‘घाचर घोचर’ : आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत! (भाग १)
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
भाग्यश्री भागवत
  • ‘घाचर-घोचर’ या कादंबरीच्या कन्नड, इंग्रजी, हिंदी आणि मराठी आवृत्तीची मुखपृष्ठं आणि कादंबरीकार विवेक शानभाग
  • Thu , 13 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस घाचर घोचर Ghachar Ghochar विवेक शानभाग Vivek Shanbhag

‘घाचर-घोचर’ ही मूळ कन्नड कादंबरी. आजवर तिचा जगभरातील २० हून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या ‘टाइम्स लिटररी रिव्ह्यू’पासून अनेक प्रतिष्ठित माध्यमांनी तिची आतापर्यंत दखल घेतली आहे. नुकताच या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. अशा या कादंबरीचा मूळ कन्नडवरून अपर्णा नायगावकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. जुलै २०१८मध्ये प्रकाशित झालेला हा अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊन, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या अनुवादित कादंबरीविषयीचा हा तीन भागांतला दीर्घ लेख...

..................................................................................................................................................................

१.

‘घाचर घोचर’ वाचून संपली, पण चिमटीत पकडता येईना. विचार करायला जावं, तर दोन टोकाच्या उपमा एकत्र रुंजी घालत होत्या. एकीकडे सुरुंग वाटत होता, दुसरीकडे भेसळ केल्याशिवाय मुशीत घालताच न येणारं द्रवरूप सोनं; आणि निवेदन? - एखाद्या ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’सारखं! समोरच्या कोंबड्यांच्या झुंजीची मजा घेता घेता फास अचानक आपल्याभोवतीच आवळताहेत असं वाटायला लावणारं... धारदार; पण दुसरीकडे तितकंच कवळून घेणारं! काय आहे हे? मन एका विचारापाशी येऊन थांबलं – हे एखाद्या अव्यक्त, अतोनात, पण दुरावलेल्या दुखऱ्या प्रियकरासारखं आहे; ज्याच्यातल्या वेदनेत सामावून नाही घेता येत नाही आणि त्या वेदनेतून सुटताही येत नाही; अशा शापित आत्म्यासारखी आहे ही कादंबरी – ‘घाचर घोचर’!

वास्तविक कथा, कादंबरी किंवा कुठलंही साहित्य मानवी नातेसंबंधांचा तळ शोधत असतं, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं; पण हा तळ असतो कुठे? हा तळ म्हणजे माणसाचं मनोविश्व किंवा मनोव्यापार. माणूस प्रत्यक्ष व्यवहारात नातं जितकं आणि जसं निभावत असतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी, अधिक वेगाने आणि अनेक गुंफण-गुंते करून तो हे नातं आपल्या मनोविश्वात सतत घोळवत ठेवत असतो. या गुंफण-गुंत्यांनाच शानभाग ‘घाचर घोचर’ म्हणतात आणि यातला एक एक धागा आपल्यापुढे उधेडून ठेवतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

एका सरळ वाक्यात सांगायचं, तर ही एका उच्च मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय स्तरात जाऊ घातलेल्या निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट आहे. या कादंबरीतली दृश्यमान पात्रं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत; घटना-प्रसंग पन्नासदेखील भरतील-न भरतील; पानं दीडशेसुद्धा नाहीत, पण मनोव्यापार मात्र सगळं प्रत्यंतर कवेत घेणारा!

कादंबरीत एका ठिकाणी नायक-निवेदक आपल्या बायकोच्या अनुषंगाने बोलताना म्हणतो, ‘अनिता सांगितलं म्हणून ऐकणाऱ्यातली नव्हती आणि मनात असेल ते बोलायला घाबरणारीही नव्हती. तत्त्वासाठी कोणत्याही थराला जाईल, अशी होती ती... नोकरदाराचा घर-संसार व व्यवसाय करणाऱ्यांचा घर-संसार यांत नीतिमत्तेचा फरक असतो.’

वास्तविक, या शेवटच्या वाक्यात कादंबरीचा सगळा तोल सामावलेला आहे. या वाक्यातल्या अर्थाची आवर्तनं आणि अनर्थ हे संपूर्ण कादंबरीभर पाहायला मिळतात. शानभाग एका मुलाखतीत म्हणतात तसं, ‘सुबत्ता येणं ही वेगळी गोष्ट असते आणि ती झेपणं ही वेगळी’. स्थित्यंतराच्या प्रक्रियेतल्या या कुटुंबाला अचानक मिळालेली ही सुबत्ता, ही स्पेस झेपत नाही, आणि ती हळूहळू त्यांचा विवेक पोखरून टाकते. मात्र ही माणसं मध्यमवर्गीय मूल्यांपासून पूर्णपणे सुटी झालेली नाहीत. त्यामुळे ती पुन्हा पुन्हा जखमी होत राहतात, पण त्या जखमा स्वीकारू मात्र शकत नाहीत. कारण हा स्वीकार वेदनेच्या मुळाशी घेऊन जाणारा आणि प्रसंगी त्यांची सगळी सुबत्ता आणि सुविधा मोडीत काढणारा ठरणारा असतो आणि याची दबा धरून बसलेली जाणीव या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या वर्तन-विसंगतीत स्पष्टपणे दिसते.

२.

या कादंबरीची सुरुवात आलिशान कॉफी हाऊसच्या वर्णनानं होते. तिथल्या एकूण वातावरणाचं वर्णन आणि निवेदन यांतून नायक स्वतःचं जे वर्तन उभं करतो, त्यातून वाचकाला नायकाचा स्तर आणि त्या स्तरावर असलेल्या सोनेरी वर्खाची कल्पना येते. सोनेरी वर्खाच्या पार्श्वभूमीवर निवेदक कॉफी हाऊसमध्ये नियमित येणाऱ्या एका तरुण-तरुणीमधलं भांडण फक्त अ‍ॅड्रेस करतो. म्हणजे त्या तरुणीच्या अ‍ॅक्शन्स आणि त्या तरुणाच्या अ‍ॅक्शन्स यांचा फक्त तपशील सांगतो; या तपशिलात दोघांच्या भांडणातले शब्द नाहीत; त्या दोघांची निवेदकानं केलेली जुनी निरीक्षणं आणि आडाखेही नाहीत. वाचकाच्या मनात कुठल्याही रंगाची पार्श्वभूमी तयार न करता, कॉफी हाऊसच्या सोनेरी बॅकड्रॉपवर थेट हा मूकपटातल्या प्रसंगसारखा प्रसंग उभा राहतो. ज्याप्रमाणे अवाजवी साधनांच्या सोसाशिवाय उपलब्ध अवकाशाला अभिनयात सामावून घेऊन उत्तम नाट्य उभं राहतं, तसंच इथं घडतं.

कादंबरीभर अनेक ठिकाणी कादंबरी आणि नाट्य यांच्या सीमारेषा ‘क्लोज कट’ मारताना दिसतात. या बिनीच्याच प्रसंगात उच्चभ्रू स्तराच्या महत्त्वाच्या बाजूचं बीभत्स रूप समोर येतं. प्रसंगातल्या तरुणीच्या ॲक्शनमध्ये जो आक्रस्ताळेपणा आहे, तो काय सांगत नाही! या स्तरातल्या वेगवेगळ्या पातळ्यांवरचं ढोंग तो उघडं पाडतो. ‘बाई’ असणं या स्तरात ज्या प्रकारे ‘टूल’ म्हणून वापरलं जातं, ते निवेदनातून उघड होतं. या स्तराचा भाग म्हणून जगताना सभ्यतेच्या आणि बाईच्या आदराच्या नावाखाली पांघरला जाणारा हा सेन्सिटिव्हिटीचा बुरखा या स्तरातला प्रत्येक जण वाहत असल्याचं निवेदनातून अगदी स्पष्ट होतं. अशा प्रकारच्या आक्रस्ताळेपणातली मुजोरी कळूनसुद्धा बाईपणाच्या नावाखाली अशा आक्रस्ताळेपणाला या स्तरातल्या समाजाची जणू मूकसंमती मिळते.

निवेदक म्हणतो, ‘इथे बसलेल्या सर्वांनी नाटकाचा एखादा प्रवेश पाहावा, तसा तो प्रसंगच शांतपणे पाहिला’. यानंतर त्या प्रसंगाबद्दल तिथला वेटर जेव्हा निवेदकापाशी ‘प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, सर’ अशी टिप्पणी करतो, तेव्हा वाचक म्हणून आपल्याला चपराक बसते. कारण हे वाक्य पुढे आल्या क्षणी आपण त्याच प्रसंगाची, पण जेंडर बदलून कल्पना करून पाहतो. त्या क्षणी दंभाचा आणखी एक भोपळा फुटतो. तो कुठला? तर माणूसपणाच्या समाजाच्या कक्षा वाढाव्यात म्हणून ज्यांनी स्वातंत्र्य, समता, सहिष्णूता, अभिव्यक्ती यांसारख्या मूल्यांसाठी आयुष्य पणाला लावलं, त्या मूल्यांना वर्तनात स्थान देण्याऐवजी आपण त्यांना भरजरी फ्रेममध्ये अडकवून निकामी केलं आणि सातत्याने स्वतःची पुरोगामी नामक समाजमान्य प्रतिमा जपण्यासाठी राबवून या मूल्यांचं अवमूल्यन केलं. कारण जेव्हा आपण जेंडर बदलून या प्रसंगाची कल्पना करतो, तेव्हा आपण अचानक भूमिका घेण्याच्या होऱ्यात जातो आणि आपला आधीचा थंड प्रतिसाद एकदम जागा होतो आणि मनात एक विचार चमकतो, ‘जेंडर सेन्सिटीव्ह होताना आपण ‘माणूसपणात’ तर गफलत करत नाही आहोत ना?’

एका लहानशा, शब्द जवळजवळ मुके असणाऱ्या फक्त ॲक्शन-रिॲक्शन-निष्ठ प्रसंगातून एकेक पापुद्रा सोलत शानभाग वरण वर्मी बाण मारतात. इथेच त्यांनी कादंबरीवर मांड ठोकलेली आहे आणि वाचकाला झडप घालून हायजॅक केलं आहे; पण आपण हायजॅक झाल्याचं वाचकाला मात्र फार उशिरा, सगळ्या जंजाळात फसल्यानंतर कळतं. शानभागांचा निवेदनातला हा एक प्रकारचा अंडर टोन ‘गनिमी कावा’ जबरदस्त आहे.

..................................................................................................................................................................

जागतिकीकरणानं तयार केलेली बाजार नावाची व्यवस्था स्लो पॉयझनिंगप्रमाणे कशी काम करते, हेही लेखकानं ‘मुंग्या’ या रूपकातून अगदी चपखलपणे मांडलं आहे. मुंग्या काय करतात? तर कुठल्याही साध्याशा अडचणीचं उपद्रवमूल्य वाढवतात. याने साधी अडचण विनाकारण टोकदार होते. एकदा अडचण टोकदार झाली की, जाणिवांना ‘कम्फर्ट’ नावाच्या गरजा खुणावू लागतात. मात्र एका गरजेला बळी पडणं हे पुढच्या नवनव्या गरजांच्या जिभांना नकळत आमंत्रण ठरतं. पण खरी अडचण ‘कम्फर्ट’ शोधण्यात नाही. उपद्रवाच्या सुसाट गतीनं ‘कम्फर्ट’ शोधायला भाग पाडण्यात आणि तो शोधता शोधता नकळत मूल्यात्मकतेच्या ऱ्हासाचं टोक गाठत हिंस्र होण्यात, त्याचं समर्थन शोधण्यात, तसंच या सगळ्याला अधिकृतता प्राप्त होण्यात आहे.

..................................................................................................................................................................

यानंतर दुसऱ्या प्रकरणात कादंबरीचा निवेदक स्वतःच्या कुटुंबाबद्दल सांगायला सुरुवात करतो. इथं जर सूक्ष्मात जाऊन आपण शानभाग यांच्या भाषेचं निरीक्षण केलं, तर त्यांच्या अमोघ प्रतिभेचं आपल्याला दर्शन होतं. सर्जनशील लेखक भाषेची मोडतोड करून नवीन भाषा घडवत असतो, म्हणजे नेमकं काय करत असतो, याचं धडधडीत प्रत्यंतर, म्हणजे शानभागांची भाषा आहे! वास्तविक, भाषेची मोडतोड करत असताना सर्जनशील लेखक किंवा प्रतिभावान लेखक बहुतांश वेळा आपल्या गुळगुळीत मनोव्यापाराला किंवा रूढ वर्तन-सवयींना नख लावत असतो आणि आतमधली भळभळ उघडी पाडत असतो.

शानभाग इथेही नेमकं हेच करतात. स्वतःसकट घरातलं प्रत्येक व्यक्तिमत्त्व उलगडत नेणारं त्यांचं हर एक वाक्य हा एक दंभस्फोट आहे. म्हणजे एकाच वेळी या वाक्यांमध्ये त्या-त्या व्यक्तीचं वर्णन आहे, घराच्या उतरंडीतलं स्थान आहे, संबंधित व्यक्तीकडून वठवली जाणारी भूमिका आहे आणि या सगळ्या जंजाळात अस्पृश्य, उपरं राहत असणारं सत्यही आहे.

थोडक्यात, हे सगळं वर्णन म्हणजे व्यक्ती-प्रवृत्तींचे पापुद्रे सोलणारा दारूगोळा आहे. उदाहरणार्थ, घरातला कर्ता पुरुष, चिकप्पा याच्याबद्दल लिहिताना शानभाग लिहितात – “त्याचा नाश्ता, खाणं-पिणं, त्याच्या आवडीनिवडी, त्याला काय हवं; काय नको हे सगळं घरातल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. तो रात्रंदिवस जितके जास्त कष्ट उपसतो, तितके आम्ही जास्त मजेत राहू शकतो. त्यांनं लग्न केलेलं नाही... ‘सगळी सुखं असताना आता या वयात कशाला लग्न?’ असं वाटावं इतकं आम्ही त्याला जपतो; त्याची मर्जी सांभाळतो. कुटुंबातल्या मिळवत्या पुरुषाला मिळतात, त्या सगळ्या सवलती घरात त्याला मिळतात.’’

खरं तर हे वाचल्यानंतर वाचक म्हणून आपल्याही दंभाचे अनेक पापुद्रे सोलवटून निघतात. कारण पहिलं प्रकरण वाचताना आपल्यापैकी ज्या वाचकांना हा लेखक-निवेदक पुरुषांच्या अडचणी समजून घेणारा वाटलेला असतो आणि ज्या वाचकांना त्याचं लेखन-निवेदन स्त्री-विरोधी वाटलेलं असतं, अशा दोन्ही प्रकारच्या वाचकांच्या इम्प्रेशन्सच्या या प्रकरणात शानभाग ठिकऱ्या उडवतात, आणि ‘सत्याला सत्य म्हणून जाणा’ हा जळता निखारा हातात घेऊन कुठल्याही एकाच एका गोटाला न चिकटता सगळा तळ चिरून काढतात.

पण तरीही माणसांच्या या वर्तन-विसंगतींबद्दल वाचताना वाचकांच्या मनात या माणसांबद्दल कुठेही घृणा उत्पन्न होत नाही किंवा शिसारीची भावनाही होत नाही. वाचकाच्या मनात अखेरपर्यंत काही उत्पन्न होत असेल आणि कायम राहत असेल, तर ती फक्त वेदना राहते! कारण लेखकाच्या निवेदनात, भाषेत माणसाच्या मनोव्यापाराचं नागडं सत्य असलं, तरी त्या सत्याबद्दल कुठेही कमीपणाची भावना नाही, तुच्छता नाही; केवळ ते सत्य समजून घेणं आहे. म्हणून हे सगळं वाचताना सत्य आपल्या अंगावर आलं, तरी त्यात माणसाचा अव्हेर नसल्याचं वाजत राहतं. लक्षात घेण्याची गोष्ट ही की, हा सहानुभाव लेखकाच्या शब्दांतून कुठेही व्यक्त झालेला नाही. सगळी भाषा, शब्द पात्रांची कथा-व्यथा सांगणारीच आहे, पण शब्द जे आवाज करून सांगत नाहीत, ते रचना मूकपणे सांगते. त्यामुळे लेखक जे शब्दांत सांगतो, त्यात जसे अर्थाचे अनेक पापुद्रे दडलेले आहेत, तसंच तो ज्या प्रकारे सांगतो आहे, भाषा घडवतो आहे, त्या घडणीतही अर्थाचे अनेक पापुद्रे दडलेले आहेत.

३.

सर्वसाधारणपणे ‘प्रेम’ आणि ‘निष्ठा’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात. यात काही प्रमाणात तथ्यही आहे. मध्यमवर्गीय जगण्यात या दोन्ही मूल्यांना, विशेषतः ‘निष्ठा’ या मूल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र ज्या वेळी ‘निष्ठा’ हे मूल्य ‘प्रेम’ या तत्त्वापासून फारकत घेतं, तेव्हा माणसं पाशवी थराला कशी जातात, याचं उत्तम दर्शन लेखक एका छोट्याशा प्रसंगातून समोर आणतो. वास्तविक, ‘प्रेम’ या तत्त्वामध्ये ‘सत्याचा स्वीकार’ दडलेला आहे, तर निष्ठेत ‘या स्वीकाराशी घट्ट बांधिलकी’. मात्र या दोन बाजूंपैकी कोणत्याही एका बाजूचा कमकुवतपणा नैतिक आंधळेपणाला निमंत्रण देणारा ठरतो. त्यामुळे दुधारी असलेली ही तलवार सामान्य माणसाच्या कम्फर्ट झोनला सतत आव्हान देत राहते. परिणामी, सुविधाजनकतेला वश झालेल्या माणसांकडून यांपैकी एका मूल्याला हरताळ फासला जातो.

..................................................................................................................................................................

‘संपत्ती हळूहळू वाढते’ हे तत्त्व बिनीला सांगताना, आपल्याजवळ येणाऱ्या सगळ्या समृद्धीचा पाया संयम आणि सचोटी हा असतो आणि तो असला, तर पैशाला केवळ ‘चलन’ म्हणून नव्हे, तर ‘मूल्य’ म्हणून किंमत प्राप्त होते, हे लेखक स्पष्ट करतो. यामुळे पैसा येण्याला विरोध असण्यापेक्षाही, आणखी सूक्ष्मात जात, लेखक-निवेदक त्याच्या येण्याचा ‘चाली’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. यासाठी पुढच्या बिंदूवर बोट ठेवताना तो या पैशाला भटजीच्या जानव्याची उपमा देतो. या एकाच उपमेतून तो या पैशाप्रतीची पावित्र्य, स्वतःच्या शीलाप्रमाणे जपण्याची गोष्ट, प्रामाणिकपणा ही जुनी मूल्यं अधोरेखित करतो.

..................................................................................................................................................................

घराचा एकमेव कर्ता पुरुष असलेल्या आणि घराची सर्व आर्थिक सुविधाजनक, सुबत्ता अवलंबून असणाऱ्या चिकप्पानं दडवलेल्या आणि त्याच्या ओढीनं न राहवून घरी आलेल्या प्रेयसीच्या प्रसंगातून लेखकानं मध्यमवर्गीयांच्या सभ्यतेच्या मुलाम्याखाली दडलेल्या किडकेपणाला अलगद वर आणलं आहे.

सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा पाळून, प्रेम पणाला लागल्यानंतरच ही प्रेयसी घराच्या आवारात पाऊल टाकते. मात्र ज्या पुरुषासाठी ती आलेली असते, तो किंवा इतर दोन पुरुषांपैकी कुठलाही पुरुष या प्रसंगात शेवटपर्यंत या प्रेयसीचा सामना करत नाही. सार्वजनिक किंवा व्यावसायिक पातळीवर पुढारपण करणाऱ्या मध्यमवर्गीय पुरुषांचा नाजूक संबंधांच्या हाताळणीतला कचखाऊपणा आणि भ्याडपणा लेखक इथं समोर आणतो. सभ्यता, प्रतिमा आणि प्रतिष्ठा या तीन कल्पनांचा विळखा मध्यमवर्गीय समाजाला आणि त्यातही पुरुषप्रधानता असल्यानं या समाजातल्या पुरुषाला सगळ्यात जास्त पडलेला असतो. या विळख्यापायी तो कुठल्या थराचं क्रौर्य करतो आणि त्यासोबत येणारी कुचंबणा गिळतो; पर्यायानं एकाच वेळी तो किती भेकड आणि संवेदनाहीन थंड होतो, हे या प्रसंगाच्या निमित्तानं समोर येतं. या कापुरुषाच्या वतीनं प्रेयसीला जाब विचारायला पुढे येणाऱ्या, घरातल्या कापुरुषाला स्वतःच्या लिंगाच्या बळावर सत्शीलतेचं प्रमाणपत्र देऊ पाहणाऱ्या या घरातल्या बायकाही एका अर्थी याच व्यवस्थेचा बळी आहेत. सर्व घराला बांधून ठेवण्याची पोकळ ओळख जपण्याच्या नादात एकीकडे त्या पुरुषी व्यवस्थेत दुय्यमत्व स्वीकारतात आणि प्यादं बनून राहतात, पण यासाठी दुसऱ्या बाईची अब्रू चव्हाट्यावर आणताना बाईपणाच्या गाभ्याला चूड लावतात.

चिकप्पाच्या ओढीनं घरापर्यंत आलेल्या प्रेयसीला चिकप्पासकट घरातले सगळे केवळ ‘माणूस’ समजायलादेखील नकार देतात. वास्तविक, चिकप्पाचं हे प्रेम ‘सत्य’ असल्याची घरातल्या सगळ्यांना जाणीव आहे. मात्र या सत्याप्रति निष्ठा दाखवता, चिकप्पाच्या ओघानं आलेल्या सुबत्ता, प्रतिष्ठा, सुविधा या विळखा घालून बसलेल्या कल्पनांवर गदा येणार. त्यामुळे चिकप्पा आणि प्रेयसी या दोघांमधलं प्रेम व कुटुंबीय आणि चिकप्पा यांच्यातलं प्रेम या दोन्ही सत्यांचा अव्हेर करून चिकप्पा आणि कुटुंबीय भौतिक वास्तवाला बळकटी देणाऱ्या ‘निष्ठा’ या मूल्याला जवळ करतात; आणि उसनं अवसान आणून ढोंगाला सत्याच्या बोकांडी मारण्याचा आटापिटा करतात.

इथं लेखकानं रेखाटलेलं चिकप्पाच्या प्रेयसीचं सगळं वर्तन ढोंगाच्या कंपनांनी फडफडणाऱ्या, पण तरीही जळत राहणाऱ्या ज्योतीसारखं तेवत राहतं. कारण तिच्या ठिकाणी ‘प्रेम’ आणि ‘निष्ठा’ यांचा अभेद आहे. कदाचित यामुळेच या सगळ्या प्रसंगात ती जवळजवळ काही बोलत नाही. तिची नजर, तिची देहबोली आणि तिचे आर्त स्वर ‘प्रेम’ नामक सत्याचा हवाला देण्यासाठी पुरेसे ठरतात. एका ‘अतोनात प्रेम करणाऱ्या बाईच्या’ किती परी लेखक तिच्या केवळ हालचालींमधून टिपतो! त्याचं हे टिपणं अप्रतिम आहे! या परी टिपताना कादंबरी कवितेची उंची गाठते. आपल्या प्रेमाबद्दल घरी माहीत नसल्याचं जाणणारी, पण चिकप्पाच्या ओढीनं न राहवून त्याच्या घरापर्यंत आलेली ही प्रेयसी आहे. तिचं घरापर्यंत येणं लेखक असं टिपतो –

आधी ती आमच्या घरापासून थोडी लांब उभी होती. ती बहुधा चिकप्पाची वाट पाहत असावी. ‘तो बाहेर आला तर त्याची तिथेच गाठ घ्यावी’ असा तिचा इरादा असावा. ‘येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरा झेलत रस्त्यावर तरी असं किती वेळ उभं राहायचं’ असं तिच्या मनात आलं असेल. तरीही तिथेच उभी राहून ती आमच्या घराकडे बघत होती.

चिकप्पा एकदा दृष्टीस पडला असता, तर त्यावर समाधान मानून बहुतेक ती निघून गेली असती.

जसजसा वेळ जाऊ लागला, तसतशी तिची सहनशक्ती कमी होत जाऊन तिची पावलं आमच्या घराकडे वळली.

गेट उघडून ती आत येते आहे, हे पाहताच आई लगबगीनं बाहेर आली. पण तेवढ्या वेळात पायऱ्या चढून ती घराच्या दारापर्यंत आली होती.

यानंतरच्या आईबरोबरच्या संवादातही तिला चिकप्पाला भेटायचं असल्याच्या ठाम इराद्याशिवाय ती दुसरं काहीही बोलत नाही.”

यानंतर चिकप्पासाठी या प्रेयसीनं बनवून आणलेली त्याची आवडती आमटी त्याला देण्याची प्रेयसी आईला विनंती करते. मात्र आई ही विनंती झिडकारते. आमटीचा डबा पडतो आणि आमटी सांडते. त्यानंतर शानभाग लिहितात – ‘‘तिथं क्षणभर शांतता पसरली. ती ‘अय्यो अय्यो’ करत असहायपणे त्या सांडलेल्या आमटीजवळ बसून राहिली. लालसर रंगाची ती आमटी जमिनीचा सखलपणा शोधत वाहू लागली. आमटीतले काळ्या मसूरदाण्यांचे पुंजके इथे तिथे पसरलेले दिसत होते. चिकप्पाविषयी तिच्या मनात असलेलं प्रेम पाहून आम्ही सगळे बेचैन झालो... चिकप्पा नाश्ता अर्ध्यावरच टाकून उठला व हात धुऊन आपल्या खोलीकडे निघून गेला’’.

इथं कादंबरी काव्यात्मतेचा अत्युच्च बिंदू गाठते. सांडलेल्या आमटीजवळ तिने असहायपणे बसण्यात काय नाही! तिची सगळी वाहती द्रवरूपात आहे; त्या पदार्थात तिने ओतलली सगळी असोशी आहे; त्या असोशीची वाताहत आहे आणि तरीही त्या असोशीचा दरवळ आहे. अतिशय साध्या, साहजिक प्रसंगातली; काळजाला घरं पाडणारी इनटिमसी शानभाग ज्या तरलतेनं वर आणतात, ते प्रेमाचं जिव्हारीपण रुतून बसणारं आहे.

या प्रसंगानंतर आई आणि मालती प्रेयसीला शिव्या द्यायला सुरुवात करतात. प्रेयसी मात्र अखेरपर्यंत कुठलीही हीन पातळी गाठत नाही. मात्र स्वतःला दिल्या जाणाऱ्या वागणुकीनं घायाळ होत जाते आणि कासावीस होऊन शेवटचा प्रयत्न म्हणून खाजगीतल्या नावानं चिकप्पाला साद घालते.

या सगळ्या शोभेनंतरही चिकप्पा बाहेर येत नाही, तेव्हा तिचं सगळं प्रेम घृणेनं भरून जातं आणि हे केवळ एका कटाक्षातून व्यक्त करून ती तिथून चालती होते.

या सगळ्या प्रसंगाला कुटुंबातल्या बायकांच्या आरडाओरडीची, अपशब्दांची आणि पुरुषांच्या नामानिराळेपणाची पार्श्वभूमी आहे. प्रेयसी जवळजवळ मुकी आहे; पण या सगळ्या प्रसंगाची रचना शानभाग अशी करतात, जणू ‘सत्याला आवाजाची गरज नसते’ हे तत्त्व उजळून निघतं. मात्र एका बिंदूपाशी या बायकांचा आरडाओरडा आणि पुरुषांचा पळपुटेपणा हेदेखील सत्य माहीत असूनही त्याचा स्वीकार करण्याची शक्ती गमावल्याने असहायपणे केलेलं अरण्यरुदन भासतं. त्यामुळे घडणाऱ्या प्रसंगात प्रॅक्टिकल पातळीवर प्रेयसी असहाय वाटली, तरी शानभाग माणसाच्या मनोव्यापाराची इतकी पिसं काढतात की, जणू त्यातला प्रत्येक धागा सुटा होतो आणि असहायतेची परिभाषा स्पष्ट होऊन सोंग घेणारी माणसं अधिकच केविलवाणी भासू लागतात.

यातही एक अस्फुट काव्यात्म धागा म्हणजे, या प्रेयसीचं नाव लेखकानं टाळलं आहे. जणू प्रेयसी आणि तिचं ओसंडून वाहणारं प्रेम कधीच नावाचे धनी नसावेत. त्या प्रेमाचं जिव्हारी लागणारं हरवलेपण हीच जणू ‘प्रेयसी’ या भूमिकेची मिळकत आणि भागधेय!

..................................................................................................................................................................

लेखकानं या प्रवासाच्या निमित्तानं सांगितलेल्या काही विचारांची सांधेजोड केली, तर मध्यमवर्गाच्या अधःपतनाबाबत तो जे मूक विधान करू पाहतो आहे, ते समोर येतं. जागतिकीकरणाआधीचा आर्थिक पातळीवर अस्थिर, पण नैतिक पातळीवर घट्ट असणाऱ्या प्रतिनिधीचं पात्र म्हणून निवेदकाचे वडील समोर येतात. कादंबरीत सुरुवातीला आलेल्या कुटुंबाच्या ऐशोरामीपणाच्या आणि चकचकीतपणाच्या वर्णनाच्या पार्श्वभूमीवर याच कुटुंबाचं आलेलं जुनं रूप दृश्यात्मक पातळीवर काहीसं ओंगळवाणं आणि दमछाक करणारं वाटतं, पण त्यात फुलणाऱ्या मानसिक स्वास्थ्याच्या तारांना जेव्हा शानभाग स्पर्श करतात, तेव्हा या सगळ्या कादंबरीच्या वेदनेची नस कचकचून दाबली जाते आणि कादंबरीभर उठणार्‍या सगळ्या कळा वाचकाचा एकदम ताबा घेतात.

..................................................................................................................................................................

यानंतर तिसऱ्या प्रकरणात शानभाग या संपूर्ण कुटुंबाचा निम्न मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गापर्यंत झालेला प्रवास रेखाटतात. हा प्रवास त्यांनी अगदी आटोपशीर, पण तरीही ठाशीवपणे सांगितला आहे. बदलांच्या एकेका बिंदूचा खुंटा बळकट करत शानभाग यांनी चितारलेला हा आलेख अनेक तीव्र-कोमल उलथापालथींची नांदी सांगणारा आहे. या सगळ्या स्थित्यंतराच्या, उलथापालथींच्या मुळाशी ‘जागतिकीकरण’ नावाची भेदक रेषा वाहत असल्याचं हा प्रवास वाचत असताना आपल्याला जाणवतं. कुटुंबाची सगळी सुबत्ता, किडकेपण सांगितल्यानंतर वर्मी बाण लागेल, अशा पद्धतीनं मध्येच स्थित्यंतराच्या प्रवासाची रचना लेखकानं केल्यानं दोन ताण वाचकाच्या मनावर दाब ठेवत राहतात. यांपैकी एक ताण मध्यमवर्गीय कुटुंबाच्या नीतिमत्तेचा ऱ्हास समजून घेणारा असतो, तर दुसरा तीच नीतिमत्ता उजागर करणारा असतो; पण या गुंफणीचा योग्य परिणाम साधला जाऊन वाचक न्यायदानाच्या भूमिकेत शिरत नाही. मात्र दोन्ही ताणांच्या वेदनेतून सुटूही शकत नाही.

४.

लेखकानं या प्रवासाच्या निमित्तानं सांगितलेल्या काही विचारांची सांधेजोड केली, तर मध्यमवर्गाच्या अधःपतनाबाबत तो जे मूक विधान करू पाहतो आहे, ते समोर येतं. जागतिकीकरणाआधीचा आर्थिक पातळीवर अस्थिर, पण नैतिक पातळीवर घट्ट असणाऱ्या प्रतिनिधीचं पात्र म्हणून निवेदकाचे वडील समोर येतात. कादंबरीत सुरुवातीला आलेल्या कुटुंबाच्या ऐशोरामीपणाच्या आणि चकचकीतपणाच्या वर्णनाच्या पार्श्वभूमीवर याच कुटुंबाचं आलेलं जुनं रूप दृश्यात्मक पातळीवर काहीसं ओंगळवाणं आणि दमछाक करणारं वाटतं, पण त्यात फुलणाऱ्या मानसिक स्वास्थ्याच्या तारांना जेव्हा शानभाग स्पर्श करतात, तेव्हा या सगळ्या कादंबरीच्या वेदनेची नस कचकचून दाबली जाते आणि कादंबरीभर उठणार्‍या सगळ्या कळा वाचकाचा एकदम ताबा घेतात.

आधीप्रमाणेच एक अगदी साधासा प्रसंग आणि वडलांची दिनचर्या यांतून शानभाग या नैतिक अधिष्ठानाची मुळं आणि त्यांचं रुतलेपण उकलतात. याची त्यांनी कौटुंबिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्य यांच्याशी घातलेली वीण अतूट आहे. पर्यायानं सध्याच्या काळात विकाऊ झालेल्या ‘आनंद’, ‘सुख’ आणि ‘समाधान’ नावाच्या पूर्वी जगण्याचा भाग असलेल्या आणि आता अश्वत्थाम्याच्या जखमा म्हणून चिरस्थायी झालेल्या जाणिवा यांच्या शानभागांनी नेमकेपणानं खपल्या काढल्या आहेत. या नैतिक पैसाच्या सांधेजोडीचे लेखकाने उजागर केलेले काही बिंदू असे –

‘श्रीमंतांसारखी उधळपट्टी करू नका. वृक्षाची वाढ जशी हळूहळू होते, तशी संपत्तीदेखील हळूहळू वाढली पाहिजे’ असं त्यांचं (वडलांचं) मत होतं. त्यांना आमच्याजवळ असलेल्या पैशांची किंमत अगदीच क्षुल्लक वाटू लागली होती आणि आमच्या सगळ्यांच्या चिंतेचं हेच मूळ कारण होतं.

...चहा पावडरची विक्री करून मिळालेली रोख रक्कम ते सुरक्षितपणे त्यांच्या पिशवीत ठेवायचे. ती पिशवी खांद्यावरून काढून छातीजवळ घट्ट पकडून ठेवलेली असायची. एखाद्या भटजीनं मधूनमधून आपल्या जानव्याला स्पर्श करावा, त्याप्रमाणे ते ती पिशवी मधूनमधून चाचपडून पाहत पुढे चालत असत.

त्यांच्या कंपनीचं काम फक्त आम्हाला दोघांना येत होतं असं नाही, तर घरातले सगळेच त्यात सहभागी व्हायचे.

दर तीन महिन्यांनी त्यांच्या कंपनीत सेल्ससंबंधी स्पर्धा असायची, पण त्यामध्ये त्यांना कधी बक्षीस मिळालेलं मला आठवत नाही.

आप्पांच्या मिळकतीत घर चालवताना पैशाच्या व्यवहारात लपवाछपवी नसे.

कुठल्याही गोष्टीत निवडीची संधीच नसल्यानं नाराजीही नसायची

...रात्री दहा वाजेपर्यंत तीन वेळा हिशेब तपासूनही ताळा होत नव्हता. त्यामुळे घरातले सगळेच घाबरले. आप्पा जेवले नाहीत; ‘मुलांना जेवायला वाढा’ असं त्यांनी आईला सांगितलं...सामान्यपणे तो (चिकप्पा) आप्पांच्या व्यवहारात लक्ष घालत नसे. परंतु आज जेवण करून तो आप्पांच्या बाजूला जाऊन बसला व त्यांना हिशेबात मदत करू लागला.

नेहमीप्रमाणे मी व मालती माजघरात झोपलो... समोरच धडपडणारे, पुन्हापुन्हा हिशेब करत बसलेले आप्पा पाहून त्यांच्याविषयी करुणा दाटून आली व ‘काहीही करून यांना मदत केली पाहिजे’ असे विचार मनात आले.

त्यांच्यातील ‘या हिशेबाच्या गोंधळातून सुटलो एकदाचा’ या भावानेची लाट स्वयंपाकघरात असलेल्या आईपर्यंत पोहोचली व तीही बाहेर येऊन त्यांच्या आनंदात सामील झाली... ते तिघंही आनंदानं तृप्त होऊन गेले. हा क्षण माझ्यासाठी अपूर्व असा होता. जेमतेम पाव सेकंदाच्या प्रसंगानं माझ्यामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण केली...हा आनंदाचा प्रसंग दिवाळीच्या पहाटेसारखा आमच्या सगळ्यांच्या स्मरणात आहे.

जणू एखादा रुतलेला काटा आम्ही सगळ्यांनी मिळून, एकमेकांच्या सहकार्यानं, एकत्रितपणे प्रयत्न करून काढून टाकला होता. ही अशी आतल्या आत उमललेली भावना एकमेकांना अधिक जवळ आणत होती.

..................................................................................................................................................................

सार्वजनिक किंवा व्यावसायिक पातळीवर पुढारपण करणाऱ्या मध्यमवर्गीय पुरुषांचा नाजूक संबंधांच्या हाताळणीतला कचखाऊपणा आणि भ्याडपणा लेखक इथं समोर आणतो. सभ्यता, प्रतिमा आणि प्रतिष्ठा या तीन कल्पनांचा विळखा मध्यमवर्गीय समाजाला आणि त्यातही पुरुषप्रधानता असल्यानं या समाजातल्या पुरुषाला सगळ्यात जास्त पडलेला असतो. या विळख्यापायी तो कुठल्या थराचं क्रौर्य करतो आणि त्यासोबत येणारी कुचंबणा गिळतो; पर्यायानं एकाच वेळी तो किती भेकड आणि संवेदनाहीन थंड होतो.

..................................................................................................................................................................

यानंतर वडलांची नोकरी गेल्याच्या प्रसंगाबद्दल लिहिताना शानभाग म्हणतात – ‘तो काळ आजच्यासारखा सतत नोकऱ्या बदलण्याचा नव्हता. असलेली नोकरी जाणं, हा आयुष्यातला अत्यंत कठीण प्रसंग असायचा. भविष्यातल्या अंधाराची जाणीव करून देणारा तो क्षण असे.

यानंतर नोकरी केल्यानं भेदरलेल्या, पण तरीही एकमेकांना धीर देण्याच्या ओढीनं उसनं अवसान आणून आली कळ दाबणाऱ्या जिवलग कुटुंबाचं वागणं शानभाग तन्मयतेनं रंगवतात.

या संकटातून संधीचा, म्हणजेच नोकरीतून व्यवसायात शिरण्याचा मार्ग चिकप्पा सांगतो आणि निवेदकाचे वडील त्यात होकार भरतात, तेव्हा शानभाग लिहितात – ‘आम्ही सर्वांनी स्वयंपाकघरात असणं व आप्पांनी त्या क्षणी हा असा निर्णय घेणं, याचा काहीतरी संबंध असावा, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. सगळ्यांनी मिळून, एकत्रितपणे विचार केला नसता तर आप्पांनी हा निर्णय घेतला असता की नाही, कोण जाणे!

...“अण्णा, या उद्योगात ५० टक्के तुझी भागीदारी’’ असं चिकप्पाने सांगून टाकलं. बोललेले हे शब्द चिकप्पानं शब्दशः खरे केले.

हे सगळे बिंदू पाहता, काय लक्षात येतं? आधुनिकतेला प्राधान्य देताना आणि आदर्शवादाला जुनाट आणि स्वप्नाळू ठरवताना मध्यमवर्गानं सर्वांत आधी विवेकाची आहुती दिली आणि विवेकाला फाट्यावर मारून मिळणाऱ्या पैशातून तो शांतता, सुरक्षितता आणि समाधान विकत मागू मागत फिरू लागला. जागतिकीकरणापूर्वीचा रोजच्या जगण्यात कुठलंही वेगळं अस्तित्व न राखता, जगण्याचा भाग असलेल्या मूल्यात्मकतेवर आणि त्यातून येणाऱ्या जगण्याच्या पोतावर लेखकानं लख्ख प्रकाश टाकला आहे. ‘संपत्ती हळूहळू वाढते’ हे तत्त्व बिनीला सांगताना, आपल्याजवळ येणाऱ्या सगळ्या समृद्धीचा पाया संयम आणि सचोटी हा असतो आणि तो असला, तर पैशाला केवळ ‘चलन’ म्हणून नव्हे, तर ‘मूल्य’ म्हणून किंमत प्राप्त होते, हे लेखक स्पष्ट करतो. यामुळे पैसा येण्याला विरोध असण्यापेक्षाही, आणखी सूक्ष्मात जात, लेखक-निवेदक त्याच्या येण्याचा ‘चाली’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. यासाठी पुढच्या बिंदूवर बोट ठेवताना तो या पैशाला भटजीच्या जानव्याची उपमा देतो. या एकाच उपमेतून तो या पैशाप्रतीची पावित्र्य, स्वतःच्या शीलाप्रमाणे जपण्याची गोष्ट, प्रामाणिकपणा ही जुनी मूल्यं अधोरेखित करतो. मात्र हे सगळं वाचत असताना तो या सगळ्या सांगण्याचा सूर असा घायाळ लावतो की, या मूल्यांची आज आपण असलेली खिल्ली या सगळ्या सांगण्यापाठीमागे वाजत राहते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सचोटीनं केलं जाणारं काम कायम मर्यादित गतीनं जाणारं असल्यानं त्याला स्पर्धेची आस नसते; त्याच्यात मक्तेदारीचा भाव फार कमी असतो; जबाबदारी मात्र विभाजित असते. त्यामुळे या कामाला काहीही लपवावं लागत नाही. ते खुलं आणि सर्वांना धरून ठेवणारं असतं. ‘निवडीची संधी नसणं’ ही आजच्या आपल्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाल्या गुळगुळीत, भांडवलशाही मनांना निश्चित नकारात्मक गोष्ट वाटते. पण आपल्या मागच्या, मध्यमवर्गीय होऊ पाहणाऱ्या पिढ्यांकडे बघता काय दिसतं? निवडीची संधी नाही, जबाबदाऱ्या आजपेक्षा कैक पटींनी जास्त, क्षेत्र मर्यादित असल्यानं विकासालाही मर्यादित वाव, परिणामी गती अत्यंत कमी आणि वाढीचा झपाटाही कमी.

वास्तविक, आताच्या तुलनेत विचार करता, या सगळ्याचा या पिढीवर विपरीत परिणाम व्हायला हवा होता. पण तसं न होता, उलट ही पिढी आजच्या पिढीपेक्षा अधिक चिवट, आशावादी आणि पुष्कळ तत्त्वनिष्ठ दिसते. कारण संधी केवळ आशा निर्माण करत नाही; अपेक्षाही निर्माण करते. त्यामुळे आशेतून अपेक्षा येतात; अपेक्षेतून स्वप्नपूर्ती येते; पूर्तीतून किंवा अपूर्तीतून त्या स्वप्नांमागे ऊर फुटून पळत राहणं येतं; कारण संधी सतत जाग्या असतात. मग हा आशा-निराशेचा खेळ पेलण्यासाठी अधिआत्मिक ट्रेनिंग येतं. मात्र मुळात संधीच अतिशय मर्यादित असेल, तर अपेक्षांवरही बंधनं येतात. अशा वेळी भौतिक सुखाचा मार्ग खडतर होतो आणि खडतर मार्ग बरेचदा संयम, सोबत, एकजूट या धारणांसाठी भरीस घातल्याशिवाय राहत नाही. माणसाचा नैसर्गिक कल भौतिक सुखांना अनुकूल असण्याचा आहे. त्यात काही गैर नाही. मात्र गरजेपेक्षा जास्त वेगानं प्राप्त झालेली भौतिक सुखं बहुतांश वेळा अवकाळी पावसाप्रमाणे काम करतात. तहान भागण्याला तोटा नसतो, पण मुळं मात्र कुजून जातात.

या लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी पहा- https://www.aksharnama.com/client/article_detail/5735

.............................................................................................................................................

‘घाचर घोचर’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4468/Ghachar-Ghochar

..................................................................................................................................................................

लेखिका भाग्यश्री भागवत ग्रंथसंपादक आहेत.

bhagyashree84@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......