‘ठाकरे’ : उत्तरार्धात काहीसा गोंधळलेला असला तरी सिनेमा वाईट नक्कीच नाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘ठाकरे’चं पोस्टर
  • Sat , 26 January 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie ठाकरे Thackeray नवाजुद्दिन सिद्दिकी Nawazuddin Siddiqui

‘ठाकरे’ हा सिनेमा तांत्रिक बाबी, दिग्दर्शन, अभिनय अशा अनेक पातळ्यांवर तो उत्तम जमून आलेला आहे. मात्र, तो मागे पडतो तो त्याच्या नायकाच्या राजकीय धोरणांच्या चित्रणात. अर्थात ते काही तो चरित्रनायकाची विचारसरणी, धोरणं समोर मांडत नाही यामुळे नव्हे. कारण तो ही धोरणं, मग भलेही ती विरोधाभासी किंवा दुटप्पी असली तरी, अनअपॉलजेटिकपणे समोर मांडतो. फक्त फरक इतकाच आहे की, असं करताना या अनअपॉलजेटिकपणाचं रूपांतर हिरॉइझममध्ये होतं. आणि हे होण्याचं कारण म्हणजे ही मतं मुळात विरोधाभासी आहेत हेच चित्रपट (आपल्या नायकाप्रमाणेच) ओळखत/मान्य करत नाही. ज्यामुळे त्याचा आपल्या नायकाच्या (आणि नायकाविषयीच्याही) विचारांना पडद्यावर आणण्याच्या नादात उत्तरार्ध त्याच्या उत्तम अशा पूर्वार्धापुढे ठळकपणे कमकुवत भासतो. त्यामुळे त्याचं आपल्या नायकाशी, त्याच्या विचारसरणीशी (कुठलाही गंड न बाळगता) प्रामाणिक राहणं स्वागतार्ह असलं तरी हे सगळं एकूण चित्रपटाच्या दृष्टीनं नक्कीच सकारात्मक ठरत नाही.

बाळ ठाकरे (नवाजुद्दिन सिद्दिकी) यांच्यावर बाबरी मस्जिद प्रकरणादरम्यान खटला भरण्यात आला होता, हे तर सर्वश्रुत आहे. ‘ठाकरे’देखील इथूनच, एप्रिल १९९४ पासून सुरू होतो, आणि मग फ्लॅशबॅक्सच्या माध्यमातून ठाकरेंचा सामाजिक-राजकीय प्रवास उलगडत जातो. तूर्तास कथानक जाणून घेण्यापुरतं का होईना पण ठाकरेंची विचारसरणी योग्य की अयोग्य हा विचार बाजूला ठेऊ. तर, ठाकरेंची तीक्ष्ण (की तीव्र) विनोदी नजर आणि व्यंगचित्रं ‘फ्री प्रेस जर्नल’च्या संपादक आणि व्यवस्थापनाला खटकत असल्यानं ठाकरे आपल्या स्वाभिमानी प्रवृत्तीमुळे नोकरीचा राजीनामा देतात. त्यानंतर ठाकरेंना त्यांचा भोवताल, मराठी माणसांना मिळणारी वागणूक आणि अमराठी लोकांविषयीची लोकांच्या (की त्यांच्या) मनातील चीड, यामुळे ‘घाटी’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्यांसाठी त्यांना काहीतरी करावंसं वाटतं. परिणामी ‘मार्मिक’ची सुरुवात आणि कालांतरानं शिवसेनेची स्थापना होते. पण पुढे सेना लवकरच राजकीय क्षेत्रात सक्रिय होते आणि सेनेचा मुंबईतील जय-पराजय ते थेट सेनेचा मुख्यमंत्री असा साधारण चारेक दशकांचा विस्तृत कालखंड बऱ्याच उड्या घेत (आणि अर्थातच संदर्भ गाळत), तरीही परिणामकारक ठरेल अशा स्वरूपात समोर मांडला जातो. असं करताना १९९४ मधील खटल्यातील ठाकरेंवरील कारवाई आणि फ्लॅशबॅक्समधून चालणारी बाळासाहेबांची (आणि परिणामी शिवसेनेची) वाटचाल, अशा दोन पातळ्यांवर चित्रपट पुढे सरकत राहतो.

‘ठाकरे’ अभिजित पानसेची पटकथा आणि दिग्दर्शकीय कौशल्य यांच्यामुळे अधिक उत्तम ठरतो. याआधी ‘रेगे’च्या निमित्तानं पानसेंच्या थक्क करणाऱ्या संहिता-बांधणीची कल्पना आलेली आहे. इथंही अगदी तसंच घडतं. ज्याद्वारे मुळातच कथानकाच्या आणि संकल्पनांच्या पातळीवर गोंधळ नसलेला पूर्वार्ध प्रभावी ठरतो. याखेरीज अधूनमधून अॅनिमेशनसह केलेली दृश्यांची मांडणी सिनेमाला रंजकही बनवतेच.

१९९४ मधील खटल्याचं दृश्य रंगीत असलं तरी त्यानंतर पूर्ण पूर्वार्धभर दाखवली जाणारी भूतकाळातील दृश्यं ब्लॅक अँड व्हाइट आहेत. सुदीप चटर्जीच्या कॅमेऱ्यानं टिपलेल्या या कृष्ण-धवल दृश्यांना उत्तम संवाद, कला दिग्दर्शन, पार्श्वसंगीत आणि कथेची साथ लाभून सिनेमॅटिक गुणवत्ता अनुभवायला मिळते. याखेरीज कथानक जसजसं पुढे जाऊ लागतं, त्यानंतर सेनेचा वाढता राजकीय प्रभाव, महाराष्ट्र तसंच भारतातील वाढतं राजकीय, सामाजिक आणि मुख्यतः धार्मिक अस्थैर्य यामुळे चित्रात हळूहळू भगवे-हिरवे (धार्मिक-राजकीय) असे रंग भरले जाऊ लागतात. मात्र, पुढे उत्तरार्धात इतकं काही घडतं (किंवा मग घडणार असतं) की, हा भाग पूर्णतः रंगीत स्वरूपात समोर येतो. इथं चित्रात भरले जाणारे रंग मूळ कथेचा डोलाराच डगमगायला लागलेला असल्यानं चित्रपटाला वाचवू शकत नाहीत. अर्थात, हा उत्तरार्धही काही चित्रण आणि अभिनय अशा बाबतीत वाईट नसला तरी तो एव्हाना नायकाची विचारसरणी मांडताना उडालेल्या गोंधळामुळे चित्रपटावर नकारात्मक परिणाम करतो.

आता हे घडतं कसं तर या चारेक दशकांदरम्यान घडलेल्या बऱ्याचशा गोष्टींमुळे बाळासाहेबांची आणि परिणामी शिवसेनेची विचारधारा बदलल्याचं आढळतं. म्हणजे आधी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणत घेतलेली भूमिका आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसोबत झालेल्या बैठकीमध्ये मात्र काहीसं लवचिक रूप धारण करत, वेगळ्या शब्दांत मांडली जाते. याखेरीज न्यायालयात दिलेला जाबही फारच संदिग्ध आणि पळवाटा शोधणाऱ्या स्वरूपाचा भासतो. भूमिकादेखील वेळोवेळी प्रांतवादी ते हिंदुत्ववादी ते पुन्हा प्रांतवादी अशी बरेच बदल अनुभवते. त्यामुळे आधी उल्लेख केल्याप्रमाणे आक्रमक दृष्टिकोन, धोरणांमधील बदल हे सगळं स्वागतार्ह असलं तरी ते चित्रपटाचा आणि कथानकाचा विचार करता काहीसं गडबडीचं आहे.

याखेरीज हिटलरचं समर्थन करणाऱ्या कथनाच्या आणि संवादांच्या जोरावर चरित्रनायकाच्या बऱ्या-वाईट सर्वच विचारांना समोर आणण्याचा उद्देश वरवर कितीही प्रामाणिक असला तरी इथं चित्रपटाला अपेक्षित परिणाम हा हिरॉईक, टाळ्या घेणारी प्रतिमा उभी करणं असल्यानं हा ‘आम्ही भारी-वाईट सगळी मतं अनअपॉलजेटिकपणे समोर मांडतो’ स्टॅन्ड स्वीकारार्ह ठरत नाही. तसं तर ‘हाऊस ऑफ कार्ड्स’मधील मध्यवर्ती पात्र असलेला अँटी-हिरो फ्रॅंक अंडरवुडदेखील ‘डेमॉक्रसी इज सो ओव्हररेटेड’ म्हणत हुकूमशाहीचं समर्थनच करत असतो. मात्र, तिथं निर्माते त्या पात्राला जितकं नायकत्व बहाल करतात, तितकंच त्याच्या वाईट कृतींविषयी घृणा निर्माण व्हावी असंही रेखाटतात. इथं मात्र तटस्थ असण्याचा केवळ आभास निर्माण केला जातो. परिणामी उत्तम आणि पॉलिश्ड मांडणीच्या आवरणाखाली हा सिनेमा इतरही बऱ्याचशा बाबी अलगद सरकवू पाहतो, जे मुळातच चुकीचं आहे.

‘ठाकरे’चं कास्टिंग ही त्याच्या प्लस पॉइंट्सपैकी एक मानवी लागेल. ज्यात अगदी मुख्य भूमिकेतील नवाजुद्दिन सिद्दिकी (बाळसाहेब ठाकरे), अमृता राव (मीना ठाकरे), अशोक लोखंडे (यशवंतराव चव्हाण), प्रवीण तरडे (दत्ताजी साळवी), संजय नार्वेकर (कृष्णा देसाई), राजेश खेरा (मोरारजी देसाई), संदीप खरे (मनोहर जोशी), प्रकाश बेलवडी (जॉर्ज फर्नांडिस), निखिल महाजन (शरद पवार) अशा अगदी छोट्या ते विस्तृत सर्वच प्रकारच्या भूमिकांतील कलाकार अगदी परफेक्ट वाटतात. नवाजुद्दिन कमाल करतो, हे वेगळं सांगणे न लगे.

एकूणच, ‘ठाकरे’ हा त्यातील कथानायकाची भूमिका मांडताना (उत्तरार्धात) काहीसा गोंधळलेला असला तरी सिनेमा वाईट नक्कीच नाही. त्याचा पूर्वार्ध तर नक्कीच उत्तम आहे. चरित्रनायक ठाकरेंचे चाहते हा चित्रपट चुकवणार अशी शक्यता नाहीच, मात्र तो दिग्दर्शक अभिजित पानसेंच्या कामाशी परिचय असलेल्या आणि एकूणच सिनेमा माध्यमाच्या चाहत्यांनीही चुकवू नये. शिवाय, तो आवडो-न आवडो, त्यातील सिनेमॅटिक मूल्यांकडे दुर्लक्ष होऊ नये.

टीप : ‘ठाकरे’चा पुढील भागही येणार आहे. अर्थात, अजून चित्रीकरणाला सुरुवात झालेली नाही.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......