‘गौहर’ : एका मनस्वी कलाकाराची शोकांतिका
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘गौहर’ या नाटकातील काही दृश्यं
  • Mon , 11 March 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe गौहर Gauhar माय नेम इज गौहरजान My name is Gauhar Jaan महेश दत्तानी Mahesh Dattani लिलिट दुबे Lillete Dubey राजेश्वरी सचदेव Rajeshwari Sachdev झिला खान Zila Khan

१७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा विजय झाला. तेथून भारतीय संस्कृतीचा पाश्चात्य संस्कृतीशी परिचय व संघर्ष सुरू झाला. सुमारे दोनशे वर्षं टिकलेल्या इंग्रजांच्या सत्तेदरम्यान भारतात अनेक चांगले-वाईट बदल झाले. यात स्वतःचा आब राखून ताठ मानेनं भारतीय संगीत उभं राहिलं. भारतात अनेक शतकांपासून शास्त्रीय संगीताची, त्यातील विविध घराण्यांची भरजरी परंपरा आहे.

एकेकाळी ही परंपरा दक्षिण भारतात देवदासी व उत्तर भारतात तवायफ/ कोठेवाली वगैरे महिलांनी टिकवली आहे. अशीच एक अफलातून महिला म्हणजे गौहरज़ान (१८८७-१९३०) ही गायिका. अभ्यासकांच्या मते विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या रेकॉर्ड कंपनीमुळे गौहर जानचा आवाज घराघरांत गेला आणि ती भारतातील पहिली सुपरस्टार झाली. बेगम अख्तरचं स्वप्न होतं की, तिला गौहरज़ानसारखं गाता यावं.

गौहरज़ानचं जीवन वादळी होतं. ती ख्रिश्चन पती-पत्नींची कन्या. तेव्हा तिचं नाव होतं अंजेलिना येओवर्ड. पुढे तिच्या आईनं एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं. यामुळे अंजेलिनाचं नाव बदलून गौहरज़ान झालं. गौहरज़ानचं सुरुवातीचं आयुष्य बनारसला गेलं व नंतरचा काळ कलकत्ता शहरात व्यतीत झाला. तो काळ म्हणजे बंगालचा नवाब वाजिद अली शहाचा काळ. गौहरज़ाननं कलकत्त्यात शास्त्रीय संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं होतं. तिची आई उत्तम गायिका होती. गौहरज़ाननं गाण्यात आणि नर्तनात अफाट पैसा कमावला व तसाच बेफामपणे उधळलासुद्धा. शेवटी तिला म्हैसूर दरबार आश्रय दिला. अशा एका प्रकारे बेहिशेबी जगणाऱ्या कलाकारांची त्या काळी जशी अपरिहार्य शोकांतिका होत असे, तशी गौहरज़ानचीसुद्धा झाली.

गौहरज़ानचं वादळी जीवन विक्रम संपत या तरुण लेखकानं ‘माय नेम इज गौहरज़ान’ या २०१० साली प्रकाशित झालेल्या चरित्रात शब्दबद्ध केलं आहे. या चरित्राचा आधार घेऊन नाटककार महेश दत्तानी यांनी ‘गौहर’ हे सुमारे दोन तास चालणारं इंग्रजी नाटक संपन्न केलं. हे नाटक मुंबईच्या ‘प्राईम टाईम थिएटर’तर्फे मंचित केलं.

गौहर तेरा वर्षांची असताना एका मुस्लिम जमीनदाराच्या प्रेमात पडते आणि त्याच्याबरोबर पळून बनारसला येते. तिथं ती सुमारे चार वर्षं राहते. या दरम्यान तिचा गाण्याचा रियाज जरी सुरू होता, तरी ती मैफली करत नव्हती. यथावकाश तिचा प्रियकर तिला सोडून देतो. मग तिला कलकत्त्याला आईकडे परत येण्यावाचून पर्याय राहत नाही. गौहरज़ान एक और मिश्रण होतं. तिला २२ भाषा येत होत्या. यातील अनेक भाषांत ती सफाईनं गाऊ शकत असे. तिची कलकत्त्यात स्वतःच्या नावाची इमारत होती ‘गौहर मंजिल’.

विसावं शतक सुरू झालं, तेव्हा भारतात ग्रामोफोन तबकड्यांचा जमाना सुरू झाला. या कंपनीचे अधिकारी गेसबर्ग भारतातील बाजारपेठ कशी काबीज करता येईल, यासाठी कलकत्त्यातील अनेक गायक-गायिकांना भेटत होते. या दरम्यान त्यांची भेट गौहरज़ानशी झाली. तिचा अलौकिक आवाज ऐकून त्यांच्या लक्षात आलं की, हिच्या गाण्याच्या रेकॉर्ड काढल्या तर अफाट पैसा कमावता येईल. आणि होतंही तसंच. ग्रामोफोन कंपनी तिच्या आवाजातलं पहिलं गाणं १९०२ साली रेकॉर्ड करते. गौहरज़ानच्या गाण्याच्या रेकॉर्डचा खप प्रचंड होता. एका अंदाजानुसार तिनं जवळजवळ सहाशे रेकॉर्ड काढल्या. तिला १९११ साली दिल्लीला भरलेल्या दरबारात गाण्याची संधी मिळाली होती. रेकॉर्डच्या विक्रीतून तिला व ग्रामोफोन कंपनीला अफाट पैसा कमावता आला. गौहरज़ाननं हा पैसा दोन्ही हातानं उधळला.

नाटकात एक कलकत्त्याच्या रस्त्यातला प्रसंग दाखवला आहे. गौहरज़ान सहा घोड्यांच्या बग्गीनं जात असते. त्या काळी फक्त उच्च दर्जाच्या इंग्रज अधिकाऱ्याला सहा घोड्यांची बग्गी बाळगण्याचा मान होता. एक पोलिस अधिकारी गौहरज़ानची बग्गी अडवतो. एक हजार रुपयांचा दंड ठोठावतो. लक्षात घ्या की, हे हजार रुपये विसाव्या शतकातील पहिल्या दशकांतले. गौहरज़ान चटकन हजार नव्हे, तर दोन हजार काढून देते. सांगते की, ती उद्यासुद्धा याच रस्त्यानं याच सहा घोड्यांच्या बग्गीनं जाणार आहे. त्यामुळे पोलिसानं उद्याचा दंड आजच घ्यावा!

गौहरज़ानसारखे मनस्वी कलाकार एका वेगळ्याच धुंदीत जगत असतात. त्यांना या जगाचे कायदेकानून माहिती नसतात. किंवा असे म्हणणे कदाचित जास्त संयुक्तीक ठरेल की, त्यांना हे कायदेकानून माहिती करून घेण्याची इच्छा नसते. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे काही चाणाक्ष व लुच्चे लोक त्यांचा गैरफायदा घेतात. असाच प्रकार गौहरज़ानबद्दलही घडतो. तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिचा दूरचा नातेवाईक कोर्टात दावा टाकतो की, गौहरज़ान अनौरस संतान आहे व तिचा ‘गौहर मंजिल’वर कोणत्याच प्रकारचा मालकी हक्क नाही. सबळ पुराव्याअभावी गौहरज़ान खटला हरते. आयुष्याची शेवटची वर्षं तिला म्हैसूर दरबारनं मंगलोर इथं दिलेल्या एका छोट्या घरात काढावी लागतात.

हे नाटकाचं थोडक्यात कथानक. यात तसं नवीन काही नाही. बालगंधर्व वगैरे अनेक महान कलाकारांची ही शोकांतिका झालेली आहे. आज हे सर्व कलाकार एक आख्यायिका बनून समाजाच्या स्मृतीत जीवंत आहेत अजरामर झाले आहेत. त्यांना ज्यांनी फसवलं, त्यांची नावं इतिहासाला माहिती नाहीत, मात्र या कलाकारांना रसिक विसरले नाहीत. ‘गौहर’ हे नाटक बघताना हे सर्व विचार मनात येत होते.

या नाटकाचं दिग्दर्शन लिलिट दुबे यांनी केलं आहे. या नाटकाचा कालखंड म्हणजे एकोणिसाव्या शतकाची शेवटची वर्षं व आणि विसाव्या शतकातील सुरुवातीची वर्षं. गौहरज़ानचं जीवन कलकत्ता, बनारस, म्हैसूर वगैरे ठिकाणी गेलं. हे जागेचे व काळाचे बदल व्यक्त करण्यासाठी लिलिट दुबे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. रंगमंचाच्या मागे बॅकलाईटचा वापर करून गावांची नावं व ते वर्ष प्रोजेक्ट केलं.

नाटककार महेश दत्तानी यांनी कथा सांगण्यासाठी फ्लॅशबॅकचा वापर केला आहे. नाटकाची सुरुवात गौहरज़ान म्हैसूर दरबारनं दिलेल्या छोट्या हवेलीत येते, तेथून सुरू होते. वृद्ध झालेली व जीवनाला कंटाळली गौहर जान रसिकांसमोर येते. नंतर कालपट मागे मागे जातो. कलकत्ता, बनारस वगैरे शहरात कथानक घडतं. नेपथ्य फारसं बदलत नाही.

या नाटकासाठी दिग्दर्शक लिलिट दुबे यांनी नट फार चांगले निवडले आहेत. राजेश्वरी सचदेव (तरुण गौहर जान), डेंझील स्मिध (गौहरचे युरोपीयन वडील व ग्रामोफोन कंपनीचे अधिकारी), झिला खान (वृद्ध गौहर जान) या तीन महत्त्वाच्या पात्रांभोवती नाटक फिरत राहतं. या तिन्ही नटांनी अत्यंत दर्जेदार अभिनय केला आहे आणि प्रयोगाची रंगत उत्तरोत्तर वाढवत नेली आहे.

राजेश्वरी स्वतः उत्तम गायिका व नर्तिका आहे. या गुणांचा तिला ही भूमिका सादर करताना फार उपयोग झाला. तिला अधूनमधून गावं लागतं. राजेश्वरी स्वतः गायिका असल्यामुळे हा बदल अतिशय सहजतेनं रसिकांसमोर आणते. डेंझील स्मिथ मुंबईतल्या इंग्रजी रंगभूमीवरचा एक ज्येष्ठ नट. ही भूमिका त्यानं नेहमीच्या सफाईनं सादर केली आहे.

यात खरी कमाल केली आहे ती झिला खान यांनी. या नामवंत गायिका आहेत. या नाटकात त्यांनी प्रथमच अभिनय केला आहे. पण कोठेही नवखेपणा दिसत नाही. शिवाय त्यांनी गायलेली गौहरज़ानची गाजलेली गाणी. यातलं एक गाणं तर कलिजा खलास करतं. ते म्हणजे ‘आजा सावरिया तोहे गरवा लगा लू. रसिके भरे तोरे नैन’. हे गाणं नंतर अनेकांनी गायलं आहे. ‘गमन’ या सिनेमात तर हे शीर्षकगीत आहे. हे गाणं झिला खान यांच्या आवाजात ऐकताना गौहरज़ान कशी गात असेल याचा अंदाज येतो.

हे नाटक बघणं म्हणजे एका अशा काळात डोकावणं, जो तसा फार जुना नसला तरी आजच्या कमालीच्या वेगवान जीवनात फार मागे गेल्यासारखा वाटतो. ‘गौहर’ या नाटकानं तो काळ, त्यात जगलेले अतिशय मनस्वी कलाकारांचं जग डोळ्यांसमोर उभं राहतं. एक उसासा टाकत रसिक ‘गौहर’ बघून नाट्यगृहाबाहेर पडतात.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................