संघर्ष करणारा कधीच मोडून पडत नाही, हे या आत्मकथनाचे सार आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वसंत केशव पाटील
  • ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 01 March 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफार मी लोकांचा सांगाती Mi Lokancha Sangati संपतराव पवार Sampatrao Pawar

अगदी विद्यार्थिदशेपासून गेली तब्बल पाच तपे शेतकऱ्यांचा निर्भीड वाली आणि खंबीर वकील म्हणून सातत्याने संघर्षरत असलेल्या भाई संपतराव पवारांचे ‘मी लोकांचा सांगाती’ हे लक्षवेधी आत्मकथन आहे. या आत्मकथनात व्यक्तीपेक्षा समष्टीचा पैस नि परीघच अधिक प्रभावी आहे. एकूण सहा प्रकरणांत विभागलेले हे लेखन खरे तर एकाच अंत:सूत्रात बांधलेले आहे. शेतीचे अर्थशास्त्र, चारा-पाण्याचे न्याय्य नियोजन, गावगावकीचे तिढे-तिपडे, प्रस्थापित राजकारण्यांचे दांभिक मुखवटे, धनदांडग्यांची सत्तालोलुपता, पुढाऱ्यांची दाखवेगिरी, सरकारी अधिकाऱ्यांची ढिम्म वृत्ती, तत्त्वनिष्ठा गुंडाळून रंग बदलणारे पक्षश्रेष्ठी, दुष्काळामुळे होणारी गुराढोरांची परवड नि अशा गावाशिवाराला तळागाळात लोटणाऱ्या विविध समस्यांचा हा कोलाज आहे.

संपतरावांची मूळ पिंड-प्रकृती ही अथक लढवय्याची. एकीकडे समंजस, संयमी आणि समर्पणभाव, पारदर्शक परखडपणा, घट्ट मूल्यनिष्ठा; तर दुसरीकडे सळसळती अशी, ‘शेंडी तुटो पारंटी तुटो’ या पंथातील सर्वमंगलकारी दृढनिश्चयी भूमिका. युवाशक्तीची बळ-बांधणूक करण्यातील असोशी व त्याकरिता रात्रंदिवस पायाला भिंगरी, अन्याय-अत्याचार व जातिभेदाची जळमटे यांविषयीची तर्कशुद्ध चीड, सहकार्य, समन्वय, श्रमदान, स्वयंसूचन सामोपचार यांवर मन:पूत विश्वास, आंदोलन-मार्चे वगैरेचे काटेकोर नियोजन आणि विशेष म्हणजे समग्र प्रयोजनातील सुस्पष्टता, ही अशी एकूण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची समृद्ध खतावणी.

एन.डी. पाटील, अप्पासाहेब शिंदे, मुकुंदराव किर्लोस्करांदीसह आपले आई-वडील तसेच अनेक सहकाऱ्यांची विशेषत: भारत पाटणकर, बाबराव गुरव यांची संपतरावांनी चितारलेली कृष्णधवल चित्रेच-चरित्रे एकरंगी किंवा एकांगी वाटत नाहीत. शासन-प्रशासनातील भल्याबुऱ्या घटना-प्रसंगांचे रोखठोक वर्णन, विश्लेषण मोठे मार्मिक व समतोल आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात आलेल्या दोन परस्परविरोधी वर्तन-व्यवहाराच्या प्राचार्यांविषयी संपतरावांनी कथन केलेले अनुभव ताठ कण्याचा आणि कणखर बाण्याचा विद्यार्थी काय असतो, याची प्रचीती देतात. भारतीय व जागतिक राजकारणातील संपतरावांनी दिलेले संदर्भ त्यांच्या चौफेर व अभ्यासू वृत्तीची साक्ष म्हणता येईल.

या लेखनातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपतरावांनी ‘बिटविन द लाइन्स’मध्ये जी सूचक स्पेस सोडली आहे ती बरेच काही सांगून जाते. संपतराव मातीच्या पायांची फारशी दखल घेत नाहीत. जो स्वत:शी नेक-नामदार किंवा प्रामाणिक असत नाही, तो कुणाशीही कधीच प्रामाणिक असू शकत नाही, हे जीवनमूल्य उराशी जपत संपतरावांनी केलेली काटेरी वाटचाल ‘सारेच दीप मंदावले…’ अशी खंत बाळगणाऱ्यांना मोठी उभारी देणारी आहे.

हा जागल्या पाठीवर गावाशिवारातील जटिल समस्यांचे गाठोडे घेऊन, आपल्या उरा-शिरावर परिस्थितीचे प्रहार झेलत सुसाट निघालेला प्रभंजन आहे. आणि या साऱ्या पार्श्वभूमीला सातत्याने मंद-मृदू तरीही तारसप्तकात निनादणारी संपतरावांची कृतकृत्य नम्रता, परमत सहिष्णुता, भक्ती-विभक्ती तसेच विरक्तीही कशी भोवंडून टाकते, यासाठी मुळातून हे पुस्तक वाचावे लागते.

मातीच्या पायांनी त्यांना लाख खोडे घातले, जिवाभावाच्या साथीदारांनी अकारण-सकारण फारकत घेतली, पण हा रापलेला गडी पुढे नि पुढेच धावत राहिला. धपापत राहिला. उसासत राहिला. जगाच्या लेखी हीच त्याची चिमूटभर कहाणी. त्याने स्वत:तच प्रस्तावनेत म्हटले आहे – ‘राबणाऱ्यांचं गर्वगीत मी गात राहिलो आणि महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात जगाकडे पाठ करून काम करत राहिलो.’

सुहास पळशीकरांचे श्रीकाराचे दोन शब्द या आत्मकथनाचे जणू ‘प्रीअॅम्बल’च म्हणावे. सुहास कुलकर्णींचे प्रकाशकीयही सामाजिक गतिस्थितीचे नेमके विश्लेषण करणारे आहे. संपतराव म्हणजे शेतकरी-कामगार पक्षाचा एकलव्य. तरीसुद्धा त्याने पक्षाची शोकांतिका आणि तिची कारणमीमांसा हातचे न राखता केली आहे. संघर्ष करणारा कधीच मोडून पडत नाही आणि पडला-झडला-तंटला तरीही पायांखालची पुण्यगंधा मृतिका घेऊन तो पुन्हा झेपावतो, वादळाला ललकारतो. वाकत किंवा रांगत नाही, हेच या आत्मकथनाचे सार म्हणावे लागते.

खरे तर बळिराजा धरणाचा प्रवर्तक व शिल्पकार ही संपतरावांची सर्वदूर पोहोचलेली ओळख, पण इथे या पानापानावर प्रगटलेला संपतराव हा न संपणारा आणि न विकणारा असा दीपस्तंभ आहे.

.............................................................................................................................................

भाई संपतरावांच्या ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4512/Mi-Lokancha-Sangati

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Sandesh pawar

Sat , 02 March 2019

धन्यवाद सर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......