अजूनकाही
ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांच्या ‘आडाडाता आयुष्य’ या मूळ कन्नड आत्मचरित्राचा ‘खेळता खेळता आयुष्य’ या नावानं मे २०१४ मध्ये मराठी अनुवाद प्रकाशित झाला. उमा कुलकर्णी यांनी केलेला हा अनुवाद राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या आत्मचरित्राची ओळख करून देणारा हा लेख...
.............................................................................................................................................
प्रसिद्ध नाटककार गिरीश कार्नाड यांच्या कन्नड आत्मचरित्राचे शीर्षक ‘आडाडाता आयुष्य’. त्याचे उमा कुलकर्णी यांनी केलेले मराठी भाषांतर नुकतेच वाचले. काही वर्षांपूर्वी (२०१३ मध्ये) मराठी भाषांतराच्या प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम पुण्यात झाला होता. स्वतः गिरीश कार्नाड आले होते. गिरीश कार्नाड यांच्या काही कन्नड चित्रपटांचा महोत्सवदेखील करण्यात आला होता. मला आठवते ‘चेलुवी’ हा सोनाली कुलकर्णीचा पहिला चित्रपट, ‘कनक पुरंदर’ हा लघुपटदेखील दाखवला गेला होता. त्यावेळी झालेल्या भाषणांमध्ये आत्मचरित्रात नमूद केलेले त्यांचे काही बोल्ड अनुभव हा चर्चेचा, उत्सुकतेचा विषय ठरला होता. त्यांचे आडनाव ‘कर्नाड’ नसून ‘कार्नाड’ आहे, हे त्यावेळी सगळ्यांना समजले.
त्यावेळी मी इतरांप्रमाणे पुस्तक विकत घ्यायला काही विशेष उत्सुक नव्हतो. मी स्वतः त्यांच्या ‘आगोम्मे ईगोम्मे’ या दुसऱ्या एका पुस्तकाचे भाषांतर करण्याच्या कामात गुंतलो होतो, जे अजून पूर्ण झालेले नाही. त्याविषयी त्यांच्याबरोबर संपर्कदेखील झाला होता, परवानगीही दिली होती. ते पुस्तक म्हणजे त्यांच्या प्रामुख्याने वैचारिक लेखांचे संकलन आहे.
गिरीश कार्नाड जरी नाटककार म्हणून सुपरिचित असले तरी, ते वैचारिक लेखन करणारे, विचार आणि मत प्रदर्शन करणारे म्हणून माहिती आहेत. त्याचा अनुभव मी एकदा-दोनदा घेतला होता. पुण्यात पूर्वी २०११ मध्ये शुभा मुदगल यांच्या ‘बाजा गाजा’ या संगीत कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून आले होते आणि त्यांनी संगीत विषयावर भाषण केले होते. त्यांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर त्यांच्या वैचारिकतेची आणखीनच प्रचीती येते.
या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या ४३-४५ वर्षांपर्यंतचा लेखाजोखा मांडला आहे. तसे पाहिले तर अजून अर्धेअधिक त्यांचे आयुष्य आत्मचरित्र स्वरूपात यायचे आहे. पण त्यांची एकूण जडणघडण कशी झाली हे वाचकांना बऱ्यापैकी समजू शकते. इन मीन १०-११ प्रकरणांतून, साधारण ३०० पानांच्या या चरित्रात सुरुवातीला अर्थातच त्यांनी स्वतःच्या जन्माची कथा, आई वडील यांच्याबद्दल सांगितले आहेत. त्यांच्या आईबद्दल वाचून तर धक्काच बसतो, काळाच्या पुढचे आचार-विचार. गिरीश कार्नाड हे कर्नाटकातील, कन्नड बोलणारे, लिहिणारे असले तरी त्यांचे कुटुंब हे कर्नाटकाच्या कोकण भागातील (करावळी) भागातील गौड सारस्वत ब्राह्मण. तेथे मराठी-कोकणीचा अंमल. पण कर्नाटकात वास्तव्य म्हणून कन्नड संस्कार झाले. या समाजाचा इतिहास, आजची स्थिती, वैशिष्ट्ये यांबद्दलदेखील ठिकठिकाणी त्यांनी माहिती दिली आहे, ती मनोरंजक आहे.
शिरसीमधील त्यांचे बालपण यांचे पुढे वर्णन येते. शिरसी म्हणजे कर्नाटकातील घाटमाथ्यावरील प्रदेश, घनदाट जंगल, निसर्ग यांनी वेढलेला. मी पाहिलेला आहे तो प्रदेश. तेथील वास्तव्यात त्यांच्यावर आजूबाजूला असलेला ख्रिश्चन समाजाचे संस्कार झाले झाले. घरात नाटकाचे प्रेम आधीपासूनच. १९४५-४८ मध्ये शिरसीमध्ये येणाऱ्या नाटक मंडळीतर्फे लागणारी त्यांना बरीच नाटके पाहायला मिळाली. या सगळ्या संस्कारांची परिणती ‘ययाती’मधील पौराणिक पात्रे उभी करताना झाली, असे त्यांनी नमूद केले आहे.
१९५२ मध्ये त्यांचे कुटुंब शिरसीहून धारवाडला आले. ‘धारवाड : एक्कावन्न घरं’ या नावाच्या प्रकरणातून त्यांनी ह्या कोकणी लोकांची धारवाडच्या वेशीबाहेर टेकडीच्या आसपास कशी घरे होती आणि तेथील वातावरण कसे होते हे सांगितले आहे. पुढील आणखी एका प्रकरणात धारवाडचे वास्तव्य, कॉलेज जीवन यांचे विवरण येते. त्यावेळी धारवाड आणि इतर जिल्हे जसे की विजापूर, बेळगाव, कारवार हे ‘मुंबई कर्नाटक’ म्हणून ओळखले जायचे आणि ते मुंबई प्रांताचा भाग होते.
ह्या उत्तर कर्नाटकातील भागाचा मैसूर कर्नाटकाशी संस्कृतीच्या दृष्टीने विशेष संबंध नसे. हे सर्व माझ्या ‘अमीरबाई कर्नाटकी’ ह्या पुस्तकातदेखील आले आहे. वरदराज हुईलगोळ (कन्नडमधील प्रसिद्ध नाटककार नारायण हुईलगोळ यांचे पुत्र), वि. कृ. गोकाक, आद्य रंगचार्य श्रीरंग, बेंद्रे इत्यादी महान लेखक, कवी, नाटककार यांची ओळख, परिचय कर्नाटक कॉलेजमध्ये झाला. गोकाक यांच्याकडून इंग्रजी साहित्य शिकायला मिळाले. धारवाडमधील प्रसिद्ध पुस्तक प्रकाशन संस्था जी. बी. जोशी यांची ‘मनोहर ग्रंथमाला’, तेथे जमणारी साहित्यिकांची टोळकी या सगळ्यांचा त्यांना अनुभव मिळाला.
पुढील प्रकरणात गिरीश कार्नाड आपले मुंबईचे दिवस कसे होते याबद्दल लिहितात. मुंबई विद्यापीठात शिकत असताना, माहीमला सारस्वत मंडळींच्या कंपूत राहतानाचे अनुभव ते मांडतात. मुंबई विद्यापीठाच्या आसपासचा परिसर, ज्यात पुस्तकाची दुकाने, प्रदर्शने, नाटके, सिनेमे, हॉटेल्स, त्यातच इराणी हॉटेल्सचे वातावरण, या सर्वांमुळे विविध अनुभव घेत ते मोठे होत गेले. भारतीय नाटकांच्या दृष्टीने तो संक्रमणाचा काळ होता. पुढे शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्डला गेले, त्याची कथा येते. तेथे जायच्या आधी, आणि एम.ए. संपायच्या आधीच, त्यांनी ‘ययाती’ हे प्रसिद्ध नाटक कन्नडमध्ये कसे लिहिले, याची कथादेखील मनोरंजक आहे.
१९६० मध्ये ते इंग्लंडला उच्चशिक्षणासाठी जहाजाने गेले. तोही तीन आठवडे प्रवासाचा अनुभव आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ ही कादंबरी, अनंत काणेकर यांनी सोव्हिएत रशिया आणि इंग्लंडचा केलेला जहाज प्रवास, जो ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’ या पुस्तकात आला आहे. कार्नाड यांनी केलेले जहाजावरील अनुभवांचे वर्णन या दोन्ही पुस्तकांच्या धर्तीचे आहे. भारत सोडून गेल्यावर एकदम संस्कृती, आचार, विचार, स्त्री-पुरुष संबंध यात आलेला मोकळे-ढाकळेपणा, या सर्वांचा अनुभव, त्यांनी कसा दोन्ही हातांनी स्वीकारला, हे समजते.
ऑक्सफर्डमध्ये त्यांनी तीन वर्षे काढली. मी लंडनला गेलो आहे, पण ऑक्सफर्डला काही गेलेलो नाही. त्यामुळे हे त्यांचे सविस्तर वर्णन मस्त भावते. निसर्ग, हॉस्टेलचे वातावरण, पाश्चात्य संगीत, May Morning, Magdalen College या जुन्या कॉलेजच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांनी तेथे Philosophy, Politics, Economics मध्ये बी. ए. केले. ब्रिटिश विद्यापीठीय संस्कृती, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज ही जवळच असलेल्या दोन्ही जुन्या विद्यापीठांतून असलेला एकच अभ्यासक्रम (ऑक्सब्रिज), तेथील विद्यार्थ्यांमध्ये असलेली वर्गव्यवस्था यांचे वर्णन आले आहे. आजकाल मुलं (साधारण गेल्या ३०-३५ वर्षांपासून) अमेरिकेत पुढे शिकायला जातात, पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या मागे-पुढे त्यावेळेस इंग्लंड (६०-७० वर्षांपूर्वी) हे प्रमुख आकर्षण होते.
तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात, तेथे ते बरेच फिरले. ब्रिटनच्या गावातील असलेले पब्स, जो तेथील संस्कृतीचा भाग आहे, ह्याची ओळख त्यांनी विस्ताराने करून दिली आहे. त्यांचे मित्र, मैत्रिणी, प्रेम-प्रकरणे, लिव्ह-इन संबंध इत्यादीबद्दल मोकळेपणाने लिहिले आहे. पुढे ते Oxford Union ह्या संस्थेचेदेखील अध्यक्ष झाले. हा अनुभव त्यांना कसा समृद्ध करून गेला, त्यांची वैचारिक जडणघडण कशी झाली हे समजते.
ऑक्सफर्डमध्ये असताना लिहिलेल्या त्यांच्या ‘तुघलक’ या नाटकाच्या लिखाणाची कथासुद्धा त्यांनी सांगितली आहे. मी ‘ययाती’चे मराठी नाट्यरूपांतर पाहिले, तर ‘तुघलक’चे हिंदी नाट्यरूपांतर पाहिले आहे. इंग्लंड वास्तव्य संपवून १९६४ मध्ये भारतात परतले, ते त्यावेळच्या मद्रासमध्ये Oxford University Press (OUP) मध्ये संपादकाची नोकरी मिळवून.
यापुढील आयुष्याचे ते तत्कालीन मद्रास येथून कथन करतात. मद्रासमधील त्यांचे आयुष्यदेखील समृद्ध करणारे असे होते, नाटक, संगीत, चित्रपट, स्त्रिया, मद्यपान, विविध मित्र, सहकारी यांचे अनुभव इत्यादी इत्यादी! मद्रासचे School of Arts, ज्यात पुढे चोळामंडल नावाच्या कलेसाठी वसवलेल्या भागाचेदेखील वर्णन आले आहे. तसेच ‘मद्रास प्लेयर्स’ (Madras Players) ह्या हौशी नाट्यसंस्थेविषयीचे त्यांचे अनुभवदेखील वाचनीय आहेत. माझ्या चेन्नईच्या दोन वर्षांपूर्वीच्या भेटीत या दोन्ही ठिकाणांना भेटी दिल्या नाहीत, कारण मला माहितीच नव्हते. अजून एक वैशिष्ट्य, मला माहीत असलेले, जे संगीत क्षेत्राशी निगडीत आहे, ती म्हणजे Madras Music Season. मद्रासमध्ये एका उच्च वर्गातील विवाहित महिलेशी आलेले लैंगिक संबंध याचे वर्णन चकित करणारे आहे.
उमा कुलकर्णी यांनी एक-दोन ठिकाणी इंग्लिश ‘documentary film’ला मराठी ‘साक्षी-चित्र’ असा पर्याय वापरला आहे. मी तरी हे पहिल्यांदाच पाहतो आहे. ‘माहितीपट’ असा सुपरिचित शब्द आहे की, याला मराठीत. OUPचा सात वर्षांचा करार संपता संपता त्यांना दोन महिन्यांसाठी लंडनला जायला मिळाले. त्यावेळी तेथे त्यांनी Thomas Mann यांच्या ‘The Transposed Heads’ लघुकथेवरून ‘हयवदन’ हे भारतीय नाट्यसृष्टीला कलाटणी देणारे नाटक कसे लिहिले याची कहाणी सांगतात.
मद्रास मध्ये OUPचे काम करत असताना असताना प्रसिद्ध कन्नड लेखक यु. आर. अनंतमूर्ती यांची कादंबरी ‘संस्कार’ यावर सिनेमा कसा केला, यांचे सविस्तर वर्णन ‘शृंगेरी : संस्कार’ नावाच्या एका स्वतंत्र प्रकरणातून केले आहे. चित्रीकरण शृंगेरी, आगुम्बे या निसर्गरम्य परिसरात झाले आहे. मी तेथे गेलो आहे, खूपच छान परिसर आहे. कन्नड माध्व संप्रदाय (जो माझा देखील आहे!) यातील प्रथा, कडक सोवळे, कर्मकांड या सगळ्यावर हा सिनेमा टीका-टिप्पणी करतो. पण हा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही.
भैरप्पा यांच्या प्रसिद्ध ‘वंशवृक्ष’ कादंबरीवर त्याच नावाच्या सिनेमाची कथा, जिचे चित्रीकरण मैसूर मध्ये झाले, त्या सर्वांची कथा ‘जुने मैसूर : नवे प्रयोग’ यात येते. हा चित्रपट त्यांनी प्रसिद्ध कन्नड रंगकर्मी बी. व्ही. कारंत यांच्याबरोबर केला. हाही सिनेमा मी अजून पाहिला नाही, पण कादंबरीचे मराठीतील नभोवाणी रूपांतर ऐकले आहे. त्याच सुमारास आणखी एक चित्रपट ‘काडू’ ह्याचेदेखील काम सुरू कसे झाले याचे विवरण येते. हे सर्व वाचून त्यांच्यातील फिल्ममेकर, अभिनेता कसा फुलत गेला हे समजते. मी गेल्या वर्षी चित्रपट रसास्वाद शिबिराला गेलो होतो, त्यावेळेस चित्रपटनिर्मिती, प्रक्रिया यांबद्दल जे सांगितले होते, त्याची थोडीफार प्रचीती या वर्णनातून आली. या दोन-तीन कन्नड चित्रपटांमुळे त्यावेळेस कन्नड चित्रपटसृष्टीत वेगळी लाट आली, याचे श्रेय त्यांना जाते.
पुस्तकाच्या शेवटी पुण्यात FTII चे संचालक म्हणून झालेले त्यांचे आगमन, त्याविषयी ते लिहितात. पुण्यात ते दोन वर्षे राहिले. FTIIचा अनुभव, परिसर, प्रभात स्टुडिओची असलेला इतिहास इत्यादीबद्दल ते आत्मीयतेने लिहितात, ते वाचून छान वाटते. मी नुकतेच FTIIचा अनुभव घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात FTIIमध्ये घडलेल्या घडामोडी, जसे की तेथील संप, शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलणे, प्रभात स्टुडिओचे संस्थापक दामले यांचा पुतळा दर्शनी भागात आणणे, भारतीय चित्रपटसृष्टी आणि FTII यांत नसलेला संबंध, हे सर्व त्यांच्या अभिरुचीची, दूरदृष्टीची साक्ष देतात. तेथेच त्यांच्या आणि हेमामालिनी प्रकरणाबद्दल मोकळेपणाने माहिती देतात. दोन वर्षांनंतर तेथून लगेच ‘मंथन’ या हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी राजीनामा देऊन राजकोटला निघून जातात. आणि सर्वांत शेवटी वयाच्या चाळीशीत त्यांच्या विवाह होतो, त्याची ते माहिती देतात.
तर असा गिरीश कार्नाड यांच्या आत्मचरित्राचा संक्षिप्त परिचय. आता चांगले आत्मचरित्र कशाला म्हणायचे हा प्रश्नच आहे. लेखकाने अगदी प्रामाणिकपणे सर्व नमूद केले आहे, याला पुरावा काय? तसेच सर्वच्या सर्व गोष्टी मांडल्याच पाहिजेत का? त्यांच्या आत्मचरित्रात प्रांजळपणा आहे, हे नक्की. त्यातून शिकण्यासारखे - वाचक म्हणून समृद्ध करणाऱ्या गोष्टीदेखील - भरपूर आहे. पण हाच प्रांजळपणा बऱ्याचदा वादविवादाचे, चिखलफेकीचे कारण बनतो. या पुस्तकातील बरेच प्रसंग, उल्लेख हे अशा वादासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे, होती. पण तसे अजून तरी झालेले दिसत नाही.
थोडेसे अनुवादाबद्दल. तो नक्कीच वाचनीय आहे. बहुधा मूळ पुस्तकातील, कथनातील ओघवतेपण टिकून आहे. पण बऱ्याच ठिकाणी शब्दयोजनेमुळे रसभंग होतो. ‘अय्यो’ हा शब्द पक्का कर्नाटकी आहे, तो मराठीत का वापरावा? प्रचोदन, सांद्र अनुभव, साक्षी-चित्र, खेळता खेळता आयुष्य हे असे शब्दप्रयोग थोडा त्रास देतात. मी कन्नड जाणतो, कर्नाटकाची संस्कृती, भूभाग जाणतो, म्हणून मी तेथील बऱ्याच गोष्टी ज्या पुस्तकात आल्या आहेत, त्या समजू-उमजू शकलो, पण इतर भाषिकांना तो भाग कितपत भावेल याची मला शंका आहे. कन्नडमधून मराठी भाषांतर करण्याचा मलादेखील छोटासा अनुभव आहे, उमा कुलकर्णी यांनी अर्थात कितीतरी पुस्तके केली आहेत. पण हे भाषांतर प्रकरण अवघडच असते, हे मात्र नक्की. पुस्तकात छायाचित्रे आहेत, पण ती छोटी छोटी का आहेत हे समजले नाही. मुखपृष्ठावर त्यांचे एक छायाचित्र आहे, जे ‘आगोम्मे ईगोम्मे’ या आधी उल्लेख केलेल्या त्यांच्याच कन्नड पुस्तकाच्या मलपृष्ठावर आहे. ते रूहशाद गार्दा यांनी काढले आहे, असे त्यात नमूद केले आहे. पण ते काय आहे हे कुठेच सांगितलेले आहे. मला वाटते ‘हयवदन’ या नाटकात ‘दोन मस्तकं’ ही जी संकल्पना आहे, ती त्यांनी त्यातून दर्शवली आहे.
गिरीश कार्नाड यांच्या कामाची यादी पुस्तकाच्या शेवटी सूची रूपात दिली आहे, ती एकदम उपयुक्त आहे. असो. गिरीश कार्नाड किती वैविध्यपूर्ण, समृद्ध आयुष्य जगले आहे, असेच म्हणावे लागेल.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गिरीश कार्नाड म्हणजे एक अफाट व्यक्तिमत्त्व. त्यांच्याभोवती जे वलय आहे, त्यामुळे हे पुस्तक हातातून सोडवत नाही!
.............................................................................................................................................
हा मूळ लेख प्रशांत कुलकर्णी यांच्या ब्लॉगवर दोन भागात प्रकाशित झाला आहे. ते दोन्ही भाग संपादित करून इथे घेतले आहेत.
लेखक प्रशांत कुलकर्णी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत.
ppkya@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.



Post Comment