‘स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी’ : ही वेबसिरीज पहाच, पण आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवत....
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुहास किर्लोस्कर
  • ‘स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसिरीजची पोस्टर्स
  • Sat , 31 October 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी Scam 1992 : The Harshad Mehta Story

‘स्कॅम १९९२ – द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसिरीज सोनी लाइव्ह चॅनेलवर नुकतीच प्रदर्शित झाली आहे. १० भागांची ही वेबसिरीज घोटाळ्याचे तपशील, बँकिंग सिस्टीममधील बारकावे, शेअर मार्केट – मनी मार्केट व्यवहारातल्या खाचाखोचा, कलाकारांचा उत्तम अभिनय यासाठी बघण्यासारखी आहे. परंतु दिग्दर्शकाने ही कथा हर्षद मेहताच्या बाजूने सांगितली आहे. त्यामुळे प्रेक्षक या नात्याने सजग राहणे आपले कर्तव्य ठरते. अन्यथा ‘गरीब बिचाऱ्या हर्षदला, सगळे टपले छळण्याला’ या दिग्दर्शकाच्या प्रयत्नात आपण फसण्याची शक्यता आहे.

हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल आणि देबशिष बासू यांनी लिहिलेल्या ‘द स्कॅम’ या पुस्तकावर आधारित या वेबसिरीजमध्ये आर्थिक घोटाळयातील अनेक बारकावे आपल्याला समजतात. याचे श्रेय पुस्तकाच्या लेखक द्वयीला आहे. त्याचबरोबर हा घोटाळा सोप्या शब्दांत प्रेक्षकांना समजावून सांगणाऱ्या पटकथालेखकांना म्हणजेच सौरव डे, सुमित पुरोहित, वैभव विशाल, करण व्यास यांनाही जाते. गुजराती म्हणी\वाक्प्रचार, चटकदार संवाद, हर्षदच्या तोंडी जाणीवपूर्वक पेरलेले गुन्हेगारीला ‘ग्लोरिफाय’ करणारे संवाद उत्तमरीत्या लिहिले गेले आहेत. 

१९९०च्या पूर्वी भारत नुकताच बदलत होता. बजाज स्कूटर खरेदी करण्यासाठी अनेक महिने वाट बघावी लागत होती. सर्वसामान्य माणूस या वाट बघण्याला कंटाळला होता. सरकारी लाल फितीच्या कारभाराची नियंत्रणे हळूहळू सैल होऊ लागली होती, अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली होऊ लागली आणि याच वेळी स्पर्धाही प्रखर होऊ लागली. 

नेमक्या याच काळात ‘रिस्क है तो इश्क है’ असा मंत्र घेऊन सर्वसामान्य हर्षद मेहताने यंत्रणेमधले धागेदोरे आणि लागेबांधे समजून घेतले. पाया भक्कम करण्यात फारसा वेळ न दवडता उंच उंच इमले बांधू पाहणाऱ्या हर्षदचे स्वप्न येनकेन प्रकारेण ‘दुनिया मुठ्ठी में’ करणे हेच होते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

हर्षद झटपट श्रीमंत होत असताना अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फटका बसला, आत्महत्या करावी लागली, नैराश्य आले, परंतु त्यांच्या कहाण्या त्यांच्या बाजूने दाखवणारे कोणी नाही, हे आपले दुर्दैव! जगभरात अनेक बँकांचे घोटाळे झाले. त्यात अनेक बँकांचे उच्चपदस्थ लाखो-करोडो रुपयांचा बोनस घेऊन सुटले, परंतु सर्वसामान्य माणूस भरडला गेला. अशा घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी अर्थव्यवस्था आणि बँकिंग सिस्टीमची माहिती असावी लागते.

हर्षद घोटाळा प्रकरण सुचेता दलाल यांच्याकडे चालत आले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या सुचेता दलाल यांनी या घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन तपास करण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फलस्वरूप म्हणजे ‘द स्कॅम’ हे पुस्तक आणि ही वेबसिरीज. परंतु या वेबसिरीजमध्ये शेवटच्या काही भागात हर्षदला सहानुभूती मिळावी, या दृष्टीने सुचेता दलाल यांनाच कसे अपराधी वाटत होते, यावर भर दिला गेला आहे आणि हर्षदच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती बाळगली जाईल असे प्रसंग दाखवले आहेत.

कमीत कमी वेळेत गर्भश्रीमंत होण्याची स्वप्ने बघणाऱ्या हर्षदने कोणत्याही ठोस तारणाशिवाय एकावर एक कर्जे कशी मिळवली, हे आपण बघतो, परंतु त्या बँक कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी कोणता चारा दिला, याचे स्पष्ट पुरावे नजरेआड होतील, अशी व्यवस्था केल्याचे स्पष्टपणे जाणवते.  हर्षदचा भाऊ अश्विन, हर्षदला नेहमी सावध करताना तसे प्रश्न विचारताना दिसतो आणि हर्षद उडवाउडवीची उत्तरे देताना आपण बघतो, परंतु फार कष्ट न घेता झटपट श्रीमंत झाल्याबद्दल कोणीच त्याला जाब विचारत नाही, याचे आश्चर्य वाटते.       

बँक रिसीट म्हणजे काय, मनी मार्केट म्हणजे काय, त्याचे व्यवहार कसे होतात, त्यामधील कमकुवत दुव्यांचा गैरफायदा घेत हर्षदने पैसा कसा कमावला, हे अर्थव्यवस्थेचा अभ्यासक या नात्याने बघणे औत्सुक्याचे आहे. कोणत्याही तारणाअभावी स्टेट बँकेने आणि एकूणच भारतीय बँकींग यंत्रणेने हर्षदचे कसे लाड केले, हे आपण बघतो. परंतु स्टेट बँक, युटीआय, रिझर्व बँक, सेबी यांसारख्या अनेक संस्था काहीही ठोस तपास करू शकल्या नाहीत आणि त्या सगळ्यांना हर्षद पुरून उरला. यामागे नेमके कोण होते हे सिरीजमध्ये गुलदस्त्यात राहते. कारण अनेक प्रकरणांचा तपास अजूनही चालूच आहे, असं म्हणतात. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हर्षदव्यतिरिक्त इतर व्यक्तिरेखा दाखवताना त्या खलनायकी ढंगाने दाखवण्याची पुरेपूर तजवीज करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. एकेक पात्र खुलवत ही वेबसिरीज अशा पद्धतीने पुढे नेली आहे की, आपण हर्षद सोडून इतर सर्वांकडे खलनायकाच्या दृष्टिकोनातून बघतो. हंसल मेहता आणि जय मेहता या दिग्दर्शकांनी तटस्थ दृष्टिकोन ठेवला असता तर ही वेबसिरीज उच्च दर्जाची होऊ शकली असती.       

श्रेया धन्वंतरीने साकारलेली सुचेता दलाल, रजत कपूरचा सीबीआय अधिकारी, अनंत महादेवन यांनी साकारलेला हताश रिझर्व बँक गव्हर्नर, के. के. रैना (फेरवानी), सतीश कौशिक (मंजू मुंद्रा) अशा अनेक कलाकारांनी उत्तम केल्या आहेत, ही जमेची बाजू. प्रतीक गांधी यांनी हर्षदसारखे वावरण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अभिनय–आवाज यांमध्ये वैविध्य आणले असते तर त्या व्यक्तिरेखेला न्याय देता असता, कारण त्या भूमिकेला बऱ्याच वर्षांचा कालावधी मिळालेला आहे.

पहिल्या नऊ एपिसोडमध्ये तरुण दिसणाऱ्या हर्षदचे वय दहाव्या एपिसोडमध्ये अचानक वाढते, त्याला स्वतःच्या तब्येतीची काळजी वाटू लागते, हे पटण्यासारखे नाही. अचिंत ठक्कर यांनी संगीत दिग्दर्शक या नात्याने उत्तम कामगिरी विचारपूर्वक करताना प्रत्येक एपिसोडचा शेवट त्या काळातील गाजलेल्या गाण्यांचा यथोचित अर्थपूर्ण संदर्भ दिला आहे. सुमित पुरोहित यांचे संकलन वाखाणण्यासारखे आहे. काही प्रसंग असे जोडले आहेत की, तिथेच आपल्या तोंडून ‘क्या बात है’ अशी दाद येते. 

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटात नसिरुद्दीन शाहच्या तोंडी एक वाक्य आहे. ते महत्त्वाचे आहे - “सच क्या है? हर एक का अपना अपना व्हर्जन है?” अलीकडे प्रोपगंडा सिनेमे/वेबसिरीज आणि बायोग्राफी यांचे पेव फुटलेले दिसते, ज्यामध्ये कोणतीही घटना ग्लोरिफाय करून दाखवताना दिग्दर्शकाने स्वतःचे मत आधीच बनवलेले असते आणि प्रेक्षकांनी तसे मत बनवावे, अशी निर्माता-दिग्दर्शक यांची इच्छा असते. उदा. संजूबाबा कसा निरागस होता, आपण कसा सर्जिकल स्ट्राईक प्रथमच केला, वगैरे. 

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अशा चरित्रात्मक सिनेमामध्ये तौलनिक अभ्यास न करता कोणाची जाहिरात करायची आहे, याचे नियोजन आधीच केलेले असते आणि प्रेक्षकांच्या माथी काय मारायचे हे ठरवलेले असते. ‘स्कॅम १९९२’ ही वेबसिरीज याच पठडीमधली आहे. चरित्रपट करताना कोणत्याही व्यक्तीचे मूल्यमापन करताना कोणाचेही भक्त न होता आपण त्याला गुण दोषांसकट तटस्थ वृत्तीने बघायला आपण कधी शिकणार?   

हर्षदने बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि एकूणच सिस्टीममधील पळवाटांचा फायदा घेऊन लुटले, ज्यामध्ये अनेक छोटे-मोठे गुंतवणूकदार लुटले गेले, काहींचा फायदा झाला, परंतु अनेक जण आयुष्यातून उठले. याचे चित्रण करताना दिग्दर्शकाने हर्षद मेहता या गैरव्यवहार करणाऱ्या गुन्हेगारामधील माणूस शोधण्याचा प्रयत्न करताना त्याला महान करण्याचे आधीच ठरवल्याचे पदोपदी जाणवते. त्यामुळे ही वेबसिरीज बघताना आपण आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवण्याचे भान राखायला हवे. 

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......