चंद्रमोहन सर, ‘कलाकार’ या बिरुदाआड ‘माणूस’पण झाकोळलं न जाणं, हा तुमच्या लेखनाचा खूप मोठा ‘स्ट्राँग पॉइंट’ वाटतो!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
भाग्यश्री भागवत
  • ‘बिटविन द लाइन्स’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 04 December 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो बिटविन द लाइन्स Between the Lines चंद्रमोहन कुलकर्णी Chandramohan Kulkarni

चंद्रमोहन सर,

‘राईट अप’सारखं न लिहिता पत्रवजा लिहिण्याचं कारण असं की, चित्र, चित्रवजा लेखन, रेष आणि रेषांचे अर्थ यांबद्दल वाचन शून्य; आळशीपणा भरपूर; त्यामुळे अभ्यासाचा वगैरे प्रश्नच नाही; आणि तुमच्या पुस्तकाबद्दल काहीही लिहिताना, कमेंट करताना रेष वजा करून लिहिता येऊ शकत नाही. त्यामुळे मी जे काही लिहीन त्याचा या सगळ्यासकट मला कितपत नीट विचार करता येईल, याची जरा शंका वाटतेय. पत्रामुळे या सगळ्या सांगण्याला वैयक्तिक देवाण-घेवाणीचं स्वरूप येईल आणि हे छापलं तरी व्यक्तिसापेक्षतेमुळे लोकांना ते विशेष ग्राह्य न मानण्याची मुभा राहील.

अनुक्रमणिकेत दिलेली शीर्षकं आणि शीर्षकांमधलला फॉन्ट साईज वाढवून मोठी केलेली अक्षरं यांचा बराच काळ विचार करत राहिले. कारण सिमेट्री आणि/ किंवा सजावट वा मांडणी केवळ एवढ्याच दृष्टीनं ती केलेली नसणार, असं आधीपासून वाटत होतं आणि पुस्तक वाचत गेल्यावर, त्यानंतर ‘लोकमत’मधला तुमचा कमल शेडगेंवरचा छोटासाच लेख वाचल्यावर अधिक ठळक झालं; पण वर उल्लेख केल्याप्रमाणे या बाबतीत विशेष वाचन नसल्यानं मी लावत असलेला अन्वय अंदाजपंचे असू शकतो. 

‘निळी सायकल’ या अनुक्रमणिकेतल्या शीर्षकात ‘सा’ हे अक्षर मोठं केलेलं आहे. या मोठ्या ‘सा’चा विचार करताना माझं कनेक्शन एकदम संगीताकडे लागलं. संगीताचं शिक्षण घेताना पहिल्यांदा शिकवला जातो तो ‘सा’. तुमच्या चित्रकलेच्या कारकिर्दीची सुरुवात आणि या सगळ्यातलं सायकलचं स्थान - स्पोक्सच्या रेषा, स्पोक्स फिरताना होणारा प्रकाशाचा खेळ... अगदी वडलांनी सायकलवर बसण्यासाठी टांग टाकताना तयार झालेलं अर्धवर्तुळ - या अनुषंगानं तो एकूण श्री गणेशाचा ‘सा’ आहे आणि म्हणून अनुक्रमणिकेत या अन्वयार्थानं मोठा केला आहे, असं वाटलं.

हा अन्वयार्थ लावत असताना मध्येच पंडित भीमसेन यांनी एके ठिकाणी सांगितलेली एक गोष्ट आठवली. ते म्हणाले होते की, ‘सवाई गंधर्वांनी पहिला बराच काळ त्यांना फक्त ‘सा’ लावायला सांगितला होता; घटवून घेतला होता.’ हे उमगतानाच तो धागाही उमगल्यागत वाटलं, जो अर्पणपत्रिकेवरून सुरू होऊन अनुक्रमाद्वारे ‘निळी सायकल’ या लेखाच्या सुरुवातीच्या पानावर जातो. मजकुरातल्या ‘निळी सायकल’ या शब्दांना एक सैलसर वेटोळा घालून त्याखालच्या परिच्छेदाला अधोरेखित करत, पण त्यातून वाट काढत लेखातल्या शीर्षकातल्या ‘निळी सायकल’ या दोन शब्दांमधून जातो. जाता जाता सायकलला एक सैलसर वेटोळं घालतो आणि पुढे किंचित आवर्तन निर्माण करतो.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : वडिलांची निळी हर्क्युलसची सायकल... केवढा अभिमान होता त्यांना!

.................................................................................................................................................................

यातून अनुक्रमातून म्हणजे कारकिर्दीच्या सुरुवातीपासून, मजकुरात म्हणजे प्रत्यक्ष जगण्यात प्रवेश करणारा चित्रकलेचा ‘सा’ म्हणजे सुरुवातीचा स्वर म्हणजे कारकिर्दीतले सुरुवातीचे दिवस पुढे सरकताना एका खासियतीची जाणीव ठेवून, पण त्यात न अडकता सायकलच्या मदतीने म्हणजे अगदी मुळापासून सुरुवात करत, किंचित वाटा वळणं घेत म्हणजे वेगवेगळे अनुभवत गोळा करत हा धागा पुढे जातो.

‘सायकल’ या शब्दाला धाग्याचं सैलसर वेटोळं घालण्यात मला आणखी एक अन्वय लागला. रूप संकल्पनाकाराला किंवा तुम्हाला तो अभिप्रेत आहे की, नाही माहीत नाही, पण सुरुवातीपासून अनुभव आत घेण्याची गती आणि सायकलची गती असा अन्वय मला लागला. म्हणजे कारकिर्दीचा वेगानं अनुभव घेणारा ‘सा’ ठेहराव सोडत नाही; सायकलशी, तिच्या जीवनस्तराशी, त्या जीवनस्तराशी निगडीत गतीनं जगणाऱ्यांशी नाळ कायम ठेवतो. त्यामुळे सायकलच्या गोल चाकांप्रमाणे सगळं फिरूनही पुन्हा समेवर येणाऱ्या किंवा सम धरून शकणाऱ्या कारकिर्दीच्या निर्देशाचा हा ‘सा’ आहे, असंही वाटून गेलं.

अर्थात हे मी नको तेवढं ताणून लावलेलं आकलन असेल तर सोडून द्या. मी आधी म्हटलं तसं पानांवर काढलेला धागा दोन ओळींमधून अन्वय लावत मला जसा घेऊन गेला आहे, तशी मी गेले आहे.

‘आत्मशत्रू’ हे आणखी एक या दृष्टीनं जाणवलेलं उदाहरण. अनुक्रमणिकेत शब्दातला ‘त्म’ मोठा केला आहे. स्वतःच स्वतःत खुपसून घेतलेल्या तलवारीप्रमाणे भासणारं हे जोडाक्षर आहे. जणू ‘म’ म्हणजे ‘मी’ आणि त्यात घुसलेला अर्धा ‘त्’ म्हणजे ‘तलवार’ किंवा अगदी तलवारीच्या पात्याचा आकारही, या ‘त’शी साधर्म्य दाखवणारा असतो. आणि लिहितानाही ‘त्’, ‘म’मध्ये घुसल्यागतच दिसतो. अर्थात लेख वाचल्यावर मोठ्या केलेल्या जोडाक्षराचा विचार करताना मला हे गवसलं आहे.

मजकुरातल्या शीर्षकातला धागा पाहिला तर असं जाणवतं की, हा मजकुराला कुठेच स्पर्श करत नाही, पण शीर्षकाला एक सैलसर वेटोळं घालून शीर्षकाच्या थोडा वर बराच गुंतलेला दिसतो; या लेखात तुम्ही वर्णन केलेल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे स्वतःच्याच विचारांचा गुंता करून जणू त्याच्याशीच जुळवून घेतल्यासारखा. किंवा पुढे तुम्ही लिहिलं आहे तसं - ‘प्रदर्शनादिवशी खाली अंधारात येरझाऱ्या घालत राहिला, पण वर उजेडात आला नाही.’ खरं तर या वाक्यातून चित्र काढलं तुम्ही असं वाटलं आणि अंधार उजेड, वर खाली, रद्दीचं बोचकं समुद्रकाठची चित्रं, येरझाऱ्या, गॅलरी या सगळ्यांना एकदम झपझप नवे आयाम, अन्वयार्थ मिळाल्यागत आणि तुमच्या सांगण्यातली म्हणजे तुम्हाला सूचित करायची असलेली सगळी वेदना, घालमेल, असहाय्यता, कोरडेपणा, कळकळ, चकचकाट, बेगडीपणा असं सगळं एकदम दृश्यमान होऊन अंगावर आलं.

हीच दृश्यमानता लेखात आणखी एका ठिकाणीही काळजात घुसते. जेव्हा तुम्ही त्याच्या कुटुंबीयांबद्दलच्या चुटपुटत्या अस्पष्ट बोलण्याला पुस्तकातल्या ‘प्रिंटिंगला न उमटलेल्या एखाद्या पानाची उपमा’ देता. तो सतत वागवत असलेली प्रूफं, कामातला चोखपणा, आयुष्यच एक पुस्तक बनून गेल्यासारखं व्यक्तिमत्त्व असलेल्या या माणसाचं स्वतःचंच एक पान उमटलं नसल्याचं तुमचं विधान डोळ्यासमोर अचानक भकास पांढरा रंग फेकतं आणि क्षणभर त्या रंगाची बधिरता आदळते.

‘व्यवहार’ किंवा ‘दे दान’ यांसारख्या लेखांबद्दलही असंच काही ना काही जाणवलेलं आहे, पण दाखल्यापुरती वर दिलेली दोन उदाहरणं पुरेशी ठरावीत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मजकूर सुरू होतो त्या पानावर मजकुराच्या समोर निम्म्याहून अधिक सोडलेली मोकळी जागा, त्यात फिरवलेला धागा, शीर्षकाभोवतीनं त्याची केलेली रचना, या सगळ्याच मला मजकुराइतक्या ‘बिटविन द लाईन्स’ वाटल्या. या सगळ्या बाबी आशयाशी हरेक अर्थानं अभिन्न आहेत आणि तुम्ही शब्दांतून जे सांगू पाहताय त्याचंच दृश्यरूप आहेत.

या पानावर न टाकलेला फूटर किंवा पृष्ठक्रमांक ही एकसंधता आणखी वाढवतात, प्रवाही करतात. इतर पानांवरही फूटरला पुस्तकाचंच नाव टाकलेलं आहे; इतर पुस्तकांप्रमाणे लेख आणि पुस्तक यांची नावं एकाआड एक टाकलेली नाहीत. तांत्रिकदृष्ट्या या मागच्या कारणांचा विचार करताना मला वाटलं की, बरेचसे लेख कमी लांबीचे असल्याने लेख आणि पुस्तकाचं नाव टाकण्याची शिस्त आकारण गोंधळाची किंवा गर्दीची ठरेल आणि पुस्तकाच्या सुटसुटीतपणाला शिस्तीच्या अट्टाहासानं बाधा येईल, आणि हे रास्तच आहे.

अन्वयार्थाच्या पातळीवर विचार करताना वाटलं की, लेख कुठलाही असला तरी गाभा एकच आहे – ‘बिटविन द लाईन्स’. आणि पानोपानी कदाचित तोच उमटायला हवा. म्हणून सगळीकडचा फूटर आहे – ‘बिटविन द लाईन्स’.

या निमित्तानं एक गंमत सांगते. ‘बिटविन द लाईन्स’ हा पृष्ठक्रमांकाच्या वर घेतलेला फूटर मला आधी वाचकाचं लक्ष मजकुरावरून विचलित करणारा वाटला. रूपसंकल्पनाकाराने असं का केलं असेल यावर डोकं खाजवत होते. त्याचं नेमकं उत्तर काही सापडलं नाही; पण एक मजा झाली. मजकुरातली ओळ फूटरपाशी येऊन जिथं तुटत होती किंवा संपत होती, त्याच्या ओघात हा फूटर घातल्यावर वेगळीच गंमत यायला लागली.

उदाहरणार्थ, ‘‘पण आवाज जास्त नाही. सगळा व्यवहार दबक्या आवाजात, कुजबुजत ‘बिटविन द लाईन्स’ चाललेला.” किंवा “एका कौटुंबिक भिकारी नवऱ्याची भीक मागण्याची टमरेलं रस्ता ओलांडून अगदी समोरच असलेल्या सार्वजनिक नळावर जाऊन त्या भिकाऱ्याच्या बायकोनं धुवून आणली, तोपर्यंत इकडे भिकारी ‘बिटविन द लाईन्स’ बिडी ओढत बसला होता.’’

असं वाचल्यानंतर काय बहार आली! आणि चाळा लागल्यागत असं अनेक ओळींना लावून खुदूखुदू हसायला झालं. ‘बिटविन द लाईन्स’ या शीर्षकाची पुस्तकाच्या फूटरमध्ये केलेली उभी मांडणीही ओळींच्या अर्थाला साकार करून अर्थ साधते. एरवी नेहमीप्रमाणे आडव्या टाकलेल्या फूटरमध्ये ही सार्थकता खासच आली नसती. उभी मांडणी ओळींचा फील देते.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पुस्तक पुन्हा पुन्हा उलटसुलट चाळावं, तर नवनव्या गमती-अर्थ सापडत जातात. पण हे माझ्या मनाचे खेळ आहेत की यासारखंच काही रूपसंकल्पनाकाराच्या डोक्यात होतं आणि म्हणून त्याने ते मांडणीत आणलं आहे, कुणास ठाऊक! तरी वाटतंय ते सांगून टाकते. लेख सुरू होणाऱ्या मजकुराच्या पहिल्या पानाबद्दल मी आधी लिहिलं आहेच. आत्ता पुस्तक चाळत असताना आणखी नवीच गंमत सापडली. प्रकरणाच्या सुरुवातीच्या पानावर तुम्ही जो मजकूर घेतलाय, त्याचं लाइन स्पेसिंग वेगळं आहे. यामुळे पानाचा तोल उत्कृष्ट सांभाळला जातो, हे थेट ‘बिटविन द लाईन्स’. त्याच्या थोडं आणखी पोटात उतरलं, तर जाणवलं की, हे लाईन स्पेसिंग कसं दिलं गेलं आहे? तर जे चार विचारांचे धागे किंवा रंग पार्श्वभूमीला ठेवून पुढे त्यांच्या संदर्भानं जो पोत विणाला जाणार आहे किंवा तयार होणार आहे, त्यांच्यातला अखंडपणा तुटू नये, पण वेगळेपणा जाणवावा, अशा रीतीनं आणि तेवढ्या मात्रेतच हे लाईन स्पेसिंग दिलं गेलं आहे.

थोडं आणखी पोटात गेलं, तर काही ठिकाणी नवंच चमकलं. म्हणजे बहुतांश ठिकाणी, अगदी सुरुवातीच्या पानांप्रमाणे इतर मजकुरातही बहुतांश दृश्यमयता आहेच, पण प्रकरणाच्या सुरुवातीच्या पानावर ती अगदी ठळकपणे आहे. म्हणजे लाइन स्पेसिंगमधून पानाचा तोल साधला जातोच, पण ज्या-ज्या ओळींनंतर स्पेसिंग आहे, त्या स्पेसिंगच्या अलीकडच्या-पलीकडच्या ओळींमधला मजकूर प्रोसेसमध्ये असलेल्या चित्रांच्या रेषांसारखा आहे. म्हणजे दोन ओळींमधून काही रेषा काढल्या आणि थोडी जागा सोडून पुढच्या रेषा... असं. याचं मला आवडलेलं उदाहरण म्हणजे, ‘जिलब्या’ या लेखाचं सुरुवातीचं पान. म्हणजे -

“तिथंच अलिबाग मध्ये घर आहे त्यांचं.

धंदा : आकाश कंदील बनवण्याचा नाही. 

धंदा : दुकान. इलेक्ट्रिकच्या वस्तू आणि इतर काही विकण्याचं. छोटीशी बंगली. बंगलीतच एका बाजूला छोटंसं, शेडवजा दुकान बांधलेलं.”

हे वाचत असताना पार्श्वभूमीचे रंग, त्यातून वातावरण, त्यातून रेषा, रेषांमधून चित्र, चित्रांमधून रंगरूप, भोवताल असं काय काय फटाफट उमटत जातं. लाइन स्पेसिंग, प्रकरणाच्या सुरुवातीच्या पानावरचा ओळींचा आखूडपणा, रेखाटनासारखी भाषा यांमुळे अनेक ठिकाणी धागा, प्रकरणाचं शीर्षक, तिथला मोकळा अवकाश यांच्या समोर असलेल्या ओळींबाबत मध्येच भ्रम तयार होऊन चित्र फ्लॅश होतं बऱ्याचदा आणि गंमत येते. सुरुवातीला मला वाटत होतं, मोकळी जागा आणि शब्द-ओळींचा समतोल; पण हळूहळू त्या शब्दओळींच्या पोटातल्या (बिटविन द लाइन्स) चित्राचा तोलही दिसायला लागला. अर्थात, हे सर्वच्या सर्व ठिकाणी नाही. काही ठिकाणी शब्दभाषाच आहे आणि ते यथार्थही वाटतं.

काही ठिकाणी शब्दभाषा आणि चित्रभाषा एकमेकांना टक्कर देतात. उदाहरणार्थ, ‘आम्ही बि'घडलो तुम्ही बि'घडाना’. यात सुरुवातीला तुम्ही म्हटलंय -

“माझं साधारण प्रगतिपुस्तक असं : सर्व भाषा ‘येत’ असल्यामुळे इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत ओके. गणित शून्य. इतिहास हरवलेला. भूगोल दिशाहीन. सायन्स बोंब. फक्त चित्रकला चांगली. त्यामुळे सरळ प्रवेश मिळाला.”

इथे काय डोळ्यासमोर येतं सांगते - प्रगती पुस्तक, त्यावरचे रकाने, त्यावर लिहिलेली विषयांची यादी आणि हातही न उचलता त्या-त्या विषयाच्या चौकटीत त्या विषयाचं मूल्यमापन करून दिलं जाणार मार्कांऐवजीचं चिन्ह. म्हणजे ‘इतिहास’ या विषयामोरच्या चौकटीत प्रश्नचिन्ह किंवा भूगोल या विषयासमोरच्या चौकटीत फुली असं काहीतरी. तर इथे अर्थ तर सगळे शब्दांमधून ध्वनित होत आहेत, पण कदाचित त्यांचं आकलन शाब्दिक न राहता किंवा ते प्रतीत होताना चिन्ह किंवा तत्सम काहीतरी समोर येतं. 

यानंतर एन्ड मार्कच्याच आकाराच्या, पण रंगानं ग्रे असलेल्या, मजकुरात पसरलेल्या छोट्या चौकोनी विरामांचा विचार डोक्यात आला. सर्वसाधारणपणे इतर पुस्तकांमध्ये अशा विरामांच्या जागी थोडी जास्त मोकळी जागा सोडली जाते आणि पुढचा मजकूर छापला जातो. किंवा अगदी लक्षणीय विराम असेल, तर मोकळ्या जागेच्या मधोमध तीन फुल्या किंवा तीन चौकोन असं काहीतरी दिलं जातं. पण या पुस्तकात लेफ्ट अलाइन केलेला, अत्यंत फिक्कट ग्रे रंगाचा, विरळ चौकोन माझ्या लक्षात राहिला. त्याचा विचार करताना मला दोन प्रश्न पडले - एक, इतका फिकट विरळ चौकोन द्यायचा होता, तर तो दिलाच कशाला? जागा मोकळीच का सोडली नाही? आणि दोन, द्यायचा होता, तर इतर पुस्तकांप्रमाणे कळून येईल, असा मधोमध न देता लेफ्ट अलाइन करून काय साधलं?

..................................................................................................................................................................

‘बिटविन द लाइन्स’ ​या चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5219/Between-the-Lines

..................................................................................................................................................................

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चौकोनांच्या वरचा मजकूर पुन्हा पुन्हा वाचताना काही गोष्टी लक्षात आल्या. मजकुरातले हे चौकोनांचे विराम दोन प्रसंगांच्या मधलेच आहेत. त्यामुळे अर्थदृष्ट्या योग्यच ठिकाणी आहेत. त्यांच्या विरळ पोताचा, पानाच्या रंगातच विरण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रे रंगाचा विचार करताना थोडं फिल्म्सशी कनेक्शन लागलं. म्हणजे फिल्ममध्ये दोन प्रसंगांच्या मध्ये पापणी लवण्याइतपतच विराम असतो. तो आपल्याला जाणवतो; तो अर्थपूर्ण असतो, कारण तो आला नाही, तर काही वेळ प्रेक्षकांचा गोंधळ उडेल आणि दोन प्रसंग या विरामानं संदर्भसहित होण्यापेक्षा विरामाअभावी काही काळासाठी संभ्रमात टाकतील. मात्र म्हणून हा विराम लांबलेला नसतो. तो चिमटीत पकडता येत नाही. अर्थात, येताही कामा नये. नाहीतर त्याची आणि फिल्मची सार्थता बाधित होईल. अगदी तसंच मला या पार फिक्या, विरळ चौकोनी विरामांबद्दल वाटलं. त्यांचं अस्तित्व आहे, पण ते सांधेजोडीपुरतं आहे; ठसठशीत नाही. त्यामुळे वाचणाऱ्याचा ओघही तुटत नाही आणि हे चौकोन नसल्याने किंचित संभ्रम किंमत सरमिसळ होण्याची शक्यताही टळते.

त्याच्या लेफ्ट अलाइनमेंटबाबतही तेच जाणवलं. वाचकाची नजर डावीकडून उजवीकडे फिरते. विराम पानाच्या मध्यावर घेतला असता, तर त्याच्या स्थानाच्या दृष्टीनं तो उगाच डोळ्यात आला असता. कारण वाचकाची डावीकडून उजवीकडे फिरणारी नजर या मध्येच ठाकलेल्या विरामाने अडखळली असती. यातून सलग वाचनाचा ओघ बाधित झाला असता. पुन्हा तीन फुल्या किंवा ठळक रंगानं तो विराम अधोरेखित झाला असता. म्हणजे मजकुराला, त्याच्या सांधेजोडणीला आणि त्यातून निघणार्‍या अर्थाला प्रचंड नाही, तरी किंचित धक्का पोहोचला असता. तर असं काही होता कामा नये, म्हणून रूपसंकल्पनाकाराने पोत, रंग, स्थान या पातळीवर जो सूक्ष्म विचार केला आहे, तो मला असा ‘बिटविन द लाइन्स’ सापडला. अर्थात, असंही वाटलं की, बहुतांश वेळा चांगल्या दर्जाच्या पुस्तकनिर्मितीत असा विचार केला जात असेलच. माझं वाचन आणि निरीक्षण दोन्ही कमी असल्याने मला आज लागला असेल.

याशिवाय अगदी मोजक्या दोन-चार ठिकाणी हे चौकोन तेच, पण थोडं आणखी पोटातलं काम करत असल्याचं जाणवलं. ‘याद’ या लेखात सुनीताबाई आणि तुमचं बोलणं चालू असताना जिथं पुलं येतात, तिथं त्यांनी बोलायला सुरुवात करण्याआधी हा चौकोन आला आहे. वास्तविक, इथं प्रसंग बदलत नाही, पण प्रसंगाचा मूड किंवा वळण मात्र निश्चित बदलतं. या अर्थी आलेला हा चौकोन किंवा विराम इतर ठिकाणच्या विरामांपेक्षा अधिक ‘बिटविन द लाइन्स’ वाटला.

असंच एक उदाहरण ‘रक्तवाहिनी’ या लेखातही सापडतं. जिथे चौकोनी विरामाच्या आधी प्रिंटरशी बोलताना एकीकडे मनात काकुळतीचा भाव आहे आणि तो प्रत्यक्ष प्रसंगात उमटला आहे, पण प्रसंग तसाच पुढे सरकताना मनाच्या तळात मात्र एक प्रकारची निराशा, वैताग, संभ्रम या भावना आहेत. तर मनाच्या या दोन पातळ्यांमधल्या अवस्था या चौकोनामुळे किंवा विरामामुळे एकदम लख्ख होतात.

असं करत जाताना आणखीन टोकरून बघावंसं वाटलं. म्हणून हा चौकोनाचा विराम न घेताही तुम्ही काही मोकळ्या जागा सोडल्या आहेत का आणि असतील, तर तिथं नेमकं ‘बिटविन द लाइन्स’ काय आहे, हे शोधायला सुरुवात केली. अशाही जागा काही प्रमाणात सापडल्या. त्यांचा मी लावलेला अर्थ सांगते.

‘मित्र’ या लेखामध्ये ब्लू फिल्म बघायला जाण्याचा जो संपूर्ण प्रसंग आहे, तिथं एके ठिकाणी तुम्ही दोन प्रसंगांच्या मध्ये मोकळी स्पेस सोडली आहे, पण तिथं विरामासाठीचं कुठलंही चिन्ह नाही. याच्या कारणामागचा विचार करताना वाटलं की, हा संपूर्ण प्रसंग सांगताना जे एक सेन्सॉर्ड आणि काहीसं गूढ म्हणावं असं वातावरण तयार होतं, त्याला कदाचित एखाद्या छोट्या टिंबानेही छेद गेला असता. तर दबकेपणाचा, गूढतेचा तो फील कायम किंबहुना अखंड राहावा म्हणून कदाचित तुम्ही त्या स्पेसमध्ये काहीही न भरता तो दाब तसाच वाहू दिला असावा.

असंच उदाहरण ‘पहाटे, स्वप्न मला पडले’ या लेखातही पाहायला मिळतं. लेखाच्या शेवटी ॲनिमेशनच्या सगळ्या झटापटीतून आलेला थकवा, काहीशी हतबलता, उमजलेपण आणि येणारी तटस्थता हे सगळं सांगताना लिखाणात मध्ये स्पेस आहे. ती मधला थोडा काळ गेल्याचं सांगणारी आहे, पण उमजण्याचा एक एक बिंदू एकामागोमाग एक उजळ करणारीही आहे. त्यामुळे काळाच्या हिशोबाने स्पेस असणं रास्त वाटलं, पण चिन्ह नसल्यानं खुल्या होत जाणाऱ्या बिंदूंत सलगता राहिली. विरामाच्या चिन्हानं कदाचित फ्लोच्या फिलला किंचित छेद जाण्याची शक्यता होती, असं वाटलं.

तरीही किंवा कदाचित याचमुळे काही ठिकाणी विरामाचे हे चौकोन न देणं कळलं नाही. ‘शुभोकामना’, ‘सरबत’ अशा आणि विशेषत्वानं ‘नमामि नर्मदे’ या लेखांमध्ये अनेक ठिकाणी चौकोन न देणं कळलं नाही. तसंच काही लेखांमध्ये स्पेस आहे, पण चौकोन नाही असंही जाणवलं. तिथंही चौकोन असायला हवे होते, असं मी विरामांच्या चौकोनांचा जो तर्क लावला आहे, त्यानुसार वाटलं. पण तरी माझ्या विचारसूत्रात काही गडबड असू शकते किंवा मी अति विचार करून किसही पाडला असेल. किंवा हे सगळं करण्यात पानांचा हिशोब गडबडत असेल, अशी तांत्रिक बाब किंवा कारणही मनात येऊन गेलं.

पुस्तक वाचायला सुरुवात केल्यापासून, ‘मित्रास अर्पण’पासून निघालेला धागा डोक्यात घोळत होता. ‘अनाघ्रात’ या लेखात मला या धाग्याकडे किंवा एकुणातच रेषेकडे कसं बघायचं, हे सापडलं - बझ् मिशेलने म्हटल्याप्रमाणे 'चमकदार आणि ओझ्याखाली न दबलेली तुमची रेष' हे एक, आणि दुसरं, ती तशी का असते, यामागचा तुम्ही सांगितलेला तर्क – रफ-फेअरमधली पोझ, फेअरचं दडपण, रफमधला मोकळेपणा आणि दोन्हींमधून उडणारा गोंधळ.

हे सगळं वाचतानाच पुन्हा एकदा संगीताकडे कनेक्शन लागलं. कुठेतरी वाचल्याचं किंवा ऐकल्याचं अंधूक स्मरलं की, किशोरीताई आमोणकरांच्या प्रत्यक्ष मैफलीपेक्षाही त्यांचा रियाज अधिक बहारदार असे. या सगळ्याचा अर्थ लावताना वाटलं की, थोडक्यात, प्रायोगिकता न हरवण्यात खरी गंमत आहे, आणि अनेकदा परफॉर्मन्स प्रेशरने ती हरवू शकते.

मग या लाइनवर तुमच्या धाग्याचा विचार करायला सुरुवात केली. सुरुवातीला वाटलं की, हा अखंड एकच धागा वळणं घेत शेवटच्या पानापर्यंत गेला आहे. पण मग पुन्हा पुन्हा प्रकरणांची सुरुवात आणि शेवट पाहताना जाणवलं की, असं नाहीये. काही ठिकाणी तो एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणात थेट घुसलाय. कधी शब्दांना वेटोळं घालत, तर कधी शब्दांचा मुलाहिजा न ठेवता त्यांच्यात घुसत, कधी हा धागा मध्येच गायब झालाय, तर कधी आधीपासून मोकळा सुटून ओपन एन्डेड राहिलाय. एक मात्र नक्की, तुम्ही वर्णन केलेल्या व्यक्तिमत्त्वांचे, वस्तूंचे, प्रसंगांचे किंवा निसर्गतत्त्वाचे तरंग आणि पोत या धाग्याच्या वाटावळणांतून, गुंत्यातून उमटतात. काही ठिकाणी ते कळले, काही ठिकाणी ते रुतून बसले, तर काही ठिकाणी कळलेही नाहीत. वानगीदाखल काहींबद्दल सांगते.

‘मित्र’ या लेखातला धागा या न्यायाने एकदम मनमौजी चालतो; अर्थात तुम्ही रेखाटलेल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे! मुळात ‘मित्र’ या शब्दाभोवतीने जाताना तो आजूबाजूला भरपूर अवकाश तयार करतो. हा धागा पुष्कळ वळणावळणांचा आहे, काही ठिकाणी त्याचे गुंतेही होऊन बसले आहेत. काही ठिकाणची वळणं बाकदार आहेत, तर काही ठिकाणची उलटीसुलटी. शेवटच्या पानात तर तो थेट मजकुरात घुसला आहे. थोडक्यात, या व्यक्तिमत्त्वाच्या स्वच्छंदीपणाचा, मनस्वीपणाचा आणि अनवटपणाचा पोत आणि प्रवास या धाग्यातूनही व्यक्त होतो.

‘कौमार्यभंग’ या लेखातला धागा म्हणजे रुतून बसलेलं उदाहरण. या लेखात आधीच्या लेखातून काहीशी वळणं घेत आलेला धागा थेट घुसतो. ‘मी बधीर. काहीच नाही काढलं.’ या दोन वाक्यांभोवती वेटोळं घालत अगदी किरकोळ वळणं घेत ‘कौमार्यभंग’ या शब्दाला एक मोठं वेटोळं घालून तुलनेनं कमी गुंते करतो आणि थेट पानाच्या वरच्या दिशेनं जाऊन अंतर्धान पावतो. लेख संपतो तिथंही तो प्रकटत नाही. या लेखातली तुमची एकूण मन:स्थिती, एक प्रकारचा ट्रान्स, त्याची धार आणि या सगळ्याची तीव्र गती या धाग्यातून करंटसारखी वाहिल्यागत वाटते.

लेखाच्या शेवटच्या पानावर धागा नाही, याचं कारण शोधताना दोन-तीन प्रश्न मनात आले – खालून येऊन तो ज्या वेगानं वर जात मोकळा झाला, तिथून त्याला परत खाली आणणं 'कौमार्यभंग' ठरला असता का? की र. कृ. जोशींनी जे सांगितलं त्यापुढे रेष काय उमटवणार (अर्थ प्रतीत करणार, या अर्थी) की त्यांच्या या सांगण्यानंतर तो रेखाटला असता आणि न जाणो 'फिनिश' करायला लागला असता, तर नकोच तो 'कौमार्यभंग', असं आदरयुक्त भीतीसारखं काहीतरी?

आता ज्या धाग्याचं चलन मला नीट कळलं नाही, त्याबद्दल. ‘बाळासाहेब’ या लेखातल्या धाग्याचा विचार केला, तर या अंतर्मुख, पण रोखठोक व्यक्तिमत्त्वाप्रमाणे असलेली शक्तिमान रेषा आणि तिची मर्यादित वळणं या लेखातल्या धाग्यात जाणवतात, पण लेख संपता संपता त्याने व्यापलेली जागा किंवा त्याच्या आजूबाजूचा सढळ अवकाश नेमकं काय सांगू पाहतो, हे मला उमगलं नाही.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लेखाच्या सुरुवात-शेवटच्या धाग्यांचा विचार करताना लेखाच्या शीर्षकाच्या स्थानाकडे लक्ष गेलं आणि प्रत्येक लेखात ते वेगवेगळ्या उंचीवर दिलं असल्याचं जाणवलं. पण याचा संबंध लेखातल्या मजकुराशी नसून आधी धागा फिरला असावा आणि धागा-मजकूर यांतून प्रतीत होणाऱ्या अन्वयानुसार, आणि धागा आणि शीर्षक एकमेकांशी ज्या प्रकारे संलग्न राहून अर्थ प्रवाहित करतील, त्या आधारे मागाहून शीर्षकाचं स्थान निश्चित केलं असावं, असं वाटलं; आणि ते यथार्थही वाटलं.

अनुक्रमाचा विचार करताना पहिल्या भागातले लेख अनुभवाचा पैस टप्प्याटप्प्यानं वाढवत जात व्यापक होत जाणारे वाटले. दुसऱ्या भागातले लेख अर्थात अधिक मुक्त चिंतनपर आहेत. मात्र या दोन्ही भागांमधल्या लेखांमध्ये एक विशिष्ट मग्नता किंवा तंद्री आहे, जी वाचताना ठळकपणे जाणवते. तरीही काही लेखांचा समावेश नसता, तर चाललं असतं, असं मला वाटलं. हे लेख विशेषत्वानं दुसऱ्या भागातले आहेत. यांतले ‘दिवाळी’, ‘पिच्चर’, ‘भयानक सुंदर वास’ यांसारख्या लेखांमध्ये एखादाच विशेष मुद्दा आहे. तो निरखून येतो, पण सुरुवातीपासून पुस्तक वाचत जाताना हे लेख तोपर्यंतचा प्रभाव थोडा फिका करतात. याचबरोबर ‘मॉडेल’, ‘फरक’ आणि काही प्रमाणात ‘स्वीकार नकार’ यांसारखे लेख पुनरुक्तीची भावना जागृत करतात. त्यामुळे वाचनातला रस किंवा सलगपणा काहीसा बाधित होऊन विचलित व्हायला होतं.

पुस्तकातले बहुतांश लेख चित्रभाषेचेच आहेत. बहुतांश वेळा कुंचला लेखणीवर हुकूमत गाजवतो. त्यामुळे अनेक ठिकाणी शब्दांमधून रेषेचीच दिशा, वळणं, आकार आणि त्यातून स्वभाव आणि चित्रं उभी राहतात, आणि ती इतकी तपशीलवार उभी राहतात की, आपणही त्या प्रसंगांचे साक्षी असल्याचा भ्रम काही वेळा निर्माण होतो. काही ठिकाणी शब्दचित्रांच्या शब्दचित्रकविताही होतात. उदा. ‘मृत्यूनंतरच्या जगाची बॉर्डर सोडून आपल्या नेहमीच्या व्यवहाराच्या जिवंत माणसांच्या वाहत्या जगात येण्याच्या…’; ‘व्हॅन गॉग म्हटलं की, त्याच्या इमेजच्या पुढे आधी ह्याची एक काचेची पारदर्शक इमेज उभी राहते आणि त्यातून पलीकडची व्हिन्सेंटची इमेज दिसते.’, किंवा ‘आठवणींच्या पिंपळपानावरच्या रेषारेषांमध्ये ही वृद्धा हरवून जाई, आठवणींचा पारब्यांवर लहान झोके घेत राही.’

अशा एक ना अनेक जागा सापडतात.

मात्र सगळेच लेख चित्रभाषेचे नाहीत. चित्रभाषा असूनही काही लेख सुंदर शब्दकळा ल्यालेले आहेत. उदा. ‘जिलब्या’, ‘याद’, ‘थोड्याशा जाड आवाजात’, ‘अनाघ्रात’ इत्यादी. ‘नमामि नर्मदे’सारखा लेख तर चित्रशब्दकळा यांचं अफाट रसायन आहे.

‘चित्र’ या गोष्टीबद्दलची तुमची तन्मयता, त्यातलं हरवलेपण, चित्रं करताना येणारं झपाटलेपण हे तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक अक्षरातून वाजतं, उमलून येतं. चित्र आणि चित्रकलेचा तुमचा प्रवास, त्यातले प्रयोग यांबद्दल तुम्ही परीघापासून केंद्रापर्यंत जे जे सांगितलं आहे, ते इतकं तन्मयतेनं आणि प्रत्येक रेष उघडून सांगितलं आहे की, या विषयाचा गंध नसणाऱ्यालाही यातून प्राथमिक नजर निश्चितपणे मिळू शकेल. हे सगळं वाचताना मला चित्रानं व्यापून जाण्याच्या किंवा सगळं काही मुळातून अथकपणे समजून घेण्यानं ग्रासून जाण्याच्या तुमच्या वृत्तीचा हेवा वाटला. एक गोष्ट मात्र जाणवली की, संपूर्ण प्रसंग चितारण्याच्या नादात काही ठिकाणी तपशिलात थोडं जास्त रेंगाळलं गेलं आहे. त्यामुळे कधी कधी पुनरावृत्ती होऊन लेखाची लय काहीशी मंदावते.

'ललितलेखन' या प्रकाराचा विचार करताना मला अनेकदा दोन गोष्टी प्रामुख्यानं जाणवतात. एक, हे अनुभवाधारित लिखाण असलं, तरी ते बऱ्याचदा जरा अधिक रंगवून सांगितलं जातं. दोन, कदाचित त्यामुळे किंवा इतर काही कारणानं असेल, त्यातून कळत-नकळत एक ‘जजमेंट’ पास केलं जातं; आणि लेखन अनुभवाधारित असल्याने त्या ‘जजमेंट’ला वाचकाकडून नकळत एक ‘ऑथेंटिसिटी’ बहाल केली जाते. त्यामुळे हा काहीसा अतिशयोक्त मामला लेखनातल्या बेजबाबदारीकडे झुकतो की काय, अशी शंका येते.

मात्र तुमच्या लेखनात सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे तीळमात्रही नाही. मला अशा कित्येक जागा दिसल्या, जिथे जजमेंट, मेलोड्रामा, ‘स्व’ कुरवाळणं या गोष्टींना भरपूर वावा होता; संधी होती. याहीपेक्षा ‘बिटविन द लाइन्स’ म्हणजे वर सांगितलेली ही वैगुण्य टाळण्यामागे कुठलीही पोझ नाही, हेदेखील तुमच्या लिखाणातून स्वच्छ जाणवतं.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : चंद्रमोहन कुलकर्णी भारतीय फ्रान्सिस्को होसे दे गोया इ लुसियेन्तेस आहेत!

.................................................................................................................................................................

तुमच्या ‘याद’ या लेखात हे अगदी प्रामुख्याने जाणवतं. पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या अ‍ॅक्शनमधून स्वभावदर्शनाचा एक कोपरा नक्की उजळ होतो, पण त्याचा प्रकाश अकारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वांवर फाकत नाही. प्रसंगा जेवढा आणि जसा घडला, तेवढा आणि तसाच तो उभा राहतो; अगदी कुठली छोटी, सूचक कमेंटही न करता उभा राहतो, आणि हे मुद्दाम वगैरे टाळलेलं नसल्याचं भाषेवरून जाणवतं.

‘मित्र’ या लेखात मेलोड्रामाला किती स्कोप होता! जवळचा मित्र आणि त्याचा मृत्यू वगैरे किंवा त्याच लेखात ब्ल्यू फिल्म नकोशी वाटण्याचा प्रसंग आहे. तिथं आत्मस्तुतीला भरपूर वाव होता; पण तुमची कुठलीही मात्रा चुकलेली नाही.

अगदी ‘अनाघ्रात’ किंवा ‘कौमार्यभंग’ यांसारख्या लेखांमध्ये तर तुमचं कौतुक आहे, पण त्याला कुठलीही झळाळी नाही. या सगळ्यामुळे उलट तुमच्या अनुभवपरतेची ऑथेंटिसिटी वाढते. यातला विरोधाभास हा की, तुम्ही मात्रेत लिहिल्याच्या आनंदापेक्षा मला एखादं हरवलेलं मूल्य या निमित्तानं सापडल्याचाच आनंद अधिक झाला.

पण याही पुढे जाऊन मला तुमच्या लेखनातला सगळ्यात जिव्हाळ्याचा वाटलेला भाग म्हणजे, ‘माणूस’ म्हणून स्वत:ला निरखत, तपासत राहणं. दोन-तीन चटकन आठवणारी उदाहरणं देते. ‘याद’ या लेखात पुलंना स्क्रिप्ट नेऊन देण्याविषयी तुमची अस्वस्थता सांगताना तुम्ही लिहिलंय…

“दुसऱ्या काही चित्रकला वगैरे कारणानिमित्त गेलो असतो, तर ठीक होतं. पण हे काम तसं काही नव्हतं. कुणाचं तरी कसलं तरी स्क्रिप्ट पुलंकडे नेऊन द्यायचं, हे काम मला उगाचच कमी दर्जाचं वाटत होतं. मला ते थोडंसं कमीपणाचंही वाटत होतं बहुतेक.”

दुसरं, ‘जिलब्या’ या लेखातलं -

‘मला मोह सुटला. मनात म्हटलं, घरी एक, स्टुडिओवर एक. म्हणालो, ‘अजून एखादा होईल का? पुढच्या आ‌ठवड्यात चक्कर मारतो परत. तुम्ही बनवून ठेवा, तो पिवळा-हिरवा दिला होता ना लॉजमध्ये, तसा!’

मला म्हणाला, स्पष्ट,

‘‘जमणार नाही. वेळ नाही असं नाही. पण हा चांगला झालाय. आता पुरे. जास्ती करू नये माणसानं. शिवाय तुम्ही तर आर्टिस्ट आहात, तुम्हाला माहिती आहे, किती आणि कसं काम केलंय ते! नाव ‘चितळे’ असलं, तरी ‘जिलब्या’ नाही घालत मी. आकाशकंदील करतो. पुढच्या वर्षी देईन, तुमच्यासाठी नक्कीच करीन एखादा. नमस्कार, या.’’

इथं लेख संपतो. आपली सदसद्विवेकबुद्धी प्रसंगी ताळ्यावर आणणाऱ्या माणसांना इतक्या खणखणीतपणे मांडणं, यात माझ्या मते ‘माणूस’ म्हणून जागं राहण्याच्या आसेशिवाय दुसरं काहीच नाही.

तिसरं ‘पहाटे, मला स्वप्न पडले’ या लेखातलं -

“नुसतं चांगली चित्रं काढून चालत नसतं. जगात. त्याचं अ‍ॅप्लिकेशनही नीट व्हायला हवं. चित्रकारांचं ते काम नाही. त्याला वेगळी माणसं लागतात. टीमवर्क नावाची काहीएक गोष्ट जगात आहे, अ‍ॅनिमेशन ही काही एकट्या-दुकट्यानं करण्याची गोष्ट नाही.”

स्वत:च स्वत:ला खडे बोल सुनावल्यासारखं हे सांगणं! यात स्वप्न अपुरं राहिल्याचं दुखरेपण आहे, पण फाजील कुरवाळेपण किंवा गोंजारलेपण नाही; वास्तवाची चाड सुटत नाही; इथं नाही आणि संपूर्ण पुस्तकभरही नाही. ‘कलाकार’ या बिरुदाआड माणूसपण झाकलं किंवा झाकोळलं न जाणं हा मला तुमच्या लेखनाचा (की पिंडाचा) खूप मोठा स्ट्राँग पॉइंट वाटतो.

..................................................................................................................................................................

‘बिटविन द लाइन्स’ ​ ​- चंद्रमोहन कुलकर्णी

राजहंस प्रकाशन, पुणे

मूल्य - २४०, मूल्य - ३०० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5219/Between-the-Lines

..................................................................................................................................................................

याच चालीवर पुढे विचार केला, तर तुमच्या कित्येक लेखांत नर्मविनोदाची पखरण आहे, असं जाणवतं. ग्रेसांवरच्या लेखांत किंवा ‘नमामि नर्मदे’ किंवा ‘रक्तवाहिनी’ यांसारख्या लेखांत तर तुम्ही स्वतःलाही विनोद विषय ठरवता. या तीनही लेखांचा स्वर एका मात्रेनं चढा लावला, तरी अनुक्रमे कुचेष्टा, तुच्छता किंवा सहानुभूती या पातळ्यांवर हे लेख सहज घसरू शकतात. पण तुमची दृष्टी तारतम्याची, परिस्थितीजन्य विचार करण्याची असल्याने आणि दुराग्रही नसल्याने त्या-त्या जागी आलेला, तो-तो भाव आणि रस मला पूर्ण एन्जॉय करता आला.

‘बिटविन द लाइन्स’ हे शीर्षक सगळ्या पुस्तकभर पुन्हा पुन्हा लावून बघत होते. मला सापडलेले तीन अर्थ सांगते. पहिला, अगदी उघड, अर्थात तुमची चित्रकारितेची कारकीर्द. दुसरा, या कारकिर्दीबरोबरच तुमच्या आयुष्याबद्दल काही सांगणारा. तिसरा, माझ्या मनात रुतून बसलेला. पुस्तकभर कोणती व्यक्तिमत्त्वं किंवा प्रसंग आहेत? तर या पुस्तकातली बहुतांश व्यक्तिमत्त्वं अशी आहेत, ज्यांची रेष जणू उमटलीच नाही. कुठल्या तरी दोन रेषांच्या मध्येच त्यांची रेष अंतर्धान पावली. या दोन रेषांच्या मधल्या न उमटलेल्या कैक रेषांच्या लकाकीला, तकाकीला तुम्ही स्वर दिला आहे; आणि म्हणून ते न उमटलेले स्वर मनात रुंजी घालत राहतात; रुतून बसतात.

मला मुखपृष्ठाचा विचार करतानाही हेच जाणवलं. उमटलेल्या रेषा खूप आहेत, पण त्यांच्यामधले जे काळे-पांढरे निरभ्र पॅच आहेत, त्यांच्यात विरून गेलेल्या ओळी, आत, पुस्तकात उमटल्या आहेत. अगदी मुखपृष्ठावरच्या शीर्षकाचं असमान अक्षरवळणदेखील सुबक नसलेले मुके भोग प्रदर्शित करतं, असं वाटतं. अनुक्रमणिकेत, मुखपृष्ठावर आणि स्पाइनवर शीर्षकाच्या पुढे, पाठीमागे, मध्ये दिलेले ओव्यांचे दंडही अर्थपूर्ण आहेत. सर्वसाधारणपणे ओवीची तीन लक्षणं सांगितली जातात – काव्यात्मता, अनलंकृतता आणि कथात्मता. मला वाटतं, तुमच्या लेखांना ही तीनही लक्षणं तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच ओव्या आठवाव्या लागत नाहीत; सहज रुतून बसतात.

मी पुष्कळच लिहिलं आहे, पण त्याचा लोड न घेता, माझा मूर्खपणा आणि शिल्लक उरला तर शहाणपणा मोकळेपणी कळवा.

- भाग्यश्री

..................................................................................................................................................................

लेखिका भाग्यश्री भागवत ग्रंथसंपादक आहेत.

bhagyashree84@gmail.com 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......