अजूनकाही

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
‘प्रेमा’बद्दल बोललं, लिहिलं जातं किंवा विचार केला जातो, तेव्हा बहुतेकांच्या मनाशी वा डोळ्यासमोर स्त्री–पुरुष असे भिन्नलिंगी जोडपेच असते. ‘प्रेमकथा’ म्हणजे फक्त दोन भिन्नलैंगिक व्यक्तींमध्ये होणारी किंवा घडणारी गोष्ट, असंच सर्वसाधारपण समजल, गृहित धरलं जातं. आपल्या आजूबाजूलाही तशीच उदाहरणं अधिक दिसतात. परिणामी ‘समलैंगिक प्रेम’ या विषयावर सहजपणे, उघडपणे ना बोललं जातं, ना लिहिलं जातं. ‘प्रेमकथे’वरील आधारित चित्रपटांची आकडेवारी पाहिली, तर हजारो चित्रपट भिन्नलैंगिक व्यक्तींच्या प्रेमावरच असल्याचे दिसते… म्हणजे तीच टिपिकल हिरो-हिरोईनची ‘लव्हस्टोरी’.
अलीकडच्या काळात समलैंगिकतेवर आधारित हिंदी चित्रपट आणि वेबसिरीज दिसू लागल्या आहेत. पण बहुतेकदा त्यात मुख्य नायक-नायिका नसतात, तर सहायक कलाकार असतात. अर्थात एवढीही पात्रं मराठी सिनेसृष्टीत दुर्मीळच.
अमोल पालेकर यांच्या दिग्दर्शनातील काही मोजकेच चित्रपट डोळ्यासमोर येतात. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतल्या त्या मोजक्या चित्रपटांतही समलैंगिक पुरुष दाखवताना स्त्रीवेष धारण करणारा पुरुष, इतकंच त्या पात्राला संकुचित करून ठेवलं आहे. बहुतेक चित्रपटांतील कथांचा शेवटही (ट्रॅजिक) आघातजन्य किंवा दुःखदच दाखवला जातो. त्यातून असंच सांगण्याचा प्रयत्न होतो की, समलैंगिक प्रेम समाज कधी स्वीकार करणार नाही, त्यामुळे मृत्यू किंवा भिन्नलैंगिक व्यक्तीशी लग्न याच प्रकारानं याचा शेवट होऊ शकतो.
रोहन कानवडे लिखित आणि दिग्दर्शित ‘साबर बोंड’ (Cactus Pear) हा समलैंगिक विषयावरील चित्रपट मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील पारंपरिक साचेबद्धपणाला छेद देतो. जानेवारी २०२५मध्ये हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘सनडान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘ग्रँड ज्युरी’ पुरस्कार मिळवलेला मराठीतील पहिला चित्रपट ठरला. तो महाराष्ट्रात १९ सप्टेंबर २०२५पासून सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आलाय.
‘साबर बोंड’ म्हणजे निवडुंगाचं फळ. हे फळ प्रतिकूल हवामानातही स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतं. या नावाप्रमाणेच या चित्रपटातील मुख्य पात्र प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतं.
आनंद हा शहरात राहून नोकरी करणारा ३० वर्षीय अविवाहित मध्यमवर्गीय तरुण. तो वडिलांच्या मृत्यूमुळे अंत्यविधी आणि इतर कार्य करण्यासाठी १० दिवसांसाठी अनेक वर्षांनी आपल्या गावी येतो. तिथं त्याला सतत ‘लग्न कधी करणार?’ या प्रश्नाला कुटुंबीय आणि समाजाला उत्तर द्यावं लागतं. गावातील गावी आल्यावर आनंदला त्याचा बालपणीचा बाळ्या हा मित्र पुन्हा भेटतो. तो शेतात मजुरी काम करणारा, शिक्षण पूर्ण न झालेला अविवाहित तरुण असतो. त्याच्याही घरातलेही त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहत असतात. त्यावरून त्याचेही कुटुंबियांशी वादविवाद होत असतात.
वडिलांच्या मृत्यूचं दुःख आणि त्यांच्या उत्तरकार्याशी संबंधित गोष्टींनी चित्रपटाला सुरुवात होते. मयताचं असल्यामुळे कार्य होईपर्यंत काय-काय करावं आणि काय काय करू नये, याचे नियम पाळायला सांगितले जातात. शेजारपाजरचे लोक आणि पाहुण्यांची घरी ये-जा सुरू असते. काही नातेवाईकांच्या भेटीगाठी तर खूप वर्षांनंतर होतात. नव्या-जुन्या नात्यांची ओळख होते, विचारपूस केली जाते. त्याच वेळी कुटुंबीयांची स्वयंपाकघरातली आणि शेतावरची कामंही सुरू राहतात. त्यासोबतच वडिलांच्या मृत्यूनंतर एका वर्षात लग्न झालंच पाहिजे किंवा लग्न का करत नाही, यावरून आनंदला सल्ले दिले जातात, त्याच्या लग्नावरून घरात चर्चा सुरू होतात.
त्याच वेळी घरातील आणि समाजातील कोंदट वातावरणामुळे दुःखाची भावना व्यक्त न करू शकणारा आनंद मोकळा श्वास आणि आधार शोधत असतो. तेव्हा त्याला त्याचा मित्र बाळ्या आधार आणि साथ देतो, सतत त्याच्या सोबत राहतो, त्याचं मन रमावं म्हणून रानात घेऊन जातो, लहानपणीच्या चांगल्या गोष्टी आठवण करून देतो. हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी सांगताना आणि एकमेकांना समजून घेताना शब्दाविना ते दोघं एकमेकांकडे आपल्या भावना व्यक्त करतात.
खरं तर ही गोष्ट आनंद आणि बाळ्या यांच्या प्रेमाची असली, तरीही ते कुटुंब, गाव आणि समाज यांच्याशी सहजपणे बांधले गेलेले दिसतात. ही जाणीव चित्रपटात अगदी अचूक टिपली आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
लेखक-दिग्दर्शकाला आपण मांडत असलेल्या संवेदनशील विषयाची पुरेपूर जाणीव असल्यामुळे त्याने बहुधा जाणीवपूर्वकच गाणी, मसालेदार संवाद, अवघड शब्द, फॅमिली मेलोड्रामा आणि लांबलचक स्वगतं, या सगळ्याला फाटा दिला आहे. अगदी सहज समजेल अशी सरळ मांडणी केली आहे. सूरज सुमन, भूषण मनोज आणि जयश्री जगताप या कलाकारांनी समरसून आपापल्या भूमिका केल्या आहेत.
‘मी समलैंगिक आहे’ ही स्व-ओळख’ स्वतःला माहिती असणं, ती पटणं, कुटुंबीयांना आणि समाजाला सांगणं, हा एक मोठा टप्पा असतो. ‘समलैंगिकते’बाबत सांगितल्यानंतर समाजातील पारंपरिक विचारांच्या भीतीशी करावी लागणारी लढाई आयुष्यभरासाठी चालू होते. समलैंगिक प्रेमाला कुटुंबात आणि समाजात पोषक वातावरण नाही, हे माहिती असतानाही ‘साबर बोंडं’ आपल्या प्रेमाचं अस्तित्व फुलवण्याचा प्रयत्न करतो.
समलैंगिक प्रेमाचा ‘स्वीकार आणि सकारात्मकता’ हे या चित्रपटाचं एक वेगळेपण आहे. म्हणजे फक्त दोन भिन्नलैंगिक व्यक्तींमधल्या ‘प्रेमा’पलीकडे जात, पाहत, दोन समलैंगिक व्यक्तींमध्येही प्रेम असतं, हे या चित्रपटात खूप चांगल्या प्रकारे मांडलं आहे. सुंदर दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफरच्या सुंदर फ्रेम्समुळे या सर्व गोष्टी अगदी सहजरित्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या दिसतात.
.................................................................................................................................................................
लेखिका अंजली प्रविण NALSAR युनिव्हर्सिटी फेअर ट्रायल प्रोग्रॅममध्ये डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. क्रिमिनल जस्टीस सिस्टीमच्या अभ्यासक आहेत.
amkar.anju@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment