उस्मानाबाद साहित्य संमेलनानं दोन गोष्टी शिकवल्या. लोकांच्या साहाय्यानं संमेलन करता येतं आणि काटेकोर मांडणी केली तर कमी खर्चात दर्जेदारही होतं
पडघम - साहित्यिक
कौतिकराव ठाले पाटील
  • उस्मानाबादला झालेल्या ९३व्या अ. भा. म. साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील
  • Fri , 30 October 2020
  • पडघम साहित्यिक साहित्य संमेलन Sahitya Sammelan फादर फ्रान्सिस दिब्रिटो Father Francis Dibroto अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan

‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे २०१९-२०२० या वर्षाचे ‘अक्षरयात्रा’ हे वार्षिक मुखपत्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्याला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी विस्तृत अध्यक्षीय लिहून जानेवारी महिन्यात उस्मानाबादला झालेल्या ९३व्या अ. भा. म. साहित्य संमेलनाचा आढावा घेतला आहे. त्यांचे ते अध्यक्षीय संपादित स्वरूपात…

.................................................................................................................................................................

१.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे साहित्य महामंडळाचे थेट लोकांपर्यंत पोहचणारे व चर्चाविषय होणारे मुख्य काम आहे. म्हणून संमेलनस्थळ ठरवणे हे मोठे जोखमीचे काम असते. संमेलनाचा संबंध एकाच वेळी थेट सामान्य आणि जाणत्या रसिकांशी येत असतो. त्यांच्या अपेक्षांचा व आकलनाचा विचार करावा लागतो. ज्या भागात संमेलन घेणे अपेक्षित आहे, जेथे यापूर्वी संमेलन झालेले आहे अशी व जिथे कधीच संमेलन झालेले नाही अशा स्थळांकडून निमंत्रणे आली तर त्यांपैकी संमेलन कोठे द्यायचे याचा विवेकाने विचार करावा लागतो. लेखन-वाचन संस्कृतीच्या भरण-पोषणाला कुठे वाव व त्यातही गरज आहे हे पाहावे लागते. शिवाय निधी संकलनाची क्षमता व निवासासाठी पुरेशी हॉटेल्स आहेत की नाही ह्या आनुषंगिक गोष्टींचाही विचार अलीकडे महत्त्वाचा होऊन बसला आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जीवनावश्यक वस्तूंइतकेच महत्त्व संमेलनकाळात निमंत्रित लेखक-कवी हॉटेलला देत असतात. याचा परिणाम अनेकदा गरीब ‘स्थळा’च्या वाट्याला संमेलन न मिळण्यात होतो. सुमारे आठ-नऊ वर्षांपासून उस्मानाबादचे वाङ्मयीन कार्यकर्ते उस्मानाबादला संमेलन मिळावे म्हणून पुन्हा पुन्हा निमंत्रणे देऊन संमेलन मागत होते; परंतु प्रतिस्पर्धी स्थळांसमोर त्यांचा निभाव लागत नव्हता. त्यामुळे उस्मानाबादकरांचा व मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून आमचा विरस होत होता. अखेर साहित्य महामंडळाचे कार्यालय मराठवाडा साहित्य परिषदेकडे आल्यावर व ज्यांना श्रीमंत-अतिश्रीमंत स्थळांची हौस होती असे सदस्य त्यांच्या साहित्य संस्थांमधून व त्यामुळे आपोआपच महामंडळाच्याही बाहेर गेल्यावर साहित्य महामंडळाच्या विद्यमान सदस्यांनी एकमुखाने उस्मानाबादचा पुरस्कार केला आणि अखेर खूप उशिराने का होईना पण उस्मानाबादला संमेलन मिळाले. साहित्य महामंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने उस्मानाबादवर साहित्य संमेलनासाठी एकदाचे शिक्कामोर्तब केले. इथे संमेलनाच्या कामाचा पहिला टप्पा संपला.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील सार्वजनिक निवडणुका होत्या. सुमारे दोन महिने आधी आचारसंहिता लागेल व सर्व सरकारी व्यवहारांवर काही काळ बंधने येतील आणि संबंधित यंत्रणेला आपले काम करता येणार नाही याचा अंदाज मला होता. असे झाले तर संमेलनाला मिळणारे पन्नास लाख रुपयांचे सरकारी अनुदान अडकून पडेल व साहित्य संमेलन अडचणीत येईल म्हणून मी सर्व संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून नेहमीचा शिरस्ता बदलून संमेलनाच्या कामाच्या प्रक्रियेत बदल केला आणि जलद हालचाली करून संमेलन स्थळ निवडीचा टप्पा नेहमीपेक्षा दीड-दोन महिने आधीच पूर्ण केला. उस्मानाबादला संमेलन होणार हे जाहीर केले आणि जवळपास चार-साडेचार महिने आधी सरकारी अनुदान पदरात पाडून घेतले. साहित्य संमेलन ‘सुरक्षित’ पार पाडण्यासाठी माझ्या परीने वाट मोकळी केली. त्यामुळे उस्मानाबादच्या स्वागतमंडळाची धाकधूक कमी झाली. ते अधिक उत्साहानं कामाला लागलं.

संमेलनाध्यक्षांची निवड हा संमेलनातील दुसरा पण अतिशय महत्त्वाचा टप्पा. उस्मानाबादला कोण अध्यक्ष असावा याच्या बातम्या वर्तमानपत्रे रंगवून रंगवून व ठासून देत होती. एक प्रकारे साहित्य महामंडळावर व विशेषत: माझ्यावर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. मराठवाड्यातील अर्धा डझन ज्येष्ठ लेखकांची नावे त्या सर्वांनी दीडेक महिना चर्चेत ठेवली आणि हा दबाव कमी होऊ दिला नाही. समाजमाध्यमे वर्तमानपत्रांच्या दहा घरे पुढे होती. ज्येष्ठत्व, भूमिपूत्र, जात असे निरनिराळे आधार समाजमाध्यमे शोधत होती. आपापल्या वकुबानुसार वेगवेगळ्या भूमिका त्यांवर मांडल्या जात होत्या. यावर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनी उचित ‘मौन’ पाळले आणि कोणाच्याच बाजूने आपला कल दाखवला नाही; ‘काहीही सांगता येत नाही, बैठकीत जो निर्णय होईल तो जाहीर करण्यात येईल’ अशी भूमिका मी घेतली.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

वर्तमानपत्रांमधल्या चर्चेतल्या नावांपैकी जी चार नावे महामंडळाच्या सदस्यांच्या पसंतीस उतरतील अशी होती, त्यांपैकी ना. धों. महानोर व रा. रं. बोराडे ह्या दोघांनी जाहीरपणे तर सुधीर रसाळ व नरेंद्र चपळगावकर ह्या दोघांनी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षाजवळ म्हणजे माझ्याचजवळ, माझ्या घरी येऊन अध्यक्ष होण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. अशा परिस्थितीत अध्यक्ष शोधणे आणि निवडणे इतरांना सोपे वाटत असेल, पण साहित्य महामंडळासाठी ते फार कसोटीचे काम असते\होते.

साहित्य संमेलन मराठवाड्यात होणार असल्यामुळे ‘मराठवाडा साहित्य परिषद संमेलनाध्यक्षाच्या निवडीपासून अलिप्त राहील; ती कोणाचेच नाव सुचवणार नाही इतर संस्थांकडून आलेल्या नावांमधूनच अध्यक्षाची निवड करण्यात येईल’ असे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मी आधीच जाहीर करून टाकले होते. तरीही साहित्य महामंडळ मराठवाडा साहित्य परिषदेकडे असल्यामुळे आणि साहित्य संमेलन उस्मानाबादला साहित्य परिषदेची शाखाच भरवणार असल्यामुळे संमेलनाचा अध्यक्ष वाचक - रसिकांना पसंत पडेल, उस्मानाबादकरांनाही चालेल असा असावा अशी माझी व माझ्या सहकाऱ्यांची अपेक्षा होती. ही अपेक्षा महामंडळाच्या घटक, समाविष्ट व संलग्न संस्थांनी पुरी केली.

साहित्य महामंडळाच्या घटक व समाविष्ट संस्थांपैकी निम्म्यापेक्षा अधिक संस्थांनी जी नावे सुचवली होती त्यात ख्रिस्ती लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव अग्रभागी व बहुसंस्था मान्य होते. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या सदस्यांनी संस्थांचा कल लक्षात घेऊन व आलेल्या नावांवर सारासार विचार करून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने, बिनविरोध निवड केली आणि सोळाव्या शतकापासून ख्रिस्ती धर्मीयांनी निर्माण केलेल्या मराठी साहित्य परंपरेचा सन्मान केला. साहित्य महमंडळाचा अध्यक्ष म्हणून मला सुखद धक्का दिला. माझ्या सर्व सहकाऱ्यांची परिपक्व समज पाहून मी क्षणभर भारावून गेलो. कारण संस्था चालवताना असे क्षण क्वचितच वाट्याला येतात, हे मी माझ्या संस्थात्मक कामाच्या दीर्घ अनुभवावरून खातरीने सांगू शकतो.

इथे एक गोष्ट मला मुद्दाम सांगितली पाहिजे ती ही की, साहित्य महामंडळाचे आम्ही एकोणीस जण व्यक्तिगत जीवनात वेगवेगळ्या विचारधारांचे वाहक आहोत यात शंका नाही. पण हा निर्णय घेताना कोणीही आपली विचारधारा मध्ये आणली नाही व अध्यक्षाची निवड करताना खळखळ केली नाही. मग भले, ब्राह्मण महासंघाने विरोधाचे आपटबार फोडायला सुरुवात केल्यानंतर पुढे कोणी थोडीफार कुरकुर केली असेलही, पण ती फक्त कुरकुर होती. पण अंतिमत: कोणीही उघडपणे ब्राह्मण महासंघाच्या भूमिकेशी सहमत नव्हते. मला व्यक्तिश: ही गोष्टही खूप महत्त्वाची वाटते. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मला हा निर्णय घेणाऱ्या व त्यावर ठाम राहणाऱ्या सदस्यांचा अभिमान वाटतो, वाटत राहील.

२.

साहित्य महामंडळाच्या वतीने महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय जाहीर केल्यावर दुसऱ्या दिवशी ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाराष्ट्र ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी निवडीविरोधी प्रतिक्रिया दिली. त्यांना फक्त हिंदू अध्यक्ष हवा होता. प्रतिक्रिया व विरोध ब्राह्मण महासंघाचा होता; त्यामुळे मला मुळीच आश्‍चर्य वाटले नाही. महाराष्ट्रातील ब्राह्मणांमधला एक वर्ग कायमच अदूरदर्शी, धर्मांध व जात्यंध राहात आलेला आहे याचे दाखले मध्ययुगापासून सापडतात. पण हा गट वगळता ब्राह्मणांमधला फार मोठा वर्ग मात्र संत एकनाथांनी आचरलेल्या आणि लोकहितवादी, न्या. रानडे व आगरकर यांच्या मार्गाने जाणारा आहे, हे फादर दिब्रिटो यांची निवड केवळ स्वीकारूनच नव्हे तर सर्व स्तरांतून तिला पाठिंबा देऊन संमेलन यशस्वी करण्यास साहित्य महामंडळास बळ दिले हे उस्मानाबाद संमेलनाने पुन्हा एकदा दाखवून दिले. हे खरे असले तरी संकुचित, अदूरदर्शी, जात्यंध व विशेषत: धर्मांध असलेल्या गटाने आपले उपद्रवमूल्य कायम दाखविलेले आहे आणि अखिल मराठी समाजाला एकसंध होण्यापासून रोखण्याचे कामही कायमच केलेले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या गटाने महाराष्ट्रीय धर्माचे जितके नुकसान केले, त्यापेक्षा ज्या हिंदू धर्माच्या नावाखाली हा गट हे उद्योग करतो, त्या हिंदू धर्माचेही त्यापेक्षा खूप मोठे आणि कधीही व कशानेही न भरून निघणारे नुकसान त्याने केलेले आहे. दीडशे वर्षांपूर्वी पुण्याच्या ना. वि. जोशी यांनी साक्षेपाने लिहिलेले ‘पुणे शहराचे वर्णन’ हा ग्रंथ वाचला म्हणजे यांच्या बौद्धिक वकूबाची कल्पना येते. श्रीछत्रपती शिवाजी महारांजानी धर्मांतरितांना परत आपल्या मूळ धर्मात घेण्याचा घालून दिलेला धडा यांना रुचला नाही. ‘राजा कालस्य कारणंम्’ ही उक्ती ब्राह्मणांमधील या गटाने खोटी ठरवली. श्रीशिवाजी महाराजांनी घालून दिलेला धडा त्यांनी अंगीकारला असता तर हळूहळू समाजाची मानसिकता बदलत गेली असती आणि ही प्रथा रूढ झाली असती. त्यामुळे सक्तीच्या धर्मांतराला आळा बसला असता. इच्छेविरुद्ध केलेल्या धर्मांतरितांना परत येण्याचा एक मार्ग मिळाला असता. देशात आज जे चित्र दिसते ते दिसले नसते आणि हे धर्मांध लोक आज इतर धर्माविरुद्ध जी आदळआपट करतात ते करण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती.

भीमा कोरेगाव येथे इंग्रजांविरुद्ध झालेल्या अखेरच्या लढाईच्या वेळी ‘आम्ही तुमच्या बाजूनेच लढतो पण हिंदूधर्मात व हिंदूसमाजात आमचे स्थान काय राहील’ असा प्रश्न दुसऱ्या बाजीरावाला महार सैनिकांच्या नेत्याने विचारला होता. त्या वेळी दुसऱ्या बाजीरावाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि महारांचा शूरपणा ओळखून त्यांना बरोबरीच्या नात्यानं वागवू असं आश्वस्त केलं असतं आणि समजूतदारपणे तो प्रश्न सोडवला असता तर ते योद्धे पेशव्याचं सैन्य सोडून इंग्रजांकडे गेले नसते आणि इंग्रजांकडून लढलेल्या त्या केवळ ५००-६०० महार योद्ध्यांकडून पेशव्यांच्या २५०० - ३००० सैन्याचा दारुण पराभव झाला नसता. आणि पुण्याची सत्ताही इंग्रजांच्या हाती गेली नसती. केवळ दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या व त्यांच्या सल्लागारांच्या जात्यंधपणामुळे व नादानपणामुळे श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली मराठी सत्ता नामशेष झाली नसती.

शेवटी असे प्रश्‍न राज्यकर्त्यानेच सोडवायचे असतात. पण दुसऱ्या बाजीरावाला मूळातच समज कमी; शिवाय त्यात ब्राह्मण असल्याचा अहंकार मोठा. ह्या अहंकारानेच मराठेशाही बुडवली. भीमा कोरेगाव येथे नदीकाठी असलेला ऐतिहासिक विजयस्तंभ हा ह्या महार योद्ध्यांच्या शौर्याचं स्मारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीने त्याकडे दलितांच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून पाहिले आणि महारांचा स्वाभिमान जागवला, अस्मिता जागी केली म्हणून दरवर्षी तिथे दलित समाज एकत्र जमून ह्या योद्ध्यांना आदरांजली वाहतो. दीड दोन वर्षांपूर्वी झालेल्या आदरांजली मेळाव्यात जात्यंधांनी ठरवून दंगल घडवून आणली अशी सर्वत्र चर्चा होती व अजूनही मधून मधून होत असते.

हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी झालेल्या मराठवाडा मुक्तिआंदोलनाच्या वेळी मराठवाड्यात रजाकारांनी हिंदूंच्या ब्राह्मणांसह इतर जातींमधील १३ तरुण स्त्रिया पळवून नेल्या होत्या व त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले होते. याची प्रतिक्रिया म्हणून हिंदूंनीही मुसलमानांच्या ५ स्त्रिया पळवून आणल्या होत्या. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर थोड्याच दिवसांत दोन्हीकडच्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या समजूतदार पुरुषांनी शांतता व सलोखा निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन जो समजोता केला, त्यात दोन्हीकडच्या त्या पळवलेल्या १३ आणि ५ स्त्रियांचा प्रश्न पुढे आला. तेव्हा त्या सर्व स्त्रियांना सभेसमोर आणण्यात आले आणि त्यांना विचारण्यात आले की, यापुढे तुमची इच्छा काय आहे? त्यावेळी सर्व १३च्या १३ हिंदू स्त्रियांनी परत आपापल्या घरी जाण्याची व मुसलमान स्त्रियांनी त्यांच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु ज्यांच्या हातात परंपरेने धर्माची सूत्रे होती त्या अविवेकी, अदूरदर्शी व धर्मांध ब्राह्मणांनी अनिच्छेने व सक्तीने का होईना एकदा बाटल्यावर/बाटवल्यावर, भ्रष्ट केल्यावर/भ्रष्ट झाल्यावर त्यांचा परत घेण्याचा/येण्याचा मार्गच बंद करून ठेवलेला असल्यामुळे व दीर्घकाळ अडाणी बहुजनसमाजाच्या डोक्यात ही अविवेकाची पुटे पक्की चढवलेली असल्यामुळे त्यांच्या घरच्या पुरुषांनी आपल्या स्त्रियांना त्यांचा काहीही दोष नसताना परत घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना एकतर विहिरी जवळ कराव्या लागल्या व काहींना इच्छा नसतानाही पळवून नेलेल्या व अत्याचार केलेल्या मुसलमानांसोबतच जावे लागले. ह्या दोन्ही व ठिकठिकाणी घडलेल्या अशा घटना ह्या जात्यंध व धर्मांध ब्राह्मणांच्या अहंकाराचे व विचारहीनतेचे फळ आहे. अशा ब्राह्मणांचा हा संघ आहे.

३.

अध्यक्षाच्या नावाच्या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी निषेधाच्या व विरोधाच्या चार दोन फोनांनी व एक दोन लघुसंदेशांनी सुरुवात झाली. पण तिसऱ्या दिवशी पहाटेपासून फोनांचा व थोड्या प्रमाणात लघुसंदेशांचा मारा माझ्यावर सुरू झाला. तिकडे पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे ब्राह्मण असूनही त्यांनी त्यांच्या साहित्य परिषदेकडून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव सुचवलेले असल्यामुळे त्यांच्यावरही असाच मारा सुरू झाला. निषेध, अध्यक्ष बदला, सगळे हिंदू लेखक मेले आहेत का, अशा आशयाचे ते फोन व लघुसंदेश होते. मी व जोशी दुर्लक्ष करतो म्हटल्यावर आधी थोडी सौम्य असलेली भाषा बदलत गेली व आक्रमक होऊ लागली; तिचे रूपांतर धमक्यात झाले. पाहून घेऊ, संमेलन होऊ देणार नाही; धिंगाणा घालू, उधळून लावू अशा चढत्या क्रमाने आम्हाला, निदान मला तरी क्षणाचीही फुरसत न मिळू देता अखंडपणे फोन व धमक्या येत होत्या.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : दिवाळी अंक आणि ‘प्रतिभे’ला बेजार करून सोडण्याचे दिवस!
..................................................................................................................................................................

सर्व महाराष्ट्रातील, मेंदूचा विकृत वापर करणारे ब्राह्मण महासंघाचे व मेंदू गहाण टाकलेले बहुजनांचे लोक फोन करण्यासाठी कामाला लावले होते. मी सुरुवातीला काही फोन न चुकू देता घेतले. काय प्रकरण आहे व कशासाठी आहे हे माझ्या ध्यानात आले. तिकडे पुण्यात प्रा. मिलिंद जोशींचाही फोनवर असाच छळ चालू होता. ब्राह्मण असूनही जोशींना सूट नव्हती. त्यांच्या दृष्टीने जोशी माझ्यासोबत होते ही त्यांची चूक होती. ते विचार करणारे व विवेकी होते म्हणून तेही माझ्याइतकेच दोषी होते. त्यांच्या दृष्टीने मिलिंद जोशींचं ‘ब्राह्मणत्व’ बावनकशी नव्हतं, ‘चोख’ नव्हतं; त्यात ‘खोट’ होती. त्यामुळे तेही अपराधी होते. विवेकी व विचारी असणं हा त्यांचा अपराध होता. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी त्यांची सहनशीलता कमी कमी होऊ लागली. ते हातघाईवर आले. ‘गोंधळ घालू, संमेलन होऊ देणार नाही’चं रूपांतर धमक्यात झालं. ‘तुमच्याकडे पाहून घेऊ, कसा अध्यक्ष बदलत नाही? पाहतोच.’ मारहाणीच्या, जिवे मारण्याच्या धमक्या सुरू झाल्या.

याची कुणकुण वर्तमानपत्रांना व वृत्तवाहिन्यांना लागली आणि दुसऱ्या दिवशी जवळपास सर्व महत्त्वाच्या मराठी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर धमक्यांच्या ठळक बातम्या आल्या. वृत्तवाहिन्यांनीही धमक्यांना ठळक प्रसिद्धी दिली. तरीही फोन व लघुसंदेश बंद झाले नव्हते. मी, आलेले फोन करणारे कोण आहेत याचा अंदाज येण्यासाठी सगळे फोन उचलण्याऐवजी मध्ये पुरेसा वेळ जाऊ देऊन अधून मधून फोन उचलण्याचे व त्यांच्याशी बोलण्याचे धोरण अवलंबले. त्याचा फायदा असा झाला की, फोन करणारांपैकी काहीजण असे आढळून आले की, आपण कशासाठी फोन करतो हेच त्यांना माहीत नव्हते. काही जणांना नीट बोलताही येत नव्हते. संमेलन म्हणजे काय? निवडलेला अध्यक्ष का नको, हाच असला तर काय बिघडणार आहे, दुसरा कोण पाहिजे, तुम्ही संमेलनाला येणार आहे का? यापैकी अनेकांना काहीच सांगता येत नव्हते. ते पुरते सांगकामे, खरं म्हणजे फोनकामे होते. त्यांना कोणीतरी फक्त फोन करायला सांगितले होते आणि त्यांनी ते केले होते. ते पुरते ‘अडाणी’ होते.

त्यांच्या नावावरून, गावांवरून व भाषेवरून ते निमनगरी व खेड्यांमधील बहुजनसमाजातील असावेत याचा अंदाज मला आला. हजारो वर्षे वापरत असलेला ‘कावा’ आताही ब्राह्मण महासंघ वापरत होता आणि आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परस्पर बहुजनसमाजाचे अडाणी लोक हाताशी धरून वापरत होता. त्यांपैकी काहींना मी सुनावले, तेव्हा त्यांनी, ‘आम्हाला फक्त फोन करायला सांगितला म्हणून आम्ही केला’. ‘तुम्ही म्हणता ही भानगड आम्हाला कोणीच सांगितली नाही’ असे त्यांनी मला सांगितले. म्हणजे फोन करणारांपैकी जे फोन खेड्यांतून व निमशहरी भागातून आलेले होते. त्यांपैकी अर्धे लोक तरी काय चालले आहे, याबाबत अनभिज्ञ होते.

मुंबईच्या कोण्या ‘सत्यजित देशमुख’ नावाच्या माणासाच्या धमकीचा मी वाहिनीवर नावानिशी उल्लेख केला. परळीच्या दुबेचाही मी थेट उल्लेख केला. आणखी काही नावांचे उल्लेख केले; ते प्रसारित झाले. मी आता थेट नावांचा उल्लेख करू लागलो.

तोपर्यंत समाजमाध्यम कोणीही न सांगता उत्स्फूर्तपणे साहित्य महामंडळाच्या, संमेलनाच्या, मिलिंदच्या व माझ्या बाजूने नेटाने कामाला लागले होते. समाजमाध्यमावर ठिकठिकाणचे इतर लोक ब्राह्मण महासंघाचा व विरोधकांचा तीव्र शब्दांत निषेध करू लागले. त्यांना प्रतिकार करू लागले व साहित्य महामंडळाला, साहित्य संमेलनाला, अध्यक्षाच्या निवडीला, मिलिंदला व मला नावानिशी पाठिंबा जाहीर करू लागले. त्यांचा निषेध व आमचा पाठिंबा वाढत गेला. चंद्रपूर-नागपूरपासून ते थेट सावंतवाडी गोव्यापर्यंतच्या लोकांनी ब्राह्मण महासंघातील धर्मांधांचा खरपूस समाचार घेतला. आठवडाभर हे चालू होते.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : सोलापूरकरांनो, मारुती चितमपल्लींचा ‘नारायण सुर्वे’ करू नका!
..................................................................................................................................................................

शेवटी हळूहळू फोन व धमक्या कमी कमी होत बंद झाल्या तरी हे प्रकरण एवढ्यावर थांबेल असे मला वाटत नव्हते. उस्मानाबादला संमेलनात हे थोडीफार गडबड करतील व अडथळे आणतील असा मी अंदाज केला आणि मनातल्या मनात त्यांना रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून ठेवला.

४.

तिकडे उस्मानाबादमधील ब्राह्मण महासंघाच्या मोजक्या लोकांनी स्वागतमंडळाला फोन केले. त्यांनी त्यांच्या परीने उचित भूमिका घेतली. उस्मानाबादकर आपण फक्त यजमान आहोत, अध्यक्ष निवडीचा व कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार यजमानांना नसतो. हे सर्व अधिकार साहित्य महामंडळाला असतात. महामंडळ ठरवील तेच आपल्याला करावे लागेल. नाही तर संमेलन हातचे जाईल. तेवढ्यावर ते गप्प बसले.

उस्मानाबादची शांतता माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाची होती. तेथील जनतेने स्वागतमंडळाच्या व साहित्य महामंडळाच्या पाठीशी उभे राहून ती नीट सांभाळली. म्हणून संमेलनाच्या यशात महामंडळाबरोबर स्वागतमंडळाइतकाच उस्मानाबादच्या जनतेचाही मोठा वाटा आहे; म्हणून मी समारोपात त्यांचं जाहीर कौतुक केलं. संमेलनाची कार्यक्रमपत्रिका ठरली.

ख्यातनाम कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल असे एक दिवस मी जाहीर केले. संमेलनाची तयारी सुरू झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात गावागावात संमेलनाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली. अशा वेळी संमेलन केवळ पाच दिवसांवर आले असताना एक दिवस प्रत्यक्ष कविवर्य ना. धों. महानोरच माझ्यासामोर येऊन उभे राहिले आणि ब्राह्मण महासंघाच्या कार्याध्यक्ष माधुरी कुलकर्णी यांचं एक पत्र, ब्राह्मण महासंघाचं एक निवेदन आणि स्वत: महानोरांनी लिहिलेलं एक पत्र त्यांनी माझ्यासमोर ठेवलं. महानोर हे मराठी साहित्यातील वजनदार व्यक्तिमत्त्व. त्यांच्याहस्ते संमेलनाचं उद्घाटनहोणार होतं. अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, उद्घाटक ना. धों. महानोर हे उद्घाटन समारंभात व्यासपीठावर असणार होते. त्याला विशेष महत्त्व होतं. त्यामुळे संमेलनाची उंची वाढणार होती. उद्घाटन समारंभाला वजन प्राप्त होणार होतं. हे हेरून ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी संमेलन अडचणीत आणण्यासाठी नवी खेळी खेळले होते.

ना. धों. महानोर जिथे राहात होते, तिथल्या आसपासच्या जिल्ह्यांतील ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी महानोरांच्या घरी जाऊन त्यांच्यावर दबाव आणला. तुम्ही साहित्य संमेलनाला जाऊ नका, उद्घाटन करू नका, आमचा व आमच्या संघटनेचा संमेलनाध्यक्षांना विरोध असताना तुम्ही संमेलनाला जाताच कसे अशी भाषा त्यांनी वापरली आणि ब्राह्मण महासंघाचे पत्रक, संघाच्या कार्याध्यक्ष श्रीमती कुलकर्णी यांचे पत्र त्यांनी महानोरांना दिले. महानोरांनी संमेलनाच्या उद्घाटनासाठी उस्मानाबादला जाऊ नये, संमेलन अडचणीत यावे अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. महानोरांवर दडपण आणण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला. महानोरांनी आधी त्यांचं सर्व ऐकून घेतले आणि शांतपणे मी निमंत्रण स्वीकारलेलं आहे, मी साहित्यिक आहे. त्यामुळे मी साहित्य संमेलनाला जाणार आहे; ठरल्याप्रमाणे संमेलनाचे उद्घाटन करणार आहे; तिन्ही दिवस तिथे थांबणार आहे; साहित्य संमेलनात सहभागी होणार आहे. तुम्ही काहीही केले तरी यात बदल होणार नाही. तुमचे हे निवेदन व पत्र मी ठेवून घेतो. तुम्ही आता जा आणि पुन्हा माझ्याकडे येऊ नका अशा शब्दांत ते निवेदन व पत्र घेऊन येणाऱ्या ब्राह्मण महासंघाच्या तथाकथित कार्यकर्त्यांना महानोरांनी ठणकावले.

महानोरांनी त्या पत्राची व निवेदनाची अशा दोन्ही झेरॉक्स प्रती मला दिल्या. चार महिन्यांपूर्वी मला व प्रा. मिलिंद जोशी यांना दिलेल्या धमक्यांकडे मी गांभीर्याने पाहिले नव्हते. काही हितचिंतक पत्रकारांनी सुचवूनही मी पोलिसात तक्रार दिली नव्हती. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आताचा प्रश्न वेगळा होता. तीन-चार महिने रात्रंदिवस कार्यकर्त्यांनी व उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांनी खपून उभं केलेलं संमेलन पाच-पंचवीस माथेफिरूंच्या दुराठाहाखातर विस्कटून गेलं तर सर्वांच्या कष्टांवर, उमलत्या रसिकतेवर व पैसा पैसा जमा करून उभ्या केलेल्या व्यवस्थेवर पाणी फिरणार होतं. दहा वर्षं प्रयत्न करून मिळविलेलं साहित्य संमेलन हातचं निसटणार होतं. हे लक्षात घेऊन स्वागतमंडळाच्या प्रमुख, विश्वासू सहकाऱ्यांशी मी चर्चा करून संमेलनात गडबड होणार नाही, यासाठी त्यांच्यामार्फत उस्मानाबादमधूनच नागरिकांच्या सहकार्यानं सुरक्षा व्यवस्था निर्माण केली आणि संभाव्य ‘गोंधळ्यांचा’ तिथल्या तिथे बंदोबस्त करण्याची जबाबदारी ह्या व्यवस्थेकडे सोपवली.

सुदैवाने तिचा उपयोग करावा लागला नाही. तसेच संमेलनाच्या एक दिवस आधी महानोरांनी मा. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची प्रत, उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांना साहित्य महामंडळाने लिहिलेले पत्र ब्राह्मण महासंघाच्या निवेदनासह व पत्रासह आणि चार महिन्यांपूर्वी मला आलेल्या धमक्यांच्या फोन नंबरांच्या यादीसह उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात समक्ष जाऊन, संमेलनाला सुरक्षाव्यवस्था पुरवण्यासाठी दिली. त्याची दखल घेऊन पोलिसांनीही संमेलनात उत्तम बंदोबस्त ठेवला व शांतपणे आपले काम केले. कदाचित महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन तीन पक्षांचे सरकार आल्यामुळे ब्राह्मण महासंघाला अपेक्षित असणारे शासकीय सत्तेचे पाठबळ मिळण्याची असलेली खात्री मावळली असावी आणि त्यामुळे महासंघाला आपली भूमिका बदलावी लागली असावी.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : खांडेकरांच्या ‘ययाती’चे तीन नवे वाचक आणि आपल्या एकंदर वाचनाभिरुचीची इयत्ता
..................................................................................................................................................................

याबरोबरच या प्रकरणात कविवर्य महानोरांची व्यासपीठावरची उपस्थिती आणि व्यासपीठावरची भूमिका, महानोरांबद्दल नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपासून सर्व स्तरांवर असलेला आदर याचीही नोंद शासकीय पातळीवर घेतली गेली असावी.

एवढं मात्र खरं की, संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मी, महामंडळाचे इतर पदाधिकारी, स्वागत मंडळाचे पदाधिकारी, मिलिंद जोशी, साहित्य महामंडळाचे माझे सर्व संस्थांमधील सहकारी आम्ही सर्वजणांनी उद्भवेल त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवली होती. पण श्री. महानोरांच्या नावाची किल्ली फिरली आणि ब्राह्मणमहासंघाचे गंजलेले कुलूप बंद झाले आणि साहित्य संमेलन सुरळीतपणे आणि मोठ्या झोकात साजरे झालेले, पार पडलेले साऱ्या महाराष्ट्राने पाहिले.

५.

गेली काही वर्षे मराठी प्रसारमाध्यमे (वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्या) साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील राजकीय नेत्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीवर टीका करत असत व साहित्य महामंडळाला जबाबदार धरून दोष देत असत. लेखकांचे संमेलन असून व्यासपीठावर पुढाऱ्यांपेक्षा लेखकच कमी हा त्यांच्या टीकेचा मुद्दा असे. काही वेळा ऐनवेळी आलेल्या पुढाऱ्यांसाठी स्वागताध्यक्ष असलेल्या राजकीय नेत्याची माणसे, बसलेल्या लेखकाच्या मानपानाचा विचार न करता त्याला त्याच्या जागेवरून सरकवून त्याच्या जागेवर त्या पुढाऱ्याला बसवत असत. घुमानच्या संमेलनात संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांच्या व्यासपीठावर झालेल्या कुचंबणेबद्दल झालेली चर्चा सर्वश्रुत आहे. म्हणजे संमेलन लेखकांचं व महत्त्व पुढाऱ्यांना अशी स्थिती काही वेळा निर्माण होत असे. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या टीकेत सर्वच अतिरेक करणारे असे, असे म्हणता येणार नाही. पण ह्या स्थितीला जबाबदार कोण हे ध्यानात न घेतल्यामुळे निष्कारण साहित्य महामंडळ टीकेचे धनी होत असे. साहित्य महामंडळावर काही वेळा न शोभणारी टीका केली जात असे. साहित्य महामंडळ लाचार आहे असे चित्र अनेकदा उभे करण्यात आलेले मी पाहिलेले आहे. साहित्य महामंडळ ही हातात कोणतीही सत्ता व शस्त्रं नसणारी निरुपद्रवी सेवाभावी संस्था आहे हे लक्षात घेतले जात नसे.

या टीकेत तुच्छताच जास्त असे. या तुच्छतेला साहित्य महामंडळाने दिलेले उत्तर न छापण्याची किंवा महत्त्वाचा संदर्भ असलेला मजकूर गाळून छापून त्या उत्तरातील जीवच काढून घेण्यात येत असे. यावर हताशपणे पाहात बसण्यापलीकडे आमच्या हातात काहीच नव्हते. जेव्हा या निमित्ताने साहित्य महामंडळात चर्चा होई तेव्हा संमेलनाच्या यजमानपदाजवळ मुद्दा येऊन अडत असे. तशातच उस्मानाबादचे निमंत्रण यायला लागले आणि मी विचार करू लागलो की, उस्मानाबादला संमेलन मिळाले तर राजकीय नेत्यांचा अनादर न करताही आपल्याला संमेलन घेता येणे शक्य आहे का या दिशेने माझे मन विचार करायला लागले. आणि त्यातूनच उस्मानाबादचे संमेलन आकाराला येत गेले.

गरज पडल्यास संमेलनाच्या आयोजनाच्या सर्व प्रक्रियेची माहिती त्यांना द्यायची, पण प्रत्यक्ष संमेलनाच्या आयोजनापासून त्यांना दूर ठेवायचे. त्यांनी दिली तर त्यांची मदत घ्यायची पण त्यांच्यावर व त्यांच्या संस्थांवर संमेलनाची कोणतीही जबाबदारी टाकायची नाही. हे संमेलन उस्मानाबादचे म्हणजे राजकीय नेत्यांसह सर्व जनतेचे म्हणून उभे करायचे. म्हणजे संमेलनापासून त्यांना दूर तर करायचे नाही पण त्यांच्यावाचून संमेलनाचे पानच हलणार नाही; संमेलन होणेच शक्य नाही, अशी परिस्थितीही निर्माण होऊ द्यायची नाही.

एकच वर्षापूर्वी यवतमाळच्या संमेलनाने जो धडा महामंडळाला शिकवला होता तोही माझ्यानजरेसमोर होता. म्हणून साहित्य संमेलन हे लेखकांचे व रसिकांचे असते हे सूत्र मनात पक्के धरून शक्य झाल्यास न बोलता, गरज पडल्यास कमीत कमी बोलून, लोकांचे, लोकांसाठी व लोकवर्गणीतून संमेलन उभे करायचे.

उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे होते व ही शाखाच हे संमेलन घेणार होती. त्यामुळे हे जमू शकेल असा विश्‍वास मला वाटू लागला. आमचे उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नीतीन तावडे हे कर्तबगार कार्यकर्ते आहेत याचा मला चांगला अनुभव होता. मी व माझ्या पदाधिकारी मित्रांनी त्यांच्यासह उस्मानाबाद शाखेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राजकीय पुढाऱ्यांवरून संमेलनावर होणारी टीका आपण रोखायचीच, थांबवायचीच असं आपसात बोलून ठरवलं. साहित्य संमेलन घेण्यासाठी गेल्या तीस-पस्तीस वर्षांत निर्माण झालेला राजकीय पुढाऱ्यांचा धोपट मार्ग सोडून उस्मानाबादच्या व उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांवर विश्‍वास टाकून लोकश्रयाचा, लोकवर्गणीचा बिकट मार्ग निवडला आणि नीतीन तावडे व साहित्य परिषदेच्या शाखेचे व स्वागतमंडळातील त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि मित्र यांना प्रेरणा दिली. त्या सर्वांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींशी चांगला संवाद राहील याची काळजी घेतली. आणि गंमत अशी की, कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न करता उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांनी व संस्थांनी साहित्य संमेलनाला आपापल्या परीने मदत केली. ज्यांनी मदत केली नाही त्यांचाही अनादर होणार नाही याची काळजी घेतली. या कामात लोकसत्तेचे उस्मानाबादचे प्रतिनिधी रवींद्र केसकर आणि कोषाध्यक्ष माधव इंगळे यांनी श्री. तावडे यांना चांगले सहकार्य केले.

याचवेळी एक महत्त्वाची गोष्ट घडली. संमेलनाच्या तयारीच्या काळात महाराष्ट्रात सार्वजनिक निवडणुकींचा मोसम होता. कधी नव्हे तो हा मोसम राजकीय अस्थिरतेचा होता. या काळात निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उलथापालथी व पक्षबदल घडले. राजकीय पुढारी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडू लागले. उलटसुलट निर्णय घेऊ लागले. अशा अस्थिरतेच्या काळात कोणत्याही शहाण्या माणसाने संमेलन त्यांच्या हातात दिले नसते. कारण या अस्थिरतेमुळे पुढारी वेळ देऊ शकला नसता. शिवाय कोणत्याही कारणाने पुढारी अस्थिर झाला, यवतमाळसारखे त्याने अंग काढून घेतले की, संमेलनाचेही तीन तेरा वाजले असते. म्हणून मीही तेच केले आणि संमेलनावरचे अनिश्चिततेचे सावट दूर केले; फार तर असेही म्हणता येईल की, त्यांची राजकीय अस्थिरता नकळत आमच्या मांडणीला बळ देऊन गेली.

तुम्ही कसे वागता, कशाला महत्त्व देता, योग्य वेळी प्रसंग पाहून कोणाला महत्त्व देता याला सार्वजनिक कामात फार महत्त्व असतं. आम्ही निरपेक्षपणे संमेलन नगरीला ’संत गोरोबा काकांचं नाव दिलं आणि ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रातल्या कुंभार समाजानं आम्ही न मागताही उत्स्फूर्तपणे संमेलनाला पाच लाख रुपये देणगी दिली. सर्व महाराष्ट्रातून कुंभार समाजातला जाणता वर्ग संमेलनात सहभागी झाला. अगदी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुसलमान समाजानंही संमेलनाला आर्थिक मदत केली. मी शब्द टाकला आणि पिंपरी-चिंचवडच्या डॉ. पी. डी. पाटलांनी एका क्षणात पंधरा लाख रुपये दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातील व शहरातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणाधिकरी, जिल्हाधिकारी, विविध खात्यांचे शासकीय अधिकरी, कर्मचारी, गावागावातील लहान थोर व्यापारी, छोट्या-मोठ्या संस्था, उस्मानाबाद शहरातील नागरिक या सर्वांनी संमेलनाला आपले म्हटले आणि आपापल्या शक्तिनुसार मदत केली म्हणून हे संमेलन लोकांचे झाले; नुसते राजकीय पुढाऱ्यांचे उरले नाही. ह्या सर्वांबद्दलची कृतज्ञता म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांचा आणि बँका व सर्व संस्थांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. पी. डी. पाटील यांचा उद्घाटन समारंभात सन्मानाने व्यासपीठावर बसवून सर्वांसमोर उचित सत्कार केला. काही लोकांना ते रुचले नाही. ज्यांना रुचले नाही त्यांच्याकडे लक्ष द्यावे असे महामंडळाला वाटत नाही. एका दमडीचीही व फुकटच्या शब्दाचीही मदत न करणारांनाच फक्त असे वाटू शकते हे इतक्या वर्षांच्या अनुभवांवरून आम्हाला चांगले ठाऊक झालेले आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

इथे एक मुद्दा मुद्दाम सांगितला पाहिजे तो हा की, जी प्रसारमाध्यमे, राजकीय नेत्यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीमुळे महामंडळावर ‘लाचार’ म्हणून टीका करत होती. त्यांच्यापैकी काही आता ‘मंत्र्यां’ना, पुढाऱ्यांना व्यासपीठावर का बसवले नाही म्हणून उलटी टीका करायला लागली, केली. निदान दोनतीन आजी माजी मंत्र्यांना तरी व्यासपीठावर बसवायला पाहिजे होते असे त्यांचे म्हणणे होते. मी त्या वर्तमानपत्रांची व पत्रकारांची नावेही सांगू शकतो. पण इतरांच्या नजरेत त्यांना कमीपणा आणणे मला योग्य वाटत नाही. तेवढी सभ्यता पाळणे साहित्य महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी माझी जबाबदारी मानतो.

६.

‘राजकीय पुढाऱ्यांचा वावर’ संमेलनातून कमी करणं किंवा मर्यादित करणं हा साहित्य महामंडळाचा व साहित्य संमेलनाचा हेतू नव्हता व नाही. पण भूमिका असल्याशिवाय कोणीही व्यासपीठावरील जागा अडविणे अनाठायी असते हे माझे जुने मत असून साहित्य महामंडळाचीही तीच भूमिका असली पाहिजे. साहित्य संमेलनात नव्या-जुन्या साहित्यावर चर्चा व्हावी, साहित्यातील निरनिराळे प्रवाह ज्यांच्यामुळे निर्माण झाले ते लेखक, त्यांच्या साहित्यकृती, साहित्यातील भले-बुरे, संमेलनाध्यक्ष व त्यांचे भाषण, प्रथितयश लेखकाची मुलाखत, नव्या लेखक-कवींचे स्वागत, त्यांतील कसदार लेखन करणारांच्या विचारांची व लेखनाची दिशा, नव्या वाटा शोधणे, वाचनसंस्कृती, अभिरुची घडवणारे मनोरंजनाचे कार्यक्रम, पुस्तके खरेदी - विक्रीचा पैस, कविसंमेलन (ने) याची नीट रचना करून देणे, संगती लावायला प्रवृत्त करणे ह्या गोष्टी साहित्य संमेलनात होणे अपेक्षित असते, असले पाहिजे. उस्मानाबाद साहित्य संमेलनात सगळीच पारंपरिक मांडणी महामंडळाने नाकारली असे मी म्हणणार नाही; ते शक्यही नसते. पण पारंपरिकता आणि नवे बदल याचा मेळ घालण्याचे काम उस्मानाबाद साहित्य संमेलनाने जरूर केले, हे मला येथे सांगितले पाहिजे. सरावलेला अनुभवी रसिकवर्ग नसूनही आमच्या अनघड रसिकांनी मोठी गर्दी करून आणि मिनिट अन् मिनिट बसून सर्वच कार्यक्रमांना, चर्चांना मोठी दाद दिली; चार कोटी रुपयांच्यावर पुस्तके खरेदी केली; वाचनसंस्कृतीला चालना दिली. महानगरांमधील मराठी समाज मराठीपासून दूर जात आहे, मराठीपासून तुटत आहे असे आजचे चित्र असताना त्याचवेळी निमनागरी व ग्रामीण मराठी समाज मराठीसाठी नवा रसिकवर्ग निर्माण करत आहे, हे या संमेलनाने दाखवून दिले. हे संमेलनाचे यश नाही काय?

या संमेलनानं मला व साहित्य महामंडळाला दोन गोष्टी शिकवल्या. पहिली लोकांवर विश्वास टाकला तर लोकांच्या साहाय्यानं संमेलन करता येतं आणि दुसरं काटेकोर मांडणी केली तर कमी खर्चात नेमकेपणानं व नेटकेपणानं साहित्य संमेलन दर्जेदार होऊ शकतं. उस्मानाबादला माझ्या सहकारी मित्रांनी हे प्रत्यक्ष करून दाखवलं आणि गेल्या तीस-चाळीस वर्षांत परावलंबी होत गेलेलं संमेलन मार खात खात व धडे घेत घेत एक वर्तुळ पूर्ण करून संमेलनाच्या मूळ उद्देशाकडे आलं, आणलं. तीस-पस्तीस वर्षांनंतर लोकवर्गणीच्या बळावर व राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाशिवाय आजच्या दृष्टीने कमी खर्चात झालेलं हे संमेलन आहे. आयोजकांनी व इतर सर्वांनी ठरवले, तर या मार्गानेही संमेलन (ने) होऊ शकते / शकतात, उस्मानाबाद संमेलनाने वाङ्मयीन कार्यकर्त्यांसाठी हा धडा घालून दिला असं खात्रीनं म्हणता येतं.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Sada Dumbre

Mon , 02 November 2020

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले पाटील यांनी उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घडलेल्या व विशिष्ट हेतुने प्रेरित होऊन जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या घटना व घडामोडींकडे पाहण्याची अंतर्दृष्टि या लेखाद्वारे दिली.समकालीन महाराष्ट्रातील काही अनिष्ट प्रवृत्तींचे दर्शन त्यामुळे झाले.साहित्य संमेलनांच्या इतिहासात त्याची नोंद घेतली जाईल.वास्तव नजरेआड करता येणार नाही.मुख्य प्रवाहातील मुद्रित माध्यमांनीही या लेखाची दखल घेतली पाहिजे. अक्षरनामाने ती घेतली, त्याबद्दल धन्यवाद. सदा डुम्बरे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा