अजूनकाही
शेअर बाजारात व्यवहार सुरू करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. पण इंटरनेट असो, टीव्ही वाहिन्या असोत किंवा या विषयावरची उपलब्ध पुस्तकं असोत... सहसा अगदी प्राथमिक बाबी तुम्हाला कोणी सांगत नाही. सगळ्यांची माहिती ही एका किमान पातळीच्या वरची असते. साहजिकच, या बाजारात पहिल्यांदा प्रवेश करणारा गुंतवणूकदार बिचकतोच. त्याच्याकडे पैसा असतो, गुंतवण्याची इच्छा असते, पण योग्य मार्गदर्शनाच्या अभावी तो माघारी जातो. अशा पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत शेअरबाजार समजून देणारं स्वामीनाथन अन्नामलाई यांचं ‘Stock Market Investing And Trading’ हे इंग्रजी पुस्तक ‘शेअरबाजाराच्या युक्तीच्या गोष्टी’ या नावाने नुकतंच मनोविकास प्रकाशनाने मराठीत आणलं आहे. त्याविषयी अनुवादक पूनम छत्रे यांच्या शब्दांत...
..................................................................................................................................................................
सामान्य भारतीय गुंतवणूकदाराला भारतीय शेअर बाजाराबद्दल प्रचंड आकर्षण असते. वर्तमानपत्रात रोज शेअर बाजाराबद्दल बातम्या असतात. त्यांचे मथळेही ‘शेअर बाजारात कोट्यवधींची उलाढाल’, ‘परदेशी गुंतवणुकीमुळे शेअर बाजार वधारला’ असे आकर्षक असतात, किंवा कधीकधी ‘शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे अब्जावधींचे नुकसान’ असे भीतीदायकही असतात. दूरचित्रवाणीवर शेअर बाजारातल्या घडामोडी आणि त्यांचे विश्लेषण करणाऱ्या अनेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. इंटरनेटवर एका क्लिकवर शेकडो संकेतस्थळे शेअर बाजारातली आकडेवारी घेऊन हजर असतात. त्यामुळे शेअर बाजाराबद्दल कायमच चर्चा होत असते.
भारतीय शेअर बाजार सध्या एकदम तेजीत आहे. त्याची कारणे समजण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. १९९१च्या आर्थिक सुधारणांनंतर भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली. अनेक जागतिक कंपन्या हळूहळू भारतात यायला लागल्या. २००० सालानंतर शतक तर बदललेच, पण भारताप्रती जागतिक दृष्टिकोनही बदलला. याचं प्रमुख कारण होतं- संगणक क्रांती. या क्रांतीमुळे कष्टाळू आणि गुणी भारतीय तरुणांनी जागतिक बाजारपेठेत नाव आणि लौकिकही कमावला. भारत हा एक वेगाने विकसित होणारा देश म्हणून जागतिक पटलावर आला. कधीही अपेक्षा न केलेले पैसे अचानक लोकांच्या हातात नियमितपणे यायला लागले. २५ ते ४५ च्या वयोगटाचे जीवनमान कमालीचे सुधारले. पैसे आले, त्यामुळे खर्चही वाढले. हे साहजिकच असते. भारतीय बाजार याच लाटेवर स्वार झाला. मोठी घरे, गाड्या, ब्रँडेड कपडे, वस्तू, परदेश सहली, हिरे-सोने या सर्व चैनीच्या हौशी पुरवून झाल्यावर मग हाच मध्यमवर्ग उपजत शहाणपणाने आता पैसे सुरक्षित ठेवण्याचे पर्याय शोधू लागला. जमीन, घरं, बॅंकेत डिपॉझिट्स, सोनं हे पारंपरिक पर्याय होतेच, पण हा खेळता पैसा उत्तम रीतीने गुंतवला जाईल अशा नवीन पर्यायांची बाजाराला तातडीने गरज होती. ‘म्युचुअल फंड’ हा एक सशक्त पर्याय याच वेळेला उदयाला आला आणि आजघडीलाही तो गुंतवणुकीचा सगळ्यात सुलभ आणि त्यातल्या त्यात खात्रीशीर पर्याय म्हणून गुंतवणुकदारांसमोर आहे. या सगळ्यात भारतीय शेअर बाजार कुठे होता?
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
शेअर बाजार आणि देशाची राजकीय स्थिती याचाही थोडाफार संबंध असतो, हा मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा. राजकीयदृष्ट्या देश मजबूत असेल, गुंतवणुकीसाठी देशातलं वातावरण पोषक असेल, देशात परदेशी कंपन्यांच्या मालासाठी ग्राहक असतील, तर देशाची आर्थिक स्थिती भराभर वधारते. १९९१ नंतर भारतीय बाजारपेठेत हे सगळे घटक उपस्थित होते. २००० सालानंतर परदेशी गुंतवणूकदारांचा एकसंध पैसा आपल्या देशात यायला लागला आणि भारतीय शेअर बाजार खऱ्या अर्थाने उदयाला आला. त्या आधी बाजाराचा विस्तार तसा मर्यादित होता, तो आता अधिक व्यापक झाला.
२००० सालाआधी सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या फारसा वाट्याला जात नव्हता, तो आता हळूहळू शेअर बाजाराकडे वळायला लागला. पण हा शेअर बाजार तसा समजायला अवघड असतो. भलेभले इथे चकतात, प्रचंड पैसा कमावतात आणि गमावतातदेखील. त्यामुळे अनिवार आकर्षण आणि गुंतवलेल्या पैशाचा अतिशय उत्तम परतावा मिळण्याची हमी असूनही सामान्य माणूस इथले ताकही फुंकून पितो. शेअर बाजारात व्यवहार सुरू करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. पण इंटरनेट असो, टीव्ही वाहिन्या असोत किंवा या विषयावरची उपलब्ध पुस्तकं असोत... सहसा अगदी प्राथमिक बाबी तुम्हाला कोणी सांगत नाही. सगळ्यांची माहिती ही एका किमान पातळीच्या वरची असते. साहजिकच, या बाजारात पहिल्यांदा प्रवेश करणारा गुंतवणूकदार बिचकतोच. त्याच्याकडे पैसा असतो, गुंतवण्याची इच्छा असते, पण योग्य मार्गदर्शनाच्या अभावी तो माघारी जातो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
हीच पोकळी श्री. स्वामीनाथन अन्नामलाई यांनाही जाणवली. स्वामीनाथन हे स्वत: शेअर बाजारात व्यवहार करतात. त्यांनीही अगदी प्राथमिक पायरीपासून सुरुवात केली आणि अतिशय कष्टाने शेअर बाजारातले तंत्र आणि मंत्र शिकून घेतले. हळूहळू त्यांनी स्वत:च्या व्यवहारांची व्याप्ती वाढवली आणि अनुभवातून यशस्वी झाले. आपल्याला असलेली माहिती अनेकांना सांगावी, त्यांना शेअर बाजाराची किमान माहिती द्यावी आणि त्यांनाही या बाजारातून उत्तम कमाई मिळवून द्यावी या उद्देशाने त्यांनी हे पुस्तक लिहिले- ’शेअरबाजाराच्या युक्तीच्या गोष्टी’. या पुस्तकाचा उद्देश विशद करताना स्वामीनाथन लिहितात-
“भारतीय शेअर बाजाराशी निगडित पुस्तकांचा मी शोध घ्यायला लागलो, तेव्हा माझ्या असे लक्षात आले, की दोनच प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत- सामान्य माणसाला मुळीच कळणार नाहीत, अशी क्लिष्ट तांत्रिक बाबी आणि सूत्रे सांगणारी अवजड पुस्तके; किंवा शेअर बाजारातली अगदी जुनी आकडेवारी आणि माहिती देणारी पुस्तके; ज्यांचा आजच्या घडीला काहीच उपयोग नाही. म्हणूनच, हे पुस्तक केवळ भारतीय शेअर बाजाराला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले आहे. आजच्या घडीला हेच सर्वाधिक गरजेचेही आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
किमान माहितीही न घेता, अधिकचे पैसे मिळवण्याकरता, अनेक जण शेअर बाजारात उडी मारतात आणि हात पोळून घेतात. शेअर बाजारासारख्या गुंतागुंतीच्या विषयाला थोडे सुलभपणे समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. यात मी इतक्या सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कसलीही आर्थिक पार्श्वभूमी नसलेल्या साध्या माणसालाही शेअर बाजारातल्या संज्ञा समजू शकतील.”
पुस्तक वाचताना हा उद्देश पुरेपूर सफल झालेला आहे असे दिसते. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचे नाव आहे ‘शेअर बाजाराचे गमभन’. यात शेअर बाजारातल्या व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या बारिकसारिक बाबींबद्दल लेखकाने लिहिलेले आहे. त्यानंतर हुशार गुंतवणूकदार आणि हुशार ट्रेडर या दोघांसाठीही काही खास ’टिप्स’ आहेत. या अशा युक्त्या कोणी सहजपणे सांगत नाही, पण लेखकाने उदारहस्ते त्या युक्त्या सर्वांसाठी लिहिलेल्या आहेत. आपण शेअर बाजारासंबंधी बातम्या ऐकतो किंवा वाचतो तेव्हा अनेकदा ‘आयपीओ’ (Initial Public Offer) आणि ‘डिमटेरिअलायजेशन’ हे शब्द ऐकतो. या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे, त्यांची प्रक्रिया कशी असते, हे त्यांवरच्या दोन प्रकरणांमधून लेखकाने वाचकाला सविस्तरपणे सांगितले आहे. पुस्तकात ‘हिंदू अविभाजित कुटुंब (HUF)’ हे एक अतिशय रोचक प्रकरण आहे. हे नाव आपण केवळ इन्कम टॅक्ससंबंधी ऐकलेले असते. पण HUF करबचतीचे एक उत्तम, वैध साधन आहे. त्याचा सुयोग्य वापर कसा करायचा याचीही माहिती या पुस्तकात मिळते. लेखकाने संपूर्ण पुस्तकाचे आरेखन फार हुशारीने आणि मुद्देसूदपणे केलेले आहे. वाचकाला प्राथमिक माहिती आपण देत आहोत, याचे भान कायम ठेवलेले आहे. त्यामुळे पुस्तक कुठेही क्लिष्ट होत नाही, उलट वाचायला आणि समजायलादेखील सोपे होते. म्हणूनच, पुस्तकाचा उद्देशही सफल होतो. हे पुस्तक वाचून साध्या वाचकाला शेअर बाजारातल्या प्राथमिक बाबींचे आकलन नक्कीच होऊ शकते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
केवळ भारतीयच नाही, तर जागतिक शेअर बाजार नेमके कधी आणि कशामुळे उसळतील किंवा पडतील याचे गणित भल्याभल्यांना सुटलेले नाही. पण त्यात सावधगिरीने पैसे गुंतवणे आणि चांगला परतावा मिळवणे मात्र शक्य आहे. त्यासाठी थोडी चिकाटी आणि अभ्यास मात्र हवा. यातला अभ्यासाचा भाग या पुस्तकातून नक्की साध्य होऊ शकतो. हे पुस्तक वाचून वाचकाला खालील गोष्टी कळतात-
१. शेअर बाजार जितका वेळ चालू असतो, तितका वेळ संगणकासमोर बसला नाहीत, तरीही पैसे कमावता येतात.
२. भरपूर नफा मिळवून देणारे शेअर्स पटकन ओळखून आपला फायदा करून घेता येतो.
३. शेअर बाजारात ज्या शेअर्सचे व्यवहार आता होत नाहीत, अशा अ-सूचीबद्ध शेअर्सची हाताळणी.
४. भीडभाड न बाळगता ऑप्शन्स विकून टाकणे आणि नफ्याची टक्केवारी वाढवणे.
५. आयपीओबद्दल आणि आयपीओकरता पैसे कसे उभे करावेत याबद्दल माहिती.
६. कागदी शेअर्सचे रूपांतरण इलेक्ट्रॉनिक शेअर्समध्ये (डिमटेरिअलायझेशन) कसे करावे.
७. बीइइएस (BeES) म्हणजे काय, तो गुंतवणुकीचा जोखीममुक्त पर्याय आहे का?
८. स्टॉक स्क्रीनर्सशी ओळख.
९. शेअर बाजाराला कोणत्या प्रकारच्या घोटाळ्यांमुळे फटका बसू शकतो.
१०. हिंदू अविभक्त कुटुंबाची (HUF) स्थापना करून आयकर वाचवता येऊ शकतो.
पटकन समजतील असे, आणि ज्याची अंमलबजावणीही करता येतील असे सल्ले या पुस्तकात दिलेले आहेत. शेअर बाजारात व्यवहार करून तुम्हाला फारसा ताण न घेता, निवांतपणे, भरपूर उत्पन्न कमावायचे असेल, तर तुम्हाला फक्त हे पुस्तक हाताशी ठेवायचे आहे.
..................................................................................................................................................................
‘शेअरबाजाराच्या युक्तीच्या गोष्टी’ - स्वामीनाथन अन्नामलाई, अनुवाद पूनम छत्रे, मनोविकास प्रकाशन, पुणे, मूल्य - १५० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5269/Guntavnuk-Darala-Mahit
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment