‘२.०’ : परस्परविरोधी संकल्पनांच्या अतर्क्य मांडणीत गोंधळलेला चित्रपट
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘२.०’चं एक पोस्टर
  • Sat , 01 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie २.० 2.0 रजनीकांत Rajinikanth अक्षय कुमार Akshay Kumar शंकर Shankar

दिग्दर्शक शंकरच्या फिल्म्स तार्किकदृष्ट्या दोषपूर्ण असतात, त्या ‘स्टाईल ओव्हर सबस्टन्स’ या संज्ञेचं मूर्त रूप असतात. कारण शंकरचा चित्रपट हा रुपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी बनवलं गेलेलं रुपेरी स्वप्न असतं. त्यात लॉजिक आणि उत्तम कथा, एकसंध पटकथा यांची जागा उत्तम मूलभूत संकल्पना आणि तिचं सदोष तरीही सिनेमॅटिक, भव्यदिव्य रूप या गोष्टी घेतात. तर्क आणि मर्यादा अशा भौतिक संकल्पना बाजूला पडून त्यांच्या जागी भव्यता येते. कारण ती दिग्दर्शक शंकरची फिल्म असते, आणि सारं जग जाणतं की, तिच्यात सिनेमॅटिक वैभव हे फ्रंटफूटवर असतं. ‘२.०’देखील याहून वेगळा नाही. तो सदोष असला तरीही रंजक आहे. तसंही शंकरकडून त्याच्या अफाट कल्पनासौंदर्याचं श्रेय कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.

पक्षीराजाच्या (अक्षय कुमार) कृत्यांमुळे शहरातील लोकांचे सेल फोन्स अचानक गायब होऊ लागतात. कुठल्याही वैज्ञानिक संज्ञेच्या आणि मानवी ज्ञानाच्या पल्याड असणाऱ्या या गोष्टीमुळे शहरात हाहा:कार माजतो, वशीगरण (रजनीकांत) याआधीच्या चित्रपटात बॅन आणि डिसमँटल केलेल्या चिट्टीला पुन्हा सुरू करण्याचा उपाय सुचवतो. काही अतर्क्य घटनांमुळे सुरुवातीला सदर गोष्टीला मिळणारा नकार होकारात परिवर्तित होऊन चिट्टी पुन्हा कार्यरत होतो, आणि शंकरच्या सौंदर्यदृष्टीचा विचार करता तिच्या आवाक्यामुळे थक्क करणाऱ्या कामगिरीला सुरुवात होते. त्यानंतर चांगल्या मूलभूत संकल्पनेला ओव्हर द टॉप तरीही रंजक अशा पद्धतीनं पडद्यावर आणण्याची किमया साध्य केली जाते.

शंकरच्या चित्रपटात सूक्ष्मता, सबटेक्स्ट या गोष्टींना फारसा वाव तसा नसतोच. इथंही अगदी खलनायकाचं नावही सूक्ष्मतेचा अभाव असणारं, लगेच अंगावर येणारं आहे. पण पुन्हा असंही म्हणता येईल की, एक मोबाईलपासून आणि दुसरा लोखंडापासून बनलेल्या, अशा दोन महाकाय व्यक्तींच्या लढाईचं चित्रण असणाऱ्या सिनेमात सूक्ष्मतेला जागा ती कितीशी असणार?

‘२.०’ त्याच्या केंद्राशी तंत्रज्ञानाच्या पर्यावरणावर होणाऱ्या वाईट परिणामांच्या निमित्तानं सरकारी यंत्रणांकडून या गोष्टींकडे केला जाणारा कानाडोळा, भ्रष्टाचार अशा शंकरच्या चित्रपटांमध्ये हमखास आढळणाऱ्या मुद्द्यांना हात घालू पाहतो. अर्थात इथवर सगळं ठीकही आहे. कारण त्याचा मुद्दा काही प्रमाणात योग्यही आहेच. पण पुढे जाऊन तो याद्वारे आपला खलनायक उभा करण्यासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शक्ती, मानवी ऑरा अशा संकल्पनांची मांडणी करू लागतो आणि अनेकविध संकल्पनांच्या गदारोळात चित्रपटाचा, त्यातील चांगल्या-वाईट सर्वच पात्रांचा नक्की उद्देश काय आहे हे कळणं अवघड होतं.

चित्रपटाच्या पूर्वार्धात कुठल्याही पात्राला मानवी भावना, संवेदना आहेत असं दिसत नाही. डॉ. वशीगरणपासून मंत्री, व्यावसायिक सगळे लोक एका विशिष्ट टोनला पकडून त्याच लहेजात यांत्रिकपणे बोलत राहतात. परिणामी चित्रपटात नायकत्व बहाल केल्या जाणाऱ्या बाजूकडील कुणाशीही भावनिक पातळीवर जोडलं जाणं अशक्य बनतं, आणि रजनीकांतपासून ते आदिल हुसैन आणि अगदी अमी जॅक्सनपर्यंत सगळेच लोक भावनाशून्य पद्धतीनं वावरताना दिसतात. याउलट उत्तरार्धात पक्षीराजाच्या बॅकस्टोरीच्या निमित्तानं त्याचा मुद्दा कळत आणि पटत असल्यानं तार्किकदृष्ट्या त्याची बाजू पटतच असते की, तो वर्तमानात येऊन लोकांना मारायला सुरुवात करतो. त्यामुळे तो काहीसा बरोबर असतानाही आपल्याला केवळ निर्बुद्ध लोकांचे जीव वाचवण्याच्या कामामुळे रजनी आणि त्याच्या फौजेची बाजू घ्यावी लागते. बरं, यातही पुन्हा चिट्टी विरुद्ध पक्षीराजा सामन्यात चिट्टीला अभिनय न जमणाऱ्या किंवा ओव्हरअॅक्टिंग करणाऱ्या एक्स्ट्राजचे प्राण वाचवण्यात रस नसल्यानं हे लोक नुसते स्टेडियमभर ओरडत फिरताना दिसतात. परिणामी (संभाव्य) नायक आणि खलनायक दोन्हींना कुठल्याच जीवाची पर्वा नसल्यानं आपणही तार्किकदृष्ट्या विचार करणं सोडून समोर घडणाऱ्या विध्वंसक दृश्यांना दाद देणं अधिक योग्य ठरतं. दरम्यान दृश्यं आणि संकल्पनांची पुनरावृत्ती होत गेल्यानं चित्रपटाचा उत्तरार्ध व्यतीत होत असलेल्या दार मिनिटागणिक अधिकाधिक रेंगाळत जातो.

रजनीकांत अनेकविध भूमिकांमध्ये त्याच्या शैलीनं रंग भरतो, तर अक्षय कुमारची कन्व्हिन्सिंग कामगिरी करतो. अमी जॅक्सन सिरिअल पाहणाऱ्या रोबोटच्या असल्यानं तिचाच हावभावशून्य आविर्भाव इतर वेळी खटकतो तसा इथं खटकत नाही. आदिल हुसैन मात्र मनोमन ‘ये कहाँ फंस गया मैं’ असं म्हणत असावा.

अर्थात असं असलं तरी ‘२.०’ अगदीच वाईट ठरत नाही, त्याचं कारण म्हणजे शंकरची कल्पनाशक्ती. त्याच्या कल्पनासौंदर्याला वेळोवेळी दाद द्यावीशी वाटते. केवळ स्वीकारार्ह ठरणाऱ्या दर्जाच्या व्हीएफएक्सच्या भडिमारातही माणसाला चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात असलेली सेल फोन्सची भिंत, एकाच वेळी व्हायब्रेट होत स्क्रीन उजळून टाकणाऱ्या मोबाईल्सनं व्यापलेलं बेडरूम अशा पडदा व्यापून टाकणाऱ्या अनेकविध संकल्पनांचं कौतुक करावंसं वाटतं.

‘२.०’चं साऊंड डिझाईन खास उल्लेख करावं असं आहे. कारण प्रत्येक लहान-मोठा आवाज केवळ स्पष्टपणे ऐकूच येत नव्हता, तर त्याची अनुभूती होत होती. असंख्य फोन्सच्या व्हायब्रेशन्स होत असताना संपूर्ण थिएटर शब्दशः व्हायब्रेट होत असल्याचा आभास निर्माण करणं ही साधी गोष्ट नाही.

एकूणच, ‘२.०’कडून फारशा अपेक्षा न ठेवणं उत्तम आहे. कारण याआधीच्या चित्रपटात थीमॅटिक पातळीवर उभ्या केल्या गेलेल्या पचवता येतील अशा संकल्पना यात तशा नाहीतच. सदर चित्रपट तार्किक, भावनिक पातळीवर सदोष आणि अपरिणामकारक आहे. पण हा शंकरचा चित्रपट आहे, आणि त्याचा चित्रपट या ना त्या पातळीवर प्रभावी ठरणं तसं स्वाभाविक आहे. तसं ते इथंही घडतं. फक्त तो प्रभाव मर्यादित स्वरूपाचा आहे, इतकंच.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................