अजूनकाही
जागतिक पातळीवर ‘चित्रपट’कलेचे आगमन होण्याआधी रंगभूमीवर सादर होणारे ‘नाटक’, हे महत्त्वाचं करमणुकीचं आणि सामाजिक प्रबोधनाचं माध्यम होतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांत ‘चित्रपट’ ही कला आकाराला येत होती, तेव्हा भारतातील काही राज्यांत नाटक कंपन्या होत्या. अशीच एक नाट्यसंस्था म्हणजे १९४४ साली मुंबर्इत पृथ्वीराज कपूर यांनी स्थापन केलेली ‘पृथ्वी थिएटर्स’. या कंपनीचा कारभार सुमारे १६ वर्षे चालला आणि १९६० साली ही नाटककंपनी बंद झाली. नंतर पृथ्वीराज कपूरचे सुपुत्र शशी कपूर यांनी वडिलांच्या स्मरणार्थ जुहू येथे १९७८ साली ‘पृथ्वी थिएटर’ हे एक कायमस्वरूपी नाट्यगृह स्थापन केलं. तेव्हापासून तिथं दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक नाट्यमहोत्सव संपन्न होतो. हे या महोत्सवाचे ४७वं वर्ष होतं. १ ते १७ नोव्हेंबर दरम्यान यंदाचा महोत्सव संपन्न झाला.
या महोत्सवातलं यंदाचं एक अतिशय महत्त्वाचं नाटक म्हणजे ग्रीक नाटककार अॅरिस्टोफेन्स (ख्रिस्तपूर्व ४५० ते ख्रिस्तपूर्व ३८८) यांचं ‘लिसिस्ट्राटा’. या नाटकाचा प्रयोग ख्रिस्त पूर्व ४११मध्ये सादर झाल्याची नोंद आढळते. ग्रीक नाटक म्हटलं की, त्यामागे आपोआप ‘शोकांतिका’ हा शब्द येतोच. ग्रीकांच्या गाजलेल्या शोकांतिका म्हणजे ‘राजा इडिपस’, ‘अँटीगनी’ वगैरे.
नाटककार अॅरिस्टोफेन्सचे वेगळेपण म्हणजे त्याने ग्रीक विनोदी नाटकं लिहिली. या काळात ग्रीसमध्ये नगर-राज्यं होती. या काळातली गाजलेली नगर-राज्यं म्हणजे अथेन्स आणि स्पार्टा. या दोन नगर राज्यांत वैर होते. या दोन नगर-राज्यांत ख्रिस्तपूर्व ४३१ ते ख्रिस्तपूर्व ४०४ दरम्यान भीषण युद्ध झालं. या पार्श्वभूमीवर अॅरिस्टोफेन्सने ‘लिसिस्ट्राटा’ हे नाटक लिहिलं.
एक संवेदनशील कलावंत म्हणून अॅरिस्टोफेन्सला युद्धाचा, त्यातील अनावश्यक हिंसेचा तिटकारा होता. म्हणून त्याने शांततेचा संदेश देणारं हे नाटक लिहिलं, ज्यात विनोदाचा मुबलक वापर केला. अनेक प्राचीन ग्रीक नाटकांत कालातीत कथांना स्पर्श केलेला असतो. यातही पुरुषप्रधान संस्कृती, सत्ता आणि सत्तेची लालसा, हिंसा वगैरेंना हात घातला आहे.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
या नाटकाचा ‘डी फॉर ड्रामा’ या नाट्यसंस्थेने सादर केलेला प्रयोग हिंदी-बुंदेली भाषेत होता. सुमारे दीड तास चालणारा हा प्रयोग अतुल कुमारने दिग्दर्शित केला होता. हे नाट्यरूपांतर ऋषभ यांनी केलं आहे.
आपले पती युद्धात गुंतले आहेत, त्यांना युद्ध म्हणजे मर्दानगीचा आविष्कार वाटतो वगैरेंची जाणीव झाल्यावर दोन्ही नगर-राज्यांतील स्त्रिया ठरवतात की, जोपर्यंत पुरुष युद्धं थांबवत नाहीत, तोपर्यंत त्यांना शरीरसुख द्यायचं नाही. हा आगळ्या प्रकारचा संपच असतो. यामुळे वेगळेच ताण निर्माण होतात. त्याची कथा म्हणजे हे नाटक.
यातील गृहितक म्हणजे महिला शरीरसुखापासून दूर राहू शकतात आणि शांततेसाठी यशस्वी प्रयत्न करू शकतात. (आज या दोन्ही गृहितकांसमोर प्रश्नचिन्ह उभी करता येतात). अशा अभूतपूर्व कामासाठी वेगळ्या प्रकारचे नेतृत्व लागते. ते समोर येतं. अंबा ही तरुण विवाहित महिला इतर विवाहित आणि काही अविवाहित महिलांना पटवून देते की, पुरुषांना वेडावणारं शरीरसुख फक्त स्त्रीच देऊ शकते. सुरुवातीला पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध या प्रकारचं बंड करण्यास घाबरणाऱ्या, नकार देणाऱ्या स्त्रियांमध्ये अंबा आत्मविश्वास जागृत करते. हळूहळू एकेक स्त्री तयार होते आणि अंबाच्या नेतृत्वाखाली बंडाला दमदार सुरुवात होते.
एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे नाटकाचे दिग्दर्शक अतुल कुमार यांनी हे नाटक कॉलेजमध्ये शिकत असताना वाचलं होतं. मात्र तेव्हा त्यांना हे नाटक रंगमंचावर आणण्याचं धाडस झालं नाही. या नाटकातील संभोगाची सूचक दृश्यं, संभोगाबद्दलचे संवाद वगैरे असलेले नाटक रंगमंचावर आणणं धाडसाचं काम आहे. आता मात्र २०२५ साली त्यांनी हे नाटक मंचित केलं.
त्यांच्या मते आजच्या जगात अनेक ठिकाणी युद्धं सुरू आहेत. जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. अतुल कुमार यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे नाटकाचा काळ स्पष्ट केला नाही. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.
या नाटकातील पात्रं जरी बुंदेली (पश्चिम उत्तर प्रदेश) आणि हिंदी (मध्य प्रदेश) भाषेत बोलतात, तरी नाटक हे भागांत घडतं, असं मात्र नाही. म्हणूनच नाटकाचं नेपथ्य तसेच वेशभूषा काळाकडे निर्देश करत नाहीत. याद्वारे नाटकाचा वैश्विक आशय अधोरेखित करण्यात आला आहे. सुरुवातीला नेपथ्यात पांढऱ्या रंगाचा भरपूर वापर केला आहे. पांढरा रंग शांततेचा प्रतीक समजला जातो. जसंजसं पुढे सरकू लागतं आणि पुरुषांची सत्तालालसा, त्यासाठी करत असलेली युद्धं वगैरेंचे संदर्भ प्रेक्षकांसमोर यायला सुरुवात होते, तसातसा लाल रंगाचा वापर वाढतो. हे सर्वच फार सूचक आणि प्रभावी आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
गेले अनेक वर्षं सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी अंबा पुढाकार घेऊन आजूबाजूच्या नगर-राज्यांतील स्त्रियांची बैठक बोलावते. बरीच वादावादी होऊन अंबाचं म्हणणं मान्य होतं आणि युद्ध थांबल्याशिवाय आम्ही पुरुषांना शरीरसुख देणार नाही, अशी जाहीर शपथ घेतली जाते. जसजसा काळ जातो, तसतसं या अनोख्या संपाला यश मिळत जातं.
नंतर रंगमंचावर एकामागे एक असे बरेच पुरुष येतात, जे शरीरसुखासाठी रडकुंडीला आलेले दिसतात. दिग्दर्शकाने हे जसं संवादातून दाखवलं आहे, तसंच या पुरुषांच्या कडक झालेल्या प्रतीकात्मक शिस्नातूनही दाखवलं आहे. अनेक प्रकारच्या विनवण्या करूनही स्त्रिया बधत नाहीत. युद्ध थांबवल्याशिवाय शरीरसुख मिळणार नाही, ही भूमिका कायम ठेवतात.
शेवटी अक्रोपोलीस येथे सर्व पुरुषांची बैठक भरते. बैठकीला आलेल्या सर्व पुरुषांचं कडक झालेलं शिस्न प्रेक्षकांना दिसतं. अशा प्रसंगांत विनोद आणि एक प्रकारचे कारुण्य ठळक होतं. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटी यशस्वी होतात, शांतीसाठी तह होतो. परिणामी सर्व पुरुषांना आपापल्या बायका मिळतात. या टप्प्यावर हे सुमारे दीड तास चालणारं नाटक संपतं. ही धमाल सुखांतिका आहे.
नाटकाच्या आगळ्या विषयासाठी वेगळ्या प्रकारचं सादरीकरण गरजेचं होतं. अतुल कुमारने हे लक्षात घेत नाटक बसवलं आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे नाटकात नेपथ्य नाममात्र आहे. सर्व भर जबरदस्त संवाद आणि देहबोली यावर आहे. जोडीला कथानकाच्या प्रगतीप्रमाणे बदलणारी वेशभूषा आणि प्रकाशयोजना आहे. या नाटकात ‘अंबा’ हे पात्र केंद्रस्थानी आहे. ही महत्त्वाची भूमिका कामना पाठक यांनी लीलया पेलली. हे नाटक बघणं एक प्रसन्न अनुभव जरी असला, तरी यातील दाहक आशय आपल्याला अंतर्मुख करतो.
.................................................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.
nashkohl@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment