सी. रामचंद्र : हिंदी चित्रपट संगीताच्या रूढ शैलीविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवणारा संगीतकार
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अनिल गोविलकर
  • सी. रामचंद्र
  • Fri , 25 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 गायक-संगीतकार Singer-Musician सी. रामचंद्र C.Ramchandra

हिंदी चित्रपट संगीतात एकेकाळी स्वतःचं अधिराज्य गाजवणारे म्हणून सी. रामचंद्र यांचं नाव घ्यावं लागतं. जवळपास १८ वर्षं (१९४२ ते १९५८) त्यांनी हिंदी चित्रपट संगीतावर आपली छाप उमटवली. इतकी प्रदीर्घ कारकीर्द असल्यानं त्यांचं मूल्यमापन करणं बरंच सोपं होतं.

सी. रामचंद्र यांनी पंडित विनायकबुवा पटवर्धन (पुणे) आणि पंडित शंकरराव सप्रे (नागपूर) यांच्याकडून कलासंगीताचं पायाभूत शिक्षण घेतलं, हे सुरुवातीलाच सांगणं आवश्यक आहे. कारण त्यांच्यावर बऱ्याच वेळा ‘पाश्चात्य संगीतचोर’ म्हणून आरोप केला गेला (वास्तविक मुळातल्या पाश्चात्य चाली आणि त्यांची पुनर्रचना केलेल्या आवृत्त्या हा अभ्यासाचा वेगळा विषय आहे!) परंतु त्याचबरोबर त्यांनी भारतीय धाटणीची जी गाणी दिली, त्याकडे या टीकाकारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं. भारतीय कलासंगीताचा पायाभूत अभ्यास केल्याचा त्यांना आपल्या कारकिर्दीत बराच फायदा झाला. किंबहुना कलासंगीताच्या अभ्यासाचा एक अटळ परिणाम होतो, परंतु या संगीतकारानं स्वररचना करताना निव्वळ आधारभूत स्वर घेतले आणि आपल्या रचना सजवल्या. त्या कशा सजवल्या, याचंच इथं आपण विवेचन करणार आहोत आणि उचलेगिरीबाबत झालेली टीका किती कोत्या मनाची आहे, हे दाखवून देणार आहोत.

सी. रामचंद्र यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक सुंदर हार्मोनियम वादक म्हणून झाली (साधारणपणे १९३९साली), पण लवकरच त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं आणि आपल्या परिपूर्ण कारकिर्दीला आरंभ केला. त्यांनी साधारणपणे २५० चित्रपटांना संगीत दिलं (इतर भाषिक चित्रपट यात अंतर्भूत आहेत). 

आनंदी, जवानीच्या जल्लोषानं भरलेलं, तसंच पाश्चात्य हलक्याफुलक्या संगीतानं प्रभावित झालेलं भारतीय संगीत असं ढोबळपणे म्हणता येतं, परंतु त्यांना ‘संगीतचोर’ म्हणणं तितकंसं योग्य नाही. आपण हलक्याफुलक्या पाश्चात्य संगीताचे सुजाण श्रोते आहोत, असं ते वारंवार म्हणत असत आणि  त्यात तथ्य आहे. सर्वांत महत्त्वाचा विशेष म्हणजे संगीतरचनेस वर्णनात्मक आशय देण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षणीय होता. त्यांच्या गायनात एक प्रकारचा फसवा सहजपणा होता. गुणगुणल्यासारखं ते गातात असं वाटतं. तुम्ही पण माझ्या सोबत गाऊ शकता, नव्हे तसं करा, असं जणू ते सुचवतात. 

‘आना मेरी जान संडे के संडे’ (चित्रपट शहनाई) या गाण्यानं त्यांना खऱ्याअर्थानं अफाट लोकप्रियता मिळाली. पाश्चात्य संगीताचा वापर कसा करावा, याबाबत त्यांनी या गाण्याद्वारे नवीन पायंडा पाडला असं म्हणता येईल. गीतरचनेची या संगीतकाराची एक खास सर्वसाधारण पद्धत अशी, की निवडकपणे हलकं - विशेषतः नृत्याच्या अंगाचं - पाश्चिमात्य संगीत घ्यायचं आणि त्याला भारतीयता प्रदान करायची. यामुळे हिंदी चित्रपट संगीतात ‘रंबा संबा’ (गोरे गोरे), ‘रॉक अँड रोल’ (मिस्टर जॉन किंवा इना मीना डिका) ही वळणं त्यांनी पक्केपणानं रुजवण्याचं काम केलं. परिणामतः ओबो, सॅक्सोफोन, चेलो, ट्रम्पेट, ड्रम्स, स्पॅनिश गिटार, हार्मोनिकासारखी वाद्यं त्यांनी मुबलकपणे वापरली, यात काही नवल नाही! 

त्यांच्या बहुतांशी रचनांनी आजही लोकमानसावर परिणाम का साधावा, याची कारणं समजण्यासारखी आहेत. सर्वांत प्रथम असं की, चालीची बांधणी इतकी साधी आहे की, ही गीतं ऐकून कुणालाही आपणही गाऊ शकतो, असा विश्वास वाटतो. दुसरा विशेष असा की, वापरलेले ताल आणि लयी सहज उचलता येण्यासारख्या आहेत. यात शारीर हालचाली सहजपणे जमणं हा भाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी पूर्वशिक्षणाची काहीही गरज नाही. त्यांच्या रचनांचं साधेपण हे असं आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सर्वांतून एक वासनारहित मोकळेपणा खेळत असतो. 

सी. रामचंद्रांचं ‘अनारकली’मधील ‘ये जिंदगी उसीकी हैं ’ हे गाणं अजरामर झालं, पण त्याच चित्रपटातील ‘मुहोब्बत ऐसी धडकन हैं ’ हे मात्र पार मागे पडलं. खरं तर, रचनेच्या दृष्टिकोनातून ‘मुहोब्बत ऐसी धडकन’ हे गाणं नितांत रमणीय आणि गोड आहे. थोडा वेगळा विचार केला तर असं दिसेल की, ‘ये जिंदगी उसीकी हैं ’ यावर ‘शारदा’ नाटकातील, ‘मूर्तीमंत भीती उभी’ या गाण्याची थोडी पडछाया आहे आणि हे खुद्द सी. रामचंद्रांनीदेखील कबूल केलेलं आहे, तरी देखील लोकप्रियता कशी चंचल असते, हे बघण्यासारखं आहे. असो.

याचबरोबर या संगीतकारानं भारतीय संगीत परंपरांत बसू शकतील, अशीही गीतं यशस्वीपणे सादर केली आहेत. या संदर्भात ‘लोक’, ‘कला’ आणि ‘जन’ संगीतकोटींतील त्यांच्या रचनांचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. ‘ये जिंदगी उसीकी है’ या गीतात उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांचं सतार वादन उल्लेखनीय आहे. याच वाद्यानं पुढे ‘मुहोब्बत ही ना जो समझे’ या गीतात रंग भरला आहे. पहिल्या गीतात असाधारण चमकदारपणे वाजणारी सतार, या रचनाकारानं सहेतुकपणे दुसऱ्या गीताच्या शोकगंभीर परिणामास विरोधासंबंधी म्हणून योजली आहे.

‘तू छुपी है कहाँ’ या गीतामधील शहनाईचा वापर याच प्रकारचा आहे. ‘मालकंस’ या ‘औडव’ रागात बांधलेल्या चालीत शहनाईच्या भेदक आणि तीक्ष्ण स्वरवाक्यांतून एक साद वा हाक ऐकू येते. कालिक लय पुरवण्यासाठी बहुदा ताशा व नगारा ही काठीच्या आघातानं वाजणारी तालवाद्यं वापरली असावीत. आणखी एक सुरेख उदाहरण बघायचं झाल्यास, ‘कितना हंसी है मौसम’ या गाण्यात ‘पिकोला’ या उच्चस्वरी वाद्याच्या ध्वनीनं या गीतात बासरी मुख्य चालीतून आतबाहेर करते. 

या संगीतकारानं काही अप्रतिम द्वंद्वगीतं दिली आहेत. ‘ओ चांद जहाँ तू जाये’ हे गीत लताबाई आणि आशाबाई यांनी गायलेलं आहे. ‘वो हमसे चूप है’ (सी. रामचंद्र आणि लताबाई), ‘गया अंधेरा हुवा उजाला’ (लताबाई आणि तलत मेहमूद), ‘भूल जाये सारे गम’ (नौशेरवान-ए-आदिल), ‘तू छुपी है कहाँ’ (आशाबाई आणि मन्ना डे), ‘गा रही है जिंदगी’ (आशाबाई आणि महेंद्र कपूर) ही गाणी ऐकावीत. यांत निरनिराळ्या आवाजात कुठलीही भावना आगळीवेगळी वाटते! इथंच रचनाकाराचं कौशल्य पणाला लागलेलं असतं. फक्त चालच नव्हे, तर त्या चालीच्या आवाजानुसार बदलता रंगही ध्यानात आला पाहिजे. 

इतर रचनाकारांप्रमाणे हा संगीतकार आपल्या रचनासूत्रांतही भारतीय रागांच्या ठशांचा वापर समाविष्ट करतोच. ‘कैसे जाऊं जमुना के तीर’ (राग भैरवी), ‘ओ निर्दयी प्रीतम’ (राग भीमपलास), ‘जब दिल को सतावे गम’ (राग जौनपुरी), ‘आधा है चंद्रमा’ (राग मालकंस), ‘दिल लगाकर हम ये समझे’ (राग पहाडी) इत्यादी गीतं या संदर्भात लक्षात येतील.

असं असलं तरी या संगीतकाराला ‘बागेश्री’ या रागानं अधिक प्रभावित केलं होतं. ‘राधा ना बोले’, ‘जाग दर्द ए इष्क जाग’ या गीतांत हा राग यथायोग्य वापरलाच आहे, परंतु ‘मोहब्बत ऐसी धडकन है’, ‘हम कितना रोये’, ‘मेरे जीवन मे किरन’ ही गीतं ऐकावीत. बागेश्री रागावर प्रक्रिया करून, त्याचा पुनर्रचित अवतार या गीतांतून घडवला आहे. 

पारंपरिक रचना वापरण्याशिवाय (ये जिंदगी उसी की है - मूर्तिमंत भीती उभी किंवा ‘कैसे जाऊं जमुना के तीर’ - याच नावाची भैरवी रागातील ठुमरी) त्यांनी अमलात आणलेलं अधिक कुशल तंत्र म्हणजे स्वराकृती निर्माण करण्याचं, चित्रं अनुसरण्याचं. 

उदाहरणार्थ ‘जब दिल को सतावे गम’ किंवा ‘धीरे से आजा री’ पहिल्या गाण्यात सरगम गायनाचं शास्त्रोक्त कंठ संगीतातील तंत्र वापरलं आहे, तर दुसऱ्यात जन्मस्थान उघडपणे मराठी स्त्रीगीतावर आधारलेलं आहे. या संगीतकारावर जेव्हा पाश्चात्य संगीताची उसनवारी करणारा, अशी टीका होते, त्या वेळी प्रस्तुत रचना करताना पारंपरिक संगीताची योजना करणारा संगीतकार म्हणून लक्षात घ्यावं. 

त्यांच्या अनेक गीतांना ‘विनोदी गीतं’ म्हणता येईल. तसं पाहता आवश्यक ते शब्द असल्याशिवाय विनोद कसा आणायचा हा नेहमीच प्रश्न असतो. बऱ्याच वेळा गंभीर संगीतापासून फटकून वागणारे ध्वनिपरिणाम योजणं बरेचसे संगीतकार पसंत करतात. वास्तविक गीताच्या लयींपासून विनोद निर्मिती करता येते. उदाहरणार्थ, ‘ओ बेटा जी’ (अलबेला) या गीतांत जलतरंग वाद्यानंतर स्वयंपाकघरातील भांड्यांचे आवाज ध्वनी लयीच्या चौकटीत बसवून वापरल्यानं गीत अधिक वेधक झालं आहे. याच उलट बोलायचं झाल्यास ‘मेरे दिल की घडी’ (अलबेला) या गीतांतील विनोदी आशय मोजक्या वाद्यांचा वापर आणि ढाल्या आवाजातील गायन, यामुळे अधिक वेधक झाला आहे. तो ठाशीवपणे समोर येतो. 

दुसरा वेधक विशेष असा म्हणता येईल की, एकंदर नेहमीची संचालन गीतं किंवा मिरवणुकीतून शौर्य, निषेध व्यक्त करणारी गीतं या संगीतकाराच्या पसंतीच्या कक्षेत नव्हती. ‘यही पैगाम हमारा’ (पैगाम) किंवा ‘देख तेरे संसार की हालत’ (नास्तिक) या घेताना कुशलतेनं रचलेली गीतं असं म्हणता येईल. या उलट चित्रपटबाह्य ‘ऐ मेरे  वतन के लोगो’ हे गाणं. खरं तर हे गाणं चित्रपटबाह्य संदर्भानं अमर झालं, पण गीताच्या चलनात ज्या प्रकारचा रुंजी घालणारा भाव, करुणार्त भाव आहे, तो विशेष जाणवणारा आहे. पण या संगीतकाराला राष्ट्रगीतं रचायला आवडलं असतं, असं वाटत नाही. 

प्रत्येक रचनाकार काही गीतं अशी काही करतो, जी रूढ अर्थानं धडाक्यात लोकप्रिय झाली नाहीत, तरी देखील ती ऐकल्यावर एक सूक्ष्म पण काहीसा अस्वस्थ करणारा परिणाम घडतो. काही वेळा परिणाम एकदम न जाणवता त्या गीतांच्या वारंवार श्रवणानं लक्षात येतो. अशा गीतांचं यथार्थ मूल्यमापन अवघड जातं. उदाहरणार्थ, ‘तुम क्या जानो’ (शिनशिनाके बुबलबू) हे गीत बागेश्री रागाची छाया घेऊन अवतरतं. परंतु विशेष असा की, आपण शास्त्रीय राग वापरलाय, असं दाखवण्याचा अट्टाहास कुठेच दिसत नाही. तसंच आपण रागापासून कसे दूर गेलो आहोत, हेही दर्शवण्याचा प्रयत्न नसतो. या गाण्यात ‘रोये’ शब्दावर कोमल गंधार ठेवून मग आवाहक गंभीरतेच्या शुद्ध धैवतावर अवरोह केला जातो. मग एकेक स्वरवाक्य येतं आणि नंतर ‘षड्ज’ या शांत स्वरावर विसावतो. 

हा संगीतकार अष्टपैलू होता हे नि:संशय. त्याचा रचनासंभार विपुलही आहे. त्याला सुरावटीचा प्रवाह खेळता ठेवणं जमत असे. काहीही करताना कसलाही प्रयास पडत नसे आणि संगीतरचनेतील त्याचं हे सहजपण श्रोत्यांपर्यंत सहजपणे पोहोचत असे. त्यामुळे एखाद्या गीतानं डोळ्यांत अश्रू आले तरी ऐकणाऱ्यास आरामदायी आनंद वाटे. त्याचं संगीत सगळ्यांना समजतं. अर्थात ते साधं म्हणून समजतं असं नसून, पुरेशा तांत्रिक प्रभुत्वामुळे आपलं कौशल्य लपवून संगीत लोकांसमोर आणण्याची कला त्यांना साध्य झाली होती.

या संगीतकारानं हिंदी चित्रपट संगीताच्या रूढ शैलीविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवलं. त्यासाठी आपलं वेगळेपण सिद्ध करण्याची त्यांना कधीही गरज भासली नाही. आपण कलाकार आहोत आणि ते पुरेसं आहे, हीच त्यांची भावना प्रबळ होती. संगीतकार म्हणून इथंच त्यांचं वेगळेपण सिद्ध होतं. 

.............................................................................................................................................

लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.

govilkaranil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......