‘हाऊस ऑफ कार्ड्स’मधला फ्रॅंक अंडरवुड प्रत्येक क्षणाशी वाटाघाटी करण्याचं, सौदेबाजी करण्याचं मूल्य देतो...
कला-संस्कृती - टीव्ही मालिका
समीर शिपूरकर
  • ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ची पोस्टर्स
  • Sat , 19 January 2019
  • कला-संस्कृती टीव्ही मालिका हाऊस ऑफ कार्ड्स House of Cards

नेटफ्लिक्सवर ‘हाऊस इफ कार्ड्स’ नावाची ७३ भागांची  एक ‘पोलिटिकल थ्रिलर’ मालिका आहे. २०१३ ते २०१८ च्या काळात या मालिकेची निर्मिती केली आहे.

अमेरिकन राजकारण-सत्ताकारण यांच्याभोवती आपल्याला फिरवत, गुंगवून ठेवणारी ही मालिका आहे. तीव्र सत्तासंघर्ष मांडता मांडता मानवी स्वभावाच्या अनेक पैलूंवर भाष्य करत ही मालिका पुढं सरकत जाते.

माणसाची मूळ प्रवृत्ती काय, स्वार्थ की परोपकार? सतत चर्चेत असलेला हा एक विषय आहे. दोन्ही बाजूंनी जोरकस मांडणी केली जात असते. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याची माणसाची वृत्ती नैसर्गिक आहे असं म्हणता येईल का? मग माणसामध्येच सहकाराची भावना दिसते त्याचं स्पष्टीकरण कसं देता येईल? माणूस लोकशाही या मूल्यासाठी तयार झाला आहे का? की आतून अजूनही तो हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे? हुकूमशाही प्रवृत्ती ही माणसातली विकृती म्हणून बघायची की, तो फक्त एक टोकदार आविष्कार म्हणून बघायचा?

हे आणि असे अनेक प्रश्न ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ बघताना मनात येत राहतात. 

मुळात माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीवर सतत प्रकाशझोत टाकत राहणं आणि तीच माणसाची मूळ प्रवृत्ती आहे असं ठसवत राहणं हा जुना भांडवलशाही प्रोजेक्ट याही मालिकेतून मांडला गेलाय की, काय असाही विचार मनात येऊन जातो.

हे सगळे प्रश्न नोंदवून ठेवत आपल्याला ही मालिका बघत पुढं जात येईल.

यातल्या राजकारणाचं विश्लेषण अनेक बाजूनी करता येईल. या राजकारणाचे परिणाम खुद्द अमेरिकेच्या लोकांवर कसे होतात आणि बाहेरच्या जगावर कसे होतात वगैरे तपासता येईल. पण त्याआधी त्यातलं एक पात्र खूप हातवारे करून, जोरकस बोलून, वेळप्रसंगी आक्रस्ताळेपणा करून आपलं लक्ष वेधून घेतंय, त्याच्याकडं बघायला पाहिजे.

हे गृहस्थ आहेत फ्रॅंक अंडरवुड.

फ्रॅंक अंडरवुड हा डेमोक्रॅटिक पक्षाचा सभासद आहे. महत्त्वाकांक्षी आहे.

आपल्यामध्ये आणि फ्रॅंक अंडरवुडमधे समान दुवे कमी सापडले तरी तो आपल्यावर मोठा प्रभाव टाकत जातो. जणू एक नवं मूल्यच देऊन जातो. हे मूल्य उदात्त-उच्चतर वगैरे नाहीये. हे मूल्य आहे वास्तवात वावरण्याचं. प्रत्येक क्षणी वास्तवात वावरण्याचं. पण या वास्तवभानाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येक क्षणाशी वाटाघाटी करण्याचं, सौदेबाजी करण्याचं. फ्रॅंक अंडरवुडची दिशा स्पष्ट आहे- जगातलं जे जे आपल्या मनासारखं नाही, ते ते आपल्या दिशेनं वळवून घ्यायचं. आणि हे वळवण्याचं-वाकवण्याचं राजकारण फ्रॅंक मोठ्या हिकमतीनं करतो. 

न थकता, न कंटाळता, थंडगारपणा राखून प्रत्येक क्षणाशी अविरत-सातत्यपूर्ण झगडा करायचा असतो असा त्याचा विश्वास आहे. आणि प्रत्येक क्षणातून काही-ना-काही हासील करत रहायचं असतं, हे त्याचं जगण्याचं सूत्र आहे.

अगदी नातेसंबंधांमध्येसुद्धा त्याचा हाच दृष्टिकोन आहे. बायकोशी - क्लेअर अंडरवुडशी - असलेलं नातंसुद्धा असं सतत भानावर राहून देवघेव-वाटाघाटी करत रहाव्यात अशा प्रकारातलं आहे. ‘डील विथ द सिच्युएशन’चा अर्थ त्याच्यासाठी ‘परिस्थितीशी सौदा करणं’ हाच आहे. बायकोशी त्याचं असलेलं नातं हे रूढ अर्थानं प्रेमाचं नाहीये, रोमँटिक नाहीये. सत्ताकारणाच्या या खेळात आपली बायको आपल्यासाठी सर्वांत मदतशील आणि सर्वांत विश्वासार्ह आहे याचं त्याला भान आहे. त्यामुळं ती आपल्याला तुल्यबळ अशी मदतनीस आहे, तिला काहीही करून आपल्यापाशी राखलं पाहिजे, वेळप्रसंगी नमतं घेतलं पाहिजे, तिच्या आकांक्षांना वेळोवेळी वाव दिला पाहिजे, तिची सत्तेची भूक भागवली पाहिजे, याचं विलक्षण भान फ्रॅंकपाशी आहे.

इकडं क्लेअर अंडरवुड हीसुद्धा फ्रँकचे बरेच गुण बाळगणारी स्वतंत्र विचारांची महत्त्वाकांक्षी स्त्री आहे. आपला नवरा काहीही झालं तरी स्वतःचं वरचं स्थान सोडत नाहीय हे तिला कळतंय. तरीही तीसुद्धा परिस्थितीशी वाटाघाटी करतीय. भावनेच्या भरात वाहून जाण्याची तिची तयारी नाहीय. उलट वाट बघण्याची तिची लांब पल्ल्याची तयारी आहे. फ्रॅंक आक्रमक, आक्रस्ताळा आहे. क्लेअर शांत आहे, संयमी आहे, अगदी आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा चेहऱ्यावर मंद स्मित बाळगण्याची क्षमता तिच्यात आहे.

‘प्रत्येक स्त्री फेमिनिस्ट असेल’ असं समजण्याची चूक करू नका असा इशारा क्लेअर अंडरवुड आपल्याला देत राहते.

आपण लबाड वागतो हे फ्रॅंक अंडरवुडला माहिती आहे. आपण क्रूर होऊ शकतो हे त्याला योग्यच वाटतं. आपण स्वार्थी राहू शकतो याला त्याची सहजमान्यता आहे. सततच्या अस्थिरतेचा त्याला मनापासून स्वीकार आहे. एरवी सामान्य माणूस दमतो, थकतो होतो आणि शेवटी कशाचा तरी आधार घेऊन एका ठिकाणी विसाव्याला येतो. मग हे विसाव्याचं ठिकाण एखादी व्यक्ती असेल, एखादं मूल्य असेल, विचारधारा असेल किंवा देव असेल. पण फ्रॅंक अंडरवुडचा विसावा नेमका कोणता हेच आपल्याला कळत नाही. पृथ्वीवर एकदाच इंधन भरून सूर्यमालेच्या बाहेर पाठवलेली अंतराळयानं जशी सूर्यकिरणं शोषत स्वतःच्या बळावर नव्या सूर्याकडे जात राहतात, तसा फ्रॅंक स्वतःच स्वतःला इंधन पुरवत राहतो आणि पुढं पुढं जात राहतो. 

फ्रँकची लबाड वृत्ती इतर लोकांना कळत असते, त्यांच्या मनात त्याच्याविषयी तीव्र तिरस्काराची भावना निर्माण करत असते. ही तिरस्काराची भावना फ्रॅंकपर्यंत सतत पोहोचत असते. पण हा पठ्ठ्या डगमगत नाही.

फ्रॅंक आपल्यासमोर पूर्ण उघड्या-नागड्या स्वरूपात येतो. इतका की आपल्याला तो पेलवत नाही. वर हा मिस्कीलपणे आपल्या डोळ्याला डोळा भिडवून आपल्या मनातल्या गमती आपल्याला सांगत राहतो. सगळी तीव्र घुसळण आपल्यासमोर मांडत राहतो. जणू प्रत्येक प्रसंगात आपणही खरोखरच तिथं आहोत असं मानून तो आपल्याशी बोलत राहतो. लोक कसे मूर्ख आहेत, कुणाची नाजूक जागा कोणती आहे, कुठल्या व्यक्तीला कशासाठी सांभाळून ठेवलंय, एखाद्या व्यक्तीला संपूर्ण उदध्वस्त करण्याची पद्धत कोणती अशी त्याची अनेक गुपितं तो आपल्याला सांगत राहतो.

या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगण्यामागं फ्रॅंक अंडरवुडचा हेतू जर आपल्याला कळाला तर आपला थरकाप उडतो. तो आपल्याला जणू म्हणतो, “तुम्हीसुद्धा माझ्याइतकेच भंपक आहात, कपटी आहात. मी जे डावपेच करतो ते तुम्हीसुद्धा दररोज करता, पण ते मान्य करण्याची हिंमतसुद्धा तुमच्यात नाही. तेव्हा ही लपवाछपवी बंद करा आणि माझ्या खेळात सामील व्हा, आपण सगळे एकच आहोत.”

तर फ्रॅंक अंडरवुड नकळत आपल्या मनातल्या अंधाऱ्या डोहात उतरत जातो. जेव्हा तो डोळ्यात डोळे घालून आपल्याशी बोलतो, तेव्हा तो आपल्या आत दडलेल्या आदिमानवी प्रेरणांना साद घालतो. उत्क्रांतीच्या प्रवासात माणसाच्या मेंदूवर कॉर्टेक्स आणि निओकॉर्टेक्स हे जे थर जमले आहेत, ते अलगद बाजूला करून फ्रॅंक अंडरवुड थेट आपल्या भावनिक मेंदूला हात घालतो, जिथं भूक-झोप-भीती-संभोग-सत्ता अशा फक्त प्राथमिक गरजा उरतात. आणि हा राजकारणाचा सबंध डोलारा या प्राथमिक गरजांच्या पूर्तीसाठी रचला गेला आहे याची खणखणीत जाणीव तो आपल्याला करून देतो.

मग आपल्याला दिसायला लागतात ते व्हाईट हाऊसमधे वावरणारे हे सुटाबुटातले केसाळ अश्मयुगीन स्त्री-पुरुष. हे सगळे मिळून आपल्यासमोर एक भव्य पट मांडतात, ज्याचा नायक आहे फ्रॅंक अंडरवुड. लोकशाही, समानता वगैरे आधुनिक मूल्यांच्या छाताडावर उभा राहून फ्रॅंक आपल्यासमोर अनेक पेच निर्माण करून ठेवतो. ही मूल्यं हवी तशी, हवी तेव्हा वाकवता येतात, वळवता येतात याचा थेट अनुभव तो आपल्याला देतो. ‘डेमोक्रसी इज ओव्हररेटेड’ हे त्याचं वाक्य आपल्याला अस्वस्थ करत राहतं.

आता फ्रॅंककडून कोणी काय घ्यावं हा ज्याचा-त्याचा किंवा जिचा-तिचा प्रश्न आहे. अगदी भारतातलं राजकारणही याच वळणावर आहे की, फ्रँकचा थंडगार क्रूरपणा अशा वातावरणात एक मोठा गुणच ठरावा.

सतत भीतीचं, ताणाचं वातावरण निर्माण व्हावं, अविश्वास हवेत पसरावा, अड्रेनलीनसारख्या द्रावाचा स्त्राव जास्तीत जास्त व्हावा, जेणेकरून लोक सतत अस्वस्थ राहतील आणि आपण काहीही करून कोणत्याही मार्गानं आपलं वर्चस्व सिद्ध करावं ही आजच्या काळात रुळलेली वाट आहे. 

फ्रॅंक अंडरवुडशी जवळचं नातं सांगणारे अनेक नेते आज जागतिक राजकारणात मोक्याच्या जागी येऊन बसलेत. त्यामुळे फ्रॅंकला  समजून घेणं जास्त महत्त्वाचं.

त्याचबरोबर, ज्यांना मानवी मनाचा खेळ समजून घेण्याची इच्छा आहे, जे आपल्या नैतिकतेच्या चौकटी बाजूला करून ‘जे चालू आहे’ त्याचं निरीक्षण करू शकतात त्यांच्यासाठी फ्रॅंक अंडरवुड हे एक झपाटून टाकणारं रसायन आहे.

तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर तो डोळ्याला डोळा भिडवून मिश्किलपणे हसेल आणि ‘कम धिस वे’ असं म्हणून व्हाईट हाऊसच्या तळघरातल्या गोलगोल जिन्यानं खाली नेईल आणि मानवी व्यवहाराच्या तळाशी असलेल्या रौद्र खेळात सामील करून घेईल.

तळघरात राहून सत्तासंघर्षाच्या टोळीयुद्धात उतरायचं की समानतेच्या वाटा हुडकण्याचे प्रयत्न सुरू ठेवायचे हा पुन्हा, ज्याचा-त्याचा किंवा जिचा-तिचा प्रश्न आहे.

.............................................................................................................................................

लेखक समीर शिपूरकर डॉक्युमेंटरी फिल्ममेकर असून अवकाश निर्मिती या संस्थेतर्फे डॉक्युमेंटरी बनवणे, प्रसार करणे हे काम करतात.

sameership007@gmail.com                  

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Mandar Parkhi

Mon , 21 January 2019

समीर, छान लिहिलंय. Thanks for sharing. स्वार्थी असणं, जगातील प्रत्येक गोष्टीचा स्वत:साठी उपयोग करून घेणं, तेच जगणं आहे असं मानणं, हा राजकारण व काॅर्पोरेट जगाचा rule (there are many exceptions) आहे असं दिसतं. आणि situation बदलायची असेल तर आधी ती पूर्णपणे माहीत असली पाहिजे. मी ही नेट सीरिज नक्की पाहीन. Actually, पुस्तक वाचायला आणखी आवडेल आणि वेळाच्या दृष्टीने जमेल.