कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावणारा कादंबरीकार
ग्रंथनामा - आगामी
राम जगताप
  • ‘लोचना आणि आलोचना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 09 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी श्याम मनोहर Shyam Manohar राम जगताप Ram Jagtap

बडोदा इथं पुढील आठवड्यात (१६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान) होत असलेल्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ कादंबरी-नाटककार श्याम मनोहर यांच्या साहित्याचा ऊहापोह करणाऱ्या ‘लोचना आणि आलोचना’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. चंद्रकांत पाटील व केशव तुपे यांनी हे पुस्तक संपादित केले असून समकालीन प्रकाशन, पुणे यांनी ते प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील हा एक लेख...

.............................................................................................................................................

आदर्श, परंपरा, प्रेरणा, मानदंड, निकष, धारणा या सतत बदलणाऱ्या गोष्टी असतात, असायला हव्यात. कारण प्रत्येक नवी पिढी ही आधीच्या पिढीची टीकाकार असते. आधीच्या पिढीनं जी काही मांडणी केलेली असते, त्यातील उणिवा शोधणं, त्या मांडणीत नवी भर घालणं, प्रसंगी त्यातील कालबाह्य भाग नाकारून नवी मांडणी करणं, ही नव्या पिढीची कामं असतात. एवढंच नव्हे, तर कर्तव्य असतं. कुणाही एका व्यक्तीनं केलेल्या मूल्यमापनाला मर्यादा असतात. कारण त्यातून त्या व्यक्तीच्या साहित्याचे काहीच पैलू उलगडले जाऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही साहित्याचं पुन्हापुन्हा मूल्यांकन करणं हे समीक्षकांचं कामच असतं. त्यामुळे त्या व्यक्तीचं योगदान नेमकेपणानं जाणून घ्यायला मदत होते; काळाच्या ओघात त्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर होण्यास मदत होते. आधीच्या समीक्षकांकडून कळत-नकळत झालेला अन्याय दूर करता येतो. मात्र या बाबतीत मराठी साहित्यातील समीक्षक कमी पडतात, ही वस्तुस्थिती आहे. मराठी समीक्षकांनी साठोत्तरी प्रवाहानंतर फारसे नवे सिद्धान्त मांडलेले नाहीत आणि ज्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांची दखलही घेतली गेलेली नाही. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं, तर प्राध्यापक रा. ग. जाधव यांनी ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ (ecology of literature) हा आधी मांडलेला आपला सिद्धान्त तीनेक वर्षांपूर्वी नव्यानं मांडून दाखवला आहे; पण त्याची साधी दखलही मराठी समीक्षकांनी घेतलेली नाही. अशा प्रकारची उदासीनता अनभ्यस्ततेतून निर्माण होते. जुन्याच जोखडांना चिकटून राहिल्यानं आणि जे आपल्याला पटत नाही, ते सरसकट नाकारायचंच या वृत्तीनं मराठी समीक्षा विद्यापीठीय वर्तुळापुरती मर्यादित झाली. तिचा समाजाशी असलेला अनुबंध तुटला; पण त्याची चाड समीक्षकांना आहे, याचे दाखले फारसे सापडताना दिसत नाहीत.

या प्रकारामुळे प्रयोगशीलता, नवे रचनाबंध, नवे दृष्टिकोन यांची उपेक्षा करणं, त्याची दखल न घेणं वा त्यावर अनभ्यस्त पद्धतीनं टीका करणं असे प्रकार वाढीला लागलेले दिसतात.

याची अलीकडची दोन महत्त्वाची उदाहरणं म्हणजे विलास सारंग आणि श्याम मनोहर.

सारंग यांची अकारिक प्रयोगशीलता तर मराठी समीक्षक, लेखक आणि वाचक यांना पेलवलीच नाही. ज्यांनी सारंग यांची पुस्तकं प्रकाशित केली, त्या प्रकाशकांना ती कळली असंही नाही. शिवाय, सारंग यांनी आपला शिष्य-संप्रदाय जमवला नाही. अशा प्रयोगशील लेखकाकडे नवे लेखक आकर्षित होतात; पण सारंग यांच्या बाबतीत तेही फारसं झालेलं दिसत नाही. त्यामुळे सारंग यांच्या साहित्याचं यथोचित मूल्यमापन तर सोडाच, पण त्यांचे साहित्य नीट समजून घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न मराठी समीक्षेकडून पुरेशा प्रमाणात झाला आहे, असं दिसत नाही.

जी उपेक्षा सारंग यांची झाली, तोच प्रकार श्याम मनोहर यांच्या बाबतीत होताना दिसतो आहे.

खरं म्हणजे श्याम मनोहर यांच्या सुरुवातीच्या कथा-कादंबरी-नाटक या वाङ्मय प्रकारातील लेखनाची दखल काही प्रमाणात घेतली गेली आहे, नाही असं नाही; पण मूल्यमापन मात्र काही विशेषणांच्या पलीकडे जाताना दिसत नाही. ‘ब्रेन टीझर कादंबरीकार’, ‘प्रयोगशील कादंबरीकार’, ‘विक्षिप्त कादंबरीकार’ या विशेषणांपलीकडे श्याम मनोहर यांच्या कादंबऱ्यांकडे पाहिलं जातं, असं जाणवत नाही. ‘शंभर मी’ या कुठलाच नायक नसलेल्या आणि फारसे घटनाप्रसंग नसलेल्या श्याम मनोहरांच्या कादंबरीवरील प्रतिक्रिया पाहिल्या, तर ते प्रकर्षानं जाणवते.

श्याम मनोहर यांच्या अलीकडच्या कादंबऱ्यांची चमत्कारिक वाटणारी नावं (उदा. ‘खूप लोक आहेत’, ‘उत्सुकतेने मी झोपलो’, ‘खेकसत म्हणणे आय लव्ह यू’, ‘शंभर मी’) याचीच चर्चा अधिक होते आहे; पण मनोहर या कादंबऱ्यांमधून जे सांगू-मांडू पाहत आहेत, त्याला भिडण्याची तयारी मराठी समीक्षा दाखवताना दिसत नाही. ‘ही काय कादंबरी आहे का?’, ‘हा तर चक्रमपणा झाला!’, ‘तत्त्वज्ञानच झोडायचं आहे, तर मग तसं पुस्तकच लिहावं ना, ते कादंबरीत कशाला घुसडायचं?’ असं प्रश्नोपनिषद उभं केलं जात आहे. ‘मनोहर यांना सरळपणे काहीच सांगता येत नाही. ते कायम वळसे घेत काहीतरी दुर्बोध सांगण्याचा प्रयत्न करतात’, हा समज तर मराठी साहित्यात सार्वत्रिक होत चालला आहे. याचं कारण म्हणजे, गेल्या शंभर-दीडशे वर्षांमध्ये मराठीमध्ये ‘कादंबरी’ या वाङ्मयप्रकाराचा म्हणून जो घाट आकाराला आला आहे, त्याच्याशी श्याम मनोहर यांच्या कादंबऱ्या फटकून वागतात. स्वतःच्या लेखनाला ‘कादंबरीच’ म्हणण्याबाबत श्याम मनोहरही फारसे आग्रही दिसत नाहीत. ते सातत्यानं ‘फिक्शन’ वा ‘कथात्म-साहित्य’ असे शब्द वापरतात. ‘फिक्शन’ला मराठीमध्ये समर्पक शब्द नाही, असं त्यांचं म्हणणं आहे व ते खरंही आहे.

श्याम मनोहर त्यांच्या कादंबऱ्यांमधून काय करू पाहत आहेत? एक, ते एकाच वेळी कादंबरीच्या रूढ घाटाला छेद देत आहेत. दोन, ‘सभ्यता’ आणि ‘संस्कृती’ यांच्या संदर्भातील तत्त्वचर्चा कादंबरीच्या माध्यमातून करू पाहत आहेत. थोडक्यात, मराठी कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. (हाच प्रकार नाट्यदिग्दर्शक म्हणून पं. सत्यदेव दुबे यांनी केला आहे. फरक एवढाच की, दुबेंनी ते इतरांच्या संहितेच्या बाबतीत केले आहे. मनोहर यांची नाटककार म्हणून ओळख झाली ती दुबेंमुळेच.) कादंबरीच्या अक्षांश- रेखांशमध्ये जे-जे काही करता येणं शक्य आहे, त्याच्या जेवढ्या म्हणून शक्यता आहेत, त्या-त्या पणाला लावून पाहण्याचा प्रयत्न श्याम मनोहर त्यांच्या प्रत्येक कादंबरीमधून करत आले आहेत.

या साऱ्या प्रयोगांमधून मनोहर यांना काय सांगायचं आहे? मनोहर म्हणतात, “मला कादंबरीची नवी संकल्पनात्मक मांडणी करायची आहे. मी तिची नवी व्याख्या करू पाहतो आहे. समाजाची बदलती सभ्यता आणि ‘मी कोण आहे’ या दोन्ही प्रश्नांना कादंबरीच्या माध्यमातून भिडण्याचा प्रयत्न करतो आहे. ‘मी कोण आहे’ हा प्रश्न आपण अध्यात्मात लोटून दिला आहे. त्याला मला कादंबरीत आणून, त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे.”

मराठी कादंबरीकार बौद्धिक प्रश्नांशी झोंबी घेत नाहीत, ही तर वस्तुस्थिती आहे. श्याम मनोहर यांनी जेवढ्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत, तेवढीच नाटकंही लिहिली आहेत. त्यांचे प्रयोगही झालेले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचं अभिवाचन, त्यावर आधारित नाट्यप्रयोगही होत आहेत; पण त्यांचं स्वरूप प्रायोगिक असंच आहे. मात्र हे सर्व करणारे लोक तरुण कलाकार आहेत, ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. नव्या पिढीला रूढ संकेतांना फाटा देणाऱ्या, अब्सर्ड धर्तीच्या आणि प्रसंगी स्वतःला नीट न उमगलेल्या गोष्टींची ओढ अधिक असते. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं पाहिजे; पण त्यांच्याकडून मूल्यमापनाची, समग्र आकलनाची फारशी अपेक्षा ठेवता येत नाही. त्यासाठी अभ्यस्त समीक्षकांचीच गरज असते; पण मराठी समीक्षेचा निदान अलीकडच्या काळातला लौकिक तरी आस्वादक आकलनाच्या पलीकडे फारसा जाताना दिसत नाही.

मनोहरांच्या बाबतीत तर तो खूपच जाणवतो. त्यांच्या कादंबऱ्या आस्वादाच्या पातळीवर समजून घ्यायला-द्यायला मराठी समीक्षा कमी पडते आहे. उदा. ‘शंभर मी’ ही कादंबरी पाहू. या कादंबरीत १२५ हून अधिक प्रकरणं आहेत; पण या कादंबरीला कुठलाही नायक नाही. फारसे घटनाप्रसंगही नाहीत. माणसाच्या शंभरहून अधिक प्रवृत्ती त्यांनी एकेका प्रकरणातून मांडल्या आहेत. या प्रवृत्तीच या कादंबरीच्या नायक आहेत, हे कादंबरी बारकाईनं वाचताना लक्षात येतं; पण व्यक्तीला नायक मानून त्याला चांगल्या-वाईट प्रवृत्ती चिकटवण्याची मराठी कादंबरीकारांची परंपरा असल्यानं मराठी समीक्षकांना या कादंबरीकडे कसं पाहावं, हेच कळेनासं झालं आहे. कमी-अधिक फरकानं मनोहरांच्या सर्वच कादंबऱ्यांबाबत अशीच स्थिती आहे. सामान्य माणूस त्याच्या दैनंदिन जगण्याकडे कसं पाहतो, त्यातील संगती-विसंगती आणि विक्षिप्तपणा मनोहर त्यांच्या कादंबऱ्यांमधून मांडण्याचा प्रयत्न करतात. माणूस हे किती गुंतागुंतीचं प्रकरण असतं, एकाच माणसामध्ये किती प्रकारच्या प्रवृत्ती असतात अशा माणसांमधल्या पैलूंचा शोध घेण्याचं काम मनोहर करू पाहतात; पण ही गोष्ट समजून घेण्यात मराठी समीक्षा उणी पडते आहे, असं खेदानं म्हणावं लागतं.

मराठी समीक्षकांमध्ये एक (दुष्ट) प्रवृत्ती आहे - काय लिहिलं आहे, ते कशा प्रतीचं आहे, यापेक्षा काय लिहिलं नाही, याचीच चर्चा समीक्षक जास्त करतात. याचा अर्थ, प्रत्यक्षात लेखकाला काय म्हणायचं आहे, हे मराठी समीक्षक फारसं समजून घेताना दिसत नाहीत. त्यात केवळ कथा-कादंबऱ्या-नाटकं लिहिणाऱ्या आणि सार्वजनिक सभा-समारंभात न बोलणाऱ्या, फारसं ललितेतर गद्यही न लिहिणाऱ्या मनोहरांसारख्या लेखकाविषयी कसं जाणून घेणार, हाही प्रश्न असतोच; पण आता त्याची सोडवणूक श्याम मनोहर आणि चंद्रकान्त पाटील यांनी केली आहे. मनोहर यांच्या निवडक भाषणांचं व लेखांचं ‘श्याम मनोहर : मौखिक आणि लिखित’ हे सव्वाशे पानी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यामुळे मनोहर केवळ कादंबरीच नाही, तर एकंदर फिक्शनचा कसा विचार करतात हे जाणून घेण्याची मोठीच सोय झाली आहे. या पुस्तकातील ‘फिक्शन हीही ज्ञानशाखा आहे’ या लेखात मनोहर म्हणतात, “माणसाच्या स्वत:च्या आवडीनिवडी असतात. स्वत:चे कल असतात. माणसात कुटुंबाचे असते. माणसात समाजघटकाचे वा जातीचे असते. शैक्षणिकतेवरूनचे, व्यावसायिकतेवरूनचे असते. भाषेचे असते. देशाचे असते. हे सगळे होत माणसाच्या माणूसपणापर्यंत जायचे असते. इतका पल्ला फिक्शनमध्ये घ्यायचा असतो आणि ‘माणूस म्हणजे काय?’ याचा शोध घ्यायचा असतो. त्या माणूस पात्राने त्याचे वर उल्लेखलेले सर्व बाळगत, त्यातील काही दुरुस्त करीत, त्यातील काहींना प्रश्न करीत, काहींचे विनोद करीत, काही लपवत जीवनाचा त्याचा स्वत:चा अर्थ शोधायचा असतो. हे माणसाचे कर्तव्य आहे. माणूस म्हणून तो हे करत नसेल, तर हे फिक्शनने करायचे असते किंवा फिक्शनने नागरिक वाचकांना त्याची जाणीव करून द्यायची असते.”

या उताऱ्यावरून मनोहरांची फिक्शनमागची नेमकी भूमिका काय आहे, हे सहज समजून घेता येईल.

विलास सारंग यांच्यासारखी प्रयोगशील वृत्ती जोपासणारे, पण तरीही आधुनिकता, उत्तर आधुनिकता या जंजाळात न पडणारे श्याम मनोहर हे आव्हानात्मक कादंबरीकार आहेत. त्यांची ‘हे ईश्वरराव…हे पुरुषोत्तमराव’पासून ‘शंभर मी’पर्यंतची कुठलीही कादंबरी रूढार्थानं वाचकांचे मनोरंजन करत नाही; वाचकानुनय तर अजिबातच करत नाही. उलट ती वाचकांच्या डोक्याचा भुगाच करते; पण तरीही त्यांची लोकप्रियता कमी नाही. त्याचं कारण बहुधा ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ या पारपंरिक वृत्तीला कधीतरी कंटाळून जाणाऱ्या माणसांच्या स्वभावात असावं. म्हणूनच ते ‘नाही मनोहर तरी…’ असलेल्या श्याम मनोहरांच्या कादंबऱ्यांच्या वाट्याला जात असावेत. जसे मराठी वाचक तसेच साधारणपणे मराठी समीक्षकही असल्यानं त्यांचीही तीच तऱ्हा होते; आणि दोघांकडून बहुतांश वेळा गल्लत, गफलत, गहजब होतो. पण त्याबाबत मनोहरांना फारशी फिकीर नाही. त्यांना कोण विचारायला गेलंच तर ते सांगतील, “फिक्शनचे मर्म जाणणे हा फिक्शन वाचण्याचा प्रमुख हेतू असला पाहिजे. कोणतेही फिक्शन शंभर टक्के कळले पाहिजे, अशी धारणा ठेवण्याची गरज नाही.” हे त्यांना तुसडेपणानं सांगायचं नसतं. खरोखरच त्यांची तशी धारणा आहे. त्यांना ‘मी कोण आहे?’ आणि ‘सामाजिक सभ्यता’ या दोन्ही प्रश्नांना समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोक कसे भिडतात, हे पडताळून घ्यायचं असतं. या दोन्ही प्रश्नांशी त्यांनी घेतलेली झोंबी ते त्यांच्या कादंबऱ्यांमधून मांडतात. कारण त्यांच्या दृष्टीनं ‘फिक्शन हीही ज्ञानशाखा आहे’.

कादंबरीसारख्या वाङ्मयप्रकारातून तात्त्विक प्रश्नांची मांडणी करणारे पहिले कादंबरीकार म्हणजे वामन मल्हार जोशी. ‘तत्त्वज्ञ कादंबरीकार’ म्हणून मराठीमध्ये त्यांचा गौरव केला गेला. प्रसिद्ध समीक्षक गो. म. कुलकर्णी यांनी ‘वा.म.जोशी साहित्य-दर्शन’ (साहित्य अकादेमी, १९८५) या पुस्तकात ‘कल्पकता लढवून खेळकरपणे तत्त्वचिंतन करण्याची वामन मल्हारांची पद्धती’ त्यांच्या पहिल्यावहिल्या लेखनापासून दृग्गोचर झाल्याचा निर्वाळा दिला आहे. वामन मल्हार यांनी ‘विचार सौंदर्य’, ‘विचार-विलास’, ‘विचारलहरी’ अशी वैचारिक पुस्तकंही लिहिली. त्यांचं १९१५ साली प्रकाशित झालेलं ‘सॉक्रेटिसाचे संवाद’ हे पहिलं पुस्तक अनुवादित स्वरूपाचं होतं. श्याम मनोहर यांनीही फ्रेडरिक नीत्शे यांच्या ‘झरथुष्ट्र उवाच’ या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. मात्र वामन मल्हार यांच्याप्रमाणे त्यांनी वैचारिक स्वरूपाचं लेखन फारसं केलेलं नाही. वामन मल्हार यांच्या ‘रागिणी’, ‘आश्रमहरिणी’, ‘सुशीलेचा देव’, ‘इंदू काळे आणि सरला भोळे’ या कादंबऱ्या तत्त्वचिंतन करणाऱ्या आहेत. ‘रागिणी’ या ‘युगप्रवर्तक’ मानल्या गेलेल्या कादंबरीमध्ये त्यांनी अंत:प्रेरणा म्हणजे काय?, श्रेष्ठ कोण-बुद्धी का भावना?, मनुस्मृतीत स्त्रियांची निंदा आढळते की स्तुती?, धर्म खरा की भौतिक शास्त्रे खरी?, ब्रह्म निर्गुण की सगुण?, बुद्धीपासून फायदे व तोटे, सत्य आणि नीती, अंत:स्फूर्तीज्ञान विरुद्ध तर्कज्ञान, ईश्वराचे अस्तित्व, स्त्रीस्वातंत्र्य, सृष्टीचा धर्म - स्वार्थ की स्वार्थत्याग, जग आनंदमय व प्रेममय आहे की दु:खमय व कलहमय? यांसारख्या विविध प्रश्नांची चर्चा केली आहे.

श्याम मनोहर यांच्या कादंबऱ्यांमध्येही हेच दिसून येतं. ‘हे ईश्वरराव…हे पुरुषोत्तमराव’ (१९८३)पासून ‘शंभर मी’ (२०१२)पर्यंत त्यांच्या सातही कादंबऱ्यांमध्ये अनेक प्रकारच्या तत्त्वचर्चा आहेत, पण हे मांडतानाचं मनोहरांचे वेगळेपण म्हणजे ते त्यासाठी बरेचदा विसंगती, उपरोध, विडंबन, असंबद्धता यांचाही आधार घेतात. मूळ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या मनोहरांकडे तर्कसंगत विचार आहे, पण ते सांगण्याची त्यांची पद्धत मात्र जराशी तिरपांगडी आहे. त्यामुळे त्यांची कुठलीही कादंबरी एकदा वाचून भागत नाही किंवा एकसलगही वाचून चालत नाही. ती थांबत-थांबत, दमादमानंच वाचावी लागते, आणि कादंबरीभर विखुरलेल्या वेगवेगळ्या तुकड्यांचा मनातल्या मनात कॅनव्हॉस जुळवावा लागतो. वामन मल्हारांनी तत्त्वचर्चा करताना जसं कुठल्याही प्रश्नाचं निर्णायक उत्तर दिलेलं नाही, तसंच श्याम मनोहरही देत नाहीत. किंबहुना वामन मल्हार यांच्याप्रमाणेच ते प्रश्न उपस्थित करत राहतात, त्यांच्या उत्तराच्या दिशा सूचित करतात. त्यामुळे वामन मल्हार यांच्याप्रमाणेच श्याम मनोहर यांच्या कादंबऱ्यांकडेही दुर्लक्ष होण्याची शक्यता बळावत चालली आहे. वामन मल्हार आणि श्याम मनोहर यांच्यातील साधर्म्य तर कुणीच लक्षात घेताना दिसत नाही. असं म्हणतात की, ‘प्रश्न विचारण्यातून शहाणपण दिसते, तर उत्तरातून हुशारी कळते.’

वामन मल्हार आणि श्याम मनोहर यांच्या कादंबऱ्यांमध्ये (आणि इतर साहित्यातही) सतत प्रश्न उपस्थित केलेले दिसून येतात. त्यांची उत्तरं शोधण्याचं काम समीक्षक-वाचक यांनी करावयाचं आहे; पण जो प्रकार काही वर्षांपूर्वी वामन मल्हार यांच्या बाबतीत झाला, तोच श्याम मनोहर यांच्यासंदर्भातही घडताना दिसतो आहे. मग मराठी समीक्षकांची आणि वाचकांची साहित्याभिरुची इतक्या वर्षांत उंचावली नाहीच की काय असा प्रश्न पडतो.

‘मी व माझे टीकाकार’ या लेखात वामन मल्हार यांनी म्हटलं आहे, “…माझ्या टिकाकारांना माझ्यात जे गुण दिसले ते माझ्यामध्ये नाहीत आणि माझ्यात जे दोष आहेत ते त्यांना आजिबात दिसले नाहीत, याची जाणीव उत्पन्न होऊन, मानवी टीका वरवरची असते हे ध्यानात आले व हसू आले…” पुढे ते म्हणतात – “…कोणत्याही विषयाच्या सर्व बाजूंचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची व असा विचार करावयास लावण्याची माझी जी वृत्ती आहे, तिचे महत्त्व अद्यापि पुष्कळ लोकांना कळलेले नाही व या वृत्तीचा अर्थही कित्येकांच्या ध्यानात येत नाही.” या दोन्ही गोष्टी श्याम मनोहर यांच्या बाबतही घडताना दिसतात. त्यामुळे ‘श्याम मनोहर- मौखिक आणि लिखित’ या पुस्तकानंतर तरी मराठी वाचक आणि समीक्षक मराठी कादंबरीचे अक्षांश-रेखांश धसाला लावणाऱ्या श्याम मनोहरांकडे जरा सहृदयतेनं पाहतील, अशी आशा करायला हरकत नाही. आता प्रश्न एवढाच आहे की, मनोहर यांचं हे नवं पुस्तक वाचून मराठी समीक्षक त्यांच्या कादंबऱ्यांना नव्यानं भिडण्याचं धाडस करतील की नाही? जे करतील, त्यांना हे लक्षात ठेवावं लागेल की, जुन्या हत्यारांनी नव्या लढाया लढता येत नाहीत, जिंकता तर अजिबातच येत नाहीत. 

.............................................................................................................................................

श्याम मनोहर यांची पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा - 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4354

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......