‘मंडेला’ निश्चितपणे ‘तमिळ क्लासिक’ म्हणावा इतक्या अव्वल दर्जाचा सिनेमा आहे!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुरेंद्रनाथ बाबर
  • ‘मंडेला’चं पोस्टर
  • Tue , 18 May 2021
  • कला-संस्कृती मंडेला Mandela मडोने अश्विन Madonne Ashwin योगी बाबू Yogi Babu शिला राजकुमार Sheela Rajkumar

‘मंडेला’ हा तमिळ सिनेमा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाला आहे. तो मडोने अश्विन यांनी दिग्दर्शित केलाय. त्यातली प्रमुख भूमिका योगी बाबू यांची आहे. ग्रामीण भागातील जातीय राजकारण आणि निवडणूक यावर आधारित हा व्यंग-सिनेमा आहे.

त्याची कथा आहे तमिळनाडूमधील सुरंगुंडी नावाच्या एका गावची. त्याचे जातीच्या आधारावर उत्तर सुरगुंडी आणि दक्षिण सुरगुंडी असे दोन भाग पडलेले असतात. या दोन विभागांत जोराचा जातीय संघर्ष असतो. तोच संघर्ष राजकारणातदेखील दिसतो. हा अनेक वर्षांचा संघर्ष थोपवून ठेवण्याचे काम गावातील ज्येष्ठ व्यक्ती आणि सरपंच पेरिया अय्या करत असतात. त्यासाठी त्यांनी दोन विवाह केलेले असतात. एक बायको दक्षिण सुरगुंडीमधून, तर दुसरी उत्तर सुरगुंडीमधून. या क्लृप्तीने त्यांनी गावात जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो. मात्र ते थकतात, तेव्हा त्यांच्याच दोन मुलांमध्ये जोराचा संघर्ष सुरू होतो. एक मुलगा दक्षिण सुरगुंडीमधून उभा राहतो, तर दुसरा उत्तर सुरगुंडीमधून. पेरिया अय्या त्यांचा उत्तराधिकारी निवडत नाहीत, एव्हाना त्यांना दोघेही सक्षम वाटत नाहीत. पण जिद्दीने पेटलेली दोन्ही मुले निवडणुकीच्या रणांगणात उतरतात.

गावाच्या मधोमध एका वडाच्या झाडावर ‘स्माईल’ (योगी बाबू) नावाचा न्हावी राहत असतो. झाडाखाली बसून लोकांच्या दाढी-मिशा करतो आणि रात्री झाडावर झोपी जातो. त्याचे ढोबळ नाव ‘स्माईल’ असते, मात्र गावातील लोक त्याला कोणत्याही नावाने हाक मारत असतात... गाढव, राक्षस वगैरे वगैरे. सबंध गाव त्याची अवहेलना करत असते. शक्यतो पैसेही त्याला कोणी देत नाही. केवळ मूठभर धान्य देतात. केवळ दाढी-मिशासाठी कसले पैसे म्हणून त्याला लोक भांडीदेखील घासायला लावतात. जातीमुळे पदरी पडलेल्या अवहेलनेमुळे जगण्यात पूर्णतः सन्मान आणि स्वाभिमान त्याने गमावलेला असतो. केवळ एक स्वप्न की, आपले झाडाखाली सलून बनले पाहिजे. त्यासाठी तो जगत असतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एके दिवशी सलूनसाठी जमवलेले पैसे एक दारुडा चोरी करतो. कुणी हे पैसे चोरले हे माहीत असूनही तो काही करू शकत नाहीत. पुढे तोच चोरटा स्माईलला सांगतो की, ‘पैसे झाडावर न ठेवता पोस्टात ठेवत जा, मग चोरी नाही होणार.’ स्माईल पोस्टात जातो. पण त्या अवस्था पाहून इथे पैसे सुरक्षित राहतील का, यावर त्याचा विश्वास बसत नाही. पण नवीन आलेली पोस्टमास्टर थेनमोझी (शिला राजकुमार) त्याला विश्वास देते की, इथे पैसे सुरक्षित राहतात. पण खाते काढण्यासाठी कोणतेही ID प्रूफ स्माईलकडे नसते. अगदी जन्माचा दाखलदेखील नसतो. जन्माच्या वेळी त्याचे नाव काय ठेवले होते, हेदेखील त्याला माहीत नसते. गावातील अनेक ज्येष्ठ लोकांना विचारून पण नाव माहीत होत नाही. शेवटी थेनमोझीला त्याची कणव येते. आणि त्याला आपणच नवीन नाव ठेवून सरपंचाच्या सहीने जन्माची नोंद घालून सगळी कागदपत्रे काढून घेण्याचे ठरवते. भरपूर नावे सुचवल्यानंतर पोस्टाच्या एका तिकीटवरून थेनमोझीला एक नाव सुचते – ‘मंडेला’.

‘मंडेला यांनीही आपल्या वर्ण-अस्मिता आणि स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला, तोच संघर्ष तू करत आहेस. हेच नाव तुला सूट होईल,’ असं म्हणत थेनमोझी त्या नावाची नोंद घालून घेते.

पुढे उत्तर आणि दक्षिणमधील निवडणूक रंगात येते. दोघे प्रतिस्पर्धी आपापल्या विभागाची मते गोळा करण्याचे प्रयत्न सुरू करतात. संबंधित जातीच्या माणसांची शोधाशोध सुरू होते. शहरात असलेल्या गावातल्या माणसांना आणणे… अगदी परदेशातील माणसेदेखील बोलावून घ्यायचे सुरू होते. पण शेवटी एकूण गोळाबेरीज होऊन मते समसमान होतात.

अशात गावात BLO ऑफिसर येतो. एक नवीन नोंदणी झाली आहे, त्याचे निवडणूक ओळखपत्र देण्यासाठी आलो आहे, असे तो सांगतो.  सर्व आश्चर्याने बघू लागतात. ते निवडणूक ओळखपत्र असते मंडेलाचे. हे पाहून दोन्ही गटाचे लोक त्याला गाढव, राक्षस न बोलवता ‘मंडेला, मंडेला’ करत बोलावू लागतात. आजवर स्वतःचे मत नसलेल्याला स्माईलला मतदार झाल्यानंतर अचानक आदर मिळू लागतो. निवडणूक ओळखपत्र तो गळ्यात घालून फिरू लागतो. त्याचे एक मत गावासाठी निर्णायक होते. दोन्ही पक्षाकडून त्याची मनधरणी सुरू होते. कपडे, सलूनसाठीचे सामान, अगदी नवे सुसज्ज सलूनदेखील उभे करून दिले जाते.

हे सगळं घडत असताना थेनमोझी त्यावर चिडते. तो म्हणतो, ‘कधी नव्हे तो सन्मान मिळत आहे. तो मी का सोडू?’ त्यावर थेनमोझी म्हणते, ‘निवडणूक संपली की, जसे पूर्वी होते तसे होईल.’ पण तो ऐकण्याच्या मानसिकतेत नसतो. दोन गटांपैकी कुणाला मत द्यायचे, हे तो बिलकूल उघड करत नाही. जोपर्यंत लोक जास्तीत जास्त पैसे देत नाहीत, तोवर तो मताची किंमत वाढवत नेतो. शेवटी त्याच्या मताचा लिलाव करण्याचे ठरवले जाते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मंडेलाचे मत नेमकं कुणीकडे आहे, हे समजेनासे झाल्यावर मात्र दोन्ही गट त्याला मारहाण सुरू करतात. त्याचे सलून पेटवतात. हा इतका संघर्ष कोणत्या गोष्टीसाठी करत आहेत, हे मंडेलाला समजते आणि त्याच्यात परिवर्तन घडून येते. मंडेलाची भूमिका बदलते. तो मग गावासाठी पाणी, सार्वजनिक शौचालय, शाळा, रस्ते इत्यादीसाठी दोन्ही गटांना ब्लॅकमेल करू लागतो. आणि नंतर गावच्या विकासाला जोर येतो.

मतदान होते. लोकांना आपल्या एका मताची किंमत लक्षात येते. विकत घेतलेले मतदार नेत्यांना मतदानाच्या दिवशी पैसे परत करू लागतात. त्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्काची पूर्णतः जाणीव होते. मतदान पूर्ण होते.

समकालीन भरकटलेल्या राजकीय सामाजिक व्यवस्थेवर व्यंगरूपातून जोरदार प्रहार करणारा हा सिनेमा आहे. एकीकडे जातीच्या अस्मितेसाठी उभा राहिलेला संघर्ष, तर दुसरीकडे केवळ एक मतदार म्हणून मिळालेली अस्मिता, असा विषय मांडला आहे.

एका त्रयस्थ भारतीय व्यक्तीच्या चष्म्यातून सर्वच समाज दोषी आहे, हे सिनेमा पाहिल्यावर लक्षात येते. समाजातील सर्वच जाती आज पोकळ अस्मितेने भारावून गेल्या असताना दिग्दर्शकाला नायकाचे नावदेखील परदेशी ठेवावे लागले असावे, असे लक्षात येते. अन्यथा आपल्या व्यवस्थेने सिनेमा ‘आपल्या’ जातीचा कसा आहे, हे शोध घेऊन त्या सिनेमावरदेखील आपल्या जातीचा शिक्का मारला असता.

पण या सिनेमाचे वैशिष्ट्य हे आहे की, आपल्याला ‘भारतीय’ मतदार हाच खऱ्या लोकशाहीचा/चित्रपटाचा नायक आहे, म्हणून पाहण्यास भाग पाडतो. प्रत्येक नागरिकाला जेव्हा आपल्या मताची खरी किंमत कळेल आणि तो भारतीय म्हणून मतदान करेल, तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही रुजेल आणि समाजात नैसर्गिक एकोपा निर्माण होईल, हा या चित्रपटाचा मुख्य आशय आहे.

‘मंडेला’ची कथा अगदी साधी असली तरी व्यंग दाखवत असताना विषयाचे गांभीर्यदेखील व्यवस्थित हाताळण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. सिनेमाला ‘मंडेला’च्या (योगी बाबू) उत्तम अभिनयाची जोड मिळाली आहे. तसेच सिनेमाचा शेवट अतिशय योग्य केला आहे. शेवट अशा पद्धतीने केला आहे की, दर्शक तिथून निश्चित विचार करावयास सुरू करतो. दर्शकासमोर प्रश्न उभा राहतो. दर्शक त्या सिनेमाचा एक भाग होतो. हे या सिनेमाचे यश आहे.

‘मंडेला’ निश्चितपणे ‘तमिळ क्लासिक’ म्हणावा इतक्या अव्वल दर्जाचा सिनेमा आहे. नक्की पहावा असा.

..................................................................................................................................................................

लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.

advbaabar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Vijay Db

Tue , 18 May 2021


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......