‘दास्तांगोई’ म्हणजे लांबलचक कथा सादर करणे. किस्से थांबतात, संपतात. दास्तांगोई मात्र सुरूच राहते. तीत स्वल्पविराम येतो, पूर्णविराम नाही
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अक्षय शिंपी
  • ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ या कार्यक्रमाचं एक पोस्टर व त्याची काही छायाचित्रं
  • Mon , 31 January 2022
  • कला-संस्कृती चलत्-चित्र दास्तान-ए-बड़ी बांका दास्तांगोई अक्षय शिंपी

‘दास्तांए’ हा शब्द आपण अनेक हिंदी गीतांतून ऐकला आहे. याचा अर्थ होतो ‘गोष्टी’, ‘कथा’, ‘किस्से’. आणि ‘गोई’ म्हणजे त्या ‘सांगणे’ किंवा ‘सादर करणे’. जो गोष्ट सांगतो किंवा सादर करतो, त्याला ‘दास्तांगो’ म्हणतात. ‘दास्तांगोई’ म्हणजे कथा सांगणे किंवा सादर करणे. दास्तांगोई म्हणजे लांबलचक कथा सांगणे/सादर करणे. किस्से थांबतात, संपतात. दास्तांगोई मात्र सुरूच राहते. तीत स्वल्पविराम येतो, पूर्णविराम नाही.

हा कलाप्रकार पर्शियातून भारतात आला. भारतात मुघल सत्ता असताना हा कलाप्रकार बहरला, वाढला. अकबराच्या काळात ही कला भरभराटीला आली. दास्तांगोई हा दरबारी कलाप्रकार. नवाब, राजे, सम्राट यांच्यासाठी प्रामुख्याने तो खेळला जाई. अर्थातच दास्तांगो पुरुषच असत. महिलांना दास्तांगोई सादर करायला मनाई होती. म्हणूनच हा कलाप्रकार पुरुषी होता. 

उर्दूत अलिफ़ लैला, हातीमताई वगैरे दास्तान सादर केल्या जात. परंतु, ‘दास्तान-ए-अमीर हम्जा’ ही सर्वांत लोकप्रिय दास्तान होती. अजूनही आहे. ज्यात हज़रत मुहम्मद काका ‘अमीर हम्जा’ यांच्या पराक्रमांची वर्णनं आहेत.  

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

याची सुरुवात इराणमध्ये आठव्या-नवव्या शतकांत झाली असं मानतात. आधीच उल्लेख केल्यानुसार मुघल काळात हा कलाप्रकार भारतात रूजला, परंतु या कलाप्रकाराला नवे आयाम मिळाले ते १९ व्या शतकात. लखनौमध्ये. तिथं पहिल्यांदा अमीर हम्जाच्या पराक्रमांच्या कथांचं भारतीयकरण झालं. इराणमधून आलेल्या दास्तानमध्ये केवळ ‘रज़्म’ (युद्धवर्णने) आणि ‘बज़्म’ (मैफिल) हे दोनच घटक होते. त्यात ‘अय्यारी’ (चलाखी, चतुरपणा) आणि ‘तिलिस्म’ (जादू) हे आणखी दोन घटक जोडले गेले. जे दास्तान-ए-अमीर हम्जाचे पुढे प्राणतत्त्व ठरले. अभ्यासकांच्या मते, दास्तानमध्ये वरील चार घटक किंवा यापैकी एखादा घटक असणं आवश्यक आहे. तरच ती परिपूर्ण दास्तान म्हणता येईल. 

अमीर हम्जाच्या दास्तान लखनौमध्ये येण्यापूर्वी फारसीत लपलेल्या विदेशी गोष्टी होत्या. ज्या सामान्य लोकांसाठी अनाकलनीय होत्या. लखनौत त्या ‘अय्यारी’ आणि ‘तिलिस्म’च्या जोडीनं सादर झाल्या, तेव्हा सामान्य लोकांवर त्यांचा गहिरा परिणाम झाला. त्याचप्रमाणे उर्दूतील हिंदुस्थानी अंदाज, वाक्प्रचार, म्हणी या भाषिक खेळांनी सामान्यजनांना मंत्रमुग्ध केलं. 

लखनौमध्ये त्या वेळी मुहम्मद हुसैन जाह, अहमद हुसैन कमर, मीर अहमद अली, अम्बा प्रसाद रसा, तशद्दुक हुसैन आणि हकीम असगर अली खान असे देशभर प्रसिद्ध असलेले दास्तांगो होते. लखनौमध्येच दास्तान-ए-अमीर हम्जाला ‘तिलिस्मे होशरुबा’चा किस्सा जोडला गेला. त्याचं कथानक इतकं थरारक आहे की, प्रेक्षक/श्रोते स्वतःच त्याचा प्रत्यक्ष हिस्सा असल्याचा अनुभव घेतात. 

यात अमीर हम्जाचा मुकाबला जादूगारांचा सम्राट अफ़रासियाब याच्याशी आहे. त्याची साठ हजार जादूगार गुलामी करतात. हे कथानक दोन पातळ्यांवर घडतं. दृश्य जादूची पातळी आणि अदृश्य जादूची पातळी. या दोहोंतून रक्ताची नदी वाहते. जिचं नाव आहे ‘खून-ए-रवां’. ज्या नदीवर धुक्याचा पूल असून त्याच्या मधोमध दोन अजस्त्र वाघ उभे आहेत आणि त्यांच्यावर एक भली मोठी हवेली तोलली गेलेली आहे. त्या हवेलीच्या पहिल्या मजल्यावर पऱ्या पावा वाजवत आहेत. दुसऱ्या मजल्यावरच्या पऱ्या नदीत मोती फेकत आहेत आणि नदीतल्या मासोळ्या ते मोती आपल्या तोंडात झेलत आहेत. तर तिसऱ्या मजल्यावर घनघोर युद्ध पेटलं आहे. तिसऱ्या मजल्यावरचे सैनिक/गारदी आपापसांत लढत आहेत आणि त्यांच्या रक्ताचे पाट खालच्या नदीच्या पाण्यात मिसळत आहेत. म्हणूनच या नदीचं नाव ‘खून-ए-रवां’ असं आहे. या कथानकावरून दास्तांगोईतील कथानकांचा पोत आणि विस्तार ध्यानी येईल.

दास्तांगोई ही मौखिक परंपरा आहे. दास्तान सांगितल्या/सादर केल्या जात आणि श्रोते/प्रेक्षक त्या ऐकत, बघत. त्या कागदावर उतरल्या नव्हत्या. परंतु, मुन्शी नवल किशोर यांनी दास्तान-ए-अमीर हम्जा उर्दूत छापण्याचा विचार आणि निर्धार केला. तेव्हा ही दास्तान केवळ एकाच खंडात उपलब्ध होती. जी १८५५मध्ये कलकत्त्यातील फोर्ट विल्यम कॉलेजकडून प्रसिद्ध केली गेली होती. नवल किशोर प्रेसकडून जेव्हा ही संपूर्ण दास्तान प्रसिद्ध करण्याचा घाट घातला गेला, तेव्हा ती लेखनाची जबाबदारी मुहम्मद हुसैन जाह यांच्याकडे आली. नंतर अहमद हुसैन कमर आणि इतर दास्तांगोंनीही आपापली भागीदारी नोंदवली. 

१८८१मध्ये जेव्हा नवल किशोर प्रेसमध्ये दास्तान-ए-अमीर हम्जा छापण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, तेव्हापासून ते १९१० पर्यंत छपाई होत राहिली. ही दास्तान ४६ खंडांपर्यंत आली आणि प्रत्येक खंडांत १००० पृष्ठे होती. अशा तऱ्हेनं नवल किशोर प्रेसची दास्तांगोई ही जगातील सर्वांत लांबलचक दास्तान ठरली. जी ४६,००० पृष्ठांची आहे. यात अमीर हम्जाचा सर्वांत लोकप्रिय किस्सा - तिलिस्मे होशरूबा - सात खंडांत व्यापला आहे.

भारतातील शेवटचे प्रसिद्ध दास्तांगो मीर बाकर अली यांचं १९२८मध्ये दिल्लीत निधन झाल्यानंतर दास्तांगोई खेळण्याची परंपरा संपूर्णपणे खंडीत झाली. २००५मध्ये महमूद फ़ारूखी यांनी प्रसिद्ध उर्दू शायर, कादंबरीकार, समीक्षक शम्सुर्रहमान फ़ारूखी यांच्याकडून दास्तांगोईची तालीम घेत उर्दूत त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि दास्तांगोईचा लुप्त झालेला प्रवाह पुन्हा वाहता केला. ही आधुनिक दास्तांगोई आहे. नंतर अनेक कलावंत/सादरकर्ते दास्तांगोईशी जोडले गेले.

आता केवळ अमीर हम्जाचीच दास्तान न सांगता समकालीन विषयांवर दास्तान बांधल्या आणि सादर होऊ लागल्या. दास्तांगोईतून केवळ करमणूक न साधता तीतून थेट सामाजिक-राजकीय विधान दास्तांगोंकडून केलं जाऊ लागलं. दास्तांगोई पूर्वी रात्रभर खेळल्या जायच्या आता आधुनिक अवतारात त्या काही तासांवर आल्या, पण परिणाम न उणावता. 

राजा विक्रमाची प्रेमकथा, ‘दास्तान-ए-मंटोईयत’, विनायक सेन यांच्या अलोकतांत्रिक अटकेवर आधारित ‘दास्तान-ए-सेडिशन’, फाळणीवर आधारित ‘दास्तान-ए-तकसीम-ए-हिंद’, प्रसिद्ध लेखक विजयदान देथा यांच्या कथेवर आधारित ‘दास्तान-ए-चौबुली’, एलिस अँड वंडरलँडवर आधारित ‘दास्तान-ए-एलिस’, अशा दास्तान लोकप्रिय झाल्या. 

महमूद फ़ारूखी यांचे शिष्य अंकित चड्ढा याने दास्तांगोईत विविध प्रयोग केले. ते भारतातातले प्रसिद्ध आणि प्रयोगशील दास्तांगो होते. अमीर ख़ुसरोची दास्तान, कबीराची दास्तान, गांधींच्या मृत्यूविषयक विचारांवर आधारित प्रार्थना या दास्तान अतिशय लोकप्रिय ठरल्या. त्याचसोबत लहान मुलांपर्यंतही दास्तांगोई पोचवली, हे त्यांचं विशेष योगदान आहे. आधुनिक दास्तांगोई उर्दूसोबतच गुजराती, बंगाली या भाषांतही पोचली.

आम्ही ती मराठीत आणली. मराठीत माझ्यासोबत धनश्री खंडकर ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ आणि नेहा कुलकर्णी यांच्यासोबत ‘दास्तान-ए-रामजी’ या दास्तांगोई सादर केल्या जात आहेत. मराठीतली पहिली दास्तांगोई ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ ही मुंबई शहरावरील दास्तांगोई आहे. मुंबईची विविध रूपं, मुंबईची गती, मुंबईतलं जगणं, माणसांचं जगणं तीतून उलगडलं जातं. तर ‘दास्तान-ए-रामजी’मधून जन्म-मृत्यू या दोन शाश्वत घटनांबद्दल बोललं जातं. 

दास्तांगोई शैली मराठीत आणताना उर्दू कलाप्रकार आणि मराठी लोकपरंपरा व साहित्य यांचं ‘फ्युजन’ केलं गेलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यातील साम्यस्थळं दाखवायची झाली, तर साहित्य आणि संगीत यांचा उल्लेख करता येईल. दास्तांगोईचे हे मूलभूत घटक. मराठी परंपरेत ओवी, साकी, दिंडी आणि अन्य वृत्त-छंदातल्या रचना, लोककथा मुबलक मौजूद आहेत. उर्दू दास्तांगोईत विषयानुरूप शेरोशायरी दास्तांगोंकडून ऐकवली जाते. मराठीत आम्ही विषयानुसार लोकपरंपरेतील गीतं, कविता सादर करतो. तद्वतच मराठी परंपरेला महिलांनी गोष्टी सांगणं नवं नाही. आपला पिंड पोसला गेला, तो आई-आजींकडून ऐकल्या गेलेल्या गोष्टींवर. त्यामुळे मराठी दास्तांगोईत महिला दास्तांगो असणं हे नवं नाही. परंतु, इथं महिला दास्तांगो केवळ महिलांचंच पात्र वठवते असं नाही. ती पुरुष आणि तृतीय लिंगाचंही पात्रं बेमालूमपणे वठवते. दोन दास्तांगो असले तरी अंतिमत: एकच दास्तांगो सादरीकरण करतो आहे, हा परिणाम साधला जाणं अपेक्षित आहे. दास्तांगोई लिंग ओलांडून पलीकडे जाते. ‘जेंडर बायसनेस’ला इथं थारा नाही. 

दास्तांगोईत बाह्य साधनांच्या वापराला मनाई आहे. उदाहरणार्थ कुठल्याही पद्धतीची विशेष रंगभूषा, वाद्य, विशेष प्रकाशयोजना वापरता येत नाही. अगदी रंगमंचाचीही अट नाही. दास्तांगो आपला ‘आवाज’ आणि ‘शरीर’ ही हत्यारं वापरून प्रेक्षकांसमोर अवकाश निर्माण करतो. गायली जाणारी गाणी हे टाळ्या, चुटक्या आदींच्याच तालावर गायली जातात. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

चित्रपट-नाटक बघत असता त्यातल्या इतर अनेक घटकांकडे आपली नजर स्वाभाविकपणे जाते. नेपथ्य, वेशभूषा, संगीत, छायालेखन, अभिनय, यांत गुंतून एकत्रित परिणाम हरवण्याची शक्यता अधिक असते. दास्तांगोईत नखशिखान्त पांढरे कपडे घालून, वज्रासनात बसून दास्तांगो सादरीकरण करत असतात. इथं अन्य कुठल्याही रंगाला मज्जाव आहे. 

कमीत कमी (जवळपास शून्य) साधनाच्या साहाय्यानं हा कलाप्रकार सादर केला जातो. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची शतप्रतिशत जिम्मेदारी ही दास्तांगोंची असते. इथं त्यांच्या अभिनयकौशल्याचा कस लागतो. 

मराठी भाषा ही कायम लवचीक आणि स्वागतशील राहिलेली आहे. इतर भाषांतले शब्द, कलाप्रकार तिनं सहजपणे सामावून घेतले. त्यामुळेच तिचा प्रवाह समृद्ध होत ताकदीनं वाहत राहिला. उर्दूतील गज़लेचं सुरेश भटांनी मराठीत लावलेलं रोप बहरतंय. दास्तांगोईही मराठीत स्वीकारली जाईल आणि बहरेल, अशी आशा आहे.

.................................................................................................................................................................

लेखक अक्षय शिंपी अभिनेता, कवी आणि ‘दास्तांगो’ आहेत.

akshayshimpi51@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......