वसंत देसाई : संगीत परंपरेत राहून प्रयोग करणारा विरळा संगीतकार!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अनिल गोविलकर
  • वसंत देसाई
  • Sat , 26 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 गायक-संगीतकार Singer-Musician वसंत देसाई Vasant Desai

बरेचसे संगीतकार हिंदी चित्रपटांपुरतं किंवा हिंदी भाषिक गीतांपुरतं आपलं अस्तित्व ठेवतात. यात अगदी इतर भाषिक संगीतकार- जसं बंगाली, मराठी, पंजाबी, दक्षिण भारतीय संगीतकार (जे प्रामुख्यानं हिंदी चित्रपटांसाठीच स्वररचना करत होते) यांनी आपली  कारकीर्द हिंदी चित्रपटाभोवतीच साकार केली. अर्थात ही त्यांची मर्यादा असं म्हणता येणार नाही, पण त्यांनी हिंदी चित्रपट हेच आपलं ध्येय ठेवलं. याला एक सणसणीत अपवाद म्हणून वसंत देसाई यांचं नाव घ्यावं लागेल.

कोकणपट्टीतील सावंतवाडी जवळील सोनवड गावी देसाई यांचा जन्म झाला. हा तपशील जरा महत्त्वाचा म्हणायला लागेल, कारण हा परिसर धर्म आणि लोकसंगीतासाठी गाजलेला आहे. याचा प्रभाव आणि परिणाम देसाई यांच्यावर नक्कीच झाला असणार. त्यांच्या नंतरच्या कारकिर्दीचा बारकाईनं आढावा घेतला तर या मताला पुष्टी मिळते.

देसाई यांना संगीतात लहानपणापासून अतोनात रस असल्यानं उस्ताद इनायत खान आणि डागर बंधू यांच्याकडून त्यांनी शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतली. त्यांच्या स्वररचनेवर रागसंगीताचा फार प्रभाव आहे, याचं मूळ इथं सापडतं. पुढे त्यांना तरुण वयात प्रभात कंपनीत, गोविंदराव टेबे यांच्या हातखाली सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ते प्रभातमध्ये स्थिरावले. इथं त्यांना व्ही. शांताराम भेटले. नंतर व्ही. शांतारामांनी प्रभातपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला, तेव्हा वसंत देसाई यांना भरपूर संधी मिळाल्या. या दोघांना प्रभातचा वारसा मिळाला होता, हे मुद्दामहून ध्यानात ठेवावं लागेल. समान विचार आणि ध्येयं यांचा परिणाम दोघांच्याही कामात दिसला. राजकमलबरोबर त्यांनी दीर्घकाळ काम केलं.

वास्तववादी चित्रपटनिर्मितीत ज्याचा उद्भव होतो, त्या संगीतावर भर असल्यानं विविध आणि वास्तव ध्वनी-उगम वापरण्यावर देसाई यांचा कटाक्ष होता. उदा., ‘दो आँखे बारा हाथ’ या चित्रपटातील ‘सैय्या झुठो का बडा सरताज निकला’ या गाण्यात ‘रावणहथ्था’ या लोकवाद्याचा समर्पक उपयोग केला आहे! तसंच या चित्रपटातील ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या गीतात योजलेला लयबंध वाऱ्यानं उघडझाप करणाऱ्या खिडकीतून पुरवला जातो.

देसाई यांच्या रचनांत थोडाफार नाट्यगीतांचा गंध राहिला. याशिवाय असं जाणवतं की, पारंपरिक संगीत चलन आणि चाली यांच्या अंगभूत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्यानं त्या जशाच्या तशा व परिणामकारकतेनं वापरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. याचाही संबंध मराठी नाट्यसंगीताशी असलेल्या त्यांच्या जवळच्या नात्याचा असावा. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो, असा मराठी नाट्यसंगीत परंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो. या परंपरेचा आणि देसाई यांचाही कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भरवसा नव्हता. उदा., ‘दिल का खिलौना हाये टूट गया’ (भैरवी), ‘बोल रे पपीहरा’ ही गाणी ऐकावीत.

तसंच ‘गुड्डी’ या चित्रपटातील ‘हमको मन की शक्ती देना’ या प्रार्थना गीताला केदार या शांत-गंभीर रागाचा आधार आहे, पण रागविस्ताराची अपेक्षा निर्माण होऊ नये, अशी खबरदारी चालीच्या चलनातून घेतली आहे. या उलट ‘बोल रे पपीहरा’ ही शास्त्रोक्त चीज त्रितालाऐवजी केहेरवासारख्या तालात बांधून जरा हलकीफुलकी केली आहे. याचाच वेगळा अर्थ असा घेता येतो की, परंपरेत राहून प्रयोग करण्याकडे देसाई यांचा कल होता.

‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील ‘नैन सो नैन’ या गाण्यासाठी ‘मालगुंजी’ रागाचा आधार घेतला आहे. हा राग प्रेम-प्रणय इत्यादींसाठी वारंवार वापरलेल्या बागेश्रीपासून नाजूक अंतर राखून असतो, म्हणजे तसा ठेवावा लागतो. याच चित्रपटात त्यांनी भारताच्या अनेक प्रांतांत प्रचलित असलेल्या ‘बारमासा’ या पारंपरिक लोकगीतप्रकारच्या धर्तीवर ऋतूवर्णनपर पद्यं योजली आहेत. या रचनांना गीतांचं स्वरूप न देता केवळ चाली ठेवण्यात देसाई यांनी परंपरेत राहून थोडा बदल करण्याच्या रचनापद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे त्यांच्यावर काही बंधनं आली हे खरं, पण त्याचबरोबर तयार चाली व त्यासाठी ऐकणारेही निश्चित झाले. ‘जो तुम तोडो पिया’ किंवा ‘ऐ मेरे दिल बता’ या रचनांवरून त देसाई ठरीव दृश्यांसाठी साचेबंद संगीत कसं वापरत असत, याची कल्पना येते.

आणखी एका बाबीकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. व्ही. शांतारामांसाठी काम करताना केलेल्या रचना नाट्यप्रभावित वास्तववादाला धरून असत, पण इतर चित्रपटांसाठी त्यांचं धोरण वेगळं राहत असे. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी दिलेलं ‘मेघा बरसने लगा है आज की रात’ (‘शक’ चित्रपट) हे गीत अधिक वेधक उदाहरण म्हणून सांगता येईल. राजकमलसाठी केलेल्या संगीतरचनांत न आढळणारे विशेष अशा संगीतरचनांत आढळतात, याचा अर्थ त्यांच्या सर्जनशीलतेला व्यापक रूप होतं.

देसाई यांच्या पुढील सांगीतिक रचनांचा आराखडा अत्यंत व्यामिश्र, तसंच परंपरेत राहून प्रयोग करणारा आणि नंतरच्या काळात आधुनिक वाद्यांच्या साहाय्यानं अधिक गुंतागुंतीचा होता, असं विधान ठामपणे करता येतं. अशी प्रतिभा लाभलेला संगीतकार विरळाच असतो. एका बाजूनं हिंदी चित्रपट, दुसरीकडे मराठी चित्रपट आणि तिसरीकडे मराठी रंगभूमीवरील कामगिरी, इतका व्यापक पट एकाच कारकिर्दीत समर्थपणे हाताळणं, हीच खरी देसाई यांची सर्जनशीलता म्हणायला लागेल.

.............................................................................................................................................

लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.

govilkaranil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......