टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरुण जेटली, विरेंद्र सेहवाग आणि राहुल गांधी
  • Wed , 20 September 2017
  • विनोदनामा टपल्या डोनाल्ड ट्रम्प Donald Trump किम जाँग उन Kim Jong-un अरुण जेटली Arun Jaitley विरेंद्र सेहवाग Virender Sehwag राहुल गांधी Rahul Gandhi धर्मेंद्र प्रधान Dharmendra Pradhan

१. अण्वस्त्र व क्षेपणास्त्र चाचण्यांनी अमेरिका, जपान या देशांना धमकी देणाऱ्या उत्तर कोरियाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला. अमेरिकेला धोका निर्माण झाला किंवा अमेरिकेत भीतीचं वातावरण निर्माण झाल्यास उत्तर कोरियाला नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रातील पहिल्याच भाषणात ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेकडे संयम आणि ताकद दोन्ही आहे. पण अमेरिकेवर किंवा आमच्या मित्रराष्ट्रांवर संकट आल्यास आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील. ‘रॉकेट मॅन’ (किम जाँग उन) सध्या आत्मघातकी मोहिमेवर आहे. तो स्वतःला आणि स्वतःच्या साम्राज्याला अडचणीत आणत आहे. मात्र अमेरिकेला धोका निर्माण झाला तर उत्तर कोरियाला नष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. संयुक्त राष्ट्र तसंच अन्य देशांनी उत्तर कोरियावर दबाव आणावा अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला.

‘रॉकेट मॅन’ आणि ‘लूज सॉकेट मॅन’ म्हणजे आपले ट्रम्प तात्या यांच्यात डावं-उजवं करणं कठीण आहे. ट्रम्प यांच्या वेडाचारावर अमेरिकेत लोकशाहीची नियंत्रणं आहेत आणि अमेरिकेचा अध्यक्ष उत्तर कोरियाच्या हुकूमशहाइतका बेबंद आणि अनियंत्रित असू शकत नाही (त्याची कितीही इच्छा असली तरी), हाच त्यातल्या त्यात दिलासा आहे. अमेरिकेच्याच नव्हे, तर कोणत्याही अपयशी राज्यकर्त्याला जेव्हा करण्यासारखं इतर काही उरत नाही, तेव्हा तो युद्ध घडवून आणतो आणि सैन्याच्या जिवावर आपल्या बेटकुळ्या फुगवून दाखवतो. ट्रम्प तात्यांची वाटचाल धाकट्या बुश महोदयांच्याच पावलावर पाऊल टाकून चाललेली दिसते. त्यांना सद्दामनं संधी दिली, यांना किम पावतोय.

.............................................................................................................................................

२. अमेरिकेतील भाषणात भारतातील घराणेशाहीच्या परंपरेचा उल्लेख करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी टीका केली आहे. ‘जेव्हा त्यांनी अमेरिकेत बसून घराणेशाही भारताचा स्वभाव असल्याचं म्हटलं, तेव्हा मला लाज वाटली’, असं जेटली म्हणाले. राहुल यांनी कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी काँग्रेसमधील घराणेशाहीविषयी विचारणा करण्यात आली असता त्यांनी भारतात राजकीय, चित्रपट आणि उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही असल्याचं म्हटलं होतं. भारतामध्ये कारभार अशाच पद्धतीनं चालतो, असं ते म्हणाले होते.

अरुण जेटली यांना कशाची ना कशाची लाज वाटते, हीच मोठी दिलासादायक गोष्ट आहे. ज्या भारतीय जनता पक्षाचे ते नेते आहेत, तो घराणेशाहीमुक्त आहे का? की फक्त काँग्रेसच घराणेशाहीनं ग्रासलेली आहे? राहुल यांचं प्रश्नोत्तरांमधलं उत्तर घराणेशाहीचं समर्थन करणारं नव्हतं, तर देशाच्या वृत्तीवर बोट ठेवणारं होतं. ती सर्व क्षेत्रांत आहेच. जेटलींचे पंतप्रधान जेव्हा परदेशांत जाऊन तिथल्या भाषणांमध्ये ‘आपलं सरकार येण्यापूर्वी लोकांना या देशात जन्म घेतल्याची लाज वाटत होती,’ अशी निरर्गल आणि धादांत थापेबाज विधानं करून देशाची नालस्ती करत होते, तेव्हा जेटली यांना अशाच प्रकारे लाज वाटली होती का?

.............................................................................................................................................

३. भारतात असहिष्णुता व बेरोजगारी या दोन मोठ्या समस्या आहेत आणि त्यांनी देशाची सुरक्षा व प्रगती यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेत केला. सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसनं आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते म्हणाले की, पुरेशा रोजगारांची निर्मिती करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्यानं देश बिकट स्थितीतून जात आहे.

देशापासून सुदूर भूमीवर पंतप्रधानांपासून राहुल यांच्यापर्यंत अनेक नेत्यांना बहुधा दूरदृष्टी प्राप्त होते आणि त्यांना देशातल्या समस्यांचं यथातथ्य ज्ञानही होतं. मात्र, राहुल यांना काँग्रेसच्या नाकर्तेपणाची जाणीव त्यातून झाली का? या देशानं परस्पर सामंजस्यात मीठ कालवू पाहणाऱ्या आणि असहिष्णुता, द्वेष हाच आधार असलेल्या संघटनांना साठ वर्षं सत्तेपासून दूर ठेवलं होतं. या काळात सहिष्णुतेची घडी पक्की करण्यात काँग्रेस प्रामुख्यानं अपयशी ठरली, तिनं त्यातून मतपेढ्यांचं राजकारणच केलं, म्हणून आज देशात असहिष्णुता खुलेआम आणि गर्वाने वगैरे वाढवली जाते आहे. ते पाप आपलंच आहे, हे कळलं तर या ज्ञानप्राप्तीचा फायदा.

.............................................................................................................................................

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: देशातील व्हीआयपी संस्कृती संपवण्याचा विडा उचललेला असताना मोदी सरकार व्हीआयपी लोकांना विशेष सुरक्षा देण्याबाबत यूपीए सरकारपेक्षाही पुढे गेलं आहे. यापूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारनं ३५० लोकांना विशेष सुरक्षा (झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणी) दिली होती. या संख्येत आता वाढ होऊन हा आकडा ४७५ च्या पुढे गेला आहे. भाजप सरकारनं अनेक तथाकथित साधुसंतांनाही विशेष सुरक्षा पुरवली आहे. यांत योगगुरू रामदेव बाबा, माता अमृतानंदमयी, रामजन्म भूमी श्राइन बोर्डचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, वादग्रस्त खासदार साक्षी महाराजांचा समावेश आहे. त्याचबरोबर गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे पहिल्यांदाच आमदार बनलेले चिरंजीव पंकज सिंह, यांनाही विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. सुमारे १५ राजकारण्यांच्या मुलांसाठी सरकारनं एनएसजी सुरक्षा तैनात केली आहे.

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान...’ अशा रीतीनं समाजात बदल घडून येत नसतात. नेता ज्या गोष्टींची प्रवचनं देतो, त्यांचं प्रतिबिंब खुद्द त्याच्या आचरणात पडलं नाही, तर जनताही अशी जुमलेबाजी मनावर घेत नाही. आपली जनता तर अशीही व्हीआयपी संस्कृतीला सोकावलेली आहे. ज्याला त्याला इतरांपेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ ठरून विशेषाधिकार मिळवण्याची इच्छा असते. जन्मजात जातीश्रेष्ठत्वाच्या भाकड कल्पनांना इंग्रजांच्या शासनातील साहेबी जी हुजूरगिरीची जोड मिळून तयार झालेलं हे घातक कॉकटेल आहे. राजकीय सत्ताधारी वर्गाला त्याचीच नशा खूप असते. मोदींना या संस्कृतीत बदल घडवायची खरोखरच इच्छा असेल, तर गाड्यांवरचे लाल-पिवळे दिवे काढून ते होणार नाही; खुद्द त्यांचं विमान जमिनीवर उतरावं लागेल सर्वांत आधी.

.............................................................................................................................................

५. मला टीम इंडियाचा कोच व्हायची इच्छा होती, मात्र बीसीसीआयमध्ये कोणतीही ‘सेटिंग’ नव्हती म्हणून या पदावर मी बसू शकलो नाही असा खळबळजनक आरोप टीम इंडियाचा माजी ओपनर आणि धडाडीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यातल्या वादानंतर कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाला रामराम ठोकला. त्यानंतर बीसीसीआयनं टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. सेहवागसह इतर अनेकांनी अर्ज केले होते. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण या तिघांच्या सल्लागार समितीनं इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यानंतर अखेर रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. याबद्दल सेहवाग म्हणाला, “देखिये, मैं कोच इसलिये नहीं बन पाया क्योंकी जो लोग कोच चुन रहें थे उनसे मेरी कोई सेटिंग नहीं था.”

देशात लाखो मुलं क्रिकेट खेळतात. त्यांच्यातल्या हजारो मुलांमध्ये गुणवत्ता असते. शेकडो मुलांमध्ये लक्षणीय गुणवत्ता असते. त्यांच्यातून भारतीय क्रिकेट संघामध्ये जाण्याचं भाग्य मोजक्या दहा-पंधरा खेळाडूंना लाभतं. ते लाभलं तेव्हा कोणतं सेटिंग केलं होतं सेहवागनं? सचिन, सौरव आणि राहुल हे काही दूध के धुले नाहीत. रवी शास्त्रीच प्रशिक्षक हवा, या विराटच्या हट्टापुढेच बीसीसीआयने मान तुकवली, हे स्पष्टच आहे. पण, प्रशिक्षकाच्या निवडीमागे या तीन मोठ्या खेळाडूंचे आणि बीसीसीआयचे काही निकष असतील. त्यात आपण बसलो नसू, ही शंकाही सेहवागच्या मनाला चाटून कशी गेली नाही. याच बीसीसीआयनं आपल्याला अनेकदा पुनरागमनाची संधी दिली, तेव्हा एखाद्या उभरत्या खेळाडूला आपलं सेटिंग असल्याची शंका आली असेल, असं नाही वाटलं सेहवागला?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Azhar shaikh

Wed , 20 September 2017

राहुल गांधींना घराणेशाही वर बोलताना बघून मला लाज वाटली अस अरुण जेटली म्हणतात मग लोकसभेला पराभव होऊन सुद्धा तुम्ही अर्थमंत्री झालात तुम्हाला नाही का लाज वाटली जेटली साहेब


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......