देविकाराणीचे जीवन अक्षरशः वादळी होते. त्यांच्या जीवनावर नाटक येणे अपरिहार्यच होते!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘देविकाराणी : गॉडेस ऑफ सिल्वर स्क्रीन’चे एक पोस्टर
  • Sat , 21 September 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe देविकाराणी : गॉडेस ऑफ सिल्वर स्क्रीन Devika Rani: Goddess of the Silver Screen इरा दुबे Ira Dubey लिलेट दुबे Lillete Dubey

भारतीय चित्रपटसृष्टीला वैभवशाली इतिहास आहे आणि तो घडवण्यात समाजातील अनेक घटकांचा हातभार लागलेला आहे. यात स्त्रियांसुद्धा मागे नव्हत्या. जेव्हा चित्रपटाच्या क्षेत्रात स्त्रिया अभावानेच आढळत, त्या काळी देविकाराणीने (१९०८-१९९४) चित्रपटांत भूमिका तर केल्याच, शिवाय पतीच्या मृत्यूनंतर जवळजवळ पाच वर्षे ‘बॉम्बे टॉकिज’ हा चित्रपटनिर्मिती करणारा मुंबईस्थित स्टुडिओ चालवला. देविकाराणीचे जीवन अक्षरशः वादळी होते. त्यांच्या जीवनावर नाटक येणे अपरिहार्यच होते. मुंबईतील नामवंत नाट्यसंस्था ‘प्राईम टाईम थिएटर’तर्फे अलिकडेच ‘देविकाराणी : गॉडेस ऑफ सिल्वर स्क्रीन’ हे सुमारे दोन तास चालणारे इंग्रजी नाटक मंचित करण्यात आले.

आजच्या पिढीला देविकाराणीबद्दल फारशी माहिती नसेल, म्हणून तिच्याबद्दल थोडक्यात माहिती करून घेणे क्रमप्राप्त आहे. यावरून नाटकात तिच्या वादळी जीवनातील कोणता भाग घेतला आहे वगैरे समजायला सोपे होईल. लंडनस्थित किश्वर देसाई देविकाराणीचे चरित्र लिहीत आहेत. त्यांची व लिलेट दुबे यांची गाठ पडली. लिलेटला देविकाराणीच्या जीवनकहाणीत नाट्य दिसले. त्यांनी किश्वर देसाईंना नाटक लिहिण्याची सूचना केली. त्यातून या नाटकाचा जन्म झाला. हे चरित्र नाटक आहे. यात देविकाराणीच्या जीवनातील महत्त्वाची २० वर्षे घेतली आहेत. नाटक सुरू होते, तेव्हा देविकाराणी १७ वर्षांची असते; तर नाटक संपते तेव्हा तिचे वय ३७ वर्ष असते.

रवींद्रनाथ टागोरांच्या नात्यातील १७-१८ वर्षांची देविकाराणी त्या काळातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय सुंदर स्त्रियांप्रमाणे लंडनला वास्तुशास्त्र शिकायला गेली होती. तिथे तिची ओळख हिमांशू रॉय (१८९२-१९४०) या तरुणाबरोबर झाली. हिमांशू किंवा देविकाराणी, ज्याला बंगाली भाषेत ‘भद्रलोक’ म्हणतात अशा सामाजिक/आर्थिक वर्गातले. हिमांशू लंडनमध्ये बॅरिस्टर व्हायला गेलेला असतो, पण लवकरच तो चित्रपटसृष्टीच्या प्रेमात पडतो. १९३०च्या दशकात भारतातील कुलीन स्त्रिया चित्रपटात भूमिका करत नसत. म्हणून मग अतिशय सुंदर व बुद्धिमान देविकाराणी हिमांशूला चित्रपटाच्या निर्मितीत मदत करते. यथावकाश ते लग्न करतात व भारतात परततात.

भारतात परत आलेल्या या युगुलासमोर एक भव्यदिव्य स्वप्न असते. ते म्हणजे चित्रपटनिर्मितीसाठी पाश्चात्य देशांच्या धर्तीचा एक व्यावसायिक स्टुडिओ उभारायचा. त्या हेतूने ते मुंबईतील मालाड या उपनगरात १९३४ साली ‘बॉम्बे टॉकिज’ हा अत्याधुनिक स्टुडिओ उभारतात. त्यासाठी हिमांशू एक लिमिटेड कंपनी स्थापन करतो. ‘बॉम्बे टॉकिज’चे शेअर मुंबई स्टॉक एक्सचेंजवर विकले\खरेदिले जातात. चित्रपटनिर्मितीला व्यावसायिक रूप देण्याचे श्रेय हिमांशू रॉयचे.

देविकाराणीसारखी सुंदर कलावंत स्त्री चित्रपटांत नंतर भूमिका करायला लागते. तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे ‘जवानी की हवा’ (१९३५) व ‘जीवन नैय्या’ (१९३६). तिचा अतिशय गाजलेला चित्रपट म्हणजे ‘अछुत कन्या’. हा चित्रपट १९३६ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अक्षरशः इतिहास घडवला. याच चित्रपटाद्वारे एक तरुण नट रसिकांसमोर आला, जो नंतर ‘अशोककुमार’ या नावाने प्रसिद्ध झाला.

कोणत्याही व्यवसायात असतात तसे चढउतार चित्रपट व्यवसायातही असतात. उलटपक्षी असेही दाखवून देता येते की, चित्रपट व्यवसायात जेवढे चढउतार असतात, तेवढे इतर व्यवसायात नसतात. ‘बॉम्बे टॉकिज’चा बॅनर फडकत राहावा यासाठी देविकाराणीला प्रसंगी स्वतःचे दागदागिने विकावे लागतात. हिमांशूची चित्रपटनिर्मितीबद्दल भव्यदिव्य स्वप्ने असतात. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाअगोदर जर्मनीतून चित्रपट तंत्रज्ञ आणले होते. त्यांच्या काही चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणजे फ्रान्झ ओस्टेन हा जर्मन दिग्दर्शक. त्याने ‘बॉम्बे टॉकिज’च्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

चित्रपटांबद्दल असे स्वप्न बाळगणाऱ्या हिमांशूचे युरोपात असताना काही स्त्रियांशी संबंध आले होते. यातील एक जर्मन स्त्रीला तर हिमांशूपासून अपत्य झालेले होते. ती हिमांशूचा माग काढत भारतात दाखल होते. हिमांशूच्या भानगडी बघून देविकाराणीचा भ्रमनिरास होतो. पती-पत्नीत खटके उडायला लागतात. देविकाराणी एका सहकलाकाराच्या नजम हसनच्या प्रेमात पडते आणि त्याच्याबरोबर पळून जाते. ‘बॉम्बे टॉकिज’ची स्टार नायिकाच उपलब्ध नाही म्हटल्यावर या स्टुडिओच्या चित्रपटनिर्मितीवर परिणाम व्हायला लागतो. सरतेशेवटी हिमांशू देविकाराणीची समजूत काढून तिला परत आणतो.

थोड्याच काळात दुसरे महायुद्ध सुरू होते आणि भारतात काम करणाऱ्या जर्मन तंत्रज्ञांना देश सोडून जावे लागते. हे तंत्रज्ञ म्हणजे ‘बॉम्बे टॉकिज’चा प्राणवायू होते. हे सर्व ताणतणाव सहन न होऊन हिमांशू १९४० साली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरतो. तेव्हा त्याचे वय असते अवघे ४८. हिमांशू मृत्यूच्या आधी देविकाराणीकडून वचन घेतो की, कोणत्याही परिस्थितीत ‘बॉम्बे टॉकिज’ बंद पडू द्यायचा नाही. तो फक्त स्टुडिओ नव्हता तर एक भव्य स्वप्न होते. त्या काळी ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये लीला चिटणीस, दिलीपकुमार, मधुबाला वगैरे पुढे नावारूपाला आलेली मंडळी होती. १९४३ साली शशधर मुखर्जी व अशोककुमार ‘बॉम्बे टॉकिज’तून बाहेर पडून ‘फिल्मिस्तान’ हा स्टुडिओ सुरू करतात.

देविकाराणी हिमांशूच्या मृत्युनंतर ‘बॉम्बे टॉकिज’ सावरते. त्या काळी ही अगदीच जगावेगळी गोष्ट होती. देविकाराणीने तब्बल सहा वर्षे ‘बॉम्बे स्टुडिओ’ यशस्वीपणे चालवला. या दरम्यान ती स्वेटो स्लाव्हरोरिच या रशियन चित्रकाराच्या प्रेमात पडते. त्यानंतर स्टुडिओ विकते आणि स्लाव्हरोरिचशी लग्न करून मनाली या थंड हवेच्या ठिकाणी उर्वरित आयुष्य घालवते. देविकाराणीचा मृत्यू १९९४ साली झाला.

असे हे वादळी जीवन रंगमंचावर आणणे मोठे आव्हान होते. लिलेट दुबेंच्या नाट्यसंस्थेने हे आव्हान लीलया पेलले आहे. या नाटकाची निर्मितीमूल्ये फार वरच्या दर्जाची आहेत. लिलेट दुबे यांनी नेपथ्यकार सलीम अख्तर यांच्या मदतीने अतिशय उपयुक्त सेट उभारला. यात लंडनमधील प्रसंग, मुंबईतील घटना, हिमांशू-देविकाची बेडरूम वगैरे सर्व महत्त्वाचे प्रसंग सादर केले जातात. सलीम अख्तर यांनीच प्रकाशयोजनेची जबाबदारी स्वीकारली आहे. पार्श्वसंगीत ओंकार पाटील व वेशभूषा पिया बेनेगल यांची आहे.

देविकाराणीच्या भूमिकेतील इरा दुबे यांनी काही गाणी गायली आहेत. उदाहरणार्थ, ‘अछुत कन्या’तील ‘मैं बन को पंछी’. इरा दुबेंनी देविकराणीच्या भूमिकेत जान ओतली आहे. १७ वर्षांची अल्लड देविकाराणी, प्रियकराबरोबर पळून गेलेली देविकाराणी, पुरुषी वर्चस्व असलेल्या जगात ‘बॉम्बे टॉकिज’ खमकेपणी चालवणारी देविकाराणी आणि उत्तर आयुष्यात रशियन चित्रकाराच्या प्रेमात पडलेली देविकाराणी, या भूमिकेतील सर्व चढउतार या गुणी नटीने समर्थपणे व्यक्त केले आहेत.

अलिकडेच ‘गौहर’मधील त्यांची गौहरजानची भूमिका बघण्याची संधी मिळाली होती. ती भूमिका उजवी होती की, आता सादर केलेली देविकाराणी उजवी, असा मनात वाद निर्माण झाला, इतक्या या दोन्हीही भूमिका इरा दुबेने जबरदस्त सादर केल्या.

जॉयसेन गुप्ता हा गुणी नट हिमांशू रॉयच्या भूमिकेत आहे. त्याने सुरुवातीला लंडनमधील मजामारू हिमांशू व नंतर मुंबईत ‘बॉम्बे टॉकिज’ स्थापन करणारा गंभीर प्रवृत्तीचा हिमांशू, हे बदल आवाजातील चढउतार, संवादफेकीचा वेग, चालण्याची ढब बदलून व्यक्त केले आहेत. या दोघांच्या साथीला मार्क बेगिंग्टन (फ्रान्झ ओस्टेन व स्वेटो स्लाव्हरोरिच), प्रणव सचदेव (अशोक कुमार), कश्यप शंगारी (नजम हसन) वगैरेंनी उत्तम साथ दिली आहे. या सर्वांमुळे ‘देविकाराणी : गॉडेस ऑफ द सिल्वर स्क्रीन’ बघणे आनंददायक ठरते.

सुमारे २५ वर्षांपूर्वी मुंबईच्या ‘एनसीपीए’मध्ये ‘थ्रो ऑफ डार्इस’ (१९२९), ‘शिराझ’ (१९२८) वगैरे मुकपट दाखवले होते. मुकपटाच्या काळी पडद्याखाली वाद्यवृंद बसून पडद्यावर सुरू असलेल्या मुकपटाला पार्श्वसंगीत देत असे. एनसीपीएत जेव्हा हे मुकपट दाखवले, तेव्हासुद्धा वाद्यवृंद पडद्याच्या खाली बसून पार्श्वसंगीत देत होता. ‘देविकाराणी’ हे नाटक बघताना का कोण जाणे पण सतत तो प्रसंग आठवत होता. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती हिमांशू रॉय यांची होती. ‘शिराझ’च्या भूमिकेत व ‘थ्रो ऑफ डाईस’मध्ये सोहनच्या भूमिकेत हिमांशू रॉय होते, तर या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन फ्रान्झ ओस्टेन यांनी केले होते.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......