आपण विज्ञानाची ‘सृष्टी’ घेतली, पण विज्ञानाची ‘दृष्टी’ घेतली नाही! विज्ञानाची ‘करणी’ घेतली, पण विज्ञानाची ‘विचारसरणी’ घेतली नाही!
ग्रंथनामा - झलक
नरेंद्र दाभोलकर
  • ‘विवेकाचा आवाज’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 20 August 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar अंधश्रद्धा निर्मूलन Andhashraddha Nirmoolan विवेकाचा आवाज Vivekacha Aavaj

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अर्ध्वयू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज सहावा स्मृतिदिन. समाज विवेकनिष्ठ आणि समाजनिष्ठ व्हावा यासाठी आपल्या प्राणांची कुरवंडी ओवाळली, सहा वर्षांपूर्वी पुण्यात त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांचे मारेकरी शोधण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले असले तरी त्यामागचा ‘मास्टर माइंड’ मात्र अजूनही मोकाटच आहे. 

आज संध्याकाळी पुण्यात दाभोलकरांची १० भाषणे असलेल्या ‘विवेकाचा आवाज’ या पुस्तकाचे प्रकाशन दै. ‘हिंदू’चे संचालक आणि माजी संपादक-पत्रकार एन. राम यांच्या हस्ते होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

२५ जानेवारी १९५० रोजी मला जी घटना मिळाली, त्यात फक्त नागरिकांचे हक्क होते. म्हणजे मला संचार-स्वातंत्र्याचा हक्क आहे, मी देशामध्ये कुठेही फिरू शकतो. मला अभिव्यक्तीचा हक्क आहे, मी पाहिजे ते बोलू शकतो. मला मालमत्ता धारण कण्याचा हक्क आहे, मी मालमत्ता खरेदी करू शकतो. परंतु मुलं मोठी झाल्यावर आपण त्यांना जसं सांगतो की, ‘तुम्हांला हक्क मिळतील, पण तुम्हांला कर्तव्यंही पार पाडावी लागतील’, त्याच पद्धतीने १९७६ साली देशाच्या घटनेमध्ये वाढ करून, तिच्यामध्ये नागरिकांच्या कर्तव्यांचा समावेश कण्यात आला. त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे - It is a duty of every indian citizen to promote scientific temperament. म्हणजे, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा (Scientific Temperament) विचार, प्रसार आणि अंगीकार करणं, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या, नागरिकाने वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विचार, प्रसार आणि अंगीकार करावा की करू नये, असं त्याला विचारलेलं नाहीये; ते त्याचं कर्तव्च आहे. एवढंच नव्हे, तर त्याच्यानंतर १९८७ साली देशाचं नवं शैक्षणिक धोरण आलं. या शैक्षणिक धोरणामध्ये ‘वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती’ या महत्त्वाच्या गाभाघटकाचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मूल्यशिक्षण शिकवलं जातं. शालेय मूल्यशिक्षणामध्येही ‘वैज्ञानिक दृष्टीकोना’च्या जोपासनेची नोंद केलेली आहे.

तर, एवढा महत्त्वाचा असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय, हे मला एका शब्दात कोण सांगेल?

‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ याचा एका शब्दामध्ये अर्थ - कार्यकारणभाव तपासणं! प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं. ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजतात, असं नाही; पण ती ज्या वेळी समजतील, त्या वेळी ती कशी समजतील, हे कार्यकारणभावामुळे मला समजतं. यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला लाभलेला हा सर्वांत खात्रीचा मार्ग आहे!

वैज्ञानिक दृष्टीकोन कळेपर्यंत माणूस या सृष्टीमधला दुबळा प्राणी होता. तर विचार असा केला पाहिजे की, माणूस नावाचा एवढा दुबळा प्राणी या सृष्टीचा स्वामी झाला कसा? लोक असं म्हणतात, ‘तो सृष्टीचा स्वामी झाला, कारण त्याने आपली विचारशक्ती आणि बुद्धी या दोन्हीही गोष्टी वापरायला सुरुवात केली.’ मग मी त्यांना असं विचारतो, ‘सगळ्यांनाच बुद्धी आहे - हत्तीला बुद्धी आहे, म्हणून तो सर्कशीमध्ये काम करतो; कुत्र्याला बुद्धी आहे, म्हणून तो पोलीस खात्याला उपयोगी पडतो; डॉल्फिन माशाला तर चौथीतल्या पोराएवढी अक्कल आहे; तो पाणसुरुंग शोधून काढतो आणि बोटींना मार्गही दाखवतो; मग माणूसच बुद्धिमान कसा?’

लक्षात घ्या, माणूस या जगामध्ये फक्त पाच लाख वर्षांपूर्वी आला. माणसाचं शास्त्रीय नाव आहे, ‘मॅन द होमो सेपिअन!’ खरं तर त्याचं पूर्ण शास्त्रीय नाव आहे, ‘मॅन द होमो सेपिअन सेपिअन.’ आता ‘होमो’ म्हणजे ‘प्राणी’, ‘सेपिअन’ म्हणजे ‘शहाणा’. मग इतका दुबळा प्राणी शहाणा झाला कसा? माणूस निर्माण झाला पाच लाख वर्षांपूर्वी. माणसाचे पूर्वज असलेले गोरिला किंवा ओरांग उटांग, चिंपँझी, एप हे निर्माण झाले दीड कोटी वर्षांपूर्वी. ज्या प्राण्यांमध्ये मादी पिल्लाला जन्म देते आणि दुग्धाद्वारे त्याचं पोषण करते, ते हत्ती, वाघ, सिंह यांसारखे सस्तन प्राणी निर्माण झाले तीन कोटी ऐंशी लाख वर्षांपूर्वी. अंदाजे चार कोटी वर्षांपूर्वी हत्ती निर्माण झाला आणि त्याचं वजन आहे ४००० किलो आणि मक्त पाच लाख वर्षांपूर्वी माणूस निर्माण झाला अन् त्याचं वजन आहे ६० किलो. मग ‘तुलनात्मकरित्या’ कुणाचा मेंदू मोठा असला पाहिजे”, असा प्रश्न विचारल्यानंतर लोक विचारात पडतात. कारण त्यांना माहीत असतं की, माणसाच्या मेंदूचं वजन साधारणपणे १३५० ते १५०० ग्रॅम म्हणजे दीड किलो आहे आणि त्याच्या शरीराचं वजन ६० किलो आहे. म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रमाणामध्ये एक टक्का ते दीड टक्का एवढं माणसाच्या मेंदूचं वजन आहे; आणि ४००० किलो वजन असलेल्या हत्तीच्या मेंदूचं वजन आहे, मक्त चार किलो! म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रमाणामध्ये १/१० टक्के!

आता आपल्यासमोरचा खरा प्रश्न असा की, हत्तीपेक्षा माणसाचा मेंदू इतका मोठा झाला कसा? मी जर असं म्हटलं की, माणूस हा देवाचा अत्यंत लाडका प्राणी आहे. त्याने रोज झाडाखाली बसून देवाची प्रार्थना केली की, ‘हे देवा - अक्कल दे, अक्कल दे, अक्कल दे’ आणि मग देव प्रसन्न झाला, त्याने माणसाला अक्कल दिली आणि माणसाचा मेंदू हळूहळू वाढला; तर तुम्ही सगळे जण हसाल. पण तुम्ही श्री गणपतीला मानता. गजानन हा बुद्धीचा देव आहे, असं मानता. त्याचं मस्तक हत्तीचं आहे, हे तुम्हांला माहीत आहे. मग बुद्धीचा देव असलेल्या गजाननाने हत्तीला बुद्धी न देता माणसाला बुद्धी दिली, याचं इंगित काय आहे?

कशामुळे माणसाचाच मेंदू वाढला आणि अन्य कुठल्याही प्राण्यांचा मेंदू वाढला नाही? याचं उत्तर असं की, उत्क्रांतीमध्ये - लक्षात घ्या, माणूस हा एक प्राणीच आहे. त्यामुळे आपण ‘मनुष्य प्राणी’ असं म्हणतो. सगळ्या प्राण्यांसारखेच माणसालाही पंजे आहेत - माणसाचा अंगठा सुटा झाला, माणसाच्या पंज्याची बोटं सुटी झाली, माणूस आपला अंगठा आपल्या बोटांवर टेकवायला लागला, त्याने स्वतःच्या दहा बोटांचं हत्यार किंवा अवजार केलं आणि आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. ही प्रक्रिया करता-करता त्याचा मेंदू वाढत गेला. या प्रक्रियेत काही हजार वर्षं गेली. मग माणसाने खालचा दगड उचलला. उचललेल्या दगडाला धार लावली. धार लावलेल्या दगडाला झाडाची मांदी तोडून जोडली आणि ‘कुऱ्हाड’ नावाचं प्राथमिक हत्यार केलं. नंतर हे हत्यार हळूहळू विकसित झालं. त्यानंतर निसर्गावर प्रक्रिया कण्याची माणसाची क्षमता वाढली आणि त्यामुळे त्याच्या मेंदूचा आणखी विकास झाला. मग काही हजार वर्षं गेली. माणसाने धातू शोधून काढला. नंतर त्याने धातूची अवजारं तयार केली. त्या अवजारांच्या आधारे प्रक्रिया करण्याची माणसाची क्षमता आणखी सुधारली. त्याचा मेंदू आणखी वाढला. लक्षात घ्या, श्रमाच्या द्वारे माणूस निसर्गावर प्रक्रिया करायला लागला आणि त्याचा मेंदू वाढला.

माणसाची व्याख्या ‘विचार करणारा प्राणी’ अशी नाही, कारण सगळेच प्राणी विचार करतात. माणसाची व्याख्या आहे - Man is tool making animal. म्हणजे माणूस हा ‘हत्यार’ किंवा ‘अवजार’ निर्माण करणारा प्राणी आहे. माणसासकट सगळेच प्राणी आधी चार पायांवर होते; मनुष्य नंतर दोन पारांवर आला. त्याने पुढच्या दोन पायांचं हातांमध्ये रूपांतर केलं आणि त्या हातांच्या आधारे निसर्गावर प्रक्रिया सुरू केली. पण ज्या वेळेला तो ताठ झाला, त्या वेळेला त्याचं स्वरेंद्रिय वर सरकलं. माणसाच्या स्वरेंद्रियाची जेवढी कंपनं होतात, तेवढी कंपनं अन्य कुठल्याही प्राण्याच्या स्वरेंद्रियाची होत नाहीत. त्यामुळे माणसाने भाषा शोधून काढली. मग एका बाजूला श्रमांद्वारे निसर्गाशी संवाद आणि दुसऱ्या बाजूला भाषेद्वारे माणसांशी संवाद यांच्यामुळे माणसाचा मेंदू वाढला; कुठल्याही देवाची पूजा-अर्चा करून, जप-जाप्य करून, यज्ञयाग करून त्याचा मेंदू वाढला नाही.

माणसाचं शास्त्रीय पूर्ण नाव आहे, ‘मॅन द होमो सेपिअन सेपिअन.’ म्हणजे शहाणा - आणि अतिशहाणा नाही - आणि अधिकाधिक शहाणा होत चाललेला माणूस. मग माणसाला शहाणं बनवणारा हा ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ आधुनिक अर्थाने आपल्या देशामध्ये कधी आला? जगामध्ये कधी आला? खरं म्हणजे, आपल्याकडे चार्वाक आणि बुद्ध यांच्या काळापासून प्राथमिक स्वरूपामध्ये कार्यकारणभाव अस्तित्वात होताच; पण आधुनिक कालखंडाचा विचार करता आणि आधुनिक अर्थाने साधारणपणे ४०० ते ५०० वर्षांपूर्वी युरोपमध्ये ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ आला. त्याला ‘कोपर्निकस रिव्होल्यूशन’ म्हणतात, हे आपल्याला माहीत असेल.

कोपर्निकसने गणित मांडून पहिल्यांदा दाखवलं की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं वाटत असलं, तरी खरं तर पृथ्वीच सूर्याभोवती फिरते. ही गोष्ट आर्यभट्टाने कोपर्निकसच्या आधी १००० वर्षं भारतात सांगितलेली होती, मात्र ती आपण टिकवून धरू शकलो नाही; पुढं नेऊ शकलो नाही; आर्यभट्टाला मान देऊ शकलो नाही. आर्यभट्टानंतर जवळजवळ १००० वर्षांनी कोपर्निकसने ही गोष्ट सांगितली. त्याच्याकडे युरोपमध्ये लक्षच देण्यात आलं नाही; परंतु गॅलिलिओ निर्माण झाला आणि गॅलिलिओने १६०९ साली दुर्बीण शोधून काढली. त्या वेळी तो शोध अत्यंत क्रांतिकारी होता. दूर समुद्रामध्ये असलेली जहाजं या दुर्बिणीमुळे जवळ आल्यासारखी दिसायची. ‘या माणसाने असा विलक्षण शोध लावलेला आहे की, शत्रूचं जहाज लांब असतानादेखील जवळ आल्यासारखं दिसेल’, असं देशोदेशीच्या राजदूतांनी आपल्या राजाला कळवायला सुरुवात केली. गॅलिलिओचं कौतुक झालं; पण गॅलिलिओला एक दुर्बुद्धी झाली. त्याने ती दुर्बीण वर आकाशाकडे वळवली आणि लोकांना दाखवायला सुरुवात केली की, ‘लोक हो, बघा, मी तुम्हांला दाखवतो, चंद्र हा काही सुंदरीच्या मुखासारखा नाहीये, त्याच्यावर दऱ्याखोऱ्या आहेत. लोक हो, मी तुम्हांला दाखवतो, सूर्य अम्लान नाहीये, त्याच्यावर काळे डाग आहेत. लोक हो, या आणि बघा, मी तुम्हांला दाखवतो, चंद्राला जशा कला आहेत, तशा शुक्राला कला आहेत. लोक हो, या आणि बघा, मी तुम्हांला दाखवतो, चंद्र हा जसा पृथ्वीचा उपग्रह आहे, त्याप्रमाणे गुरू या ग्रहाला तब्बल तीन उपग्रह आहेत.’

मला खात्री आहे की, माझं हे भाषण ऐकणाऱ्यांपैकी बहुधा एकाने किंवा फारच थोड्यांनी गुरूचे उपग्रह बघितलेले आहेत, शुक्राच्या कला बघितलेल्या आहेत, सूर्यावरचे डाग बघितलेले आहेत किंवा चंद्रावरच्या दऱ्याखोऱ्या बघितलेल्या आहेत.

हे गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी सांगितलं, पण गॅलिलिओचं कौतुक झालं नाही. ख्रिश्चन धर्मपीठाचा सर्वोच्च गुरू म्हणजे पोप. त्या पोपने गॅलिलिओला ख्रिश्चन धर्मपीठासमोर हजर राहण्याची आज्ञा केली. त्या पोपचं नाव होतं, आठवा अर्बन. तो गॅलिलिओचा मित्र होता. पोप स्वतः शास्त्रज्ञ होता. ही आज्ञा गॅलिलिओपर्यंत पोहोचली, त्या वेळी तो आजारी होता आणि म्हणून त्याने विनंती केली, ‘मी बरा झाल्यानंतर येतो’; पण शास्त्रज्ञ असलेल्या आणि मित्र असलेल्या पोपने आज्ञा केली, ‘तुला जर येता येत नसेल, तर साखळबंदांनी जेरबंद करून, घोड्यावर टाकून तुला हजर करावं लागेल, इतका तू केलेला गुन्हा गंभीर आहे.’

मग गॅलिलिओ व्हॅटकिनमध्ये पोहोचला; ख्रिश्चन धर्मसभा भरली. सगळे बिशप आणि कार्डिनल बसलेले होते; पोप बसलेला होता. समोर गॅलिलिओला उभं करण्यात आलं आणि त्याच्यावर दोन आरोप ठेवण्यात आले. पहिला आरोप – ‘तू खोटारडा आहेस’. खोटारडा का? कारण ‘आम्ही रोज बघतो की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि तू मात्र सांगतोस की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यामुळे तू खोटारडा आहेस.’ दुसरा आणि अधिक गंभीर आरोप – ‘तू पाखंडी आहेस’. पाखंडी याचा अर्थ, खऱ्या धर्मश्रद्धेला न मानणारा. खरी धर्मश्रद्धा म्हणजे ‘बायबल’मध्ये लिहिलेली. त्यामध्ये लिहिलेलं आहे, ‘आकाशातल्या दयाळू बापाने माणसाला दिवसा प्रकाश मिळावा म्हणून सूर्य आणि रात्री शीतल चांदणं मिळावं म्हणून चंद्र अशी सूर्य-चंद्राची दोन झुंबरं आकाशामध्ये लटकवलेली आहेत’; आणि युरोपमध्ये सतराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हे शिकवलं जात होतं.

लक्षात घ्या, त्या वेळी युरोपमध्ये विज्ञानाचा प्रसार जरी बऱ्यापैकी झालेला असला, तरी त्या वेळी अ‍ॅरिस्टॉटलचं वाक्य युरोपमध्ये प्रमाण मानलं जात होतं. असं म्हटलं जायचं की, Aristotal was the master of all who knows - ज्यांना ज्यांना जे काही कळतं, त्या सगळ्यांच्या बुद्धीचा समन्वय हा शेवटी अ‍ॅरिस्टॉटलपर्यंत जाऊन पोहोचतो. अ‍ॅरिस्टॉटलने दोन कारणं सांगितलेली होती. त्यांपैकी एक होतं, efficient cause. म्हणजे ‘कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न’; परंतु दुसरं होतं, final caus. म्हणजे, ‘आकाशातल्या बापाची इच्छा’. त्यामुळे गॅलिलिओला सांगण्यात आलं की, ‘तू बायबलच्या विरोधात बोलतोयस. त्याच्यामुळे तू माफी माग.’

हा प्रसंग भाषणांमध्ये सांगितल्यानंतर मी अनेकदा विचारतो, “तुमची माहिती काय आहे? गॅलिलिओने माफी मागितली की मागितली नाही?” आणि लोक बहुधा सदिच्छेपाटी सांगतात, ‘गॅलिलिओने माफी मागितली नाही’. इतिहास असं सांगतो, ‘गॅलिलिओने गुडघे टेकले. बिनशर्त माफी मागितली. त्याने स्वतःच्या तोंडात मारून घेतलं आणि म्हणाला, “माझं चुकलं. पुन्हा मी असं वेडंवंगाळ बोलणार नाही. तुम्ही म्हणता, तेच खरं आहे. सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो.”

आता आज आपण पहिलीमधल्या विद्यार्थ्याला शिकवतो की, जरी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसत असलं, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मग हे सिद्ध करणाऱ्या गॅलिलिओने माफी का मागितली? कारण त्याच्या आधी फक्त २५ वर्षं बमुनो नावाच्या शास्त्रज्ञाला हेच बोलल्याबद्दल आणि बोललेलं म्हणणं मागे न घेतल्याबद्दल खांबाला बांधून जिवंत जाळून मारण्यात आलेलं होतं. गॅलिलिओची तेवढी हिंमत नव्हती. गॅलिलिओने माफी मागितली, म्हणून तो आजन्म कारावासाच्या शिक्षेवर सुटला. शेवटची सात वर्षं तर तो आंधळा होता आणि त्याला एकान्त कारावासाची शिक्षा देण्यात आलेली होती.

.............................................................................................................................................

हेही वाचा

स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - डॉ. नरेंद्र दाभोलकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3065

‘हत्या’ करून ‘विचार’ मारता येत नाही, हेच गेल्या पाच वर्षांनी दाखवून दिलं आहे! - संपादक, अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/2425

खरंच सापडला का हो दाभोलकरांचा मारेकरी? - निखिल वागळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/2423

ज्ञानविज्ञानासाठी प्राणांची कुरवंडी ओवाळणारा महाराष्ट्रातला पहिला हुतात्मा - विनोद शिरसाठ

https://www.aksharnama.com/client/article_detail/1186

डॉ. नरेंद्र दाभोलकर : आगरकरांचा वारसदार - राजा पिंपरखेडकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/1188

.............................................................................................................................................

आपण विचार करा की, हे का घडलं? हे घडलं याचं कारण, गॅलिलिओ धर्ममार्तंडांच्या विरोधामध्ये बोलत होता, हे खरंच आहे; पण त्याच्याहीपेक्षा खोल जाऊन आपण विचार केलात, तर आपल्या लक्षात येईल की, गॅलिलिओ जगाचा नवा कार्यकारणभाव सांगत होता. तोपर्यंत जगाचा कार्यकारणभाव एकच होता. तो म्हणजे, ‘आकाशातल्या बापाची इच्छा!’ आणि गॅलिलिओ म्हणत होता की, ‘आकाशातल्या बापाची इच्छा काय असेल ती असेल; परंतु सूर्य हाच पृथ्वीभोवती फिरतो असं दिसणार आणि प्रत्यक्षात पृथ्वी हीच सूर्याभोवती फिरणार, चंद्रही असाच फिरणार. आकाशातल्या बापाची इच्छा काय आहे, याच्याशी त्याचा काही संबंध नाही.’

कार्यकारणभावाचा विचार करून आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचा शोध घेण्याची एक नवी दिशा त्याच्या या शोधामुळे जगाला मिळाली. त्यामुळे आधीच्या ४,९९,६०० वर्षांमध्ये मानव जातीची जेवढी प्रगती झाली नव्हती, तेवढी प्रगती गेल्या ४०० वर्षांमध्ये ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ कळल्यामुळे झाली आहे!

माझ्या जीवनात जे काही घडतं; त्याच्यामागे देव नाही, त्याच्यामागे दैव नाही, त्याच्यामागे नशीब नाही, त्याच्यामागे प्रारब्ध नाही, त्याच्यामागे संचित नाही, त्याच्यामागे प्राक्तन नाही, त्याच्यामागे कर्मविपाक नाही, त्याच्यामागे मागच्या जन्मीचं पापपुण्य नाही, त्याच्यामागे माझी जन्मवेळ नाही. माझ्या आयुष्यात जे-जे काही घडतं, त्या प्रत्येक कार्याच्या मागे कारण आहे. ते कारण मला शोधता येतं, आणि मला शोधता येतं म्हणून ते मला बदलता येतं.

त्यामुळे ज्या वेळी तुम्ही ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ विसरता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं दुसऱ्यांच्या हातामध्ये देता. तुम्ही ज्या वेळी ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ स्वीकारता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं स्वतःच्या हातात घेता!

.............................................................................................................................................

‘विवेकाचा आवाज’ या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5019/Vivekacha-Awaj

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 12 September 2019

माझा प्रतिवाद : वाचकहो, नुकतीच २० ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोलकरांची मृत्युतिथी येऊन गेली. त्यांनी लिहिलेला हा लेख पुनर्प्रकाशित केला. ते हयात नसल्याने त्यांना उद्देशून प्रतिसाद देता येणार नाही. पण विचारमंथानार्थ काही मुद्दे उपस्थित करेन म्हणतो. १.

यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला लाभलेला हा सर्वांत खात्रीचा मार्ग आहे!
तरीपण हा काही एकमेव मार्ग नाही. निसर्गाचे नियम डोक्यात तयार करायचे नसून प्रयोगाद्वारे पडताळून पहायचे असतात, हा विज्ञानातला सर्वमान्य मार्ग आहे. मात्र प्राध्यापक सत्येंद्रनाथ बसूंनी प्रकाशकणांच्या वर्तनासंबंधी नियम पडताळून न पाहता गृहीत धरून किचकट गणिते मांडली. ती गणितं आज बोस - आईनस्टाईन सांख्यिकी म्हणून ओळखली जातात. हा अतिशय मूलभूत प्रकारचा गणितीय शोध आहे. जो भौतिकशास्त्राने जसाच्या तसा स्वीकारला. सांगण्याचा मुद्दा काये की कार्यकारणभाव शोधणे हा ज्ञानप्राप्तीचा एकमेव मार्ग नव्हे. २.
माणूस नावाचा एवढा दुबळा प्राणी या सृष्टीचा स्वामी झाला कसा?
माणूस कधीच सृष्टीचा स्वामीबिमी नव्हता. ३.
गजानन हा बुद्धीचा देव आहे, असं मानता. त्याचं मस्तक हत्तीचं आहे, हे तुम्हांला माहीत आहे. मग बुद्धीचा देव असलेल्या गजाननाने हत्तीला बुद्धी न देता माणसाला बुद्धी दिली, याचं इंगित काय आहे?
गणपतीस हत्तीचं डोकं नंतर लावण्यात आलंय. जन्माला तेव्हा माणसाचंच डोकं होतं. ४.
कुठल्याही देवाची पूजा-अर्चा करून, जप-जाप्य करून, यज्ञयाग करून त्याचा मेंदू वाढला नाही.
उगीच काहीही ठोकून दिलंय. ध्यानधारणा केल्याने मनाची शक्ती वाढते हे अनेकांनी अनेक वेळा सिद्ध केलंय. एकीकडे कार्यकारणभाव शोधायच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे धडधडीत पुराव्यांकडे दुर्लक्ष करायचं. वा, चांगले विवेकवादी ढोल बडवताहेत दाभोलकर! ५.
पृथ्वीच सूर्याभोवती फिरते. ही गोष्ट आर्यभट्टाने कोपर्निकसच्या आधी १००० वर्षं भारतात सांगितलेली होती, मात्र ती आपण टिकवून धरू शकलो नाही; पुढं नेऊ शकलो नाही; आर्यभट्टाला मान देऊ शकलो नाही.
याला कारण मेकॉलेछाप इंग्रजी शिक्षणपद्धती आहे. ६.
प्रत्यक्षात पृथ्वी हीच सूर्याभोवती फिरणार, चंद्रही असाच फिरणार. आकाशातल्या बापाची इच्छा काय आहे, याच्याशी त्याचा काही संबंध नाही.
सूर्य १५ कोटी किलोमीटर्स वरनं फक्त ३ मीटर्स ची भरती आणतो. हे भयावह रीत्या व्यस्त प्रमाण आहे. आकाशातल्या बापाने (की आजून कोणी) स्वैरपणे हलकीशी फुसकुली सोडली तर पृथ्वीवर समुद्रात महाकाय लाटा उसळतील. या त्सुनामीच्या सुकाळात अवघी मानवजात पार धुवून निघेल. तेव्हा माणसानं औकादीत राहायला शिकावं. ७.
त्यामुळे आधीच्या ४,९९,६०० वर्षांमध्ये मानव जातीची जेवढी प्रगती झाली नव्हती, तेवढी प्रगती गेल्या ४०० वर्षांमध्ये ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ कळल्यामुळे झाली आहे!
हा दाभोलकारांचा भ्रम आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन ही काही आधुनिक विज्ञानाची मक्तेदारी नव्हे. रावणाने रचलेल्या शिवतांडव स्तोत्रात 'नवीनमेघमण्डलीनिरुद्धदुर्धरस्फ़ुरत्' असा विजेचा उल्लेख आहे. याची फोड 'नवीन-मेघमण्डली-निरुद्ध-दुर्धर-स्फ़ुरत्' अशी होते. याचा अर्थ 'नव्या ढगांच्या मंडलात कशीबशी कोंबलेली व त्याचवेळी स्फुरणारी' असा होतो. आजही विजा कडाडतात त्या प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीच्या व अखेरच्या दिवसांत. ही बाब रावणकाळी माहित होती. सांगायचा मुद्दा काये की वैज्ञानिक दृष्टीकोन ही काही आधुनिक विज्ञानाची मक्तेदारी नव्हे. प्राचीन तंत्रज्ञानाचे बरेच पुरावे सापडलेत. डोळे उघडून बघणार कोण! ८.
त्यामुळे ज्या वेळी तुम्ही ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ विसरता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं दुसऱ्यांच्या हातामध्ये देता.
दाभोलकरांनी फड्डे ( = फ्रॉड) केले व त्यातून त्यांची हत्या झाली. यामागील कार्यकारणभाव दाभोलकरांना कळलाच नाही. तो कळण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाची अजिबात आवश्यकता नाही. पण लक्षांत कोण घेतो! असो. प्रतिवाद वाचनाबद्दल समस्तांचे आभार ! :-) आपला नम्र, -गामा पैलवान


Gamma Pailvan

Wed , 21 August 2019

माझा प्रतिवाद : https://www.misalpav.com/node/45127 -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......