‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ : ही कादंबरी जागतिक महासत्ता म्हणून मिरवणारी अमेरिका वंशश्रेष्ठत्वाच्या नावाखाली आपल्याच कृष्णवर्णीय बांधवांचे शोषण कसे करत आली आहे, याची कहाणी सांगते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’चं मुखपृष्ठ
  • Fri , 07 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस टु किल अ मॉकिंगबर्ड To kill A Mockingbird हार्पर ली Harper Lee

मानवी वृत्ती-प्रवृत्ती ही व्यक्ती, स्थळ, कालसापेक्ष असते. देश बदलला, काळ बदलला आणि माणसं बदलली तरी ती सर्वत्र सारखीच असल्याचे दिसते. भारतात जात, धर्म, पंथ, भेदभाव आहे, तर पाश्चात्य देशांत वंशभेद आहे. विशेषतः प्रगत समजली जाणारी अमेरिकाही यास अपवाद नाही. वसाहतवादावर विजय मिळवत प्रगतीची घोडदौड करणाऱ्या अमेरिकेने निग्रोंवर जो (हा शब्द आज अमेरिकेत वापरला जात नाही) अन्याय, अत्याचार केला, त्यावर आजपर्यंत शेकडो पुस्तके आलेली आहेत. परंतु वैचारिक पुस्तकांपेक्षा ललित कलाकृतींमधून अन्याय-अत्याचाराची रूपे आणि त्याची मुळे किती खोलवर आहेत आणि ते मानवी न्यायासाठी किती घातक आहेत, ते कळू शकते. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ ही कादंबरी.

गेल्या ६० वर्षांत तीन कोटींहून अधिक प्रतींची विक्री झालेल्या, पुलित्झर हा सन्माननीय पुरस्कारप्राप्त ही कादंबरी नुकतीच मराठीत अनुवादित झाली आहे. डॉ. विद्यागौरी खरे यांनी अनेक वर्षांच्या अथक मेहनतीने ही सुंदर कलाकृती मराठीत आणली आहे. कृष्णवर्णी गुलामांचे शोषण आणि त्यांच्यावर केले जाणारे अन्याय-अत्याचार हे या कादंबरीचे महत्त्वाचे सूत्र आहे. एका अर्थाने ही कादंबरी नैतिक मूल्ये मांडणारी आणि आत्मकेंद्री होत जाणाऱ्या जगाला सजग करणारी आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या कादंबरीमध्ये मुख्यतः तीन-चार पात्रे आहेत, त्यातही दोन-तीन लहान मुले आहेत. यातील जीन लुईस उर्फ स्काऊटच्या निवेदनातून संपूर्ण कालपट समोर येतो. तिच्या पहिली ते तिसरीपर्यंतच्या म्हणजे वय वर्षे सहा ते नऊ या कालावधीत घडलेल्या घटनांचा आढावा ही कादंबरी घेते. एवढ्या कमी वयामध्ये तिला एवढी समज असू शकते का, हा एक प्रश्न आहेच, पण लेखिकेने दिलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तिच्या व्यक्तिरेखेला न्याय देणारी आहेत.

ही कादंबरी दोन भागांत विभागलेली आहे. यामध्ये दोन चित्रं रेखाटलेली आहेत. पहिल्या भागात एका झाडाच्या फांदीला टायर बांधलेला असून त्यामध्ये एक निष्पाप पक्षी बसलेला आहे. तो नुसता बसलेला नसून त्याला फाशीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. दुसऱ्या भागात पहिल्या चित्रासारखेच चित्र असून त्यात पक्षी दिसत नाही. अर्थात हा पक्षी म्हणजे ‘मॉकिंगबर्ड’. दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा पक्षी अतिशय निरुपद्रवी असून विविध आवाज करून लोकांचे मनोरंजन करतो. त्याला ठार मारणे म्हणजे एका निष्पाप पक्षाचा बळी घेणे, हे सूचकत्व ही कादंबरी देते.

पहिल्या प्रकरणात निवेदन करताना स्काऊट सांगते की, ॲटिकसचे वडील अलाबामा नदीच्या काठावर थोडी जमीन घेऊन सायमन फिंच अमेरिकेत येऊन स्थायिक झाला, त्याचे हे सगळे वंशज आहेत. शेतात कापूस विकून त्यावर कुटुंब गुजराण करणे, हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. सिव्हिल वॉर होते आणि पोट भरणे अवघड होऊ लागते, तेव्हा ॲटिकस घराचा उंबरठा ओलांडून मॉन्टगोमेरीला जाऊन कायद्याचा अभ्यास करू लागतो, आणि धाकट्या भावाला डॉक्टर बनवतो. त्याला अलेक्झांड्रा नावाची एक बहीण असते. कायद्याची पदवी मिळाल्यानंतर ॲटिकस मेयकोम्बला येऊन वकिली सुरू करतो. त्याला जेरेमी हा मुलगा, तर जीन लुईस उर्फ स्काऊट ही मुलगी असते. ही दोन्ही मुले लहान असताना त्याच्या पत्नीचे निधन होते, परंतु तो दुसरे लग्न करत नाही.

त्याच्या घराशेजारी रॅडले प्लस नावाचे घर असून तो ‘भूतबंगला’ म्हणून प्रसिद्ध असतो. मात्र त्यात ऑर्थर रॅडले राहत असतात. त्या कुटुंबातील बू रॅडले या मुलाला एका वाईट कामामुळे शिक्षा होते, परंतु कुटुंबप्रमुख त्या मुलाला यापुढे परिसरातील लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची हमी देऊन घरात बंदिस्त करतात. त्यामुळे त्यांचे घर कायमचे बंद असते. या तरुण मुलाला पाहण्याचा व बाहेर काढण्याचा विचार सतत स्काऊट व जेरेमी करत असतात. त्यांच्या शेजारी उन्हाळ्याच्या सुट्टी घालवण्यासाठी आलेला समवयस्क मित्र डील (पूर्ण नाव चार्लस बेकर हॅरीस) त्यांना प्रोत्साहन देतो. तो या दोघांपेक्षा एका वर्षांनी मोठा असूनही उंचीने दोघांपेक्षा बुटका असतो. त्याला वडील नसतात. म्हणजे त्याला आणि त्याच्या आईला त्यांनी सोडून दिलेले असते. त्याच्या डोक्यामध्ये भन्नाट कल्पना असतात. तो भूतबंगल्यातून त्या बू रॅडलेला बाहेर काढण्यासाठी अनेक नवनवीन योजना आखतो. पण त्यात फारसे यश येत नाही.

दुसऱ्या भागामध्ये टॉम रॉबिन्सन आणि त्याचा खटला, याभोवती कादंबरी फिरते. रॉबिन्सन हा एक निग्रो विवाहित तरुण असतो. तो अनेकांना मदत करतो. त्याचाच भाग म्हणून मिस्टर बॉब युएलला तो मदत करतो. २१ नोव्हेंबर रोजी बॉब युएलची मुलगी मेएला युएल असा आरोप करते की, रोबिन्सनने तिच्यावर बलात्कार केला. त्या वेळी तिचे वडील येतात आणि रॉबिन्सन पळून जातो. कोर्टात खटला उभा राहतो. न्यायाधीश टेलर आरोपीची वकिली करण्यासाठी ॲटिकसला सूचवतात.

पुढे हे प्रकरण केवळ मेएलाच्या बलात्‍कारापुरते मर्यादित राहत नाही, तर यातून गोरे विरुद्ध निग्रो असा संघर्ष उभा राहतो. निग्रोंची मते कोणीही विचारात घेत नाही. मुळात बलात्कारासंबंधी कुठलेही वैद्यकीय पुरावे नसताना खोटा आरोप करून त्याला देहदंडाची शिक्षा देण्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न चालू असतात. एवढेच नाही तर नीग्रो खूप माजलेले आहेत आणि आपल्याला ते भ्रष्ट करू पाहात आहेत, अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती तयार होत जाते. त्यामुळेच ॲटिकसला वेळोवेळी धमक्या दिल्या जातात.

मात्र या सगळ्या प्रकरणाकडे ॲटिकस मानवतावादी दृष्टीकोनातून पाहतो. कोर्टामध्ये सवाल-जवाब होत असतानाही मुद्देसूद मांडणी करतो. त्याला या गोष्टीची कल्पना असते की, त्याने रॉबिन्सनला निर्दोष म्हणून सिद्ध केले तरी त्याला शिक्षा होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे किमान तो सर्वांसमक्ष निर्दोष ठरला पाहिजे एवढीच तळमळ ॲटिकसला असते. कोर्टासमोर त्याने केलेली मांडणी एवढी प्रभावी होते की, हे प्रकरण फक्त कोर्टापुरते मर्यादित न राहता मानवतावादी दृष्टीकोनातून केलेले मुक्तचिंतन ठरते. तो अनेक उदाहरणे देत कोर्टातल्या ज्येष्ठांसहित उपस्थित लोकांना विचार करायला भाग पाडतो. कुठलाही धर्म, जात, वंश वाईट नसते, तर माणसे वाईट असतात. ती कुठल्याही वंशाची असू शकतात, हा त्याचा निष्कर्ष मनाला भिडतो. त्याची वकिली पाहून त्याची दोन मुलेही प्रभावित होतात. परंतु दुर्दैवाने त्याच्या विरोधात निकाल लागतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्याचिका दाखल केली जाते, पण आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणून रॉबिन्सनला पलायन करत असताना गोळ्या घातल्या जातात आणि एका निष्पाप व्यक्तीचा खून होतो.

लेखिकेने अचूक व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत. या कादंबरीतील मुख्य नायक ॲटिकस फिंचविषयी असे वर्णन येते – “इतरांच्या वडिलांमध्ये आणि आमच्या वडिलांमध्ये काही साम्य नव्हतं. त्याला चष्मा होता. डाव्या डोळ्याने तो जवळजवळ आंधळा होता. कुठलीही गोष्ट नीट पाहायची असेल तर तो मान वळवून उजव्या डोळ्याने पाहत असे. आमच्या वर्गमित्राचे वडील ज्या ज्या गोष्टी करत, त्या तो करत नसे. शिकारीला जात नसे, दारू पित नसे, सिगरेट ओढत नसे, फक्त दिवाणखान्यात बसून पुस्तक वाचत असे.”(पृ. ८१) या दोन-तीन वाक्यांतून ॲटिकसचे व्यक्तिमत्त्व कळते. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.

जेम व जीन लुईसचा मित्र चार्लस बेकर हॅरीस उर्फ डिलविषयी म्हणतो, “डील विलक्षण होता. निळ्या रंगाच्या चड्डीत शर्ट कसाबसा खोचला होता. केस बर्फासारखे पांढरेशुभ्र होते अन् वाऱ्यावर भुरभुरत होते. माझ्यापेक्षा वर्षाने मोठा असलेला हा मुलगा माझ्यापेक्षाही बूटका होता.”(पृ. १४) या वर्णनामुळे तो मुलगा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. जन्माने निग्रो असलेला रॉबिन्सनविषयीचे वर्णन असे येते – “टॉम पंचवीस वर्षांचा होता. त्याचे लग्न झालेले होतं. त्याला तीन मुलंही होती...”(पृ. १६८) तर जी मुलगी त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप करून त्याला तुरुंगात टाकते, तिच्याविषयी म्हणजेच मेएला युएल विषयीचे वर्णन असे येते- “ती थोराड बांध्याची आणि कष्ट उपसायची सवय असलेली मुलगी होती. वडिलापेक्षा ती खूपच स्वच्छ आणि नीटनेटकी होती…”(पृ. १५८)

या संक्षिप्त ओळख करून देण्याच्या पद्धतीमुळे वाचक कंटाळत नाही. लेखिका फक्त व्यक्तींचेच वर्णन करून थांबत नाही, तर ज्या गावात ही घटना घडते, त्या गावाविषयी व शेजारी असलेल्या भूतबंगल्याचीही माहिती देते.

कादंबरीतील नायिका स्कॉउट रॅडले प्लेसविषयी सांगते, “रॅडले प्लेस म्हणजे एक बैठं घर होतं. एके काळी त्याच्या भिंतीचा रंग पांढरा असावा. खिडक्या हिरव्या रंगाच्या होत्या. घराला पोर्च होतं. पण एकंदर सगळ्यालाच अवकळा आली होती…”(पृ. १५) तर गावाविषयी माहिती अशी येते, “मेयकोम्ब हे प्रामुख्याने सरकारी कचऱ्या असलेलं गाव होतं. कोणत्याही औद्योगिक कारणांसाठी ते वाढलेलं नसल्याने अलाबामातल्या इतर गावापेक्षा इथे बकाली कमी होती. सरकारी इमारती भव्य होत्या, रस्ते रूंद होते... नवीन माणसं क्वचित दिसायची. गावातल्या मूठभर कुटुंबांची आपापसात लग्न व्हायची…”(पृ. ११६) लेखिकेने जीन लुईस उर्फ स्काऊट या छोट्या मुलीच्या माध्यमातून अफलातूनच चित्र उभे केले आहे.

या कादंबरीचे बलस्थान नायिका जी भूमिका घेते, प्रसंगान्वे जे तात्त्विक विवेचन करते, त्यात दडलेले आहे. मुला-मुलींसोबत केलेले संभाषण असेल किंवा कोर्टातील युक्तिवाद असेल, सर्वच मानवतावादाची, नैतिकतेची आणि माणूस म्हणून जगण्याची सूत्रे आहेत. उदा. नायक आपल्या मुलांना म्हणतो, “दुसऱ्या लोकांशी जमवून घ्यायचं म्हणजे थोडा त्यांच्या दृष्टीकोनातूनही विचार करावा लागतो... काही लोक एवढे वाईट असतात की, त्यांच्या वाटेला जाऊन आपण त्रास करून घेण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. शिवाय त्यांना कितीही शिक्षा केली तरी त्याचा काही फायदा होत नाही...”(पृ. ३०) किंवा “सुरुवात करायच्या आधीच आपला पराभव होणार आहे, हे नक्की माहीत असलं तरी जिंकायचा प्रयत्न न करणं हा भेकडपणा आहे स्काऊट.”(पृ. ६९), किंवा “थॉमस जेफरसन एकदा म्हणाला होता की, सर्व माणसे ही जन्मतः समान असतात. पण हे सगळीकडेच लागू पडत नाही. विशेषतः सगळ्यात हास्यास्पद उदाहरण आपल्या शिक्षणक्षेत्रात पाहायला मिळतं. सगळी माणसं समान आहेत म्हणून अडाणी आणि आळशी मुलांनासुद्धा हुशार आणि चलाख मुलांच्या बरोबरीने शिकवायचा प्रयत्न केला जाते. मग ती मागे पडतात. मग कमीपणाच्या जाणीवेने ती एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. सगळी माणसं ह्या अर्थाने समान असू शकत नाहीत हे आपल्याला माहीत आहे. काही माणसं इतरांपेक्षा चालाख असतात. काही माणसांना जन्मापासूनच इतरांपेक्षा जास्त चांगली संधी मिळते. काही माणसं इतरांपेक्षा जास्त पैसा कमावतात. काही बायका इतर बायकापेक्षा जास्त सुगरण असतात. काही माणसं जन्मतः च विलक्षण बुद्धिमत्ता आणि प्रतिभा घेऊन जन्माला येतात जी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असते.”(पृ. १८३), किंवा “आपण आपले मित्र निवडू शकतो, पण नातलग निवडू शकत नाही. आपण जरी त्यांच्याशी संबंध तोडून टाकले तरी ते आपले नातलग आहेत हे आपण नाकारू शकत नाही.” (पृ. २००)

ही काही प्रातिनिधिक उदाहरणे लक्षवेधी आहेत. निग्रोंची बाजू मांडताना ॲटिकसने कोर्टात केलेला युक्तिवाद (पृ. १८१-१८३) तर मुळातूनच वाचण्यासारखा आहे. निग्रोच नाही तर जगभरात वंश, धर्म, परंपरा, चुकीच्या समजुती, पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन... यावर केलेले भाष्य डोळे उघडवणारे आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कादंबरीचा अनुवाद करताना विद्यागौरी खरे यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. अमेरिकी पर्यावरण आणि संस्कृती उलगडून दाखवत असताना बोजड किंवा अनाकलनीय होणार नाही, याची काळजी घेतली आहे. विशेषतः नातेवाईक ओळख करून देताना आत्या, काका (पाश्चात्य देशात मामी, काकू, आत्या, चुलती या सर्वांचा उल्लेख एकाच नावाने केला जातो.) अशा प्रकारे उल्लेख केल्यामुळे ते अधिक सुलभ झाले आहे.

वरकरणी पाहता पाश्चात्य देशात धार्मिक स्थळे सर्वांना खुली आहेत असे वाटते, पण अमेरिकेत निग्रोंसाठी वाईट अवस्थेत असलेली चर्चेस आणि केला जाणारा भेदभाव ही कादंबरी उघडी करते. त्यातही मजेशीर बाब म्हणजे, निग्रो लोक गोऱ्या लोकांना आपल्या चर्चमध्ये प्रार्थना करू देत नाहीत, ही बाबही लेखिकेच्या नजरेतून सुटत नाही.

थोडक्यात, ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ ही कादंबरी जागतिक महासत्ता म्हणून मिरवणारी अमेरिका वंशश्रेष्ठत्वाच्या नावाखाली आपल्याच कृष्णवर्णीय बांधवांचे शोषण कसे करत आली आहे, याची कहाणी सांगते. यासोबतच नैतिक विचार व मानवी मूल्यांची पेरणी करते.

‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ - हार्पर ली

अनु. विद्यागौरी खरे,

मनोविकास प्रकाशन, पुणे

मूल्य - ३०० रुपये.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा -

आपला समाज, आपले शेजारी यांचा विचार करायला शिकवणारं हे पुस्तक एकमेकांपासून तुटत चाललेल्या, आत्मकेंद्री आणि स्वार्थी वृत्तीनं पछाडलेल्या आपल्या समाजाकरता फार आवश्यक आहे!

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......