‘सखाराम बाइंडर’ : आधुनिक, अभिजात नाटकाचा वेगळा अन्वयार्थ
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘सखाराम बाइंडर’च्या हिंदी प्रयोगातील काही दृश्य
  • Sat , 27 April 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe सखाराम बाइंडर Sakharam Binder विजय तेंडुलकर Vijay Tendulkar

मराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक ही एक अभिजात कलाकृती आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीला या नाटकाला हात घालण्याची इच्छा होते. यातील सखाराम बाइंडर, लक्ष्मी, चंपा वगैरे पात्रं अजरामर झाली आहेत. त्यांचा अन्वयार्थ लावण्याचे काम प्रत्येक पिढीतील प्रतिभावान दिग्दर्शक करत असतो.

मुंबईस्थित जेफ गोल्डबर्ग स्टुडिओतर्फे अलिकडेच ‘सखाराम बाइंडर’चे हिंदीत प्रयोग सादर करण्यात आले. हे प्रयोग अशोक पांडे यांनी दिग्दर्शित केले असून ते नाटकात ‘सखाराम’ची प्रमुख भूमिका करतात.

तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ १९७२ साली मंचित झाले होते. या नाटकामुळे एकच गदारोळ उठला होता. या नाटकात चंपाचे पात्र रंगभूमीवर साडी बदलते असे एक दृश्य आहे. शिवाय सखाराम बाइंडरच्या तोंडी असलेली भाषा तेव्हाच्या (व कदाचित आजच्यासुद्धा) उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय संवेदनशीलतेला मानवणारी नव्हती. जोडीला सखारामचे जगावेगळे जीवनविषयक तत्त्वज्ञानसुद्धा मराठी संवेदनशीलतेला आव्हान देत होते.  अशा कारणांनी या ‘सखाराम’ वादग्रस्त ठरला व त्याने इतिहास घडवला. तेव्हा लेखकाच्या आविष्कार स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यात एक सुप्त मुद्दा दडला होता. तो म्हणजे नाटककाराने ‘सखाराम बाइंडर’ हा जातीने ब्राह्मण दाखवला होता. तो तसा जर नसता तर या नाटकाबद्दल त्या काळी एवढा गदारोळ उठला असता का, आज हा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.

येथे मला इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या आणि पुढे कमालीच्या वादग्रस्त झालेल्या ‘लेडी चॅटर्लीज लव्हर’ या कादंबरीची आठवण होते. या कादंबरीत असे दाखवले आहे की, लेडी चॅटर्ली एका माळ्याबरोबर शरीरसंबंध ठेवते. हे विवाहबाह्य संबंध तत्कालीन समाजाला अर्थातच मान्य नसतात. याचे खरे कारण म्हणजे लेडी चॅटर्लीने एका माळ्याबरोबर म्हणजे खालच्या वर्गातल्या (खालच्या जातीतल्या नव्हे) पुरुषाशी संबंध ठेवले असतात. त्या ऐवजी जर तिने एखाद्या लॉर्डशी संबंध ठेवले असते तर कदाचित एवढी बोंबाबोंब झाली नसती.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

‘सखाराम बाइंडर’ नाटकाची, खास करून त्यातील सखाराम, चंपा वगैरे पात्रांची एव्हाना भारतभर काही एक प्रतिमा रसिकांच्या मनांत स्थिरावली आहे. अशोक पांडे यांनी या प्रतिमेला पूर्णपणे छेद जरी दिला नसला तरी त्यात नवे आणि विचार करण्यासारखे रंग भरले आहेत. तेवढ्यासाठी तरी ‘सखाराम बाइंडर’चा हा प्रयोग बघावा.

सखारामचे कथानक आता थोडक्यातही सांगण्यात अर्थ नाही, इतकी या नाटकाची समाजात चर्चा झालेली आहे. मला सुदैवाने निळू फुले, लालन सारंग यांनी सादर केलेल्या ‘सखाराम’चे चार-पाच प्रयोग बघण्याची संधी मिळाली. त्यानंतर मुंबईस्थित नाट्यकर्मी ओम कटारे यांनी हिंदीत सादर केलेला ‘सखाराम’ बघण्याची संधी मिळाली. परिणामी माझ्याही मनात ‘सखाराम बाइंडर’ नाटकातील पात्रांच्या रूढ झालेल्या प्रतिमा होत्या. यात सखारामची वासना, त्याचा (आजही) पचनी पडायला अवघड असा प्रामाणिकपणा व रोकडा व्यवहार, चंपाच्या व्यक्तिमत्त्वात असलेली कामुकता, लक्ष्मीचे पारंपरिक हिंदू स्त्रीचे संस्कार प्रमाण मानुन जगणे वगैरे प्रतिमा माझ्या मनात गडद होत्या. अशोक पांडे यांनी दिग्दर्शित व अभिनित केलेला ‘सखाराम बाइंडर’ बघून मात्र यातील अनेक प्रतिमांना तडा गेला. परिणामी मला या नाटकाचा पुनर्विचार करणे भाग पडले.

या नाटकातला सखाराम २०१९ मधला आहे. त्याच्याजवळ मोबाईल फोन आहे.  मात्र नाटकात याचा फारसा वापर केलेला नाही. त्याच्या घराचा सेट मात्र जुन्या काळाला शोभेल असे नेपथ्य वापरून उभा केला आहे.

नाटकाची सुरुवात सखाराम आणि लक्ष्मी यांच्या आगमनाने होते. तिला व पर्यायाने प्रेक्षकांना सखाराम त्याची काम करण्याची पद्धत समजून सांगतो. एवढेच नव्हे तर शेजारच्या कपाटातून चक्क एक करारपत्र काढतो व त्यावर लक्ष्मीला स्वाक्षरी करायला लावतो. हे नवीन आहे. मूळ संहितेत सखाराम फक्त बोलतो, लेखी करार करत नाही. यामुळे नाटक २०१९ मधले वाटते. आता आपल्या समाजात ‘विवाहपूर्व करार’ वगैरेची चर्चा सुरू झाली आहेच.

नाटक नेहमीच्या कथानकानुसार पुढे सरकते. सखारामचा मित्र दाऊद येतो. लक्ष्मी त्याला गणपतीची आरती करू देत नाही. परिणामी कमालीचा चिडलेला सखाराम तिला बेदम मारतो. सखारामचा निधर्मी दृष्टीकोन प्रेक्षकांसमोर येतो. हळूहळू सखारामला वाटायला लागते की, लक्ष्मीच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला असावा. ती ज्या आत्मीयतेने मुंगळ्याशी लाडे लाडे बोलते त्यावरून सखारामसह प्रेक्षकांनासुद्धा असा संशय येतो. येथे नाटककार म्हणून तेंडुलकरांचे मोठेपण ठसते. त्यांनी अशा प्रसंगातून लक्ष्मीचे पात्र ठसठशीत केले आहे. असा प्रसंग सुचणे सोपे नाही.

यथावकाश सखारामला लक्ष्मीचा कंटाळा/ त्रास होऊ लागतो व तो तिला घराबाहेर काढतो. अद्याप जगाचा फारसा अनुभव नसलेली लक्ष्मीसुद्धा घरातून जायला तयार होते व जातेसुद्धा. सखारामच्या घरात पुन्हा एकदा व्हेकन्सी निर्माण होते, जी चंपा भरून काढते.

नाटकाच्या या टप्प्यापर्यंत दिग्दर्शकाने फारसे बदल केलेले नाहीत किंवा जे केलेत ते फारसे महत्त्वाचे वाटत नाही (उदाहरणार्थ मोबार्इल वगैरे सखारामच्या हातात दाखवणे). त्यांनी काही प्रसंग का गाळले हे मात्र समजत नाही. उदाहरणार्थ मूळ नाटकात एका प्रसंगी लक्ष्मी असताना सखाराम मृदंग वाजवतो. यातून रंगमंचावर एक वेगळे पवित्र, आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर नंतरचा धिंगाणा जबरदस्त परिणाम करतो.

अशोक पांडेंनी सादर केलेली चंपा खूप वेगळी आहे. एक तर ज्या तऱ्हेने व ज्या पोशाखात ती रंगमंचावर येते ते बघता ही गरीब घरातली असेल असे यत्किंचितही वाटत नाही. तिने परिधान केलेला स्लीव्हलेस ब्लाऊज, लावलेला काळा गॉगल, बेंबी खाली नेसलेली साडी, लालभडक लिपस्टिक वगैरेमुळे ती एक बाजारबसवी वाटते. आधीच्या प्रयोगातील लालन सारंगांनी साकारलेली चंपा अशिक्षित, गरीब घरातील स्त्री वाटायची. सखारामने आजपर्यंत घरात आणलेल्या स्त्रियांपैकीच एक, असे वाटायचे.  हे माझे निरीक्षण आहे, अशोक पांडे यांनी सादर केलेल्या चंपाबद्दल आक्षेप नाही.

येथून पुढे नाटक वेगळया प्रकारे विकसित होते. सखारामच्या सततच्या सांगण्यानुसार चंपा त्याला शरीरसुख द्यायला तयार होते, पण भरपूर मद्यपान केल्यावरच. त्यानंतरच्या संवादांतून व सखाराम/ चंपाच्या देहबोलीतून प्रेक्षकांना जाणवते की, या दोघांना एकमेकांपासून अभूतपूर्व शरीरसुख मिळाले आहे. सखारामला बायका आडव्या करण्याची सवय असली तरी त्या सर्व परित्यक्ता होत्या. त्यांच्यासाठी सखारामला शरीरसुख देणे हा त्यांच्यातल्या कराराचा महत्त्वाचा भाग होता. आता सखारामने आणलेली चंपा खूप वेगळी आहे. चंपाला नवऱ्याने सोडले नसते तर चंपाने नवऱ्याला सोडलेले असते. हा महत्त्वाचा फरक येथे लक्षात घ्यायला हवा. याचा संदर्भ पुढे येतो, ज्यामुळे नाटकाच्या आशयात बदल होतो.

सखाराम-चंपाचे जीवन आनंदात सुरू होते. सखारामला असे अभूतपूर्व शरीरसुख आधी कधीही न मिळाल्यामुळे तो चंपाचा जवळजवळ गुलाम होतो. तिच्यापायी त्याची नोकरी जाते, शेजारीपाजारी टोमणे मारायला लागतात, दाऊदसारखा मित्र दुरावतो. पण सखाराम पर्वा करत नाही. तो त्याच्याच मस्तीत जगत असतो. आणि अशात लक्ष्मी परत येते!

चतुर व घर कामाचा कंटाळा करणाऱ्या चंपाला लक्ष्मीचे येणे फायद्याचे वाटते. ती सखारामला लाडीगोडी लावून लक्ष्मीला ठेवून घेते. लक्ष्मीसारख्या पारंपरिक संस्कार प्रमाण मानणाऱ्या स्त्रीला सखाराम-चंपा यांच्यातील बेभान करणारा शृंगार सहन होत नाही. शिवाय तिच्या येण्यामुळे सखारामच्या मनावरही वेगळ्या प्रकारचा ताण येतो. तो चंपाला आधीसारखे जबरदस्त शरीरसुख देऊ शकत नाही, ज्याची एव्हाना चंपाला चटक लागली असते. ती या सुखासाठी दाऊदकडे जायला लागते. लक्ष्मीच्या विश्वात हा बदफैलीपणा असतो, फसवणूक असते. याच दरम्यान चंपाचा नवरा नाटकात अवतीर्ण होतो व नाटकाला वेगळेच परिमाण प्राप्त होते. अशोक पांडेंनी या पात्राच्या अन्वयार्थात बदल केले नसले तरी अभिनयाच्या पातळीवर चंपाचा हा नवरा फार उजवा वाटतो.

अशोक पांडेंनी वेगळ्या प्रकारे चंपा सादर केली आहे. ते सर्वच विचार करण्यासारखे आहे. तेंडुलकरांची चंपा शरीरसुखाबद्दल किळस बाळगणारी आहे. एका प्रसंगी ती सखारामला चोख सांगते की, ‘मला बिघडवू नको सांगते. मला तसलं काय आवडत नाही, ते बाई-पुरुषातलं’. पांडे यांची चंपासुद्धा सुरुवातीला शरीरसुखाबद्दल नाराज असते. पण सखारामच्या सहवासात तिलासुद्धा त्यातला आनंद अनुभवायला मिळतो. नंतर नंतर तर तीसुद्धा या सुखाला आतुर झालेली दिसते.

अशा स्थितीत लक्ष्मी सखारामला चंपाच्या बदफैलीपणाबद्दल व तिचे दाऊदशी असलेल्या संबंधांबद्दल सांगते. चिडलेला सखाराम रागाच्या भरात चंपाचा खून करतो. लक्ष्मी सखारामला धीर देते व तिचे प्रेत पुरून टाकण्यास सांगते. तेंडुलकरांचे नाटक संपते, तेव्हा रंगमंचावर सखाराम चंपाचे प्रेत गाडण्यासाठी खड्डा खणत असतो व लक्ष्मी त्याला मदत करत असते. पांडेंच्या नाटकात हा प्रसंग नाही. त्याऐवजी नाटकात चंपाचा कायमचा काटा निघाल्याबद्दल खुश झालेली लक्ष्मी दिसते व नंतर तिच्या अंगात देवी संचारली असा प्रसंग आहे. येथे नाटक संपते.

हा शेवट एका पातळीवर जास्त अर्थपूर्ण आहे. चंपाचा खून केल्यावर सखारामचा मिजास पूर्णपणे उतरलेला असतो. चंपाला अपेक्षित असे सुख देऊ शकत नाही म्हणून ती दाऊदकडे जाते हा धक्का सखाराम पचवूच शकत नाही. असा धक्का आजपर्यंत त्याने वापरलेल्या बायकांपैकी एकीनेही त्याला दिलेला नसतो. म्हणून चंपाचा खून करण्याअगोदरच सखाराम एका पातळीवर पराभूत झालेला असतो. पण ज्या प्रकारे पांडे यांनी लक्ष्मीवर नाटक संपवले, तिच्या अंगात देवी आलेली दाखवून, तिला हर्षवायू झालेला दाखवून केलेला हा शेवट, जास्त समर्पक वाटतो.

या नाटकात अशोक पांडे (सखाराम), सुश्री श्रेया मिश्रा (लक्ष्मी), शोनाली नागराणी (चंपा), हसित शहा (दाऊद) आणि अनिल मिश्रा (चंपाचा नवरा) यांच्या भूमिका आहेत. यातील प्रत्येकाने कमालीच्या तन्मयतेने आपल्या भूमिका वठवल्या आहेत. तरीही लक्ष्मीच्या भूमिकेतील सुश्री व चंपाच्या नवऱ्याची भूमिका करणाऱ्या अनिल मिश्रा यांचा खास उल्लेख करावा लागेल. लक्ष्मीतील आमूलाग्र बदल सुश्री फार सहजतेने व्यक्त केले आहे. विशेषतः शेवटच्या प्रसंगात तर तिने कमाल केली आहे. अनिल मिश्रा यांनी चंपाचा लोचट आणि लाचार नवऱ्याच्या छोट्याशा भूमिकेचे अक्षरशः सोने केले आहे. मुळ प्रयोगात बघितलेला फौजदार शिंदे आणि अनिल मिश्राने साकार केलेला फौजदार शिंदे फार वेगळे आहेत.

‘सखाराम बाइंडर’सारख्या आधुनिक अभिजात नाटकाचे सतत वेगवेगळे अन्वयार्थ लावणे व त्यानुसार नाटक सादर करणे हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण आहे. अशोक पांडेंनी दिग्दर्शित केलेला ‘सखाराम बाइंडर’ ही मुंबईतील रंगभूमीवरील एक महत्त्वाची घटना आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......