संस्कृती प्रबोधनाच्या गाभ्याचे बहुआयामी चिंतन ‘यथार्थ’मधून आले आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजेन्द्र मुंढे
  • ‘यथार्थ’चे मुखपृष्ठ
  • Fri , 20 March 2020
  • ग्रंथनामा शिफारस यथार्थ श्रीपाद भालचंद्र जोशी

कवी, ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, समीक्षक, वक्ते, संवाद माध्यमशास्त्रातील तज्ज्ञ आणि सांस्कृतिक-वाङ्मयीन चळवळीचे उद्गाते म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या गौरवार्थ अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संपादित केलेल्या ‘यथार्थ’ या गौरवग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले.

अलीकडील काळात संबंधित व्यक्तीच्या विशेषांसोबतच समकालीन विषयावर तज्ज्ञांचे लेखन संपादित करण्याची परंपरा गौरवग्रंथांच्या रूपाने रूढ होताना दिसते आहे. याच परंपरेतील ‘यथार्थ’ हा ग्रंथ ‘वैचारिक व प्रागतिक चिंतन’, ‘साहित्य, संस्कृती, भाषा, अभिव्यक्ती’, ‘जागतिकीकरण, संवादमाध्यमे’ आणि ‘व्यक्तिविशेष’, अशा चार विषयघटकांत विभागला आहे. हे सर्व विषय सदैव डॉ. श्रीपाद जोशी यांच्या चिंतन-लेखनाचे आणि जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत.

या ग्रंथातील पहिल्या विभागात विचारविश्वाचा धांडोळा घेताना अनेक मूलभूत स्वरूपाची निरीक्षणे त्या त्या विषयातील अनुभवी आणि अधिकारी व्यक्तींनी नोंदवली आहेत. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी भारतीय समाजवादाचा वैचारिक प्रवास विस्तृतपणे मांडताना भारतीय ‘लोकशाही समाजवाद’ ही एक संपन्न, सर्वांगीण विचारधारा असून ती भांडवलशाही व कम्युनिझम यांना पर्यायी आहे, असे प्रतिपादन केले आहे. या विचारधारेमुळेच नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क व फिनलँड या देशांनी आपापले समाज संपन्न व समतेवर आधारलेले बनवले आहेत. हे काम आपण  भारतात निष्ठापूर्वक केले पाहिजे, याला पर्याय नाही, असे मत त्यांनी मांडले आहे.

तर ‘सामाजिक न्याय आणि आजचे वास्तव’ याचा उलगडा करताना पन्नालाल सुराणा यांनी मूलभूत हक्क, वैयक्तिक कायदा आणि त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्न, बहुपत्नीत्व, स्त्रियांची निरक्षरता, मुस्लीम प्रश्नांवरील हमीद दलवाईंची भूमिका, हिंदूचे कायदे अशा विविध प्रश्नांवरील मांडणी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून केलीय.

डॉ. किशोर महाबळ यांनी सांप्रदायिक सौहार्द आणि राष्ट्रीय स्थैर्याचा थेट अनुबंध जुळवून आजच्या ज्वलंत प्रश्नांची मांडणी केली आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी कॉ. गोविंदराव पानसरेंच्या कर्तृत्वाचा आलेख चित्रित करताना त्यांच्या चळवळीतील ‘शत्रू-मित्र विवेक’ सप्रमाण मांडला आहे. कॉ. पानसरे मतभेदांना मनभेदांपर्यंत घेऊन जात नसत. म्हणून तर त्यांच्या सामाजिक-राजकीय चळवळीत वेगवेगळ्या भागीदार संस्था-संघटना व पक्ष राहत, असे प्रमेय मांडले आहे.

कॉ. अजित अभ्यंकर ‘मार्क्सवादी राजकारणाचा भारतीय प्रवास’ या लेखात वस्तुनिष्ठ व प्रांजळ मांडणी करून भारतीय कम्युनिस्टांच्या चुका मान्य केल्याची साक्ष त्यांच्या लेखात मिळते.

‘प्रगतिशील चळवळीपुढील आव्हाने’ या लेखात डॉ. भालचंद्र कांगो यांनी डाव्या चळवळीच्या घसरणीचे सत्य सच्चेपणाने स्वीकारून नव्या काळातील नव्या आव्हानांचा शोध वास्तवातील कुरूपतेच्या विच्छेदनातून नोंदला आहे. अत्यंत कमी शब्दात व्यापक व नेमकी चिंतन सूत्रे मांडून कांगो यांनी साम्यवाद-समाजवाद-आंबेडकरवाद अशा सर्वच प्रगतीवादी विचारधारांचा अनुबंध एकात्म करून भारतीय विषमव्यवस्थेची कोंडी फोडण्याची दिशा स्पष्ट केलीय.

‘महाराष्ट्रातील मुसलमानांची इस्लामिक संस्कृती’ या लेखात प्रा. फकरद्दीन बेन्नुर यांनी संपूर्ण भारतातील इस्लामी परंपरा सुफी मूल्यात्मकतेच्या निकषावर तपासून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू-मुसलमानांचे ऐतिहासिक सहअस्तित्व अर्थपूर्ण करण्यासाठी व भविष्यात सुखासमाधानाने सर्व प्रवाह, सर्वधर्म एकात्म होण्यासाठी बेन्नूर यांचा हा लेख मार्गदर्शक ठरणारा आहे. तसेच वर्तमान भारताच्या व विश्वाच्या धार्मिक कुरूपतेची कोंडी फोडणारी चिंतनसूत्रे त्यांच्या लेखातून आली आहेत.

या भागातील अखेरच्या ‘स्त्री-पुरुष संबंध आणि स्त्रीवादाचे भारतीय वास्तव’ या लेखातून डॉ. अश्विनी घोंगडे यांनी भारतीय स्त्री-पुरुष संबंधांत स्त्रीवादाचा संदर्भ जोडताना अद्याप आपण फार दूर असल्याचे मांडलेले मत गांभीर्याने समजून घेण्यातच भारतीय समाजाचे कल्याण आहे.

या ग्रंथातील दुसऱ्या भागातील ‘साहित्य, संस्कृती, भाषा अभिव्यक्ती’ या महत्त्वाच्या विषयावर प्रा. के. ज. पुरोहित यांचा साहित्याचा अन्वयार्थ, डॉ. किशोर सानप यांचा साहित्यिकांची आत्मकथने, प्रा. अरविंद खांडेकर यांचा मराठी भाषेची परवड आणि विद्यापीठांची भूमिका आणि विजय पाडळकर यांचा ‘माध्यमांतर : वाद-प्रतिवाद’ आणि विश्राम गुप्ते यांचा ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाठभेद’ हे लेख आहेत.

देशाचे तुकडे करणाऱ्या घोषणा या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येत असतील तर देशाची एकात्मता जपणाऱ्या घोषणांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही मान्य व्हावे! स्वातंत्र्याचे मूल्य मान्य करताना दुसरी बाजूही विचारात घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विश्राम गुप्ते करतात. या विभागात डॉ. वासुदेव मुलाटे, प्रा. हरी नरके, डॉ. श्री. मा. भावे, आनंद पाटील यांचे साहित्य, संस्कृती, भाषा अभिव्यक्तीच्या विविध कंगोऱ्यांना स्पर्श करणारे लेख आहेत.

‘जागतिकीकरण, संवाद-माध्यमे आणि कला, साहित्य संस्कृती’ या लेखात मराठी भाषा माध्यमांचा अनुबंध स्पष्ट करताना भानू काळे यांनी मराठीची स्थिती गंभीर असल्याचे सत्य नोंदवले आहे. तसेच माध्यम व्यावसायिकांची प्रमाणभाषा आणि व्याकरणशुद्ध भाषेचा आग्रह धरला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केलीय. बोलभाषेचा आदर जरूर बाळगावा, पण प्रमाण मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी उदासीनता नको, असे त्यांच्या लेखातून स्पष्ट होते.

प्रा. कमल दीक्षित यांनी ‘पुनर्स्थापनेचा एक संकल्प’ या लेखात माध्यमांनी आकारास आणलेली नवी जीवनरूपे, संस्कृती, नीतिमूल्ये आणि विकास यांच्या तपासणीची आवश्यकता प्रतिपादन केलीय; तर प्रा. जयदेव डोळे यांनी संवाद माध्यमांचा आणि साहित्य संस्कृतीचा अनुबंध जोडताना जागतिकीकरणाचा परिप्रेक्ष्य अधोरेखित केला आहे. डोळे यांनी नेटमुळे ‘नकारात्मक वर्तना’चा प्रकार रूढ झाल्याचा धोका सांगितला आहे. यातून रुजणारा नवा सामाजिक रोग घातक ठरतो. माध्यमांनी जोडलेले लाखो लोक फॅसिस्ट शैलीने बांधले जाऊन एकाएकी उभे राहू शकतात. ‘जमावाचे आदर्श’ आडमाप सामाजिक विकोपाला जन्म देतात, ही इतिहासाची साक्ष देऊन डोळे यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. याशिवाय या ग्रंथात श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचे विविध पैलू डॉ. निशिकांत मिरजकर आणि डॉ. रवींद्र शोभणे यांनी उलगडून दाखवले आहेत.

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते लेखक कार्यकर्ता आहेत. त्यांची व्यापक व समग्र जीवनदृष्टी कवितेच्या कक्षा व मर्यादा ओलांडून जीवनाच्या अनेक घाटांतून, माध्यमांमधून कृतिशीलरीत्या व्यक्त होते. सहिष्णू, विवेकी, धर्मनिरपेक्ष समाज निर्मितीच्या चळवळीचेही ते एक अध्वर्यू आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाचा वेध ग्रंथाचे समन्वयक संपादक डॉ. विलास देशपांडे यांनी आपल्या प्राक्थनातून समर्थपणे घेतला आहे. तसेच समकाळाच्या सांस्कृतिक, साहित्यिक, भाषा आणि समाजजीवनाच्या स्थित्यंतराचा वैचारिक पातळीवरचा मोठा पट मांडण्यात या ग्रंथाचे संपादक डॉ. श्रीपाल सबनीस यशस्वी झालेले दिसतात.

त्यांच्या दीर्घ प्रस्तावनेतून त्यांनी घेतलेला सर्वस्पर्शी परामर्श आणि वैचारिक-प्रागतिक चिंतन सम्यकपणे आले आहे. संस्कृती प्रबोधनाच्या गाभ्याचे बहुआयामी चिंतन ‘यथार्थ’मधून आले आहे. त्यामुळे पारंपरिक गौरवग्रंथापेक्षा तो निराळा ठरतो.

चित्रकार नयन बाराहाते यांनी या गौरवग्रंथाची मांडणी अत्यंत कल्पक आणि सुबकपणे केली आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......