‘पॅरासाईट’ हा ऑस्कर विजेता सिनेमा बांडगुळं आणि अस्तित्वासाठी परोपजीवी झालेले प्राणी यातील फरक अधोरेखित करतो!
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अलका गाडगीळ
  • ‘पॅरासाईट’ची पोस्टर्स
  • Sat , 15 February 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा English Movie पॅरासाईट Parasite ऑस्कर Oscar बाँग जून हो Bong Joon-ho नागराज मंजुळे Nagraj Manjule महाश्वेता देवी Mahasweta Devi

‘पॅरासाईट’ या सिनेमाचं पहिलं दृश्य सिऊलच्या गरीब वस्तीतील तळघरात घडतं. किम कुटुंब एका तळखोलीत राहत असतं. त्याच्या खिडकीच्या वरच्या भागातून गल्ली आणि तिच्या दोन्ही बाजूंची एकमेकांना भिडलेली घरं दिसतात. पण आकाशाचा तुकडा मात्र या तळखोलीच्या खिडकीतून दिसत नाही.

पिझ्झा डिलिव्हरीसाठी लागणारा खोका तयार करण्याचं काम हे कुटुंब करत असतं. किम पती-पत्नी, केवीन हा त्यांचा तरुण मुलगा आणि त्याची बहीण जेसिका हे सगळे मिळून काम करत असतात. पण त्यांची कमाई मात्र तुजपुंजी असते. या रोजच्या रेट्यातून बाहेर कसं पडता येईल, यासंबंधीची चर्चा सुरू असताना केवीनला त्याचा मित्र भेटायला येतो. तो एका कामाची ऑफर घेऊन आलेला असतो. हा मित्र पार्क या धनिक कुटुंबातील दाहेया नावाच्या शाळकरी मुलीला इंग्लिश शिकवण्याचं काम करत असतो. पण शिक्षणासाठी परदेशी जाणार असल्यामुळे तो हे काम करू शकणार नसतो. पार्क कुटुंबातील मुलीची तो घेत असलेली इंग्लिशची शिकवणी केवीननं घ्यावी असं तो सुचवतो. केवीनसाठी ही एक पर्वणीच असते. अडचण एकच असते- फर्डं इंग्लिश येत असूनही डिग्री नसल्यामुळे पार्क कुटुंब आपल्याला स्वीकारेल का असा प्रश्न त्याला पडतो. पण त्यातूनही मार्ग निघतो. इंग्लिशमध्ये पदवी मिळाल्याचं अस्सल दिसणारं सर्टिफिकेट इंटरनेट कॅफेमध्ये तयार होतं.

पार्क कुटुंबात केवीन दाहेया पार्कची शिकवणी सुरू करतो. त्याच दिवशी दाहेयाच्या चोई ओ सूक या धाकट्या भावाला कलाशिक्षकाची जरुरी असल्याचं त्याला समजतं. या कुटुंबात प्रवेश केल्यानंतर एकामागोमाग एक बनाव करत आपल्या बहिणीची - जेसिकाची वर्णी लावण्यात केवीन यशस्वी होतो. चोई ओ सूक या धाकट्या भावाची चित्रं बघून आणि त्याचा अभ्यास करत असल्याचा आव आणून ‘ही चित्रं बघितल्यावर त्याच्या मनावर आघात झाल्याचं प्रतीत होतंय’ असं  आपलं ‘एक्सपर्ट’ मत जेसिका देते.

श्रीमती पार्कना चिंता वाटू लागते आणि बालमानसशास्त्राचं ज्ञान जेसिकाला असल्याची खात्री तिला वाटू लागते. पुढे जेसिका कुटुंबाच्या ड्रायव्हरवर संशय येईल असा डाव खेळते. ड्रायव्हरला नोकरीवरून काढलं जातं आणि तिचे वडील साँग काँग किम ड्रायव्हर म्हणून दाखल होतात. नंतर पार्क कुटुंबात कारभारीण म्हणून अनेक वर्षं काम करत असलेल्या मून ग्वाँग हिचाही काटा काढला जातो आणि तिच्या जागी श्रीमती किम दाखल होतात.

नवीन नेमलेले चारही जण एकाच कुटुंबातील आहेत हे पार्क यांना ठाऊक नसतं. श्रीमती किम हाउसकीपर असल्यामुळे त्यांना मालकांच्या घरी राहावं लागतं. एकाच वेळी चारही जणांची कमाई सुरू झाल्यामुळे किम कुटुंबीय आनंदात असतात. चारीठाव जेवण परवडू लागल्यामुळे त्यांच्या आनंदात भर पडते. पार्क कुटुंबही नव्या स्टाफमुळे आश्वस्त झालेलं असतं.

एके दिवशी पार्क कुटुंब पर्यटनासाठी बाहेरगावी रवाना होतं. ते गेल्यानंतर किम आई-बाबा आणि मुलं बंगल्याच्या ड्रॉइंग रूममध्ये बसून मौजमजा करतात. भरपूर दारू आणि खानपानाची व्यवस्था केलेली असते. दारू आणि चकण्यावर ताव मारत किम कुटुंबाची दिवाळी साजरी होत असते.

‘‘मिस्टर आणि मिसेस पार्क किती चांगले आहेत... त्यांचं वागणंही साधं सरळ असतं... संपत्ती असल्यामुळे त्यांच्या स्वभावात विनयशीलता आली असावी... मुबलक पैसे मिळाल्यामुळे त्यांच्या मनातील किल्मिषं दूर झाली असावी,’’ अशी चर्चा करत ते चौघे बंगल्यातील विस्तीर्ण फ्रेंच विंडोच्या बाहेर आशेनं बघतात. पैसे जमवून आपल्यालाही अशा घरात राहता येईल असं दिवास्वप्न ते बघतात.

पण पाहता पाहता क्षणार्धात वातावरणातील शांतता भंग होते. आभाळ भरून येतं आणि नंतर ते कोसळू लागतं. आतमध्ये बंगल्यातही प्रचंड मोठं वादळ येतं. किम कुटुंब एका वावटळीत सापडतं. दुसऱ्यांच्या श्रमांवर संपत्ती जमा करणारं पार्क कुटुंब आणि त्यांच्यावर अवलंबून असलेलं श्रमिक वर्गातील किम कुटुंब परजीवीच. परजीवीत्व सार्वत्रिक असतं, वैश्विक असतं, तसंच ते अस्वस्थ करणारंही असतं. ते कुठे नसतं?  

किम कुटुंब आळशी नसतं. ते आपल्या छोट्या छोट्या कामांसाठी आणि गरिबीतून मार्ग काढण्यासाठी खोटं बोलतात. अशी हाराकिरी केल्याशिवाय त्यांचा टिकाव लागू शकत नाही. त्यांना जगण्याची साधनं सहजाहजी मिळू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना धनिक वर्गावर अवलंबून राहावं लागतं. पार्क कुटुंब आपल्या अस्तिवासाठी कष्टकरी वर्गावर अवलंबून असतं. कष्टकऱ्यांच्या श्रमावरच त्यांच्या आयुष्याचा डोलारा उभा असतो. कष्टकरी मात्र तळघरात, भूमीच्या एक पातळी खाली राहतात.

अविरत पाऊस पडत असताना, शहराच्या सखोल भागात पूर आलेला असताना, गरिबांचं सर्वस्व वाहून जात असतानाही शहराच्या वरच्या भागात राहणाऱ्या पार्क कुटुंबाला आपल्या मुलाचा वाढदिवस धमाकेदार पद्धतीनं साजरा करायचा असतो! 

पुढे कथेमध्ये अनेक वळणं येतात. एकामागोमाग एक धक्कादायक गोष्टी कशा घडतात.

पडद्यावर दृश्यं झळकत असतानाच काही रूपकं उजागर होतात. ‘पॅरासाईट’मध्ये मनोरंजन आणि रूपकांचा मेळ अत्यंत विलक्षणरीत्या गुंफला गेला आहे. अस्तिवासाठीचं परजीवीत्व आणि सतत शोषण करणारं बांडगुळी जीवन, वरचा आणि खालचा मजला, प्रेम आणि निष्ठा, नैतिकता आणि अनैतिकता, गटारं, गरीब कष्टकरी माणासांच्या अंगांचा गंध आणि या गंधाचा तिटकारा असणारा वर्ग, अस्तित्वासाठी केलेला मामूली गुन्हा आणि सतत होणारं शोषण, सर्वनाश करणारा पाऊस आणि छळ-कपट दिसत असतानाही केलेला कानाडोळा, असे असंख्य प्रतीकात्मक पेच हा चित्रपट उभा करतो.

अखेरीस कोण परजीवी आहे, या विषयीचं ठसठशीत भाष्य हा सिनेमा केवळ दृश्यांतून करतो. शब्दांची गरज उरत नाही.

बाँग जून हो दिग्दर्शित हा सिनेमा पाहताना नागराज मंजुळेंच्या चित्रपटांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. वंचित वर्गाला आर्थिक आणि जातीय जुलमांना कसं सामोरं जावं लागतं, या विषयीचं खणखणीत भाष्य मंजुळे यांनी आपल्या चित्रपटांतून केलं आहे. बाँग जून हो आणि नागराज मंजुळे हे एकाच जातकुळीचे चित्रकर्ते आहेत, यात काही शंका नाही. पण आपला चित्रपट जागतिक पातळीवर नेण्यासाठी लागणारं आक्रमक मार्केटिंग, जाहिरात तंत्र, जनसंपर्काचे डावपेच आत्मसात केले आहेत. नागराज मंजुळेंसारख्या दिग्दर्शकांचे चित्रपटही जागतिक पातळीवर कसे नेले जातील आणि गाजवले जातील, याचा गंभीरपणे विचार व्हायला.  

चित्रपटातील पार्क आणि किम या कुटुंबाममधील प्रतीकात्मक द्वंदाच्या पार्श्वभूमीवर लेखिका-कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांच्या एका वचनाचा दाखला इथं द्यावासा वाटतो. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे - ‘‘वरचा वर्ग फक्त उपभोक्ता आहे, अनुत्पादक कामं करण्यात गुंतला आहे. काही उत्पादन करण्याची क्षमताच त्यांच्यात नाही.’’

वरच्या आणि मध्यमवर्गाच्या बांडगुळेपणाच्या जाणीवेचा धागा महाश्वेता देवी, बाँग जून हो आणि नागराज मंजुळे यांच्या पकडीत आला आहे!

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......