‘द लायन किंग’ : ‘सिनेमॅटिक मास्टरपीस’ नसला तरी नितांतसुंदर छायाचित्रण आणि सुरेख लाइव्ह-अ‍ॅक्शन रिमेक
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘द लायन किंग’चं पोस्टर
  • Sat , 20 July 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie द लायन किंग The Lion King

जगभरातील विविध चित्रपटसृष्टींचा विचार केला तर जवळपास सगळीकडेच जुन्या (आणि काही वेळा अगदी नवीनही) चित्रपटांच्या पुनर्निर्मितीचं वादळ आलेलं आहे. ‘डिस्नी स्टुडिओ’ तर झाडूनपुसून त्यांच्या सगळ्याच अ‍ॅनिमेटेड चित्रपटांचे लाइव्ह-अ‍ॅक्शन रूपात पुनर्निर्माण करण्यात व्यस्त आहे. अगदी याच वर्षी टिम बर्टन दिग्दर्शित ‘डम्बो’ आणि गाय रिची दिग्दर्शित ‘अलादिन’ हे दोन लाइव्ह-अ‍ॅक्शन रिमेक्स प्रदर्शित झाले आहेत. अशातच डिस्नी स्टुडिओ पुन्हा एकदा ‘द लायन किंग’ या १९९४ मधील सुप्रसिद्ध अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचा रिमेक समोर घेऊन आलेला आहे. 

जॉन फॅवरूने पूर्वी अशा प्रकारच्या चित्रपटाच्या उत्तम दिग्दर्शनाची किमया ‘द जंगल बुक’च्या (२०१६) निमित्ताने साधली होती. त्यामुळे तो या प्रकल्पावर काम करतोय हे सुरुवातीलाच स्पष्ट झालेलं असल्यानं त्याबाबत फारशी शंका असण्याचं कारण नव्हतं. दृश्यपातळीवर चित्रपट ‘नॅशनल जिओग्राफिक’ किंवा ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवरील एखाद्या माहितीपटाइतका अस्सल भासत असल्यानं त्यातील प्राण्यांना मानवाप्रमाणे बोलताना पाहण्याइतपत अविश्वासाच्या त्यागाची गरज भासते. हा इतका प्रेक्षकांवर अवलंबून असणारा भाग सोडल्यास दिग्दर्शक जॉन फॅवरू आणि या फोटोरिअ‍ॅलिस्टिक अ‍ॅनिमेशन चित्रपटाच्या निर्मितीमागील कलाकारांनी उत्तम कामगिरी केल्याचं दिसून येतं. 

आता हा चित्रपट म्हणजे मूळ कलाकृतीतील प्रत्येक दृश्यचौकटीचं केलेलं पुनर्निर्माण आहे. शिवाय, मूळ चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक हान्स झिमरदेखील इथं परतलेला आहे. त्यामुळे चित्रपट सुरू होतो, तेव्हा समोर येणारं उगवत्या सूर्याची आयकॉनिक दृश्य आणि त्याच्या पार्श्वभूमीवर लगोलग ऐकू येणारं तितकंच आयकॉनिक संगीत हे पैलू लागलीच आपल्याला त्या विश्वात घेऊन जातात. जवळपास पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा सांगितल्या जाणाऱ्या या कथेच्या केंद्रस्थानी आहे एक सिंह- सिम्बा (हिंदी आवृत्तीतील आवाज - आर्यन खान). त्याच्या जन्मापासून या कथेला सुरुवात होते. 

.............................................................................................................................................

दोन प्रवृत्तींमधील द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या ‘ओह माय गोडसे’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5010/Oh-My-Godse

.............................................................................................................................................

मुफासा (शाहरुख खान) या जंगलाच्या अनभिषित सम्राटाचा मुलगा असलेला सिम्बा लागलीच जंगलाचा भावी राजा म्हणून गौरवला जातो. मुफासाच्या राज्यात अगदी गुण्यागोविंदानं जगणारे सर्व प्राणी हा वारसाहक्क मान्यही करतात. त्यावर कुणाचाच आक्षेप असण्याचं काही कारण येत नाही. कारण, मुफासाने मांसभक्षक प्राण्यांनी इतर प्राण्यांची शिकार करण्यावर अनेक निर्बंध लादलेले आहेत. इथं राहणारे सगळे प्राणी या प्रदेशाला ‘गौरवभूमी’ म्हणतात. आणि खरं सांगायचं झाल्यास पिवळ्या, केशरी रंगांनी उजळून निघणाऱ्या या तेजस्वी प्रदेशाचं हे चित्र त्याच्या नावाला जागणारं असंच आहे. हे सगळं नितांतसुंदर पद्धतीनं टिपणारं कॅलेब डिशनेलचं छायाचित्रण ‘एव्हरी फ्रेम अ पेंटिंग’ या संज्ञेचं मूर्तीमंत रूप आहे. कारण, चित्रपटातील जवळपास प्रत्येक दृश्यचौकट एखाद्या सुंदर चित्राप्रमाणे भासणारी आहे. 

जंगलात इतर सगळे प्राणी खुश असले तरी मुफासाचा भाऊ- स्कार (आशिष विद्यार्थी) काही आनंदी नसतो. एकेकाळी मुफासाने मिळवलेलं राजपद आता त्याच्या मुलाकडे जाणार, म्हणजे याहीवेळी त्याची पदरी निराशाच येणार. स्कारच्या निमित्तानं या वैश्विक पोहोच असलेल्या कथानकात दुष्ट खलपात्र आणि सत्तापालट करण्यासाठीची त्याची तितकीच दुष्ट योजना येते. ज्यामुळे सिम्बाला त्याच्या विश्वापासून दूर जावं लागतं. ज्यानंतर त्याची भेट पुम्बा (संजय मिश्रा) आणि टिमॉनशी (श्रेयस तळपदे) होते. पुढे नालाच्या (ऐश्वर्या राजेश) रूपात आपल्या विधिलिखितानुसार राजा बनण्यास प्रोत्साहन देणारं कुणीतरी त्याला भेटतं. मात्र हे सगळं करायचं की नाही, हे त्याच्या हातात असतं. 

स्कार समोर आल्यानंतर किंवा त्याचं राज्य प्रस्थापित झाल्यानंतर समोरील दृश्यांना एक विशिष्टरीत्या गडद अशी छटा प्राप्त होते. हा बदल कधीकाळच्या ‘गौरवभूमी’ला स्मशानकळा आल्याचं समर्पकपणे मांडणारा आहे. ज्यात छायाचित्रकार डिशनेलचं काम अधिकच प्रभावी झालेलं आहे. 

हिंदी आवृत्तीमध्ये कमी अधिक फरकानं मूळ चित्रपटाइतकंच प्रभावी लिखाण असलं तरी काही वेळा काही संवाद रटाळ भासू शकतात. या आवृत्तीतील गाणी मूळ गाण्यांइतकी परिणामकारक नाहीत. चित्रपटातील पात्रांना हिंदीत आवाज बहाल करणाऱ्या कलाकारांची कामं मात्र अगदीच सुरेख आहेत. आर्यन खानचा आवाज शाहरुखच्या आवाजासारखा भासणारा असल्यानं तो इथं शोभून दिसतो. (आता चित्रपटसृष्टीतील वशिलेबाजीची परंपरा नक्कीच वादाचा विषय आहे. तूर्तास त्याकडे न वळलेलं बरं.) संजय मिश्रा, असरानी, श्रेयस तळपदे हे कलाकार मूळ चित्रपटातही विनोदी भूमिकेत असणाऱ्या पात्रांना आवाज देत त्यांचा परिणाम अधिकच उंचावून ठेवतात. 

जुन्याच कथेचं पुनर्कथन म्हणावा असा हा चित्रपट ज्या पद्धतीनं पडद्यावर आणला आहे, त्यासाठी एकदा तरी पहावा असा आहे. त्याला ‘सिनेमॅटिक मास्टरपीस’ वगैरे म्हणता येणार नसलं, तरी हा एक प्रभावीपणे निर्मिलेला एक रंजक चित्रपट नक्कीच आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......