मुक्ता बाम : थेट प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य घेणाऱ्या मुक्ताच्या एकांकिका भविष्यात अधिकाधिक सक्षमतेने ही परंपरा पुढे नेतील...
कला-संस्कृती - नाटकबिटक
वंदना भागवत
  • मुक्ता बाम आणि त्यांच्या एका एकांकिकेतील एक प्रसंग
  • Wed , 01 June 2022
  • कला-संस्कृती नाटकबिटक मुक्ता बाम Mukta Baam महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

नुकताच महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चा २०२१ सालचा ‘रा. शं. दातार नाट्य पुरस्कार’ युवा रंगकर्मी मुक्ता बाम यांना देण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख...

..................................................................................................................................................................

नाटक लिहायचे तर प्रश्न विचारता यावे लागतात. गोष्टीत ‘पुढे काय?’ हा प्रश्न महत्त्वाचा असतो तसा नाटकातही. नाटक पुढे जाते ते प्रश्नांची उत्तरे शोधण्यातूनच. रंगमंचाची म्हणून एक भाषा असते हे खरे. पण रंगभाषेच्या गाभ्याशी असतात ते नाटककाराने उभे केलेले प्रश्न. या प्रश्नांशी नाटकातली पात्रे कशी झुंजतात आणि त्याचे कार्यकारणभाव कसे प्रस्थापित करतात याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. नाटकातला विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम नाटकातून मांडल्या गेलेल्या प्रश्नातून – संघर्षातून होत असते. संघर्षातून नाटक जगण्याशी थेट नाते सांगत असते. प्रत्यक्ष वावरणारी पात्रे त्यांच्या संघर्षातून जगण्याचे प्रयोजन मांडत असतात. नेमके प्रश्न विचारणे आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे यातून नाटक उभे राहते. उत्तरे मिळण्यातील अडसर नाटककार किती चोखपणे टिपतो यावर नाटककाराची ताकद जोखता येते.

‘नाटककार’ या शब्दासारखा ‘नाटककर्ती’ असा शब्द रूढ झाला नाही. कदाचित नाटक लिहिण्याचे आणि दिग्दर्शित करण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांची संख्या खूपच कमी आहे म्हणून असू शकेल. पण याचा अर्थ स्त्रियांना प्रश्न विचारता येत नाहीत असा नाही; तर स्त्रियांना प्रश्न विचारण्याची मुभा आणि मोहलत मिळवण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेशी झगडावे लागते. स्त्रियांनी थेट प्रश्न विचारायचे वातावरण आधुनिकतेत निर्माण झाले. त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या आणि त्यांना विवेकी उत्तरे शोधणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढू लागली. मुक्तासारख्या नवोदित नाटककर्तीला स्त्रियांनी प्रश्न विचारण्याची परंपरा पुढे नेता येईल, अशी शक्यता तिच्या एकांकिका दर्शवतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मुक्ताच्या पुरस्कारप्राप्त चारही एकांकिका स्त्रियांना - व्यवस्थेपेक्षा वेगळा विचार करणाऱ्यांना - पडणाऱ्या प्रश्नांशी झगडतात. त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी मुक्ताच्या नाटकातील पात्रे जिथे जो विचार, जी कल्पना सापडेल तिथून खेचून आणतात. त्यासाठी त्यांना काल आणि अवकाश यांच्या मर्यादा नाहीत. मुक्ताशी बोलताना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली, ती अशी की मुक्ता केवळ बाह्य परिस्थितीलाच प्रश्न विचारत नाही, तर ती स्वत:च्या जडणघडणीलाही प्रश्न विचारते. आत्मटीका ही तिच्या वाटचालीची साथीदार आहे.

नाटककर्ती म्हणून मुक्ताची वाटचाल शाळेपासून सुरू झाली. अक्षरनंदन शाळेत सातवीत असताना नाट्यलेखनाची जबाबदारी अनपेक्षितपणे तिच्या अंगावर पडली. ते लिहिताना खूप मजा आली. त्याला प्रथम पारितोषिक मिळाले, पण त्या वेळेस नाटक हा प्रकार खूपच आव्हानात्मक आहे, याची जाणीव झाली. मजाही यायला लागली. कारण तो केवळ शब्दांशी खेळ नसतो, तर प्रेक्षकांच्या व्यवधानाशीही असतो हे समजले.

मग फर्गसन महाविद्यालयातील नाटक-गटात दाखल झाल्यावर नवनवीन साक्षात्कार झाले. १० मुलांबरोबर काम करणारी ती एकटीच मुलगी. जुन्या बाजारातून दरवाजे उचलून आणणे, ठोक बाजारातून नेपथ्याचे सामान रात्री-अपरात्री गाडीवर टाकून घेऊन येणे इथपासून ते तिच्या लिखाणाच्या शब्दप्रधान शैलीवर तुटून पडणाऱ्या मित्रमंडळींना तोंड देणे अशी सगळी अनुभवसमृद्धी तिच्या लेखनाच्या पायामध्ये जमा होत होती.

“ ‘अक्षर-नंदन’सारख्या शाळेत सहकार्याने, समजून घेत, सामावून घेत, आस्थेने आपले म्हणणे मांडले, तर ते ऐकले जाईलच याची खात्री असायची, ती महाविद्यालयातल्या वातावरणात नसायची. माझ्या लेखनाबद्दलच्या थेट, रोखठोक, निर्भीड प्रतिक्रिया मला महाविद्यालयातील नाटक-गटांतच ऐकायला मिळाल्या. त्यांना तोंड देत उभे राहणे मला खूप काही शिकवून गेले. आता मी ठामपणे वागू शकते. सगळ्यांची आवडती असणे आणि उत्तम नाटक उभे करणे या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. तेव्हा सतत सगळ्यांची आई किंवा बायको होऊन समजूत घालण्याच्या भूमिकेत असणे सोडले पाहिजे; माझ्या मनातला नाटकाचा आकार स्टेजवर आणायचा तर मी मला दिग्दर्शिका म्हणून प्रस्थापित करायला लागेल हे मी शिकले”, असे मुक्ताने मला सांगितले.

७०च्या दशकात पुण्यातील महाविद्यालयात आणि एकूणच सामाजिक अवकाशात वेगवेगळ्या चळवळी आणि सांस्कृतिक उलथापालथींमध्ये बायकांचा आवाज सुस्पष्ट होत गेला होता. त्यात प्रश्न विचारणे आणि विचारलेले प्रश्न ऐकून घेणे, असे दोन्हींचेही प्रशिक्षण समृद्धपणे होत होते. समांतर चित्रपट आणि प्रायोगिक रंगभूमीवरून अनेक प्रयोग होत होते. दिग्दर्शक आणि लेखकांशी थेट संवाद होऊ शकायचे. या मोकळेपणातून बौद्धिक आवाका वाढत गेला आणि संवादीही होत गेला. त्यातूनच बाई म्हणूनही सक्षमता वाढत होती. स्त्री चळवळी सांस्कृतिक क्षेत्रातील पुरुषसत्तेविषयी बोलत होत्या. त्यांचेही पडसाद महाविद्यालयीन सांस्कृतिक व शैक्षणिक अवकाशात उमटत होते.

सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींच्या जोडीने अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रमांमधून एक संकरित आधुनिकता विकसित होत होती. वैश्विक आणि स्थानिक विचारविश्वे यांच्यात देवाणघेवाण होत होती. पाश्चात्त्य संघर्षात्मक साहित्याचे भारतीय अवकाशात अत्यंत आस्थेने वाचन आणि उपयोजन होत होते. हिंसा, युद्धे, कंगालीकरण, बकालीकरण, शोषण, वंश-जाती-वर्ग-लिंग भेदांच्या चर्चा सार्वत्रिक होत्या. पाश्चात्त्य विचारविश्वांचा अभ्यास करत असतानाच एतद्देशीय आधुनिक परंपरा कशा उभ्या करता येतील, याच्याही चर्चा त्या वेळेस होत होत्या. साहजिकच त्यातून केवळ लेखक, दिग्दर्शकच घडत होते असे नाही तर व्यापक दृष्टीचे वाचक आणि प्रेक्षकही घडत होते. कोण काम्यू? कोण ब्रेख्त? असे प्रश्न पडत नसण्याऱ्या तरुणाईचा तो कृती-काल होता.

९०च्या दशकात जागतिकीकरणाला सामोरे गेल्यानंतर सगळ्याच सामाजिक-वैचारिक चर्चांमधली गुंतागुंत वाढली. राजकारणही संख्याधारित होत गेल्याने राजकीय भूमिकांमध्ये संदिग्धता आली. भ्रष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे ताण, यात सुस्पष्ट भूमिका घेण्याची गरज वाटली, तरी ती नक्की कोणत्या स्थानावरून घ्यायची याबाबतीतले ताण वाढत गेले. अशा वेळेस राष्ट्रीयत्वाचा पाया विस्तारण्यापेक्षा संकोचत नेण्यातूनच ही स्पष्टता येते, असा जागतिक भ्रम तयार झाला. याचा परिणाम संपूर्ण सांस्कृतिक वातावरणावर झाला.

जास्तीचे वाचन करणारा, वैश्विक सर्जनशील कृती आपल्याशा करणारा, संवादाबद्दल, वेगळेपणाबद्दल असोशी असणारा वाचक आणि प्रेक्षक स्वत:चे आक्रसलेले परीघच अभिमानाने मिरवता झाला. जेव्हा राजकारण आणि विचारधारा समाज-मनाची पकड घेण्यास असमर्थ ठरतात, तेव्हा सर्जनशील लेखकाची जबाबदारी वाढते.

मुक्तासारख्या तरुण नाटककर्तीच्या लेखनाचे महत्त्व इथे अधोरेखित करता येईल. तिला स्वत:ला प्रस्थापित सामाजिक स्थानाचा लाभ होऊनही व्यापक आव्हानांचा विचार करणारी लेखिका म्हणून तिची दखल घेता येईल, कारण जीवन सुखकारक असेल तर सहसा संकुचित गर्वभूमी तयार करण्याचा मोह होऊ शकतो. अशा वेळेस स्वत:च्या भूमीवर उभे राहून जगाकडे कुतूहलाने बघण्याचे आणि अत्यंत भेदक प्रश्न विचारण्याचे काम तिच्या चारही एकांकिका करतात. ‘विपाशा’, ‘टिळा’, ‘रंग’ आणि ‘ऑस्कर’ या चार एकांकिकांमधून मुक्ताने परत एकदा संकरित आधुनिकतेच्या प्रकल्पाकडे पावले टाकली आहेत, असे म्हणता येईल. तीही लिंगभावाच्या स्थानावरून.

अमेरिकेतील वंशवाद आणि भारतातील जातीयता यांच्यातील दुवे शोधणारी वैश्विक मानसिकता, समलिंगी लेखकाला भोगाव्या लागणाऱ्या यातना आणि प्रेम हा शब्द संकोचत नेण्याच्या वेदना यांच्यातील साम्ये, ब्राह्मणी परंपरांमधील स्त्रीचे शोषण आणि वेश्या व्यवसायातील स्त्रीचे शोषण, यांची तुलना अशांसारखे विषय मुक्तासारख्या तरुण मुलीला आव्हानात्मक वाटतात हे आश्वासक आहे.

त्याचबरोबर नाटककर्ती म्हणून उभी राहताना “मी स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडले. पूर्वी आपल्याला इतकं छान वाक्य लिहिता आलं याचा आनंद व्हायचा. आता समोरच्या व्यक्तीवर मी सांगत असलेल्या गोष्टीचा काय परिणाम होईल, मला तो कसा घडवून आणायचा आहे, याचा विचार मी सतत करत राहते,” असे ती सांगते.

“मी अशा सामाजिक पार्श्वभूमीतून आले आहे जिथे थेट, स्पष्ट, भेदक न बोलता, आडून आडून, रूपकात्मक बोलण्याची शैली जास्त स्वीकारली जाते. कोलटकरांची ‘भिजकी वही’- त्यातली ‘विपाशा’- वाचली आणि माझ्यावरच्या भाषिक संस्कारांसमोर प्रश्नचिन्ह उभं राह्यलं. तितकी थेट भाषा रंगभूमीवर बोलायची का? ही भाषा समजू शकणाऱ्यांसाठीच नाटक लिहायचं की सर्व लोकांसाठी? नाटकातून बोध दिला गेला पाहिजे हे मान्य केलं तरी नाटकातून मनोरंजन झालंच पाहिजे तर मग भाषा कशी वापरायला हवी? शब्दांपलीकडे रंगभूमीचीही भाषा असते- नेपथ्य, इतर कलाप्रकार, वेषभूषा यांची भाषा कशी वापरायची? शब्दांची काटछाट कशी करायची? असे अनेक प्रश्न घेऊन मी त्यांची उत्तरं नाटकांमधून शोधते आहे.”

नाटके का लिहावीशी वाटतात याबद्दल बोलताना ती म्हणाली, “पूर्वी दूरदर्शनवरच्या मराठी मालिका मी बघायचे. त्यातले स्त्रियांचे चित्रण अतिशय अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे मग वेगळा विचार करणाऱ्या स्त्रिया निर्माण करण्याची आवश्यकता वाटली.”

‘विपाशा’ या तिच्या एकांकिकेची नायिका हायपेशिया ज्ञानाच्या भक्कम पायावर उभी असणारी स्त्री आहे. इ.स.पूर्व ३५०मध्ये जन्माला आलेली ही ग्रीक स्त्री गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ होती. प्लेटोचा वारसा सांगणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या शाखेची अभ्यासक होती. लग्न, मुलेबाळे या पारंपरिक स्त्री-धर्मामध्ये तिला रस नाही. पेगन संस्कृतीचा वारसा सांभाळणाऱ्या तत्त्ववेत्त्यांना खिश्चन धार्मिक संस्कृतीत भोगाव्या लागलेल्या यातनांचे लिंगभावी टोक म्हणजे हायपेशियाचा मृत्यू. स्त्री असूनही पारंपरिक स्त्रियांसारखी जगत नाही म्हणून संतापलेल्या पुरुषसत्तेने तिची हत्या केली. त्याची ही गोष्ट.

“पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून चालेलही, पण म्हणून बायकांचे स्तन आपण घेऊन फिरणार का?” हा प्रश्न धर्मगुरू त्याच्या शिष्याला विचारतो. हा खिश्चन धर्मगुरू मनुस्मृतीतील भाषा बोलतो – “कौमार्यात वडिलांकडे, नंतर भावाकडे, तारुण्यात नवऱ्याकडे आणि वार्धक्यात मुलाकडे जबाबदारी असते स्त्रीची. स्त्री कधीच स्वतंत्र नसते.” हायपेशियाची हत्या करावी असे सांगताना तो म्हणतो, “पुरुषासारखा पुरुष कायम ताब्यात ठेवतो स्त्रीला आणि एकदा समाज आपला म्हटला की, त्यातली प्रत्येक स्त्री आपलीच नाही का? तिच्यावर वर्चस्व राखता आलं पाहिजे आणि फारच दीड शहाणी असेल तर तिला संपवताही आलं पाहिजे”, असे तो सांगतो.

हायपेशिया आपल्या मासिक रक्तस्रावाने थबथबलेले वस्त्र तिला अडवणाऱ्या पुरुषाच्या हातात देत विचारते, “लढाईत सांडलेलं रक्त पवित्र म्हणतोस ना? मग हे माझ्या स्त्रीधर्माचं रक्त आहे. वयात आल्यापासून लढते आहे मी समाजाच्या नजरांशी. माझं कौमार्य अबाधित राखण्याची किंमत आहे हे रक्त.” मुक्ताची हायपेशिया अशी वैश्विक होते. पुरुषसत्तेला म्हणजेच हिंसेला, स्त्रियांवरील आणि ज्ञानावरील बंधनांना, क्रौर्याला ठामपणे प्रश्न विचारते.

‘ऑस्कर’ ही एकांकिका १९व्या शतकात ऑस्कर वाईल्ड या आयरिश नाटककाराला समलैंगिकतेसाठी भोगाव्या लागणाऱ्या तुरुंगवासाच्या चर्चेवर उभी राहते. एकांकिका फक्त ऑस्कर वाईल्डविषयी बोलत असली तरी तिचे धागे समलैंगिक संबंधांबरोबरच प्रेम म्हणजे काय या चर्चेशी जोडले आहेत. प्रेम ही संकल्पना संकोचणे म्हणजे माणूसपणाची कल्पना संकोचणे असा रोख या एकांकिकेचा आहे. वाईल्डच्या समलिंगी असण्याच्या आरोपांवर आधारित खटल्याची पाश्र्वभूमी मुक्ताने उचलली आहे. प्रत्यक्ष वाईल्डचे लेखन व त्यातील राजकारण, त्याची कलाविषयक भूमिका, त्याचा आयरिश वारसा या बारकाव्यांना बाजूला ठेवत प्रेमाची व्याख्या कशी करायची या कल्पनेभोवती ही एकांकिका फिरते. “इतक्या वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या नात्यांमध्ये प्रेम करता येतं तर कोणाला चूक म्हणायचं? ऑड समजायचं? आणि का?” असा प्रश्न ऑस्करच्या तोंडून ती विचारते तेव्हा हाच प्रश्न मग लव्ह-जिहादाच्या राजकारणालाही विचारता येतो.

‘रंग’ ही एकांकिका एकाच वेळेस स्पर्धात्मक जगण्याचे तकलुपी निकष आणि मग त्यांचे वंशवादाशी असणारे नाते, यावर भाष्य करते. भांडवली अर्थव्यवस्था विक्री-व्यवस्थेच्या आक्रमकतेवर विकसित होते. त्यात अनेक पूर्वग्रहांना खतपाणी घातले जाते आणि मग ते पक्के करण्यातून पैसा मिळवता येतो. या एकांकिकेची नायिका गौरी अत्यंत आक्रमकपणे गोऱ्या रंगासाठीचे क्रीम बाजारात यशस्वी करण्याची धडपड करते आहे. पण जेव्हा वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गरोदर राहताना गफलतीने ती कृष्णवर्णीय मुलाची आई होणार असे तिला समजते तेव्हा मग तिच्यापुढे प्रश्न उभा राहतो. ते मूल त्याच्या कृष्णवर्णीय आई-बापांकडे देऊन टाकायचे का? या उपायावर तिची मातृत्व भावना मात करताना मुक्ता दाखवते. हा निर्णय कॉट्झीच्या ‘लेगसी’मधील नायिकेच्या निर्णयाइतका संपूर्ण विवेकी सामाजिक भानातून घेतलेला नसला तरी जैविक प्रेरणा विवेकी बनवण्याकडे उचललेल हे पाऊल आहे असे म्हणता येईल.

‘टिळा’ ही अत्यंत कठोर प्रश्न विचारणारी एकांकिका आहे. ७०च्या दशकातील मूलगामी स्त्रीवाद्यांच्या संतापाचे प्रतिध्वनी इथे उमटतात. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आलेली विवाहित सुमन चक्कर येऊन पडते आणि कोठीवालीच्या हाती लागते. पण घरातून बाहेर पडल्यावरच सुमन प्रामाणिकपणे नवऱ्याच्या घरालाच प्रश्न करते, “मी तुम्हाला सोडून पळून गेले, कारण मला प्रेम हवं होतं थोडं, थोडा आदर, थोडं स्वातंत्र्य... हे पाळीचे दिवस परत अंग चोरून, लाजिरवाण्यासारखं, वांझ म्हणून हिणवलं जात, नव्हतं जगायचं मला. वेगळंच वाटलं आज. पाळी सुरू आहे म्हणून ना कोणी टोचून बोललं, ना कोणी बाजूला टाकलं. ज्यांना आपण असंस्कृत म्हणतो त्यांनी तुमच्यापेक्षा सुसंस्कृतपणे वागवलं हो मला!”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

विवाहसंस्थेतील स्त्रीत्वाचा अवमान आणि वेश्याव्यवसायातील स्त्रीचे निर्णय-स्वातंत्र्य असा विरोध मांडत एकांकिका पुढे जाते. वेश्या व्यवसाय करताना लग्नाची बायको व्हायचं अप्रूप वाटणाऱ्या सरलेला सुमन सांगते, “नव्याची नवलाई संपली की कोठीवरचा व्यवहार असो वा घर, फार नाही फरक उरत.” म्हणूनच स्वत:ला आवडेल त्याच पुरुषाबरोबर झोपणारी अमिरा तिला आवडते.

मुक्ताने लिहिलेल्या या चारीही एकांकिकांमध्ये तरुण मुलीला पडणारे प्रश्न प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे मांडले आहेत. स्त्रीच्या स्थानावरून प्रश्न मांडत असताना तिला व्यवस्थेचे भान आहे. पुरुषी मूल्यांनी बनलेली व्यवस्था पारंपरिक पूर्वग्रह बळकट करत नेते, तसेच पुरुषसत्ता ही राजकीय सत्ता आणि धर्मसत्ता यांच्यातून बळ मिळवते अशी मांडणी ती करताना दिसते.

२१व्या शतकाच्या या टप्प्यावर सर्व प्रकारच्या सत्ताकारणाला नव्याने प्रश्न विचारण्याची गरज आहे. कोणत्याही एका विचारधारेतून सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीत हे उघड आहे. पण तरुण मने संकुचित विचारांमध्ये बंदिस्त करणे, त्यांना प्रश्न विचारण्याची खुली संस्कृती नाकारणे हा धोका आज सर्वत्र जाणवतो आहे. कोंडली गेलेली मने मग विस्कटतात, विकृत विचारांचा आधार घेतात. पर्यावरणीय समस्या जटिल होत असताना आणि विषमतेची दरी रुंदावत असताना हिंसात्मक धारणा प्रबळ होत जातात. हे विस्कटलेपण सावरायचे तर विवेकाचा आधार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुण मुलींनी जास्तीत जास्त प्रश्न विचारायला हवेत आणि त्यांची विवेकी उत्तरे मिळवण्याचा आग्रहही धरला पाहिजे. थेट प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य घेणाऱ्या मुक्ताच्या एकांकिका भविष्यात अधिकाधिक सक्षमतेने ही परंपरा पुढे नेतील, अशी आशा आहे.

(‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’मधून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vishnu Date

Thu , 09 June 2022

ह्या २१व्या शतकातही स्त्रीयांचे प्रश्न सुटत नाहीत! म्हणूनच ह्या एकांकीका महत्वाच्या आहेत!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......