'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अक्षय शेलार
  • पिफ २०१९
  • Mon , 14 January 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र पिफ Pune International Film Festival Damn Kids डॅम किडस

कालच्या १० जानेवारीला १७ व्या ‘पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’चे उद्घाटन झाले असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘पिफ’च्या निमित्ताने पुण्यातील सिनेरसिक जगभरातील विविध भाषांतील शेकडो चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. महोत्सवातील चित्रपट पाहण्यासाठीचे मुख्य स्थळ असलेल्या सिटी प्राइड, कोथरूडमध्ये महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल, कलात्मक दिग्दर्शक समर नखाते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘पिफ’चा उद्घाटन समारोह पार पडला. यानंतर सायंकाळी याच ठिकाणी चिलीच्या ‘डॅम किड्स’ या ओपनिंग फिल्मची स्क्रीनिंग होऊन महोत्सवातील पहिला दिवस पार पडला.

एकीकडे महोत्सवाला उपस्थिती लावणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होत असताना ‘पिफ’शी संलग्न असलेली थिएटर्सची संख्या मात्र दर वर्षागणिक कमी होत जाताना दिसते. यावर्षी तर पूर्वीप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेशी टाय-अपदेखील नसल्याने तेथील ज्यादाच्या स्क्रीन्सही यावेळी नसतील. शिवाय, तेथील सिनेरसिकांच्या संख्येचा भार इतर स्थळांवर पडेल तेही वेगळंच.

१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यातील निवडक चित्रपटगृहांमध्ये पार पडणाऱ्या या महोत्सवाची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

मराठी कम्पिटीशन अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या सातपैकी तीन चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित झाले आहेत. शिवाय त्यातील ‘मुळशी पॅटर्न’ तर अजूनही चित्रपटगृहांमध्ये टिकून असताना त्याचं महोत्सवातील मुख्य चित्रपटगृहांत सर्वाधिक क्षमतेच्या स्क्रीन्सवर होऊ घातलेलं प्रदर्शन महोत्सवांत पूर्वीच प्रदर्शित होऊन गेलेल्या चित्रपटांना मिळणारा थंड प्रतिसाद पाहता प्रश्नचिन्ह उत्पन्न करणारं आहे. असं असलं तरी याच विभागातील सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’ आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘खटला बिटला’ हे चित्रपट महत्त्वाचे चित्रपट असून, त्यांच्या दिग्दर्शकांचे आधीचे चित्रपट पाहता आकर्षणाचं कारणही आहेत.

‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ या विभागांतर्गत भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मेहबूब खान यांचे ‘मदर इंडिया’, ‘अमर’ आणि ‘अंदाज’, तर आंतराराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले इटालियन चित्रपट दिग्दर्शक बर्नार्डो बर्टोलुसी यांचे ‘द लास्ट एम्परर’, ‘लास्ट टॅंगो इन पॅरिस’ आणि ‘लिटिल बुद्धा’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. याखेरीज चित्रपटसृष्टीतील अलीकडील काळात निधन पावलेल्या लोकांना आदरांजली वाहणाऱ्या ‘ट्रिब्यूट’ या विभागांतर्गत श्रीदेवी यांचा ‘इंग्लिश विंग्लिश’, पटकथाकार शिनोबु हाशिमोटो यांचा (अकिरा कुरोसावा दिग्दर्शित) ‘टू लिव्ह’ आणि दिग्दर्शिका कल्पना लाझमी यांचा ‘रुदाली’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. नानाविध विभागांतर्गत समावेश असलेल्या चित्रपटांखेरीज पहायला मिळणारे इतरही बरेच कार्यक्रम या महोत्सवात असणार आहेत.

गोन्जालो जस्टिनिएनोचा ‘डॅम किड्स’

फारच प्रबळ असा राजकीय-सामाजिक मुद्दा आणि पार्श्वभूमी घेत, १९८३ च्या चिलीमध्ये घडणारा ‘डॅम किड्स’ तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि हुकूमशाही प्रवृत्तीच्या निमित्ताने एका खंबीर महिलेची कथा समोर आणतो. रशियात स्टॅलिन सत्तेत असताना त्याने जशी विरोधी मतप्रवाहातील लोकांच्या हत्येची आणि लोकांना रातोरात गायब करण्याची सत्रं सुरू ठेवली होती, अगदी तशाच तऱ्हेने ८३ च्या काळात चिलीमध्ये हुकूमशहा जनरल पिनोचेची हुकूमशाही सुरू होती. लोकशाहीची मागणी करणाऱ्या लोकांचं अपहरण आणि हत्या करणं तिथे राजरोसपणे सुरू होतं. त्याच पिनोचेच्या सत्तेच्या काळात चिलीत वास्तव्य असलेली ग्लॅडी ही महिला लोकशाहीच्या समर्थनार्थ आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीने ती सॅम्युएल थॉम्पसन या अमेरिकन तरुणाला आपल्या घरातील एक खोली भाड्याने देते.

त्यानंतर ‘डॅम किड्स’ साधारण दोन पातळ्यांवर पुढे सरकत राहतो. एकीकडे सॅम्युएलचा चिलीतील घटनांकडे पाहण्याचा तिऱ्हाईत स्वरूपाचा दृष्टिकोन दिसतो. ज्याद्वारे तो चिलीतील चिघळलेल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीकडे पाहताना दिसतो. तर दुसरीकडे ग्लॅडी आणि इतर नागरिकांचा पिनोचे आणि त्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नजरेत न येता स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची मागणी करण्याचा लढा सुरू असतो. तत्कालीन राजकीय परिस्थितीवर अतिशय प्रखर भाष्य आणि अभोवताली इतकं काही घडत असतानाही पात्रांचा दैनंदिन आयुष्याकडे पाहण्याचा हलकाफुलका विनोदी अंदाज यांत कमालीचा समतोल राखत ‘डॅम किड्स’ प्रभावी ठरतो. एकूणच त्यानिमित्ताने ‘पिफ’ची दणकेबाज सुरुवात झाली आहे असं म्हणता येतं.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................