सलिल चौधरी : अधिक टिकाऊ आणि सार्थ संगीत-संगम साधणारा प्रयोगशील संगीतकार!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अनिल गोविलकर
  • सलिल चौधरी
  • Sat , 26 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 गायक-संगीतकार Singer-Musician सलिल चौधरी Salil Chowdhury

चित्रपट गीतांमध्ये प्रयोग करायला तसा वाव कमी(च) असतो. मुळात तीन घटक असलेला अटकर बांध्याचा हा आविष्कार आणि त्यातून केवळ तीन-चार मिनिटांचं सादरीकरण. त्यामुळे प्रयोग करायचे झाले तरी शब्द, स्वरांची रचना, वाद्यमेळ आणि गायन, याच घटकातून होणार. आणि तिथं तिन्ही स्वतंत्र व्यक्ती! म्हणजे प्रत्येकाच्या प्रतिभेचा आविष्कार वेगळा आणि तरीही मर्यादित स्तरावरील. चित्रपटातील कविता अति गूढ असून चालत नाही, अन्यथा शब्दकळेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक. जरी गायक/गायिका स्वतंत्र व्यक्ती असल्या तरी गायनाचा पल्ला हा संगीतकारानं आधीच आखून दिलेल्या मार्गावरून गाठायचा. तरी या क्षेत्रात ‘मी गाण्यात वेगळे प्रयोग केले’ असा ‘दावा’ करणारे भरपूर भेटतात, यामुळेच बहुदा ‘प्रयोग’ हा शब्द थोडासा हास्यास्पद झाला आहे.

अशा परिस्थितीत ज्या संगीतकारांना खऱ्या अर्थी ‘प्रयोगशील’ म्हणावे, अशा फार थोड्या संगीतकारांमध्ये सलिल चौधरी यांचा समावेश होतो. त्यांनी नेमके काय प्रयोग केले आणि त्याचे किती दूरगामी परिणाम झाले, याचा इथं आढावा घ्यायचा आहे. 

बालपण आसाम आणि बंगाल इथं गेल्यानं या दोन्ही प्रदेशातील आदिम आणि लोकसंगीताचा गडद परिणाम झाला, असं त्यांच्या रचनांवरून सहज अनुमान काढता येतं. त्यातून लहानपणी ‘कम्युनिस्ट’ विचारसरणीशी संबंध आल्यानं,ज्या कलांचा लोकांशी थेट संबंध असतो, ज्या कलांना ‘लोकांच्या कला’ म्हणता येतं, त्याच कला महत्त्वाच्या असतात, हा विचार त्यांच्या मनावर बिंबला. अर्थातच आदिम, लोन आणि धर्म या भारतीय संगीताच्या कोटी आपोआपच खास महत्त्वाच्या ठरतात. सलिलदांच्या एकंदर संगीत निवडीत, ही भूमिका बरीच ठामपणे दिसून येते. 

या संदर्भात पुढे विचार करण्यासाठी आपल्याला निदान चार टप्पे ध्यानात घेतले पाहिजेत. युथ क्वायर (युवासमूह गायन) क्षेत्रांतील त्यांचं काम, हा पहिला विशेष. त्यांच्यातील ज्वलंत कम्युनिस्ट विचारसरणी लक्षात  घेता, हा टप्पा त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीनं त्यांनी मुंबई आणि कोलकत्ता इथं असे गायकसमूह स्थापन केले. 

दुसरा टप्पा- त्यांनी दिलेले हिंदी चित्रपट संगीत. ते मात्र पूर्णपणे मुंबईत फळाला आलं. 

तिसरा टप्पा- बंगाली गीत या क्षेत्रात त्यांनी खूपच वेधक कामगिरी केली आहे.

आणि शेवटचा टप्पा - बालगीतं. 

या सगळ्या टप्प्यांचं विवेचन या साठी करायचं की, त्यांनी जी चित्रपट गीतं केली, त्या सगळ्या निर्मितीवर कुठे ना कुठेतरी या टप्प्यांचा प्रभाव ठामपणे जाणवतो. डाव्या विचारसरणीशी असलेल्या बांधीलकीमुळे विविध भारतीय प्रदेशांतील लोकसंगीत, समूहगायनाची सहेतूक योजना आणि वाद्यवृंदाचा वापर त्यांच्या संगीतात सर्वत्र आढळतो. शिवाय भारतीय संगीतात ज्याची कमतरता अनेकांना जाणवते, त्या स्वनरंगाची विविधता या तीन विशेषांमुळे त्यांना सुलभ झाली.

भारतीय संगीतात कुठलंही चावीफलक वाद्य (हार्मोनियम, पियानो, ऑर्गन इत्यादी वाद्ये) म्हटलं की, नवा स्वनरंग, एक प्रकारचं प्रमाणीकरण आणि सर्वांना उपलब्ध संगीत उपयुक्तता, या गोष्टी अपरिहार्यतेनं जाणवतात. संगीतातून अखिल भारतीय आवाहकता कशी साधायची, या मूलभूत प्रश्नाला इथं स्पर्श झाला. सलिलदांनी समूहगायनाचा आपल्या पार्श्वसंगीतासाठी वाद्यांसारखा वापर केला आहे. 

बंगाली गीताचा आधुनिक अवतार सिद्ध करण्यातली त्यांची आस्था, तसंच रवींद्र संगीत आणि त्याचं वातावरण, याविषयी विरोधविकासवादी भूमिका, यामुळे त्यांना आपल्या खास ठशाचं बंगाली गीत रचणं भाग पडलं, हे सहज ध्यानात येण्यासारखं आहे. यातूनच त्यांनी पुढे आपली अनेक बंगाली गीतं हिंदीत आणली. 

याचाच परिणाम असेल, पण सलीलदा पाश्चात्य कलासंगीताचे अभ्यासक झाले. बीथोवन, मोझार्ट इत्यादी ‘क्लासिकल’ रचनाकार त्यांच्या खास पसंतीचे होते, हे सहज समजून घेता येतं. याच संगीताच्या प्रभावामुळे त्यांना वाद्यवृंद रचनेत प्रयोग करण्याची स्फूर्ती मिळाली असणार, हे उघड आहे. भारतीय वैदिक संगीत, आदिवासी संगीत, इतकंच नव्हे तर तंबोरा या वाद्यातही स्वरसंवाद (हार्मनी) हे तत्त्व आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. 

‘दो  बिघा जमीन’ या चित्रपटातून त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. ‘धरती कहे पुकार के’ हे गाणं लोकसंगीताशी फार जवळचं नातं सांगणारं आहे. या गाण्याच्या सुरुवातीला ‘भाई रे’ अशी पुकार आहे आणि ती या गाण्याचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल.  

पुढे त्यांच्या ‘परख’ या चित्रपटातील गीतं विशेष गाजली. ‘मिला है किसीका झुमका’ हे गीत ऐकण्यासारखं आहे. यात एकाच बासरीचा वाक्यांश ऐकायला येतो. ढाल्या तारतेचा ताल आणि साधी चाल, तरीही लोकसंगीताचा बाज आणि त्याच्याच चलनाचा थेट वापर, यामुळे हे गीत वेधक झालं आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बंगाली लोकसंगीताचा त्यांच्यावर गडद परिणाम जाणवतो. ‘क्या हवा चली’ किंवा ‘ऋत बदली’ या गाण्यांवर बंगाली ‘बाउल’ संगीताची छाप आहे. याच वळणानं वेगळं गाणं बघायचं झाल्यास ‘बन्सी क्यो बजाये’ ऐकावं. हे एक वेगळंच नृत्यगीत आहे 

सलिलदांनी स्वत:च्या अनेक बंगाली रचना हिंदीत आणल्या. ‘जारे, जारे उड जारे पंछी’, ‘ओ सजना, बरखा बहार आई’ किंवा ‘ना जिया लागे ना’ ही गाणी त्यांच्याच मुळातल्या बंगाली गाण्यांची हिंदी नक्कल आहे. असं असलं तरी ती मुळातली गाणी ऐकताना त्यांच्या प्रतिभेची साक्ष मिळते, हे नक्की. 

त्यांनी पाश्चात्य रचनाकारांचा अभ्यास केला होता. याचा परिणाम असा झाला की, त्यांच्या गाण्यात दोन्ही सांगीतिक संस्कृतीचा अप्रतिम मिलाफ आढळतो. तसंच पारंपरिक वाद्यांतूनदेखील नवनवीन सुरावटी काढून गाण्यालाच वेगळं परिमाण देण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षणीय ठरतो. तसं बघितलं तर ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ हे गाणं सरळ सरळ मोझार्टच्या सिम्फनीवर बेतलेलं आहे (सलिलदांनी ते कधीही लपवलं नाही) तरीही गाण्यातील वाद्यमेळ बारकाईनं ऐकला, तर त्यात सलिलदांच्या अभ्यासाची चुणूक दिसून येते.

असाच प्रकार त्यांनी इतर रचनांच्या बाबतीत केलेला दिसतो. म्हणजे चालीचा मूलस्त्रोत जरी उचललेला असला तरी त्यात स्वत:चं वैशिष्ट्य म्हणून काहीतरी सांगीतिक करामत करून दाखवायची आणि ही जाणीव त्यांनी शेवटपर्यंत ठेवली होती. ‘रजनीगंधा’, ‘छोटी छोटी सी बात’ या चित्रपटांतील गाणी ऐकावीत. चाली तशा सरळ, साध्य आहेत, परंतु प्रत्येक अंतरा आणि तिथला वाद्यमेळ यात काही ना काहीतरी वेगळेपण दिसून येतं. त्या दृष्टीनं त्यांच्या आधी सी. रामचंद्रांनी जी पाश्चात्य संगीताची जाणीव ठेवली होती, त्याचं सुसंस्कारित रूप सलिलदांनी आपल्या रचनांमधून आपल्या समोर आणलं. 

आज ए.आर. रेहमान जे प्रयोग करत आहे, म्हणजे भारतीय आणि पाश्चात्य संगीताचं एकत्रीकरण, याचा पाया सलिलदा आणि नंतर राहुल देव बर्मन यांनी घातला आहे, हे आपल्याला सहज समजून घेता येईल. 

संपूर्ण गीतत्वास पोचलेली अशी एक रचना ‘ओ सजना बरखा बहार’ बघूया. वास्तविक चाल ही त्यांच्या मूळ बंगाली गाण्याची आहे, तरीही स्वरपट्ट्यामध्ये मुक्त फिरणारी, संगीत कल्पनांनी भरलेली, उत्साही, द्रूत अशी मधुर चाल आहे. कोमल निषाद स्वरावर येऊन थांबणारा मुखडा, हा या रचनेचा मनोज्ञ विशेष. नायिकेच्या मनोवस्थेचे नेमकं चित्रण स्वरांच्या साहाय्यानं अतिशय प्रत्ययकारी पद्धतीनं घडतं.

पाश्चात्य संगीताचा अभ्यास असल्यानं ‘जिंदगी ख्वाब है’ या गाण्यात व्हायोलिन, अॅकॉर्डियन, ट्रम्पेट इत्यादी वाद्यांचा वापर खास ऐकण्यासारखा आहे. 

सलिलदांच्या सांगीतिक कारकिर्दीचं शिखर म्हणजे ‘मधुमती’. या चित्रपटात त्यांच्या संगीत सर्जनक्षमतेचा विस्तीर्ण पट उलगडलेला दिसतो. ‘आजा रे’सारखं पछाडून टाकणारं गीत, ‘दैय्या रे दैय्या’सारखं लोकसंगीतावर आधारित गीत, ‘जंगल मे मोर नाचा’सारखं हलकंफुलकं गीत, तर ‘टुटे हुवे ख्वाबो ने’सारखं अप्रतिम विरह गीत. यातील प्रत्येक गाण्याला सलिलदांनी स्वत:चं खास वैशिष्ट्य प्रदान केलं आहे. 

सलिलदांची सर्जनशक्ती वारंवार आपलं सौंदर्यपूर्ण संगीत वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्यानं भारलेली होती. काम जर अधिक केंद्रीभूत झालं असतं तर संगम-संगीताच्या गतिमान कोटीत चपखल बसणारं संगीत ते आपल्याला देऊ शकले असते. त्यांची गाणी ऐकताना हिंदी चित्रपट संगीतात जे संगीत होतं, त्यापेक्षा अधिक टिकाऊ आणि सार्थ संगीत-संगम साधण्याची त्यांना इच्छा होती, असं जाणवतं आणि तशी त्यांची क्षमतादेखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारं काम नव्हतं! 

.............................................................................................................................................

लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.

govilkaranil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......