‘घाचर घोचर’ : आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत! (भाग २)
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
भाग्यश्री भागवत
  • ‘घाचर-घोचर’ या कादंबरीच्या कन्नड, इंग्रजी, हिंदी आणि मराठी आवृत्तीची मुखपृष्ठं आणि कादंबरीकार विवेक शानभाग
  • Thu , 13 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस घाचर घोचर Ghachar Ghochar विवेक शानभाग Vivek Shanbhag

५.

वडलांचा हा सगळा काळ निवेदकाच्या लहानपणाचा काळ असल्यानं बालमनाच्याही अनेक गोष्टी लेखकाला या निमित्तानं सांगता आल्या आहेत. मूल हे व्यक्तिमत्व भौतिकतेच्या पल्याड जाऊन संपूर्णतः मानसिक स्तरावर कसं ऑपरेट होत असतं, हे या निमित्तानं शानभाग यांनी अफलातून पद्धतीनं सांगितलं आहे. माणसाचं रूप असल्यानं त्याला भौतिक गोष्टींची ओढ असते, पण प्रौढांप्रमाणे ही ओढ भावनिक स्वस्थतेची स्पर्धा करत नाही. कुटुंब आनंदात असतानाच मुलांना भौतिक गोष्टी आनंददायी वाटतात; कुटुंब आनंदात असतानाच ती निर्भीड राहू शकतात; कारण त्याच वेळी त्यांना एकसंधतेचा, एकटं नसल्याचा, भावनिक जवळीकतेचा आणि पर्यायानं मानसिक स्वस्थतेचा अनुभव येतो; ही स्वस्थता ती फील करतात. त्यामुळे घरात भौतिक पातळीवर सर्व नीट असेल आणि मानसिक पातळीवर अगदी बारीकसा जरी ताण असेल, तरी मुलं तो ताण फील करतात आणि नकळत स्वतःही त्या ताणाचा भाग होतात. कारण त्यांच्या लेखी समीकरण उलटं असतं. त्यांचा भौतिक आनंद मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असतो. ‘काहीही करून यांना मदत केली पाहिजे’, ‘पाव सेकंदाच्या या प्रसंगानं माझ्यामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण केली’ आणि ‘ही अशी आतल्या आत उमललेली भावना एकमेकांना अधिक जवळ आणत होती’ त्या तीन वाक्यांमधून लेखक या आणखी खोल, हळव्या, अतिशय संवेदनशील, वर्तमान पिढीच्या वर्तनाला सोलून काढणाऱ्या, कोंडीत पकडणाऱ्या आणि झोंबणाऱ्या पापुद्र्याला नख लावतो. कारण हा एक साधासा ताणाचा प्रसंग वाचत असताना आज आपण जे जे मिस करतो किंवा ज्या ताणाला व्यक्तिगत जबाबदारीचा मुलामा देऊन स्वतःला एकटं करून टाकतो, त्या सगळ्या साचलेपणाचा तळातला गाळ हे वर्णन वाचताना वर येतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

वास्तविक, ‘मुलांचं दुभंगलेपण’ आणि ‘कामाचा ताण’ हे आजच्या मध्यमवर्गापुढचे कळीचे प्रश्न आहेत. या दोन प्रश्‍नांनी जणू आजचा सगळा मानसशास्त्रीय व्यवसाय तोलून धरला आहे. मात्र बहुतांश वेळा समुपदेशकदेखील आपल्या विकासाच्या गतिमान कल्पनांपुढेच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात आणि आपला मूल्यव्यवहार ढवळून काढून पुनर्विचार करायला भाग पाडतात. बालमनाचं चिंतन रेखाटताना लेखक वास्तविक आजच्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय जगण्यावर कुठलंही भाष्य करत नाही. मात्र लहान मुलाच्या मनातले विचार वाचताना आपण मध्यमवर्गीय माणूस म्हणून व्याकूळ होतो. मध्यमवर्गाच्या तरुण पिढीची झालेली गोची, त्यांच्या कुटुंबापासून तुटलेल्या किंवा अलूफ झालेल्या तारा, स्वतःच्या भोवतालाबद्दलची अनभिज्ञता, त्याबाबतची तुच्छता, अतिरंजितता, मनाचं दुभंगलेपण, तुसडेपणा, कोशमग्नता, उद्दामपणा, बेफिकिरी, भावनिक व्यामिश्रता, व्यसनलोलुपता, हिंसेचं आकर्षण, थ्रिलच्या अविचारी आणि अवास्तव कल्पना या सगळ्या-सगळ्यातून त्यांचं घडणारं बेभान आणि माणुसकीहीन वर्तन आणि त्यानंतर मध्यमवर्गाच्या मूल्यव्यवस्थेला येणारी अर्धीमुर्धी जाग अशा आपल्यापुढे आरसा धरणाऱ्या कितीतरी चिरफळ्या लहान मुलाचं, त्या कुटुंबव्यवस्थेचा केवळ एक भाग म्हणून येणारं मनोविश्व रेखाटताना लेखकानं उडवल्या आहेत. कुठलीही टिप्पणी न करता स्वतःचा विकट चेहरा स्वतःला पाहायला लावण्याचं लेखकाचं हे सामर्थ्य अचाट आहे.

थोड्या बारकाईनं हा सगळा काळ रेखाटण्याच्या निवेदकाच्या सुराकडे पाहता, मोठ्या माणसाच्या सुरात बालमनाचा नॉस्टॅल्जिया मिसळल्याचं ऐकू येतं. मात्र म्हणून ‘तो काळ सुंदर आणि आजचा वाईट’ इतका काळे-पांढरेपणा या सुरात नाही. उलट या सुरात मूल-मनाचे रंग आहेत. त्यामुळे ते सांगणं अंतस्थ हेतूरहित, अधिक पारदर्शी आणि लसणारं झालं आहे. मूल-मनावर उमटलेल्या (अर्थ लावलेल्या नव्हे) इम्प्रेशन्सची जणू केवळ व्यक्तता केल्यागत निवेदन भासतं. त्यामुळे ते वाचकालाही स्वतःच्या मूल-मनाच्या तळापर्यंत जायला भाग पाडतं; ओढून नेतं आणि तिथवर गेल्यावर आजची वर्तन-विसंगती आणि रोजच्या जगण्यात अंगीकारलेली मूल्यहीनता अचानक पंखा उघडावा, तशी संपूर्ण पैसे विखरून झपकन उभी राहते. मूल्यात्मकतेची खोल रुतलेली मुळं कुठेतरी खोलात तरी कणभराचं सत्त्व राखून असतात.

सगळे उद्योग चिकप्पा चालवत असूनही आणि निवेदकाच्या संपूर्ण कुटुंबाचा तो उद्योग वाढवण्यात जवळजवळ नगण्य वाटा असूनही ५० टक्के हिस्सेदारीचा शब्द चिकप्पाने पाळल्याचं निवेदक नमूद करतो. कुटुंबाचं चिकप्पावर १०० टक्के अवलंबित्व असूनदेखील चिकप्पाने केलेली ही कृती त्या कठीण दिवसांतल्या बांधीलकीला दिलेली सलामी वाटते. या वाक्यावर प्रकरण संपतं, तेव्हा वाचक मात्र विचारमग्न होतो आणि सगळी झूल उतरल्यावर आजच्या मध्यमवर्गाच्या आयुष्यात इतका तरी ओलावा उरेल की नाही, या प्रश्नचिन्हापाशी येऊन थांबतो.

६.

त्यानंतरच्या चौथ्या प्रकरणात घराची रचना, घरातलं सामान आणि घरातल्या मुंग्या या तीन मुख्य बिंदूमधून शानभाग बरंच काही सांगू पाहतात. पैकी सामानाविषयी वाचताना आणि नेमाडेंच्या ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ या विधानाचा प्रत्यय येतो, तर मुंग्यांविषयी वाचताना ‘स्वतःतला सैतान जागा होण्याच्या अवस्थेचा’ प्रत्यय येतो. घराच्या रचनेविषयी वाचताना सद्य वर्तमानात मध्यमवर्गाच्या अत्यंत कळीच्या बनलेल्या ‘स्पेस’ या संकल्पनेविषयी अनेक प्रश्नचिन्हं उभी राहतात. अर्थात, घराची रचना सांगण्यापासूनच लेखकानं सुरुवात केली आहे. हे लेखकाचं उच्च मध्यमवर्गीय होण्यापूर्वीचं घर आहे. त्यामुळे या एकूण वास्तुलाच ‘स्पेस’ नामक आवकाश नसल्याचं लेखक स्वच्छ आणि स्पष्ट वर्णन करतो. उदा. आगगाडीसारखी असलेली घराची रचना; त्यामुळे पहिल्या खोलीच्या दारात उभं राहिलं, तर शेवटच्या खोलीपलीकडचंही सगळं दिसणं, शेजारची चिकटून असलेली घरं, चिकटून-चिकटून असलेल्या लहान खोल्यांच्या आगगाडीसारख्या डब्यांमध्ये दाटीवाटीनं राहणारी माणसं, सगळ्या खोल्या रांगेत असल्यामुळे एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जावं लागणं, रात्री उठावं लागलं तर एकेक खोली पार करत सगळ्यात शेवटी असणाऱ्या संडासात जावं लागणं, त्या वेळी सगळ्या खोल्यांची दारं उघडताना होणारा बिजागिऱ्यांचा आवाज, चिकटून असलेल्या घरातून येणारा आणि निवेदकाच्या आईला नकोसा वाटणारा लसणाचा उग्र दर्प या सगळ्या बाबींचा आजच्या मध्यमवर्गाच्या ‘स्पेस’ नामक संकल्पनेतून विचार केला, तर सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेल्या ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ या मूल्यावर घाला करणारे घटक असंच आजची पिढी याकडे पाहील.

मात्र स्पेस म्हणजे केवळ वास्तूनं तयार केलेला भौतिक अवकाश नसून स्पेस ही मानवी मनाची धारणा असणं, या धारणेतून सामंजस्य निर्माण करणं आणि तरीही भौतिक स्पेसअभावी बोचणाऱ्या टोकांबाबत सहिष्णू असणं, हे सगळं या आक्रसलेल्या भौतिक स्पेसबद्दल सांगताना लेखक तितक्याच प्रत्ययकारीपणे सांगतो. किंबहुना त्याही पुढे जात सामंजस्य आणि सहिष्णुता यांमधून घडलेली मनाची धारणा भावनिक पातळीवर किती सूक्ष्म जाणिवांनी माणसा-माणसाला जोडत जाते, एकमेकांत रुतवून ठेवते आणि कुटुंब, तसंच समूह पातळीवर युनिट म्हणून घट्ट बांधून ठेवत, एकेका माणसाला सुटी पडू देत नाही, हे अत्यंत तरल संवेदन-तपशिलांतून हा लेखक आपल्यासमोर ठेवतो.

..................................................................................................................................................................

माणसाच्या वर्तनाला किती बारीक पातळीवर जागतिकीकरण चॅनलाईज करत गेलं, त्यातून कृत्रिम आणि अस्सल यांमधला दुभंग माणसात कसा रुजत गेला आणि तो दुभंग माणसाला भौतिक पातळीपासून मानसिक पातळीपर्यंतच्या क्रयशीलतेकडे कसा ढकलत गेला, हे मुंग्या, त्यांचं वर्तन, त्यांच्या वर्तनाला घराने दिलेली प्रतिक्रिया आणि मुंग्यांच्या प्रसंगानंतर लेखकानं घर बदलल्याचं वर्णन करून मुंग्यांच्या उपद्रवाला दिलेली प्रतीकात्मक प्रतीकात्मक पातळी या सगळ्यांमधून स्पष्ट होतं. इथंही लेखक सुबत्ता अधोरेखित करण्याऐवजी ती ज्या चोरपावलांनी आणि ज्या गतीनं येते, ते अधोरेखित करत राहतो.

..................................................................................................................................................................

वर्तमान मध्यमवर्गाच्या जीवनशैलीच्या आणि मनोव्यापाराच्या सगळ्या नसा तो करकचून आवळतो; त्यांचा संदर्भ कुठेही सोडत नाही. त्या सगळ्या नसा शब्दांत उघड केलेल्या नाहीत. कादंबरीत रेखाटलेल्या उच्च मध्यमवर्गाविषयीच्या कथनात-कथानकात त्यांतल्या बऱ्याच नसा पकडल्या आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त नसा लेखक जागतिकीकरणापूर्वीचा काळ रेखाटताना ज्या जीवनशैलीबद्दल, मूल्यांबद्दल आणि लागट जगण्याबद्दल व्यक्त-अव्यक्तपणे सांगतो, त्या वेळी पकडल्या गेल्या आहेत.

या तपशिलाचा बारकाईनं विचार केला, तर एकेक नस माळेतल्या मण्यासारखी स्वच्छ दिसते. तिच्या जोडणी दिसतात, बिघडलेल्या जागा दिसतात आणि त्या जागेची एकेक कळ दाबली जात सतत ठणका लागत राहतो. मात्र मध्यमवर्गाच्या सभ्य-सुसंस्कृत वर्तनाप्रमाणेच हा ठणकाही थेट शब्दांत उघडावाघडा सांगितला गेलेला नाही. शब्दांत फक्त आधीच्या पिढीच्या जगण्याचं वर्णन-चित्रण आहे आणि त्या वर्णन-चित्रणातून हा ठणका मुक्या माराप्रमाणे बॅकड्रॉपला वाचकाच्या मनात सतत काळानिळा होत राहतो. लेखकाचा खरं वेगळेपण हे आहे.

शानभाग भाषा अतिशय गोळीबंद वापरतात. मात्र अनेक संदर्भ आणि अनेक अर्थ पोटात घेतलेल्या या भाषेच्या अर्थाचे बहुपदरी स्फोट वाचकाच्या मनात होत राहतात; त्यांचे पुन्हापुन्हा भडके उडत राहतात.

घराच्या भौतिक पातळीवरच्या चिंचोळ्या आणि आखूड अवकाशाबद्दल सांगताना परस्पर अव्यक्त सामंजस्याचे, मर्यादा राखणाऱ्या अव्यक्त उमजेचे, टोचणाऱ्या पण फारकत न घेणाऱ्या सहिष्णुतेचे, परिस्थितीजन्य लवचीकतेचे आणि सगळे विकार उपस्थित असूनही त्यांची टोकं न काढता निपजणाऱ्या स्निग्ध बंधांचे बिंदू लेखक या भौतिक तपशिलांच्या समोर ठेवत जातो –

घराच्या पुढच्या, म्हणजे पहिल्या खोलीत लाकडी बाकड्यावर चिकप्पा झोपायचा. खरंतर तिथे बाकडं राहील एवढीच जागा होती...कधीकधी चिकप्पा कामावरून उशिरा घरी आला, तर आवाज न करता घरात यायला ही खोली सोयीस्कर होती. त्या काळी पुढच्या दाराला आतून कडी घातलेली नसे.

त्यानंतरच्या (तिसऱ्या) खोलीत काहीसा अंधार असायचा. याच खोलीत एका कोपर्‍यात छोटं देवघर होतं... आई-अप्पा या खोलीत निजायचे...या खोलीत बाकी खोल्यांपेक्षा जास्त गारवा असायचा, म्हणून या खोलीत थोडं वेगळं वाटायचं. कधीकधी देवापुढली समईची ज्योत हळूहळू क्षीण होत जाऊन विझून जायची, तेव्हा त्यातून येणाऱ्या धुराचा वास खोलीत भरून राहायचा. हा वास मला खूप आवडायचा म्हणून कधीकधी समईतलं तेल संपलं आहे, हे कळूनही मी त्यात तेल घालत नसे.

रात्री लघवीसाठी उठावं लागलं, तर आवाज न करता, एकेक खोली पार करताना, कितीही काळजी घेतली, तरीही दाराच्या बिजागऱ्यांचा आवाज टाळणं शक्य होत नसे. बिजागऱ्या जास्तच कुरकुर करू लागल्या तर आई त्यांत तेल टाकत असे.

घराच्या दोन्ही बाजूंना खिडक्या होत्या. परंतु उजव्या बाजूला गटार असल्याने त्या बाजूच्या खिडक्या कायमच बंद असायच्या. दुसऱ्या बाजूच्या म्हणजे डावीकडच्या खिडक्यांना आईने पातळ पडदे लावले होते. त्या बाजूला राहणाऱ्या लोकांचा स्वयंपाक घाटावरच्या लोकांसारखा असायचा. त्यांच्याकडच्या लसणाच्या उग्र अशा वासानं आमची घ्राणेंद्रियंसुद्धा स्वच्छ होऊन जायची. आईला तो वास अजिबात सहन होत नसे. परंतु खिडकी बंद ठेवली, तर प्रकाश येत नसे. म्हणून दिवसा पडदे असायचे. संध्याकाळी मात्र आई खिडक्या बंद करून घ्यायची.

सकाळी मला जाग यायची, ती साधारणपणे आईच्या अंगण झाडण्याच्या आवाजानं. केरसुणीचा फर फर असा आवाज गजरासारखा वाटायचा...पण गारठा असला, तर मी आणखी थोडा वेळ झोपून राहायचो. त्यानंतर जाग यायची ती आईनं बनवलेल्या न्याहरीच्या पदार्थांच्या दरवळानं.

हे बिंदू अन्वयाचे कोणते तरंग उमटवतात? ते अनेक ठिकाणी आपल्या तथाकथित ‘स्पेस’ आणि ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ या संकल्पनांबद्दल आपल्याला थोडं हलवून नव्यानं विचार करायला भाग पाडतात. इथं हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की, ते ‘स्पेस’ ही कल्पना नाकारत नाहीत. पण स्वतःचं दुबळेपण आणि विकार झाकण्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली ती राबवणं नाकारतात; स्वतःच्याच कोशात निमग्न राहून नव्या आयामांच्या शक्यता खुडणं नाकारतात. दुसऱ्याच्या खाजगी अवकाशाचा स्वीकार, तो स्वीकार निभावताना जपावा लागणारा संयम, तो संयम कायम राखण्यासाठी धारण करावी लागणारी लवचीकता आणि सामंजस्य हे सगळं एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात ‘आत्मसात’ करत जाण्यातून ‘स्पेस’ ही संकल्पना आकाराला येते.

ती अशा प्रकारे आकाराला आल्यास, तिच्यात एक युनिट म्हणून समूह-निर्णयन, नापसंती दर्शन, तारतम्यपूर्ण हस्तक्षेप, भावनिक उद्वेगाचा निचरा, अबालवृद्ध मतमतांतरांचं स्वागत, तणावाचं विकेंद्रीकरण असे माणसांच्या लवचीक जुळणीचे, तळात गाळ बसून न देता मनाला ढवळून सतत शुद्ध राखणारे अनेक घटक जोडले जातात. मात्र ‘स्पेस’साठी म्हणून आपण जितका जितका भौतिक अवकाश मुक्रर करत जातो, तितका तळातला गाळ खोलीबंद होत जातो आणि विधायक हस्तक्षेपाच्या निर्मळ करणाऱ्या शक्यता खुडून टाकल्या जातात. याने वैयक्तिक विकास साधला जात असला, तरी जगण्याचा तोल मात्र ढळलेला दिसतो. कारण एकमेकांचे अवकाश एकमेकांना छेदत नसतील, तर एकमेकांच्या जगण्याचा हिस्सा असण्याला अर्थ उरत नाही.

..................................................................................................................................................................

जागतिकीकरणानं परफेक्शन, सिमेट्री, सौंदर्य, स्वच्छता यांचं अनाठायी अवडंबर माजवलं. या सगळ्या आपल्या समाजाच्या पूर्वापार कुचकामी जागा होत्या, हे खरंच आहे, पण त्या दुरुस्त करण्याचे मार्ग शोधण्याऐवजी जागतिकीकरणाने त्या कुचकामी जागांच्या उपद्रवाचं अवडंबर माजवून त्यांना निकामी ठरवलं आणि त्याच्या आड हळूच चकचकीत, आकर्षक पर्याय सरकवले. यातून एक प्रकारे माणसाच्या भावनिक विकासाच्या शक्यता तर खुडल्या गेल्याच, पण माणसाच्या चुकण्यालाही यातून मज्जाव केला गेला.

..................................................................................................................................................................

बायोबबलप्रमाणे त्यात केवळ एक कृत्रिम पारदर्शकता असते. अवकाश प्रत्यक्ष छेदण्यात जसं घर्षण असतं, तशी माघारही असते; जितकी अपरिहार्यता असते, तितकी क्षमतांची परजही असते; त्यामुळे क्षोभ असला, तरी समावेशकता असते. हे सगळं असल्याशिवाय बंध आणि आठवणी यांना अर्थ उरत नाही. आपापल्या गढ्या घट्ट धरून बंध तयार होऊ शकत नाहीत. अशा प्रकारे तयार झालेल्या बंधांना कायम आत्मकेंद्रितता, आत्मलुब्धता आणि मतलबीपणा यांच वास असतो. त्यामुळे अशा बंधांचे हेतू कायमच भ्रष्टपणाच्या उंबरठ्यावर उभे असतात. म्हणून तयार झालेल्या बंधांना रुजण्याची असोशी असेल, तर ते गढ्या मोडून टाकतात किंवा नाहीतर पाणथळ वनस्पतींप्रमाणे खाली दलदल साचवून पृष्ठभागावर ‘सभ्यता’ नामक चिडीचूप विलोभनीयता धारण करून बसतात. वर दिलेले हे सगळे बिंदू व्यक्ती-व्यक्तींमधली ‘स्पेस’ नावाची संकल्पना अशा रितीनं स्पष्ट करणारे आहेत.

यातून लेखक काय सांगू पाहतो? शतकानुशतकं धारण केलेली पारंपरिक मूल्यं अचानक झिडकारून आपण समोर आलेल्या सुबत्तेचा आणि आधुनिकतेचा घाईनं, सरधोपटपणे आणि अधाशीपणे स्वीकार करू पाहिला, तर त्याने बहुतेक स्थैर्य लाभलं, तरी त्यात माणूसपणाच्या अनारोग्याला मोठंच निमंत्रण दिलं जातं. ‘जुनं ते सोनं आणि नवा तो विटाळ’ हा सूर ही कादंबरी लावताना दिसत नाही. आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा मात्र या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत. वर अधोरेखित केलेले हे बिंदू या प्रश्नचिन्हांचे सूक्ष्म तरंग उमटवतात.

७.

जागतिकीकरणानं तयार केलेली बाजार नावाची व्यवस्था स्लो पॉयझनिंगप्रमाणे कशी काम करते, हेही लेखकानं ‘मुंग्या’ या रूपकातून अगदी चपखलपणे मांडलं आहे. मुंग्या काय करतात? तर कुठल्याही साध्याशा अडचणीचं उपद्रवमूल्य वाढवतात. याने साधी अडचण विनाकारण टोकदार होते. एकदा अडचण टोकदार झाली की, जाणिवांना ‘कम्फर्ट’ नावाच्या गरजा खुणावू लागतात. मात्र एका गरजेला बळी पडणं हे पुढच्या नवनव्या गरजांच्या जिभांना नकळत आमंत्रण ठरतं. पण खरी अडचण ‘कम्फर्ट’ शोधण्यात नाही. उपद्रवाच्या सुसाट गतीनं ‘कम्फर्ट’ शोधायला भाग पाडण्यात आणि तो शोधता शोधता नकळत मूल्यात्मकतेच्या ऱ्हासाचं टोक गाठत हिंस्र होण्यात, त्याचं समर्थन शोधण्यात, तसंच या सगळ्याला अधिकृतता प्राप्त होण्यात आहे.

बाजार नावाच्या व्यवस्थेनं नेमकं काय केलं? या व्यवस्थेनं संधी आणि सोयी निर्माण केल्या. शेवटच्या पायरीवरच्या माणसाचं स्वप्न साकार करण्याची ताकद दिली, पण या व्यवस्थेच्या गतीनं माणूसपणाचा मात्र घात केला. जागतिकीकरणानंतर एकदम वरवंटा फिरवल्यागत माणसाचं अवस्थांतर झालं. जगण्याची शैली, मूल्यं आणि सभ्यतेच्या कल्पनांच्या चौकटी हे सगळं असं बदललं की, रोजच्या, साध्या जगण्यातली मूल्यं ग्लोरिफाय झाली, त्यांना टोकं प्राप्त झाली आणि त्यांना मखरात बसवण्यासाठी ‘सोहळा’ हा एक अनिवार्य उपचार आणि तीव्र भावनिक बिंदू तयार झाला; या व्यवस्थेच्या रेट्यानं तो तसा तयार केला. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानता अशी कोणतीही मूल्यं आपण वर्तमान चौकटीत पाहतो, तेव्हा काय दिसतं? खरोखरच त्यांच्या कक्षा वाढलेल्या दिसतात की, ‘कक्षा वाढल्या’च्या लेबलखाली गलोरिफिकेशनचा नाटकी आणि लक्षवेधी प्रकारच अधिक दिसतो?

मुंग्यांसारख्या या उपद्रवकारक रेट्याचा निपटारा करायला गेलेल्यांचं काय होतं? मुंग्यांपासून सुटका करून घेताना घराचं जे होतं, तेच होत असावं – भीतिग्रस्तता, हिंस्रपणा, सैरभैरपणा, नैराश्यग्रस्तता, द्वेषाची निपज, असहायता, संशयग्रस्तता अशा अनेक व्याधी जडतात. थोडक्यात, विरोध करता करता माणूस विरोधी तत्त्वालाच बळी पडतो. उपद्रवमूल्य सफल होतं आणि नव्या गरजांच्या जिभा खुल्या होतात.

मुंग्या लागण्याची ठिकाणं ज्या बारकाईनं आणि एकेएक बारीक पदर पकडत, ज्या सूक्ष्म पातळीवर जाऊन लेखकानं सांगितली आहेत, त्यातून त्याच्या निरीक्षण शक्तीच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतोच, पण या जागांचा जागतिकीकरणाच्या संदर्भात रूपकात्मक पातळीवर विचार केला, तर ते मुंग्यांच्या कार्यशक्तीप्रमाणे चिवटपणे, अथक, पण रेट्यानं आणि आपल्या घरातल्या अगदी बारीक बारीक जागा शोधत, त्या जागांचं उपद्रवात रूपांतर करत हळूहळू कसं ग्रासून टाकतं, याचं अगदी विणकामी आणि कसून वेध घेणार प्रत्यंतर आपल्याला येतं.

..................................................................................................................................................................

शतकानुशतकं धारण केलेली पारंपरिक मूल्यं अचानक झिडकारून आपण समोर आलेल्या सुबत्तेचा आणि आधुनिकतेचा घाईनं, सरधोपटपणे आणि अधाशीपणे स्वीकार करू पाहिला, तर त्याने बहुतेक स्थैर्य लाभलं, तरी त्यात माणूसपणाच्या अनारोग्याला मोठंच निमंत्रण दिलं जातं. ‘जुनं ते सोनं आणि नवा तो विटाळ’ हा सूर ही कादंबरी लावताना दिसत नाही. आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा मात्र या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत. वर अधोरेखित केलेले हे बिंदू या प्रश्नचिन्हांचे सूक्ष्म तरंग उमटवतात.

..................................................................................................................................................................

जागतिकीकरणानं परफेक्शन, सिमेट्री, सौंदर्य, स्वच्छता यांचं अनाठायी अवडंबर माजवलं. या सगळ्या आपल्या समाजाच्या पूर्वापार कुचकामी जागा होत्या, हे खरंच आहे, पण त्या दुरुस्त करण्याचे मार्ग शोधण्याऐवजी जागतिकीकरणाने त्या कुचकामी जागांच्या उपद्रवाचं अवडंबर माजवून त्यांना निकामी ठरवलं आणि त्याच्या आड हळूच चकचकीत, आकर्षक पर्याय सरकवले. यातून एक प्रकारे माणसाच्या भावनिक विकासाच्या शक्यता तर खुडल्या गेल्याच, पण माणसाच्या चुकण्यालाही यातून मज्जाव केला गेला. मॅन्युअल एररचा माणसा-माणसातला स्वीकार जो पूर्वी गृहीत होता, तो स्वीकारही या व्यवस्थेनं अनाठायी अधोरेखित केला. त्यामुळे एका अर्थी त्यातली स्वीकारार्हता निकामी झाली. तिला अकारण कॉन्शसनेस आला आणि त्यातून ‘चूक’ या गोष्टीचं चलन बदललं, तिचं वलय बदललं, तिचं प्रभावक्षेत्र बदललं, तिच्यातली सहजता नाष्ट झाली आणि ‘पोलिटिकल करेक्टनेस’चं एक लोढणं तिच्या गळ्यात येऊन पडलं. त्यामुळे चुकीच्या देवघेवीतली लवचीकता नष्ट झाली. यातून ‘चूक’ या संकल्पनेचा स्तर अचानक बदलला आणि तिचं चूकपण, त्यातून होणारा भावनिक विकास, येणारी चिंतनशीलता, माणूस म्हणून ठहरावाने वाढणं हे सगळं संपून ‘चूक’ या संकल्पनेला ‘एकाने संधी गमावणं आणि दुसऱ्याला संधी मिळणं’ एवढ्यापुरतीच ही संकल्पना मर्यादित झाली.

८.

माणसाच्या वर्तनाला किती बारीक पातळीवर जागतिकीकरण चॅनलाईज करत गेलं, त्यातून कृत्रिम आणि अस्सल यांमधला दुभंग माणसात कसा रुजत गेला आणि तो दुभंग माणसाला भौतिक पातळीपासून मानसिक पातळीपर्यंतच्या क्रयशीलतेकडे कसा ढकलत गेला, हे मुंग्या, त्यांचं वर्तन, त्यांच्या वर्तनाला घराने दिलेली प्रतिक्रिया आणि मुंग्यांच्या प्रसंगानंतर लेखकानं घर बदलल्याचं वर्णन करून मुंग्यांच्या उपद्रवाला दिलेली प्रतीकात्मक प्रतीकात्मक पातळी या सगळ्यांमधून स्पष्ट होतं. इथंही लेखक सुबत्ता अधोरेखित करण्याऐवजी ती ज्या चोरपावलांनी आणि ज्या गतीनं येते, ते अधोरेखित करत राहतो. अप्पांच्या विचारातल्या ‘वृक्षाची वाढ जशी हळूहळू होते, तशी संपत्तीदेखील हळूहळू वाढली पाहिजे’ या विचाराचा खुंटा यातून बळकट होताना दिसतो. ‘अचूक’ राहण्याच्या या झपाटलेपणापायी माणसाचं जे माकड होतं, जो विदूषक होतो, त्याच्या आतलं जनावर ज्या प्रकारे बाहेर येतं आणि ‘माणूस’ हे जे फक्त लेबल उरतं, ते शानभागांनी मुंग्यांच्या संदर्भातल्या एकूण सगळ्या वर्णनातून गळा पकडावा, तस पकडलं आहे –

दुसऱ्या प्रकारच्या, किंचित तांबूस रंगाच्या मुंग्या मात्र भारी हुशार! त्याही वेड्यासारख्या धावत असायच्या; पण त्या धावण्यामागे स्पष्ट असा उद्देश असायचा. खाण्यायोग्य काही नसेल अशा ठिकाणी उगाचच धावत जाऊन त्या वेळ वाया घालवत नसत.

आई मुंग्यांना पाहून अगदी वेडीपिशी व्हायची...एखाद्या डब्याचं जरा सैल लागलेलं झाकण अथवा वाढायला घेतलेलं, पण घासायचं राहिलेलं भांडं अशा आमच्या नजरेतून सुटलेल्या बारीकसारीक गोष्टीही मुंग्यांना लगेच कळायच्या. इतकंच कशाला, जेवताना ताटाच्या बाहेर एकादं शीत पडलं किंवा वाढताना साराचे एक-दोन थेंब खाली जमिनीवर पडले, तरी आमचं जेवण पूर्ण होण्यापूर्वीच दोन मुंग्या तिथे पाहणी करण्यासाठी आलेल्या असायच्या. चहाचा कप जमिनीवर ठेवल्यावर त्याच्या तळाला लागलेल्या चहाच्या खुणा जमिनीवर उमटायच्या. तिथे लगेच पुसलं नाही, तर तिथे मुंग्या हजर...म्हणूनच तर एक प्रकारच्या असहायतेतून, सर्वांची जेवणं आटोपल्यावर लगेचच स्वयंपाकाची भांडी अगदी स्वच्छ घासून ठेवायची सवय आईला लागली होती.

आम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो, अशा जागी त्या दिसायच्या. कधीतरी एकदा चकली खाताना माझ्या कंपास पेटीवर पडलेले कण मला माहीत नव्हते; पण त्यांना ते बरोबर दिसले होते.

मुंग्यांना हरविण्याकरिता आमचे हर प्रकारचे प्रयत्न चालू असत; तरी आमचं क्षणाचंही दुर्लक्ष किंवा आमच्या प्रयत्नांतील उणीव यांमुळे मुंग्या पुन्हा दिसू लागल्या की, हरल्याची भावना मनात वाढीला लागायची...अनेकदा तर त्यांची घरं नजरेला पडल्यावर कणीक व गामाक्सिन एकत्र कालवून तयार केलेले गोळे यांच्या घरावर थापून त्यांची समाधी बांधली जाई. असं करुन किती मुंग्या मारायच्या माहीत नाही; पण आम्हाला समाधान मिळायचं. ‘कुठच्या बाजूला जावं’ असा विचार करत उभी असलेली एकटी दुकटी मुंगी जरी नजरेला पडली, तरी ‘ती आपल्याला उपद्रव देणारच’ असं वाटून तिला हुसकावून लावण्याची सवय आम्हाला झाली होती. आमच्यामध्ये अगदी नकळत निर्माण झालेल्या क्रौर्याची जाणीव प्रथम मला अनितानं करून दिली.

कोणाच्या तरी सांगण्यावरून आई आठवड्यातून एकदा घरात कडुनिंबाचा धूर करायची. त्यासाठी तिनं एक जुना डबाच तयार करून ठेवला होता...भरपूर धूर झाला की, घराच्या कानाकोपर्‍यांतून ती डबा फिरवायची, तेव्हा संपूर्ण घर धुराने भरून जायचं...हे सगळं करण्यामागे तिचं एकच ध्येय असायचं. ते म्हणजे, घराची काळजी घेणं, घर सांभाळणं. एकदा मध्यरात्री मी बाथरूमला जाण्यासाठी उठलो असता, दरवाजे उघडत असताना स्वयंपाकघरात आई दिसली. ती हातात टॉर्च घेऊन, भिंतीकडे तोंड करून उकिडवी बसली होती व रांगेत चाललेल्या मुंग्यांचं उगमस्थान शोधत होती...मुंग्या उंदीर वा मांजर यांसारखा आवाज करत नाहीत. पण अशी मध्यरात्री उठून आई त्यांना शोधायचा प्रयत्न करत होती, त्या अर्थी तिच्या मनाला त्यांचा सुगावा लागला असला पाहिजे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आता ‘मुंग्या आपल्या वैरी आहेत’ अशीच भावना निर्माण झाली होती व त्यांना मारण्यात आम्हाला कसलीच भीती वाटत नसे व अपराधीपणाची भावनाही नसे. त्यांचा त्रास व आमची असहायता वाढत चालल्यावर आम्ही त्यांचा नाश करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढू लागलो...आमची नजर चुकवून जर त्या अन्नपदार्थांच्या जवळ आल्याच, तर त्यांच्याभोवती पाण्याच्या रेघा काढून आम्ही त्यांना बाहेर जाण्यापासून अडवायचो. तिथे आतल्या आत त्या वेड्यासारख्या फिरू लागल्यानंतर पाण्याच्या रेघा जवळजवळ आणून त्यांना भिजवून टाकायचो. मुंग्यांचा मोठा जमाव असेल, तर जळता निखारा त्यांच्यावर टाकून त्यांना जाळून टाकण्याचा आणखी एक मार्ग होता...घासायला ठेवलेल्या भांड्यांवर त्या दिसल्या, तर भरपूर पाणी ओतून त्या भांड्यात त्यांना बुडवून आम्ही मारत असू. अशी क्रूरकर्मं ही आमच्या रोजच्या जीवनातील सहज अशी गोष्ट झाली होती. पहिल्यांदा एकेकट्यानं, गुपचूप केल्या जाणाऱ्या या गोष्टी काही दिवसांनंतर आम्ही सगळ्यांसमोर राजरोसपणे करू लागलो. मुंग्या म्हणजे आमचं घर गिळंकृत करायला आलेले राक्षस आहेत, अशा प्रकारे आम्ही वागत होतो.

कोणी बाहेरचं माणूस आलंच, तर आमचे उद्योग बघून ‘आमचं हे काय चाललंय’ असं वाटायचं...

या लेखाचा तिसरा आणि शेवटचा भाग वाचण्यासाठी पहा- https://www.aksharnama.com/client/article_detail/5736

.............................................................................................................................................

‘घाचर घोचर’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4468/Ghachar-Ghochar

..................................................................................................................................................................

लेखिका भाग्यश्री भागवत ग्रंथसंपादक आहेत.

bhagyashree84@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......