तुम्ही काही म्हणा, जोपर्यंत लिहावंसं वाटतंय, तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे!
ग्रंथनामा - झलक
अनिल अवचट
  • ‘माझ्या लिखाणाची गोष्ट’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 26 August 2020
  • ग्रंथनामा झलक अनिल अवचट Anil Awachat माझ्या लिखाणाची गोष्ट Mazya Likhanachi Goshta

अनिल अवचट उर्फ बाबाचं ‘माझ्या लिखाणाची गोष्ट’ हे नवंकोरं पुस्तकं काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालं आहे.  आज बाबाचा ७६वा वाढदिवस. त्यानिमित्ताने समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या त्याच्या ‘माझ्या लिखाणाची गोष्ट’ या पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

माझा स्वभाव असा विचित्र की, मनापासून वाटतं तेच करणार. जिथे मन रमत नाही, तिथून हळूच सटकणार. फायदा की तोटा याचा विचार न करता. मेडिकलला शेवटच्या वर्षी जाणवलं, आपण डॉक्टर व्हायच्या स्वभावाचे नाही आहोत. मी अर्ध्यातूनच कॉलेज सोडायला निघालो होतो. पण सुनंदा म्हणाली, “तू एमबीबीएस पूर्ण कर. मग काय वाटेल ते कर.” तिने पैसे मिळवायची जबाबदारी घेतली. मला मोकळं रान! माझं सामाजिक काम वगैरे नंतर सुरू झालं. आधी चित्रं काढायचो. तेव्हा आमचं असं ठरलं की, सुनंदा मला स्टुडिओ करून देणार. मी मनसोक्त चित्रं काढत बसायचं. पण पुढे सामाजिक कामात गुंतलो. मग ठरवलं, आपण पूर्णवेळ सामाजिक कामच करायचं. जोरात मोर्चे, गेट मीटिंगा, घोषणा; पण त्यातही मन रमेना. मग हमाल पंचायत या कामगार संघटनेमध्ये थोडाफार भाग घेऊ लागलो. बरोबरच झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्‍नावर काम करणार्‍या ‘झोपडी संघ’ या संघटनेचं काम करू लागलो; पण नंतर तेही झेपेना. कायम संघर्षास तयार असणं, कधीही बोलावणं आलं की निघणं, वगैरे माझ्या स्वभावाशी जुळत नव्हतं. मग तेही सोडून दिलं. आमच्या संघटनेपासून मी दुरावलो. आपले मित्र रस्त्यावर लढत आहेत आणि आपण घरी निवांत बसलोय, हेही मनाला रुचेना. तोवर माझ्या लिहिण्याची सुरुवात झाली होती. मग ठरवलं, गरिबांच्या जगण्यावर, प्रश्‍नांवर लिहूयात. हाच आपला सामाजिक कामातला सहभाग. म्हणून मग लिहिता झालो. त्यातही आधी ‘साधना’ साप्ताहिकात लिहायचो. संपादनही करायचो. पण राजा ढालेच्या लेखावर वादळ उठलं. तेव्हा तिथेही माझी कोंडी झाली. बाहेर पडलो. नंतर ‘मनोहर’ साप्ताहिकात लिहू लागलो, फ्रीलान्स रायटर झालो आणि मग मात्र स्वतःचं काही तरी सापडल्यासारखं झालं. वाटलं, हे कसं ब्येस झालं!

या लिहिण्याकडे येण्यासाठीचा हा प्रवास काही वर्षांचा होता. आपण कुठे रमतो आणि कुठे नाही, हे आधी कुठे माहीत होतं? हे सर्व प्रयोग केले ते सुनंदाचा भक्कम पाठिंबा होता म्हणून. ‘एक म्हणजे एक कर. धरसोड करू नको’, असं ती कधी म्हणाली नाही म्हणून हे जमलं. उलट, ती हसून मला म्हणायची, “तू आत्मचरित्र लिहिलंस, तर त्याचं नाव ‘पलायन’ ठेव. मेडिकलपासून पळालास, युक्रांदमध्ये गेलास. तिथून...”

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

पलायन तर खरंच. पण त्याला दुसरं नाव देऊ - ‘आत्मशोध’. कारण हे ‘पलायन’ सर्जनशील आहे. त्यामुळेच मला मी गवसलो. मला कुणी कुणी विचारतं, “तुम्हाला हे प्रयोग करू द्यायला सुनंदा भेटली. आमच्यापाशी तसं कोणी नाही. आम्ही काय करावं?” याला उत्तर काय देणार? आपल्या मनाचा विनासायास विभाग (कंफर्ट झोन) शोधून काढला, तर त्यासाठी आठवड्यातून दोन तास ठेवता येतील? निदान एक तास? तेवढं तरी करू यात. बाकीचा वेळ उपजीविकेसाठी काम करू; पण आवडीच्या कामासाठीही जगण्यात जागा ठेवू यात की. प्रत्येक जण काही तरी कल घेऊन येतो. तो त्याचा विनासायास विभाग. तिथे कष्टांचे श्रम वाटत नाहीत. तेच उपजीविकेचं साधन झालं तर उत्तमच; पण न झाल्यास ते आतलं झाड मरू नये, इतपत त्याची काळजी तर घेऊ यात?

सुदैव असं, की माझं झाड मला त्यामानाने लवकर दिसलं. मी २४व्या वर्षी लिहायला लागलो. आज सत्तरी उलटल्यावरही लिहितोय. लिहावंसं वाटतंय. परदु:ख पाहून आजही विरघळतं इतकं मन जिवंत आहे. मला मिळालेली ही मोठीच देणगी म्हणायची.

लिखाणाची सुरुवात झाली तीच मुळी पु. लं.च्या विरोधात लेख लिहून. ‘साधना’मध्ये लिहिला होता तो लेख. आश्चर्य म्हणजे पुढे काही वर्षांनी मी आणि सुनंदा पुलंचे इतके लाडके झालो की, जणू त्यांची मुलंच! ‘साधना’तल्या त्या लेखानंतर संपादक यदुनाथ थत्त्यांनी दर आठवड्याला लिही असं सांगितलं आणि मी लिहू लागलो. आठवड्याचं पान लिहिणं आता किती अवघड वाटतं! दरवेळी विषय कुठून आणायचा? त्या विशिष्ट दिवसाच्या आत तो लेख लिहायचा कसा? सगळंच संकट. पण तेव्हा मात्र बांध फुटावा तसं लिहीत राहिलो. त्याचं पुढे ‘वेध’ हे पुस्तक झालं.

‘साधने’चा वाचक खूप मर्यादित, आणि तोही एक परिवारच. साने गुरुजी परंपरेतला. त्यांच्यात एक संज्ञा नेहमीची. अमुक एक माणूस म्हणजे साने गुरुजींच्या धडपडणार्‍या मुलांपैकी एक. ही धडपडणारी मुलं आता चांगलीच वयस्क, म्हातारी झालेली. त्यांना ‘साने गुरुजींच्या वाटेने जाणारे’ एवढं म्हटलं असतं तरी चालण्याजोगं होतं. पण त्यांना ‘धडपडणारी’ म्हणायचं? असो. पण साधनेतल्या लिखाणाविषयी या धडपडणार्‍या मुलांच्या काही ठाम कल्पना होत्या. माझं त्या काळातलं लेखन त्यांना रुचत नव्हतं. साधनेची अशी एक भाषा होती. वाचकांच्या पत्रव्यवहारात ‘नितांत सुंदर अंक’, ‘आगळा-वेगळा लेख’ असे बरेच गोड गोड, गुळगुळीत झालेले शब्द वापरले जायचे. साने गुरुजींची धडपडणारी मुलंच असणार ती. उलट, मी ठरवलं होतं, की असे गुळगुळीत झालेले शब्द आपल्या लिखाणात येऊ द्यायचे नाहीत. ‘जणू’ हा शब्दही तेव्हा लिखाणात परत परत वापरला जायचा. त्यालाही मी हद्दपार केलं होतं. अशा शब्दांची मी यादीच केली होती. कधी ते नजर चुकवून माझ्या लिखाणात यायचे. मग मी धान्यातल्या खड्यासारखा उचलून ते बाजूला करायचो. काही लेखकांच्या लिखाणात मधूनमधून निरर्थक वाक्यं येतात, तशी आपल्या लेखनात येऊ नयेत यासाठी मी जागरूक असायचो.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : बाबा ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण तो फटकून राहणारा नाही, तर बरोबर घेऊन जाणारा आहे!

..................................................................................................................................................................

नरहर कुरुंदकर माझे आवडते लेखक. पण त्यांच्याही लेखात मधूनच एक वाक्य यायचं, ‘यावर माझं स्पष्ट मत असं आहे की...’ मला वाटायचं, हा तुमचा लेख आहे, तेव्हा मतही तुमचंच असणार आणि ते स्पष्ट असणार हे गृहीतच आहे. मग हे वाक्य कशाला? बर्‍याच लेखांमध्ये त्या माणसाचा झगडा संपतो, अडचणी संपतात आणि उत्कर्षाचा काळ सुरू होतो, अशा ठिकाणी एक वाक्य हमखास वापरलं जायचं. ते म्हणजे ‘नंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.’ ज्या कुणी पहिल्यांदा वापरलं असेल त्याला चांगला परिणाम मिळाला असेल. पण नंतर जो उठतो तो हेच वाक्य वापरतो. वापरून वापरून गुळगुळीत झालेलं नाणं जसं. मी नंतरच्या काळात खूप मुलाखती घेतल्या-लेख लिहिले, पण लिहिताना कधीही या वाक्याकडे मागे वळून पाहिलं नाही.’

त्या काळात ‘समाजवादी फोरम’ हे व्यासपीठ शरद पवारांनी निर्माण केलं होतं. इतर परिषदेसारखे इथेदेखील खूप ठराव व्हायचे. अनेक ठराव शेवटी नुसते पुकारून, हात वर करून पास व्हायचे. एका परिषदेचं रिपोर्टिंग करायला मी गेलो होतो. त्याच्या रिपोर्टमध्ये मी लिहिलं, ‘चटावरचं श्राद्ध उरकावं तसे ठराव उरकले गेले.’ मी थबकलो. चटावरचं श्राद्ध म्हणजे काय? हा चट कुठला आणि त्यावर श्राद्ध होतं कसं? हे आपल्या अनुभवातलं नसतानाही आपण का लिहिलं? तसं लिहायची पद्धत आहे म्हणून? ते वाक्य मी सरळ काढून टाकलं. पण नंतर मी या ‘चटा’चा शोध घेऊ लागलो तेव्हा कळलं, की बनारसला गंगेकाठी ब्राह्मण भटजी तट्ट्याच्या छत्र्या घालून बसलेले असतात. तिथे बसायला चटई असते, म्हणून त्याला चट म्हणत असावेत. तिथे पाच-पाच मिनिटांत श्राद्ध उरकली जातात. म्हणून चटावरचं श्राद्ध ही उपमा. हे कळलं तेव्हा कुठे माझं समाधान झालं. पण त्या वेळेपासून मी नियमच केला : जे आपल्या अनुभवातलं असेल तेच लिहायचं. जे लिहिलंय तसं आपण बोलतो का हे बघायचं.

त्यामुळे माझी भाषा माझी राहिली. साधी-सोपी राहिली. मी जसं बोलतो तसंच लिहू लागलो. हा कानमंत्र मो. स. साठ्यांचा. बिहारसाठी पैसे जमवतानाचे अनुभव त्यांना मी सांगत होतो. ते मला म्हणाले, “हे मला लिहून दे.” मी म्हटलं, “पण मी कुठे लेखक आहे?” ते म्हणाले, “अरे, आत्ता जे बोललास तेच लिहून द्यायचं.”

..................................................................................................................................................................

हेही वाचा : डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!

..................................................................................................................................................................

मी घरी जाऊन दहा मिनिटांत ते लिहिलं आणि बाबांना आणून दिलं. दुसर्‍या दिवशी पाहतो तर ‘सकाळ’मध्ये तो अनुभव माझ्या नावावर छापलेला. अरेच्चा, इतकं सोपं असतं तर! जे बोलतो ते लिहायचं. शैलीची भानगड नको, लेखाच्या रचनेचा विचार नको. जे सांगायचं ते वेगळं, नवं असेल तर वाचक वाचतोच. म्हणजे भाषा, रचना, शैली वगैरेपेक्षा महत्त्वाचं काय, तर तुम्ही काय सांगता ते. माझा रस्ता खुला झाला. रस्त्यावर कोसळलेल्या दरडी आपोआप उचलल्या गेल्या. ट्रॅफिक जॅममधून मला आपोआप वाट मिळत गेली. एखाद्या जिवलग व्यक्तीला सांगतोय असं समजायचं आणि जसं कागदावर उतरेल तसं उतरू द्यायचं. आपोआप अनुभवाला अनुरूप भाषा तयार होत जाते. पाण्याचा प्रवाह उतार मिळेल तिकडे वाहत जातो, तशी रचनाही आपसूक तयार होत जाते. कापसाच्या पेळूतून अनेक धागे हळूहळू एकत्र येत अलगदपणे छानसं सूत निर्माण होतं. चाक आपोआप फिरवलं जातं, पेळूचा हात आपोआप खाली-वर होत राहतो. सूत चरख्याच्या चातीला आपोआप गुंडाळलं जातं तसंच.

लिखाणाचा गुंता सुटल्यावर असा लिहीत सुटलो की बस्स! या लिखाणामुळे समीक्षक मंडळींची गडबड उडाली. या लिखाणाला काय म्हणावं? त्याला कुठल्या कप्प्यात टाकावं? माझं लिखाण म्हणजे कथा नसल्यामुळे त्याला ‘ललित गद्य’ म्हणावं असं कुणी सुचवलं; पण त्यावरही अनेकांचा आक्षेप. दुर्गा भागवत, प्रभाकर पाध्ये यांनी लिहिलं ते ललित गद्य. त्यात कसं निसर्गाचं तरल रूप न्याहाळलं आहे! माझ्या लिखाणात झोपडपट्ट्यांतली घाण आणि हमालांचा घाम… शी शी! हे कुठलं आलंय ललित गद्य!

मला यातलं काही कळत नव्हतं. लिखाणाला कोणत्या कप्प्यात बसवायचं ही समीक्षकांची समस्या. माझं तर म्हणणं होतं, याला साहित्य तरी कशाला म्हणता? पाहिलं ते सांगावं, या गरजेपोटी केलेलं हे लिखाण. कथा- कादंबर्‍यांना प्रत्यक्ष हेतू नसतो, तर ते लिखाण आपोआप स्फुरलेलं असतं. पण इथे मात्र लोकांना माहीत व्हावं, या उघड हेतूपोटी मी लिहीत होतो. याला कुठलं नाव द्यायचं ते तुम्ही बघा. पण लिहिणारा लिहितोय आणि वाचणारा वाचतोय एवढं पुरेसं नाही का, असा प्रश्‍न मला पडायचा.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पुढे कुणी तरी ‘रिपोर्ताज’ हा शब्द काढला. फ्रान्समध्ये पत्रकार वर्तमानपत्रांत कथेच्या शैलीने विशेष लेख लिहू लागले होते. त्याला त्यांच्याकडे ‘रिपोर्ताज’ म्हणत. मग सगळ्यांनी तेच नाव उचलून धरलं. कोणी कोणी तर मला श्रेयही देत, की ‘यांनी तिकडचा रिपोर्ताज हा फॉर्म मराठीत आणला.’ हा फॉर्म मी मराठीत आणायला आधी मी तिकडचं वाचायला तर हवं; ते वाचल्यावर हे आपल्या मराठीत आणू या, असा विचार सुचायला हवा आणि मग मी त्या शैलीत मराठीमध्ये लिहायला हवं. यातलं काहीच घडलेलं नव्हतं. आधी माझं मराठीतलंच वाचन जेमतेम, तर फ्रेंचमधलं वाचायला मी कुठला जातोय? मग कशाला हे श्रेय मला आणि कशाला ती लेबलं, असं मला वाटायचं. तुमच्या समोर आलंय ते लिखाण वाचनीय आहे का, वाचकाला काही नवं जग त्यातून कळतंय का, किंवा जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतंय का, एवढं तपासा म्हणजे झालं. ‘ते साच आणि मवाळ’ आणि ‘मितुले आणि रसाळ’ कितपत आहे, हे बघा. त्यात बसत नसेल तर सोडून द्या, असं माझं म्हणणं असायचं.

त्या काळात मी दैनिकांच्या पत्रकारांमध्ये वावरत होतो. प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायचो. कार्यक्रमांना जायचो. कुणा कुणा नेत्यांच्या सभांना हजेरी लावायचो. पण माझं लिखाण वर्तमानपत्री नव्हतं. मी बातम्या ‘सोडत’ नव्हतो की, अग्रलेख-स्तंभ लिहीत नव्हतो. ज्यावर लिहायचो ते विषय दैनिकांमधल्यासारखेच असले तरी ते माझ्या लेखात खूप सविस्तर यायचे. त्यात माणसं असायची, त्यांची वैशिष्ट्य यायची. तुझ्या लेखातून कॅमेरा फिरतो तशी दृश्यं ‘दाखवली जातात’, असं कोण कोण म्हणायचे. त्यामुळे पत्रकारांना वाटायचं, हे मेंढरू आपल्यातलं नाही. हा लेखक आहे, तिकडचा आहे. तर लेखक मंडळी म्हणायची, ‘याचं लिखाण जर्नालिस्टिक’ आहे. ते साहित्य नाही.

म्हणजे मी ना इथला होतो ना तिथला! पण मला वाटायचं, तुम्ही काही म्हणा जोपर्यंत लिहावंसं वाटतंय तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे.

..................................................................................................................................................................

माझ्या लिखाणाची गोष्ट - अनिल अवचट

समकालीन प्रकाशन, पुणे

पाने - १५२, मूल्य - २०० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5221/Mazya-Likhanachi-Goshta

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......