मधल्या काळातील मराठी विचारवंतांचे, राज्यशास्त्रज्ञांचे, समाजशास्त्रज्ञांचे लोकप्रिय लेखन पाहा. ‘प्रोपगंडा’ हा शब्द त्यांच्या कोशातच नाही असे वाटावे.
ग्रंथनामा - झलक
रवि आमले
  • ‘प्रोपगंडा : प्रचार | जाहिरात |अपमाहिती | आणि बरेच काही...’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 February 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक प्रोपगंडा Propaganda रवि आमले Ravi Amle

‘प्रोपगंडा : प्रचार | जाहिरात |अपमाहिती | आणि बरेच काही...’ हे पत्रकार रवि आमले यांचे नवेकोरे पुस्तक नुकतेच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. दै. लोकसत्तामधून ‘प्रचारभान’ या नावाने प्रकाशित होत असलेल्या साप्ताहिक सदराचे हे सुधारित स्वरूप आहे. या पुस्तकाला आमले यांनी लिहिलेलं हे मनोगत...

.............................................................................................................................................

नवी मुंबईतील वाशी स्थानकातून महामार्गाच्या दिशेने चालू लागलो की, काही अंतरावर आसाम भवन लागते. तेथे एक बऱ्यापैकी मोठे पुस्तकांचे दुकान आहे. तेथे अनेकदा जाणे असायचे. याचे कारण तेथे भरपूर इंग्रजी पुस्तके असत. जुनी, वापरलेली पुस्तके. युरोप-अमेरिकेतून पुस्तकांच्या रद्दीचे कंटेनरच्या कंटेनर मागवत असावेत ते. पण त्यामुळे ती खूपच स्वस्तात मिळायची. पत्रकारितेतून प्राप्त पगाराला परवडायची. एक होते, की त्या रद्दीच्या सागरातून आपल्याला हवा तो मोती मोठ्या सायासानेच मिळायचा. तर एके दिवशी तेथे असेच एक पुस्तक दिसले. छोटेसे. रया गेलेले. पण त्याच्या मथळ्याने आकर्षित करून घेतले. ‘द सेलिंग ऑफ द प्रेसिडेन्ट’. लेखक जॉर्ज मॅकगिनीस. पुस्तकाचा ब्लर्ब वाचला. थोडेसे चाळले आणि लक्षात आले हे काही वेगळेच प्रकरण आहे. रिचर्ड निक्सन या अमेरिकी अध्यक्षाची दूरचित्रवाणीवरून कशा प्रकारे विक्री केली गेली, याची ती कथा होती. ते वाचताना मनात एक शब्द लकाकून गेला- ‘प्रोपगंडा’. ही २०१०मधील गोष्ट.

तसा हा शब्द तेव्हाही काही नवा नव्हता. याचा पहिला उच्चार ऐकला त्यालाही आता किमान चाळीस वर्षे उलटून गेली आहेत. ओतूरच्या जीवन शिक्षण मंदिरात वडील शिक्षक होते. आजही चांगले आठवतेय, त्यांच्या तोंडून हा शब्द पहिल्यांदा कानावर पडला होता- ‘प्रपोगंडा’. इंग्रजीतपण गंडा वगैरे असतो हे ऐकून तेव्हा जरा मजाच वाटली होती. हेही आठवतेय की इंदिरा गांधींच्या संदर्भात तेव्हा तो शब्द आला होता. त्यानंतर मात्र हा विषय फारसा असा कानावर आलाच नाही. इंदिरांनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. देशात दूरचित्रवाणीचे युग त्यांनी आणले. त्यावर स्वार होण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्या काळात नेहमी दिसायची त्यांची छबी दूरदर्शनवर. पण त्याला लोक ‘प्रोपगंडा’ म्हणत नसत. जाहिरातबाजी म्हणायचे त्याला. वस्तुतः जाहिरात हे प्रोपगंडाचे केवळ एक अंग. पण आपल्या विचारविश्वाने ते लक्षातच घेतले नाही.

हा शब्दच विचारविश्वात नव्हता. त्यामुळे त्याचा अर्थ शोधण्याची, उहापोह करण्याची, उदाहरणे पाहण्याची गरजच भासली नाही आपल्याला. या मधल्या काळातील मराठी विचारवंतांचे, राज्यशास्त्रज्ञांचे, समाजशास्त्रज्ञांचे लोकप्रिय लेखन पाहा. ‘प्रोपगंडा’ हा शब्द त्यांच्या कोशातच नाही असे वाटावे. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविरोधात देशभर आंदोलन झाले. नरहर कुरुंदकर यांच्यासारखे विचारवंत तेव्हा सरकारच्या नाकावर टिच्चून आणीबाणीविरोधात प्रचार करीत होते. कुरुंदकर यांच्या भाषणांची तऱ्हा काही निराळीच होती. ते तेव्हा इसापच्या गोष्टी सांगत असत आणि त्याद्वारे देशकालस्थितीचा परामर्ष घेत असत. लोकांना बरोबर कळे, ते काय बोलतात ते. उपहास, वक्रोक्ती, व्याजोक्ती, विनोद अशा विविध मार्गांनी ते फॅसिझमविरोधात लोकांना जागवत असत. फॅसिझमवरील त्यांचे एक भाषण आता लेखरुपात प्रसिद्ध आहे. त्यात ते फॅसिझमची लक्षणे सांगतात. त्यांच्या प्रचारपद्धती सांगतात. ‘असत्य हे सत्य म्हणून बिनधोकपणे वावरू शकेल इतकी सोय जर करता आली, तर शिष्टसंमत कल्पना म्हणून परवडणारी लोकशाही सोयीनुसार वापरणे याला फॅसिस्टांची हरकत नसते,’ असे एक महत्त्वपूर्ण वाक्य आहे त्यात. पण त्यांच्या या प्रचारातही प्रोपगंडा हा विषय केंद्रस्थानी नव्हता. याचा परिणाम असा झाला, की प्रोपगंडाचा डंख कसा असतो हे आपल्या नीट लक्षातच आले नाही. छापील शब्दांवर विश्वास ठेवण्याची आपली सामाजिक प्रवृत्तीही त्याला पोषकच ठरली. तेव्हा वृत्तपत्रेही सरकारी माहिती शहानिशा न करता खरी मानत होते. त्या माहितीमागे काही हेतू असतील, ती अर्धसत्य वा खोटी असू शकेल अशी शंका कोणी चुकूनही घेत नव्हते. घोषणांना खरे मानून चालण्याची तर रूढीच निर्माण झाली आपल्याकडे. बाकी सारे सोडा. साध्या गुन्हेवृत्तांकडे पाहा. आजही पोलिसांकडून दिली जाणारी माहिती म्हणजे ब्रह्मवाक्य असे समजूनच ती छापली जाते. एरवी पोलिसांच्या प्रामाणिकतेबाबत येता-जाता संशय घेणारे आपण याबाबत मात्र पोलिसांना सत्यवचनी हरिश्चंद्रच समजतो, तर यात काही विसंगती आहे, हेही त्या पत्रकारांच्या गावी नसते. अशा परिस्थितीमुळे मराठीमध्येच काय, भारतातील इंग्रजीसह अन्य भाषांतही ‘प्रोपगंडा’ हा विषय मुळातून समजून घेण्याची वा देण्याची निकड कोणाला भासलीच नाही. प्रोपगंडा मात्र होतच राहिला.

यात बदल होत गेला तो एकविसाव्या शतकाच्या आरंभापासून. सॅम्युअल हटिंग्टन यांचा १९९३ मधला ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स?’ हा निबंध, त्याचा पुढे जगभरातील राजकीय विचारव्यूहावर झालेला परिणाम, ‘९-११’चा हल्ला, अल् कायदा आणि त्याविरोधातील प्रचार, जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे ‘दहशतवादविरोधी युद्ध’ अशा विविध घटना एकीकडे आणि सॅटेलाईट टीव्ही, संगणक, इंटरनेट यांचा प्रसार दुसरीकडे आणि या दोन्हींतून साकारलेले अर्थकारण या सगळ्यातून जगभरात मोठी उलथापालथ घडत होती. १९९१मध्ये जागतिक अर्थकारणाशी घट्ट जोडले गेलेलो आपण या सगळ्याचा आणि या सगळ्यामागचा अर्थ समजून घेऊ लागलो होतो. भारतीय राजकारणात साठून राहिलेल्या स्थितीशीलतेचा बांध तोवर फुटू लागला होता. सगळीकडेच उजव्या परंपरावादी शक्ती उसळून वर आल्या होत्या. समाजात एक विचित्र घुसळण सुरू झाली होती. याच काळात अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी इराकवर आक्रमण केले. साल होते २००३.

दहशतवादाविरोधात उभ्या राहिलेल्या शक्तींनी दहशतवादाचा चेहरा असलेल्या सद्दाम हुसेन याच्या पाडावासाठी छेडलेले ते युद्ध असल्याचे आपल्याला सांगण्यात येत होते. ते युद्ध सुरू झाले, संपले आणि त्याच दरम्यान आपल्याला त्या कारणांतील फोलपण समजून चुकले. एक जागतिक महासत्ता, ब्रिटनसारखी तिची बटलरी राष्ट्रे, बहुराष्ट्रीय माध्यमे, भारतात तेव्हा नुकत्याच उभ्या राहू पाहात असलेल्या वृत्तवाहिन्या या सर्वांनी मिळून प्रोपगंडाचे केवढे मोठे मायाजाल उभे केले होते हे अनेकांच्या तेव्हा लक्षात आले. ते इराककांड घडले आणि असे काही घडू शकते, आपलेच पूर्वग्रह, आपल्याच भावना यांचे खेळणे करून आपल्या सर्वांनाच बनविले जाऊ शकते, हे तीव्रतेने समोर आले. परंतु अजूनही त्याला आपल्याकडे कोणी प्रोपगंडा म्हणत नव्हते. आपण अजूनही खोटानाटा प्रचार, जाहिरातबाजी या शब्दावलीतच अडकलो होतो. अण्णा आंदोलन आणि त्यानंतरची लोकसभा निवडणूक या दोन घटनांनी मात्र झोपलेल्या माणसाच्या तोंडावर पाणी पडावे तसे आपले झाले.

२०१४ मध्येच नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारमोहिमेमागील प्रशांत किशोर या प्रोपगंडाकाराचा हात बऱ्यापैकी उघड झाला. बातम्यांतून त्याची चर्चा होत होती. परंतु अजूनही त्याचा विचार बहुतांशी ‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’च्या अंगानेच होत होता. अण्णा आंदोलन, त्यातून निर्माण झालेला आम आदमी पक्ष यांचेही तेच. अशात ब्रेक्झिट घडले. डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. ‘केब्रिज अ‍ॅनालिटिका’, ‘बिग डेटा’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या साऱ्या गोष्टी जागतिक चर्चेत आल्या. आजचा प्रोपगंडा हा किती सर्वव्यापी आहे, त्याची साधने किती आधुनिक आहेत हे त्यातून दिसत होते. ते सारेच भयंकर होते. अस्वस्थ करणारे होते.

‘लोकसत्ता’त त्याची चर्चा होत होती. ‘प्रचारभान’ हे सदर आले त्यातूनच. हे नाव, हे सदर याची मूळ कल्पना ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहायक संपादक अभिजीत ताम्हणे यांची. समाजमाध्यमेच नव्हे, तर मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांतूनही प्रोपगंडा केला जात आहे, ते आपल्या वाचकांच्या किमान निदर्शनास तरी आणून द्यावे. कारण हा प्रोपगंडा देशाला अंतिमतः दुहीच्या उंबरठ्यावर घेऊन जाणारा आहे ही त्यांची या मागील भावना. मात्र ‘लोकसत्ता’चे वाचक, त्यांची वैचारिक उंची हे सारे लक्षात घेता हे सदर आपल्याला झेपेल का हा विचार मनात होता. या विषयाचा आवाकाही मोठा. पण अभिजीतने आग्रह धरला. गिरीश कुबेर हे सातत्याने नव्या विषयांच्या आणि लेखकांच्या शोधात असलेले ‘धाडसी’ संपादक. त्यांनी विश्वास टाकला आणि अखेर २०१७ मध्ये दर सोमवारी ‘प्रचारभान’ प्रसिद्ध होऊ लागले. पहिल्या दोन-तीन लेखांतच हे सदर वाचकांना भावत असल्याचे लक्षात आले. मराठीतीलच नव्हे, तर भारतातील इंग्रजीसह सर्व भाषांतील अशा प्रकारे प्रोपगंडाचा इतिहास मांडणारे हे पहिलेच लेखन असल्याचे काही वाचकांनीच लक्षात आणून दिले. याचे पुस्तक यावे अशी सूचना करणारे ई-मेल येऊ लागले. हे सारे लेखकाची छाती छप्पन इंचाची करणारे होतेच, पण जबाबदारी वाढविणारेही होते. अर्थात डोक्यात वाचकप्रियतेची हवा जावू नये याचीही व्यवस्था काही वाचक करीतच होते. प्रोपगंडाचा पहिल्या महायुद्धापर्यतचा इतिहास मांडला जात होता तोवर सारे ठीक होते. तेव्हाही ट्रम्प यांच्यासंदर्भात काही लिहिले की एक-दोन नाखुशीची ई-पत्रे हमखास यायचीच. पण दुसरे महायुद्ध सुरु झाले, हिटलरचा प्रवेश झाला आणि काही जण बिनसले. त्यांची चिडचिड, ‘कांग्रेसी, सिक्युलर, प्रेस्टिट्यूट’ आदी शिव्या यांचा अर्थ, आता प्रोपगंडावरच लिहित असल्याने, नीटच समजत होता. पण त्यांना सारे काही ‘पॉझिटिव्ह-पॉझिटिव्ह’ दिसावे यासाठी हिटलरच्या आणि एकंदरच प्रोपगंडाच्या इतिहासाचे तर पुनर्लेखन करणे शक्य नव्हते. या अशा वेळी गिरीश कुबेर, अभिजीत ताम्हणे यांच्याप्रमाणेच महेंद्र पंढरपुरे, सुहास गांगल या वरिष्ठ सहकाऱ्यांचे पाठीशी उभे राहणे मोलाचे ठरले. ते लेख पुस्तकरूपात यावेत ही या सर्वांचीच इच्छा होती.

पण हे पुस्तक म्हणजे ‘प्रचारभान’मधील लेखांचे निव्वळ संकलन नाही. वृत्तपत्रीय लेखनाला दोन मर्यादा असतात. एक म्हणजे उपलब्ध जागेची आणि दुसरी संपादकीय भूमिकेची. ‘लोकसत्ता’त ही दुसरी मर्यादा कधीच जाणवली नाही हे येथे आवर्जून नमूद करायला हवे. एखाद्या लेखकास सदर दिले, म्हणजे ती जागा त्याची झाली. आपणांस पटत नसलेली वा आपल्या वृत्तपत्राच्या भूमिकेत बसत नसलेली मते तो मांडत असला, तरी ते त्याचे स्वातंत्र्य आहे. त्या लेखनस्वातंत्र्याच्या आड संपादकांनीही येता कामा नये, ही संपादक गिरीश कुबेर यांची भूमिका. पत्रकारितेत हे हल्ली दुर्मीळच. जागेची मर्यादा मात्र असतेच. त्या विशिष्ट शब्दसंख्येतच लेख बसवावा लागतो. त्यामुळे सांगण्यासारख्या बऱ्याच मजकुराला कात्री लावावी लागते. विस्तार टाळावा लागतो. पुस्तकाच्या पायात या बेड्या नसतात. या पुस्तकासाठी ‘प्रचारभान’मधील सर्वच लेखांचे पुनर्लेखन, संपादन केले. त्यात भर घालून ते अधिकाधिक माहितीपूर्ण व्हावेत असा प्रयत्न केला. या विषयाबद्दल नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीची त्याला जोड दिली. सदरात जाऊ शकली नव्हती अशी काही प्रकरणे नव्याने लिहिली. यामुळे ‘प्रचारभान’च्या तेव्हाच्या वाचकांनाही या पुस्तकातून नवे काही वाचल्याचे समाधान मिळू शकेल, असा विश्वास वाटतो.

हे पुस्तक खरे तर या पूर्वीच यायचे. पण त्याच्याआड ‘रॉ’ आले. प्रचारभान हे सदर आणि ‘रॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाचे लेखन हे एकाच काळातले. तेव्हा दोन दिवस साप्ताहिक सुटीचे असत. रविवार, सोमवार. दर रविवारी प्रचारभानचा लेख लिहावा आणि सोमवारी ‘रॉ’चे लेखन, संशोधन करावे असे वेळापत्रक ठरून गेले होते. डिसेंबर २०१८ मध्ये रॉ प्रकाशित झाले आणि मग ‘प्रोपगंडा'कडे वळलो. यासोबत अन्य नैमित्तिक लेखन असायचेच. यात उशीर झाला. या सर्व काळात माझी पत्नी मनिषा, मुली मुक्ता आणि मल्लिका या तिघींचीही साथ महत्त्वाची ठरली. या काळात मुलींच्या वाट्याला तर मी आलोच नाही. धाकट्या बहिणी वंदन आणि सुरेखा या माझ्या लेखनाच्या पहिल्या वाचक आणि तिखट समीक्षक. त्यांच्या तसेच माझे मित्र, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक नागेश पाटील यांच्या टोचणीमुळेच हे पुस्तक आज पूर्ण होऊ शकले. ‘मनोविकास प्रकाशन’चे आशीष पाटकर यांनी मोठ्या आनंदाने या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली. मनोविकासची आजवरची प्रकाशित पुस्तके त्यांच्या चोखंदळपणाची साक्ष आहेत. या विषयावरील पुस्तक ते प्रकाशित करीत आहेत यातून हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरेल असा अर्थ काढण्यास हरकत नाही.

प्रोपगंडाचा आजवरचा इतिहास लिहिताना नजरेसमोर नेहमीच चालू वर्तमानकाळ होता. या काळातील घटना-घडामोडी समजून घेण्याच्या कामी, आपल्या मनावर विविध दृश्य-अदृश्य शक्ती टाकत असलेले प्रभाव ओळखण्याच्या कामी हे पुस्तक आले, तर त्यापरता दुसरा आनंद नसेल. वाचकांकडून मिळालेली तीच सर्वांत मोठी दाद असेल.

.............................................................................................................................................

‘प्रोपगंडा : प्रचार | जाहिरात |अपमाहिती | आणि बरेच काही...’  या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5194/Propaganda

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

किणीकर चार ओळी लिहितात आणि आपल्याला केवढा प्रवास घडतो! कला आणि निसर्ग हा संवेदनशील लोकांचा विसावा असतो. हे रुबाई लिहिणारे लोक मूळचे आध्यात्मिक. किणीकर आध्यात्मिक होते ह्या विषयी कुणाच्या मनात काही शंका असायचे कारण नाही. आता पर्यंत ते अनेक रुबायांमध्ये दिसलेलेच आहे. पुढेही ते दिसत राहीलच. स्वतः उमर खय्याम सूफी होता. पण ह्या लोकांना अध्यात्माच्या अलीकडे जे आहे ते जगून घ्यायचे आहे.......

जागतिकीकरणाच्या परिणामांच्या परिप्रेक्ष्यात १९९०नंतरचा महाराष्ट्र, जनजीवन आणि जनआंदोलने, हे या पुस्तकाचे मध्यवर्ती सूत्र आहे...

नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आणि आर्थिक नवउदारमतवादी धोरणे राबवण्याच्या प्रक्रियेतून जगभर प्रचंड बदल झाले. महाराष्ट्रातल्या बदलांचा मागोवा या घेतला असून तो वाचकांना एक व्यापक दृष्टी देऊ शकतो. यात महाराष्ट्रातले विविध प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी वैचारिक भूमिका स्पष्ट करणारे महत्त्वाचे लेख आहेत. सर्व प्रत्यक्ष चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात वैचारिक स्पष्टता दिसते.......