ऐश्वर्य‘वारी’कडून ‘वैराग्य’वारीकडे...
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन वैद्य
  • ‘परतवारी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 21 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो परतवारी सुधीर महाबळ नीतीन वैद्य मनोविकास प्रकाशन

जाता येता पाच-सहाशे किमीची चाल करून ज्ञानेश्वर-तुकारामांच्या पालख्या दशमीस मुक्कामी विसावल्या असतील.

इतके दिवस वारीबद्दलचे कुतूहल दरवर्षी ठराविक काळात वर्तमानपत्रात रोज ठराविक जागी येणाऱ्या बातम्यांपुरतेच मर्यादित होते. आळंदी-देहूपासून होणाऱ्या प्रस्थानापासून ठिकठिकाणी स्थानिक पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांनी केलेले स्वागत, न चुकता येणारा दिवे घाटातल्या गर्दीचा वरून घेतलेला फोटो, माळशिरसपासून वाखरीपर्यंत ठिकठिकाणी होणारे उभे-आडवे रिंगण सोहळे, त्यातले ते डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन धावणाऱ्या बायकांचे फोटो, पंढरीच्या सीमेवर होणारे संतांच्या भेटीचे सोहळे, एकादशी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी प्रक्षाळपूजेनंतर 'जातो माघारी पंढरीनाथा' या शीर्षकाने येणारी वारकऱ्यांच्या परतीची बातमी... हे सारे इतक्या सवयीचे झाले होते की, या काळात आपणही वारीतच आहोत असे वाटे.  

केव्हातरी दि. बा. मोकाशींचे ‘पालखी' हे पुस्तक वाचनात आले. त्याआधी वारीच्या अनुभवावरची वर्तमानपत्रात या काळात आलेली सदरे, पुस्तके पहिली- वाचली होती. त्यापेक्षा हे काही वेगळेच पुस्तक होते. मुळात मोकाशी वारकरी म्हणून वारीत सहभागी झाले असले तरी वारीच्या पार्श्वभूमीवरील नियोजित कादंबरीसाठी काही अनुभवात्मक पूर्वतयारी करावी, हा लांबलेला हेतू होता. गोखले इन्स्टिट्यूटकडून वारीच्या पाहणीसाठी प्रश्नावलीही करून घेतलेली. त्यामुळे मोकाशी वारीत आहेत आणि नाहीतही. मनात  श्रद्धा आहे तसेच प्रश्नही. त्यामुळे त्यांना भेटणारे वारकरी संसारातले ताप, कौटुंबिक भांडणे, आर्थिक त्रस्तता, शेतीतल्या अडचणी याला कंटाळून वारीत सुटका शोधतात (अर्थात सगळेच असे नाहीत, पण हाही हेतू आहे ). 

मला कुतूहल होते, गुंतवणूक नव्हती, पुढे माझ्यासाठी वारीतील रोमँटिसिझम संपून गेला... तरी एक उत्सुकता होतीच, एवढे लाखांच्या संख्येने जाताना बरोबर असणारे चैतन्य परत जाताना कुठे जाते? पालख्या परत कशा जातात? लहानपणी गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीतही मोठी मूर्ती कायमसाठी असणारे गणपती रात्री उशीरा परत कसे जात असतील, असे वाटे, तसेच हेही. अशात यावेळी वारी चालू असतानाच 'परतवारी' हे सुधीर महाबळ यांचे पुस्तक वाचनात आले, दोन महिन्यात तीन आवृत्त्या निघालेले. वारीबरोबर केलेला परतीचा प्रवास. जाताना लाखोंच्या बरोबरीने केलेला उत्सुक, अधीर, राजस प्रवास आता जेमतेम काहीशे जणांचा विरक्त, कष्टमय प्रवास आहे. महाबळ त्याला ‘वैराग्यवारी’ म्हणतात. 

गेली बारा वर्षे अपवाद वगळता महाबळ नेमाने परतवारी करताहेत, म्हणजे गुरुपौर्णिमेला गाडीने पंढरपूर गाठायचे, तिथून वारीच्या परतीच्या प्रवासात सामील व्हायचे. येताना वीस-एकवीस दिवसात सगळी कोडकौतुके घेत पंढरीत आलेले. परत तेवढेच अंतर दहा दिवसात कापत आषाढ कृ दशमीस आळंदी. रोज सरासरी ३५ किमीची चाल. मांडव परतणीची उदासीही असावी. पालखी संस्थानचे कर्मचारी वगळता कुणाचीही राहण्या-खाण्याची कसलीही सोय नाही. ती मिळेल तिथे, तशी आपली आपण करायची. पालखीची चाल वेगात, त्याबरोबर एखाद किलोमीटर पुढे चालणे होत नाही, मग अपरात्री एक वाजता उठणे, जमेल तसे आवरून दीड वाजता प्रस्थान ठेवणे, फटफटेतो पालखीचा नियोजित विसावा गाठणे, तिथे पालखीची वाट पाहात थोडी विश्रांती, वाटेत नळ असलेले शेतातले घर दिसले की अंघोळ उरकणे. या दरम्यान सृष्टीचे रोजचे नवल नव्याने उलगडताना त्याच्या साक्षीने रोजचे भारावणे अनुभवत होणारा स्वसंवाद, ही खरी मिळकत…

महाबळ इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्समधले इंजिनीयर. काही वर्षे परदेशी वास्तव्य केलेले, विमानतळ दुसरे घरच वाटावे इतका पंचतारांकित विमानप्रवास सवयीचा झालेला. व्यापताप ही तेवढेच. इथे मात्र सगळ्या चिंता, क्लेश यांच्या पार मन श्रांत होत जाण्याचा निरामय अनुभव. एरवी मनाच्या तळाशी गेलेले मूलभूत प्रश्न विराटाच्या साथीने सलगी करतात...काही सापडल्याचा निरागस आनंद होतो. ज्याने त्याने वाचावा स्वतःशीच ताडून पहावा असा हा अनुभव.

एरवी दिवसभर पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद करत, कसल्याच अपेक्षेविना (अगदी दर्शनाचीही) माऊलींसोबत चालण्यामागच्या श्रद्धेचा शोध घेत मुक्काम गाठणे. मोकाशींप्रमाणे महाबळांनाही बेरकी, अगदी वारीतही कटकटी, व्यापतापांची सोबत सुटत नाही असेही वारकरी भेटतात. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे हा या पुस्तकातला हृद्य भाग आहे. 'परमेश्वरानंच दिलेला प्रपंच सोडून कसे आलात?' या प्रश्नावर एकजण उत्तरतो, 'अहो, प्रपंच परमेश्वरानं दिला खरा, पण तो संपला केव्हा हे मीच ठरवणार नं? मुलं-बाळं शिकली-सवरली की मुक्त व्हायचं का त्यांची लग्नं, पुढे नातवंडं त्यांची कार्य होईतो गुंतूनच राहायचं हे मीच ठरवणार नं?' खाड्कन डोळे उघडावेत असा हा संवाद.

कायम पायी वारी करणारेही असतात ही आपल्या कल्पनेपलिकडची गोष्ट. इथे त्यांचीही भेट होते. दोन एकादशांच्या दरम्यान आळंदी-पंढरपूर अशी वर्षभर पायी, प्रपंच परमेश्वरावर सोपवून बहुतांश एकट्याने वारी करणारे बरेच आहेत. त्यांची काही सोय पालखी संस्थान करते. आळंदी संस्थांनाकडे असे दीडशेवर वारकरी नोंदले आहेत, ही सगळीच माहिती नवलाची, कुतूहल जागावणारी आहे.

या पुस्तकात एक खटकणारीही गोष्ट आहे. महाबळ स्वतः रूढार्थाने आस्तिक (कर्मकांड करत नाही या अर्थी) नाही असे आवर्जून  म्हणतात. अरुण साधूंनी प्रस्तावनेतही या गोष्टीचा दोन-तीन वेळेस उच्चार केला आहे. (त्यासाठी 'ते विश्वात्मक देव मानतात' अशी मखलाशी त्यांनी केली आहे. ) याची काय गरज, असे पुस्तक वाचल्यावर वाटून गेले. महाबळ वारीची सर्व पथ्ये पाळतात, वारकऱ्यांना आवर्जून ‘माउली’ असेच संबोधतात. त्यांच्या भाबड्या तरी समजूतदार श्रद्धेचा, त्यामागच्या मानसिकतेचा शोध घ्यायचा, ती समजून घ्यायचा प्रयत्न करतात. चुकूनही प्रश्नचिन्ह लावत नाहीत, एकुलत्या लाडक्या मुलीच्या पहिल्या श्राद्धाच्या दिवशी वाटेवर घर असल्याने वारकरी येतात, त्यांच्यासाठी भाकऱ्या थापणाऱ्या, वारकऱ्यांची जेवणाची वेळ महत्त्वाची का श्राद्धाची? असा प्रश्न करणाऱ्या आजींपुढे नतमस्तक होतात. वारीसारख्या ठिकाणी मनाच्या उन्मनी अवस्थेत चमत्कार म्हणावे असे अनुभव येतात. (नर्मदा परिक्रमेत बहुतेकांना अश्वथामा दर्शन देतो, तसे) तेही नोंदवतात. या सगळ्यात गैर काहीच नाही, पण या सगळ्यामागची डोळस तरी भाबडी अस्तिकता नाकारायची कशासाठी, असे वाटून गेले. शिवाय दरवर्षी ठराविक काळात ठराविक मार्गाने चालणे, हेही कालांतराने एकाअर्थी कर्मकांडातच जमा होते की! असो.

या पुस्तकाने एक कुतूहल शमले तरी नव्या कुतूहलाला जन्मही दिला. कधीतरी स्वतःच वारी अनुभवल्याशिवाय ते शमेल असे वाटत नाही, पण त्यासाठी महाबळांच्या ठायी असलेली अपार डोळस श्रद्धा कुठून आणावी?

परतवारी - सुधीर महाबळ

मनोविकास प्रकाशन, पुणे
पाने – १७६, मूल्य – १९९ रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3696

.............................................................................................................................................

लेखक पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Jayant Raleraskar

Fri , 21 July 2017

परतवारी' बद्दलचा लेख छानच आहे. भाबडेपणा आणि अनुषंगिक क्रिया-प्रतिक्रिया यांना स्पष्टिकरण देण्याची घाई करणारे एका निखळ आनंदाला मुकतात हे उघडच आहे.वारीतील अधिक उणे पुस्तकात असेल असे वाटते. उत्सुकता वाटली हे नक्की...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......