या पुस्तकाचं उद्दिष्ट काय? मोठ्या चुका टाळणं आणि सहजपणे वापरता येतील अशी गुंतवणुकीसंबंधीची धोरणं आखण्यासाठी वाचकाला योग्य दिशा दाखवणं...
ग्रंथनामा - झलक
बेंजामिन ग्रॅहॅम
  • ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 29 January 2021
  • ग्रंथनामा झलक द इंटेलिजंट इन्व्हेस्टर The Intelligent Investor बेंजामिन ग्रॅहॅम Benjamin Graham

आजच्या शेअरबाजारासाठी बेंजामिन ग्रॅहॅमच्या चिरकालीन संकल्पनांची अद्ययावत टिपण्यांसह मांडणी असणारं ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनाने मराठीत आणलं आहे. अतुल कहाते यांनी अनुवादित केलेलं हे पुस्तक ‘गुंतवणूकदारांचं बायबल’ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. ‘गुंतवणूक या विषयावरचं हे आजवरचं निर्विवादपणे सर्वोत्तम पुस्तक आहे’, असं गुंतवणूक गुरू वॉरन बफे म्हणतात. या पुस्तकाचा परिचय करून देणाऱ्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

‘सर्वसामान्य माणसाला योग्य प्रकारे गुंतवणुकीच्या संदर्भातली योजना आखता आणि ती अमलात आणता यावी’ हे या पुस्तकाचं उद्दिष्ट आहे. शेअर्स किंवा बाँड्स यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यासंबंधीच्या विश्लेषणाच्या तंत्रज्ञानाचा इथे फार उहापोह केलेला नाही. गुंतवणुकीशी संबंधित असली मूलतत्त्वं आणि गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन यांवर मुख्य भर देण्यात आलेला आहे. अर्थात, शेअर्सच्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे समजावेत यासाठी अनेक ठिकाणी संक्षिप्त उदाहरणं मात्र दिलेली आहेत. त्यात न्यू यॉर्कच्या शेअरबाजारामधल्या कंपन्यांची आकडेवारी बऱ्याचदा शेजारी शेजारी दिलेली आहे.

आपल्या पुस्तकामधला बराचसा भाग मात्र आर्थिक बाजारांच्या नमुन्यांचा इतिहास तपासण्यासाठी खर्च करणार आहोत. यासाठी कित्येकदा आपण अनेक दशकं मागे जाणार आहोत. यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे बाँड्स आणि शेअर्स यांची कामगिरी वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कशी झाली आहे, हे समजून घेणं आवश्यक ठरतं. तेव्हासारखी परिस्थिती आपल्या हयातीतही कदाचित अनुभवायला मिळू शकते. संतायनाच्या भूतकाळाचा ज्यांना विसर पडतो, त्यांच्याकडूनच आधीच्या चुकांची पुनरावृत्ती होते या विधानाचा परिणाम आपल्याला वॉल स्ट्रीटपेक्षा इतर कुठे जास्त चांगल्या प्रकारे जाणवणारच नाही.

‘आपलं पुस्तक नफेखोरांसाठी नाही; ते गुंतवणूकदारांसाठी आहे’ या दोन्हींमधला आता विस्मरणात गेलेला फरक नजरेला आणणं, हे आपलं पहिलं काम असेल. सुरुवातीलाच ‘कोट्यधीश कसं बनायचं?’ प्रकारचं हे पुस्तक नसल्याचा खुलासा करणं भाग आहे. वॉल स्ट्रीट किंवा इतर कुठेही श्रीमंत बनण्यासाठीचे खात्रीलायक आणि सोपे मार्ग नसतात. आर्थिक घडामोडींच्या इतिहासाच्या मदतीनं आपण या मुद्द्याचं आणखी स्पष्टीकरण देऊ शकतो. खास करून, त्यातून एकापेक्षा जास्त धडे घेणं शक्य असल्यामुळे ते महत्त्वाचंही आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि खास करून वॉल स्ट्रीटमध्ये महत्त्वाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉन जे रास्कॉब यानं ‘लेडीज होम जर्नल’ या नियतकालिकामध्ये भांडवलशाहीच्या फायद्यांविषयी १९२९ या निर्णायक वर्षामध्ये एक लेख लिहिला. त्याचं शीर्षक ‘खरं म्हणजे प्रत्येक माणूस श्रीमंत असायलाच हवा’ असं होतं. ‘चांगल्या शेअर्समध्ये दरमहा फक्त १५ डॉलर्सची गुंतवणूक केली आणि त्यातून मिळणारा डिव्हिडंडसुद्धा गुंतवला तर २० वर्षांमध्ये गुंतवलेल्या ३,६०० डॉलर्सची रक्कम वाढून ८०,००० डॉलर्स एवढी होईल’ हे जनरल मोटर्स कंपनीच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याचं (रास्कॉबचं) म्हणणं खरं असतं, तर श्रीमंत होण्यासाठीचा हा खरोखरच अत्यंत सोपा मार्ग ठरला असता. त्याचं हे म्हणणं कितपत खरं ठरलं?

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

आमच्या हिशोबानुसार १९२९-४८ या काळात गुंतवणूकदारानं अशा प्रकारे गुंतवणूक केली असती तर १९४९ सालच्या सुरुवातीला गुंतवणूकदाराच्या रकमेचा आकडा वाढून फार फार तर ८,५०० डॉलर्सवर पोहोचला असता. त्या महान माणसानं भाकित केलेल्या ८०,००० डॉलर्सच्या तुलनेत हा आकडा अगदीच नगण्य ठरला असता. म्हणूनच, आशावाद आणि त्यावर आधारित भविष्याची खात्री यांच्यावर विसंबून राहणं किती चुकीचं ठरू शकतं, हे आपल्या लक्षात येईल. या मुद्द्याकडे आपण क्षणभर दुर्लक्ष केलं तर या २० वर्षांच्या काळात गुंतवणूकदाराला प्रत्यक्षात मिळालेला परतावा चक्रवाढी पद्धतीनं वाढत आठ टक्के एवढा ठरला असता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदारानं आपल्या गुंतवणुकीला सुरुवात करताना ‘डाउ जोन्स’ हा शेअरबाजाराचा निर्देशांक ३०० असता आणि १९४८ साली तो १७७ इतका खाली आलेला असता. म्हणूनच, काहीही घडो; दर महिन्याला चांगल्या शेअर्सची खरेदी थोड्या प्रमाणात करत राहण्याची संकल्पना अत्यंत प्रभावी ठरते, हे या उदाहरणावरून स्पष्ट व्हावं. तांत्रिक भाषेत याला ‘गुंतवणुकीचे पद्धतशीर नियोजन’ (‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग’) असं म्हणतात.

आपलं पुस्तक नफेखोरी करणाऱ्यांसाठीचं नसल्यामुळे ते शेअरबाजारात व्यवहार किंवा ‘ट्रेडिंग’ करत राहणाऱ्यांसाठीचंही नाही. हे काम करणारे बहुतेक लोक खरेदी आणि विक्री यांसाठीच्या योग्य वेळा ठरवण्यासाठी आलेखांचा किंवा इतर यांत्रिक संकल्पनांचा वापर करतात. या सगळ्या तांत्रिक विश्लेषणाच्या (‘टेक्निकल अनॅलिसिस’) मुळाशी असलेली एकमेव गोष्ट - ‘शेअरची किंमत वाढलेली असल्यामुळे तो खरेदी करावा आणि शेअरची किंमत कमी झालेली असल्यामुळे तो विकावा’ ही असते. खरं म्हणजे हा उफराटाच प्रकार आहे. म्हणूनच, या मार्गाचा वापर करून वॉल स्ट्रीटमध्ये दीर्घकालीन यश कमावणं खूप अवघड आहे. आमच्या शेअरबाजारामधल्या ५० वर्षांच्या अनुभवांनुसार शेअरबाजारामध्ये घडलेल्या घटनांनुसार कृती करण्याचा हा पर्याय वापरून सातत्यानं किंवा स्थिर पैसे कमावण्यात एकाही माणसाला यश लाभलेलं नाही. हा मार्ग जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो चुकीचाही आहे, हे सांगताना आम्ही मागे हटणार नाही. शेअरबाजारामध्ये ‘ट्रेडिंग’ करण्यासंबंधीच्या प्रसिद्ध ‘डाउ थिअरी’वर थोडक्यात नजर टाकून आम्ही या वक्तव्याला दुजोरा देणार आहोत. अर्थात, आमच्या म्हणण्यामागील हा ठोस पुरावा आहे, असं आम्ही म्हणणार नाही.

१९४९ साली पहिल्यांदा प्रकाशित झाल्यापासून ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ या पुस्तकाची नवी आवृत्ती साधारणपणे दर पाच वर्षांनी प्रकाशित झाली आहे. १९६५ सालच्या आवृत्तीनंतर अनेक घडामोडी झाल्यामुळे या सध्याच्या आवृत्तीमध्ये त्यांचा विचार करणं आम्हाला गरजेचं वाटलं. त्यांची ही झलक :

१. चांगल्या दर्जाच्या बाँड्सच्या व्याजदरांमध्ये झालेली अभूतपूर्व वाढ.

२. चांगल्या शेअर्सच्या किमतीत १९७० सालच्या मे महिन्याच्या सुमाराला संपुष्टात आलेली तोपर्यंत असलेली साधारण ३५ टक्क्यांची घट. गेल्या ३० वर्षांमध्ये अशा प्रकारची घट बघायला मिळालेली नव्हती. (दुय्यम दर्जाच्या शेअर्सच्या किमतींमध्ये तर याहून खूप जास्त घट झाली.)

३. वस्तूंच्या किमतींमध्ये घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही पातळ्यांवर होत गेलेली सातत्यपूर्ण वाढ. १९७० साली एकूण व्यवसायक्षेत्रात घट झालेली असूनही महागाई कमी झालेली दिसली नाही.

४. बलाढ्य कंपन्यांची वेगानं होत गेलेली वाढ, आपल्या कंपनीचं कामकाज चालवण्यासाठी इतरांना हक्क विकणं, यांसारख्या व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात घडणाऱ्या नावीन्यपूर्ण घडामोडी. (यात ‘लेटर स्टॉक’, स्टॉक ऑप्शन वॉरंट्स यांचा वाढत गेलेला सुळसुळाट, दिशाभूल करणारी नावं वापरणं, विदेशी बँकांचा शिरकाव, अशा गोष्टींचाही समावेश होतो.)

५. सगळ्यांत मोठ्या रेलरोड कंपन्यांची दिवाळखोरी, पूर्वी खूप बलाढ्य समजल्या जाणाऱ्या कंपन्यांच्या अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांमध्ये झालेली भरघोस वाढ आणि अनेक कंपन्यांची मालमत्ता जवळपास नगण्य होणं.

६. गुंतवणुकीच्या योजनांच्या बाबतीत ‘कामगिरी’वर खूप भर देणं. काही बँकांनी सुरू केलेल्या अशा योजनांचे निकाल निराशाजनक ठरणं.

या घडामोडींकडे आपण बारकाईनं लक्ष देणार आहोत आणि त्यामुळे आधीच्या आवृत्तीमधले निष्कर्ष तसंच महत्त्वाचे मुद्दे, यांत बदल झालेले आहेत. कित्येक दशकांपासून चालत आलेली गुंतवणुकीसंबंधीची मूलभूत तत्त्वं काही बदलत नाहीत; पण आर्थिक वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांशी या तत्त्वांचा प्रत्यक्ष वापर यांची संगती लावणं मात्र गरजेचं आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

१९७१ साली जानेवारी महिन्यात या आवृत्तीचा पहिला खर्डा लिहून झालेला असताना वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांपैकी पहिल्या मुद्द्याचा अनुभव आला. त्या सुमाराला १९७० सालच्या ६३२ या नीचांकावरून ‘डाउ जोन्स’ निर्देशांक ९५१ अंकांपर्यंत उसळला होता; तसंच, वातावरणही आशादायी होतं. १९७१ साली नोव्हेंबरपर्यंत या आवृत्तीचा शेवटचा खर्डा लिहून पूर्ण झाला, तेव्हा ‘डाउ जोन्स’ निर्देशांक घसरून ७९७ अंकांवर तर आलाच होता; शिवाय, एकूण वातावरणही निराशाजनक होतं. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९४९ साली प्रकाशित झाल्यापासून अशा चढउतारांमुळे गुंतवणुकीसंबंधीच्या मूलभूत तत्त्वांकडे बघण्यासंबंधीचा आमचा दृष्टिकोन बदलू नये, याची आम्ही नेहमीच काळजी घेतलेली आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये पसरलेला एक गैरसमज १९६९-७० या काळातल्या शेअरबाजारामधल्या मोठ्या घसरणीमुळे दूर झाला असावा. हा गैरसमज म्हणजे, कंपन्यांचे शेअर्स आपण केव्हाही आणि कुठल्याही किमतीला विकत घेतले तरी त्यातून आपल्याला नफा मिळतोच आणि शिवाय मधल्या काही काळात जरी आपल्याला अपयश सोसावं लागलं तरी शेवटी बाजार वर जातोच जातो आणि त्यामुळे आपलं नुकसान भरून निघतंच. हा चुकीचा आशावाद आहे. शेअर्सच्या किमतींमध्ये भरीव आणि दीर्घकाळ नुकसान सोसावं लागू शकतं किंवा नफा मिळू शकतो. नफेखोर आणि गुंतवणूकदार अशा दोघांनाही या दोन्ही गोष्टींची तयारी ठेवणं आवश्यक असतं हे दिसून आलं आहे.

अनेक दुय्यम दर्जाच्या आणि खास करून नव्यानं स्थापन झालेल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाबतीत सोसावं लागलेलं नुकसान तर भयंकरच होतं. खरं म्हणजे यात नवीन असं काहीच नाही. १९६१-६२ साली असाच प्रकार घडला होता. पण या वेळेचा नवाच प्रकार म्हणजे फंड गुंतवणुकीसाठी बनवलेल्या काही योजनांनी अशा प्रकारच्या काही धोकादायक आणि खूप महाग शेअर्सबाबत लोकांना चांगल्या उत्पन्नाचे अमिषयुक्त वायदे केले होते. ‘इतर क्षेत्रात धडाडी दाखवणाऱ्या लोकांनाच काहीतरी मोठं काम करून दाखवता येत असलं, तरी वॉल स्ट्रीटमध्ये यामुळे जवळपास खात्रीनं धूळधाण उडणार हे नक्की असतं’ हे फक्त नवशिक्यांच्याच नाही तर अनुभवी लोकांच्या बाबतीतही खरं आहे.

चांगल्या दर्जाच्या बाँड्सच्या व्याजदरांमध्ये खूप वाढ होण्यातून निर्माण होणाऱ्या समस्येचा विचार करणं हे आमच्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे. गुंतवणूकदाराला शेअर्समध्ये गुंतवणूक करून मिळत असलेल्या डिव्हिडंडपेक्षा जवळपास दुप्पट उत्पन्न या बाँड्सनी १९६७ सालच्या अखेरीपासून मिळवून दिलं आहे. १९७२ सालच्या सुरुवातीला शेअर्सच्या डिव्हिडंडचा दर २.७६ टक्के, तर बाँड्सचा व्याजदर ७.१९ टक्के होता. (१९६४ वर्षाखेरीला हेच दर अनुक्रमे २.९२ टक्के आणि ४.४० टक्के होते.) १९४९ साली आम्ही हे पुस्तक प्रथम लिहिलं, तेव्हा शेअर्सच्या डिव्हिडंडचा दर ६.८२ टक्के आणि बाँड्चा व्याजदर २.६६ टक्के असा बरोबर उलटा होता, हे सहजपणे लक्षात येत नाही. ‘सर्वसामान्यपणे समभाग (इक्विटी) आणि रोखे (बॉन्ड्स) यांच्यात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारानं आपली रक्कम दोन्हींमध्ये ५० टक्के अशी विभागून गुंतवली पाहिजे’ असं आम्ही आधीच्या आवृत्त्यांमध्ये सातत्यानं म्हणत आलेलो आहोत आणि त्यातही सावध गुंतवणूकदारानं किमान २५ टक्केच हिस्सा शेअर्समध्ये गुंतवला पाहिजे असं आम्ही म्हटलेलं आहे. “आता मात्र बाँड्समधल्या गुंतवणुकीतून मिळत असलेल्या व्याजाचे दर खूपच जास्त असल्यामुळे ‘परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत’ गुंतवणूकदारानं आपली संपूर्ण गुंतवणूक बाँड्समध्येच करावी का?’’ हा विचार आता करणं भाग आहे. साहजिकच सतत डोकं वर काढणाऱ्या महागाईचा या संदर्भात विचार केला पाहिजे हेही नक्की. यासाठी आपण एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेलं आहे.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

आत्तापर्यंत आम्ही ‘सावध’ आणि ‘आक्रमक’ असा दोन प्रकारचा भेद गुंतवणूकदारांमध्ये केलेला आहे. सावध किंवा सक्रिय नसलेला गुंतवणूकदार मोठ्या चुका किंवा मोठं नुकसान टाळण्यावर सगळा भर देतो. यामागचा त्याचा दुसरा उद्देश - सातत्यानं गुंतवणुकीच्या संदर्भातले निर्णय वारंवार घेत राहण्यासंबंधीचे प्रयत्न, त्याची कटकट, हे टाळण्याचा असतो. आक्रमक किंवा सक्रिय गुंतवणूकदाराचं मुख्य लक्षण म्हणजे चांगल्या आणि आकर्षक शेअर्सची निवड करण्यामध्ये तो भरपूर वेळ तसंच प्रयत्न खर्ची घालतो. अनेक दशकांचा विचार केला, तर या प्रयत्नांपोटी आक्रमक गुंतवणूकदाराला सावध गुंतवणूकदारापेक्षा आपल्याला जास्त भरीव नफा मिळावा, अशी अपेक्षा असे. आजच्या परिस्थितीमध्ये मात्र खरोखरच असं घडेल का याविषयी आम्हाला शंका वाटते. कदाचित येतं वर्ष किंवा पुढची अनेक वर्षं चित्र एकदम वेगळं असू शकतं. म्हणूनच, पूर्वी आक्रमक गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या संधींप्रमाणे भविष्यात पूर्वीसारख्या चांगल्या संधी परत येऊ शकतात, हा विचार करून आम्ही त्याकडे पुरेसं लक्ष देत आहोत.

चांगली वाढ होईल अशी उद्योगक्षेत्रं निवडणं आणि त्या उद्योगक्षेत्रांमधल्या उत्तम कंपन्या निवडणं हे यशस्वी गुंतवणुकीचं गमक असल्याचं अगदी पूर्वीपासून मानलं जातं. उदाहरणार्थ, चाणाक्ष गुंतवणूकदारांनी किंवा त्यांच्या गुंतवणूक सल्लागारांनी ‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भरभराट येणार आणि त्यातही आयबीएम कंपनीला खूप फायदा होणार’ हे केव्हाच लक्षात घेतलेलं असणार. हाच प्रकार चांगली वाढ होऊ घातलेल्या इतर उद्योगक्षेत्रांच्या आणि कंपन्यांच्या बाबतींतही घडू शकतो. मागे वळून बघताना मात्र हे वाटतं तितकं सोपं नसल्याचं आपल्या लक्षात येईल. हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी या पुस्तकाच्या १९४९ सालच्या आवृत्तीमधला एक परिच्छेद खाली देत आहोत :

विमान कंपन्यांचं भवितव्य शेअरबाजाराला वाटतं त्याहून उज्ज्वल असल्यामुळे एखादा गुंतवणूकदार त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करेल. अशा गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीविषयी काही सकारात्मक दिशादर्शन करण्याचं काम हे पुस्तक करणार नाही; उलट, त्यांच्या मार्गातल्या धोक्यांविषयी सावध करण्याचं मौल्यवान काम हे पुस्तक करेल.

वर उल्लेख केलेल्या उद्योगात हे धोके खूपच मोठ्या प्रमाणात खरे ठरल्याचं दिसून आलेलं आहे. विमानानं प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या सातत्यानं वाढत जाईल, याविषयी कुणाच्याच मनात शंका नव्हती. यामुळे गुंतवणूक योजनांमध्ये विमान कंपन्यांच्या शेअर्सचा मोठा भरणा झाला. या कंपन्यांचं उत्पन्न संगणक क्षेत्रामधल्या कंपन्यांपेक्षाही वेगानं वाढत गेलं खरं; पण तांत्रिक अडचणी आणि गरजेपेक्षा जास्त विस्तार, यांमुळे त्यांच्या नफ्यामध्ये खूप चढउतार आले आणि कित्येकदा तर नफा एकदमच खुंटला. १९७० साली विमानप्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होऊनसुद्धा विमान कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जवळपास २० कोटी डॉलर्सचं नुकसान सोसावं लागलं. (१९४५ आणि १९६१ या दोन्ही वर्षीसुद्धा या कंपन्यांना नुकसान सोसावं लागलं होतं.) १९६९-७० साली इतर कंपन्यांच्या तुलनेत विमान कंपन्यांच्या शेअर्समध्ये जास्त घसरण झाली. या मोठ्या आणि अजिबात गूढ नसलेल्या उद्योगाच्या अल्पकालीन भविष्याविषयी गलेलठ्ठ पगार घेणारे म्युच्युअल फंड तज्ज्ञसुद्धा साफ चुकले, हे यावरून दिसून येतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

याउलट, ‘आयबीएम’ कंपनीमध्ये गुंतवणूक कंपन्यांनी मोठ्या गुंतवणुकी केलेल्या असल्या आणि त्यांतून मिळालेला नफाही खूप जास्त होता तरी शेअरची जास्त किंमत आणि तिच्या वृद्धीविषयीची अनिश्चितता यामुळे प्रत्यक्षात या गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांनी आपल्या एकूण भांडवलापैकी फक्त तीन टक्के रक्कमच या कंपनीमध्ये (‘आयबीएम’मध्ये) गुंतवली असल्याचं स्पष्ट झालं. साहजिकच, इतक्या कमी गुंतवणुकीमुळे या उत्तम गुंतवणुकीचा पुरेसा परिणाम त्यांच्या एकूण निकालांमध्ये दिसू शकला नाही. याखेरीज ‘आयबीएम’ वगळता संगणक क्षेत्रामधल्या इतर कंपन्यांमधली या कंपन्यांनी केलेली गुंतवणूक लाभदायी ठरलेली नसल्याचंही आढळून येतं. या दोन उदाहरणांमधून आम्ही वाचकांसाठी दोन निष्कर्ष सादर करत आहोत :

१. एखाद्या व्यवसायात भौतिकदृष्ट्या वाढ होत असल्याचं दिसत असलं, तरी त्याचा थेट नफा गुंतवणूकदाराला मिळेलच असं नाही.

२. सगळ्यांत आशादायक उद्योगांमधल्या आशादायी कंपन्यांची निवड करणं हे अगदी तज्ज्ञांनाही खात्रीनं जमेलच असं नाही.

प्रस्तुत लेखकानं निधी व्यवस्थापक म्हणून काम बघत असताना असा मार्ग वापरला नाही आणि म्हणूनच ज्यांना तो वापरायचा असेल त्यांच्यासाठी काही विशिष्ट सल्ला किंवा प्रोत्साहन देण्यासारखं त्याच्याकडे काही नाही.

असं असेल, तर या पुस्तकाचं उद्दिष्ट काय? मोठ्या चुका टाळणं आणि सहजपणे वापरता येतील अशी गुंतवणुकीसंबंधीची धोरणं आखण्यासाठी वाचकाला योग्य दिशा दाखवणं हेच आमचं उद्दिष्ट!

..................................................................................................................................................................

‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ - बेंजामिन ग्रॅहॅम, अनुवाद अतुल कहाते, मनोविकास प्रकाशन, पुणे, मूल्य - ५५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5268/The-Intelligent-Investor

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......