‘छिछोरे’ : अप्रतिमरीत्या दिग्दर्शित केलेला चित्रपट 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘छिछोरे’चं पोस्टर
  • Sat , 07 September 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie छिछोरे Chhichhore श्रद्धा कपूर Shraddha Kapoor सुशांतसिंग राजपूत Sushant Singh Rajput

महाविद्यालयीन जीवनशैली हा ‘छिछोरे’चा एक महत्त्वाचा भाग आहे. असं असलं तरी सदर चित्रपट अलीकडील काळातील व्यावसायिक हिंदी चित्रपटांप्रमाणे तद्दन कृत्रिमरीत्या महाविद्यालयीन जीवन रेखाटत, भूतकाळाविषयीच्या ओढीच्या उसन्या आवावर अवलंबून राहत नाही. चित्रपटकर्त्यांचा ते जे विश्व उभं करत आहेत, त्याचा पुरेपूर अभ्यास असल्याचं दिसतं. त्यामुळे ‘छिछोरे’ जेव्हा महाविद्यालयीन काळ उभा करतो, तेव्हा त्यातील लहान लहान निरीक्षणं नोंदवतो. तो केवळ मादक नायक-नायिकांवर भर देणारा व्यावसायिक चित्रपट ठरत नाही. यापुढे जात तो जेव्हा ‘संदेश’ देऊ पाहतो, त्यावेळीही चित्रपटाला त्याच्या विषयाच्या गांभीर्याची जाणीव असते. त्यामुळे हा संदेशदेखील माथी मारला जाणारा ठरत नाही. 

‘छिछोरे’चं कथानक भूतकाळ आणि वर्तमान अशा दोन निरनिराळ्या कालखंडात घडणाऱ्या घटनाक्रमांच्या माध्यमातून दोन पातळ्यांवर समांतरपणे चालत राहतं. राघव (मोहम्मद समद) हा अनिरुद्ध पाठक (सुशांत सिंह राजपूत) आणि माया (श्रद्धा कपूर) या जोडप्याचा मुलगा आहे. चित्रपटाला सुरुवात होते, तेव्हा तो ‘आयआयटी’च्या प्रवेश परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असताना दिसतो. मित्रांच्या आणि अनिरुद्धच्या समजावून सांगण्यानंतरही तो निकालाचा ताण घेत असतो. अनिरुद्ध आणि मायाचा घटस्फोट झालेला असल्याने पालकांमध्ये विसंवाद असल्याचं दिसतं. साहजिकच जेव्हा मनासारखा निकाल लागत नाही, तेव्हा राघव दोन यशस्वी ‘आयआयटीयन्स’च्या घरात वाढून आपण साधी प्रवेश परीक्षादेखील उत्तीर्ण होऊ शकलो नाही, या दडपणाखाली येऊन आत्महत्येचं पाऊल उचलतो. 

चित्रपट ज्या पद्धतीनं पुढे सरकत असतो, त्यानुसार ही घटना अगदीच अनपेक्षित नसते. तसाही चित्रपटकर्त्यांना आपलं कथानक भाकीत करण्यालायक ठरतं की नाही याची फिकीर नाही. कारण मुळातच त्यांचा भर यापूर्वीही चित्रपटांमध्ये दिसलेल्या गोष्टी अधिक प्रभावी स्वरूपात समोर मांडण्यावर अधिक आहे. जे आपल्याला आणतं चित्रपटातील दुसऱ्या स्तराकडे. ते म्हणजे महाविद्यालयीन जीवन. राघव जेव्हा जीवन मरणाच्या वाटेवर असतो, तेव्हा मोठ्या प्रभावीपणे या प्रकरणाची गुंफण सदर कथानकात केली जाते. एव्हाना चित्रपटातील पात्रांना नि परिणामी चित्रपटाला ‘शैक्षणिक यशापयशाचा ताण घेऊ नका’ हे सांगायचं आहे, हे स्पष्ट आहे. पण ते कसं सांगितलं जातं ते इथं महत्त्वाचं ठरतं. 

आपल्याला प्रवेश मिळतो तो अनिरुद्ध-मायाच्या महाविद्यालयीन भूतकाळात. मग हॉस्टेल क्रमांक चारमधील अनिरुद्धचे मित्र - सेक्सा (वरुण शर्मा), अॅसिड (नवीन पॉलिशेट्टी), मम्मी (तुषार पांडे), डेरेक (ताहिर राज भसीन) आणि बेवडा (सहर्ष कुमार शुक्ला) ही पात्रं कथानकात येतात. हे लोक एरवी कुठल्याही व्यावसायिक चित्रपटात निर्बुद्ध, रटाळ साचे ठरले असते. दिग्दर्शक-सहलेखक नितेश तिवारी आणि लेखक पियुष गुप्ता-निखिल मेहोत्राच्या विश्वात मात्र ती त्यांच्या मर्यादित विस्ताराव्यतिरिक्त अस्सल भासतात. कारण, त्यांना बहाल केलेली गुणवैशिष्ट्ये अगदी छोट्या छोट्या निरीक्षणांतून निर्माण केलेली आहेत. त्यातही पुन्हा अतिशयोक्ती आणि वास्तव यांचं एक बेमालूम मिश्रण चित्रपटकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळेच हॉस्टेलमधील मेसचं जेवण वाईट असतं हे एक प्रकारचं वास्तव, आणि हॉस्टेल क्रमांक तीन आणि चारमधील स्पर्धेचं फिल्मी उपकथानक या दोन्ही गोष्टींचं अस्तित्त्व इथं एकाच वेळी दिसून येतं. 

अनिरुद्ध आणि इतरांचं महाविद्यालयीन जीवन आणि वर्तमानात राघव मृत्यूच्या घशात अडकलेला असताना त्याला सांगितली जाणारी त्यांच्या भूतकाळाची कथा, ही दोन्ही प्रकरणं इथं समांतरपणे चालू राहतात. असं करताना वर्तमान आणि भूतकाळातील समानबिंदू अधोरेखित करत अगदी कल्पकतेनं कथानक समोर मांडलं जातं. 

नितेश तिवारीचं दिग्दर्शन त्याची या माध्यमावरील पकड त्याला या माध्यमाची असलेली जाण दर्शवतं. ज्यामुळे तो यापूर्वीही भारतीय चित्रपटांत दिसलेल्या उपकथानकांचा, घटकांचा समावेश असलेल्या मध्यवर्ती कथानकाला रंजक बनवू शकतो. तो ज्या पद्धतीनं आपल्या चित्रपटातील विश्वाची निर्मिती करतो नि त्याला बहर आणतो ते पहावं असं आहे. त्याच्या दिग्दर्शनात एक विलक्षण अशी जादू आहे. चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात तो संगीत आणि समोर दिसणारी दृश्यं यांचा अतिशय कमाल मिलाफ घडवून आणतो. ‘छिछोरे’मध्ये तिवारीचा दृश्यं आणि संगीताशी खेळण्याची शैली पदोपदी दिसून येतो. समोर घडणाऱ्या दृश्यांना ज्या तऱ्हेनं सांगीतिक जोड दिली जाते, नि एक वैशिष्ट्यपूर्ण अशी दृकश्राव्य लय निर्माण केली जाते, ते विलक्षण आहे. इथं समीर उद्दीनचं पार्श्वसंगीतही महत्त्वाचं ठरतं. जे अतिरेकी भावनाक्षोभक नाही, पण परिणामकारक जरूर आहे. 

भूतकाळातील प्रकरणात दिग्दर्शक तिवारी आणि इतरही सर्वांचीच कामगिरी अधिक प्रभावी आहे. या प्रकरणात त्यांच्या सिनेमॅटिक जाणिवा अधिक बहरलेल्या आहेत. उदाहरणार्थ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या हॉस्टेल क्रमांक तीन आणि चारमधील स्पर्धा जेव्हा शेवटाकडे उच्च शिखरावर असते, तेव्हा प्रत्यक्ष खेळांच्या चित्रणात तिवारी अगदी प्रभावीपणे तणाव, थरार नि एकूणच नाट्याची निर्मिती करतो. तो नाट्य ते विनोद सर्वच स्तरांवर प्रेक्षकाला खिळवून ठेवत पुरेपूर मनोरंजन करतो. इथला विनोदही एरवीच्या व्यावसायिक हिंदी चित्रपटांपेक्षा कैकपटींनी प्रभावी ठरणारा आहे. ज्याचं कारण पुन्हा एकदा लेखकांच्या आणि दिग्दर्शक तिवारीच्या निरीक्षणशक्तीत दडलेलं आहे. अगदी वर्षानुवर्षं चित्रपटांमधून दिसत आलेल्या गोष्टींचं कल्पक आणि रंजक सादरीकरण करण्यासाठीही तिवारीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. 

एकूणच ‘छिछोरे’ हा एक उत्तमरीत्या निर्माण केलेला आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे अगदीच कमालीच्या सफाईदारपणे दिग्दर्शित केलेला प्रभावी चित्रपट आहे. हल्ली महाविद्यालयीन जीवन रेखाटणाऱ्या सुमार व्यावसायिक चित्रपटांची भाऊगर्दी झालेली असताना सदर चित्रपट त्याच्या प्रभावी हाताळणीमुळे ठळकपणे वेगळा उठून दिसणारा ठरतो. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......