लेखक लिहीत राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. सृजनाचा व्यायाम
ग्रंथनामा - आगामी
डॉ. सुधीर रा. देवरे
  • ‘टिंबं’
  • Sat , 30 November 2019
  • ग्रंथनामा Granthnama आगामी टिंबं सुधीर देवरे

डॉ. सुधीर रा. देवरे यांची ‘टिंबं’ ही नवी कादंबरी लवकरच गोव्याच्या ‘सहित’ प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीचा काही अंश...

.............................................................................................................................................

सिनियर लेखकाशी ज्युनियरचं प्रत्यक्ष वा फोनवर बोलणं होत राहतं. प्रत्येक वेळी जशी मागची उजळणी होते तसे बोलण्यात नवे मुद्देही येत राहतात.

परवा सिनियर बोलता बोलता ज्युनियरला म्हणाले, ‘व्यायाम करतोस ना रोज?’

‘होय करतोय ना. जोरात चालण्याचा व्यायाम करतो. सूर्य नमस्कार नाही करत आता. झेपत नाही. शीर्षासन करायचो पण आता वय आणि वजन वाढल्यामुळे तेही नाही करत.’ असं म्हणून ज्युनियरने सिनियरला बोलायला स्पेस दिली.

स्पेस मिळताच सिनियर बोलू लागले, ‘बरोबर,  आता या वयात नाही करू शीर्षासन. मानेला त्रास होतो. एक कल्पना डोक्यात येऊन गेली परवा : जे अवयव हलवता येत नाहीत त्यांचा व्यायाम कसा करायचा. उदाहरणार्थ, काही अवयव सांगतो तुला. मुत्रपिंडाचा व्यायाम करता येईल का? कसा करायचा? माणसाला कान हलवता येत नाहीत. छोटे असतात ना म्हणून. बाकी प्राणी त्यांचे कान फडफडवतात. म्हणजे व्यायामच करतात ना कानांचा. माणसाला कानांचा व्यायाम कसा करतात, हे शोधून काढावं लागेल. कपाळाचा व्यायाम कोणालाच करता येत नाही. प्राण्यांनाही नाही. नाकाचा व्यायाम कसा करायचा. हृदय-काळीज, यकृत यांचा व्यायाम कसा करायचा? ज्या अर्थी आपण डोळ्यांचा व्यायाम करतो त्या अर्थी कपाळ, हृदय, यकृत, कान, नाक यांचा व्यायाम का करू नये? एका लेखकाने ‘यकृत’, ‘हृदय’ नावाची नाटके लिहिलीत हे माहिती आहे ना तुला?’

‘हो. श्याम मनोहर’ ज्युनियर म्हणाला.

‘बरोबर’

‘आतड्यांचा व्यायाम आपोआप होत असावा. जिभेचा व्यायाम आपोआप होतोय. दातांचा व्यायाम आपोआप होतो. नाकाचा आणि कानांचा आपोआप होतो की नाही मला माहीत नाही.’

‘कठीण आहे सगळं. खूप सुचतंय सर तुम्हाला’

‘हो, आणि हे कुठं द्यायचा प्रयत्न करू नकोस तू. फेसबुक, व्हॉटसअॅपबिटसअॅपवर देऊ नकोस. माझ्या नावासहीत द्यायचं झालं तरी देऊ नकोस. अशीच एकाशी फोनवर चर्चा केली आणि त्याने फेसबुकवर पोस्ट करून दिली. माझ्या नावानिशी. दिली तर दिली पोस्ट. माझी काही वाक्यं त्याच्या नावावर खपवून टाकली त्याने.’ सिनियर श्वास घेण्यासाठी थांबले. म्हणून ज्युनियर म्हणाला,

‘तुम्ही जे काही बोलतात ना वाचकांशी ते तुमच्या कादंबरीत येत असतं पुढं-मागं, हे मला माहीत आहे. म्हणून मी ते इतरत्र कुठं देत नाही आणि खाजगीतही सांगत नाही मित्रांना.’

‘हो मला माहीत आहे ते. विश्वास आहे तुझ्यावर. तू नाही देणार हे कुठं. हं, तर आपण काय बोलत होतो. व्यायामाविषयी. व्यायाम हा सर्वव्यापी आहे. शरीराच्या आतल्या आणि बाहेरच्या अवयवांच्या व्यायामाविषयी आपण बोलत होतो ना?’

‘हो सर’

सिनियर तंद्री लावत म्हणाले, ‘मेंदू आणि प्रतिभा हे काय आहे? मेंदू नावाचा आपल्या डोक्यात एक अवयव आहेच. पण प्रतिभा कुठं आहे? प्रतिभा हा अवयव नाही. मग लेखकात ती येते कुठून? मेंदूचा व्यायाम शक्य आहे. अनेक नवनवीन शोध हे मेंदूच्या व्यायामामुळेच शक्य झालेत असं म्हणता येईल. आणि कलांचा उद्‍गम हा प्रतिभेमुळे झाला. पण प्रतिभा कुठं आहे?’

सिनियर बोलायचे थांबले म्हणून ज्युनियर म्हणाला, ‘खूप गहन होत चाललंय सर.’

सिनियर सावकाश चिंतनात हरवून बोलू लागले, ‘हो. गहन आहेच रे हे सगळं. खूप खोल जावं लागतं. प्रतिभा हृदयात असते असं म्हणतात. आपणही गृहीत धरू तसं. गायक गाण्याचा रियाझ करतो. म्हणजे गाण्याचा व्यायामच ना. चित्रकार चित्रं काढण्याची सवय ठेवतो. म्हणजे चित्र काढण्याचा व्यायाम. लेखक लिहीत राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. आपण लेखक आहोत म्हणून लेखकावर फोकस करू. लेखक इतके श्रम करून लिहितो, त्या लिखाणाचं नेमकं काय होतं? कुठंतरी छापून येतं. नंतर त्याचं पुस्तक होतं. पण ते पुस्तक सर्वदूर पोचावं यासाठी आपण, प्रकाशक वा साहित्य रसिक काही खास प्रयत्न करतो का? लेखक जे लिहितो ते मर्यादित रसिकापर्यंतच पोचतं. आपल्या भाषेच्या लोकांपर्यंत पुस्तक सर्वदूर जाऊन धडकत नाही. एखाद्या घरी पोचतं, पण त्या घरातले सगळे लोक तरी ते पुस्तक वाचतात का? एखाद्या ग्रंथालयात पोचतं आणि तिथंच पडून राहतं ना नुसतं? सर्क्युलेट होत नाही. तुझं मी वाचायचं आणि माझं तू. हे साटंलोटंच झालं ना कॉलेजात एकमेकांना भाषणाला बोलवल्यासारखं.’

सिनियरला रिलिफ मिळावा म्हणून ज्युनियर मध्येच म्हणाला, ‘साहित्य वाचन चळवळ जोरात राबवायला हवी. मागे मी सांस्कृतिक दुष्काळाची डायरी लिहिली होती पहा. यावर भर द्यायला हवा.’

धागा पकडत सिनियर पुढे म्हणाले, ‘तसंच असं नाही, तेही बरोबर आहेच  परंतु जे लिहिलं जातं.. लिहून झालं आहे… छापून झालं आहे.. वितरीत झालं आहे... त्याची लागण का होत नाही दूर दूर पर्यंत? ते वादळासारखं पसरलं पाहिजे वेगानं, इतकं की एकानं वाचलं की त्याने दहा जणांना सांगून त्या दहा जणांनी झपाटून वाचलं पाहिजे. आणि त्यापुढे प्रत्येकाचे पुन्हा दहा दहा. दहाच का? दहाचे शंभर, शंभराचे हजार अशा रीतीने ...पुस्तकाची लागण झाली पाहिजे साथीच्या आजारासारखी. वाईट गोष्टी कशा स्प्रेड होतात सोशल नेटवर्कवरून तसं पुस्तकांचं झालं पाहिजे...’

सिनियर श्वासासाठी थांबताच ज्युनियर म्हणाला,

“तसं होतंही. पण ते लोकप्रिय साहित्याबद्दल होतं. अभिजात साहित्याबद्दल असं होत नाही. बाबा कदम जितके वाचले जातील तितके श्याम मनोहर वाचले जात नाहीत. गुलशन नंदा जितके वाचले जातात, तितके भालचंद्र नेमाडे वाचले जात नाहीत. दुसरा मुद्दा आजचे अनेक चांगले लेखक वाचकांना माहीत नाहीत. अजूनही अनेक वाचक ‘ययाती’, ‘मृत्यूंजय’, ‘स्वामी’ या पुस्तकांनाच मानदंड मानतात. काही लोक तर न वाचताच ही पुस्तकं वाचल्याची नावं सांगत राहतात.’

सिनियर नाहीतली मान हलवत म्हणाले, ‘तुझा हा मुद्दा मला तितकासा पटला नाही. कारण की, ‘ज्ञानेश्वरी’ कशी वाचली जाते अजूनही घराघरात? ‘तुकारामांची गाथा’ वाचली जाते ना अजून घराघरात? यावरही बोललं पाहिजे.’

ज्युनियरचे उत्तर तयार होते, ‘हो, सांगतो ना. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा घराघरात आजही वाचली जाते. पण त्याच्यातले काव्य वा तत्त्वज्ञान भिडतं म्हणून ती वाचली जात नाहीत. म्हणजे तत्त्वज्ञान वा काव्यानंदासाठी ती वाचली जात नाहीत. धार्मिक ग्रंथ म्हणून केवळ श्रद्धेने ती वाचली जातात हे खरं कारण. जर या ग्रंथांत अध्यात्म नसतं वा त्यांचे कर्ते संत नसते तर हे साहित्यही दुर्लक्षित झालं असतं इतर अभिजात साहित्याप्रमाणे.’

सिनियर कबूल करत म्हणाले, ‘तुझ्या म्हणण्यात तथ्य आहेच. नाही असं नाही. पण मला दुसरी शंका येते’

‘कोणती?’

‘अजून तशी लिखित कलाकृतीच निर्माण झाली नसेल कदाचित? आपल्या प्रतिभेची निर्मितीच कमी पडते की काय. लेखकाला लिहायच्या मर्यादा पडत असाव्यात? सृजनाचाही व्यायाम असायला हवा, तो कमी पडतो की काय, अशी शंका आहेच.’ प्रश्न उपस्थित करून सिनियर थांबले. 

विचारांची लिंक लावत ज्युनियर म्हणाला, ‘सृजनाचा व्यायाम असतोच. पण हे सुद्धा पूर्ण सत्य नाही. विलास सारंग, जी. ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे... ह्यांची निर्मिती कमी पडते असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. त्यांना मर्यादा आहेत असंही नाही. इतकं अभिजात लेखन येऊनही अनेक वाचकांना ते ऐकूनही माहीत नसेल तर आपण उपस्थित केलेला मुद्दा बरोबर नाही असं मला वाटतं, तेव्हा…’ ज्युनियरने आपले म्हणणे अर्ध्यावर सोडून दिलं. यावर सिनियर काही बोलत नाहीत म्हणून ज्युनियर मनात म्हणाला,

‘वाचन ही जीवनावश्यक गरज नाही असं म्हणता येईल...’

.............................................................................................................................................

लेखक डॉ. सुधीर रा. देवरे भाषा, कला, लोकवाड्‍मय, लोकसंस्कृती आणि लोकजीवनाचे संशोधक आहेत.

sudhirdeore29@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......