डोनाल्ड ट्रम्प यांच्या करमणुकीचं ‘टपली’चित्र
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Thu , 25 January 2018
  • संकीर्ण विनोदनामा टपल्या Taplya डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला तो २० जानेवारी २०१७ रोजी. म्हणजे कालच्या २० जानेवारीला त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झालं. तेव्हापासून त्यांनी अमेरिकनांची आणि सबंध जगाची भरपूर करमणूक केली आहे. त्याचा हा ‘अक्षरनामा’वर पूर्वप्रकाशित वानवळा...

.............................................................................................................................................

Tue, 15 November 2016

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर नव्यानं निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष म्हणून वर्षाला केवळ एका डॉलरचं मानधन घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण एकही सुट्टी घेणार नसल्याचंही ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.

‘इस एक डॉलर की कीमत तुम क्या जानो ट्रम्प बाबू?’ असं अमेरिकन नागरिक धास्तावून म्हणत असतील. ट्रम्प यांनी जास्तीत जास्त सुट्या घ्याव्यात, यासाठी देशभर आंदोलनं झाली, तरी आश्चर्य वाटायला नको!

http://www.aksharnama.com/client/article_detail/161

.............................................................................................................................................

Sat, 03 December 2016

पाकिस्तान हा विस्मयकारक देश आहे. इथली जनता सुज्ञ आणि हुशार आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा चांगला नावलौकिक आहे, त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : डोनाल्ड ट्रम्प.

तात्यांच्या विजयानिमित्त सत्यनारायण घालणारे आणि यज्ञयाग करणारे आता समोर आले की, फुटपाथ बदलतात… मुंगसानं कितीही आकर्षक डिस्को डान्स करून दाखवला, तरी गारुडी सापालाच दूध पाजतो.

http://www.aksharnama.com/client/article_detail/237

.............................................................................................................................................

Thu, 19 January 2017

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सेक्स टेपवरून सुरू झालेल्या विवादाविषयी बोलताना पुतीन यांनी ट्रम्प यांच्यावरचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून रशियातील सेक्स वर्कर्स जगात सर्वोत्कृष्ट असल्याचं सांगितलं.

रशियाचे अध्यक्ष अनुभवी दिसतात. बाकी या विधानात ट्रम्प यांना हिंदी सिनेमातल्या 'लॉयन'च्या स्टायलीत दिलेली गर्भित धमकीच दिसते आहे. ट्रम्पही अनुभवी आहेतच. यांच्या अनुभवांची त्यांना माहिती आहेसे दिसते.

http://www.aksharnama.com/client/article_detail/428

.............................................................................................................................................

Sat, 21 January 2017

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला स्वदेशीचा मंत्र दिला. अगदी आज, आतापासून अमेरिकेची विपन्नावस्था संपणार आहे. अमेरिकी हातांनी आणि अमेरिकी श्रमांनीच आता आपण अमेरिकेची पुनर्बांधणी करणार आहेत. अमेरिकी हातांनाच काम देणार आहोत आणि अमेरिकी उत्पादनेच विकत घेणार आहोत. अशी भावनिक साद ट्रम्प यांनी घातली.

ट्रम्पतात्या, आता एकदाचं कोणत्या शाखेत कधी स्वयंसेवक होतात ते जाहीर करून टाका. बरं ते अमेरिकीच उत्पादनं घेणार म्हणताय, तर उदयापास्नं कम्प्यूटर, मोबाइल, कपडे, चपलाबुटांची दुकानं बंद होणार का अमेरिकेतली? हा सगळा माल भायेरनंच येतोय म्हणून विचारलं तात्या. आन् तुम्हाला सस्त्यात कच्चा माल, सुट्टे भाग पुरवणाऱ्या फॅक्ट्र्या लागल्यात देशादेशांत त्याही बंद काय? रेड इंडियनच्या ड्रेसात फिरावं लागनार दिसतंय तात्याला लौकरच.

http://www.aksharnama.com/client/article_detail/438

.............................................................................................................................................

Mon, 23 January 2017

पृथ्वीवर पत्रकार हे सर्वांत जास्त अप्रामाणिक आहेत. माझे प्रसारमाध्यमांसोबत युद्ध सुरू आहे. शपथविधी सोहळ्यातील गर्दीविषयीचे चुकीचे वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर कारवाई करू : डोनाल्ड ट्रम्प

आपलं प्रत्येक विधान वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला डोनाल्ड डकच्या आवाजात ऐकू यावं, यासाठी तात्यांनी चालवलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. तात्या येनकेनप्रकारेण महाभियोग ओढवून घेण्याच्या फुल तयारीने उतरलेले दिसतायत.

http://www.aksharnama.com/client/article_detail/444

.............................................................................................................................................

Wed, 01 February 2017

अमेरिकेतील भारतीय नोकरदारांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले एच वन बी सुधारणा विधेयक अमेरिकी संसदेत सादर करण्यात आले आहे. प्रस्तावित विधेयकात हा व्हिसा असणाऱ्यांचे किमान वेतन १,३०,००० डॉलर्स करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांकडून स्वस्त मनुष्यबळाचा पर्याय म्हणून करण्यात येणाऱ्या परदेशी नोकरदारांच्या आयातीला चाप बसणार आहे. याचा मोठा फटका माहिती व तंत्रज्ञानविषयक निर्यातदार असलेल्या देशांना बसणार आहे. यात प्रामुख्याने भारताचा समावेश आहे. या व्हिसासाठीची सध्याची किमान वेतनमर्यादा ६० हजार डॉलर्स इतकी आहे.

अरे देवा, ट्रम्पतात्या आपल्यालाही 'मुसलमान'च समजतात होय! आता कुठे मुसलमानांचं नाक ठेचलं म्हणून नाच सुरू केला होता, तर ट्रम्पतात्यांनी आमच्याच पायाखालचं जाजम खेचलं! आता मॅडिसन स्क्वेअर ओस पडणार की काय?

…………………………………

सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेवर चहुबाजूनंही टीकेची झोड उठत असताना भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक केले असून दहशतवाद रोखण्यासाठी आपल्या देशातही अशा प्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

आपल्या देशाकडे या सात देशांतल्या किंवा अन्य मुस्लीम देशांमधल्या नागरिकांची रीघ लागली आहे, असा शोध यांना योगविद्येनेच लागला असणार. आदित्यनाथ यांच्या भावनेचं वर्णन करण्यासाठी 'डोनाल्डच्या यज्ञसोहळ्यात आदित्यनाथ सुरागुंग' अशी काही स्वदेशी म्हण नसल्यामुळे नाईलाजाने 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना' याच त्यांना सपशेल नापसंत ठरणाऱ्या म्हणीने करावे लागेल.

http://www.aksharnama.com/client/article_detail/472

.............................................................................................................................................

Thu, 02 February 2017

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी पुन्हा एकदा माध्यमांवर बरसले आहेत. बहुतांशी माध्यमे विपर्यस्त वृत्तांकन करणारी आणि बनावट असून अमेरिकेला खात्रीलायक वार्तांकनाची गरज आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बहुसंख्य बातम्या बनावट असतात, बहुसंख्य माध्यमं बातम्या तयार करतात, बहुसंख्य माध्यमं विपर्यस्त वृत्तांकन करणारी आणि बनावट आहेत, असे ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

तात्या, ही वाहिनी बनावट नव्हती, याची खात्री करून घेतलीत ना? मग ठीक आहे. बाकी तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. माध्यमं बनावट नसती आणि त्यांनी बोगस बातम्या दिल्या नसत्या, तर तुमच्याइतका बोगस माणूस सर्वशक्तिमान अमेरिकेच्या प्रमुखपदावर विराजमान होऊ शकला असता का? तुम्हीच आहात माध्यमांच्या बोगसपणाचा धडधडीत पुरावा.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांसाठी केलेल्या अमेरिका प्रवेशबंदी निर्णयाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ट्रम्प यांच्याकडून थोडी हिंमत, थोडा देशाभिमान व चिमूटभर प्रामाणिकपणा उधार मिळत असेल तर पाहा', असा उपरोधिक टोला हाणला आहे. 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कणखरपणाची चुणूक दाखवली आहे… पाकड्यांच्या बाबतीत जे मोदी सरकारने करायला हवे होते ते ट्रम्प यांनी एका झटक्यात करून दाखवले…' असे टीकास्त्र त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सोडलं आहे.

ट्रम्प यांच्या या तथाकथित देशाभिमानाने अमेरिकनांच्या पोटात कसा गोळा आला आहे, हे यांच्या गावी नाही आणि अमेरिकेचं श्रेष्ठत्वच मुळात जगभरातून तिथे गेलेल्या बुद्धिमंतांच्या कष्टांतून आकाराला आलं आहे, याचीही कल्पना नाही. आता ट्रम्पकाका भारतीय आयटी व्यावसायिकांचीही अशीच हकालपट्टी करण्याच्या बेताला आहेत, तेव्हा त्या निर्णयाच्याही गौरवासाठी तयार राहा आणि मायदेशी परतणाऱ्या बांधवांच्या भवितव्यासाठी 'आयटी वडापावा'च्या हायटेक गाड्या तयार ठेवा. शेवटी राष्ट्राभिमान महत्त्वाचा.

http://www.aksharnama.com/client/article_detail/476

.............................................................................................................................................

Fri, 03 February 2017

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑस्ट्रेलियाशी केलेल्या निर्वासितांबाबतच्या करारावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यात फोनवरून संभाषण सुरू असताना खटका उडाला आणि ट्रम्प यांनी चक्क फोन अर्ध्यातच ठेवून दिला.

जगाचं नेतृत्व करण्याची कुवत असलेले नेते अमेरिकेने असेही अपवादानेच निवडले आहेत, पण अमेरिकेला काहीही परवडतं म्हणून त्यांनी केस पिकलेलं एक शिशुवर्गातलं बाळ जगातल्या सर्वशक्तिमान पदाच्या खुर्चीत बसवावं, हे जरा जास्तच झालं. आता डायपर बदलत राहावे लागणार सतत.

http://www.aksharnama.com/client/article_detail/483

.............................................................................................................................................

Tue, 07 February 2017

सात मुस्लिम देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा तुघलकी निर्णय रद्द केल्याबद्दल त्यांनी अमेरिकेतील न्यायालयांवर आगपाखड केली आहे. एखादा न्यायाधीश देशाची सुरक्षा अशा प्रकारे धोक्यामध्ये टाकू शकतो यावर विश्वास बसत नाही. काही विपरीत घडलं तर त्यासाठी न्यायव्यवस्थेला दोषी धरलं जावं, बाहेरून लोक देशात येतच आहेत, हे वाईट आहे, असं ट्रम्प म्हणाले.

एखादा माणूस देशालाच काय, सगळ्या जगाला असुरक्षिततेच्या खाईत कसा ढकलू शकतो, हे ट्रम्पमहोदयांच्या कारकीर्दीच्या १३ दिवसांतच सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. त्यांच्याशी क्षुद्र न्यायाधिशाची काय तुलना होणार? ट्रम्पतात्यांचे पूर्वजही मातीत उगवलेले नाहीत, 'बाहेरून'च आलेले आहेत, हे त्यांना कोणी सांगेल का? ते स्वत: बाहेर निघून गेले, तरी अमेरिकेचं आणि जगाचं भलं होईल.

http://www.aksharnama.com/client/article_detail/498

.............................................................................................................................................

Wed, 08 February 2017

रशियाबद्दल अंमळ जास्तच जिव्हाळा आणि आपुलकी दाखवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत टीकेचा भडिमार होत असताना मंगळवारी ट्रम्प यांनी ‘कोण पुतिन मी त्यांना ओळखत नाही’, अशी उपहासात्मक टिप्पणी केली आणि रशियाशी कोणत्याही प्रकारचा समझौता करणार नसल्याचे ट्विट केले.

पुतिन यांच्या मातोश्रींचा बर्थडे जवळ आलाय काय? ट्रम्पतात्या कुठून तरी कुठे तरी जाता-येताना विमान अचानक मॉस्कोला उतरवून बिर्याणी खायला जाणार पुतिनच्या घरी, असा डाउट येऊन राहिलाय.

http://www.aksharnama.com/client/article_detail/502

.............................................................................................................................................

Tue, 21 February 2017

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील सभेत पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांवर सडकून टीका केली असून, आपण खोटय़ा बातम्यांचा अडथळा दूर सारून जनतेशी थेट बोलू इच्छितो, असे म्हटले आहे. प्रसारमाध्यमेच अमेरिकी जनतेची खरी शत्रू आहेत, असे वक्तव्य त्यांनी अलीकडेच केले होते.

लवकरच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर रेडिओच्या माइकसमोर बसलेल्या ट्रम्प यांचा फोटो आणि त्यांनी कशी भारतीय पंतप्रधानांची कार्यपद्धती आणि संवादपद्धतीही अवलंबली आहे, ते कसे मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून चालले आहेत, याच्या कौतुकचालिसांची पारायणं सुरू होणार तर.

http://www.aksharnama.com/client/article_detail/546

.............................................................................................................................................

Fri, 24 February 2017

हैदराबादच्या एका अभियंत्याची बुधवारी रात्री अमेरिकेतील कान्सस शहरातील एका बारमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोराने गोळी झाडण्यापूर्वी ‘गेट आऊट ऑफ माय कंट्री’ (माझ्या देशातून चालता हो!) असे ओरडत होता. या घटनेत आणखी एक भारतीय जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

ट्रम्प तात्यांच्या प्रत्येक मूर्ख विधानाला आणि कृतीला चेकाळून प्रतिसाद देणाऱ्यांना आता तरी भानावर यायला हरकत नाही. तात्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांना टिपण्याचा आनंद लुटताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की, तात्या त्याच बंदुकीने भारतीयांनाही टिपणार आहेच. त्यांच्या तुघलकी फर्मानांनी आधीच तीन लाखांहून अधिक भारतीयांवर हकालपट्टीची टांगती तलवार लटकली आहे. या जाणीवेने किमान तिकडच्या शासनप्रणीत उन्मादाची एतद्देशीय आवृत्ती काढण्यापासून वाचलो तरी पुष्कळ.

http://www.aksharnama.com/client/article_detail/560

.............................................................................................................................................

Thu, 02 March 2017

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रवेशाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर रविवारी नायजेरियाहून अमेरिकेला जाणाऱ्या एका अभियंत्याला जॉन एफ. केनेडी विमानतळावर आपण अभियंता असल्याचं सिद्ध करण्यास सांगितलं गेलं. ओमिनला अमेरिकेच्या दौऱ्यासाठी अत्यंत कमी मुदतीचा व्हिसा देण्यात आला.

प्रत्येक भस्मासुर आपल्याच कर्माने मरतो, हा सृष्टीचा नियमच आहे. अमेरिकेच्या बाबतीत काही वेगळं घडणार नाही. मात्र, जगातल्या एकमात्र महासत्तेच्या या भस्मासुराने आपल्याच डोक्यावर हात ठेवून राख बनून जाण्यासाठी ट्रम्पतात्यांसारखी अत्यंत गद्य आणि अंतर्बाह्य कुरूप मोहिनी शोधावी, हे आश्चर्यकारक आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती अशी!

http://www.aksharnama.com/client/article_detail/582

.............................................................................................................................................

Mon, 06 March 2017

बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्या काळात त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली होती. ओबामांनी माझे फोन टॅप केले होते, असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले असून या आरोपांनी जगभर खळबळ उडवून दिली आहे.

ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या शक्यतेने अमेरिकेलाच नव्हे तर सगळ्या जगाला भविष्यात केवढा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे ओबामा यांनी वेळीच ओळखलं होतं म्हणायचं. अमेरिकेचा शत्रू नंबर वन असलेल्या रशियाशी वेगवेगळ्या पातळ्यांवरचे नाजुक स्नेहसंबंध आणि हितसंबंध असलेल्या ट्रम्प यांच्यावर पाळत ठेवली नसती, तरच ओबामा यांच्या राजकीय आकलनाबद्दल शंका निर्माण झाली असती.

http://www.aksharnama.com/client/article_detail/595

.............................................................................................................................................

Tue, 02 May 2017

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस कराराच्या निमित्ताने भारत, रशिया आणि चीन यांच्यावर खरपूस टीका केली आहे. पेनसिल्वेनियामध्ये आयोजित मेळाव्यात ट्रम्प म्हणाले की, पॅरिस करारासाठी अमेरिका ट्रिलियन डॉलर खर्च करत आहे. मात्र रशिया, चीन आणि भारतासारखे प्रदूषण करणारे देश काहीच देत नाहीत. येत्या दोन आठवड्यात पॅरिस करारावर मोठा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ट्रम्पतात्या, या करारासाठी इतर कोणत्याही देशाने छदामही देण्याची गरज नाही. सगळ्यात जास्त वैचारिक, बौद्धिक आणि असह्य ध्वनिप्रदूषण तर अमेरिकेनेच निर्माण केलेलं आहे तुमच्यासारख्या अर्धवटरावाला अध्यक्षपदावर निवडून देऊन. आता पुढची चार वर्षं जगातला सर्वांत मोठा प्रदूषणकारी देश म्हणून भोगा आपल्या कर्माची फळं.

http://www.aksharnama.com/client/article_detail/775

.............................................................................................................................................

Mon, 26 June 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री उशीरा मोदी अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टनमध्ये मोदींचे स्वागत करण्यात आले. मोदींसाठी विमानतळाबाहेर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनीदेखील गर्दी केली होती. मोदींचे आगमन होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत खरा मित्र असल्याचे सांगून द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चा करू, असे म्हटले आहे.

अरे देवा, भारतीय गोटात सुतकी वातावरण असेल आता. ट्रम्प महोदयांना भारत हा खरा मित्र वाटू लागला असेल, तर आपली काही खैर नाही. हे गृहस्थ सगळ्या जगाला अडचणीत आणणाऱ्या लीलांसाठी कुप्रसिद्ध होत चालले आहेत. त्यात ते मित्रांसाठी अधिक घातक बनत चालले आहेत. भारत खरा मित्र असेलच, तर संबंध सुधारण्याइतके बिघडले कसे, हे त्यांना विचारण्यात हशील नाही. खऱ्या मित्रांमध्येच खूप रुसवे-फुगवे होतात, असं विधान ते तोंडावर फेकतील.

http://www.aksharnama.com/client/article_detail/956

.............................................................................................................................................

Wed, 19 July 2017

ब्रिटनमध्ये आपलं जंगी स्वागत होईल, अशी हमी जोवर दिली जात नाही तोपर्यंत ब्रिटनचा अधिकृत दौरा करणार नाही, असा अजब निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांना एका प्रकारे जंगी स्वागताचा आदेशच दिला आहे.

तात्या, तुमच्या दौऱ्याच्या वेळी अमेरिकेच्या नागरिकांनी ब्रिटनचा प्रवास करून तिथं तुमच्यावर अंडी आणि टमाटे फेकले नाहीत, तरी तेच पुष्कळ, अशी परिस्थिती आहे. जंगी स्वागताचे आग्रह कसले धरता? तुमच्या दिव्य कारकीर्दीनं ब्रिटिशांचे डोळे दिपले असतील, अशी तुमची समजूत आहे का? तुम्ही आपल्या वेडसर चाळ्यांनी अख्ख्या अमेरिकेचे आणि निम्म्या जगाचे डोळे पांढरे केले आहेत!

http://www.aksharnama.com/client/article_detail/1036

.............................................................................................................................................

Wed, 26 July 2017

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर टीका करून हल्ला चढवला आहे. 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या एका बातमीमुळे 'आयएस' या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी बगदादी याला मारण्याचा अमेरिकेचा प्रयत्न निष्फळ झाला, असे ट्रम्प यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे. 'राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांचा हा अत्यंत घाणेरडा अजेंडा आहे', असेही त्यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे. वर्तमानपत्राच्या कोणत्या बातमीमुळे बगदादीला पकडण्याची योजना निष्फळ ठरली, याबाबत मात्र ट्रम्प यांनी स्पष्ट केलेले नाही.

बिकाऊ मीडियाच्या बातमीमुळे केवढा उत्पात झाला, याचे ढोल पिटायचे आणि बातमी कोणती ते सांगायचंच नाही, या तंत्राने तर कसलाही पुरावा न देता एखाद्याला फासावरही चढवता येईल. परदेशांतून बीटल्सपासून स्टीव्ह जॉब्जपर्यंत अनेकजण कशाकशाच्या शोधात भारतात येऊन गेले होते. ट्रम्पतात्याही गुप्त ट्रेनिंगसाठी येऊन गेले असणार इतक्यातच, असा फुल डौट खायला वाव आहे.

http://www.aksharnama.com/client/article_detail/1062

.............................................................................................................................................

Wed, 23 August 2017

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले. फोर्ट मायर इथं अमेरिकन सैनिकांशी संवाद साधताना त्यांनी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांविषयीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर ताशेरे ओढले. दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान अशाच प्रकारे सुरक्षित आसरा ठरत राहिल्यास अमेरिकेला शांत बसता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानने आता दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी केली पाहिजे, असंही ते म्हणाले.

कित्ती कडक बोलतात नाही ट्रम्पतात्या! एखाद्या प्रेमळ आईने आपल्या नाठाळ कारट्याचा गालगुच्चा घेऊन आता परत त्या काकांची खोडी काढलीस, त्यांच्या घराला पुन्हा आग लावलीस तर अर्धा लाडूच देईन तुला, असं म्हटल्यासारखं वाटतं. शिवाय पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं खरोखरच बंद करायचं असेल, तर सगळ्यात आधी अमेरिका या जगातल्या सर्वांत मोठ्या युद्धसाहित्य पुरवठादार दहशतवाद-प्रसारक राष्ट्राला आपल्या भूमीवरून हुसकावायला हवं... काय म्हण्टा तात्या?

....................................

अमेरिकेत सोमवारी खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळालं. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये, ही तज्ज्ञांनी केलेली आणि शाळकरी मुलांनाही माहिती असलेली सूचना धुडकावून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बेदरकार वृत्तीला जागून उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहिलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अशा प्रकारे ग्रहण पाहिल्यानंतर अंधत्व येण्याचा धोका असतो.

ट्रम्पतात्या हे आत्मप्रेमामध्ये, स्थलांतरितांच्या द्वेषानं आणि गौरवर्णीयांच्या फुकाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनांनी आधीच इतके ठार आंधळे झाले आहेत की, त्यांना सूर्यग्रहणानं आणखी काय अंधत्व येणार? त्यांचा सूर्यग्रहण पाहतानाचा फोटो मात्र पाठवून द्या. सूर्यग्रहणाच्या वेळी ट्रम्प यांना सूर्याने त्रिखंडाच्या महानेत्याचा चेहरा दाखवला आणि ट्रम्प गॉगल घालायला विसरले, असं पोस्टर आम्ही करून घेऊ फोटोशॉपमध्ये.

http://www.aksharnama.com/client/article_detail/1173

.............................................................................................................................................

Tue, 05 September 2017

लष्करात तृतीयपंथींना भरती करण्याचा ओबामा यांचा आदेश विद्यमान अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिरवला असून, समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती करण्यास बंदी घातली आहे. ही सैनिकांबाबत क्रूरता असून त्यामुळे त्यांचं खच्चीकरणही होणार आहे, अशा शब्दांत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षानं या निर्णयावर टीका केली आहे. ओबामांनी समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेश देण्याचं धोरण जाहीर करून लिंगबदल शस्त्रक्रियांनाही परवानगी दिली होती.

ट्रम्प यांच्या मेंदूवर विचारबदलांची शस्त्रक्रिया होत नाही, तोवर असल्या प्रतिगामी निर्णयांची सवयच ठेवायला हवी. शिवाय, ट्रम्प यांनी ही असलीच मागासलेली उद्दिष्टं जाहीर करून निवडणूक जिंकली आहे. अमेरिकनांनी या उद्दिष्टांनाच कौल दिला आहे. त्यामुळे त्याबाबतीत आता तक्रार करून उपयोग नाही. त्यांनी असे निर्णय केले नाहीत, तर तोच त्यांच्या मतदारांशी द्रोह ठरेल. तेव्हा, अब भुगतो!

http://www.aksharnama.com/client/article_detail/1221

.............................................................................................................................................

Wed, 20 September 2017

अण्वस्त्र व क्षेपणास्त्र चाचण्यांनी अमेरिका, जपान या देशांना धमकी देणाऱ्या उत्तर कोरियाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला. अमेरिकेला धोका निर्माण झाला किंवा अमेरिकेत भीतीचं वातावरण निर्माण झाल्यास उत्तर कोरियाला नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रातील पहिल्याच भाषणात ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेकडे संयम आणि ताकद दोन्ही आहे. पण अमेरिकेवर किंवा आमच्या मित्रराष्ट्रांवर संकट आल्यास आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील. ‘रॉकेट मॅन’ (किम जाँग उन) सध्या आत्मघातकी मोहिमेवर आहे. तो स्वतःला आणि स्वतःच्या साम्राज्याला अडचणीत आणत आहे. मात्र अमेरिकेला धोका निर्माण झाला तर उत्तर कोरियाला नष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. संयुक्त राष्ट्र तसंच अन्य देशांनी उत्तर कोरियावर दबाव आणावा अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला.

‘रॉकेट मॅन’ आणि ‘लूज सॉकेट मॅन’ म्हणजे आपले ट्रम्प तात्या यांच्यात डावं-उजवं करणं कठीण आहे. ट्रम्प यांच्या वेडाचारावर अमेरिकेत लोकशाहीची नियंत्रणं आहेत आणि अमेरिकेचा अध्यक्ष उत्तर कोरियाच्या हुकूमशहाइतका बेबंद आणि अनियंत्रित असू शकत नाही (त्याची कितीही इच्छा असली तरी), हाच त्यातल्या त्यात दिलासा आहे. अमेरिकेच्याच नव्हे, तर कोणत्याही अपयशी राज्यकर्त्याला जेव्हा करण्यासारखं इतर काही उरत नाही, तेव्हा तो युद्ध घडवून आणतो आणि सैन्याच्या जिवावर आपल्या बेटकुळ्या फुगवून दाखवतो. ट्रम्प तात्यांची वाटचाल धाकट्या बुश महोदयांच्याच पावलावर पाऊल टाकून चाललेली दिसते. त्यांना सद्दामनं संधी दिली, यांना किम पावतोय.

http://www.aksharnama.com/client/article_detail/1272

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......