‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल’ - वेळोवेळी रंजक ठरत असला तरी पूर्णतः खिळवून ठेवत नाही!
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल’चं एक पोस्टर
  • Sat , 15 June 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie ‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल Men in Black International

‘मेन इन ब्लॅक’ चित्रपट मालिका अमेरिकन चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय आणि रंजक चित्रपट मालिकांपैकी एक आहे. एकीकडे डिस्ने स्टुडिओ अॅनिमेटेड चित्रपटांना पुन्हा लाइव्ह अॅक्शन चित्रपट म्हणून समोर आणत, तर (डिस्नेचाच एक भाग असलेला) मार्व्हल स्टुडिओ ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ उभारून पैसे कमावत असताना इतरही चित्रपट निर्मिती कंपन्यांनी या स्पर्धेपासून दूर राहून चालणार नाही. परिणामी जवळपास सगळेच स्टुडिओ आपल्याकडे असलेल्या चित्रपटांचे वा चित्रपट मालिकांचे हक्क तपासून त्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या कामी लागलेले आहेत. त्यातूनच दोन आठवड्यांपूर्वी ‘गॉडझिला : किंग ऑफ मॉन्स्टर्स’सारखे चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. ‘मेन इन ब्लॅक’चे हक्क बाळगून असणारी कोलंबिया पिक्चर्सदेखील साधारण हेच करत या चित्रपटविश्वाचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यातूनच निर्माण झालेला ‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल’ काही प्रमाणात रंजक असला तरी चावून चावून चोथा झालेल्या रटाळ कथानकामुळे अपरिणामकारक आणि अपरिपक्व ठरणारा आहे.

विल स्मिथ आणि टॉमी ली जोन्स मध्यवर्ती भूमिकांमध्ये असलेल्या मूळ चित्रत्रयीमध्ये ‘मेन इन ब्लॅक’ (सामान्यतः ‘एमआयबी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) नावाची एक गुप्त सरकारी संस्था पृथ्वीवर राहत असलेल्या परग्रहवासीयांची देखरेख ठेवत, पृथ्वीवासियांपासून परग्रहवासीयांच्या अस्तित्वाचं सत्य लपवत या ग्रहाचं संरक्षण करत असल्याचं कथानक केंद्रस्थानी होतं. ‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल’ याच चित्रपटविश्वाचा भाग आहे, आणि ‘एमआयबी’चा स्पिन-ऑफ आहे.

मॉली लहान असताना तिच्या घरात आलेल्या एका परग्रहवासीयामुळे तिचा संबंध ‘मेन इन ब्लॅक’शी आलेला असतो. त्यावेळी लोकांपासून परग्रहवासीयांचं अस्तित्व लपवण्यासाठी परग्रहवाश्यांचा अनुभव आल्याची आठवण मिटवण्याच्या यंत्राचा उपयोग केला जातो, त्याचा वापर मॉलीवर केला जात नाही. त्यामुळे आपलं आयुष्यातील एक विस्तृत काळ या संस्थेच्या शोधात घालवत तिच्यात सामील होण्याचं स्वप्न मॉली (टेसा थॉम्पसन) बाळगून असते. तिचं हे स्वप्न साकार होऊन ती या संस्थेत भरती होते, आणि लागलीच तिचं नामकरण ‘एजंट एम’ असं केलं जातं. दरम्यान हाइव्ज नामक परग्रहवासी प्रजातीच्या उपद्व्यापामुळे पृथ्वी धोक्यात असते. चित्रपटातील सुरुवातीच्या - २०१६ मधील दृश्यानुसार ‘एमआयबी’मधील स्टार एजंट, एजंट एचने (क्रिस हेम्सवर्थ) संस्थेच्या लंडन विभागातील संचालक हाय टीच्या (लिएम नीसन) सोबतीने हाइव्जचा पराभव केलेला असल्याने ही केस सोडवायची जबाबदारी त्याच्यावर सोपवली जाते. आणि पृथ्वीचं अस्तित्व वाचवण्याच्या या प्रकरणात एजंट एमदेखील एचसोबत सामील होते.

यासोबतच ‘एमआयबी’मध्ये कुणीतरी विश्वासघातकी कृत्यं करत असल्याच्या उपकथानकाचीही इथे जोडणी दिली जाते. त्यामुळे कथानकाच्या पातळीवर ‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल’ अधिकच रटाळ बनतो. कारण इथली सगळीच उपकथानकं याआधीही अनेकविध चित्रपटांमध्ये दिसून आलेली असल्याने त्यांत नावीन्याचा अभाव आहे.

अगदी - एखाद्या गुप्त संस्थेतील विश्वासघातकी व्यक्ती - हे प्रकरणही जेम्स बाँडपट ते ‘मिशन इम्पॉसिबल’पर्यंत कित्येक देशी-विदेशी चित्रपटांमध्ये दिसून आलेलं आहे. या सगळ्या नावीन्य लोपलेल्या गोष्टींच्या वापरामुळे आर्ट मार्कम-मॅट हॉलवेचं कथानक खिळवून ठेवू शकत नाही. याशिवाय एफ. गॅरी ग्रेचं दिग्दर्शनदेखील विशेष परिणामकारक नसून कामचलाऊ असल्याने ते चित्रपटाला मारक ठरतं.

‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल’बाबतच्या काही उत्तम आणि सर्जनशील निर्णयांपैकी एक म्हणजे ‘एमआयबी’ विश्वातील सेल्फ अवेअर विनोदाशी असलेलं आपलं नातं कायम राखतो. ज्यातून चित्रपटाला या विश्वातील आधीच्या चित्रपटांप्रमाणे पॉप-कल्चरबाबत विनोद करता येतात. चित्रपटाच्या अशाच विनोदांचं एक मूर्त स्वरूप म्हणजे मध्यवर्ती भूमिकांमधील अभिनेत्यांची कास्टिंग. समकालीन अमेरिकन चित्रपटांचं ज्ञान बाळगून असलेल्या कुणाही व्यक्तीला हेम्सवर्थ-थॉम्पसन जोडी मार्व्हलच्या विश्वातील एक लवकरच प्रसिद्धीस पावलेली जोडी असल्याचं माहीत असेलच. त्यामुळे साहजिकच इथे ‘विश्वरक्षक’ म्हणून समोर येणाऱ्या या दोघांमधील केमिस्ट्रीसोबतच रंजक विनोदनिर्मितीतही भर पडते.

अर्थात चित्रपट स्वतःला तितक्याशा गंभीरतेनं घेत नाही ही गोष्ट त्याचं बलस्थानदेखील बनते आणि उणीवदेखील. यातून आधीच्या चित्रत्रयीतील स्मिथ-जोन्स जोडीची भासणारी कमतरता कमी होत नसली तरी चित्रपटातील ही पात्रं अपेक्षित ती कामगिरी करतात असं म्हणता येतं.

सदर चित्रपट वेळोवेळी रंजक ठरत असला तरी तो पूर्णतः खिळवून ठेवतो, किंवा परिणामकारक ठरतो असं नाही. ज्याचं कारण मुख्यत्वे त्याच्या अपरिपक्व कथानकात दडलेलं आहे. तो अधिक चांगला होण्यासाठी त्याला आधीच्या चित्रपटांइतकी वैचित्र्यपूर्ण मध्यवर्ती पात्रं, आणि तितक्याच वैचित्र्यपूर्ण कथानकाची गरज होती. दुर्दैवाने ती इथे पुरी होत नाही. ज्यामुळे ‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल’ लोकप्रिय चित्रपट मालिकेच्या पुनरुज्जीवनाचा एक क्षीण प्रयत्न म्हणून समोर येतो.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......