चंद्रमोहन कुलकर्णी भारतीय फ्रान्सिस्को होसे दे गोया इ लुसियेन्तेस आहेत!
कला-संस्कृती - चित्रनामा
नितिन भरत वाघ
  • चंद्रमोहन कुलकर्णी आणि त्यांच्या चित्रप्रदर्शनाची पोस्टर्स
  • Tue , 15 October 2019
  • कला-संस्कृती चित्रनामा चंद्रमोहन कुलकर्णी Chandramohan Kulkarni

प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचं आजपासून आठवडाभर म्हणजे १५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शन भरत आहे. ‘ये शहर किसने बनाया?’ या कवितेच्या ओळीसारख्या नावानं हे प्रदर्शन भरतंय...हे संपूर्ण प्रदर्शन म्हणजे कवितांची मैफलच असणार आहे... कवितेसारखंच ते तरलं, संवेदनशील असणार आहे... त्यानिमित्तानं चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याविषयीचा हा लेख...

.............................................................................................................................................

चंद्रमोहन कुलकर्णी आपल्या चित्रकलेचं नेमकं काय करतायत, हे कुणाच्या लक्षात येतंय का? आणि ते जे काही करतायत त्यावरून मला कुणाची तरी आठवण येतेय? मला आठवण येतेय गोयाची. हो गोयाची. चंद्रमोहन कुलकर्णी यांची कोणत्याही प्रकारे गोयाशी तुलना करत नाहीये. पण एक निर्विकारपणे आपल्या वर्तमानाकडे पाहायची एक खास दृष्टी गोयाकडे होती, ती निर्विकार, निर्लेप दृष्टी चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याकडे आहे. एक खास दृष्टी. चंद्रमोहन सरांची ती दृष्टी मला गोयासोबत असलेल्या त्यांच्या साम्याकडे खेचून घेऊन गेली. आणि मला ठामपणे वाटतं- चंद्रमोहन कुलकर्णी भारतीय गोया आहेत. त्यासाठी थोडासा गोया सांगणं गरजेचं आहे. अर्थात इथे गोयाचं चरित्र सांगणार नाहीये, तर फक्त गोयाची ती वैशिष्ट्ये सांगणार आहे, जी चंद्रमोहन कुलकर्णी यांना भारतीय गोया म्हणवण्यास भाग पाडतात. अगदी वरवर माहिती असलेल्या वाचकांना कदाचित हे साम्य कळणार नाही, मात्र ज्यांना गोया आणि त्याचा काळ सविस्तरपणे ज्ञात आहे, अशांना हे साम्य तात्काळ जाणवेल.

फ्रान्सिस्को होसे दे गोया इ लुसियेन्तेस म्हणजेच अठराव्या शतकातील प्रख्यात स्पॅनिश चित्रकार गोया (जन्म ३० मार्च १७४६ - मृत्यू १६ एप्रिल १८२८). गोया आपल्या आधीच्या आणि नंतरच्या चित्रकारांहून वेगळा ठरतो, ते त्याच्या वर्तमान वाचण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीमुळे. गोयाने केवळ आपल्याला नेमून दिलेलं काम केलं नाही तर आपल्या सभोवती जे काही घडतंय किंवा बिघडतंय याची सम्यक् दखल आपल्या कलेतून घेतली. गोयाने आपल्या चित्रांमधून, रेखाटनांमधून आणि कोरीव रेखाटनांमधून तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा वेध घेतला. मानवी जगण्यातली भयावहता आणि मानवी क्रूरता अत्यंत निर्लेपपणे गोयाने आपल्या कलेतून मांडली.

गोया जगला तो काळ युरोप खंडातला, कदाचित दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक रक्तरंजित असा काळ होता. स्पॅनिश राष्ट्रवादी आणि त्यांनी नामधारी फ्रेंच राजा जोसेफ बोनापार्टच्या विरुद्ध केलेला रक्तरंजित उठाव, ज्याद्वारे लवकरच पेनिनस्युलर युद्ध सुरू झाले. कोणत्याही प्रकारच्या युद्धाला आणि त्यातील हिंसेला गोयाचा सख्त विरोध होता. फ्रेंच राज्यक्रांती सुरू होण्याआधीच्या, नेपोलियनचे स्पेनवरील आक्रमण, त्या आक्रमणात नेपोलियनच्या सैन्याने स्पेनवर केलेले अनन्वित अत्याचार, त्याच्या बदल्यात स्पेनमधील राष्ट्रवाद्यांनी केलेली रक्तक्रांती यांची सविस्तर चित्ररूपी बखरच त्याने मांडली आहे.

मिलोस फॉरमन दिग्दर्शित ‘गोयाज् घोस्ट’ नावाचा एक चित्रपट आहे. त्यात नेपोलियनच्या स्पेनवरील आक्रमणाच्या उत्तरार्धातील उतरत्या काळाचं आणि गोयाच्या मानसिकतेचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. क्रांती काळातील आपल्या समाजाचं चुकीचं म्हणजेच जसंच्या तसं चित्रण केलं म्हणून गोयावर चर्चद्वारा काही आरोप केले जातात आणि त्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपट उलगडत जातो. त्या काळाचं एक परिपूर्ण चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.

नेपोलियन आक्रमणपूर्व आणि आक्रमणोत्तर असे दोन्ही काळ गोयाला अनुभवायला मिळाले. या दोन्ही काळात असणारी माणसाची लालची वृत्ती, तृष्णा, लालसा, ताकदीची जबरदस्त आस, अशी मानवी महत्त्वाकांक्षेचे हिडीस रूपं त्याला पाहायला मिळाली. ती त्याने आहे तशी मांडली.

गोयाच्या मृत्यूनंतर ३५ वर्षांनी त्याने काढलेल्या ८० कोरीवचित्रांची (Etchings) चित्ररूपी बखर ‘Los Desastres De La Cuerra’ (‘The Disasters of War’) १८६३मध्ये पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली. त्या काळातील स्पेनमधील गृहयुद्धाचं भीषण स्वरूप गोयाच्या पुस्तकातून समोर आलं. त्या पुस्तकात बाराव्या क्रमांकाचं एक चित्र आहे ‘This is what you were born for’ या नावाचं त्यात एक दोन्ही हात तुटलेला जेमतेम उभा राहू शकणारा फाटका माणूस, खाली पडलेल्या काही प्रेतांवर थुंकतोय. बायकांनी या रक्तक्रांतीत घेतलेला भाग, आणि हत्यांसाठी बायकांनी पुरूषांना प्रवृत्त केल्याच्या घटना किंवा स्वत: बायकाच अगदी तोफेचे गोळे उडवायला माग-पुढे बघत नाही, अशी अनेक चित्रे गोयाने रेखाटली आहेत. एकार्थाने आपल्या बीभत्स वर्तमानाला गोयाने कायमस्वरूपी रेषाबद्ध करून ठेवलंय.

आता चंद्रमोहन कुलकर्णी यांचा काळ. अर्थात हा काळ किमान पृष्ठभूमीवर गोयासारखा नक्कीच नाहीये. अंतर्गत काय सुरू आहे हे समजायला सामान्य लोकांना काहीच मार्ग नाही. पण चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याकडे वर म्हटलं तसं एक दृष्टी आहे, ती या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या प्रतलांचं उत्खनन करते आणि त्यात दबून असलेल्या तरंगांना उजागर करण्याचा प्रयत्न करते. गोयाचा देश, समाज, काळ सोपा होता, दोन भागांत विभागलेला, एकरेषीय. मात्र चंद्रमोहन कुलकर्णी यांचा काळ आणि समाज सोपा नाही, तो खंडित आणि विखुरलेला आहे, शिवाय एकरेषीय तर अजिबातच नाही. हा देश, समाज वेगवेगळ्या नाड्यांवर वेगवेगळ्या गतीने स्पंदन पावतो. ही स्पंदने टिपण्याची आणि त्यातील एकसामायिकता टिपण्याची दृष्टी चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याकडे आहे. जो भोवताल, जो वर्तमान ते वाचतात, त्याला आपल्या कलेत परावर्तीत करण्याचं जबरदस्त कसब त्यांच्याकडे आहे.

चंद्रमोहन कुलकर्णी यांची अनेक चित्रे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दोन हजार तेरा-चौदा या काळात त्यांनी काढलेली चित्रे येऊ घातलेल्या भेसूर, भीषण काळाची वर्णनेच होती. कोणत्याही खऱ्या कलावंतासाठी, लेखकासाठी अराजकीय असं काहीही नसतं, असं मी मानतो. पण मग चंद्रमोहन कुलकर्णी यांची ही चित्रेसुद्धा राजकीय होती का? तर हो होती. पण ती पक्षीय राजकारण किंवा वैचारिक राजकारण मांडणारी होती का? तर उत्तर आहे : नाही.

बदलत्या राजकीय स्वरूपामुळे मानवी नातेसंबंधात, मानवी मूल्यात वैचारिक राजकारणाच्या नावाखाली जे काही विषारी, विषाक्त घुसत चाललेलं होतं, ज्यामुळे मानवी मन भेसूर, भीषण, भयावह आणि अत्यंत अमानवी असहिष्णू बनत चाललेलं होतं ते आपसूकच चंद्रमोहन कुलकर्णी यांना दिसत होतं ते आपोआप कोणताही गाजावाजा, आवाज न करता त्यांच्या चित्रातून समोर येत होतं. एक अत्यंत वेगळी सिरीज त्यांनी काढलेली होती. त्या सिरीजचा विषय होता : खुर्ची. पुण्यात त्या चित्रांचं प्रदर्शनही भरलेलं होतं. या खुर्चीच्या माध्यमातून मानवी लालसेच्या, महत्वाकांक्षेच्या मागे असणारं भीषण पाशवी रूप त्यांनी दाखवलं होतं. त्या सगळ्या चित्रांचा स्वर आणि रस भय आणि बीभत्सपणा हाच होता. मानवी अंर्तमनात दडून बसलेली तरी सर्वत्र जाणवणारी क्रूरता आणि वेगवेगळ्या स्वरूपात त्या क्रूरतेचं संधी मिळताच बाहेर येणं किंवा बाहेर येण्याचा प्रयत्न करणं. तत्कालीन वर्तमान समाजभानात स्पंदन पावणारी भयकंपनं त्या प्रदर्शनातील चित्रांमध्ये होती.

वर्तमानभान म्हणजे चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या तीक्ष्ण दृष्टीचे वैशिष्ट्य. त्यांच्या आणि त्यांच्याच भानाचे उदाहरण म्हणून एका चित्राचा संदर्भ देतो : ‘पोटॅटो इटर्स २०१४’. २०१५ साली व्हिन्सेंट व्हान गॉगच्या पुण्यतिथीला १२५ वर्षं पूर्ण झाली होती, त्याला आदरांजली म्हणून चित्रकार चंद्रमोहन यांनी ‘पोटॅटो इटर्स २०१४’ हे चित्र काढलं होतं. व्हिन्सेंट व्हान गॉगच्या अत्यंत महत्त्वाच्या चित्रांपैकी एक म्हणून त्याचे ‘पोटॅटो इटर्स’ हे चित्र समजलं जातं. कोळसा खाणीवर काम करणाऱ्या मजूरांच्या हालाखीची अनेक चित्रं व्हिन्सेंट व्हान गॉगने काढली. पण जितक्या ताकदीने ‘पोटॅटो इटर्स’ काढलंय त्याच्यासारखं दुसरं कोणतंच नाही. आपल्या या चित्राचं वर्णन, त्याविषयी आपल्या भावना स्वत: व्हिन्सेंटनं आपल्या भावाला थिओला लिहिलेल्या पत्रात वाचता येतात :  

…I have tried to emphasize that those people, eating their potatoes in the lamplight, have dug the earth with those very hands they put in the dish, and so it speaks of manual labour, and how they have honestly earned their food.

I have wanted to give the impression of a way of life quite different from that of us civilized people. Therefore I am not at all anxious for everyone to like it or to admire it at once.

All winter long I have had the threads of this tissue in my hands, and have searched for the ultimate pattern; and though it has become a tissue of rough, coarse aspect, nevertheless the threads have been chosen carefully and according to certain rules. And it might prove to be real peasant picture. I know it is. But he who prefers to see the peasants in their Sunday-best may do as he likes. I personally am convinced I get better results by painting them in their roughness than by giving them a conventional charm….

खाणमजूरांच्या, कामगार वर्गाच्या जगण्यावर व्हिन्सेंटने काढलेलं चित्र. त्या चित्राला शंभर वर्षांहून अधिक काळ लोटलाय. आज शंभर वर्षांनंतर जागतिकीकरणोत्तर काळात कामगार वर्गाची स्थिती कशी आहे, त्यांच्यात काय बदल घडला आहे ते चंद्रमोहन कुलकर्णी यांनी आपल्या चित्रात तंतोतंत दाखवलं आहे. केवळ एका चित्रातून शंभर वर्षांत घडलेला बदल, तेव्हढाच व्यापक पट आणि विस्तार किती ताकदीनं दाखवता येऊ शकतो ते या चित्रात कळतं. एका आर्थिक वर्गाच्या सामाजिक अवस्थांतराचा केव्हढा अफाट पट एकाच चित्रात मांडलाय.

या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे चंद्रमोहन कुलकर्णी यांची वर नमूद केलेली दृष्टी आणि त्यांचं व्यापक इतिहासभान आणि अर्थातच समाजभान. आपल्या काळापेक्षा असुसंगत अशा एका अत्यंत वेगळ्या विषयावर चित्र काढणाऱ्या चित्रकाराच्या पुण्यतिथीला १२५ वर्षे पूर्ण होतात म्हणून त्याचाच एक चित्रविषय घेऊन त्याला आदरांजली देताना सम्यक् भान राखत त्या चित्रविषयाची शंभर वर्षांनंतर काय अवस्था आहे, हे नेमकेपणाने मांडणं.

या कल्पनेत चंद्रमोहन कुलकर्णी यांची अद्भुत आकलन, प्रतिभाशक्ती आणि विचारदृष्टी दिसून येते. अशा प्रकारचे कलेद्वारे सामाजिक परिवर्तनाचे भान दाखवून देण्याचा प्रयत्न जगभरात कुठेही झालेला मला तरी अजून दिसलेला नाही. अर्थात कुणाला अशी कल्पना सुचण्यासाठी चंदमोहन कुलकर्णी व्हावं लागेल, तेव्हा ‘ती’ दृष्टी प्राप्त होईल. ती दृष्टी त्यांच्याकडे आहे म्हणून ते भारतीय ‘गोया’ आहेत.

एकमेवाद्वितीय म्हणावं अशा या महत्त्वाच्या चित्राची दखल ना समीक्षकांनी घेतली ना माध्यमांनी. अर्थात भारतीय किंवा महाराष्ट्रीय कला समीक्षकांकडून अशी दखल घेणं अपेक्षितसुद्धा नाही. मात्र हे चित्रं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यावर खूप सविस्तर लिहिलं जायला हवं होतं. काळ बदलतो. भौतिक माध्यमं बदलतात, पण गरिबांच्या दारिद्र्यात काही बदल होतो का? डाव्या, मार्क्सवादी आर्थिक इतिहासाचा आढावा घेणाऱ्या लेखकाला शंभर पानांत लिहायला जमणार नाही ते चंदमोहन कुलकर्णी यांनी एका चित्रात मांडून दाखवलं आहे. या चित्राच्या निमित्ताने मी मार्क्सवादी कला समीक्षकांना आव्हान देतो की, व्हिन्सेंट व्हान गॉगचं ‘पोटॅटो इटर्स’ आणि चंदमोहन कुलकर्णी यांचं ‘पोटॅटो इटर्स २०१४’ या चित्रांचे मार्क्सवादी आणि जागतिकीकरणाच्या आर्थिक परिप्रेक्ष्यातून विश्लेषण करून दाखवावे. योग्य प्रकारे हा प्रयत्न जमल्यास त्यांना संपूर्ण शंभर वर्षांचा दारिद्र्याच्या सामाजिक बदलांचा आढावा प्राप्त होईल.

२०१९ च्या पहिल्या चार महिन्यात चंद्रमोहन सरांनी एक चित्र मालिका केली होती, ‘लोकं वाट बघतायत’ अशा नावाची. साधारण वर्षभरापासून लोकांमध्ये एक न स्पष्ट करता येणारी अस्वस्थता, बेचैनी होती आणि लोकं वाट बघत होते. जवळपास प्रत्येक भारतीय काहीतरी संपण्याची आणि काहीतरी येण्याची अत्यंत आतुरतेनं वाट बघत होता. अत्यंत दीर्घकाळ मानसिक घालमेल समाजात पसरून होती. ती टिपण्याचं कसब फक्त चंद्रमोहन कुलकर्णी यांनी दाखवलं. ‘आपली पण वेळ कधी ना कधी तर येईलच’ या विचारात सामान्य माणूस वाट बघत असतो. बहुतेकदा ते वाट पाहणं निव्वळ हताश करणारं, ज्यातून फारसं काही हाती लागणार नाही असं असतं, कारण लोकांच्या हातात त्याखेरीज काहीच नसतं. तरी कधीकधी अत्यंत आतुरतेनं सामान्य लोकं ‘अपना टाईम आयेगा’ म्हणत वाट पाहत असतात, कारण तेव्हा अंधुक का होईना काही तरी बदलेल अशी आशा त्यांच्यात जिवंत असते. अशा जिवंत आशेला वाट बघण्याच्या रूपकात चंद्रमोहन सरांनी अत्यंत सम्यक पद्धतीने मांडलेले आहे. माणसातला सगळा वाईटपणा एकत्रितपणे गृहीत धरला तरी त्यात काहीतरी चांगलं होण्याची आशा शिल्लक राहतेच.

आपला सगळा महत्त्वाचा काळ ‘ब्लॅक पेंटिंग्ज’ करण्यात गोयाने घालवला तरी माणुसकीबद्दल असणारी त्याची उमेद कधीही संपली नव्हती. जोवर ‘माणूस वाट बघतोय’ तोवर बदलाच्या शक्यता शिल्लक आहेत, कायमस्वरूपी काहीच टिकून राहत नाही, सगळ्या गोष्टी अगदी काळासकट परिवर्तनाला बांधील आहेत, त्यासाठी वाट बघण्याचे तरी प्रयत्न करावे लागतात. हेच बदलाचं, परिवर्तनाचं मेटॅफोर आपल्या चित्र-मालिकेतून चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मांडलेलं आहे.

१५ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत चंदमोहन सरांचं ‘ये शहर किसने बनाया...’ या शीर्षकांतर्गत एक चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत भरतंय. कवितेच्या ओळीसारखं शीर्षक. हे संपूर्ण प्रदर्शन म्हणजे कवितांची मैफलच असेल. आमंत्रण पत्रिकेवर दोन कष्ट करणाऱ्या बायका आहेत. एक स्त्री सिमेंट किंवा वाळूची पाटी उचलतेय आणि दुसरी स्त्री तशीच एक पाटी भरतेय. हे शहर कोणी बनवलंय हे सूचकपणे सांगणारं चित्र. कोण ही शहरं उभी करतंय, तर ज्यांना स्वत:ला त्या शहरात जागा नाही. ज्या लोकांना कुठेच जागा नाही अशी लोकं ही शहरं उभी करतायत. कुणाच्या रक्तानं, कुणाच्या घामानं शिंपली जातायत ही शहरं? कोणी बनवली आहेत ही शहरं? गरिबांच्या, शोषितांच्या रक्ताने बांधलीयेत ही शहरं. एक न दिसणारी रक्तक्रांतीच तर सुरुये सभोवताली, कुणाला दिसो वा न दिसो. गोयाला ती दिसतेय... गोया जागाच आहे अजूनही...

भारतीय गोयाचं नव्या वर्तमानाचं हे नवं वाचन. जे कुणाच्याच दृष्टीला दिसत नाही ते गोयाच्या, ते चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या दृष्टीला दिसतं. आपल्या नजरेस सहजी न दिसणारं शहर या प्रदर्शनात पाहता येईल.

गावाची शहरं झालेल्या गावांवर, शहरांवर नॉस्टॅलजिक वांझोट्या आणि भुक्कड कविता लिहिणाऱ्यांनी आणि भूमिकेचा ठेचलेला बैल गाभण करणाऱ्यांनी एकदा या प्रदर्शनाला भेट द्यायलाच हवी.

गोयावर काही वर्षांपूर्वी मी एक कविता लिहिली होती. ती कविता आज ‘भारतीय गोया’ चंद्रमोहन कुलकर्णी यांना समर्पित करत आहे-

गोया,

तुला कदाचित माझं बोलणं

ऐकू येणार नाही

तू फार लांब आहेस माझ्यापासून म्हणून नव्हे तर

तुला ऐकायला जरा कमीच येतं म्हणून

माहितीय मला –

ब्लॅक पेंटिंग्ज म्हणे  

कशासाठी हा सगळा त्रास, उपद्व्याप?

 

तरीही तुला सांगू का?

काहीही बदललेलं नाहीये

इतक्या शतकांनंतरही

तुझ्या त्या कृष्णाकृत्या

रिलेव्हंट आहेत आजही आरपार

आजकाल पाण्याहून स्वस्त आहे रक्त

विश्वास बसत नसेल तर

सहज चक्कर मारून बघ

मध्यपूर्वेत किंवा उपखंडात

लाल रंग बनवायचा सोडून दिलाय

कंपन्यांनी म्हणतात बुवा

तरी लाल रंगाच्या सगळ्या शेड्स

अव्हेलेबल आहेत

कदाचित कुणी रंगवेल

सारा आसमंत लाल रंगांनी

बघशील तू

पण म्हणून काही तुला विषय मिळणार नाही

रेड पेंटिंग्ज बनवायचा

रक्तवर्णी डोळे तुझे टिपून घेतील रक्त

रक्तानेही विझत नाही अशी

कोणती तहान रे ही?

काहीच बदलत नाही का कधी?

मग सापेक्ष काय असतं?

.............................................................................................................................................

लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.

waghnakhe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......