खांडेकरांच्या ‘ययाती’चे तीन नवे वाचक आणि आपल्या एकंदर वाचनाभिरुचीची इयत्ता
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • खांडेकरांच्या ‘ययाती’चे मुखपृष्ठ आणि तिच्याविषयी दै. लोकसत्तामध्ये आलेली पत्रे
  • Fri , 23 October 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो वि. स. खांडेकर V.S. Khandekar ययाति Yayati

१.

महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा झाला. त्यानिमित्ताने या दिवशी अनेक वेबिनार झाले. वाचनसंस्कृती, ग्रंथसंस्कृती, पुस्तके, वाचक, प्रकाशनव्यवहार यांवर भाषणे झाली. पण या वेबिनारपेक्षा महाराष्ट्राच्या वाचनाभिरुचीचे खरे दर्शन दै. ‘लोकसत्ता’मध्ये अलीकडेच प्रकाशित झालेल्या तीन पत्रांमधून घडते, असेच म्हणावे लागेल.

ही तिन्ही पत्रे वि. स. खांडेकरांच्या ‘ययाति’ या मराठीतील एका अतिशय प्रसिद्ध अशा कादंबरीविषयीची आहेत. १० ऑक्टोबर २०२० रोजी त्यातले पहिले पत्र प्रसिद्ध झाले. ते असे -

“खांडेकरांच्या ‘ययाति’बद्दल काही प्रश्न…

एकदा पुन्हा ‘ययाति’ वाचण्याचा योग आला आणि वि. स. खांडेकरांच्या लालित्यपूर्ण निरूपणाचा आस्वाद घेता आला. या वेळेस मात्र वाचताना काही प्रश्न उभे राहिले :

खांडेकरांनी प्रारंभीच ययातिची ओळख हस्तिनापूरचे सम्राट नहुषचे पुत्र अशी करून दिली आहे. देवयानी ही राजा ययातिला रथात बसवून ‘यमुनातीरी’ फिरायला म्हणून घेऊन जाते, असा उल्लेख चार-पाच ठिकाणी आला आहे. ययातिच्या कामपिपासेची बळी एक युवतीही आपला जीव जवळच्या यमुनेतच देते! कादंबरीत ययातिला देवयानीपासून यदु हा एक आणि शर्मिष्ठेपासून एक पुरू, या दोनच मुलांचा जन्म दाखवला आहे.

या संदर्भातील पहिली वस्तुस्थिती अशी की, ययातिच्या काळात हस्तिनापूर हे अस्तित्वातच नव्हते. त्याची स्थापना नहुषच्या नंतरच्या २४व्या पिढीत झालेल्या राजा हस्तीने केली होती! ययातिचे पणजोबा पुरुरवा हे प्रयाग राज्याचे राजा म्हणून गंगा-यमुनेच्या संगमाकाठी, गंगेच्या पूर्व अंगाला असलेल्या प्रतिष्ठानपूर या राजधानीच्या ठिकाणी राहात. (आज त्या ठिकाणी भग्नावशेषी ‘झूँसी’ नावाचे गाव आहे, जे संगमापासून चार-पाच कि.मी. अंतरावर आहे, मध्ये गंगेचे अफाट पात्र आहे.)

माझी पहिली शंका अशी की, पौराणिक संदर्भ सुस्पष्ट असताना खांडेकरांनी त्या काळी अस्तित्वात नसलेल्या हस्तिनापूरला ययातिची राजधानी, तीही यमुनेकाठी का म्हणून दाखवली असेल? हस्तिनापूरपासून यमुना १८० कि.मी. लांब आहे, तर गंगा फक्त ११ कि.मी.वर आहे! दुसरे असे की, मूळ आख्यानाप्रमाणे ययातिला देवयानीपासून दोन आणि शर्मिष्ठेपासून तीन मुलगे होतात, त्यातही पुरु सर्वांत धाकटा असतो, मग कादंबरीत फक्त यदू आणि पुरुचाच उल्लेख का?

सुज्ञ विद्वज्जनांकडून माझ्या जिज्ञासेचे समाधान अपेक्षित आहे.

– डॉ. शिवशंकर मिश्रा (प्रोफेसर एमेरिटस), औरंगाबाद”

या पत्राला आठवडाभर कुणीही उत्तर दिलं नाही. खरं तर कुणीतरी द्यायला हवं होतं. पण ते असो. पहिली गोष्ट म्हणजे खांडेकरांची ‘ययाति’ ही कादंबरी आहे, तो ययातिचा इतिहास नव्हे की, त्यावरील संशोधनपर ग्रंथ नव्हे. दुसरी गोष्ट ‘ययाति’च्या मलपृष्ठावर स्पष्टपणे लिहिलेले आहे की – “या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही (खरं तर हा शब्द ‘आहे’ असा असावा!). एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी (म्हणजे खांडेकरांनी) या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.” म्हणजे महाभारतात एक उपकथानक म्हणून आलेली ययातिची कथा आणि खांडेकरांच्या ‘ययाति’ या कादंबरीचा फारसा काही संबंध नाही. त्यामुळे उघड आहे की, खांडेकरांनी त्यांना हवी ती पात्रे आणि स्थळे निवडून ही कादंबरी लिहिली आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

‘ययाति’ ही मुळात एका पौराणिक उपकथेचा आधार घेत लिहिलेली एक प्रतीकात्मक कादंबरी आहे. कारण खांडेकरांनी ययातिची सगळी कथा काही या कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेली नाही. त्यांनी ययातिचे जे भोगवादी चित्रण केले आहे, तेही अर्धसत्य आहे. पण खांडेकरांना जे सांगायचे आहे, त्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी ययातिला घेतला आहे, किंबहुना त्याच्या आयुष्यातला काही काळ आणि बाकीची काही पात्रे घेतली आहेत. कुठलाही कादंबरीकार अगदी वास्तवात घडलेल्या घटनेवर कादंबरी लिहितो तेव्हाही तो अशीच - ज्याला सोयीस्कर म्हणता येईल - अशीच निवड करत असतो. त्यामुळे मिश्रा यांचे हस्तिनापूर हे नाव का दिले, ती यमुनाकाठी आहे असे का म्हटले आणि शर्मिष्ठेच्या तीनपैकी दोनच मुलांचा उल्लेख का केला, हे तिन्ही प्रश्न गैरलागू आहेत.

पण १६ ऑक्टोबर रोजी ‘ ‘ययाती’ ही वि. स. खांडेकरांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी कादंबरी…’ या शीर्षकाचे प्रकाश विष्णू पानसे, पुणे यांचे पत्र ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले आणि मिश्रा यांनी उपस्थित केलेल्या तीन प्रश्नांना वेगळीच कलाटणी मिळाली. ते पत्र असं -

‘ ‘लोकमानस’मध्ये (१० ऑक्टो.) ‘खांडेकरांच्या ‘ययाति’बद्दल काही प्रश्न..’ हे पत्र वाचले आणि वि. स. खांडेकरांच्या ‘ययाती’ कादंबरीतील ययाती आणि महाभारतातील ययाती यांवर प्रा. नरहर कुरुंदकर यांनी ‘व्यासांचे शिल्प’ या पुस्तकात लिहिलेल्या लेखाची आठवण झाली. त्यात कुरुंदकर लिहितात की, ‘ययातीवर लिहावे असे वाटले ते भाऊसाहेब खांडेकर यांची ‘ययाती’ कादंबरी वाचून. ही कादंबरी लिहिताना खांडेकरांच्या डोक्यात पुराणकथा नाही, तर विसाव्या शतकातील माणसांची दु:खे आहेत. त्यात त्यांना रस आहे; पुराणकथा निमित्तमात्र आहे. खांडेकर हे स्वत: समाजवादी लेखक! या सगळ्या समाजवादी मंडळींची एक तात्त्विक भूमिका असते. ती भूमिका अशी की- मानवी जीवनात आपण शरीराला संपूर्णपणे महत्त्व द्यायला लागलो व शरीराच्या गरजा पूर्ण करणे एवढेच मानवी जीवनाचे शेवटचे साध्य आहे असे मानायला लागलो, तर तेवढ्याने माणसाचे जीवन सुखी होऊ शकत नाही! खांडेकरांचे मन हे गांधीवादाने प्रभावित झालेल्या एका समाजवाद्याचे मन आहे, हे जर लक्षात ठेवले तर खांडेकरांच्या ‘ययाती’ या कादंबरीतला ‘कच’ हा समाजवादी विचारसरणीचा, गांधीवादाने प्रभावित झालेला ऋषी आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून खांडेकरांच्या डोळ्यांसमोर जो ययाती आहे, तो भांडवलशाहीच्या तत्त्वज्ञानामुळे दु:खाकडे जाणारा आधुनिक माणूस आहे. या दु:खावर उतारा म्हणून धर्माच्या मार्गाने जाणारा दुसरा माणूस हा यती म्हणून आहे. या दोघांचा पराभव आणि कचाचा विजय हे खांडेकरांच्या जीवनाचे तत्वज्ञान आहे.’ म्हणजे खांडेकरांची ‘ययाती’ ही खांडेकरांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी कादंबरी आहे; ती पुराणातील कथा सांगणारी नाही. कुरुंदकर लिहितात, ‘सबंध भारतीय परंपरेत एखाद्या दैवतकथेचा क्रमाने जो ऱ्हास होतो, त्याचे एक उदाहरण म्हणून ययाति आहे.’

हे पत्र लेखकाने लिहिले आहे तसे छापले आहे की, ते संपादित स्वरूपात छापले आहे, हे कळायला मार्ग नाही. पण जो मजकूर छापला गेला आहे. तो मात्र गडबडीचा आहे. पत्रलेखकाने कुरुंदकरांचा मजकूर त्यांच्या ‘व्यासांचे शिल्प’ या पुस्तकातून घेतला आहे. माझ्याकडे ते नाही, पण कुरुंदकरांचा ‘ययाती’ हा लेख सर्वप्रथम ‘त्रिवेणी’ या १५ जुलै १९८६ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातही आहे, ते आहे. पत्रलेखकाने उल्लेख केलेले ‘‘ययातीवर लिहावे असे वाटले ते भाऊसाहेब खांडेकर यांची ‘ययाती’ कादंबरी वाचून.’’ हे पहिलेच विधान कुरुंदकरांच्या लेखात नाही. त्यानंतरची ‘‘ही कादंबरी लिहिताना खांडेकरांच्या डोक्यात पुराणकथा नाही, तर विसाव्या शतकातील माणसांची दु:खे आहेत. त्यात त्यांना रस आहे; पुराणकथा निमित्तमात्र आहे. खांडेकर हे स्वत: समाजवादी लेखक! या सगळ्या समाजवादी मंडळींची एक तात्त्विक भूमिका असते…’’ ही विधाने कुरुंदकरांच्या लेखाच्या सुरुवातीच्या तिसऱ्या परिच्छेदाच्या मध्ये सुरू होतात. त्यापुढे ‘‘पण ती प्राय: त्यांनाही नक्की माहीत नसते. समाजवादी मंडळींनी आपण समाजवादी आहोत एवढेच जाणलेले असते. समाजवादाची तात्त्विक भूमिका काय, हे त्यांनी जाणलेले नसते.’’ ही विधाने गाळून ‘‘ती भूमिका अशी की- मानवी जीवनात आपण शरीराला संपूर्णपणे महत्त्व द्यायला लागलो व शरीराच्या गरजा पूर्ण करणे एवढेच मानवी जीवनाचे शेवटचे साध्य आहे असे मानायला लागलो, तर तेवढ्याने माणसाचे जीवन सुखी होऊ शकत नाही!’’ हा पुढचा मजकूर आधीच्या मजकुराशी जोडला गेला आहे. यानंतर तब्बल २२ ओळींचा मजकूर गाळून ‘‘खांडेकरांचे मन हे गांधीवादाने प्रभावित झालेल्या एका समाजवाद्याचे मन आहे, हे जर लक्षात ठेवले तर (इथली ‘सानेगुरुजींच्या ‘आस्तिक’ कादंबरीतला आस्तिक हा जसा दुसरा गांधी दिसतो, तसा’ ही ओळ गाळली गेलीय.) खांडेकरांच्या ‘ययाती’ या कादंबरीतला ‘कच’ हा समाजवादी विचारसरणीचा, गांधीवादाने प्रभावित झालेला ऋषी आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून खांडेकरांच्या डोळ्यांसमोर जो ययाती आहे, तो भांडवलशाहीच्या तत्त्वज्ञानामुळे दु:खाकडे जाणारा आधुनिक माणूस आहे. या दु:खावर उतारा म्हणून धर्माच्या मार्गाने जाणारा दुसरा माणूस हा यती म्हणून आहे. या दोघांचा पराभव आणि कचाचा विजय हे खांडेकरांच्या जीवनाचे तत्वज्ञान आहे,’’ हा मजकूर जोडला गेला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्यानंतर पत्रलेखकाने दोन ओळी लिहून कुरुंदकरांची जे एक विधान दिले आहेत, ते त्यांच्या लेखाच्या शेवटच्या शेवटून दुसऱ्या परिच्छेदातील आहेत. ‘सबंध भारतीय परंपरेत एखाद्या दैवतकथेचा जो ऱ्हास होतो, त्याचे एक उदाहरण म्हणून ययाति आहे.’ या विधानातही दैवतकथेचा नंतरचा ‘क्रमाने’ हा शब्द गाळला गेला आहे. शिवाय या विधानाआधी ‘‘भारतीय संस्कृतीतील दैवतकथांचा अभ्यास करीत असताना मिथ्स रिटेंड, मिथ्स क्रिएटेड, मिथ्स एलेव्हेटेड, मिथ्स डिसटॉर्टेड – मिथ्स कायम राखणे, निर्माण करणे, त्यांचे उदात्तीकरण वा विकृतीकरण या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल.’’ हे विधान आहे.

२.

कुरुंदकरांचा मूळ लेख वीस पानांचा आहे. आणि ते खांडेकरांच्या ययातिबद्दल नाही. मुळात हा लेख म्हणजे त्यांच्या एका भाषणाचे शब्दरूप आहे. या लेखाची सुरुवात कुरुंदकर अलीकडे ययाति लोकांच्या आकर्षणाचा विषय का ठरला आहे, या विधानापासून करून तो काही खांडेकरांच्या ययातिमुळे झालेला नसून शिरवाडकरांचे ‘ययाती आणि देवयानी’, कवी वा. रा. कांत आणि मंगेश पाडगावकरांचे ययातीवरील दीर्घकाव्य, तसेच महाराष्ट्राबाहेरील गिरीश कार्नाड यांच्या ‘ययाती’ या नाटकाचा उल्लेख करून हा कविता, नाटक, कादंबरी यांचा विषय बनत चालला आहे, मूळ ययातीची कथा एकच असली तरी प्रत्येक जण ती वेगवेगळ्या प्रकारे मांडतो आहे, हे कुरुंदकरांनी सुरुवातीच्या दोन-तीन परिच्छेदांत सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी खांडेकरांच्या डोळ्यासमोर जो ययाती आहे तो ‘भांडवलशाहीच्या तत्त्वज्ञानामुळे दु:खाकडे जाणारा आधुनिक माणूस आहे’ अशी मांडणी करत ती खांडेकरांच्याच गांधीवादी समाजवादाचे तत्त्वज्ञान कसे मांडते, हे सांगितले आहे. त्यानंतर कुरुंदकरांनी मूळ महाभारतात ययातीची कथा कशी पाच-सहा ठिकाणी आलेली आहे, भीष्माने देखील कसा ययातीचा आपल्या कुळातला पुण्यवान सम्राट म्हणून युधिष्ठिराकडे गौरव केला आहे, ऋग्वेदातही सुक्तकार ऋषी म्हणून ययातीचा उल्लेख आहे, याची हकिकत सांगितली आहे.

महाभारत हा भारतातील एक प्राचीन ग्रंथ. त्यामुळे त्यात कालौघात बरेच प्रक्षेपही झाले. यती लहाणपणीच जंगलात निघून गेला, ही खांडेकरांनी सांगितलेली कथा मूळ महाभारतात नाही, तो प्रक्षेप आहे असे कुरुंदकरांनी म्हटले आहे. ययातीने एका राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले, राजा या नात्याने प्रजेप्रती असलेले कर्तव्य पार पाडून ययातीने ‘अर्थभोग’ पूर्ण केला, अनेकानेक यज्ञ रचून, यज्ञांच्या ऋचा रचून, यज्ञक्रिया करून ‘धर्मभोग’ पूर्ण केला. आणि आपल्या दोन पत्नींबरोबर सुखाने संसार करून ‘कामभोग’ पूर्ण केला. म्हणजे मूळ ययातीची कथा खांडेकर, शिरवाडकर, कांत, पाडगावकर, कार्नाड सांगतात त्यापेक्षा वेगळी आहे. पण प्रत्येकाने त्यातला हवा तेवढा भाग उचलून आपल्या साहित्यकृती बेतल्या आहेत. मुलगा पुरुकडून तारुण्य उसने घेतल्यामुळे खांडेकरांनी ययातीला ‘भोगवादी’ करून टाकले आहे. पण तसे करताना खांडेकरांसारख्या चारित्र्यवान लेखकाची कशी पंचाईत झाली, हेही कुरुंदकरांनी सांगितले आहे. त्यांनी लिहिलंय ‘लंपट म्हणजे काय हेही त्यांना कळत नव्हते.’ पुढे कुरुंदकर म्हणतात की, स्त्रियांच्या संख्येवरून माणूस लंपट ठरत नाही. पण कुरुंदकरांच्या म्हणण्याप्रमाणे खांडेकरांनी चुकीचे निष्कर्ष काढले. त्यानंतर ते मिथ्स कशा तयार होतात, याविषयी विवेचन करून लेख संपवतात.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : मारुती चित्तमपल्लींचा काहीसा ‘सुशांतसिंग राजपूत’ आणि नागपूरकरांची ‘रिया चक्रवर्ती’ तर केली जात नाही ना?

..................................................................................................................................................................

म्हणजे पानसे यांनी कुरुंदकरांच्या लेखातली जी अवतरणे दिली आहेत, त्यापेक्षा कुरुंदकरांच्या लेखाचा आवाका बराच मोठा आहे. तो खांडेकरांच्या, त्यांच्या विचारसरणीच्या मर्यादाही सांगतो. त्यामुळे त्यांचा निष्कर्ष खोडून काढायचा असेल तर कुरुंदकरांचा मूळ लेख, मूळ महाभारत वाचायला हवे. पण यापैकी काहीही न करता ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कुरुंदकरांनाच ‘उथळ’ ठरवणारे पत्र लिहिले. ते १८ ऑक्टोबर रोजी ‘विश्लेषक टिपण’ म्हणून लेखासारखे छापले गेले असले तरी मुणगेकरांनी ते पत्र म्हणूनच लिहिले असावे. कारण त्याची शब्दसंख्या जेमतेम ४६० इतकी कमी आहे. ‘आजचे ययाति…’ या नावाने प्रकाशित झालेले ते पत्र असे -

“ ‘खांडेकरांच्या ‘ययाति’बद्दल काही प्रश्न...’ हे वाचकपत्र (‘लोकमानस’, १० ऑक्टोबर) वाचले. त्यानंतर १६ ऑक्टोबरच्या अंकात ‘ ‘ययाति’ ही वि. स. खांडेकरांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी कादंबरी…’ हे पत्रही वाचले. त्यातील मुद्द्यांबाबत…

पहिल्या पत्रात मांडलेले मुद्दे असे : हस्तिनापूर गंगेपासून ११ कि.मी., तर यमुनेपासून १८० कि.मी. लांब असताना आणि त्यातही ‘त्या काळी’ मुळात हस्तिनापूर अस्तित्वात नसताना ती ययातिची राजधानी असल्याचे खांडेकरांनी का दाखवले? ययातिपासून देवयानीला दोन व शर्मिष्ठेला तीन मुलगे असताना कादंबरीत फक्त यदु आणि पुरुचाच उल्लेख का?

‘ययाति’च्या संदर्भात हे मुद्दे गैरलागू आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी की, हस्तिनापूर हे उत्तर प्रदेशमधील मीरतच्या ईशान्येकडे साधारण ३५ कि.मी. दूर गंगेच्या काठावर आहे. भरत राजाच्या पाचव्या पिढीतील ‘हस्ती’ या राजाने ते शहर वसवले, त्यावरून हस्तिनापूर हे नाव पडले. त्यामुळे तो खांडेकरांचा दोष मानला, तरी हस्तिनापूर नेमके कुठे आहे, हे सांगणे ‘ययाति’चा उद्देश नाही. दुसरे, देवयानीला ययातिपासून दोन मुलगे होते- यदु आणि तुर्वसु. खांडेकरांनी फक्त यदुचा उल्लेख केला. यदु हा ‘यादव’ ‘घराण्या’चा जनक मानला जातो. बरे, त्यावरून काय सिद्ध होते? पुरुच्या बाबतीत सांगायचे तर, त्याचा कादंबरीत नेमका काय ‘रोल’ आहे, हे खांडेकरांनी दाखवले आहे.

दुसऱ्या पत्रलेखकाने नरहर कुरुंदकरांचे ‘ययाति’चे विवेचन (‘भाष्य’ फार मोठा शब्द) दिले आहे. ते तर हास्यास्पद आहे. मराठी साहित्यात- आपण खांडेकर यांच्यावर टीका केली नाही तर आपली साहित्यसेवा अपुरी राहील, असे समजले गेल्यामुळे जितकी त्यांच्यावर, विशेषत: ‘ययाति’वर टीका झाली, तितकी अन्य कुणा साहित्यिकावर झाली नसावी. परंतु कुरुंदकरांचे विवेचन वाचून खांडेकरांचे ‘टीकाकार’ परवडले, पण कुरुंदकर यांच्यासारखे ‘समर्थक’ नको, असे खेदाने म्हणावे लागते. महाभारतातील एका पौराणिक उपकथेवर आधारित ‘ययाति’चा मुख्य आशय माणसाचा (येथे पुरुषाचा) अतृप्त भोगवाद कोणत्या थराला जाऊ शकतो, हे दाखवणे आहे. पुरेपूर लैंगिक उपभोग घेतल्यानंतरही उपभोगाची इच्छा अतृप्त राहिल्यामुळे ययाति स्वत:च्या मुलाचे- पुरुचे तारुण्य घेतो, हा ययातिच्या विकृतीचा कळस आहे. शेवटी उपरती होऊन म्हणा, उ:शापाच्या निमित्ताने तो पुरुला त्याचे तारुण्य परत करतो. याचे दुसरे टोक म्हणून सर्व विकारांवर विजय मिळवण्याच्या नादात ‘यति’ ‘विकृत’ होतो.

‘ययाति’ या कादंबरीचा आणि समाजवादाचा सुतराम संबंध नाही. माणसाच्या भौतिक गरजा पूर्ण करणे, हे समाजवादाचे एक सर्वात प्रमुख उद्दिष्ट आहे. कार्ल मार्क्‍सच्या भौतिकवादाचा स्वीकार केल्याशिवाय समाजवादाचा विचार असंभव आहे. आता समाजवादही कोसळला आहे. ‘गांधीयन समाजवाद’ अशी कोणतीही वैचारिक व्यवस्था नाही. भारतातील समाजवाद्यांवर तथाकथित ‘गांधीयन समाजवादा’चा मोठा प्रभाव होता. त्याच अर्थाने खांडेकर ‘गांधीयन समाजवादी’ होते. एकदा ‘गांधीयन समाजवादा’चा स्वीकार केल्यानंतर खांडेकरांच्या जीवनाचे वेगळे तत्त्वज्ञान कोणते? त्यामुळे ‘‘ययाति’ ही खांडेकरांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी कादंबरी’ हे कुरुंदकरांचे विवेचन उथळ आहे.

आजचा माणूस अधिकाधिक उपभोगवादी होत चालला आहे. वाढता ‘चंगळवाद’, शोषण आणि त्यातही स्त्रियांचे लैंगिक शोषण हे त्याचे आजचे हिणकस व विकृत स्वरूप आहे. ययाति हा त्याचा प्रतिनिधी आहे. भारतात २०१९ मध्ये स्त्रियांवर चार लाख पाच हजार ८६१ अत्याचाराच्या घटना घडल्या आणि प्रत्येक दिवशी ८७ स्त्रियांवर बलात्कार झाले. हे बलात्कार करणारे सर्व ‘आजचे ययाति’ आहेत. शेवटी प्रश्न कचाचा. कच हा आजच्या मानवी जीवनात झपाट्याने हरवत चाललेल्या विवेकवादाचा प्रतिनिधी आहे. म्हणून माझ्या मते, कच हा ‘ययाति’ कादंबरीचा ‘प्रतिनायक’ आहे. केवळ ‘ययाति’च नव्हे, तर मानवतावाद आणि त्यात अनुस्यूत असलेला विवेकवाद ही खांडेकरांच्या साहित्यनिर्मितीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.”

मुणगेकरांचे हे पत्र वाचल्यावर मराठी फेसबुकपोस्टपंडितांची आठवण येते. तेही असेच तावातावाने प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चित करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या पत्रलेखकाने उपस्थित केलेले प्रश्न अतिशय निरर्थक आहेत. त्यातही ते कुणी सामान्य गृहस्थ नसून ‘प्रोफेसर एमेरिटस’ आहेत. म्हणजे वयाची किमान तीसेक वर्षं ज्या व्यक्तीने अध्यापन, वाचन, लेखन यांत घालवली आहेत, त्या व्यक्तीला कादंबरी कशी वाचावी, तिच्यात काय शोधू नये, हे आता ‘प्रोफेसर एमेरिटस’ या पदावर पोहचल्यावरही समजायला तयार नाही. त्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंना काहीही वाटत नाही. ते त्यांचे प्रश्न फक्त गैरलागू ठरवून खांडेकरांची बाजू घेतात.

मात्र दुसऱ्या पत्रलेखकाच्या पत्रात नरहर कुरुंदकर यांचे नाव आणि त्यांचा ययातीविषयीचा अन्वयार्थ दिसता क्षणीच मुणगेकरांचा तिळपापड होतो. ते लगेच कमरेला लटकावलेली समशेर उपसून आधी ‘ययाती’च्या टीकाकारांवर वार करतात. एक वार करून झाल्यावरच दम लागला असावा. ते लगेच भानावर येत, ‘ययाति’चे टीकाकार परवडले म्हणत दुसरा बॉम्ब कुरुंदकरांच्या दिशेने भिरकावतात. का, तर ते ‘ययाति’चे समर्थक म्हणे! कशावरून समर्थक? तर दुसऱ्या पत्रलेखकाने त्यांची काही विधाने त्याच्या पत्रात दिली आहेत त्यावरून. त्यासाठी ना त्यांनी कुरुंदकरांचा मूळ लेख वाचला, ना ययातीची मूळ कथा वाचली. तरीही ते ‘ययाति’ला विकृतीचा कळस ठरवतात. ‘ययाति’ या कादंबरीचा आणि समाजवादाचा सुतराम संबंध नाही, असे सांगत कुरुंदकरांचे विवेचन उथळ ठरवून मोकळे होतात.

पण खरा षटकार मुणगेकरांनी पुढच्या परिच्छेदात मारला आहे. तो असा – “आजचा माणूस अधिकाधिक उपभोगवादी होत चालला आहे. वाढता ‘चंगळवाद’, शोषण आणि त्यातही स्त्रियांचे लैंगिक शोषण हे त्याचे आजचे हिणकस व विकृत स्वरूप आहे. ययाति हा त्याचा प्रतिनिधी आहे. भारतात २०१९ मध्ये स्त्रियांवर चार लाख पाच हजार ८६१ अत्याचाराच्या घटना घडल्या आणि प्रत्येक दिवशी ८७ स्त्रियांवर बलात्कार झाले. हे बलात्कार करणारे सर्व ‘आजचे ययाति’ आहेत. शेवटी प्रश्न कचाचा. कच हा आजच्या मानवी जीवनात झपाट्याने हरवत चाललेल्या विवेकवादाचा प्रतिनिधी आहे. म्हणून माझ्या मते, कच हा ‘ययाति’ कादंबरीचा ‘प्रतिनायक’ आहे. केवळ ‘ययाति’च नव्हे, तर मानवतावाद आणि त्यात अनुस्यूत असलेला विवेकवाद ही खांडेकरांच्या साहित्यनिर्मितीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.”

..................................................................................................................................................................

हेही वाचा : सोलापूरकरांनो, मारुती चितमपल्लींचा ‘नारायण सुर्वे’ करू नका!

..................................................................................................................................................................

ज्या न्यायाने मुणगेकर कुरुंदकरांचे विवेचन उथळ ठरवतात, त्याच न्यायाने त्यांचे हे विवेचनही उथळ ठरते. कुरुंदकरांनी तर ययातिची बदनामी केलेली नाही, पण मुणगेकर तेही करायला कमी करत नाहीत. मूळ महाभारतातल्या ययातीने कुणा स्त्रीवर बलात्कार केल्याचा उल्लेख नाही, त्याने कुणा स्त्रीचे लैंगिक शोषण केल्याचाही पुरावा नाही. तरीही मुणगेकर या दोन्ही गोष्टी करणाऱ्या पुरुषांना ‘आजचे ययाति’ म्हणतात! आणि कचाला ‘ययाति’चा ‘प्रतिनायक’, ‘आजच्या मानवी जीवनात झपाट्याने हरवत चाललेल्या विवेकवादाचा प्रतिनिधी’ ठरवून मोकळे होतात. शेवटी ‘मानवतावाद’ आणि ‘विवेकवाद’ ही खांडेकरांच्या एकंदरच साहित्यनिर्मितीची वैशिष्ट्ये असल्याचे सांगतात. मुणगेकरांचे हे निरीक्षण अतिशय बाळबोध आहे. कारण मराठीतलाच काय पण जगातला कुठलाही लेखक ‘मानवतावाद’ आणि ‘विवेकवाद’ या मूल्यांचीच पाठराखण करतो किंवा या मूल्यांसाठीच लिहितो. ‘मानवतावादविरोधी’ आणि ‘विवेकवादविरोधी’ असा लेखकांचा वर्ग कधीही अस्तित्वात नव्हता, नाही, नसेल.

३.

मुणगेकर हे विचाराने डावे असलेले अर्थतज्ज्ञ. त्यात सध्या ते काँग्रेसवासी आहेत. त्यामुळे उपभोगवादी, चंगळवादी, शोषण हे शब्द त्यांच्या लेखनात येणं तसं अपरिहार्यच. पण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाबाबत बोलण्यासाठी त्यांना थेट ‘ययाति’चा आधार घ्यायला लागतो, हे कशाचे लक्षण आहे? काँग्रेसचा खासदार म्हणून त्यांनी याबाबत एखादा लेख लिहिला तर तो मराठी वर्तमानपत्रांत छापून येणार नाही याचे? कि आला तर त्याचे प्रतिवाद करणारे चार लेख विरुद्ध बाजूने लिहिले जातील या भीतीचे? ‘मानवतावाद’ आणि ‘विवेकवाद’ या गोष्टींचे महत्त्व सांगण्यासाठी त्या मुणगेकरांना खांडेकरांच्या साहित्याशी जोडाव्याशा वाटणे, हा त्यांचा नाईलाज आहे की अगतिकता?

असो. मूळ मुद्द्याकडे येऊ. कुरुंदकरांचे विवेचन खोडून काढत मुणगेकरांनी जे विवेचन केले आहे, ते तरी कुणाला मान्य होईल? आणि का मान्य व्हावे? कारण साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रात अंतिम विवेचन किंवा अंतिम निष्कर्ष असा काही प्रकार नसतो. समीक्षक आपापल्या पद्धतीने कथा-कविता-कादंबरीची समीक्षा करतात. एखाद्या समीक्षकाने लावलेला अन्वयार्थ मूळ लेखकाच्या अन्वयार्थापेक्षा उलटाही असू शकतो.

खांडेकरांचेच उदाहरण घेऊ. त्यांनी कुसुमाग्रजांच्या पहिल्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा त्यांच्या पद्धतीने अर्थ लावून विश्लेषण केले आहे. नंतर जेव्हा खांडेकरांनी कुसुमाग्रजांना त्या अर्थांबाबत विचारले तेव्हा कुसुमाग्रजांनी त्यांच्या मनात असलेला त्या कवितांचा वेगळा अर्थ त्यांना सांगितला.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

विजया राजाध्यक्ष यांनी मर्ढेकरांच्या कवितांचा जो अन्वयार्थ लावला, त्याच्यापेक्षा पूर्णपणे उलटा अन्वयार्थ म. वा. धोंड यांनी लावला आहे. त्यामुळे साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रात इतरांची जी मते सयुक्तिक वाटत नाहीत, ती सप्रमाण खोडून काढावी लागतात, हा पूर्वपक्ष असतो; तर इतरांना मान्य होईल अशी मते संदर्भांसह नोंदवावी लागतात, हा उत्तरपक्ष असतो. इतरांवर शेरेबाजी करून कुणी आपली मतं ग्राह्य धरत नाही. पण बहुधा याची कल्पना मुणगेकरांना नसावी.

४.

थोडक्यात, खांडेकरांच्या ‘ययाति’ कादंबरीविषयीची ही तीन पत्रं काय सांगतात, कशाचं प्रतिनिधित्व करतात?

ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना, नव्या सहकाऱ्यांना, कुटुंबीयांना, मित्रांना कादंबरी कशी वाचावी, कथा कशी वाचावी, कविता कशी वाचावी, साहित्य-समीक्षा कशी वाचावी, मुळात वाचन कसे करावे, का करावे, याबाबतीत मार्गदर्शन करण्याची गरज आहे, त्यांच्याच मनातला ‘बाळबोध’ गोंधळ अजून संपायला तयार नाही. दुसरीकडे मुणगेकरांसारखे सन्माननीय. जो त्यांचा विषय नाही, त्यात ते इतरांना मोडीत काढून स्वत:ला सोयीचे असे अन्वयार्थ लावण्याचे ‘उद्योग’ करत आहेत; तर तिसरीकडे पानसे यांच्यासारखे पत्रलेखक. जे मूळ मुद्दा काय आहे, हे नीट समजून न घेताच विषय कसा भरकटेल असा काहीतरी तपशील गोळा करून आणतात. तिघांनीही ‘तारतम्या’ला तिलांजली दिलीय.

ही आपल्या एकंदर वाचनाभिरुचीची इयत्ता सांगणारी प्रातिनिधिक उदाहरणे आहेत!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Mohit Patil

Fri , 30 April 2021

मागील आठवड्यात ययाती ही कादंबरी वाचली. लेखक वि. स. खांडेकर यांनी प्रत्येक प्रसंगाचे अतिशय सुंदर आणि सुरेख वर्णन केले आहे. उठल्या सुटल्या शरीराची पूजा करून इंद्रियसुख हेच खरे सुख आहे असे समजणाऱ्या मानवाला ययाती राजाचा प्रसंग नक्की लक्षात ठेवायला हवा. धन्यवाद उत्कृष्ट मराठी कादंबरी यादी


Suhas Bhanage

Sat , 24 October 2020

तीन ही बातम्या वाचलेल्या असल्यामुळे लेख समजायला सोपा गेला. फारच सुंदर लेख. एका चांगल्या लेखा बद्दल धन्यवाद.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......