कधी काळी चित्रपट निर्मिती करणाऱ्यांनी आपल्या जाणिवा, अनुभव आणि चित्रपटाच्या व्याख्येनुसार निर्माण केलेला रटाळ आणि आळशी चित्रपट! 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘पल पल दिल के पास’चं एक पोस्टर
  • Sat , 21 September 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie पल पल दिल के पास Pal Pal Dil Ke Paas सनी देओल Sunny Deol करण देओल Karan Deol सहेर बम्बा Sahher Bambba

‘पल पल दिल के पास’ कलात्मक, तांत्रिक अशा सर्वच पातळ्यांवर इतका वाईट आहे की, त्यातील प्रत्येक अंग हे चित्रपट कसा असू नये याचा मूर्तीमंत नमुना आहे. याच्या दिग्दर्शकाला, म्हणजे सनी देओलला आपल्या मुलाला मोठ्या पडद्यावर बघायचं असल्याने त्याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर आजोबा, धर्मेंद्रने तो समोर आणला आहे. कोणेकाळी लोकप्रिय असलेल्या कलाकारांच्या मुलाचं पदार्पण असलेल्या चित्रपटाबाबतच्या अलिखित नियमानुसार सदर चित्रपटातील अभिनेत्यांना अभिनय येत नाही. (अर्थात त्यामुळे यापैकी कुणाचेही मानसिक खच्चीकरण होणार नसते!) लेखकांनी जुन्या चित्रपटांच्या पटकथा आणि रटाळ दृश्यांची सरमिसळ करून काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पल पल दिल के पास’ म्हणजे कधी काळी चित्रपट निर्मिती करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या प्राचीन जाणिवा, अनुभव आणि चित्रपटाच्या व्याख्येनुसार निर्माण केलेला एक रटाळ आणि आळशी चित्रपट आहे. इतका आळशी की, त्याच्या लेखकांनी आपल्या पात्रांची वेगळी नावं न ठेवता थेट ती भूमिका निभावणाऱ्या कलाकारांचीच नावं त्यांना देऊ केली आहेत. 

करण सेहगल हा ‘कॅम्प उझी धार’ नामक ट्रेकिंग कॅम्पचा मालक आणि गिर्यारोहक आहे. त्याला येत नाही असं काहीच नसावं. तो गिर्यारोहक आहे, तो अचानकच सांगीतिकेच्या विश्वात असल्याप्रमाणे गाऊ लागतो आणि इतरांनाही त्यात समाविष्ट करून घेतो. तो स्वतःच्या गाइड कॅम्पच्या मोहिमांचा गाइड म्हणूनही काम करतो. कुठल्या तरी कौटुंबिक सोहळ्यापासून बचावण्यासाठी म्हणून सहेर सेठी (सहेर बम्बा) ही ब्लॉगर-अधिक-समीक्षिका (व्हिडिओ ब्लॉगर) थेट ‘हिमाचल की गोद में’ म्हणत उझी धारमध्ये येऊन त्याचं परीक्षण करण्याचा निर्णय घेते. करणची कंपनी इतर प्रतिस्पर्ध्यांहून अधिक, पाच लाख रुपये इतकी फी एका मोहिमेकरिता आकारते. यात काहीतरी काळंबेरं असल्याची शंका येते. त्यामुळे माननीय समीक्षिका या कॅम्पमध्ये चालणाऱ्या गैरप्रकारांना उघडकीस आणण्याचा निश्चय करतात. 

साहजिकच आपल्या नायक-नायिकेमध्ये खटके उडू लागत असल्याची ‘प्रेमळ’, ‘रोमँटिक’, ‘लडिवाळ’, इत्यादी इत्यादी विशेषणं देणं अपेक्षित असलेली दृश्यं चित्रपटाचा पूर्वार्ध व्यापतात. मग आपल्याला ‘मैं प्रेम की दिवानी हूँ’, ‘टार्झन - द वंडर कार’ असे एकापेक्षा एक अत्युच्च दर्जाचे अभिजात चित्रपटांची आठवण होईल असं सगळं घडत जातं. अतर्क्य आणि मूर्ख दृश्यांची रांग लागते. समीक्षिका सहेर (की सेहर?) साधारणतः पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या मराठी/हिंदी/इंग्रजी चित्रपटांमधील नायिका वागतात तशा बाळबोध गोष्टी करताना दिसतात. “आम्हा मुलींचं तर बुवा आयलायनर शिवाय जगणंच अवघड आहे” (समीक्षकाने इथे रटाळ हिंदी संवादाचा स्वैर अनुवाद केलेला आहे), अशा अर्थाची वाक्यं ही पंचविशीपार असलेली तरुणी बोलत राहते. तिची फजिती होत राहते नि आपला नायक स्त्रीदाक्षिण्य दाखवत राहतो. (इथे ‘हिरो’ म्हटलं की कसं भारी वाटतं ना! स्त्रियांचा कैवारी, चित्रपटाचा हिरो! लेखक-दिग्दर्शक शंकर म्हणाला असता तसं - ‘नायक : द रिअल हिरो’) अधूनमधून हा नायक खुखु खिखि करत नायिकेच्या फजितीवर लाडिकपणे हसत राहतो. 

अर्थात प्रेम असंच तर होत असतं ना! एकदम विरुद्ध आचारविचार असलेल्या लोकांनी चार-पाच दिवस सोबत घालवले की आकर्षण निर्माण होतं, मग धप्पदिशी प्रेम! मग नायक-नायिकेत दुरावा निर्माण होणार, खलपात्र येणार, मग एकदम भारी मारधाड नि मग गोड शेवट. सगळं कसं छान छान!

एकुणात चित्रपटकर्ते कुठल्यातरी प्राचीन समीकरणानुसार चित्रपट तयार करत असल्याचं दिसतं. त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या संकल्पनाच अशा आहेत की विचारता सोय नाही. त्यामुळे पूर्वार्धात हिमाचलमध्ये बागडणारे नायक-नायिका उत्तरार्धात दिल्लीत येतात. इथे तर अगदी रटाळ साचेबद्ध खलपात्र, त्याचं तितकंच वाईट कुटुंब आणि राजकारणाची पार्श्वभूमीही येते. फिल्मी नायक विरुद्ध पुस्तकी खलनायक असं प्रकरण इथे सुरू होतं. 

पूर्वार्धात आपली नायिका अशी काही किंचाळत राहते की, विचारता सोय नाही. ऐकणाऱ्याच्या कानाचे पडदे फाडेल इतकं किंचाळणाऱ्या या बाईंची आकांक्षा, काय तर गायिका होणं! एकुणात तर्काचा अभाव चित्रपटकर्त्यांच्या नसानसांत भिनलेला आहे. रटाळ टीव्ही मालिकांना स्पर्धा देऊ शकेल इतक्या संथ आणि मूर्ख दृश्यांची मांडणी इथे केली जाते. त्यात अगदी पुरातन काळात घडत असल्याच्या थाटात म्हटल्या जाणाऱ्या संवादांचं इथलं ध्वनी आरेखनसुद्धा कमालीचं वाईट आहे. बहुधा ध्वनी आरेखन करणाऱ्यालाही चित्रपटातील अतर्क्यता सहन झाली नसावी. हे सुमार ध्वनी आरेखन आधीच वाईट असलेल्या चित्रपटाचा परिणाम अधिकच खालावून टाकतं. 

जसविंदर सिंग बाठ आणि रवी शंकरण यांनी केलेल्या सुमार लेखनाचा एक अत्युच्च दर्जाचा नमुना पहा. दृश्य असं की नायक आणि त्याची एक मैत्रीण सोबत बसलेले आहेत. मैत्रीण तो नायिकेवरील प्रेम व्यक्त करण्यास कचरत, घाबरत असल्याचं बोलून दाखवते. संवाद पहा : 

नायकाची मैत्रीण : तू डर रहा हैं। 

नायक : मैं नहीं डर रहा। 

नायकाची मैत्रीण : तू डर रहा हैं। 

नायक : नहीं, मैं नहीं डर रहा। 

(आता नायक दुःखाच्या आवेगात तिला मिठी मारतो)

नायक : हाँ, मैं डर रहा हूँ। 

नायकाची मैत्रीण : डरना मत। 

आणि दृश्य संपते. म्हणजे एकविसाव्या शतकातील दुसरं दशक संपत असताना ऐंशी-नव्वद किंवा त्याच्याही आधीच्या काळातील चित्रपटांच्या धर्तीवरील बाबी इथे घडत राहतात. 

‘पल पल दिल के पास’ सर्वार्थाने वाईट चित्रपट आहे. कथेच्या नि पटकथेच्या नावाला इथं तोंडाला पानं पुसलेली आहेत. संवाद वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन-चार दशकं आधीच्या चित्रपटांतील भासतात. दिग्दर्शनाच्या नावाखाली माननीय खासदार सनी देओल यांना काहीच येत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. तनिष्क बागची वगैरे लोक जे काही करतात त्याला संगीत म्हणणं म्हणजे उगाच संगीताचा अपमान केल्यासारखं आहे. 

करण देओल, सहेर बम्बा या दोघांनाही अभिनयातील ‘अ’देखील येत नाही, असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती ठरणार नाही. अर्थात मख्ख चेहऱ्यानं चित्रपटभर वावरणं म्हणजे अभिनय असेल तर देओल जी का लौंडा पास हो गया म्हणता येईल! 

चित्रपटात एका ठिकाणी नायक म्हणतो, “मैं समझ ही नहीं पा रहा था, मैं जिंदा क्यों हूँ”. ‘पल पल दिल के पास’ पाहिल्यानंतर किंबहुना अडीच तासांचा हा चित्रपट सहन केल्यानंतर माझीही अवस्था काहीशी अशीच होती. जिवंत का होतो आणि कसा होतो याचं उत्तर मलाही लक्षात येत नाहीये. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......