मी नरहर कुरुंदकरांकडे कसं पाहतो! (पूर्वार्ध)
संकीर्ण - श्रद्धांजली
पंकज घाटे
  • नरहर कुरुंदकर आणि त्यांची काही पुस्तकं
  • Tue , 11 July 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली नरहर कुरुंदकर Narhar Kurundkar लोकशाही Democracy हुकूमशाही Authoritarian फॅसिझम Fascism

ज्यांना पुरेशा गांभीर्याने ‘विचारवंत’ हे विशेषण लावता येईल असे महाराष्ट्रातील लेखक म्हणजे नरहर कुरुंदकर. १५ जुलै हा कुुरुंदकरांचा जन्मदिन. त्यांच्या निधनाला १० फेब्रुवारी रोजी ३५ वर्षं झाली. त्यानिमित्तानं कुरुंदकरांकडे कसं पाहावं, आजच्या परिस्थितीत कुरुंदकर कसे आणि किती समकालीन ठरतात, याचा उहापोह करणारा हा दोन भागांतला लेख. काल पहिला भाग प्रकाशित झाला होता. आज हा दुसरा भाग.

.............................................................................................................................................

“उपेक्षा, आक्रस्ताळीपणा, उपहास याने मी मरणार नाही. माझे मरण मला निरुत्तर करणाऱ्या खंडनात आहे. जे मला पुरावा व तर्क यांनी खोडून काढता येत नाही, ते मी हट्ट न करता निमूटपणे स्वीकारतो. म्हणून कुणी मला निरुत्तर करणारे खंडन केले की, मी माझी मते सोडून त्याची मते स्वीकारीन. ते माझे खरे मरण आहे. त्या मरणाची मला भीतीही आहे व त्या मरणाचे आकर्षणही आहे. तेव्हा मी नामशेषही होईन व कृतार्थही होईन.” - नरहर कुरुंदकर (रा. ज. देशमुख यांचा लिहिलेल्या पत्रातून. जया दडकर, संपा., देशमुख आणि कंपनी, दुसरी आवृत्ती, निवडक पत्रे, पृ. १२०)

“आंधळेपणाने इतर कुणाला शरण जावे, याची शेजवलकरांना (इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर) फार चीड होती. एखाद्याच्या सर्वस्वी आहारी जाण्याजोगी आपली मनोरचना नाही, असे ते म्हणत असत... मलाही शेजवलकरांविषयी अलोट प्रेम व अभिमान आहे. मराठ्यांच्या इतिहासात स्वतःला जन्मभर गाडून घेणाऱ्या या निःस्पृह, निःस्वार्थ, स्पष्टवक्त्या, प्रज्ञावंत मीमांसकाला मी मराठा इतिहासाचा एक श्रेष्ठ आचार्य मानतो... भाबड्या स्तुतिपाठकांनी त्यांची बावळट पूजा बांधण्यापेक्षा निदान फटकळ मतभेद दाखवून त्यांचे ग्रंथ नवीन पिढी बारकाईने वाचीत आहे, हे नजरेस आणणे मला इष्ट वाटते. शेजवलकरांचा विवेचक प्रखर बुद्धिमान आत्मा या खणाखणीने अधिक तृप्त होईल, अशी माझी श्रद्धा आहे. शेजवलकर मराठा इतिहासातील अस्सल नाणे होते. आंधळेपणाने कोणालाही शरण जाऊ नका, हा ताठर उपदेश ज्या वंदनीयांकडून आम्ही शिकलो, त्यांपैकी तेही एक होते.” - नरहर कुरुंदकर (इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांच्यावरील मृत्युलेखातून. नरहर कुरुंदकर, मागोवा, देशमुख आणि कंपनी. पृ. २०१-२०२)

नरहर कुरुंदकरांची ही काही वाक्यं बहुदा माझी आयुष्यभर सोबत करतील. मी कुरुंदकरांकडे कसं पाहतो याचं सार यात आहे. आधीच्या पिढीतील प्रज्ञावंताच्या स्मृतीला नंतरच्या पिढीतील एका हौशी वाचकानं दिलेली ही आदरांजली माझ्यासमोर ठेवूनच मी कुरुंदकरांकडे पाहणार आहे. या वर्षी कुरुंदकर गेल्याला ३५ वर्षं होतील. या मधल्या काळात आजूबाजूला अनेक स्थित्यंतरं झाली. मी कुरुंदकरांना पाहिलं नाही, ऐकलं नाही, मला कुरुंदकर भेटतात ते त्यांच्या लिखाणातून! मी आजचा पंचविशी-तिशीचा एक तरुण वाचक या नात्यानं त्यांच्याकडे पाहणार आहे. इथं ‘मी’ याचा अर्थ, ‘कुरुंदकर गेल्यानंतर तीस वर्षांनी (म्हणजे साधारण एका पिढीच्या अंतरानं) आजच्या समाजाकडे डोळसपणे पाहणारा तरुण’ असा घेतला आहे. कुरुंदकरांच्या लिखाणाचे विषय असंख्य व प्रचंड आहेत. सोयीसाठी मी फक्त त्यांच्या राजकीय, सामाजिक व इतिहासविषयक लिखाणाचा विचार करणार आहे. त्यांच्याकडे पाहताना शक्यतो त्यांनी वापरलेल्या शब्दांची मी मदत घेणार आहे.

ज्या कोणाला राजकारण, भारतीय राजकारणातील गुंतागुंतीचा हिंदू-मुस्लिम प्रश्न, समाजकारण, मराठी साहित्य, भारतीय परंपरा आणि संस्कृती इत्यादी विषयांचा विचार करायचा असेल आणि मराठी भाषा ही वाचनाची मर्यादा असेल तर तुम्हाला कुरुंदकरांसारखा लेखक टाळून पुढे जाणं शक्य नाही. अनेक विषयांचा चिकित्सक अभ्यास त्यांनी कर्तव्य मानून केला आणि ही त्यांची लिखाणाची प्रेरणा होती. कुरुंदकर ज्या काळात वावरले तो त्यांचा काळ समजून घ्यायचा असेल तर विनय हर्डीकर यांची जया दडकर यांनी संपादन केलेल्या ‘निवडक पत्रे’ या पुस्तकातील प्रस्तावना वाचायला हवी. चौतीस पानांच्या त्या प्रस्तावनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक विश्वात कुरुंदकरांचे स्थान नेमकेपणानं समजू शकेल.

मी, नववी-दहावीत असताना ‘महाभारत एक सूडाचा प्रवास’ आणि ‘श्रीमान योगी’ वाचताना कुरुंदकर मला पहिल्यांदा भेटले. त्यावेळी ती पुस्तकं डोक्यावरून गेली, पण ‘श्रीमान योगी’च्या प्रस्तावनेतलं एक वाक्य अजून मनात घर करून आहे. ते म्हणजे, ‘आपण औरंगजेब समजून घेत नाही म्हणून आपल्याला शिवाजी समजत नाहीत.’ पुढे कॉलेजसाठी रत्नागिरीत आल्यावर इथल्या नगर वाचनालयात पुस्तकांची अलिबाबाची गुहा मिळाली. इथं ‘जागर’च्या निमित्तानं पुन्हा कुरुंदकर भेटले. इतिहास विषय आवडीचा होताच; पण प्रचारकी थाटाच्या, एकांगी विवेचनाच्या मागे लागून इतिहासाचं आकलन करून घेण्याच्या माझ्या प्रयत्नादरम्यान गोविंद तळवलकर आणि नरहर कुरुंदकर वाचनात आले आणि माझी त्यापासून सुटका झाली. एक-एक लेखक घेऊन त्यांनी लिहिलेली सर्व महत्त्वाची पुस्तकं एकापाठोपाठ वाचणं ही सवय मी त्या काळात लावून घेतली होती. तळवलकर आणि कुरुंदकर यांच्या जवळजवळ सगळ्या महत्त्वाच्या पुस्तकांचा फडशा पाडून झाला.

नरहर कुरुंदकरांच्या राजकीय विचारांची ओळख त्यांच्या ‘जागर’, ‘शिवरात्र’, ‘भजन’, ‘वाटा : माझ्या-तुझ्या’, ‘पंडित नेहरू – एक मागोवा’ हे डॉ. राजूरकर यांच्यासमवेत लिहिलेलं पुस्तक यामधून होते. यापैकी ‘जागर’ आणि ‘शिवरात्र’ ही त्यांची महत्त्वाची पुस्तकं राजकीय लेखांचा संग्रह या स्वरूपाची आहेत. १९५० नंतर त्यांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला आणि पुढे तो वाढत गेला. या लेखांची निर्मिती राष्ट्र सेवा दल शाखांवर घेतल्या गेलेल्या बौद्धिकांतून झालेली आहे. जातिधर्मातीत लोकशाही आणि समाजवाद यांची बैठक या सर्व लिखाणाला आहे. या दोनही पुस्तकांमध्ये कुरुंदकरांच्या मुख्य विचारांची बैठक आणि आकर्षक लेखन शैलीची वैशिष्ट्यं दिसतात. साधारण स्वातंत्र्यावेळी वयात आलेल्या जवळपास सर्वच लोकांचं स्वप्न नव्या भारतीय राष्ट्राची उभारणी हे होतं. समाजवादी विचारसरणीशी डोळस श्रद्धा – त्याच्या मर्यादांची त्यांना जाणीव होती – ठेवून कुरुंदकर नव्या लोकशाहीप्रणित भारताच्या उभारणीची स्वप्नं रंगवत होते. 

त्यांच्या पिढीत असणारं आणखी वैशिष्ट्य म्हणजे पंडित नेहरूंविषयी ममत्व. पंडित नेहरूंचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. समाजवादी संस्कारातून जी पिढीच्या पिढी भारतात तयार झाली तिच्यात नेहरूंबद्दल ममत्व, आपुलकी व त्यांना नायक (Hero) मानण्याची आंधळी प्रवृत्ती असणं (कुरुंदकरांकडे ही नव्हती!) अगदी स्वाभाविक होते. नेहरू गेल्यानंतर लगेच सौ. सुलोचनाबाई देशमुखांना १९६४ मध्ये लिहिलेल्या पत्रात ते लिहितात, “पंडित नेहरूंच्या आकस्मिक मृत्युच्या बातमीमुळे मन पूर्णपणे सुन्न झाले आहे. हरताळ, मिरवणुका, शोकसभा ह्या कार्यक्रमात मी स्वतःला गुंतवून घेतले आहे. लवकरच नेहरूंच्यावर दोन-तीन ठिकाणी व्याख्यानमाला गुंफेन. पण ह्यामुळे मनाचा सुन्नपणा काही जात नाही. गेली १५ वर्षे या माणसाचा मी कसून अभ्यास करीत होतो व त्यांच्यावर बोलत होतो. या पंधरा वर्षांत ३०० वेळा तरी किमान मी नेहरूंवर बोललो असेन... सेवादलातही माझा प्रमुख कार्यक्रम नेहरू समजावून सांगणे हाच होता...त्यांचा मी अंधभक्त नसलो तरी उत्कट भक्त होतो. त्यांच्या उणीवा फार मोठ्या होत्या हे कबूल. पण त्यांचे सामर्थ्य व दूरदृष्टी फारच प्रचंड होती. ह्या माणसाच्या निधनाने माझ्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे.” (निवडक पत्रे पृ. १३-१४)

नेहरू- गांधींनी देशाचं वाट्टोळं केलं या ‘विचारसरणी’च्या प्रभावाखाली मी जात असताना ‘गांधीहत्या आणि मी’ वाचनात आलं आणि त्या विचारसरणीत अजून रुतू लागलो. तेव्हा गांधीहत्येमागे एक प्रवृत्ती होती असं सांगून वेगळंच विवेचन करणारा कुरुंदकरांचा लेख वाचल्यावर भानावर आल्यासारखं वाटून गेलं. यानंतर काही काळानं मी गांधींच्या पहिल्या मराठी चरित्राला लोकमान्य टिळकांनी लिहिलेली प्रस्तावना वाचली; यानंतर गांधींच्या नेतृत्वाचा विचार मुळातून करणं मला आवश्यक वाटलं. फाळणी संदर्भातही याच प्रकारचा अनुभव आला. त्यामुळे कुरुंदकरांकडे पुन्हापुन्हा वळणं भाग होतं. फाळणीचा दोष कुणाच्या माथी न मारता ती एक अपरिहार्य घटना होती की काय, या प्रश्नाभोवती विचार निर्माण होऊ लागले. माझ्या धारणा; की ज्या अपुऱ्या, सांगोवांगी, पुराव्यांची मोडतोड केलेल्या, प्रचारकी थाटाच्या लेखनावर आधारित होत्या, त्याचा पुनर्विचार करण्याची प्रेरणा मला कुरुंदकरांनी दिली असं म्हणता येईल.

गेल्या दशकभरापासून चालू असलेली संसदेची पायमल्ली पाहताना लोकशाहीच्या संदर्भात कुरुंदकरांचे विचार आज जास्तच महत्त्वाचे वाटतात. “गेली कैक वर्षे आपण राजकारणाचा चिकित्सकपणे अभ्यास करणे सोडूनच  दिलेले आहे. जाहीर सभेतील व्याख्याने, पुस्तके व लेख यांच्या आधारेच आपण राजकारणाचा विचार करीत आहो. राजकारणाचा विचार राजकीय प्रवाहाच्या संदर्भात करायचा असतो व राजकीय नेत्यांच्या वर्तनाची त्यांच्या व्याख्यानांत सुप्तपणे दडलेल्या ध्वन्यर्थाशी संगती लावून राजकारणाचा विचार करायचा असतो, ही शिस्तच आपण सोडून दिलेली आहे.” (‘जागर’च्या प्रस्तावनेतून).

गेल्या दहा-बारा वर्षांतल्या महत्त्वाच्या घडामोडी नजरेखाली घातल्या तरी या वैचारिक शिस्तीचं महत्त्व समजू शकेल. भारताच्या संदर्भात, अण्णा हजारे यांचं अपयशी आंदोलन, काँग्रेसचा झालेला दारुण पराभव आणि नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्यामुळे भाजपचा झालेला राक्षसी विजय; त्यानंतर संसदेची वेगानं होत गेलेली पायमल्ली (याचा अर्थ काँग्रेसच्या काळात पायमल्ली होत नव्हती असा नाही!) इत्यादी.

याच काळात जगात अमेरिकेच्या भांडवलशाहीचा फुटलेला फुगा (Subprime mortgage crisis), बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदी येणं (यांची ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ आणि ‘द ओडॅसिटी ऑफ होप’ ही पुस्तकं मराठीत आल्यावर लगेच वाचून काढली होती.), ट्युनिशियातील क्रांती आणि तिचा अरब देशांत झालेला फैलाव (Arab Spring), मोठे दहशतवादी हल्ले, इसिसचा उदय, अनेक देशांत अतिरेकी राष्ट्रवादी पक्षांना/गटांना मिळालेलं यश, ब्रेग्झिट इत्यादी घडामोडी झाल्या. युरोपात स्थलांतरितांचा लोंढा जात असताना मी माझ्या एका मित्राला सहज म्हटलं होतं, की युरोपनं आता एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याला तयार राहिलं पाहिजे! दुर्दैवानं काही दिवसांतच तसे हल्ले झाले. ही बाब ज्या वेळी माझ्या लक्षात आली; लोकशाही देशांवरच्या या हल्ल्यांनी मला मोठा धक्का बसला.

काही गमतीदार निरीक्षणंही मला नोंदवायची आहेत. यावेळी ज्या काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांचं नियमित वाचन होतं. त्यांत अनेक पत्रकार, अभ्यासक, भाष्यकार एक बाजू लावून घरून, ‘हेच कसं भविष्य असणार आहे’ असा आव आणत लिहीत असत. अण्णांच्या आंदोलनाचा हेतू माझ्या दृष्टीनं काही फारसा नैतिक नव्हता; अशा वेळी भ्रष्टाचारमुक्ती हाच जणू स्वतंत्र भारतासमोरील मोठा प्रश्न लोकपालामार्फत सोडवला गेला की, आपोआप देश प्रगतीपथावर दिसू लागेल अशी मांडणी अनेक जण करत होते. अण्णा जे आंदोलन करत होते, त्यांचा जो मार्ग जुना होता. देश कितीतरी पुढे आला होता. राजकारण्यांना या विरोधाशी कसा सामना करावा याचा पुरेसा अनुभव होता आणि अशा जुन्या मार्गानं जाऊन ते प्रश्न सुटणारच नव्हते. काही हजार वर्षांचं सातत्य घेऊन जगणाऱ्या समाजात हे असे मूलभूत दोष असणारच. ते मान्य करून त्याविरोधी व्यवस्था निर्माण करणे, संसदेची पायमल्ली होऊ न देणं आणि लोकशाही अबाधित राखणं हा मध्यम मार्ग स्वीकारणं मला अधिक उचित वाटत होतं. अनेकांचे आडाखे चुकले आणि जवळपास पूर्ण विरुद्ध वास्तव काही काळानं समोर आलं.

आपल्या जुन्या लिखाणाला विसरून हे लोक आम्ही हे वास्तवच कसं ओरडून सांगत होतो, असं लिहू लागली. तिकडं अमेरिकेत हल्लीच झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प काही झालं तरी निवडून येणार नाहीत... अमेरिकी जनतेचा पाठिंबा त्यांना नाही... त्यांच्याविरोधात अमेरिकेतली अनेक वर्तमानपत्रं (लोकशाहीचा चौथा स्तंभ) कशी उभी आहेत, असे एक ना अनेक दाखले दिले गेले. पण निकाल पूर्णपणे उलट लागला. जसजसा ट्रम्पना पाठिंबा वाढू लागला, तसतसं ब्रिटनमध्ये जनमत ब्रेग्झिटच्या बाजूनं जाऊ लागलं. याच्यामध्ये काही संकुचित राष्ट्रवाद आहे की, आणखी काही याकडं फारसं कोणाचं लक्ष होतं असं दिसलं नाही. कुरुंदकरांचा भारतीय राजकारणाचा जितका अभ्यास होता, तितका आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास होता, असं वाटत नाही. पण त्यांनी राजकारणाचा विचार करण्याची जी शिस्त सांगितली, ती समोर ठेवून या वर्तमानाकडे पाहणे योग्य होईल.

कुरुंदकरांची ऐतिहासिक संशोधनाची पद्धत त्यांच्या व्यक्तिविषयक लिखाणामधून प्रकर्षानं जाणवते. कोणत्याही व्यक्तीचा अभ्यास करताना ते स्वतःसमोर काही प्रश्न उपस्थित करतात आणि त्यांच्या अनुषंगानं व्यक्तीचं मूल्यमापन करतात. एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व समजून घेताना त्याच्या आयुष्यातील रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे असं सांगतात. सत्य समजून घ्यायचं असेल तर नाट्यमय घटनांमागे असणारी गुंतागुंत, रुक्ष व गद्यमय कहाणी जास्त महत्त्वाची असते. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कुरुंदकरांचं लिखाण वैशिष्ट्यपूर्ण आहे.

इतिहास काही करत नसतो; सर्व घडते ते खऱ्या जिवंत माणसांकडून!, हा मार्क्सचा विचार समोर ठेवून कुरुंदकरांचा इतिहासाबतचा दृष्टिकोन मला समजून घ्यावासा वाटतो. ते म्हणतात, “इतिहासाला सत्य ही एकच देवता असते आणि म्हणून व्यक्तींच्या मोठेपणाची फारशी मातब्बरी इतिहासाला नसते. आजच्या राजकीय गरजा अगर आजची ‘उपयुक्त’ श्रद्धास्थाने यांची बूज राखणे इतिहासाला जमणे शक्य नाही. भूतकाळातली व्यक्ती जाणीवपूर्वक काय घडविण्याचा प्रयत्न करीत होत्या इतकेच पाहून इतिहासाला चालणार नाही तर या व्यक्तींच्या हातून जे अजाणता घडले व त्याचे परिणाम काय झाले हेही इतिहासाला पाहावे लागेल. पुराव्याने जे सिद्ध होईल ते स्वीकारीत सर्व गुंतागुंत मान्य करीत, ऐतिहासिक दृष्टिकोन स्वीकारून कुठवर वाटचाल करता येते हे पाहण्याचा प्रयत्न करणे इतकाच या आकलनाचा हेतू आहे. त्यामुळे नवी अभिमानस्थाने समोर आली तर ती नाकारलेली नाहीत आणि काही श्रद्धास्थाने ढासळली तरी फारशी चिंता केलेली नाही.”

नरहर कुरुंदकरांच्या उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/search/?search=Narhar+kurundkar&search_type=Authors&doSearch=1

............................................................................................................................................

कुरुंदकरांची ही भूमिका मला महत्त्वाची वाटते, नाहीतर विभूतीपूजेसारखे दोष निर्माण होतात. कै. वासुदेवशास्त्री खरे यांनी ‘मराठे व इंग्रज’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत समूहरूपानं आम्ही केलेली कामं यशस्वी होत नसल्यानं आमचे राज्यतंत्र व्यक्तीप्रधानच असावं लागतं, असं म्हटलं आहे (वि. ग. कानिटकर संपा., गाजलेल्या प्रस्तावना, पृ. १२६). आताही आपण पूर्णपणे या दोषापासून मुक्त नाही. भारतासारख्या लोकशाहीप्रधान राष्ट्रामध्ये यांचा विचार करणं आवश्यक झालं आहे.

इतिहासाविषयी कुरुंदकर म्हणतात, “माझे इतिहासावर प्रेम असले तरी इतिहास भविष्याला मार्गदर्शन करतो, असे म्हटलेले नाही. इतिहास खाचखळगे दाखवून सावध करतो इतकेच म्हटलेले आहे... कोणत्याही जमातीतील परंपरागत नेतृत्व उद्ध्वस्त केल्याशिवाय भारतात लोकशाहीचा आरंभच करता येणे कठीण आहे त्याला फार मोठ्या वैचारिक लढ्याची तयारी ठेवावी लागेल... इतिहासाचा नायक जुना समाज असतो. त्या संदर्भातच इतिहास घडत असतो. परंपरांची चिकित्सा करूनच मागासलेले अंधश्रद्ध मन आधुनिक बनवता येते. चिकित्सा टाळून माणसाला आधुनिक बनवता येत नाही.”

विचारांना नवी दिशा देणं, उपलब्ध माहितीची नवी संगती लावणं, इतरांच्या लक्षात न आलेला मुद्दा मांडणं, अशी विद्वानाची लक्षणं कुरुंदकरांनी सांगितली आहेत, जी त्यांना स्वतःलाही लागू पडणारी आहेत. कुरुंदकरांचा आणखी एक मोठा गुण म्हणजे बौद्धिक सहिष्णुता. कुरुंदकर अभ्यासातून तयार झालेलं मत स्पष्टपणे मांडतात आणि त्यात दुरुस्तीची तयारीही ठेवतात. यासंदर्भात त्यांचा दिसणारा सहिष्णू स्वभाव मला जास्त भावतो आणि आजच्या परिस्थितीच्या संदर्भात आवश्यकही वाटतो.

लेखक रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.

pankajghate89@gmail.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

chintamani bhide

Tue , 11 July 2017

लेखात उल्लेख केलेले डॉ. राजूरकर यांच्या 'प्रकाशचित्रे'मध्ये कुरुंदकरांवर छान प्रकरण आहे. कुरुंदकर यांची लिखाणाची पद्धत कशी होती, यावर वेगळा प्रकाशझोत टाकणारा तो लेख आहे.