‘सातपाटील कुलवृत्तांत’  : या कादंबरीने मराठी कादंबरीला जगातील गाजलेल्या व मान्यताप्राप्त झालेल्या कादंबऱ्यांच्या रांगेत नेऊन उभे केले आहे!
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
शंकर विभुते
  • ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 05 June 2020
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक सातपाटील कुलवृत्तांत Satpatil Kulvruttant रंगनाथ पठारे Rangnath Pathare

१.

‘इतिहास’ हा शब्द उच्चारला की, आपल्या डोळ्यासमोर प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळातील राजकीय प्रवास येतो. शासनप्रणाली मग राजेशाही असेल वा लोकशाही, सामान्य माणसांना त्या इतिहासात फारसा वाव नसतो. संदर्भ आला तर या व्यवस्थेत त्यांची घेतलेली काळजी किंवा त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार यापलीकडे फारशी नोंद नसते. परंतु याचा अर्थ कोणत्याही देशाचा इतिहास हा ‘राजकीय इतिहास’च असतो, हे गृहीत धरणे किंवा समजणे अत्यंत घातक. राजकीय प्रवासासोबतच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या पैलूंना जोपर्यंत आपण समजून घेऊ शकत नाही, तोपर्यंत तो इतिहास अपुरा असतो.

मध्ययुगीन, प्राचीन भारतातील माणूस कसा जगत होता? त्याचे प्रश्न कोणते होते? त्याचा संघर्ष कसा होता? हे कळण्यासाठी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात ललित साहित्य उपलब्ध नाही. अशा प्रसंगी एक आशादायी चित्र म्हणून, सामान्य लोकांचा इतिहास म्हणून, ललित लेखनाच्या अंगाने केलेले लेखन म्हणून ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीचा उल्लेख करावासा वाटतो.

ज्येष्ठ कथा-कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे यांची मराठी रसिकांना ओळख करून देण्याची गरज नाही. ‘दिवे गेलेले दिवस’ या पहिल्या कादंबरीपासून ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या चौदाव्या कादंबरीपर्यंत त्यांच्या लेखनाचा प्रवास चढताच राहिला आहे. या कादंबरीला तर कळसच म्हणायला पाहिजे.

ही कादंबरी राजकारण, धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण, विज्ञान, इतिहास, भूगोल, प्राणी-पक्षी, नदी, विद्यापीठ, विदेश, युद्ध, पलायन, खून, मारामाऱ्या, जंगल, पशु, वंश, देवक, गोत्र, भाषेचे मूळ, संशोधन, जातीच्या अहंपणातील फोलपणा, पोलीस, कामगार, व्यापार, गुलाम, सरंजामदार, राजे, सात-आठ शतकांचा कालावकाश अशा विविध अंगांना सामावून घेते. कादंबरीची सुरुवात १२८९मध्ये होते, तर शेवट २०१९ मध्ये. म्हणजे ७२० वर्षांचा विविधांगी पट ही कादंबरी उलगडून दाखवते.

ही कादंबरी वाचताना काही कादंबऱ्या नकळतपणे नजरेसमोर उभ्या राहतात. उदा. ‘वॉर अँड पीस’, ‘रूट्स’, ‘तुंबाडचे खोत’, ‘हिंदू’ इत्यादी. पण ही कादंबरी या सर्व कादंबऱ्यांपेक्षा वेगळी ठरते. त्यामुळे तिची तोंडओळख करून देताना सुरुवातीला जो संक्षिप्त परिचय दिला आहे – ‘लेखक मराठा जातीत जन्माला आलेले असून मराठा शब्दाचा व्यापक अर्थ लावण्याचा व आपली कुलपरंपरा शोधण्याचा...’ - तो वाचक म्हणून मला चुकीचा वाटतो. कारण कादंबरी बारकाईने वाचल्यावर मराठा परंपरा शोधण्यापेक्षा मराठी माणसाचा शोध घेणे आणि मानव ही मुळात भटकी जमात असल्याच्या निष्कर्षावर येणे, या व्यापक अर्थापाशी येऊन ही कादंबरी थांबते.

सामान्य मराठी माणसाचा इतिहास लिहिण्यासाठी जी साधने लेखकाला उपलब्ध झाली, त्यानुसार १२८९ पासून म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीने पैठणवर केलेल्या स्वारीपासून ते मानववंशशास्त्रज्ञ रिचर्ड रेसिंग यांच्या मृत्यूपर्यंतचा काळ या कादंबरीत आलेला आहे. या कालपटावर लेखकाने काही पात्रे उभी केली आहेत. ही पात्रे सामान्य मराठी माणसाचे प्रतिनिधित्व करतात. ती जशी शूरवीर आहेत, तशीच भित्री आहेत. जशी प्रामाणिक आहेत, तशीच लबाड आहेत. वेळ येईल तशी तडजोड करणारी आहेत, तशीच जीव गेला तरी तडजोड न करणारी आहेत. ती हुशार, मेहनती, बेरकी, आळशी, पळपुटी, कळकुटी, लोभी, चोर, लुटारू, धाडसी, दयाळू, नीतीमान, मतलबी, अस्तिक, नास्तिक अशीही आहेत.

थोडक्यात मानवी स्वभावाचे अंतरंग दाखवणारे अनेक गुण त्यांच्यात आहेत. पण ती हिंदी सिनेमातल्या नायकासारखी सर्वगुणसंपन्न नाहीत. यातील नायक ‘अवेंजर्स’ या सिनेमातल्या नायकासारखे आहेत. असे म्हटले जाते की, या चित्रपटात हॉलिवुडमधील जवळपास ४०पेक्षा अधिक सर्वश्रेष्ठ नायकांनी काम केले आहे. यातील प्रत्येक नायकाचे स्वतंत्र हिट झालेले चित्रपट आहेत, पण या चित्रपटात त्यांच्या वाटेला जेवढं काम आलं, त्याचं त्यांनी सोनं केलं आहे. तसे या कादंबरीत प्रमुख नायक म्हणून जी पात्रं आली आहेत  - उदा. (पुरुष पात्रे) श्रीपती, साहेबराव, दशरत, जानराव, रखमाजी, पिराजी, विठ्ठल, शंभूराव, देवनाथ; (स्त्री पात्रे) रोहिणी, गीता, आर्यन, आफिया, तुळसा, समिंदरा, उल्फा, देऊबाई, चिमाबाई; (अमानवी पात्रे - घोडा, गाय, किल्ले, रणांगण, विठोबा मूर्ती)… ही सगळी पात्रे एकेका कादंबरीचा नायक होण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत. पण कालपटात त्यांना मिळालेले स्थान आपल्या मनात घर करून जाते.

२.

पहिला नायक श्रीपतीवगळता (तसा तो पठारे वंशातील आहे, पण थेट रक्ताचे नाते नाही) साहेबरावपासून ते देवनाथपर्यंत पणजोबा, आजोबा, वडील, भाऊ असे नातेसंबंध या पात्रांत आहेत. यातील पहिला भाग श्रीपती. ज्याचे मूळकूळ पठारे वंशज आहे. तो मेंढपाळ आहे, प्रामाणिक आहे, कष्टी, दयाळू आहे. त्याच्या गुणांमुळे तो मानकरी दरबारात केशवराज एडकेचा विश्वासू रक्षक बनतो. शेवटी तर तो मानकरीची पत्नी रोहिणी (ब्राह्मण) सोबत वांबोरी गावात जाऊन स्वतःचे वजन निर्माण करतो. हा अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाचा काळ. तो अल्लाउद्दीनच्या बाजूने सामील झाला होतो. तेव्हा पैठण नगरीत रामदेव यादव यांचे राज्य होते. ती राज्यव्यवस्था कशी होती, याचे संक्षिप्त पण मार्मिक वर्णन कादंबरीत येते - “देवांनी जगावं तशा वैभवात जगणारी ती तुपट अंगाची माणसं फारच फुसकी होती. इतक्या उत्तम स्थितीत राहणारी ती माणसं अगदीच भेकड होती. त्यांना शस्त्रं चालवता येत नव्हती.” ( पृ.२३).

साहेबराव उर्फ सायबु पठारे हा या कादंबरीतील दुसरा महत्त्वाचा नायक. श्रीपतीच्या वंशातला. त्याच गावातला. अर्थात याच्या काळातही वांबोरी गावात पाटीलकी असते एडके (ब्राह्मण) या घराण्याकडे. हा काळ निजामशाही, आदिलशाही (अंदाजे सन १४९०) यांच्या वर्चस्वाचा काळ. निजामशाहीतील काही पठाण फार शोषक होते. त्यांनी एडके पाटलाच्या मुलीला पळवून नेले होते. ही वार्ता गावकऱ्यांना भयभीत करते, पण या पठाणांच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती. तेव्हा या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी गावातील सात धाडसी तरुण एकत्र येतात - शुकरे, शितोळे, चौथे, राहणे, पठारे (साहेबराव), एडके, तिडके. हे तरुण पठाणांचा बंदोबस्त करण्यासाठी शस्त्र घेऊन जंगलात लपून बसतात. नियोजन करून त्या तीन-चार क्रूर पठाणांना एकटे गाठून मारून टाकतात. काळाची पावले ओळखून सुलतान त्यांना माफ करतो. त्यांच्या पराक्रमाबद्दल खुश होऊन एडके पाटील गावबैठक घेऊन बक्षीस जाहीर करतात. ते म्हणतात, “आज माझ्या मुलासकट या सात पोरांनी जी हिम्मत माझ्या लेकीसाठी दाखवली, तिला तोड नाही. त्याची आठवण म्हणून याउपर इथली पाटीलकी आळीपाळीने या सात घराण्यात दिली जाईल, असे मी जाहीर करतो.” (पृ. १७२) ही घटना ‘सातपाटील’ या नावाने प्रसिद्ध होते.

या सातपाटलांतील एक साहेबराव पठारे सातपाटील नामक तरुण मोहरम खान पठाण (साहेबरावांनीच म्हणून टाकले होते) याची पत्नी आर्यन (पुढे आरेनाबाई नावाने प्रसिद्ध) सोबत पळून जातो. पुण्याजवळ इम्रानखानच्या व शिवरामबुवाच्या मदतीने खराडी येथे गाव वसवतो. त्यांना मूलबाळ होत नाही, पण बहरामखान पठाणचा मुलगा यांचा वारस म्हणून पुढील सातपाटीलकीचा कुळपुरुष ठरतो. पुढे काही वर्षांनंतर पेशवेकाळात सातपाटील वंशातील दशरथ रानबा सातपाटील या तिसऱ्या नायकाची कहाणी येते. तो एकुलता एक मुलगा असून त्याचे पाच चुलत भाऊ असतात. त्या चुलत भावांच्या भीतीमुळे तो गाव सोडून पळून जातो. पेशवाईच्या सैनिकात भरती होतो. तेथे तुळसा नावाची एक वृद्ध विधवा महिला त्याची काळजी घेते. तो पानिपत युद्धात पेशव्यांच्या बाजूने लढतो. तेथे पराभव होतो, पण हा अपघाताने पठाण सैन्यासोबत अफगाणिस्तानमध्ये पोहोचतो. तिथून लढाईत मृत्यू पावलेल्या एका पठाणाच्या पत्नीला अफियाला घेऊन पुन्हा भारतात येतो. साताऱ्याजवळील करंजे गावी आपली वस्ती करतो. दशरथची काळुबाई नावाची पहिली पत्नी लग्नाची असते. या पहिल्या पत्नीला मुलगा होते. त्याचे नाव खंडोजी. हा पराक्रमी नसतो, पण त्याचा मुलगा जानराव हुशार असतो.

जानराव हे कादंबरीतील तिसरे महत्त्वाचे पात्र. हा दुसरा बाजीरावच्या अखेरच्या काळात शिलेदार म्हणून काही महिने काम करत होता. जानरावला रखमाजी, पिराजी ही दोन मुले, तर जमूबाई ही मुलगी. हा मुलाबाळासहीत करंजी सोडून सेल्फी येथे राहायला आला. पण दुर्दैवाने त्याच्या मुलीवर बलात्कार होतो, त्यातून काही दिवसांनी ती मृत्यू पावते. हा बलात्कार करणारा आपल्या सुनेचा भाऊ (रखमाजीचा मेहुणा) असल्याचे कळताच जानराव त्याचा खून करतो. पण खुनाचं खरं कारण फारसं कुणालाही माहीत नसल्याने जानरावच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं वाटतं. त्यामुळे त्याला गाईच्या गोठ्यात ठेवले जाते. त्याचा मोठा मुलगा शेतीच्या कामात लक्ष देणारा, सरळ नाकाने जगणारा होता, तर याउलट पिराजी हा मुलगा सहा फूट उंच, गोरा, पठाणासारखा दिसणारा, धाडसी होता. रखमाजी व पिराजी ही दोन पात्रे कादंबरीच्या चौथ्या भागात येतात ‌.

रखमाजीला सात मुले होतात. सातवा शंभूराव. (या कादंबरीत पुढे मुख्य पात्र बनते) रखमाजी आपल्या मुलीचे नाव बहिणीची आठवण म्हणून झमाबाई ठेवतो. त्या मुलीचे लग्न त्या काळाच्या रितीरिवाजाप्रमाणे बालपणी होते, पण पिराजीचे होत नाही. या लग्नानंतर पिराजी घर सोडून निघून जातो. त्याची कोणी फारशी दखल घेत नाही. कारण तो बलवान असल्याने आणि कोणतेही काम धमकीने सोडत असल्याने गावातील लोक त्याच्यापासून दूर राहतात. त्याच्या पाठीमागे कितीही बोलत असले तरी समोर बोलण्याची कोणामध्ये हिंमत नसते. पुढे पिराजी लुटारू टोळीत सामील होतो आणि त्यांचे नेतृत्व करू लागतो. एके दिवशी जत्रेच्या निमित्ताने नाच-गाणं करणाऱ्या उल्फा या स्त्रीशी त्याची भेट होते. उल्फा आई नसलेली, व्यसनी, पैशाच्या लोभी बापाला कंटाळलेली मुलगी असते. ती पिराजीसोबत पळून जाते. पिराजी तिला घोड्यावर बसून घेऊन येतो, पण गावात किंवा भावाच्या शेतात न राहता गायरान, पडीक जमिनीत आपल्या लुटारू साथीदाराच्या मदतीने झोपडी बांधून तिथे राहतो. उल्फा अतिशय सुंदर व धाडसी असते, पण गावकऱ्यांच्या नजरेस कधी पडत नाही. त्यांना एक मुलगा होतो. त्याचं नाव जालंदर. एके दिवशीला विषबाधा झाल्याने पिराजी मृत्यू पावतो, पण मृत्युपूर्वी उल्फाला मुलाला घेऊन पळून जाण्यास सांगतो. त्याची आज्ञा म्हणून ती पलायन करते. अनेक संकटांचा सामना करत शेवटी इंग्रज अधिकारी अॅथनी ब्लॅकस्मिथसोबत लग्न करून इंग्लंडला जाते. ती पुढे देवनाथचा आजोबा शंभूरावला भेटते. (त्यांच्या सोबत काढलेले छायाचित्र कथानकाला जिवंत ठेवते) तर दुसरीकडे रखमाजी पोटी जन्मलेला शंभूराव त्या घराण्यात धाडसी निघतो. त्या काळात शेतकऱ्यांची पिकं लुटणाऱ्यांचा (फिरस्ते) तो बंदोबस्त करतो. तसा तो सातवीपर्यंत शिकलेला असतो. हा महात्मा फुलेंच्या समकालीन (१८८०) काळातील. त्याचे लग्न तेजबाईसोबत होते. त्यांना मूलबाळ होत नाही.

शंभुराव रखमाजी सातपाटील हा या कादंबरीतील महत्त्वाचे सहावे पात्र. (श्रीपती, साहेबराव, जानराव, रखमाजी, पिराजी, नंतर हा) त्याचा राघु वाघुळे हा शालेय सवंगडी अस्पृश्य समाजातील असतो. शिक्षण घेऊनही तत्कालीन परंपरेनुसार नोकरी मिळत नसल्याने तो पुन्हा गावकीचे काम करतो व वेळ प्रसंगी शंभूरावला मदत करतो. शंभूराव शहरातील देऊबाई या खानावळ चालवणाऱ्या विधवा बाईच्या प्रेमात पडतो. तिला तत्कालीन परंपरेनुसार रखेल म्हणून आपल्या शिवारात आणून ठेवतो. समाजात बेअब्रू होऊ नये म्हणून त्याच्याकडे काम करत असलेल्या विठोबासोबत तिचे लग्न लावून देतो.

तेजबाईला मूलबाळ होत नसल्याने वारसा म्हणून तिच्या पुढाकारानेच शंभूरावचे तुळसाबाईसोबत दुसरे लग्न होते. तिला पाच मुलं व दोन मुली होतात. (धैर्यराव, सूर्यराव, तिमाजी, तुळाजी, माणकोजी आणि रेऊबाई, सरूबाई) प्लेगने तेजबाईचा मृत्यू होतो, तर सूर्यरावाने घोर अपमान केल्याने व मार दिल्याने काही दिवसांनी देऊबाईचा मृत्यू होतो. शंभूरावाची तुळाजी व माणकोजी ही दोन मुले दुसऱ्या महायुद्धात सामील होतात. युद्धानंतर तुळाजी पोलीस नोकरी पत्करतो, तर माणकोजी शहरात ड्रायव्हरची नोकरी करतो. शंभूरावला आयुष्याच्या शेवटी अनेक दु:खं सहन करावी लागतात. त्याची सरुबाई नावाची मुलगी लग्नानंतर एकासोबत पळून जाते. मुलगा तुळाजीची पत्नी एका मुसलमान गुत्तेदारासोबत पळून जाते. गावातील प्रतिष्ठा कमी होते. मुले कर्तबगार निघत नाहीत. अशा दुःखात एके दिवशी गोठ्यातच त्याचा मृत्यू होतो ‌.

३.

कादंबरीचा मुख्य निवेदक व शेवटचे सातवे पात्र म्हणजे देवराव उर्फ देवनाथ माणकोजी सातपाटील. शंभुरावाचा नातू. हा शिक्षणाच्या निमित्ताने गाव सोडतो‌. याचा जन्म १९५० सालचा. अनेक अर्थाने आपण या काळाचे प्रतिनिधित्व करत आहोत असे त्याला वाटते. कारण या काळात युगप्रवर्तक अशा खूप महत्त्वाच्या घटना घडतात. हा नायक आधुनिक पूर्व काळ व आधुनिकोत्तर काळ या दोन काळाचा साक्षीदा. अनेक महत्त्वाच्या घटना तो जवळून पाहतो. तो प्रचंड कष्टकरी, मेहनती. त्या जोरावर उच्चशिक्षण घेतो. एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होतो. आणीबाणीचा साक्षीदार. त्या काळातील अनुभवाविषयी अस्वस्थ होऊन लेखन करतो आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होतो. पुढे महाराष्ट्रातील मोठा साहित्यिक म्हणून त्याचा नावलौकिक होतो.

त्याला अनेक ग्रंथाच्या वाचनातून मराठी माणसाचा शोध घ्यावा असे वाटते. आपल्या पुढील परंपरेतील नात्याचा शोध घेत सातशे-आठशे वर्षे मागे जातो. हा शोध घेतानाच आपल्या जातीचा फोलपणा त्याच्या लक्षात येतो. मराठी माणूस म्हणून त्याला गर्व वाटत असला तरी शुद्ध वंश ही बाब त्याला हास्यास्पद वाटते. तो साहित्यिक असला तरी वैज्ञानिकही असतो. कार्यकारणभावावर त्याचा विश्वास असतो. तो मराठी साहित्याचा प्रतिनिधी म्हणून भारतातील निवडक साहित्यिकांसोबत इंग्लंडला जातो. तेथे त्याची मानववंशशास्त्रज्ञ रिचर्ड व रॉबर्ट यांच्याशी भेट होते. या दोन्ही व्यक्ती त्याच्या वंशपरंपरेतील, नात्यातील निघतात. उल्फा (पिराजीची पत्नी) जी इंग्लंडला गेलेली असते, तिचा वारसा त्यांच्याकडे सापडतो. (त्यांच्याकडे आजोबा शंभूरावचे छायाचित्र सापडते) मायदेशी परतल्यानंतर देवनाथ वंशाचा शोध घ्यावा म्हणून सेल्फी, करंजे खराडी, वांबोरी… अशा अनेक ठिकाणी अनेकांना भेटून माहिती गोळा करतो. शेवटी आपले आडनाव ‘सातपाटील’ का पडले याचा शोध लावतो.

या प्राचीन शोधासोबतच तो समकालीन वर्तमान, भविष्य याकडे दुर्लक्ष करत नाही. भविष्यात निर्माण होणारा विषाणूचा धोका आणि वस्तुस्थिती यांची नोंद करून आपली लेखणी थांबवतो.

४.

या कादंबरीचे बलस्थान तिच्या निवेदनशैलीत आहे. कादंबरी वाचताना कधी कादंबरीकार आपली जीवनकहाणी सांगत आहे असा भास होतो, तर कधी कादंबरीतील मुख्य नायक देवनाथ कथा सांगतो आहे असे वाटते. कादंबरीच्या प्रत्येक भागात प्रारंभी तत्कालीन राज्यव्यवस्थेची जी माहिती येते, त्यातून कादंबरीकार वास्तव इतिहास सांगत आहे असे वाटते, तर कधी कधी तो कादंबरीकाराने उभा केलेला इतिहास वाटू लागतो. आपल्याला जो इतिहास माहिती असतो, त्याच्या आधारे महत्त्वाच्या घटनांचा शोध घेण्याची उत्सुकता जेव्हा निर्माण होते, तेव्हा मात्र निवेदक सहजपणे आपली हवा काढून टाकतो. उदा. दत्ताजी शिंदे यांच्या बाबतीतला ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ या संवादाचा निवेदक या कादंबरीतून उल्लेखही करत नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे भूषण, वैभव आणि स्वाभिमान म्हणून असलेला जो शिवकाळ आहे (छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांची कामगिरी) तो या कादंबरीत येत नाही. म्हणजे या काळाच्या प्रवाहातून ही कादंबरी जाते, पण तो अभिमानाची गोष्ट म्हणून सांगत नाही. याचा अर्थ निवेदकाला गौरवशाली महाराष्ट्र वाचकांसमोर उभा करून पाठ थोपटून घेण्याची गरज भासत नाही. तो स्वतःच्या कूळपरंपरेचा शोध घेताना स्वतः सहित (मूळ पुरुष पठाण, रक्तातील स्त्रिया मुस्लिमासोबत पळून जाणे, स्वतःचा भित्रेपणा.) मराठी माणसालाही (जातीचा गर्व) फाडून काढतो.

याचा अर्थ निवेदकाला स्वतःच्या कूळपरंपरेचा शोध घेण्याची इच्छा असली तरी तो निमित्तमात्र आहे. यानिमित्ताने त्याला मराठी माणसाचा शोध घ्यायचा आहे. वाचकांना खिळवून ठेवण्याची जी प्रचंड ताकद रंगनाथ पठारे यांच्या भाषाशैलीत आहे, ती अप्रतिम आहे. जवळपास आठशे पानांची ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. एवढेच नाही तर निवेदक लोककथा सांगितल्याप्रमाणे मध्येमध्ये वाचकांशीही संवाद साधतो. तपशीलाचा विस्तार वाढत गेला की, निवेदक वाचकांच्या लक्षात आणून देतो. मूळ सूत्र विसरू नये अशी नकळतपणे वाचकांनाही ताकीद देतो. हे वाचताना कीर्तन परंपरेची आठवण येते.

निवेदकाने केलेली भाष्यं कथानकाच्या ओघात येत असली तरी त्याला एक मानवी चिंतनाचे वस्तुनिष्ठ मूल्य आहे.

या कादंबरीसाठी पठारे यांनी खूप मेहनत घेतली आहे. तत्कालीन परिस्थिती रेखाटताना जाणीवपूर्वक यादवकालीन, बहामनी कालीन, शिवकालीन, पेशवेकालीन भाषेचा मोह टाळून प्रमाण भाषेला महत्त्व दिले आहे. प्रसंगानुरूप हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर दिसतो, पण तो मर्यादित स्वरूपात आहे.

५.

या बलस्थानांसोबतच काही मर्यादाही नोंदवाव्याशा वाटतात. विशेषतः निवेदक जो ई-मेलवरून पत्रव्यवहार करतो, त्यातील इंग्रजी भाषा अनावश्यक वाटते. रिचर्ड मेलचे उत्तर इंग्रजी भाषेत असले तरी ते मराठीत सांगणे निवेदकाला शक्य होते. समजा आपण असे गृहीत धरूया की, त्यांनी इंग्रजीत पाठवलेली मेल जशास तशी कळावी असा त्यामागे हेतू आहे. पण मग निवेदकाने रिचर्डला पाठवलेली मेलही इंग्रजीतच असायला हवी होती. पण ती मराठीत आहे. उलट निवेदकानेच काही प्रसंगी भाषेची तडजोड केलेली आहे. उदा. “अरे, मला पहचानलं नाहीस? मी बहरामखान. आपण एकमेकांशी लढलो होतो.” (१६७) हा पठाण मराठीत बोलतो. समजा आपण हेही मान्य करू की, हा साहेबरावांच्या स्वप्नात आल्याने मराठीत बोलला, पण त्याच स्वप्नात तो पुढे म्हणतो- “अरे वो कुछ नहीं, लढाई, झगडे में वो होता है.” (१६८) या दोन्ही भारतीय भाषा असल्याने वाचक समजू शकतो, पण इंग्रजीचा अट्टाहास कशाला?

कथाकाळ अधोरेखित करण्यासाठी प्रत्येक भागाच्या सुरुवातीला दिलेली ऐतिहासिक स्वरूपाची माहिती काही प्रमाणात (वाचकांच्या मनावर ताण वाढणारीच आहे) ठीक आहे, पण कधी कधी कथानकाच्या ओघात मध्येच (२९३-९४) तशीच माहिती येते, तेव्हा आपण संभ्रमात पडतो. कथानकाच्या पुष्टीसाठी, स्पष्टीकरणासाठी निवेदक काही बाबी पुन्हा पुन्हा सांगतो. ही पुनरावर्तीही गैरसोयीचे वाटते.  अर्थात याला काही कादंबरीच्या मर्यादा म्हणता येणार नाहीत.

‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी अनेक अर्थाने दर्जेदार आहे. मराठीत प्रकाशित झालेल्या आजपर्यंतच्या कोणत्याही कादंबरीत न आलेला एवढा मोठा, प्रदीर्घ काळ या कादंबरीत येतो. ही कादंबरी ग्रामीण, महानगरीय, स्त्रीवादी अशा कोणत्याही प्रवाहात बसत नाही. अनेक विषयांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे.

शेवटी शेवटी निवेदक फक्त मराठी माणसाचा विचार करत नाही, तर विश्वातील अख्ख्या सजीव सृष्टीच्या अस्तित्वाची चिंता करतो. वंश, गोत्र, जात, धर्म, पंथ, राज्य, राष्ट्र, विश्व या सगळ्याच्या पलीकडे हे चिंतन जाते.

या कादंबरीने मराठी कादंबरीला जगातील गाजलेल्या व मान्यताप्राप्त झालेल्या कादंबऱ्यांच्या रांगेत नेऊन उभे केले आहे, एवढे मात्र निश्चित.

..................................................................................................................................................................

‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5166/Saatpatil-Kulvrutant

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......