डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
सुशील धसकटे
  • डॉ. अनिल अवचट
  • Fri , 22 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो डॉ. अनिल अवचट Anil Awachat महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation मुक्तांगण Muktangan

काल महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले. यंदाचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयी एका तरुण कादंबरीकारानं लिहिलेला हा लेख...

.............................................................................................................................................

१.

डॉ. अनिल अवचट हे नाव महाराष्ट्राला सर्वपरिचित आहे ते दोन गोष्टींमुळे. एक, त्यांच्या खास ‘अवचट शैली’तील ‘रिपोर्ताज’ या लेखनामुळे आणि दोन, पुण्यात त्यांनी उभ्या केलेल्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रामुळे.

माझा त्यांचा प्रत्यक्ष फार परिचय नसला तरी, अवचट मला भेटले ते मी विद्यार्थी असताना, म्हणजे पहिल्यांदा शाळेत असताना पाठ्यपुस्तकांमधून. माझी आठवण बरोबर असेल तर त्या पाठाचं नाव होतं - ‘अनिकेत’. या ‘अनिकेत’नं एक अनामिक हूरहूर त्यावेळी लावली होती. पुढे बी.ए.ला आल्यावर मात्र त्यांचा ‘माणसं’ हा लेखसंग्रह अभ्यासाला होता आणि तिथंच खऱ्या अर्थानं त्यांच्या लेखनाशी चांगला परिचय झाला. त्यावेळी मी ‘माणसं’ किमान सहा-सात वेळा तरी वाचलं असेल. त्यातलं जे समजलं नाही, ते समजून सांगायला शिक्षक होतेच, त्यामुळे ‘माणसं’ उत्तम रीतीनं समजून घेता आली. पुढे एम.ए.ला पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात आलो आणि काय वाचावं आणि कसं वाचावं याचं भान येऊ लागलं. अगदी अख्खाच्या अख्खा एकेक लेखक वाचून काढायचा असं ठरवून आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, रा. रं. बोराडे, भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर, भास्कर चंदनशिव, बी. रघुनाथ इत्यादी इत्यादी अनेक लेखक अक्षरश: झपाटून वाचून काढले. त्यातील अनिल अवचट हे एक नाव.

अवचटांच्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लेखनानं त्यावेळी मला प्रचंड झपाटून टाकलेलं होतं. एखादी सामाजिक घटना वा प्रश्न /समस्या घ्यायची, त्याच्याशी संबंधित सर्व माहिती गोळा करून तीचा नीट अभ्यास करायचा, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधितांना भेटून, त्यांच्याशी संवाद साधायचा, आणि मग खास ‘अवचट शैली’त त्याचं संगतवार विश्लेषण करणारा दीर्घ लेख लिहायचा, असं सर्वसाधारण त्यांच्या लेखनाचं स्वरूप म्हणता येईल. असा हा ‘रिपोर्ताज’ हा लेखनप्रकार मराठीत त्यांनी रुजवला, हे नि:संदिग्ध.

२.

तरल व संवेदनशील मन, शोधक दृष्टी, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती, असे उपजत गुण असलेल्या अवचटांचा मूळ पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. डॉ. बाबा आढावांसारख्या अनेक ज्येष्ठांसमवेत ते महाराष्ट्रभर खेडोपाडी वावरले - फिरले आहेत. एवढेच नव्हे तर एसेम जोशी, जेपी यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी बिहारमधल्या पुर्णिया जिल्ह्याचा दौराही केलेला आहे. तसेच पुर्णियात काही काळ राहून तिथल्या एकंदर सामाजिक प्रश्नांचा व स्थितीचा अभ्यासही केलेला आहे. (‘पुर्णिया’ पुस्तकाला नरहर कुरुंदकरांची दीर्घ व विवेचक प्रस्तावना आहे.) समाजातील विविध प्रश्नांवर, घटनांवर, समस्यांवर लिहिताना त्यांच्यातील ‘सच्चा’ सामाजिक कार्यकर्ता जागृत होतो. हाच ‘सच्चा’ कार्यकर्ता त्या त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन खऱ्या वास्तवाचा शोध आणि वेध घ्यायला त्यांना प्रवृत्त करतो. त्यांचं संबंध लेखन म्हणजे सर्वसामान्य उपेक्षित, पीडित माणसांसाठी काहीतरी करू पाहणारं, तळमळणारं, धडपडणारं एका ‘सच्च्या’ कार्यकर्त्याचं मन आहे.

ज्या विषयाकडे एरव्ही कुणाचं सहज म्हणून लक्ष जात नाही, आणि समजा गेलंच तर, ते फार महत्त्वाचं वाटत नाही, अशा अनेक अत्यंत महत्त्वाच्या उपेक्षित विषयांचं अवचटांनी तळमळीनं नेतृत्व केलं आहे. ‘वेध’च्या प्रस्तावनेत विजय तेंडुलकर लिहितात, “किंबहुना त्याची भोवतालच्या घटनांकडे किंवा माणसांकडे बघण्याची नजर विलक्षण चौकस, शोधक आणि मुळात शंकेखोरच आहे.” त्यांच्या एकूण लेखनावर एक नजर टाकल्यास हे स्पष्टपणे दिसते. उदा. ‘माणसं’, ‘वस्त्या माणसांच्या’, ‘अंधेर नगरी निपाणी’ (माणसं); ‘बावड्याचा बहिष्कार’, ‘पारधी मेळावा’, ‘मराठवाडा दंगल : दोन घटना’, ‘सत्याभामेची विटंबना’, ‘पोलीस कोठडीतील मृत्यू’ (कोंडमारा); ‘अंधश्रद्धांचे गुरू’, ‘अंधश्रद्धांची केंद्रे’, ‘अंधश्रद्धांचे बळी’ (संभ्रम); ‘वस्त्या वेश्यांच्या’ (धागे उभे आडवे); ‘बस्तरचं अरण्यरुदन’ (प्रश्न आणि प्रश्न) इत्यादी इत्यादी. या सर्वांमधून अवचट अन्यायग्रस्तांचे, पिचलेल्यांचे, नाडलेल्यांचे आणि महत्त्वाचे म्हणजे जगण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्यांचे अक्षरश: कितीतरी ‘प्रश्न आणि प्रश्न’ उपस्थित करतात.

हे सगळं वाचल्यावर आपल्यासमोर नक्कीच एक प्रश्न उभा राहतो, की अवचट हे जे मांडतायत ते आपल्याच देशातील-समाजातील आहे काय? किंवा भारतातलं, नव्हे महाराष्ट्रातलंच आहे काय? याचं उत्तर ‘होय’. आपल्याच देशाच्या व समाजाच्या या दुसऱ्या चित्राशी आपण किती अनभिज्ञ असतो हे अवचटांचे लेखन वाचल्यावर जाणवते आणि असा प्रश्न आपल्यासारख्या ‘सुरक्षित’, ‘आपल्याच कोषात असणाऱ्या’, ‘आत्ममग्न जीवन शैली’त मश्गूल असणाऱ्यांच्या मनाला पडणंही साहजिक आहे. कारण आपल्या भोवती, आपल्याच समाजात जनावराचं जीवन जगणारे कुणीतरी आहेत, दोन घासांसाठी परिस्थितीशी नाना तऱ्हेनं संघर्ष करणारे कुणीतरी आहेत किंवा एकूण समाजव्यवस्थेच्या दृष्टीनं घातक असणारं काहीतरी समाजात घडतंय, याची कानोकानी खबरही आपल्याला नसते. किंबहुना ‘जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय?’, या खुशाल व बेफिकीर वृत्तीतून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अवचटांच्या दृष्टीनं ही स्थिती अतिशय अस्वस्थ करणारी असते आणि याच अस्वस्थतेतून ते सामाजिक बांधीलकीच्या नात्यानं तटस्थपणे या सर्व समस्यांची-प्रश्नांची उकल करू पाहतात. त्यांच्या मुळाशी जातात. प्रत्यक्ष भिडतात.

३.

‘माणूस’ हा अवचटांच्या विचारांचा, चिंतनाचा आणि लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. माणसांविषयी त्यांना कमालीची आस्थाही आहे. माणूसपणाच्या व माणुसकीच्या उत्कट ओढीतूनच ते माणसांविषयी पोटतिडिकीनं लिहितात. त्यामुळे त्यांचं लेखन जिवंत, प्रसंगी धगधगीत वाटतं. पण या धगधगीतपणामध्ये नुसत्याच ज्वाळा आहेत का? तर नाही, त्याला लालित्याची व बोलीभाषेची जोड आहे; व्यापक दृष्टी व अभ्यास आहे; परखडपणा आहे; तटस्थवृत्तीनं केलेलं विश्लेषण व मार्मिक निरीक्षण आहे. हे सर्व करताना अवचट त्यात एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच गुंतलेले असतात - त्यात ते अडकून पडत नाहीत. त्यातूनच त्यांची म्हणून एक स्वत:ची लेखनशैली तयार झालेली आहे, जी वाचकांना तितकीच खिळवून ठेवते.

अवचटांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका हाही एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा आहे. अर्थगर्भ व सूचक भाष्य करणाऱ्या अर्पणपत्रिकेच्या ओळी मनाला स्पर्शून व खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. उदा. ‘समाजाने ज्यांना भटकंती बहाल केली त्या सर्व उपऱ्यांना अपराधी भावनेनं अर्पण’ (माणसं); ‘नशिब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या (तरुण) भाग्यविधात्यांना... काळजीपूर्वक’ (अमेरिका); ‘गावागावांतल्या दहशतीविरुद्ध एकाकी लढणाऱ्या अप्रसिद्ध कार्यकर्त्यांना - हा थोडा हातभार’ (कोंडमारा) इत्यादी इत्यादी.

‘तेच ते’ अशा प्रकारची टीका त्यांच्या लेखनावर झाली खरी, पण एक गोष्ट मोकळ्या मनानं मान्य करावी लागते. ती म्हणजे अवचटांचं लेखन हा मराठीतील एक महत्त्वाचा सामाजिक व वाङ्मयीन दस्तऐवज आहे. त्यांच्या ‘रिपोर्ताज’नं मराठी वाङ्मयात निश्चित अशी चांगली भर घातली हे निर्विवाद.

४.

अवचट भाषणं करतात, व्याख्यानं देतात, परंतु ती रूढार्थानं भाषणं नसतात : आपुलकीनं साधलेला ‘लोकसंवाद’ असतो.

संत कबीर हा त्यांच्या मनस्वी चिंतनाचा व आस्थेचा विषय आहे : कधी कधी ते जाहीरपणे कार्यक्रमांमधून कबीराची कवनंही गातात.

अवचट चित्रकारही आहेत : हातात कागद व पेन्सिल घेऊन पुणे विद्यापीठाच कॅम्पसमध्ये चित्रे रेखाटणत मग्न अवचटांना मी कैक वेळा पाहिलंय.

अवचट उत्तम ओरिगामी करतात : अनेक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर जेव्हा इतरांची भाषणं चालू असतात, तेव्हा अवचटांचे कान त्या भाषणांकडे व डोळे हातातल्या ओरिगामी-कागदावर.

एक स्वच्छंदी, आनंदी आणि भरभरून आयुष्य जगणारा व माणसांवर उत्कट प्रेम करणारा माणूस - बहुतेकांचा ‘बाबा’ असलेला.

.............................................................................................................................................

डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://bit.ly/2FJw7OZ

............................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......