अजूनकाही
कविता म्हणजे मानवी अस्तित्वावर परिणाम करणाऱ्या घटितांची संवेदनशील मनाने घेतलेली नोंद असते. त्या नोंदीच्या तपशिलाचा, त्यातील उद्गारांचा स्वतंत्रपणे होणारा प्रवास समाजाच्या सर्वतन जाणीवेपर्यंत होणारा असतो. त्यामुळे मानवी इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत मौलिक स्वरूपाचा असतो. कविता आपले ताजे वर्तमान पाहताना भूतकाळ न्याहाळून, भविष्यकालीन स्थितीगतीचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यात ती माणसाचा त्रिकालबाधित असा व्यवहार एका सांस्कृतिक पटलावर ठेवत जाते. त्यातून त्या त्या काळाचा नवा अर्थ प्रस्थापित होत जातो. आणि समाजाच्या व्याधीचे, त्याच्या दु:खाचे विखुरलेले संदर्भ काळाची महत्त्वपूर्ण अशी जाणीव निर्माण करतात.
त्या दृष्टीने महेश दत्तात्रय लोंढे यांची कविता महत्त्वाची आहे. तिने आपल्या आवाक्यात असणाऱ्या काळाची धग ‘निद्रानाशाची रोजनिशी’ या कवितेद्वारे आपल्या आजच्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर समोर ठेवली आहे. रुजलेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने आपल्या नजरेत सामावलेले आभासी जग ओसंडले. त्याची पाळेमुळे आपल्या अवतीभवती विस्तारली. त्याची एक कुटुंबव्यवस्थाही नव्याने तयार झाली आहे. त्याचा मनोमन, दिसणारा वेगही त्यांनी स्वीकारला आहे. त्या कोसळणाऱ्या बदलांची क्षणभंगुरता नव्या जगाला अधिक समोर जाण्याचे निर्देश देतांनाचे चित्र एका भयगंडाजवळ जाणारे आहे. हे बदल त्यांच्या स्थितीगतीतून कोणत्या वृत्ती-प्रवृत्तीतून, आपला मार्ग निवडतात हे या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. या सगळ्या स्थित्यंतरातून ढवळून निघालेले समकालीन कवितेतील माणसाचे असणे, परंपरानिष्ठ आदिम अस्वस्थतेने ग्रासलेले आहे. त्यातून त्याचा पुन्हा पुन्हा उफाळून येणारा एका प्रकारचा मूलतत्त्ववाद दिसतो. या सगळ्या अंगवळणी पडलेल्या वृत्तीद्वारे त्याच्या सुप्त अशा मानवी मूळ-प्रवृत्तीचे दर्शन होते. त्याचा इतिहास, सत्तापिपासा, आकांक्षा, धर्म, लढाया त्यातून निर्माण झालेल्या मानवी तृष्णेचा प्रवास आताच्या बाजारवादापर्यंत येऊन पोचण्याची स्थिती शोषणाच्या गुणसूत्राजवळ स्थिर होते. आज प्रत्यक्षातील ऐतिहासिक संघर्ष जरी नसला तरी ‘आपुलाची वाद आपणासी’ ही स्व-संघर्षाची जाणीव जगण्याच्या दैनंदिन वाटाघाटीतून निर्माण होते आणि हा ‘पूर्वजांच्या हाडांनी वाहिलेला गारठा’ आपल्या पुढच्या पिढीला प्रदान करताना मानवी आस्थेच्या पूर्ण वृत्तीचे दर्शन या उपयोजनातून साकार होत जाते.
पिढ्यानपिढ्या सांगून झालेल्या गोष्टींना कोणत्याही प्रकारच्या नव्या वाटा गवसत नाहीत. आता काही बदलल्याचे संकेत आणि नव-सर्जनाच्या दिशा असल्याचे जाणवत नाही. यातून येणारी स्थिती, कुठेतरी जळमटांचे जाळे, आपला सामाजिक अवकाश अशुद्ध करण्यास कारणीभूत होतानाचे चित्र बदलांच्या पार्श्वभूमीवर उभे राहत नाही. अशा या काळाच्या वांझ गोष्टी पुन्हा सांगण्याचा अट्टाहासी काळ नित्याच्या रोजनिशीसारखा पुढच्या काळाची पानेही त्याच त्या मजकुराने भरवेल.
स्वत:शीच बोलणे म्हणजे आतून आलेल्या परंपरांना खंडित करणे होय. म्हणजे एका भोवतालाबद्दल गांभीर्याने विचार करणे. आपला भवताल आपल्या सारख्या हुबेहूब सुख-दु:खाची जाणीव असलेल्या माणसांनी व्यापलेला आहे. त्याबद्दलची करुणा निर्माण करण्याचे संकेत ही कविता देते. परंपरेतील उज्ज्वल भूतकाळापेक्षा जिवंत अशा सोज्वळ वर्तमानाबद्दल हा कवी व्यक्त होताना दिसतो. त्याने माणसाच्या उद्धाराची त्याच्या अस्तित्वाची आपल्यातच असलेली व्यवस्था दाखवून दिली आहे. त्याच्या शोधातून आपल्या निर्मितीच्या नवसर्जनाच्या दिशा भविष्यातूनही याच तऱ्हेने मार्गस्थ होण्याचे चिन्ह एका युद्धखोर स्थितीला वर्तमान- परिस्थितीतच नाकारणे होते. आपले पर्यावरण माणसातील करुणेसह हस्तांतरित करण्याची ग्वाही ही व्यवस्था देते. अशी काही स्थिती या कवितेतून निर्माण झाली आहे. तीच एक माणसांपर्यंत जाणारी वाट निर्माण करू शकणार आहे.
हे ज्ञात असलेले सहज उपलब्ध असणारे ज्ञान कोणते आहे? पक्ष्यांकडून बदलणाऱ्या मोसमाविषयीचे अंदाज, त्यांच्या स्थलांतरातून आपला जीवनमार्ग निवडण्याचे आराखडे, मातीतून आपल्या सुपीक कल्पना उगवून, लोभाच्या लोंभ्या छाटल्या पाहिजेत, जमिनीला कान लावून आपल्या मातीपणाचा आवाज ऐकला पाहिजे, झाडांनी वाऱ्याबरोबर आपल्या माना डोलावल्या तर, आपल्यातील हिरवेपणाचा कोंभ त्यांच्या एकंदर जीवन जाणीवेसाठी जिवंत राहिला पाहिजे. ही अवस्था उच्च कोटीची मानवी प्रेरणा आहे. त्याबद्दलची करुणा त्याच्या सतत सहवासात राहूनच प्राप्त होते. त्यांची जीवनदृष्टी व भाषेचे सौष्टव समजावून घ्यावे लागते. तोपर्यंत आपल्यातील आपल्यासारख्या माणसांना मिठी मारली तरी पुरे आहे, या जाणीवेतून अंतर्जाणीवेत निर्माण होत असलेली भौतिकीकरणाची प्रक्रिया एका मानवी संज्ञेत रुपांतरीत होईल. त्याचे असणे एवढे भयावह स्वरूपाचे असणार नाही. असे आपल्याला या स्थितीतून म्हणता येते.
या कविता संग्रहातील ‘भर दिवसाचे साक्षात्कार’ हा एक बंध आपल्या ‘नॉस्टलजिक’ भावनिक व्यवहाराला जगणाच्या सूत्राशी जोडण्याचा प्रयत्न करतो. ही जीवनाच्या संदर्भात व्यक्त झालेली गतकातरता ‘दुखत्या पानावरून पुढे’ जाताना माणसात त्याच्या आदिमतेमध्ये असणाऱ्या काही घटितांच्या आधाराने जगण्याविषयीचे तत्त्वज्ञान मांडू पाहण्याची गोष्ट, निश्चितच एका संघर्षाला पुढे जाणारी असते. कारण दु:खाच्या जाणीवेवरच तत्त्वशरणतेचा उतारा काम करत असतो. व्यवस्थेने निर्माण केलेले किंवा घालून दिलेले नीतीनियमांचे शास्त्र ‘अभावाच्या’ अर्थपूर्णतेमध्ये सामावलेले असते. अन्यथा उफाळून आलेल्या मानवी प्रवृत्तीचे उग्र असे दर्शन काही निमित्तमात्र स्वरूपाचे असते. त्याची प्रातिनिधिक सर्वजन अशी स्थिती सार्वत्रिक अभावशीलतेच्या अंगाने एका विशिष्ट स्वरूपात प्रकट होताना दिसते. एका सामाजिक अस्वस्थतेमध्ये दिसणारे परावर्तन त्या काळाच्या पटलावरील सर्वव्याप्ततेला आवाहन करत असते. त्या दृष्टीने या कवितेतून ‘शेजारी शेजारी उगवून’ येणारी दृष्टी अत्यंत महत्त्वाचे सूचन करणारी आहे. या भावनेमध्ये सामूहिक दु:खाची मूळं एकमेकांत गुंतलेली आहेत. त्यांच्या दु:खाला व्यक्तिगत असा धागा उरलेला नाही. त्याचे स्वरूप सामाजिक अस्वस्थतेमध्ये विलीन झालेले आहे.
तशी ही कविता म्हणजे एका कृषीनिष्ठ नांदत्या समूहाची प्रातिनिधिक स्वरूपाची आत्मकथा आहे. त्या कथेतून उलगडणारी त्याची मानसिक आंदोलने आणि भाकितांची प्रमेये सकारात्मक अशा आशावादाशी जोडलेली आहेत. त्याला कोणत्याही राजकीय स्वरूपाचा संसर्ग झालेला दिसत नाही. त्याची सर्व पातळींवर व्यक्त झालेली महत्त्वाकांक्षा संवर्धनाच्या कुळातील सर्जनशील अशा व्यक्तिमत्त्वाची आहे. नियतीग्रस्ततेच्या फेऱ्यातील अज्ञान या अवस्थेत त्यांच्यात शिरलेले नाही. त्यांच्या वाट्याला आलेली अभावग्रस्तता कोणत्या परिस्थितीचा परिपाक आहे ही समजण्याची कुवत त्याच्यातील निर्मितीतत्वाने सृजनशीलतेने दाखवून दिली आहे.
या संपूर्ण कवितेचा आणि कवितागताच्या अस्तित्वाचा खऱ्या अर्थाने उपयोजित बंध ‘निद्रानाशाच्या’ स्वतंत्र विभागातून उलगडला जातो. आपले असतेपण त्यातून प्राण पणाला लावण्याची गोष्ट व्यासानेही लिहू नये एवढ्या व्यामिश्र आणि गुंतागुंतीची आहे.
या कवितेमधून येणारे वास्तव कृषी परंपरेने चालत आलेल्या कृषी व्यवसायाच्या वाताहतीचे तितकेच नाकर्तेपणाचेही आहे. जगाचा पोशिंदा समजण्याचा सुखावणारा काळ जेव्हा सगळ्या कमावलेल्या इभ्रतीवर अवघ्या अस्तित्वावर नांगर फिरवतो, तेव्हा सावरण्याची गोष्ट पुढे सरकलेली असते. सगळ्या बाजूनी भयकोंडीचे वास्तव पसरलेले असताना ‘डोळे उजाडण्याची’ स्थिती भितीग्रस्तातेत बदललेली असते. ‘रात्रीशी दिवसाला जोडणारा पूल / ढासळत राहतो / जात असतो हळूहळू वाहून’. ‘रात्रीचा संबंध’ सारासार अर्थाने निद्रेशी जोडला जातो. माणसाच्या श्रम परिहाराशी त्याच्या स्वप्नाशी त्या अवकाशाचा संबंध असतो. ती अवस्था खऱ्या अर्थाने माणसाची त्याच्या सहचर आणि परिसराची, निसर्गाच्या प्रेरणेतून निर्माण झालेली असते. त्या सुखावहतेला मानवी करुणेचे त्याच्या संवर्धनशीलतेचे एक नाते निर्माण झालेले असते.
कृषी आणि वन संस्कृतीचे येथील परिसरावर झालेले संस्कार थेट जगण्यातील नैतिकतेमध्ये रुजलेले असतात. त्यामुळे परस्परांना सांभाळून घेताना निर्माण झालेला विश्वास जगाच्या वर्तनासाठी एक अलिखित असा संकेत असतो. या संबंधात कोणत्याही कारणाने या दोन स्थितीमध्ये असंतुलन निर्माण झाले की, निद्रानाशाच्या भयाची स्थिती मानवी जीवन जाणीवेवर पसरायला सुरुवात होते. त्यातून निर्माण झालेला भयगंड निद्रेमधील स्वस्थता लाभू देत नाही. तुमच्यावरील सुरक्षा कवच नष्ट होऊन तुमचे निसर्गामधील असणे गोठण्याची स्थिती निर्माण करते. त्या दृष्टीने निद्रानाश ही भयाच्या अवस्थेला जोडली जाणारी व्याधी आहे. आपल्यातील भयाचे व्यवस्थापन आणि जगण्यातील नियमन संतुलित सकारात्मक असले की, या व्याधीचा उपचार होतो. निसर्गाकडे पाहण्याची संवर्धनात्मतेची दृष्टी असली की, माणसाला पुन्हा जगण्याची प्रेरणा निसर्गातूनच मिळते आणि हा प्रवास अधिक सुखकर व्हायला मदत होते.
त्या दृष्टीने या कवितेकडे पाहिल्यास अस्वस्थतेकडून अधिक सकारात्मकतेकडे आपण निघून जातो. या कवितेमधून जगण्याबद्दलची हतबलता पुन्हा रुजण्यासाठी तयार होते. नकारात्मकता हा तिचा गुणधर्म नाही. ‘झाडाच्या मुळाशी सावलीत झाले उन्हाचे ज्ञान’ कितीही कंठात प्राण आले तरी जागतिकीकरणातील बदलाचे त्याच्या जगण्यातील अपरिहार्यतेचे आत्मिक असे विश्लेषण ही कविता करत जाते. आपल्या अनुभवविश्वातून भोगलेला समकाल वाहत नेताना एका मध्यंतरात त्याच्यातील संक्रमणाची स्थिती स्वागतशील स्वरूपाची आहे. नव्या बदलांसाठी कोणत्याही आडवळणाच्या गोष्टी तिने स्वीकारलेल्या नाहीत. ‘पुरुषभर तणात वाढ केळी स्वत:ची / तवाजाळ दुष्काळात तगवून ठेवले स्वत:ला / मग मातीतून स्वत:लाच उपटून घेऊन / निघालो नव्या दिशांच्या स्वागताला/’ या कवितेत आलेले क्षितीज त्याच्या क्षमतेचे स्थान त्यांनी निश्चितपणे ठरवलेले आहे.
प्रत्येक कवितेची आपली एक भूमिका वाहून नेणारी एक क्षमता असते. त्या दृष्टीने ही कविता सक्षम अशी आहे. हतबलतेच्या महत्तम अशा काळात माणसाच्या अस्तित्वाचे गाणे तिने कायम ठेवले आहे. त्याच्या जगण्यापाशी उगवून आलेल्या अनेक शक्यता तिने तपासून पाहिलेल्या आहेत. त्या पद्धतीचा सकारात्मकतेला जवळ जाणारा अवकाश आपल्याकवितेतून रुजवण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे.
या कवितेला स्वत:ची एक भाषा आणि ती मांडण्याची उत्तम अशी शैली अवगत झाली आहे. या कवितेने पचवलेला प्रभाव सुसंस्कारितपणे मांडण्यातील आपलेपणा एक परंपरा म्हणून साजेसा आहे. त्यातून आपली कविता प्राणपणाने जपण्याचे कसब या संग्रहातून सफल झाले आहे. या कवितेतील प्राप्त झालेला काळ संगती विसंगतीमधून उमटलेला स्वत:चा एकात्म असा सूर कवितेतील भूमिकेचे सत्त्व टिकवून ठेवतो. प्रतिमांच्या साहाय्याने आकळलेला काळ पुढे ठेवताना त्यातून दिसणारा समृद्ध वसा नजरेआड करता येत नाही. आपला भोवताल आणि सामान्य माणसाच्या दु:खाचा सारांश मांडताना ही कविता घालमेलीचा इतिहास, दु:खाचा दंश पचवून जगण्याची अनावर ओढ कायम ठेवत जाते. आपल्या स्वप्नांना निद्रानाशाची अवस्था पचवून हिरव्या कोंभाची गोष्ट सांगत आपल्या श्वासावर उमेदीवर जगण्याची सिद्धता प्राप्त करत उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहण्याचे विसरत नाही.
या सगळ्या कथित अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली कवीची पसायदानातील दृष्टी फार मोठी आहे. त्यात सामान्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आजच्या काळाला साजेशी उर्जा मागितलेली आहे.
राहो पायाखाली जमीन फुटभर
डोईवर फांदी हिरवीगार
नकोत अश्रू –
असोत तर त्यांचे बाष्फ न होवो
सांगण्यासारखे काही उरो कायम
ऐकण्याचीही आसक्ती राहो
बोलता यावेत जमिनीशी
मौनातले शब्द काही
‘निद्रानाशाच्या’ भयाच्या पातळीवर जागत्या रात्रींचा या प्रकारचा वारसा घेऊन जगण्यातील रोजनिशी जिवंत ठेवत वेगवेगळ्या पैलूंवर व्यक्त होत असेल तर त्यातील गोठलेपणा प्रवाहित करून माणसापर्यंत जाण्याचा पूल निर्माण झाला पाहिजे, असे या कवीला वाटत असावे.
.............................................................................................................................................
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3998
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.



Post Comment