'नटले तुमच्यासाठी' : शृंगारिक लावणीची दिलखेचक अदा
कला-संस्कृती - चलत्-चित्र
संदेश मुकुंद कुडतरकर
  • ‘नटले तुमच्यासाठी’ या कार्यक्रमातील एक अदा
  • Sat , 21 January 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र नटले तुमच्यासाठी Natale Tumchya sathi भूषण कोरगावकर Bhushan Korgaonkar

'काली बिल्ली' प्रॉडक्शन्स निर्मित, भूषण कोरगांवकर लिखित आणि सावित्री मेधातूल दिग्दर्शित 'नटले तुमच्यासाठी' हा लावणीचा छोटेखानी कार्यक्रम म्हणजे 'संगीत बारी'ची एक झलक आहे. प्रत्यक्ष ‘संगीत बारी’ पाहायचा योग येईल तेव्हा येईल, तोवर दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी गेलो होतो. 'संगीत बारी'च्या अभ्यासाच्या निमित्ताने आलेल्या अनुभवांचं कथन सावित्री आणि भूषण करत असताना त्याला मिळालेली लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर आणि आकांक्षा कदम यांच्या नृत्याविष्काराची जोड हा अभूतपूर्व अनुभव होता. साजेशी प्रकाश योजना आणि संगीत यांच्या साथीने तर जणू इंद्राचा स्वर्गलोकच पृथ्वीवर अवतरल्याचा आभास निर्माण केला होता. या ट्रेलरमुळे तर 'संगीत बारी' पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भूषण आणि सावित्रीने निवेदनातून मोहनाबाईंच्या सहवासातल्या अनुभवांचे जे मिश्किल किस्से सांगितले, त्यामुळे हसून हसून पुरेवाट झाली. फडातली लावणी आणि संगीत बारी यांतला फरक त्यांनी नेमकेपणे उलगडून दाखवला. केवळ एवढ्यावरच न थांबता, लावण्यांमधील विविध विषयांवरही त्यांनी भाष्य केलं. नटांचे, नर्तिकांचे, थिएटर मालकांचे, प्रेक्षकांचे उदगार तर अगदी अंतःकरणातलं सत्य उलगडून दाखवणारे. देशात धर्माचं राजकारण चालू असताना मस्तानीची वंशावळ पुढे चालवणाऱ्या या मुस्लीम स्त्रिया मंदिरात जातात, गौरी-गणपतीचा सण साजरा करतात, तेव्हा सर्वधर्मसमभाव यांनाच नीट कळल्याचं समजतं. सर्व सामाजिक स्तरांतले त्यांचे प्रेक्षक पाहिले की, हरिवंशराय बच्चनजींच्या मधुशालेची आठवण झाल्यावाचून राहत नाही… "रंक राव में भेद हुआ है कभी नहीं मदिरालय में, साम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला..." 'प्रेक्षकांतल्या प्रत्येक पुरुषाला जेव्हा असं वाटेल की, स्टेजवर नाचणारी बाई फक्त आपल्यासाठी नाचतेय, तेव्हा ती खरी लावणी', अशा शब्दांतून मोहनाबाई व्यक्त होतात, तेव्हा शकुंतलाबाईंच्या खल्लास करणाऱ्या अदांचं गूज कळतं.

बाईंच्या नृत्याचं वर्णन तरी काय करावं! डोळ्यांचे, भुवयांचे विभ्रम, ओठांना मध्येच घातलेली मुरड, हातांच्या हालचाली या एवढ्यावरच बाई एक अख्खं साम्राज्य उभं करतात! खरं तर खच्ची करतात असंच म्हणायला हवं. प्रेक्षकांमधल्या विश्वामित्रांची विकेट न पडली तरच नवल. बाई मध्येच कुणाकडे तरी घायाळ नजरेनं पाहत, क्षणात नजरेनं इशारा करत, 'तुम्ही नाही, तुमच्या मागे बसलेले' असं म्हणतात, तेव्हा प्रेक्षकांतून हास्याची एकच लाट फुटते. देहबोलीतून बाई एका ब्राह्मणाची सर्व दिनचर्या अगदी सगळ्या बारीकसारीक तपशीलांसकट ज्या विनोदी पद्धतीनं साकार करतात, त्याला तोड नाही. आकांक्षा कदमनेही बाईंना तितकीच दमदार साथ दिली आहे. शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात 'वन्स मोअर'ची दाद मिळत असतानाच या रंगलेल्या मैफिलीची सांगता होते, तेव्हा एक अनामिक चुटपूट लागून राहते. स्त्रीदेहात जागोजागी ईश्वरानं पेरलेलं शृंगारिक काव्य अनुभवण्यासाठी हा कार्यक्रम प्रत्येक रसिकानं एकदा तरी पाहायलाच हवा.

लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.

msgsandesa@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध)

जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते.......