खूप गोष्टी ऐकणं, अनुभवणं आणि लक्षात राहणं महत्त्वाचं. हे सगळं ‘अन् पारिजातक हसला’मध्ये खूप चांगलं प्रतिबिंबित झालं आहे
ग्रंथनामा - झलक
मिलिंद वाटवे
  • ‘अन् पारिजातक हसला!’​​​​​​​ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 09 September 2022
  • ग्रंथनामा झलक अन् पारिजातक हसला An Parijatak Hasala शिवराज पिंपुडे Shivraj Pimpude करोना Corona शाळा School मुलं Children

करोना काळ सर्वांत त्रासदायक ठरला तो विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना. कारण करोनाने शिक्षणाचं स्वरूपच बदलून टाकलं. पण याच काळात शिवराज पिंपुडे या प्रयोगशील शिक्षकांना आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवले. निसर्ग आणि विज्ञान यांच्याविषयीची माहिती मुलांना विविध उपक्रमांतून सहज स्वरूपात मिळेल हे पाहिलं. या प्रयोगाच्या त्यांनी नोंदी ठेवून त्यांचं यशापयशही तपासून पाहिलं. त्यातून ‘अन् पारिजातक हसला!’ हे कल्पक पुस्तक तयार झालंय. या पुस्तकाला ज्येष्ठ प्राध्यापक आणि संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

मी एक शिक्षक आहे. बेचाळीस वर्षांत कुठल्या ना कुठल्या प्रसंगी प्राथमिक शाळेपासून पोस्ट डॉक्टरलच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिकवण्याचा योग आला आहे. आयुष्यभरात अगदी अलीकडेपर्यंत अंगावर हाडांखेरीज दुसरं काहीच दिसत नसल्यामुळे मला ‘केवळ हाडाचा शिक्षक’ म्हणायला हरकत नाही आणि त्यावर कुणीतरी प्रस्तावना लिहायला सांगितली, हा म्हातारे झाल्याचा पुरावाही पुरेसा आहे. म्हणून माझ्या अधिकाराचा वगैरे विचार न करता श्री शिवराज पिंपुडे यांनी विनंती केल्यावर मी आपलं ‘लिहितो’ म्हटलं. करोनाच्या काळात ‘ज्ञान प्रबोधिनी, निगडी’च्या शिक्षक-विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग आणि त्यातली जबरदस्त मजा याविषयी वाचल्यावर मी ‘हो’ म्हटलं ते फार चांगलं झालं, याचा मला साक्षात्कार झाला.

मी शाळेत असताना आमचं शिक्षण तसं साचेबद्ध चाकोरीतलंच होतं. पण व्यक्तिशः काही शिक्षक विषयात खूप रस निर्माण करून शिकवत असत. अशा एखाद्या तासानंतर त्या वयात किती भारल्यासारखं व्हायचं, हे स्पष्ट आठवतंय. या संवेदनशीलतेचा ज्याला चांगला उपयोग करून घेता येतो, तो चांगला शिक्षक. मी मध्ये केव्हातरी इन्स्ट्रक्शनल मॉडेल, मॉडेल लेसन, लेसन प्लॅनिंग वगैरे शब्द ऐकले. पण शिकताना आणि शिकवताना मला एक गोष्ट नेहमी जाणवत गेली. ती म्हणजे मॉडेल कुठलंही असो, त्याचं एकदा रुटीन झालं की, त्यातला रस संपतो. ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे, आधीच आखलेल्या योजनेप्रमाणे सगळं शिक्षण चालत असेल तर समजावं की, नक्कीच काहीतरी चुकतंय. नवीन विषय शिकणं, हे नवीन रानवाटा धुंडाळणं, नवीन शिखर चढून जाणं, नवीन खजिन्याचा शोध, एखाद्या रहस्यकथेची उकल करण्यासारखं, एखादी साहसकथा स्वतः अनुभवण्यासारखं वाटलं पाहिजे. त्यासाठी त्यात अनिश्चितता, आश्चर्य, उत्कंठा, कुतूहल, नावीन्य, धाडस, नवीन कल्पना लढवून पाहू, नवी गोष्ट करून पाहू, मला हे पटत नाही; त्याला आव्हान देऊन पाहू, ही वृत्ती असली पाहिजे. यशापयशाचे ठरीव मापदंड नसले पाहिजेत. या गोष्टी कुठल्याच रुटीनमध्ये बसू शकत नाहीत. आधी आखणी करून हे आणताच येत नाही. उत्स्फूर्तता आणि अनिश्चितता यांशिवाय काही शिकण्यात किंवा शिकवण्यातही मजा नाही. शिकवण्याचं प्रभावी मॉडेल, हेच की कुठलंही ठरलेलं मॉडेल नसावं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिक्षणामागे एक विज्ञान आहे आणि शिकवणं एक कला आहे. पण कुठल्याही परिस्थितीत ते तंत्रज्ञान मात्र नाही. तुम्ही शिकवताना एखाद्या तंत्रज्ञानाचा वापर खुशाल करा, पण शिकवणं हेच तंत्रज्ञान होता कामा नये. विज्ञानात जसा पुढचा शोध कोणता आणि कसा लागणार आहे, हे सांगता येत नाही, आपल्या हातून पुढची ओळ कशी लिहिली जाणार आहे, हे कवीला स्वतःलाही सांगता येत नाही; कारण ते विज्ञान आहे किंवा कला आहे. याउलट यंत्रातून प्रत्येक पीस सारखाच निघतो, तो जसा आधी ठरवलं असेल तसाच निघतो. त्याला तंत्रज्ञान म्हणतात. तसं पुढच्या तासाला काय होणार आहे, ते आधीच सांगता येत असेल, कुठल्या तासाला काय घ्यायचं, हे अगदी योजनेप्रमाणे जात असेल तर ते तंत्रज्ञान झालं, शिक्षण नाही. पण बरीच वर्षं तोच विषय शिकवत राहिलो तर मनुष्यस्वभावाप्रमाणे त्यात नकळत एक साचेबद्धपणा येऊ लागतो.

अशा वेळी शिकवण्यात एखादा असा अडथळा यावा की, सगळी योजना आणि सगळं रुटीन कोलमडून पडावं. यासाठी करोनासारखी आणखी चांगली संधी दुसरी कुठली मिळाली असती? बहुतेक शाळा-महाविद्यालयांमधून लॉकडाऊनमुळे शिक्षणाचा बोऱ्या वाजला, अशी परिस्थिती दिसत असताना, या संधीचा वेगळे प्रयोग करण्यासाठी वापर करणं हे कुणा एका व्यक्तीचं नाही, तर प्रबोधिनीतील शिक्षणाच्या संकल्पनेचं यश आहे.

या पुस्तकाचं लिखाण वाचताना मला माझ्या विद्यार्थी म्हणून आणि नंतर शिक्षक म्हणून शिक्षणक्षेत्रात काढलेल्या जवळ-जवळ सहा दशकांमधल्या अनेक प्रसंगांची आठवण झाली. शाळेत आम्ही खूपच वात्रट मुलं होतो. आमच्या काही शिक्षकांनी यासारखे काही प्रयोग आमच्यावर केलेही होते. उदाहरणार्थ, आमच्या सहावीच्या इंग्रजीच्या सरांनी आम्हाला ‘इंग्रजी बोला’चा मंत्र दिला होता. इंटरनेट वगैरे स्वप्नातही नव्हतं. तुम्हाला अडणारे शब्द लिहून ठेवा म्हणाले, आणि मला येऊन विचारा. आमच्या टवाळपणाने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. ज्याला इंग्रजीत शब्द असणारच नाही असं आम्हाला वाटत होतं, असे शब्द मुद्दाम गोळा करून गेलो. पचक्की, अंडं झालं, डबडा ऐसपैस, रुमालपाणी, त्यातल्या  त्यात याला इंग्रजीत काय म्हणतात ते सांगा, असा आग्रह धरला. सगळ्यात शेवटी ‘कमीची मेजॉऽऽरिटी’ला इंग्रजीत काय म्हणतात असं विचारल्यावर त्यांना फक्त चक्कर यायचीच बाकी होती. त्यानंतर ‘इंग्रजीत बोला’ असा आग्रह त्यांनी किमान आमच्या वर्गावर तरी धरला नाही. आमचा हेतू केवळ मास्तरला छळणे एवढा शुद्ध आणि प्रामाणिक होता. पण त्यासाठी किती विचार, किती कल्पनाशक्ती वापरावी लागली! मुलांच्यातला हा वात्रटपणा हे शिक्षणाचं खूप महत्त्वाचं साधन आहे. कारण वात्रटपणा म्हणून आम्ही जे प्रश्न विचारले, त्यासाठी आम्हाला जेवढा विचार करावा लागला, तेवढा नुसती पाठ्यपुस्तकं वाचून नक्कीच नसता झाला.

काही-काही गोष्टी ज्या आपल्याला साधी गंमत वाटते, त्यांच्यामागे मोठं वैज्ञानिक तत्त्व दडलेलं असतं. उदाहरणार्थ, या पुस्तकात भेटणारी डोळे बंद करून वावरा, एक दिवस फक्त डावा हात वापरा यासारखी ‘व्रते’. जीवशास्त्रात एखाद्या जनुकाचं, एखाद्या रेणूचं, एखाद्या संप्रेरकाचं शरीरातील कार्य काय, हे शोधायचं असेल तर हीच पद्धत वापरतात. तो जनुक, ते प्रथिन काढून टाका आणि मग काय होतं ते पहा; म्हणजे असताना तो काय कार्य करत होता ते कळेल. एकीकडे एकेक दिवस, किंवा ताससुद्धा, गंमत म्हणून अशी काही ‘व्रत’ करण्यात आपण नकळत विज्ञानातलं एक तत्त्व शिकत आहोत, संशोधनाची महत्त्वाची पद्धत शिकत आहोत, हे तेव्हा कळलं, नाही कळलं तरी चालेल. योग्य वेळी तो अनुभव कामाला येतो. गोष्टीचं तात्पर्य गोष्टीच्या शेवटी सांगायलाच पाहिजे असं नाही. अनेक गोष्टींना अनेक तात्पर्य असतात आणि ती नंतर केव्हा तरी स्वतःलाच प्रतीत होतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खूप गोष्टी ऐकणं, अनुभवणं आणि लक्षात राहणं महत्त्वाचं. हे सगळं ‘अन् पारिजातक हसला’मध्ये खूप चांगलं प्रतिबिंबित झालं आहे.

पारिजातकावरून आठवलं, तुम्ही जसा पारिजातकाविषयी खूप चांगला प्रश्न विचारला की, प्राजक्ताच्या फुलांचा सकाळी सडा पडलेला दिसतो हे खरं. पण ती फुलं नक्की कधी उमलतात, कधी गळून पडतात हे कुणी पाहिलंय? सातपुड्यातील आदिवासींकडून मी असं ऐकलं की, मोहाच्या प्रत्येक झाडाचं फुलं गळण्याचं वेळापत्रक वेगळं असतं. काही झाडांची रात्री बारा ते दोन गळतात, काहींची पहाटे चार ते सहा, क्वचित एखाद्या झाडाची दुपारी बारा वाजतासुद्धा गळतात. अस्वलासारखे मोहाची फुलं खाणारे प्राणी हे वेळापत्रक बरोबर लक्षात ठेवतात. आदिवासींनाही ते माहिती झालेलं असतं. त्यामुळे धोकादायक प्राण्यांना शक्यतो टाळून ते भरपूर फुलं गोळा करू शकतात. कुठली फुलं अगदी ताजी असतील, कुठली थोडी शिळी असतील, हे त्यांना नेमकेपणानं माहिती असतं. पण मुळात हे असं का असावं? प्रत्येक झाडाचं वेळापत्रक वेगळं का? वनस्पतीशास्त्रज्ञांनीच हे अजून नीट नोंदवून त्यामागची कारणं शोधलेली दिसत नाहीत. पण हे निरीक्षण अगदी निरक्षर आदिवासींनीसुद्धा केलं आहे.

विज्ञानाने अजून अभ्यास केलाच नाही, अशा गोष्टी, अजून विचार केलाच नाही असे प्रश्न निसर्गात भरपूर आहेत. आपण शून्यातून सुरुवात करून आजूबाजूला पाहू लागलो, तर आपल्याला ते ठायी-ठायी दिसतील. तुम्ही नवीन शोध लावला, तरच विज्ञानात भर घातली असं नाही, तर नवीन प्रश्न विचारला तरी ती विज्ञानात मोलाची भर असते आणि अशी भर कुणीही घालू शकतं. त्यासाठी ना पैसा लागतो, ना विद्वत्ता. पण आपलं शिक्षणक्षेत्र अपेक्षित प्रश्नसंचाच्या पठडीत इतकं गुरफटलं आहे की, अनपेक्षित प्रश्नांचं महत्त्व आपण पुरेसं ओळखत नाही.

या पुस्तिकेत जर मला काही त्रुटी जाणवली असेलच तर ती ही की, असे अनेक प्रश्न उठले असतीलच. त्यापैकी ज्याला उत्तरं होती ती दिली गेली असतील, पण ज्याला आपल्याकडे अजून उत्तरच नाही, असेही अनेक प्रश्न उठले असतील. ते वेडेपणाचे वाटले तरी फार महत्त्वाचे, कदाचित क्रांतिकारी शोधाकडे नेणारेसुद्धा असू शकतात. अशा प्रश्नांना जपून, त्यांचा एक संग्रह करून तोही याच पुस्तकात छापायला हवा होता. कदाचित या पुस्तकात नाही, तर आणखी कुठल्या तरी स्वरूपात. मुलांनी विचारलेल्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नसेल, तर काही शिक्षकांना कमीपणा वाटू शकतो. पण यात कमीपणा कसला? जेव्हा एखाद्या शिक्षकाला असं म्हणावं लागतं की, अरे, या प्रश्नाचा मी आतापर्यंत कधी विचारच केला नव्हता, तेव्हा ते त्या शिक्षकाचं आणि एकूण शिक्षणपद्धतीचं सर्वांत मोठं यश असतं.

‘अन् पारिजातक हसला!’ - शिवराज पिंपुडे

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

पाने - १२०

मूल्य - १०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......