‘आटपाट देशातल्या गोष्टी’ : संग्राम गायकवाड यांची ही कादंबरी श्याम मनोहरांच्या कादंबऱ्यांपेक्षा खूप पुढं जाते…
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नीतीन रिंढे
  • ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Sat , 21 May 2022
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस आटपाट देशातल्या गोष्टी Aatpaat deshatlya goshti संग्राम गायकवाड Sangram Gaikwad

‘मानवी परस्परसंबंधांच्या त्याच त्या गुंताड्यातून बाहेर पडून व्यवस्थेच्या पातळीवर गोष्टी बघणं हे त्यासाठी जमायला पाहिजे. माणसांच्या मनांमध्ये खोल बुड्या मारण्यातून वेळ काढून व्यवस्थेच्या अक्राळविक्राळ यंत्रांमधल्या नाना चक्रांच्या दातऱ्या कशा आणि कुठे फिरत असतात, यामध्ये रस घेतला पाहिजे...’ (पृ. १९५)

‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या संग्राम गायकवाड यांच्या कादंबरीतलं वर उद्धृत केलेलं विधान ‘आटपाट देशातल्या गोष्टी’तलं मध्यवर्ती पात्र निवृत्ती याच्या तोंडचं आहे. लेखकाने काय काम केलं पाहिजे हे निवृत्ती सांगतो आहे. आयकर खात्यात मोठा अधिकारी असलेला निवृत्ती आणि मूळचा इंजिनियर आणि नंतर समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून अंशत: प्राध्यापकी आणि पूर्णवेळ एनजीओद्वारे समाजकार्य करणारा माधव – या दोघा जीवलग मित्रांमध्ये (नेहमीप्रमाणे) गप्पा सुरू आहेत. या गप्पांमध्ये काही वेळ उपस्थित राहिलेल्या आणि नंतर तिथून निघून गेलेल्या पुरुषोत्तम या माधवच्या मित्राचा वरील विधानाला संदर्भ आहे. निवृत्ती माधवला भेटायला येतो, तेव्हा माधवकडेच बसलेला पुरुषोत्तम मराठीतला ‘बऱ्यापैकी कमिटमेंटने लिहिणारा लेखक’ असतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

निवृत्ती आयकर खात्यातला मोठा अधिकारी आहे, हे समजल्यावर तो अतिशय उत्सुकतेने आयकर धाडींबद्दल अनेक प्रश्न विचारतो. आयकर धाड ही काहीतरी रोमांचक गोष्ट असते, असा पुरुषोत्तमचा अद्भुतरम्य समज असतो. निवृत्तीला त्याच्या या चौकशीचा वैताग येतो आणि पुरुषोत्तम जाताच तो आपली नाराजी माधवजवळ प्रकट करतो. पुरुषोत्तम या लेखकाला आयकर चौकशीच्या एकंदर व्यवस्थेबद्दल असंवेदनशीलता असणं आणि केवळ त्यातल्या रोमांचक गोष्टींबद्दल पराकोटीची उत्सुकता असणं निवृत्तीला चांगलंच खटकलेलं असतं.

या प्रसंगात संग्राम गायकवाड यांनी पुरुषोत्तमचं लेखक असणं एकंदरच मराठी साहित्यातल्या भाबड्या-कृतक् अनुभवविश्वावर आणि जीवनदृष्टीच्या अभावावर बोट ठेवण्यासाठी वापरलं आहे. निवृत्ती हे कादंबरीतलं मध्यवर्ती पात्र या नात्याने लेखक संग्राम गायकवाड यांच्या जीवनदृष्टीच्या अगदी जवळ जाणारं पात्र आहे. या प्रसंगात निवृत्तीच्या तोंडून लेखक संग्राम गायकवाड मराठी साहित्याबद्दलचं स्वत:चं मत मांडत आहेत, असं समजायला वाव आहे.

कारण या प्रसंगात पुढं माधव निवृत्तीला म्हणतो, ‘तू का उगाच पुरुषोत्तमवर घसरतो आहेस?... जो तो ज्याच्या त्याच्या अनुभवविश्वाप्रमाणे लिहिणार. इतकं तुला त्यांचं कुचकामी वाटतंय, तर तूच का लिहीत नाहीस मग?’ यावर, ‘कुणाला वेळ आहे इथं अशा गोष्टींसाठी, बाबा! आणि वाचेल कोण, मी जर असं काही लिहिलं तर’ असं म्हणून निवृत्ती लिहिण्याची कल्पना मोडीत काढतो.

‘आटपाट देशातल्या गोष्टी’मधला निवृत्ती लिहिण्यास तयार नसला तरी संग्राम गायकवाड यांनी मात्र हा विचार मनावर घेऊनच कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीमागची लेखक म्हणूनची आपली भूमिका संग्राम गायकवाड यांनी कादंबरीत अशा प्रकारे पेरून ठेवली आहे.

‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या कादंबरीत माणसं आहेत; त्यांच्यातले परस्परसंबंध आहेत; त्या संबंधांतला जिव्हाळा, प्रेम, असूया, द्वेष, संघर्ष असं बरंच काही आहे. पण मानवी संबंधांमधल्या भावनिक किंवा मानसिक गुंताळ्याकडे या लेखकाचा रोख नाही. त्याचा रोख आहे माणसे ज्या व्यवस्थेचा भाग आहेत, त्या व्यवस्थेच्या ‘अक्राळविक्राळ यंत्रांमधल्या नाना चक्रांच्या दातऱ्या कशा आणि कुठे फिरत असतात,’ हे शोधण्यामध्ये.

वॉल्टर बेंझ्यामिन म्हणतो की, लेखक पुस्तक का लिहितो? तर आपल्याला वाचायला हवं तसं पुस्तक इतर कोणा लेखकाने लिहिलेलं नसतं, म्हणून तो स्वत:च लिहायला बसतो. संग्राम गायकवाड यांनी ‘आटपाट देशाच्या गोष्टी’ याच कारणामुळे लिहिल्या असाव्यात. त्यांच्या आटपाट देशातल्या निवृत्तीप्रमाणे संग्राम गायकवाड यांनी लेखनाला नकार दिला नाही, हे बरं झालं. त्यामुळं मराठीला एक चांगली कादंबरी मिळाली.

व्यवस्था आणि माणसं

माणसं व्यवस्थेचा भाग म्हणून जगत असतात. व्यवस्था माणसाला प्रभावित करते हे जितकं खरं, तितकंच, माणसांच्या धारणा, हेतू हेदेखील व्यवस्थेवर परिणाम करत असतात. व्यवस्था तर पूर्वापार चालत आलेल्या आहेत. परंतु आधुनिक काळात व्यक्ती आणि व्यवस्था यांच्यात पेचदार नातं तयार झालं आहे. एकीकडे व्यक्तीला मिळालेले अधिकार, त्याची मतं-विचार यांना आलेलं महत्त्व, यांमुळे सामाजिक-राजकीय-प्रशासकीय-बाजार इत्यादी सर्वच व्यवस्थांमध्ये ‘व्यक्ती’ केंद्रस्थानी आली आहे. दुसरीकडे, या व्यवस्था अधिकाधिक अमूर्त, जगङ्व्याळ बनत चालल्या आहेत अन परस्परांत अधिकाधिक गुंतत चालल्या आहेत. भारतीय समाजासाठी या पेचाला आणखी एक आयाम आहे – तो म्हणजे व्यवस्थाबदलाचा. पाश्चात्त्य समाजातल्या व्यवस्था त्यांच्या अंगभूत परिवर्तनशील प्रवासात बदलत, विकसित होत गेल्या. भारतीय समाजात मात्र इंग्रज वसाहतवादी राजवटीच्या परिणामी पेरल्या गेलेल्या पाश्चात्त्य आधुनिक राजकीय-प्रशासकीय व्यवस्था उपऱ्या राहिल्या. त्यामुळे भारतीय समाजात या व्यवस्था आणि व्यक्ती यांच्यातलं नातं अधिकच जटिल बनलं.

‘आटपाट देशातल्या गोष्टी’ ही कादंबरी व्यक्ती आणि व्यवस्था यांच्यातल्या या जटिल नात्याचा गुंता सोडवण्याचा एक प्रयत्न आहे. भारतीय माणसांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातल्या वर्तणुकीला, त्यातील समस्यांना इथल्या आधुनिक व्यवस्थेशी असलेलं त्यांचं विजोड नातं कारणीभूत आहे, असं लेखकाचं गृहीतक आहे आणि हे गृहीतक कादंबरीच्या माध्यमातून वाचकांना पटवून देण्यात संग्राम गायकवाड यांना यश आलं आहे.

कादंबरीत सांगितलेली एक ‘गोष्ट’ असते; त्या गोष्टीच्या वाचनातून वाचकाच्या मनात काही आशयसूत्रं उभी राहतात आणि या आशयसूत्रांच्या मागे लेखकाची जीवनदृष्टी, तत्त्वज्ञान असतं. कोणत्याही कादंबरीच्या रचनेत या तीन पातळ्या एकजीव झालेल्या असल्या तर वाचकाला एक समृद्ध साहित्यकृती वाचल्याचा अनुभव येतो. ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ ही असा समृद्ध अनुभव देणारी कादंबरी आहे.

‘गोष्टी’च्या कथनरूपाचं प्रयोजन

कादंबरीच्या सुरुवातीलाच निवेदक सांगतो की या आटपाट देशातल्या गोष्टी आहेत. गोष्ट नव्हे, तर ‘गोष्टी’. अनेक कथनांनी बनलेली गोधडी म्हणजे या कादंबरीचं कथानक हे इथं हलकेच सूचित केलं आहे. ‘आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता’ अशा वाक्याने सुरूहोणारं गोष्टीचं पारंपरिक कथनरूप आपल्याला परिचित आहे. कादंबरीचं नाव या कथनरूपाची आठवण करून देणारं आहे. ‘आटपाट देशातल्या गोष्टी’मध्ये पहिलंच प्रकरण ‘स्थळ आणि काळ’ या नावाचं आहे. ज्या प्रदेशात, समाजात कादंबरीतल्या ‘गोष्टी’ घडतात, त्या स्थळाला निवेदकाने ‘आटपाट’ म्हटलं आहे आणि या देशात काळाची जाणीव चक्राकार असल्याने नेमक्या कुठल्या काळात कुठल्या गोष्टी घडल्या हे या देशात सांगणं अवघड असतं, अशी टिप्पणी त्याने केली आहे.

आपल्या पारंपरिक गोष्टींचे स्थलकालाचे संदर्भ स्पष्ट नसतात. म्हणजे वास्तवात खरोखरच्या स्थळाशी ओळख सांगणारी स्थळं गोष्टीत नसतात. गोष्टीतल्या काळाचंही प्रत्यक्षात खरोखर घडून गेलेल्या विशिष्ट कालखंडाशी नातं दाखवलं जात नाही. उलट, ‘स्थलकालाशी निगडित असणं’ हे आधुनिक कादंबरी या साहित्यप्रकाराचं खास वैशिष्ट्य आहे. कादंबरी वाचत असताना वाचकाच्या मनात कादंबरीतल्या स्थळाशी आणि काळाशी प्रत्यक्षातल्या जुळणाऱ्या काळाचे संदर्भ जागे होत जातात. कादंबरीतलं कल्पित जग प्रत्यक्षातल्या वास्तवाशी अशा प्रकारे जुळणं हे कादंबरीचं प्रमुख लक्षण आहे.

लेखक संग्राम गायकवाड यांनी मात्र कादंबरीतल्या कल्पित स्थळकाळाला वास्तव संदर्भ न देता पारंपरिक गोष्टी-कहाण्यांमधला ‘कोणे एके काळी एक आटपाट नगर होतं’ या प्रकारचं कथनरूप वापरून स्थळकाळाची ओळख पुसून टाकली आहे. परिणामी, कथा अमक्याच काळात अगर अमक्याच ठिकाणी घडते असा काही ठसा वाचकावर उमटत नाही आणि स्थळकाळाचं लेखकाला अभिप्रेत असलेलं ‘भान’ तो वाचकाला देऊ शकला आहे. ते भान म्हणजे : या कादंबरीतला लेखकाने मांडलेला पेच केवळ विशिष्ट समाज, समाजगट, समूह विंâवा विशिष्ट काळ यांच्यापुरता मर्यादित नसून – काळाच्या अक्षावर पूर्वीपासून प्रवाहित होत आलेल्या भारतीय समाज नावाच्या वास्तवातला हा पेच आहे. खरं तर कोणतीही चांगली साहित्यकृती ‘विशिष्टा’चं दर्शन घडवत असताना ‘समष्टी’कडेच निर्देश करत असते. पण ‘आटपाट…’चं वैशिष्ट्य म्हणजे इथे ‘व्यक्ती’ आणि ‘समष्टी’ हे दोन ध्रुव कादंबरीच्या रचनाबंधातच उभारून या दोहोंच्या दरम्यान कादंबरीच्या कथानकाची वीण विणली आहे.

‘समष्टी’च्या वास्तवाकडून ‘व्यक्ती’च्या नैतिकतेकडे

‘स्थळ आणि काळ’ या व्यापक अवकाशबिंदूपासून कादंबरी सुरू होते. निवृत्ती, मल्हार आणि माधव या मुख्य व्यक्तिरेखांची, त्यांच्या सामाजिक-कौटुंबिक पार्श्वभूमीची ओळख करून दिली जाते. त्यानंतर ‘फॅक्ट इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’, ‘माधवचं विश्लेषण’, ‘नेशन आणि एकमय लोक’ या प्रकरणांतून आपला आधुनिक समाज, त्याच्या रचनेतले आणि वर्तनातले अंतर्विरोध, ढोंगीपणा, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून याची कारणमीमांसा इत्यादी भाग येतो. याचं कथन प्रामुख्याने माधवचं वाचन-चिंतन आणि त्याचं अध्यापन, माधव-निवृत्ती यांच्यातल्या चर्चा यांच्या द्वारे केलं जातं. एकंदर समाजव्यवहारावर, समष्टीवर आपली दृष्टी झूम करून निवेदक या भागाचं कथन करतो.

निवृत्ती, माधव आणि मल्हार या तीन मित्रांच्या व्यक्तिरेखा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. तिघेही मित्र उच्चशिक्षित, वाचन आणि विचार करणारे; निवृत्ती आणि मल्हार प्रशासनातले उच्चपदस्थ अधिकारी, तर माधव एनजीओ कार्यकर्ता. शिक्षण, उच्च पदावरची नोकरी/व्यवसाय यांमुळे या तिघांनाही लौकिक दृष्टीने सर्वसामान्य समाजाहून वरची पातळी प्राप्त झाली आहे. पण या तिघांनाही समाजाबद्दल, माणसाबद्दल फार वाटतं. विशेषत: माधवचं वाचन फार चांगलं आहे. निवृत्ती आणि मल्हार दोघंही संवेदनशील आहेत. अर्थात, मित्र असले तरी ते समविचारी नाहीत. स्वत:च्या आयुष्याविषयी आणि भोवतालच्या समाजाविषयी या तिघांच्याही धारणांमध्ये असलेले फरक अधोरेखित करून लेखकाने कादंबरीतल्या मुख्य प्रश्नाकडे पाहण्याचे किमान तीन कोन निर्माण करून ठेवले आहेत : निवृत्ती आधुनिक, विवेकवादी आहे. रॅशनल विचार आणि व्यवस्था यांच्याकडे त्याचा झुकाव आहे. जीवनातल्या पारंपरिक धाग्यांबद्दल त्याच्याही मनात एक हळवा कोपरा टिकून आहे. ‘श्राद्ध’ आणि ‘चंद्रहीन’ या प्रकरणांमध्ये तो दिसतो. पण ते स्वीकारूनही तो आधुनिक मूल्यव्यवस्थेबाबत मात्र ठाम आग्रही आहे. त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला तो तयार आहे.

याच्या उलट माधव परंपरेकडे आस्थेने, किमानपक्षी सहानुभूतीने पाहणारा आहे. किंचित देशीवादी. जुन्या धार्मिक, जातीय आयडेटिटींनी बनलेला आपला समाज आणि त्यावर आधुनिक व्यवस्थांचं झालेलं कलम – या वास्तव परिस्थितीबाबत विचार करताना माधव पारंपरिक व्यवस्थांकडे अधिक झुकतो. कादंबरीतून लेखकाने व्यक्त केलेल्या जीवनदृष्टीला समाजशास्त्रात मांडल्या गेलेल्या ज्या विचारांचा आधार आहे, त्या ‘कम्युनिटी’ आणि ‘असोसिएशन्स’ यांच्या द्वैताविषयीचा विचार प्रथम माधवनेच पुस्तकात वाचला आहे. माधवच्या माध्यमातून हा विचार या कादंबरीत शिरतो आणि संपूर्ण कथानकात वेगवेगळ्या संदर्भात फिरवला जातो. लेखकाने आपली लेखकीय कौशल्यं पणाला लावून ही गुंफण केली आहे.

मल्हार या दोघांहून किंचित वेगळा आहे. तो अधिक ‘सर्वसामान्य’ आहे. मल्हारला आधुनिक मूल्यव्यवस्था मोलाची वाटते. पण प्रत्यक्ष जीवनात मिळतंजुळतं घेऊन जीवन जगण्याला तो प्राधान्य देतो. वहिवाटी मोडून आपलं आधुनिकत्व सिद्ध करावं एवढा उत्साह किंवा निकड त्याला नाही. तरीही तो माधव आणि निवृत्तीचा मित्र मात्र आहे. कथानकात त्याला महत्त्वाचं स्थानही आहे.

यानंतर कादंबरीतल्या मुख्य तीन पात्रांशिवाय इतरही अनेक पात्रांच्या अनेक गोष्टींमधून परस्परांना जोडलेली, परस्परांमधून फुटून इतरत्र जाणारी उपकथानकं कादंबरीच्या कथानकाला पीळ देत पुढं जात राहतात. केव्हा तरी त्यांची आयुष्यं परस्परांना छेदतात आणि चकमक झडते. ज्याविषयी या मित्रांची आपसांत झडझडून चर्चा होते, मदभेद होतात, ते समाज-व्यवहाराविषयीचे प्रश्न चर्चेच्या, विचाराच्या पातळीपुरते मर्यादित न राहता खुद्द त्यांच्या जीवनावर आघात करतात आणि या मित्रांच्या संवादी आत्मीय नात्याला सुरुंग लावतात. याला सुरुवात निवृत्ती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका कंपनीवर टाकलेल्या धाडीपासून होते. माधवचं चिंतन, माधव-निवृत्ती यांच्यातल्या चर्चा यांतून वाचकाला मिळालेल्या मर्मदृष्टींच्या प्रकाशात कथानकातल्या या विविध प्रवाहांची – त्यातून प्रकटणाऱ्या समाजवास्तवाची संगती वाचक लावत जातो. कथानकाच्या अखेरच्या टप्प्यावर हे धाड प्रकरण प्रसरण पावत असताना त्यात सापडत जाणाऱ्या अनेकांपैकी एक ‘शक्तिशाली’ व्यक्ती निवृत्तीच्या खास मित्राचा – मल्हारचा – सासरा असल्याचं कळतं, आणि सर्व गोष्टींचे संदर्भ बदलून निवृत्ती पाहता पाहता एका वादळाच्या तोंडाशी येऊन उभा राहतो.

इथं ‘आटपाट...’ ही कादंबरी समष्टीकडून ‘व्यक्ती’ या ध्रुवाकडं येते. ‘समाजवास्तवा’कडून ‘व्यक्तिगत नैतिकते’कडं येते. नैतिकतेविषयीचा निवृत्तीसमोर प्रश्न उभे करत संपते. समाजरचनेच्या पेचापासून सुरुवात करून व्यक्तीच्या नैतिकतेच्या पेचापर्यंत पोहोचणं हा मोठा पल्ला या कादंबरीने गाठला आहे.

निवृत्ती हा नैतिक मूल्यं जपणारा माणूस आहे. त्याच्या जाणिवा आधुनिक आहेत. त्या दृष्टीकोनातून तो पारंपरिक मानसिकतेच्या आपल्या भोवतालच्या लोकांबद्दलची नापसंती सतत व्यक्त करत राहतो. अशा मानसिकतेचा समाजव्यवहार त्याला जराही मान्य होत नाही. पण जेव्हा, आपल्या एका निर्णयावर मित्राच्या कुटुंबाचं उद्ध्वस्त होणं न होणं अवलंबून की नाही हे अवलंबून आहे हे त्याला कळतं, तेव्हा त्याच्यासमोर पेच उभा राहतो. त्याने आजवर प्रमाण मानलेल्या मूल्यांशी प्रतारणा करायची की मूल्यांवर ठाम राहून नाती तुटणं सोसायचं या पेचापाशी कादंबरी थांबते, निर्णय घेण्याच्या जबाबदारीचा वेताळ वाचकाच्या खांद्यावर टाकून.

संग्राम गायकवाड यांना यातून सुचवायचं आहे की, हा निर्णय घेणं इतकं सोपं नाही. कादंबरीच्या प्रारंभापासून भारतीय समाजाचं आणि त्यातील व्यवहारांचं जे चित्र निवेदकाने वाचकासमोर उभं केलं आहे, ते लक्षात घेऊन हा निर्णय घ्यायचा आहे. समष्टीचा लेखकाने आधी कादंबरीभर मांडलेला आलेख म्हणजे एकप्रकारे कादंबरीच्या अखेरीस निर्माण झालेल्या नैतिक पेचासंदर्भात निर्णय घेण्याची पूर्वतयारी आहे. निर्णय काय घ्यायचा? माधवच्या म्हणण्याप्रमाणे जुन्या ‘कम्युनिटी’प्रधान व्यवस्थांद्वारे आपल्या समाजाची घडण झालेली आहे हे ध्यानात घेऊन सामोपचाराने वागायचं? त्यासाठी नीति-अनीतीचा प्रश्न थोडा बाजूला ठेवायचा? की मग निवृत्तीला वाटतंय त्याप्रमाणे ही कम्युनिटीप्रधान व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय नवा समाज जन्माला येणारच नाही हे लक्षात घेऊन निर्दयीपणे मूल्यांना चिकटून राहायचं? ‘असोसिएशन’प्रधान व्यवस्था उभी राहण्यासाठी वैयक्तिक नातेसंबंधांचे तंतू तुटकपणे तडातड तोडून टाकायचे? आणि आधुनिक मूल्यांवर जगणारा विवेकप्रधान समाज घडवायचा? त्यासाठी कुटुंबापासून, स्वकींयांपासून एकटं पडण्याची किंमत मोजायची?

‘आटपाट देशातल्या गोष्टी’चं वेगळेपण

निवृत्तीला ‘माणसांपलीकडची व्यवस्था दिसते’ (पृ. २४५). त्याच्या निष्ठाही त्या व्यवस्थेवर असतात. मध्यवर्ती पात्र म्हणून निवृत्ती हा कादंबरीतला ‘लेखकाचा माणूस’ आहे. त्यामुळे निवेदकाची सहानुभूती स्वाभाविकच निवृत्तीला अधिक आहे. पण तरीही लेखकाने कादंबरीत माधव, मल्हार, निवृत्तीची बायको अमला आणि इतरही अनेक पात्रांच्या जीवनाविषयीच्या धारणा-विचारांना स्थान दिलं आहे. कादंबरीला एक मध्यवर्ती पात्र असलं, तरी कादंबरीच्या निवेदनाचा ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ मात्र सारखा बदलत राहतो. त्यात अंत्यविधीला येणाऱ्या मृतदेहांमधले स्टेंट जमवून त्यांचा संग्रह करणारा स्मशानातला कर्मचारी सुरेश, किंवा साहेबरावांच्या ऑफिसातला शिपाई खंडू यांच्यासारख्या अगदीच किरकोळ पात्रांचे हेतू, प्रश्न, जिज्ञासा इत्यादी गोष्टींनी कादंबरीच्या कथनप्रवाहात स्थान मिळवलं आहे.

वाचकाला त्याच्या भोवतालच्या परिचित जीवनाचे अनेक अतिपरिचित कंगोरे या कादंबरीत सापडतील. लेखकाने जागोजागी त्या कंगोऱ्यांना अणकुचीदार करून वाचकाच्या संवेदनशीलतेला खरवडलं आहे. त्यामुळं या कादंबरीतलं ‘समाजचित्र’ हे बऱ्यापैकी नकारात्मक उभं राहतं.

एकाच माणसात अनेक माणसं असणं आणि त्यांचा परस्परांशी संबंध नसणं (पृ. ५९), सार्वजनिक नीतिमत्तेशी देणंघेणं नसलेल्या, भ्रष्टाचारी आप्तमित्रांचं कौतुक करणारे निवृत्तीचे नातेवाईक (पृ. ७०) या गोष्टींची निवृत्तीला चीड येते. सार्वजनिक पातळीवरचे नियम/संस्थात्मक पारदर्शकता न पाळणं, हा जास्त मोठा भ्रष्टाचार आहे असं निवृत्तीला प्रामाणिकपणे वाटत असतं (पृ. २३९). पण बहुतांश लोक तसेच जगताना त्याला दिसत असतात. निवृत्तीने मेख एंटरप्रायजेसवर धाड टाकण्यापूर्वी कादंबरीतल्या इतर पात्रांच्या जीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये हेच अप्रामाणिकपणाचं, अनैतिकतेचं चित्र निवृत्तीला दिसत असतं आणि डाचत असतं. स्टेंटमधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण, सोनमोर हत्येचं प्रकरण ही याची उदाहरणं. मित्र-गोतावळा जोपासून आयुष्यभर त्यांच्याकडून आपली कामं करून घेत लोकांचं पुढंपुढं विंâवा वर वर जात राहणं हे तर कादंबरीभर दाखवलं आहे. संग्राम गायकवाड यांनी याला शब्द वापरला आहे – ‘संपर्कलोलुप’.

पण या चित्राची दुसरीही बाजू संग्राम गायकवाड यांनी या कादंबरीत दाखवली आहे. माधव हा निवृत्तीचा ज्ञानी, चिंतनशील मित्र आपल्या समाजाच्या या निराशाजनक वाटणाऱ्या चित्राविषयी वेगळा दृष्टीकोन मांडतो. समाजशास्त्रातल्या एका संकल्पनेचा आधार घेत मांडलेला हा दृष्टीकोन असा : हजारो वर्षांची परंपरा असलेला भारतीय समाज ‘कम्युनिटी’प्रधान व्यवस्थेला अनुसरत आला.

या व्यवस्थेत परस्परांमधल्या संबंधांना सर्वाधिक महत्त्व असतं. अशा संबंधांमधूनच लोकांचं वर्तन होत राहतं आणि समाजाचा गाडा पुढे जात राहतो. ब्रिटिशांमुळे ही पारंपरिक व्यवस्था एकदम बाजूला फेकून नवी ‘असोसिएशन’केंद्री समाजव्यवस्था इथं बसवण्यात आली. लोकांची मानसिकता ‘कम्युनिटी’प्रधान आणि प्रत्यक्ष व्यवस्था मात्र ‘असोसिएशन’प्रधान; या अंतर्विरोधाचा प्रभाव आपल्या सगळ्या खाजगी-सार्वजनिक वर्तनावर पडला आहे. त्यामुळे ज्याला निवृत्ती भ्रष्टाचार, ओळखींचा वापर करून स्वार्थ साधण्याचा अप्रामाणिकपणा म्हणतो, तो समाजाच्या लेखी निव्वळ एक सोयीचा एक व्यवहार असतो.

..................................................................................................................................................................

या कादंबरीतील एका प्रकरणाचा संपादित अंश वाचण्यासाठी पहा -

आटपाट देशातल्या अचाट, पण अफाट नसलेल्या गोष्टी!

..................................................................................................................................................................

सोनमोरांच्या प्रकरणात हे दिसतं. सोनमोरांची शिकार करणाऱ्या तरुणांना अटक होते, परंतु हे तरुण ज्या समाजातून आले आहेत, त्या समाजाचं गेल्या हजारो वर्षांपासून या सोनमोर नावाच्या पक्ष्याशी प्रेमाचं नातं आहे. पण आधुनिक सरकारने सोनमोरांच्या रक्षणासाठी कायद्याची, नियमांची नवी चौकट उभारताना त्यात या समाजाचा विचार केला नाही. उलट त्याला खलनायकाचं स्थान मिळालं. त्यामुळे या समाजातल्या नव्या पिढीच्या मनात सोनमोरांविषयी द्वेष निर्माण झाला. अशा रीतीने दोन भिन्न प्रकृतींच्या व्यवस्थांची सांगड न बसल्यामुळे आपल्या समाजातल्या बहुतेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असा एक समंजस दृष्टीकोन या कादंबरीतून लेखकाने मांडला आहे. माधव आणि इतर काही पात्रांच्या द्वारे हा दृष्टिकोन पुढे येतो. निवृत्तीच्या मूल्यनिष्ठेसमोर लेखकाने हा मूल्यविचार ठेवला आहे.

निवृत्ती म्हणतो, ‘मला व्यवस्था ढासळवायची नाहीय, एक बारकी प्रोसेस पक्की करून बसवायची आहे.’ (पृ. २६०) आपल्या कृतीने व्यवस्थाबदल तर होणारच नाही, याची त्याला पक्की खात्री आहे. म्हणूनच, ‘एक साधा तरंग जरी उठणार असेल तरी तो पुरेसा आहे मला.’ असं तो म्हणतो (पृ. २५९). निवृत्तीसमोरच्या व्यक्तिगत नैतिक प्रश्नाला माधव एका व्यापक सामाजिक प्रक्रियेच्या चौकटीत नेऊन ठेवतो : ‘हे सगळं शेवटी आटपाटाच्या संदर्भात बघितलं पाहिजे. निवृत्ती हे अजिबातच लक्षात घेत नाही. एकदैवतवादी पाश्चात्त्यांनी पूर्वी धर्मप्रसाराच्या प्रेरणेतून ऊर्जा मिळवून जग पादाक्रांत केलं. आता त्यांचा पूर्वीचा देव उत्क्रांत झालाय. नवी मूल्यं, नव्या कल्पना आणि नव्या रचना या निरनिराळ्या निराकार रूपात तो आता वावरतो आहे. या रचना जशाच्या तशा अंगीकारण्याचा कसला आलाय अट्टहास? हे म्हणजे बाटगे जास्त कट्टर असतात, तसं झालं. काही नवी मूल्यं आणि नियम आपल्या इथल्या जुन्या टिकाऊ रचना आणि व्यवस्थांच्या विरोधात जात असल्यामुळे अशी विपरीतता येते आहे... मुळात हे नवं सगळंच किती मौलिक आणि टिकाऊ आहे, हाही एक यक्षप्रश्न आहेच...’ (पृ. २३९).

नैतिक प्रश्नाचा निर्णय घेण्याची जबाबदारी वाचकावर टाकली असली, तरी आपल्या सामाजिक स्थितीचं निदान आणि त्या स्थितीची कारणमीमांसा मात्र संग्राम गायकवाड यांनी नेमकेपणाने केली आहे. त्यामुळे या स्थितीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन वाचकांना मिळतो. ही स्थिती बदलण्याचे मार्ग अनेक असू शकतील. निवृत्तीच्या रूपाने लेखकाने एक संभाव्य मार्ग दाखवला आहे. माधवच्या रूपाने या मार्गावर प्रश्नचिन्हसुद्धा उपस्थित करून ठेवलं आहे. निवृत्ती आणि माधव या दोघांच्याही विचारांचा धागा पकडून इतर मार्ग शोधण्याची जबाबदारी लेखकाने वाचकावर टाकली आहे.

अव्वल दर्जाचं ‘फिक्शन’

आधी म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टींची गोधडी, त्यांना विणणारे समाजस्थितीविषयीच्या आशयसूत्रांचे समान धागे; अनेक पात्रांच्या या गोष्टींमधून प्रकटणारे त्या त्या पात्रांचे जीवनाविषयीचे विचार-धारणा – या सर्वांचा कोलाज उभा करून संग्राम गायकवाड यांनी ही आटपाट देशातली गोष्ट गुंफली आहे. निवेदक एका मध्यवर्ती पात्राच्या नजरेतून सर्वत्र बघत असला, तरी जागोजागी इतर पात्रांच्या ‘आवाजा’ला जागा करून देणारा या कादंबरीचा घाट मराठीत एरवी दुर्मीळ आहे.

लेखकाला कादंबरीच्या आधुनिक कथनरूपापेक्षा पारंपरिक गोष्ट सांगण्याचा बाज अधिक प्रिय आहे. (आधुनिक ‘असोसिएशन’प्रधान व्यवस्थांप्रमाणेच) इंग्रजांकडून आपण उसन्या घेतलेल्या कादंबरीचा आकृतिबंध ‘बेचव’ आहे असं निवेदक कादंबरीच्या सुरुवातीलाच म्हणतो (पृ. ०९). नंतरही नचिकेत नावाचं एक किरकोळ पात्र निवृत्तीला म्हणतं, ‘गोष्टीतून जे समजतं, ते दुसऱ्या कशातूनच समजत नाही.’ (पृ. १७१). पाश्चात्त्यांच्या आधुनिक व्यवस्थांच्या प्रेमात असलेलं मध्यवर्ती पात्र उभं करतानाही त्याच्या विपरीत असं पारंपरिक कथनपरंपरेविषयीचं प्रेम लेखकाने कथनात गुंफून ठेवलं आहे. अशा परस्परविरुद्ध विचारांच्या प्रकाशात इथली माणसं आणि त्यांच्या जीवनातले पेच यांच्याविषयी अधिकाधिक खोलात जाऊन घेतलेला शोध ही या कादंबरीच्या रूपाने झालेली एक मोठी उपलब्धी आहे.

‘शोध घेणारी कादंबरी’ असं म्हटलं की मराठीतले ज्येष्ठ कादंबरीकार श्याम मनोहर यांची आठवण होणं अपरिहार्य आहे. कारण त्यांनी ‘शोधाचं फिक्शन’ नावाची एक कल्पना अलीकडेच मांडली आहे (‘मौखिक आणि लिखित’ – श्याम मनोहर, पॉप्युलर प्रकाशन). त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आधीच माहीत असलेलं पुन्हा नव्याने सांगणारं साहित्य, म्हणजे कादंबऱ्या खूप लिहिल्या जातात. परंतु वाचकाला अज्ञात असणारं कल्पनाशीलतेने मांडणारं साहित्य, म्हणजे फिक्शन हे फार कमी लिहिलं जातं. त्यांच्या स्वत:च्या कादंबNया असं ‘शोधाचं फिक्शन’ आहे, असा त्यांचा दावा आहे.

श्याम मनोहरांनी त्यांच्या ‘फिक्शन’मधून आपल्या समाजातल्या ज्या अवगुणांचा शोध लावला आहे, तसेच अवगुण ‘आटपाट देशातल्या गोष्टी’तही दाखवले आहेत. श्याम मनोहरांनी समाजाच्या दुखण्याचं निदान केलं आहे; संग्राम गायकवाड यांनीही तेच केलं आहे. पण त्यांची ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ ही कादंबरी समाजाच्या केवळ अवगुणांचं चित्र रंगवण्यासाठी लिहिलेली नाही. आपल्या समाजात दांभिकता आहे आणि ज्ञानाची लालसा नाही, या शोधापाशी श्याम मनोहरांच्या अलीकडच्या सर्व कादंबऱ्या थांबल्या आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

श्याम मनोहर जिथं थांबतात, तिथून संग्राम गायकवाड यांचा शोध सुरू होतो. ‘आटपाट देशातल्या गोष्टी’मध्ये लेखकाने ऐरणीवर घेतलेला प्रश्न ‘आपल्या देशात हे अवगुण का निर्माण झाले?’ असा आहे. याचा शोध घेतल्याशिवाय त्या अवगुणांवर मात करण्याचा मार्ग सापडणार नाही, अशी लेखकाची खात्री आहे. असा काही मार्ग या कादंबरीतून दाखवला नाहीच; उलट निवृत्तीच्या एककल्ली वर्तनाचा अतिरेक दाखवत, असा एकच एक मार्ग असू शकत नाही असंच लेखकाने सुचवलं आहे. परंतु ‘आपल्या समाजाच्या अवनतीची कारणमीमांसा’ ही या कादंबरीची सर्वांत मोठी उपलब्धी होय. केवळ स्थितीचं निदान न करता त्या स्थितीच्या उगमाच्या कारणांचा शोध घेण्यापर्यंत ही कादंबरी जाऊन पोहोचली आहे.

श्याम मनोहरांनी ‘खूप लोक आहेत’ पासूनच्या सर्वच कादंबऱ्यांतून वेगवेगळ्या प्रवृत्तींची कॅरिकेचर्स उभी केली आणि त्यातून आपल्या समाजात कोणकोणते दोष आहेत त्यांचा ‘शोध’ लावला. केवळ काय आहे, हे सांगणारा लेखक आणि आहे ते का आहे, हे सांगणारा लेखक – अशा दोघांमधला दुसरा लेखक अधिक मूल्यवान लिहितो असं म्हणावं लागेल. या न्यायाने श्याम मनोहरांनी स्वत:च्या कादंबऱ्यांचं श्रेष्ठत्व ठसवण्यासाठी निर्माण केलेला ‘शोधाचं फिक्शन’ हा प्रमुख मापदंड मानला, तर त्या कसोटीवर संग्राम गायकवाड यांची ‘आटपाट देशातल्या गोष्टी ही कादंबरी श्याम मनोहरांच्या कादंबऱ्यांपेक्षा खूप पुढं जाते, असं म्हणावं लागेल.

‘आटपाट देशातल्या गोष्टी’ - संग्राम गायकवाड

मनोविकास प्रकाशन, पुणे

पाने - २६७

मूल्य - ३५० रुपये.

(अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक ‘अक्षरयात्रा (२०२१-२०२२)’मधून साभार)

.................................................................................................................................................................

लेखक नीतीन रिंढे प्राध्यापक व ग्रंथसंग्राहक आहेत.

neegrind@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Sagar Shankar

Wed , 25 May 2022

जबरदस्त विश्लेषण.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......