अजूनकाही
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
भारतातील पहिली ग्रामोफोनची रेकॉर्ड कोलकात्त्याची गायिका गौहर जान (१८७३-१९३०)च्या आवाजात निघाल्याची नोंद आहे. ही गायिका त्या काळी भारतभर प्रसिद्ध होती. तिच्या आवाजात ११ नोव्हेंबर १९०२ रोजी पहिली रेकॉर्ड तयार झाली. तेव्हा ग्रामोफोन कंपनीची भारतातली प्रमुख होती फ्रेडरिक विल्यम गेन्सबर्ग ही जर्मन व्यक्ती. या गाण्यासाठी गौहरला तीन हजार रुपये मिळाले होते. लक्षात घ्या, १९०२ सालचे ३ हजार रुपये, म्हणजे आजचे जवळपास तीस लाख.
गौहर जन्मानं ख्रिश्चन होती. तिचं मूळ नाव अँजेलिना येओवर्ड. वडील ब्रिटिश, तर आई इंडियन ख्रिश्चन. एक दिवस वडील कायमचे इंग्लंडला निघून गेले. त्यानंतर तिच्या आईने एका मुस्लीम व्यक्तीशी लग्न केलं. परिणामी अँजेलिनाचं नाव बदलून ‘गौहर जान’ असं केलं गेलं.
गौहरचं सुरुवातीचं आयुष्य बनारसला गेलं आणि नंतरचा काही काळ कोलकात्त्यात व्यतीत झाला. तिची आई उत्तम गायिका होती. तिनंही शास्त्रीय संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं. सहसा मनस्वी लोकांचं असतं, तसं गौहरचं जीवनही वादळी होतं. गौहर तेरा वर्षांची असताना एका मुस्लीम जमीनदाराच्या प्रेमात पडते आणि त्याच्याबरोबर पळून बनारसला येते. तिथं ती सुमारे चार वर्षं राहते. या काळात तिचा गाण्याचा रियाझ सुरू असला, तरी ती मैफली करत नव्हती. यथावकाश प्रियकर सोडून देतो, गौहरला आईकडे कलकत्त्याला परत येण्यावाचून पर्याय राहत नाही.
पुढच्या काळात गौहरने गाण्यातून आणि नर्तनातून अफाट पैसा कमावला आणि तसाच बेफामपणे उधळला. तिची कलकत्त्यात स्वत:च्या नावाची इमारत होती- ‘गौहर मंजिल’. तिने तिच्या आवडत्या मांजरीच्या लग्नात त्या काळी तब्बल २० हजार रुपये खर्च केले होते. गौहर हे एक अजब मिश्रण होतं. तिला २२ भाषा येत होत्या. त्यातील अनेक भाषांत ती सफाईनं गाऊ शकत असे.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
एक प्रकारे बेहिशेबी जगणाऱ्या कलाकारांची जशी अपरिहार्य शोकांतिका होते, तशी गौहर जानचीसुद्धा झाली. तिचे शेवटचे दिवस हलाखीत गेले. असं म्हणतात की, बेगम अख्तरचं स्वप्न होतं की, तिला गौहर जानसारखं गाता यावं.
आज हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे रविवार, २६ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या बालगंधर्व रंगमंदिरात (हो, मुंबईतही बालगंधर्व रंगमंदिर आहे) ‘माय नेम इज जान’ या हिंदी-बंगाली या द्वैभाषिक नाटकाचा एकपात्री प्रयोग झाला.
यात कलकत्त्याच्या रस्त्यात घडलेल्या एका प्रसंगाचं वर्णन केलं आहे. गौहर सहा घोड्यांच्या बग्गीनं जात असते. त्या काळी फक्त उच्चपद इंग्रज अधिकाऱ्याला सहा घोड्यांची बग्गी बाळगण्याचा अधिकार होता. एक पोलीस अधिकारी गौहरची बग्गी अडवतो आणि तिला एक हजार रुपयांचा दंड ठोठावतो. लक्षात घ्या की, हे हजार रुपये विसाव्या शतकातील पहिल्या दशकांतले. गौहर जान चटकन हजारच नव्हे, तर दोन हजार काढून देते आणि सांगते की, ती उद्यासुद्धा याच रस्त्यानं याच सहा घोड्यांच्या बग्गीनं जाणार आहे, तर उद्याचा दंड आजच घ्यावा आणि उद्या तिची बग्गी अडवू नये.
गौहरसारखे मनस्वी कलाकार एका वेगळ्याच धुंदीत जगत असतात‚ त्यांना या जगाचे कायदेकानून माहिती नसतात, किंवा असे म्हणणे कदाचित जास्त संयुक्तिक ठरेल की, त्यांना हे कायदेकानून माहिती करून घेण्याची इच्छाही नसते. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे काही चाणाक्ष व लुच्चे लोक त्यांचा गैरफायदा घेतात. असाच प्रकार गौहरबद्दलही घडतो. आईच्या मृत्यूनंतर गौहरचा एक दूरचा नातेवाईक न्यायालयात दावा ठोकतो की, ‘गौहर अनौरस संतान आहे. तिचा ‘गौहर मंजिल’वर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नाही.’ सबळ पुराव्याअभावी गौहर खटला हरते. परिणामी आयुष्याची शेवटची वर्षं तिला म्हैसूर दरबारने मंगलोरमध्ये दिलेल्या एका छोट्या घरात काढावी लागतात.
हे नाटकाचं थोडक्यात कथानक. यात तसं नवीन काही नाही. बालगंधर्व वगैरे अनेक महान कलाकारांचीही शोकांतिका झालेली आहे. आज हे सर्व कलाकार एक आख्यायिका बनून समाजाच्या स्मृतीत जिवंत आहेत, अजरामर झाले आहेत. त्यांना ज्यांनी फसवलं त्यांची नावं इतिहासाला माहिती नाहीत, मात्र या कलाकारांना रसिक विसरलेले नाहीत. ‘गौहर’ बघताना हे सर्व विचार मनात येत होते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या एकपात्री प्रयोगाचं दिग्दर्शन कोलकात्याच्या ज्येष्ठ रंगकमी अवनी चक्रवर्ती यांनी केलं आहे. मुंबईत सादर झालेला हा २२वा प्रयोग होता. या नाटकाचा कालखंड आहे एकोणिसाव्या शतकाची शेवटची वर्षं व आणि विसाव्या शतकातील सुरुवातीची वर्षं.
गौहरचं जीवन कलकत्ता‚ बनारस‚ म्हैसूर वगैरे ठिकाणी गेलं. दिग्दर्शकानं कमीत कमी पण कल्पक नेपथ्याच्या मदतीनं खिळवून ठेवणारा प्रयोग सादर केला. स्थळ आणि काळाचे बदल दाखवण्यासाठी अवंती चक्रवर्ती यांनी व्हिडिओ फुटेजचा वापर केला आहे. रंगमंचाच्या मागे बॅकलाईटचा वापर करून गावांची नावं आणि ती वर्षं प्रोजेक्ट केली जातात. काळ जिवंत करण्यासाठी दुसऱ्या अंकात रंगमंचावर ग्रामोफोन ठेवला जातो.
आपली कहाणी गौहर स्वत:चं प्रेक्षकांना सांगते. गौहरची भूमिका बंगाली रंगभूमीवरची गाजलेली अदाकारा अर्पिता चॅटर्जीनं सुंदर सादर केली आहे. दीड तास चालणारं हे नाटक केवळ एकट्या व्यक्तीनं खेचून नेणं सोपं नाही, पण चॅटर्जीनी हे साध्य करून दाखवतात.
या नाटकात गाणी आहेत. त्यातील एक अतिशय हृदयस्पर्शी गाणं म्हणजे ‘आ जा सावरिया तोहे गरवा लगा लूं... रसिके भरे तोरे नैन..’ हे १९७८ साली आलेल्या मुझ्झफर अलीच्या ‘गमन’ चित्रपटातही आहे. अशा गाण्यांमुळे प्रेक्षक अगदी सहज त्या काळात जातो आणि गौहर जानच्या जीवनाशी, तिच्या संघर्षाशी, यशाशी एकरूप होतो.
.................................................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.
nashkohl@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.

Post Comment