‘साता उत्तराची कहाणी’ : २०१४ ते २०१९ या काळातल्या प्रत्येक तरुणाने वाचलीच पाहिजे अशी कादंबरी!
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
राम जगताप
  • ‘साता उत्तराची कहाणी’चं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरील मजकूर
  • Wed , 10 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक Book of the Week साता उत्तराची कहाणी Sata Uttaranchi Kahani ग. प्र. प्रधान G. P. Pradhan

मित्रवर्य शशिकांत सावंतने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर ग. प्र. प्रधान यांच्या ‘साता उत्तराची कहाणी’ या काहीशा दुर्लक्षित कादंबरीवर लिहिलं आणि एकदम लक्षात आलं की, सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर विचारसरणींचा जो कलह, संभ्रम आणि शह-काटशह सुरू झालेला आहे, अशा काळात देशातील तरुणांनी कुठलं पुस्तक प्राधान्यानं वाचायला हवं? तर ते प्रधानमास्तरांचं ‘साता उत्तराची कहाणी’! कारण हे तरुण गोंधळलेले तरी आहेत किंवा भरकटलेले तरी आहेत. त्यांना आपल्या खांद्यावरील झेंडाच सर्वश्रेष्ठ वाटतो आहे. कुठल्या तरी विचारसरणीचा समर्थक होण्यात वावगं काही नाही, पण आपले विरोधक कसे नालायक आहेत, या भ्रमात राहणं मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखंच आहे. त्यामुळे अंतिमत: आपलं, समाजाचं आणि देशाचंही नुकसानच होतं, हे या तरुणांना नीटपणे, तपशीलवारपणे आणि साधार प्रमाणासह सांगेल, असं पुस्तक कुठलं? तर त्याचंही उत्तर आहे - ‘साता उत्तराची कहाणी’!

शशिकांतने या कादंबरी ‘एपिक’ म्हटलं आहे आणि तेवढंच नाही तर नेमाड्यांच्या ‘हिंदू’च्या तोडीची कादंबरीही ठरवलं आहे. ‘इंग्रजीत पाच-सहाशे पानांच्या कादंबऱ्यांना एपिक म्हणण्याची परंपरा आहे’ असं सांगत त्यानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात वरकरणी तरी साम्य दिसतं. पण या दोन्ही कादंबऱ्यांची तुलना हा समीक्षकांचा प्रांत आहे. त्यात आपण जायला नको. आणि प्रस्तुत लेखात या पुस्तकाचा उल्लेख कादंबरी असाच केलेला असला तरी खुद्द प्रधानमास्तरांनीच ही रुढार्थानं कादंबरी नाही, असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण तिची रचना कादंबरीसारखी असल्यानं तिला या लेखात ‘कादंबरी’ असंच म्हटलेलं आहे.

तर विषय आहे भारतातील सद्यस्थितीचा, तरुणांचा आणि प्रधानमास्तरांच्या ‘साता उत्तराची कहाणी’चा. ही प्रधानमास्तरांची काहीशी दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे. ती २ ऑक्टोबर १९८१ रोजी मौज प्रकाशन गृहाकडून प्रकाशित झाली. या कादंबरीची पहिली आवृत्ती संपायला मात्र सात वर्षं लागली आणि दुसरी आवृत्ती संपायला तर सतरा-अठरा वर्षं. सध्या या कादंबरीची तिसरी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. प्रधानमास्तरांचं हे पुस्तक फारसं वाचकप्रिय ठरलं नसलं, तरी ते त्यांचं सर्वांत उत्तम पुस्तक आहे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

१९४० ते १९८० या कालखंडात देशात खूप घडामोडी घडल्या. त्याविषयी प्रास्ताविकात प्रधानमास्तरांनी म्हटलं आहे - “या कालखंडातील सर्व साधनांची जुळणी करून वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून तपशिलाची चूक होऊ न देता इतिहास लिहिणे हे मोठे काम आहे. हे पुस्तक लिहिताना तो उद्देश नव्हता. या कालखंडातील विविध चळवळीत सहभागी होताना वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात जी आंदोलने झाली त्यांचे चित्रण करण्याचा या पुस्तकात मी प्रयत्न केला आहे… (वा. म. जोशी यांनी) ‘रागिणी’ या कादंबरीत ज्याप्रमाणे काव्य-शास्त्र-विनोद आणला आहे, त्याप्रमाणे राजकारणातील विविध विचार व समस्या यांची चर्चा करावी असे मला वाटले. मात्र माझं हे पुस्तक ही रूढार्थाने कादंबरी नाही. राजकीय घटनांच्या विस्तीर्ण व बदलत्या पटाची पार्श्वभूमी घेऊन विचारांचे व भावनांचे चित्रण करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.”

प्रत्येक विचारसरणीची एक व्यक्तिरेखा आणि त्यांना जोडणारा निवेदक अशी या पुस्तकाची मांडणी आहे. समाजवादी (खानोलकर), साम्यवादी (वैद्य), रॉयवादी (एम. आर.), पत्री सरकार (देशमुख), आंबेडकरवादी (खैरमोडे), हिंदुत्ववादी (जोशी) आणि गांधीवादी (सामंत) अशा सात विचारसरणी आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारी सात पात्रं. या सातही तरुणांना आपल्याला पटलेला वा भावलेला विचार घेऊन आपण आधुनिक भारत घडवू शकतो, असा आत्मश्विास असतो. आधुनिक भारत घडवण्याची ही त्यांची सात उत्तरं म्हणजे, ‘साता उत्तरांची कहाणी.’

खानोलकर, वैद्य, एम. आर., देशमुख, खैरमोडे, जोशी आणि सामंत हे सात तरुण १९४२च्या आंदोलनात सहभागी होतात. आणि देशाप्रती असलेला आपला कर्तव्य नावाचा खारीचा वाटा उचलतात. अशा देशभरातील हजारो-लाखो तरुणांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या अथक प्रयत्नामुळे १९४७ साली देश स्वतंत्र होतो. तेव्हा हे सातही तरुण वेगवेगळ्या पक्षांत सामील होतात. जोशी संघाचे काम करू लागतो, खानोलकर समाजवादी पक्षाचे, वैद्य डाव्या पक्षाचे, एम. आर. रॉयवादी पक्षाचे, खैरमोडे आंबेडकरांच्या पक्षाचे आणि सामंत गांधी प्रचार-प्रसाराचे. हे तरुण स्वातंत्र्यानंतर १९५७ साली गोवा मुक्तीच्या आंदोलनात सहभागी होतात. पोर्तुगीजांच्या लाठ्या खातात. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी होतात. त्यातही पोलिसांचा मार खातात.  

पण ही कादंबरी म्हणजे काही देशातल्या आणि राज्यातल्या राजकीय चळवळींचा, राजकारणाचा आढावा नाही. वेगवेगळ्या विचारसरणींचा त्या त्या व्यक्तींच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, त्या विचारसरणींमुळे त्या त्या माणसांचे काय होते, याचाही आढावा प्रधानमास्तरांनी घेतला आहे. यातला वैद्य तारा नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडतो. तिला तो एकदा म्हणतो, ‘मी तुझ्यावर बुर्झ्वा पद्धतीने प्रेम करू शकत नाही.’ तेव्हा ती त्याला ती म्हणते - ‘तू अगदी मूल आहेस. तुला प्रेमातलं काही कळत नाही. प्रेमात बुर्झ्वा वगैरे काही नसतं.’ अशी मजाही या कादंबरीत आहे.

हे सातही तरुण एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या विचारधारा त्यांना एकमेकांच्या विरोधात उभं करत नाहीत. ‘माझ्या विचारसरणीवर टीका करेल तो माझा शत्रू’ अशी या सातपैकी कुणाचीच भूमिका नाही. त्यामुळे एकमेकांशी मतभेद असले तरी त्यांची मैत्री कायम राहते. ते वादावादी करतात, हमरीतुमरीनं भांडतात आणि एकमेकांना प्रेमानं पत्रंही लिहितात. एकमेकांच्या घरी जाऊन गप्पांच्या मैफली जमवतात. सोबत खातात-पितात.

विशीत एकत्र आलेले हे तरुण मित्र हळूहळू चाळीशी पार करतात. त्यातल्या काहींना मुलं होतात. डाव्या विचारसरणीच्या वैद्यांचा मुलगा तर चक्क शिवसेनेचं काम करू लागतो. रॉयवादी एम. आर.चा मुलगा नक्षलवादी होतो.

या कादंबरीत काँग्रेस पक्षावर टीका आहे, तशीच समाजवाद्यांवरही. संघावर आहे, तशीच डाव्या पक्षांवरही. कारण ही विचारसरणींचं द्वंद्व मांडणारी कादंबरी आहे आणि त्या विचारसरणींना फॉलो करणाऱ्या माणसांचंही. त्यामुळे देशप्रेम, राजकारण, वादविवाद, मतभेद, भांडणं, टिंगलटवाळी, प्रेमप्रकरणं, रुसवे-फुगवे, आर्थिक चणचण, पळपुटेपणा, धैर्य, राग, लोभ, आशाआकांक्षा अशा अनेक गोष्टींचं दर्शन या सातही पात्रांच्या माध्यमातून घडत राहतं.

मुळात या परस्परविरोधी विचारसरणींचे लोक प्रधानमास्तरांचे चांगले मित्र होते. आणि निदान त्या काळी तरी या विचारसरणींच्या लोकांमध्ये इतरांच्या विचारांबद्दल आदरही होता; भले त्यांची मतं पटत नसली तरी. या प्रत्येक विचारसरणीच्या दोन-दोन तीन-तीन लोकांशी प्रधानमास्तरांनी चर्चा केली. पुस्तकाचा खर्डा त्यांना दाखवला. त्यांच्याकडून ‘हेच तुमचं म्हणणं आहे ना, हेच तुमचे युक्तिवाद आहेत ना’ असं वदवून घेतलं आणि मगच पुस्तक फायनल केलं.

त्यामुळे या सातही विचारसरणींची या पुस्तकातून चांगल्या प्रकारे ओळख होते. त्यांची सामर्थ्यं समजतात, तसेच त्यांच्या मर्यादांचीही ओळख होते. आणि या प्रवाहांची चांगल्या प्रकारे ओळख झाल्याशिवाय भारतीय राजकारण समजून घेता येत नाही.

असं असलं तरी या कादंबरीत एक मोठा दोषही आहे. यात काँग्रेसच्या विचारसरणीचं स्वतंत्र पात्र नाही. १९८१ साली कादंबरी लिहिली गेली असल्यानं शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणारं स्वतंत्र पात्र नसणं, हे एकवेळ क्षम्य ठरतं. पण काँग्रेसी विचारसरणीचं पात्र नसणं ही मोठीच उणीव मानावी लागेल. त्यामुळे काँग्रेस पक्षावर कादंबरीत अनेक ठिकाणी टीका आहे खरी, पण तिचा इतर विचारसरणींसारखा प्रतिवाद करणारं पात्र नाही, असा प्रकार झाला आहे.

अर्थात ज्याला १९४० ते ७० या काळातला महाराष्ट्र आणि देश समजून घ्यायचा आहे, त्या प्रत्येकानं ही कादंबरी वाचलीच पाहिजे. विशेषत: महाराष्ट्रातल्या तरुणांनी राजकारण, राजकीय विचारसरणी, त्यांच्यातील परस्पर विरोध वा मतभेद समजून घेण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी. आपले मतभेद कसे संयमीपणे व्यक्त केले पाहिजेत आणि आपल्या विचासरणीच्या समर्थनासाठी आंधळेपणाची नाहीतर कशा प्रकारच्या डोळसपणाची गरज असते, याचाही वस्तुपाठ या कादंबरीतून पाहायला मिळतो.

वाद, प्रतिवाद, मतभेद, अहंकार, स्वार्थ, राजकारण यांपलीकडे माणसामाणसांतील प्रेमाला, संवादाला महत्त्व असतं. इतकंच नव्हे तर तोच अंतिमत: तुमच्या जगण्याचा, समाजाशी जोडून राहण्याचा मूलाधार असतो. संवादाशिवाय आपल्यातल्या उणीवा कळत नाहीत आणि इतरांचं वेगळेपणही उमगत नाही. मनाच्या उमदेपणाशिवाय सभोवतालाकडे सामंजस्यानं पाहता येत नाही आणि अप्रिय मतं खिळाडू वृत्तीनं स्वीकारता येत नाहीत.

दोन वेगळी माणसं ही मातीच्या मूर्तीसारखी एकाच साच्यातून तयार झालेली नसतात. त्यामुळे ती कुठल्याही विचारसरणीची नसली तरी त्यांच्यामध्ये काही गोष्टींबाबत मतभेद असतातच. त्यावरून एकमेकांना निकालात काढण्याची गरज नसते, तर एकमेकांचे युक्तिवाद शांतपणे ऐकून घेण्याची गरज असते. समोरच्याचा प्रत्येक युक्तिवाद सप्रमाण खोडून काढण्याच्या भूमिकेत राहण्याचीही गरज नसते. पण ‘चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं’, हे माणूसपणाचं, माणसाच्या मोठेपणाचं लक्षण असतं. ‘सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून जाणून घ्या’ या भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीचा अंगीकार केला की, किती आणि कसं जगता येतं आणि किती आणि कसा समाज निर्माण करता येऊ शकतो, याचाही ही कादंबरी एक वस्तुपाठ आहे.

एकेकाळी महाराष्ट्रातील तरुणांवर वेगवेगळ्या विचारसरणींचा कसा प्रभाव पडला, त्यातून महाराष्ट्रातील जनमानस कसं घडलं, महाराष्ट्राचं राजकारण कसं घडलं, याचा ही कादंबरी चांगल्या प्रकारे आढावा घेते. आजचा महाराष्ट्र, देश समजून घेण्यासाठीही ही कादंबरी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शक ठरणारी आहे.

मराठीत राजकीय कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, पण अशा पद्धतीची कादंबरी मात्र एकमेव म्हणावी लागेल. त्यामुळे प्रत्येक मराठी तरुणानं हे पुस्तक वाचायला हवं. ज्यांना राजकीय विचारप्रणाल्या समजून घ्यायच्या आहेत, भारतीय राजकारण-समाजकारण समजून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी तर ही कादंबरी ‘मस्ट’ आहे.

खरं तर हा स्वतंत्र सात पुस्तकांचा ऐवज आहे, पण प्रधानमास्तरांनी तो अवघ्या पाचशे पानांत एकाच पुस्तकात मांडून दाखवला आहे. तोही अतिशय साध्या, सोप्या भाषेत. एरवी वैचारिक चर्चा हा तसा काहीसा रुक्ष आणि बोजड विषय. पण मास्तरांनी त्याची मांडणी ललित अंगानं करत पत्रं, आठवणी, गप्पा, फ्लॅशबॅक आणि चरित्र अशी करत तो सुबोध करून टाकला आहे. त्यामुळे कादंबरी एकदा हातात घेतली की, वाचून होईपर्यंत खाली ठेववत नाही.

प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळतं, तर उत्तरातून हुशारी कळते, असं म्हणतात. तो समसमा योग या पुस्तकाच्या पानोपानी विखुरला आहे. आपल्या विचारांशी सहमत नसणाऱ्यांचंही म्हणणं कसं समजून घ्या‌वं आणि प्रतिवाद कायम ठेवूनही त्यांच्याशी कशी चांगल्या प्रकारे मैत्री करता येऊ शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण स्वत: प्रधानमास्तरच होते. ही कादंबरी त्या अर्थानंही त्यांच्या कलात्मकतेचा सर्वोच्च आविष्कार मानता येईल.

भारतीय राजकारणाची आणि समाजकारणाची जातकुळीच त्यांनी या कादंबरीत उलगडून दाखवली आहे. एकोणिसाव्या शतकाबद्दल असं म्हटलं जातं की, ते मूलगामी परिवर्तनाचं शतक होतं. त्यामुळे आजची कुठलीही समस्या घ्या; राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला-साहित्य-संस्कृती, त्याचा ऊहापोह आणि त्याची उत्तरंही एकोणिसाव्या शतकात सापडतात. या शतकाकडे गेल्याशिवाय आजच्या कुठल्याच प्रश्नाची उकल होऊ शकत नाही.

‘साता उत्तरांची कहाणी’तील सात विचारप्रवाह याच शतकात उदयाला आले. त्यांच्या बहराचा काळ (रॉयवाद वगळता) विसाव्या शतकातला होता. तो नेमका काय आणि कसा होता, हे मास्तरांच्या या कादंबरीत वाचायला मिळतं. म्हणूनच तिचं महत्त्व मोठं आहे. आता रॉयवादी माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही, पण एकेकाळी या ‘इझम्स’नं महाराष्ट्रातील अनेकांना कसं आकर्षित केलं होतं, रॉयवाद नेमका काय होता हेही या कादंबरीतून समजतं. एकेकाळी महाराष्ट्रातली समाजवादी, साम्यवादी, पत्री सरकारवादी, आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी आणि गांधीवादी माणसं कशी होती, ती एकमेकांशी कशी वागतं, हेसुद्धा समजून घेण्यासाठी ही कादंबरी महत्त्वाची आहे.

.............................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Radhakrishna Muli

Sun , 14 July 2019

ही एक चांगली कादंबरी आहे आणि त्यातील कार्यकर्त्यांचे ' जगणे ' आजच्या पिढीला तर अगदीच नवे / अपरिचित वाटू शकते .ही कादंबरी आली , तेव्हाही या कादंबरीचे चांगले परीक्षण वाचण्यात आले नव्हते , असेच आठवते . काही जणांनी इतिहासाच्या अंगानी लिहिले होते .पण स्वातंत्र्य चळवळीत आणि पुढे त्या चळवळीच्या छायेत वाढलेले आपल्या राज्यातील ' पक्ष जीवन ' कसे होते हे या कादंबरीतून कळते .अर्थात या कादंबरीवर लेखकाच्या सज्जन , सात्विक आणि तत्वनिष्ठ तरीही सहिष्णू व्यक्तिमत्वाची छाप पडली आहे ..


shashikant vadana

Thu , 11 July 2019

दोन वर्षापुर्वी हि क़ादंबरी वाचली होती, पण हा सदर लेख वाचल्यानंतर कादंबरी पुन्हा हातात घ्याविशी वाटते.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......